व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३६

जे वयाने लहान आहेत त्यांची मनापासून कदर करा

जे वयाने लहान आहेत त्यांची मनापासून कदर करा

“तरुणांची ताकद हेच त्यांचं वैभव आहे.”—नीति. २०:२९.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

सारांश *

१. वाढत्या वयामुळे आपल्याला पूर्वीसारखं काम करायला जमत नसलं, तरी सध्या आपण काय करू शकतो?

आपलं वय होत जातं तशी आपली ताकद कमी होत जाते. त्यामुळे पूर्वीइतकी यहोवाची सेवा करायला आपल्याला जमेल का, अशी भीती आपल्याला वाटू शकते. पण वयामुळे आपली ताकद जरी कमी होत असली, तरी आपल्याकडे अनेक वर्षांपासून कमवलेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा खजिना आहे. आणि या खजिन्याचा वापर आपण वयाने लहान असलेल्यांना प्रशिक्षण देण्यासाठी करू शकतो. त्यामुळे त्यांना यहोवाच्या सेवेत पुढे येण्यासाठी आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या पेलण्यासाठी मदत होईल. बऱ्‍याच काळापासून मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या एका बांधवाने म्हटलं: “वाढत्या वयामुळे आता मंडळीत मला पूर्वीसारखं काम करायला जमत नाही. पण हे काम सांभाळायला आता मंडळीत बरेच तरुण बांधव तयार आहेत हे पाहून मला खूप बरं वाटतं.”

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

मागच्या लेखात आपण पाहिलं होतं, की वयस्कर भाऊबहिणींची कदर केल्यामुळे मंडळीतल्या इतरांना कसा फायदा होऊ शकतो. आता या लेखात आपण पाहू या, की आपण जरी वयस्कर असलो, तरी वयाने लहान असलेल्यांसोबत मिळून आपण काम कसं करू शकतो. आणि त्यासाठी नम्र राहिल्यामुळे, मर्यादांची जाणीव ठेवल्यामुळे, इतरांची मदत स्वीकारल्यामुळे आणि उदार असल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल तेसुद्धा जाणून घेऊ या.

नम्र राहा

३. फिलिप्पैकर २:३, ४ या वचनांनुसार नम्र व्यक्‍ती कशी असते, आणि त्यामुळे तिला कसा फायदा होतो?

वयाने लहान असलेल्यांना मदत करायची असेल, तर आपण नम्र असणं खूप गरजेचं आहे. कारण नम्र व्यक्‍ती नेहमी इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजते. (फिलिप्पैकर २:३, ४ वाचा.) जेव्हा वयस्कर लोक अशी मनोवृत्ती दाखवतात तेव्हा एखादं काम आपण पूर्वी जसं करत होतो, तसंच केलं जावं असा हट्ट ते धरणार नाहीत. (उप. ७:१०) तर, तेच काम वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं याची जाणीव त्यांना असते. हे खरं आहे, की त्यांच्या अनुभवामुळे तरुण पिढीला खूप फायदा होतो. पण या जगाचं दृश्‍य बदलत आहे याची ते नेहमी जाणीव ठेवतात. आणि नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा ते प्रयत्न करतात.—१ करिंथ. ७:३१.

वयस्कर भाऊबहीण इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या अनुभवाचा वापर करून उदारता दाखवतात (परिच्छेद ४-५ पाहा) *

४. आज विभागीय पर्यवेक्षक लेव्यांसारखी मनोवृत्ती कशी दाखवतात?

