व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३७

“मी सर्व राष्ट्रांना हलवीन”

“मी सर्व राष्ट्रांना हलवीन”

“मी सर्व राष्ट्रांना हलवीन आणि सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान वस्तू येतील.” —हाग्गय २:७.

गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!

सारांश *

१-२. आपल्या काळात काय होईल असं हाग्गय संदेष्ट्याने सांगितलं होतं?

“काही क्षणातच दुकानं आणि जुन्या इमारती धडाधड कोसळू लागल्या.” “सगळीकडे भीती पसरली होती . . . लोक म्हणत होते, की हे सगळं फक्‍त एक-दोन मिनिटंच चालू होतं. पण माझ्यासाठी तो कधीही न संपणारा अनुभव होता.” २०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या भयंकर भूकंपातून वाचलेल्या काहींनी असं म्हटलं. अशी एखादी भयानक घटना जर तुम्ही अनुभवली असती, तर तुम्ही कदाचित ती कधीच विसरू शकला नसता.

पण सध्या या क्षणाला आपण एका वेगळ्याच प्रकारच्या भूकंपाचे धक्के अनुभवत आहोत. ते धक्के फक्‍त आपल्या शहराला किंवा देशाला नाही, तर जगातल्या सगळ्या राष्ट्रांना बसत आहेत. आणि हे बऱ्‍याच वर्षांपासून चालू आहे. त्याबद्दल हाग्गय संदेष्ट्याने असं म्हटलं: “सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, ‘थोड्याच काळात, मी पुन्हा एकदा आकाश व पृथ्वी आणि समुद्र व कोरडी जमीन हालवीन.’”—हाग्ग. २:६.

३. राष्ट्रांना हालवलं जाणं हे खरोखरच्या भूकंपापेक्षा कसं वेगळं आहे?

हाग्गय संदेष्ट्याने राष्ट्रांना हालवण्याबाबत जे म्हटलं होतं, ते खरोखरच्या भूकंपासारखं नाही. कारण भूकंपामुळे फक्‍त नुकसानच होतं. पण राष्ट्रांना हालवल्यामुळे चांगले परिणाम घडून येतात. याबद्दल यहोवा स्वतः म्हणतो, “मी सर्व राष्ट्रांना हलवीन आणि सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान वस्तू येतील आणि मी हे मंदिर माझ्या वैभवाने भरून टाकीन.” (हाग्ग. २:७) ही भविष्यवाणी हाग्गयच्या काळात कशी पूर्ण झाली? आणि आज आपल्या काळात कशी पूर्ण होत आहे? या प्रश्‍नांची उत्तरं आपण पुढे पाहणार आहोत. तसंच, राष्ट्रांना हालवण्याच्या कामात आपण कसा सहभाग घेऊ शकतो, हेसुद्धा आपण पाहणार आहोत.

हाग्गयच्या दिवसांत एक प्रोत्साहनदायक संदेश

४. यहोवाने हाग्गय संदेष्ट्याला कोणतं काम नेमून दिलं?

हाग्गय संदेष्ट्याला यहोवाकडून एक महत्त्वाचं काम मिळालं होतं. त्याआधी काय-काय घडलं ते आपण पाहू. इ.स.पू. ५३७ मध्ये यहुदी लोक बॅबिलोनच्या बंदिवासातून यरुशलेमला आले, तेव्हा त्यांच्यामध्ये हाग्गयसुद्धा असावा. यरुशलेममध्ये आल्यानंतर काही काळातच त्यांनी मंदिराचं बांधकाम सुरू केलं. (एज्रा ३:८, १०) पण लवकरच त्यांच्या कामाला विरोध होऊ लागला. त्यामुळे ते निराश झाले आणि त्यांनी बांधकाम करायचं सोडून दिलं. (एज्रा ४:४; हाग्ग. १:१, २) म्हणून यहोवाने हाग्गयला लोकांचा आवेश पुन्हा वाढवायला आणि मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सांगितलं. *एज्रा ६:१४, १५.

५. हाग्गयचा संदेश ऐकून यहुद्यांना धीर मिळाला असेल असं का म्हणता येईल?

हाग्गयने जो संदेश सांगितला त्यामुळे यहुद्यांचा यहोवावरचा विश्‍वास वाढला. निराश झालेल्या यहुद्यांना हाग्गय धैर्याने असं म्हणाला: “यहोवा म्हणतो, ‘देशातल्या सर्व लोकांनो, तुम्हीही हिंमत धरा आणि काम करा. कारण मी तुमच्यासोबत आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.” (हाग्ग. २:४) ‘सैन्यांचा देव यहोवा,’ हे शब्द ऐकून यहुद्यांना खरंच किती धीर मिळाला असेल! यहोवाच्या हाताखाली स्वर्गदूतांचं एक भलंमोठं सैन्य आहे. त्यामुळे यहुद्यांना यहोवावर भरवसा ठेवायची गरज होती.