नम्र मनोवृत्तीमुळे वयस्कर भाऊबहिणींना याची जाणीव असते, की आधी जितकं आपल्याला जमत होतं तितकं आता जमत नाही. या बाबतीत विभागीय प्रर्यवेक्षकांचाच विचार करा. वयाची सत्तरी गाठल्यावर त्यांना दुसरी जबाबदारी दिली जाते. या नवीन जबाबदारीशी जुळवून घेणं त्यांना कदाचित कठीण जाऊ शकतं. विभागीय पर्यवेक्षक म्हणून भाऊबहिणींची सेवा करायला खरंतर त्यांना खूप आवडायचं, आणि आतासुद्धा त्यांना ते काम करायला खूप आवडलं असतं. पण आपल्यापेक्षा वयाने कमी असलेले लोक आणखी चांगल्या प्रकारे हे काम करू शकतात हे त्यांना माहीत आहे. प्राचीन इस्राएलमधल्या लेव्यांसारखीच ते मनोवृत्ती दाखवतात. भेट मंडपात सेवा करणारा एक लेवी ५० वर्षांचा झाल्यावर सेवेतून निवृत्त व्हायचा. पण त्याची इच्छा असेल, तर भेट मंडपात सेवा करणाऱ्‍या इतर लेव्यांना तो मदत करू शकत होता, आणि तो हे काम खूप आनंदाने करायचा. (गण. ८:२५, २६) त्याचप्रमाणे आज विभागीय पर्यवेक्षक ७० वर्षांचे होतात तेव्हा त्यांची जबाबदारी बदलते. त्यानंतर विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करण्याऐवजी त्यांना कोणत्याही एका मंडळीत सेवा करायला नेमलं जातं. त्यांच्यामुळे त्या मंडळीतल्या भाऊबहिणींना खूप प्रोत्साहन आणि मदत मिळते.

५. डॅन आणि कॅथीच्या उदाहणातून तुम्ही काय शिकू शकता?

डॅन नावाच्या भावाचाच विचार करा. ते २३ वर्षांपासून विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करत होते. पण जेव्हा ते ७० वर्षांचे झाले तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पत्नीला, कॅथीला खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. हा बदल त्यांनी कसा स्वीकारला? डॅन म्हणतात, ‘आता मी आधीपेक्षा जास्त व्यस्त आहेत.’ मंडळीत ते वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या सांभाळतात आणि बांधवांना सहायक सेवक बनायला मदत करतात. तसंच, सार्वजनिक साक्षकार्य आणि तुरुंगात प्रचारकार्य कसं करायचं हेसुद्धा ते मंडळीतल्या भाऊबहिणींना शिकवतात. तर वयस्कर भाऊबहिणींनो, तुम्ही पूर्ण-वेळच्या सेवेत असोत किंवा नसोत, इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही खूप काही करू शकता. त्यासाठी नवीन परिस्थितीशी जुळवून घ्या आणि नवीन ध्येय ठेवा. तसंच, तुम्ही काय करू शकत नाही याचा नाही, तर तुम्ही काय करू शकता यावर विचार करा.

मर्यादांची जाणीव ठेवा

६. स्वतःच्या मर्यादांची जाणीव असणं का महत्त्वाचं आहे? उदाहरण द्या.

स्वतःच्या मर्यादांची जाणीव असणारी व्यक्‍ती, आपण काय करू शकतो आणि काय नाही हे ओळखून त्याप्रमाणे काम करते. (नीति. ११:२) त्यामुळे ती जे काही करते त्यातून तिला आनंद मिळतो. मर्यादांची जाणीव असलेल्या व्यक्‍तीची तुलना आपण सायकल चालवणाऱ्‍याशी करू शकतो. रस्त्याला चढ असेल तर सायकल चालवणारा शक्यतो खाली उतरून रस्ता चालत पार करायचा प्रयत्न करेल. पण चालत असल्याल्यामुळे त्याचा वेग जरी कमी झाला, तरी तो थांबत नाही. तो पुढे जात राहतो. त्याचप्रमाणे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव असलेली व्यक्‍ती वयामुळे येणाऱ्‍या मर्यादा ओळखून आपल्या कामाचा वेग कमी करते. पण वेग कमी असला, तरी ती थांबत नाही. ती यहोवाची आणि इतरांची सेवा करत राहते.—फिलिप्पै. ४:५.

७. बर्जिल्ल्यला आपल्या मर्यादांची जाणीव होती हे त्याने कसं दाखवलं?