६. राष्ट्रांना हालवून सोडल्यामुळे कोणत्या गोष्टी घडणार होत्या?

यहोवाने हाग्गयला असा संदेश द्यायला सांगितला होता, की तो सर्व राष्ट्रांना हालवून सोडेल. हे ऐकून निराश झालेल्या आणि मंदिराचं बांधकाम सोडून दिलेल्या यहुद्यांना खूप धीर मिळाला. त्यांना जाणवलं, की जगातल्या बहुतेक राष्ट्रांवर राज्य करणाऱ्‍या महासत्तेला, म्हणजेच पर्शियाला यहोवा हालवून सोडणार आहे. यामुळे दोन गोष्टी घडणार होत्या. एक म्हणजे, मंदिराचं बांधकाम पूर्ण होणार होतं. आणि दुसरं म्हणजे, यहुदी नसलेले लोकही इथे उपासना करायला येणार होते. हा संदेश ऐकून यहुदी लोकांना नक्कीच खूप प्रोत्साहन मिळालं असेल.—जख. ८:९.

आजच्या काळात राष्ट्रांना हालवून सोडणारं काम

राष्ट्रांना हालवून सोडणाऱ्‍या कामात आज तुम्ही पूर्ण सहभाग घेत आहात का? (परिच्छेद ७-८ पाहा) *

७. जगाला हालवून सोडणाऱ्‍या कोणत्या कामात आज आपण सहभागी आहोत?

हाग्गयची भविष्यवाणी आजच्या काळात कशी पूर्ण होत आहे? आजसुद्धा यहोवा सर्व राष्ट्रांना हालवून सोडत आहे. आणि या कामात आपलासुद्धा सहभाग आहे. तो कसा? १९१४ मध्ये यहोवाने स्वर्गात आपलं राज्य स्थापन केलं आणि येशू ख्रिस्ताला त्याचा राजा म्हणून नेमलं. (स्तो. २:६) पण जगातल्या शासनकर्त्यांसाठी ही वाईट बातमी होती. कारण याचा अर्थ असा होता, की देवाने राष्ट्रांसाठी ठरवलेला काळ आता संपला होता. म्हणजे जेव्हा पृथ्वीवर यहोवाच्या वतीने राज्य करणारा एकही शासक नव्हता तो काळ आता संपला होता. (लूक २१:२४, तळटीप) त्यामुळे खासकरून १९१९ पासून यहोवाचे लोक असा संदेश सांगू लागले, की देवाचं राज्यच मानवांच्या सगळ्या समस्या दूर करेल. देवाच्या राज्याबद्दल असलेल्या या आनंदाच्या संदेशाने संपूर्ण जगाला हालवून सोडलं आहे.—मत्त. २४:१४.

८. स्तोत्र २:१-३ या वचनांनुसार बहुतेक राष्ट्रांनी राज्याच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला आहे?

राज्याच्या या संदेशाला लोकांनी कसा प्रतिसाद दिला आहे? अनेकांना तो आवडला नाही. (स्तोत्र २:१-३ वाचा.) हा संदेश ऐकून राष्ट्रं खवळली आहेत. कारण यहोवाने निवडलेला शासक त्यांना मान्य नाही. राज्याबद्दलचा संदेश, ‘आनंदाचा संदेश’ आहे असं त्यांना वाटत नाही. उलट, काही सरकारांनी प्रचाराच्या कामावर बंदीसुद्धा घातली आहे. अनेक देशांचे राज्यकर्ते देवाची उपासना करायचा दावा तर करतात, पण आपल्या सत्तेचा आणि अधिकाराचा त्याग करायला ते तयार नसतात. त्यामुळे येशूच्या दिवसांत जसं झालं, तसंच आजही होत आहे. आज अनेक राज्यकर्ते येशूच्या शिष्यांचा छळ करत आहेत. आणि असं करून ते यहोवाच्या अभिषिक्‍ताचा, म्हणजे येशूचा विरोध करत आहेत.—प्रे. कार्यं ४:२५-२८.

९. जी राष्ट्रं राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद न देता त्याचा विरोध करतात त्यांच्याशी यहोवा कसा वागतो?

जे राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद न देता त्याचा विरोध करतात त्यांच्याशी यहोवा कसा वागतो? याबद्दल स्तोत्र २:१०-१२ मध्ये असं म्हटलं आहे, “म्हणून राजांनो, आता तरी शहाणे व्हा; पृथ्वीच्या न्यायधीशांनो, दिलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष द्या. यहोवाचं भय मानून त्याची सेवा करा, आनंदाने त्याच्याबद्दल आदर बाळगा. देवाच्या मुलाचा सन्मान करा, नाहीतर देव संतापेल आणि तुमचा नाश होईल, कारण देवाचा क्रोध लगेच भडकतो. त्याचा आश्रय घेणारे सुखी आहेत.” यहोवा खूप प्रेमळ आहे, त्यामुळे तो या विरोधकांना त्यांचं मन बदलण्याची आणि आपलं राज्य स्वीकारण्याची संधी देतो. पण वेळ खूप कमी उरला आहे. आपण सध्या या दुष्ट जगाच्या शेवटच्या दिवसांत जगत आहोत. (२ तीम. ३:१; यश. ६१:२) त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर सत्य शिकून घेतलं पाहिजे आणि यहोवाची उपासना करण्याची निवड केली पाहिजे.