बायबल काळातल्या बर्जिल्ल्यचं उदाहरण घ्या. तो ८० वर्षांचा होता तेव्हा दावीद राजाने त्याला आपल्या दरबारात सल्लागार म्हणून काम करण्यासाठी बोलवलं. पण बर्जिल्ल्यने हे काम स्वीकारलं नाही. कारण त्याला आपल्या मर्यादांची जाणीव होती. वय झाल्यामुळे आपल्याला हे काम करता येणार नाही, हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने आपल्याऐवजी किम्हाम नावाच्या एका तरुण व्यक्‍तीला घ्यावं अशी विनंती केली. (२ शमु. १९:३५-३७) आजसुद्धा बर्जिल्ल्यप्रमाणेच वयस्कर बांधव आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बांधवांना सेवा करायची संधी देतात.

मंदिराचं बांधकाम शलमोन करेल या यहोवाच्या निर्णयाला दावीद राजाने पाठिंबा दिला (परिच्छेद ८ पाहा)

८. दावीद राजाला आपल्या मर्यादांची जाणीव होती हे कशावरून दिसून येतं?

दावीद राजालासुद्धा आपल्या मर्यादांची जाणीव होती. यहोवासाठी मंदिर बांधायची त्याची मनापासून इच्छा होती. पण यहोवाने त्याला सांगितलं, की हे मंदिर तो नाही, तर त्याचा मुलगा शलमोन बांधेल. त्या वेळी दावीदने असा विचार केला नाही, की शलमोन तर “वयाने लहान आहे व त्याला अनुभवसुद्धा नाही;” त्यामुळे मंदिर बांधण्याचं काम आपणच चांगलं करू शकतो. (१ इति. २९:१) उलट, त्याने देवाचं म्हणणं ऐकलं आणि मंदिर बांधायच्या कामाला आपला पूर्ण पाठिंबा दिला. (१ इति. १७:४; २२:५) कारण दावीदला हे माहीत होतं, की मंदिराचं बांधकाम हे त्याच्या वयामुळे किंवा अनुभवामुळे नाही, तर फक्‍त यहोवाच्या आशीर्वादामुळे आणि मदतीमुळेच शक्य होऊ शकतं. आज वयस्कर बांधवांच्या जबाबदाऱ्‍या जरी बदलल्या, तरी दावीदप्रमाणेच ते आवेशाने सेवा करत राहतात. आणि जे काम पूर्वी ते स्वतः करायचे ते आता तरुण बांधव करत असले, तरी ते आपलं काम चांगल्या प्रकारे पूर्ण करतील याची त्यांना खातरी आहे. कारण यहोवा त्यांना मदत करेल आणि त्यांच्या कामावर आशीर्वाद देईल हे ते ओळखतात.

९. शिगेओ यांना आपल्या मर्यादांची जाणीव होती हे त्यांनी कसं दाखवून दिलं?

मर्यादांची जाणीव राखण्याच्या बाबतीत आजच्या काळातल्या एका बांधवाचं उदाहरण पाहू या. शिगेओ नावाच्या बांधवाचं हे उदाहरण आहे. १९७६ मध्ये जेव्हा ते ३० वर्षांचे होते तेव्हा त्यांना शाखा समितीचे सदस्य म्हणून नेमण्यात आलं. नंतर २००४ मध्ये त्यांना शाखा समितीचे संयोजक म्हणून नेमलं गेलं. पुढे काही वर्षांनंतर त्यांना जाणवलं, की पूर्वीइतकी ताकद नसल्यामुळे आता त्यांना त्यांचं काम करायला जास्त वेळ लागतो. तेव्हा याबद्दल त्यांनी यहोवाला प्रार्थना केली. आणि आपल्याऐवजी एका तरुण बांधवाने ही जबाबदारी सांभाळली तर जास्त चांगलं होईल असं त्यांना वाटलं. आज जरी ते शाखा समितीचे संयोजक म्हणून काम सांभाळत नसले, तरी समितीचे सदस्य म्हणून ते सेवा करत आहेत. तर मग, बर्जिल्ल्य, दावीद राजा आणि शिगेओ याच्या उदाहरणांतून काय दिसून येतं? हेच, की जो नम्र असतो आणि ज्याला आपल्या मर्यादांची जाणीव असते तो आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्‍यांच्या अनुभवाकडे नाही, तर त्यांच्या क्षमतांकडे लक्ष देतो. तसंच, तो त्यांच्याशी स्पर्धा करत नाही, तर त्यांच्यासोबत मिळून काम करतो.—नीति. २०:२९.

इतरांची मदत घ्यायला तयार राहा

१०. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बांधवांबद्दल वयस्कर भाऊबहिणींना कसं वाटतं?

१० वयस्कर बांधव आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्‍या बांधवांना यहोवाचा आशीर्वादच मानतात. कारण मंडळीतल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या पार पाडण्याची क्षमता त्यांच्यात असते. शिवाय, आपल्या भाऊबहिणींची सेवा करण्याची इच्छाही त्यांच्यात असते. आणि म्हणूनच वयस्कर भाऊबहिणींना त्यांचा खूप अभिमान वाटतो.

११. वयाने लहान असलेल्यांकडून मदत स्वीकारल्यामुळे आशीर्वाद मिळतात, हे रूथ ४:१३-१६ यातून कसं स्पष्ट होतं?

११ आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्यांकडून आनंदाने मदत स्वीकारण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण बायबलमधल्या नामीचं आहे. जेव्हा तिचा मुलगा वारला तेव्हा तिने आपल्या सुनेला, रूथला माहेरी जाण्याची विनंती केली. पण रूथने नकार दिला आणि ती नामीसोबत बेथलेहेमला गेली. तिथे तिने नामीला खूप मदत केली आणि तिची काळजी घेतली. आणि नामीनेही ती मदत आनंदाने स्वीकारली. (रूथ १:७, ८, १८) त्यामुळे दोघींना किती फायदा झाला हे आपल्याला माहीतच आहे. (रूथ ४:१३-१६ वाचा.) नामीप्रमाणेच आज वयस्कर भाऊबहीणसुद्धा इतरांची मदत आनंदाने स्वीकारतात.

१२. आभार व्यक्‍त करण्याच्या बाबतीत प्रेषित पौलने एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?

१२ प्रेषित पौलनेसुद्धा इतरांकडून मिळालेल्या मदतीची कदर केली. उदाहरणार्थ, फिलिप्पैमधल्या ख्रिस्ती बांधवांनी त्याला काही गरजेच्या वस्तू पाठवल्या तेव्हा त्याने त्यांचे आभार मानले. (फिलिप्पै. ४:१६) तसंच, तीमथ्यने त्याला जी मदत केली होती त्याबद्दलसुद्धा त्याने आभार मानले. (फिलिप्पै. २:१९-२२) इतकंच नाही, तर पौलला जेव्हा कैदी म्हणून रोमला घेऊन जात होते तेव्हा अनेक बांधव त्याला धीर देण्यासाठी भेटायला आले. तेव्हासुद्धा त्यांना पाहून पौलने देवाचे खूप आभार मानले. (प्रे. कार्यं २८:१५) पौल खूप आवेशी होता. त्याने हजारो मैल प्रवास करून प्रचार केला होता आणि मंडळ्यांना प्रोत्साहन दिलं होतं. पण असं असलं, तरी भाऊबहिणींकडून मदत स्वीकारायला त्याला कमीपणा वाटला नाही.

१३. वयस्कर भाऊबहिणींना मंडळीतल्या तरुणांची कदर आहे हे ते कसं दाखवू शकतात?

१३ वयस्कर भाऊबहिणींनो, तुमच्यापेक्षा लहान असलेल्या भाऊबहिणींबद्दल तुम्हाला कदर आहे हे तुम्ही वेगवेगळ्या मार्गांनी दाखवू शकता. ते जर तुम्हाला त्यांच्या गाडीतून घेऊन जायला तयार असतील; तसंच, तुमच्यासाठी काही खरेदी करायला किंवा इतर काही मार्गांनी तुमची मदत करायला तयार असतील, तर आनंदाने त्यांची मदत स्वीकारा. हे कधीही विसरू नका, की यहोवा त्यांच्याद्वारेच तुमच्यावर असलेलं प्रेम व्यक्‍त करत आहे. म्हणून तुम्ही जर त्यांची मदत स्वीकारली तर तुमच्यात खूप चांगली मैत्री होऊ शकते. म्हणून त्यांना यहोवासोबत जवळची मैत्री करायला नेहमी मदत करा. मंडळीत तरुण भाऊ सेवेसाठी पुढे येतात हे पाहून तुम्हाला किती आनंद होतो हे त्यांना सांगा. त्यांच्यासोबत वेळ घालवा. आणि यहोवाच्या सेवेत तुम्हाला कोणकोणते अनुभव आले ते त्यांना सांगा. असं करून खरंतर तुम्ही यहोवाचे आभार मानता. कारण त्यानेच या तरुण भाऊबहिणींना मंडळीत आणलं आहे.—कलस्सै. ३:१५; योहा. ६:४४; १ थेस्सलनी. ५:१८.

उदार असा

१४. दावीद राजाने उदारता कशी दाखवली?

१४ दावीद राजामध्ये आणखी एक सुंदर गुण होता. तो म्हणजे उदारता. आज वयस्कर भाऊबहीणसुद्धा हा गुण दाखवू शकतात. मंदिराचं बांधकाम करण्यासाठी दावीद राजाने स्वतःच्या खजिन्यातून भरपूर पैसा आणि मौल्यवान वस्तू दान केल्या होत्या. (१ इति. २२:११-१६; २९:३, ४) मंदिराच्या बांधकामाचं श्रेय आपल्या मुलाला शलमोनला मिळेल हे माहीत असतानासुद्धा त्याने दान दिलं. आज वयस्कर भाऊबहिणींना वाढत्या वयामुळे संघटनेच्या बांधकाम प्रकल्पांवर काम करणं कदाचित शक्य नसेल. पण आपल्या परिस्थितीनुसार दान देऊन ते या बांधकाम प्रकल्पांना हातभार लावू शकतात. तसंच, तरुण बांधवांना मदत करण्यासाठी ते आपल्या अनुभवाचासुद्धा उपयोग करू शकतात.

१५. प्रेषित पौलने कशा प्रकारे उदारता दाखवली?

१५ उदारता दाखवण्याच्या बाबतीत प्रेषित पौलनेसुद्धा एक चांगलं उदाहरण मांडलं. पौल जेव्हा मिशनरी काम करत होता तेव्हा त्याने तीमथ्यलाही आपल्यासोबत घेतलं. आणि प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या आपल्या सगळ्या पद्धती त्या तरुणाला शिकवल्या. त्याने त्या फक्‍त आपल्याकडेच ठेवल्या नाहीत, तर उदारपणे त्याला शिकवल्या. (प्रे. कार्यं १६:१-३) यामुळे तीमथ्यला आनंदाच्या संदेशाचा प्रचार आणखी चांगल्या प्रकारे करता आला. (१ करिंथ. ४:१७) पुढे पौलकडून शिकलेल्या पद्धती त्याने इतरांनाही शिकवल्या.

१६. शिगेओ यांनी इतरांना प्रशिक्षण का दिलं?

१६ मंडळीत पूर्वी जे आपण काम करत होतो ते जर वयाने लहान असलेल्या भाऊबहिणींना आपण शिकवलं तर मंडळीत आपल्याला करायला काहीच उरणार नाही, अशी भीती वयस्कर बांधवांना नसते. या बाबतीत शिगेओ या बांधवाचं उदाहरण आपण पाहिलं होतं. त्यांनीसुद्धा शाखा समितीत वयाने लहान असलेल्या बांधवांना चांगलं प्रशिक्षण दिलं. ज्या देशात ते सेवा करत होते तिथे राज्याच्या प्रचाराचं काम आणखी वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी असं केलं. त्यामुळे गरज पडली तेव्हा संयोजकाची जबाबदारी सांभाळण्यासाठी एक प्रशिक्षित बांधव तिथे तयार होता. शिगेओ हे जवळजवळ ४५ वर्षांपासून शाखा समितीत सेवा करत आहेत. आणि या अनुभवाचा वापर करून ते आजही शाखा समितीत वयाने लहान असलेल्या बांधवांना प्रशिक्षण देत आहेत. खरंच, वयस्कर बांधव यहोवाच्या लोकांसाठी एक मोठा आशीर्वादच आहेत!

१७. वयस्कर बांधवांकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या ते इतरांना देऊ शकतात? (लूक ६:३८)

१७ विश्‍वासूपणे आणि एकनिष्ठेने यहोवाची सेवा करणं हाच जीवन जगण्याचा सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणि आपल्यामध्ये असणारे वयस्कर भाऊबहीण याचं जिवतं उदाहरण आहे! बायबलची तत्त्वं शिकल्यामुळे आणि त्यांप्रमाणे जीवन जगल्यामुळे आपलं भलंच होतं हे तुम्ही तुमच्या उदाहरणातून दाखवून देता. एखादं काम आधी कसं केलं जायचं हे तुमच्या अनुभवातून तुम्हाला माहीत आहे. पण आता परिस्थितीनुसार त्यात बदल करणंसुद्धा गरजेचं आहे हे तुम्ही ओळखता. तुमच्यापैकी काहींनी अलीकडेच बाप्तिस्मा घेतला असला, तरी तुमच्याकडे यहोवाला देण्यासारखं बरंच काही आहे. या वयातसुद्धा यहोवाला ओळखल्यामुळे तुम्ही किती आनंदी आहात, हे तुम्ही इतरांना सांगू शकता. तुमचे अनुभव आणि तुम्हाला शिकायला मिळालेल्या गोष्टी ऐकायला त्यांना नक्कीच आवडेल. तुम्ही जर तुमच्या अनुभवाच्या खजिन्यातून इतरांना देत राहिलात, तर यहोवा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल.—लूक ६:३८ वाचा.

१८. वयस्कर आणि वयाने लहान असलेले एकमेकांना कशी मदत करू शकतात?

१८ वयस्कर भाऊबहिणींनो, जे तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांच्यासोबत मैत्री करा. म्हणजे तुम्हाला आणि त्यांनाही फायदा होईल. (रोम. १:१२) वयस्कर आणि वयाने लहान असलेले या दोघांकडेही असं काहीतरी असतं जे ते एकमेकांना देऊ शकतात. जसं की, वयस्कर भाऊबहिणींकडे अनेक वर्षांपासून मिळवलेल्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा खजिना असतो. तर वयाने लहान असलेल्यांकडे तुलनेत जास्त ताकद आणि उत्साह असतो. जेव्हा हे दोघेपण मित्र म्हणून एकमेकांसोबत मिळून काम करतात तेव्हा आपल्या प्रेमळ पित्याचा, यहोवा देवाचा गौरव होतो आणि मंडळीतल्या सगळ्यांनाच फायदा होतो.

गीत ५३ ऐक्य जपू या

^ परि. 5 आपल्या मंडळ्यांमध्ये असे बरेच तरुण भाऊबहीण आहेत जे आवेशाने यहोवाची सेवा करत आहेत. अशा तरुणांचा यहोवाच्या सेवेत चांगला वापर करून घेण्यासाठी मंडळीतले वयस्कर भाऊबहीण बरंच काही करू शकतात; मग ते कोणत्याही संस्कृतीचे असोत.

^ परि. 55 चित्राचं वर्णन: ७० वर्षांचे झाल्यावर एका विभागीय पर्यवेक्षकाला आणि त्यांच्या पत्नीला संघटनेकडून एक वेगळी जबाबदारी मिळते. सध्या ते ज्या मंडळीत सेवा करत आहेत तिथल्या भाऊबहिणींना प्रशिक्षण देण्यासाठी ते अनेक वर्षांच्या आपल्या अनुभवाचा उपयोग करत आहेत