राष्ट्रांना हालवून सोडण्याच्या कामामुळे होणारे चांगले परिणाम

१०. हाग्गय २:७-९ या वचनात सांगितल्याप्रमाणे राष्ट्रांना हालवल्यामुळे काही जण चांगला प्रतिसाद कसा देतात?

१० ‘सर्व राष्ट्रांना हालवलं जाईल,’ असं जे हाग्गय संदेष्ट्याने म्हटलं त्याला काही जण चांगला प्रतिसाद देतात. हाग्गयने म्हटलं, की राष्ट्रांना हालवल्यामुळे “सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान वस्तू” [म्हणजे चांगल्या मनाचे लोक] यहोवाची उपासना करायला येतील. * (हाग्गय २:७-९ वाचा.) शेवटच्या दिवसांत असं घडेल हे यशया आणि मीखा संदेष्ट्यानेसुद्धा सांगितलं.—यश. २:२-४, मीखा. ४:१, २.

११. एका भावाने पहिल्यांदा राज्याचा संदेश ऐकला तेव्हा त्यांनी काय केलं?

११ जगाला हालवून सोडणाऱ्‍या संदेशामुळे लोकांवर कसा परिणाम होतो हे आता आपण पाहू या. सध्या आपल्या जागतिक मुख्यालयात काम करणाऱ्‍या केन नावाच्या बांधवाचं उदाहरण घ्या. जवळजवळ ४० वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा राज्याचा संदेश ऐकला, तो दिवस त्यांना आजही चांगला आठवतो. केन म्हणतात, “मी देवाच्या वचनातून पहिल्यांदा सत्याबद्दल ऐकलं आणि आपण या दुष्ट जगाच्या शेवटच्या दिवसांत जगतोय हे मला समजलं, तेव्हा मला खूप आनंद झाला. मला जर देवाची पसंती आणि कायमचं जीवन मिळवायचं असेल तर मी या अस्थिर जगातून बाहेर पडून ठामपणे यहोवाची बाजू घेतली पाहिजे, हे मला समजलं. मी यहोवाला प्रार्थना केली आणि वेळ न घालवता तेच केलं. मी या जगाशी असलेला संबंध तोडून देवाच्या स्थिर राज्यात आश्रय घेतला.”

१२. या शेवटल्या दिवसांत यहोवाच्या नावाचा गौरव कसा होत आहे?

१२ यहोवा आज आपल्या लोकांना आशीर्वादित करत आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. या शेवटच्या दिवसांत यहोवाच्या उपासकांची संख्या खूप वाढत आहे. १९१४ मध्ये त्यांची संख्या जवळपास ५,००० इतकीच होती. पण आज त्यांची संख्या ८० लाखांपेक्षा जास्त आहे. शिवाय, दरवर्षी स्मारकविधीला इतर लाखो लोकसुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित राहतात. अशा प्रकारे यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराची अंगणं [म्हणजे शुद्ध उपासनेसाठी त्याने केलेली व्यवस्था] ‘सर्व राष्ट्रांतल्या मौल्यवान वस्तूंनी’ भरून गेली आहेत. आणि जेव्हा ते स्वतःच्या जीवनात बदल करतात आणि नवीन व्यक्‍तिमत्त्व धारण करतात तेव्हा यहोवाच्या नावाचा गौरव होतो.—इफिस. ४:२२-२४.

जगभरातले देवाचे लोक आनंदाने देवाच्या राज्याबद्दल लोकांना सांगत आहेत (परिच्छेद १३ पाहा)

१३. देवाच्या उपासकांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे आणखी कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१३ देवाच्या उपासकांमध्ये होणाऱ्‍या वाढीमुळे इतर भविष्यवाण्यासुद्धा पूर्ण होत आहेत. जसं की, यशया ६०:२२ मधली भविष्यवाणी. तिथं असं म्हटलं आहे: “जो सगळ्यात लहान, तो हजार होईल, आणि जो सगळ्यात छोटा, तो शक्‍तिशाली राष्ट्र बनेल. मी यहोवा, योग्य वेळी हे लगेच घडवून आणीन.” आज यहोवाच्या उपासकांची संख्या वाढत असल्यामुळे आणखी एक खूप चांगली गोष्ट होत आहे. यहोवाची उपासना करायला येणाऱ्‍या या ‘मौल्यवान वस्तूंकडे,’ म्हणजे चांगल्या मनाच्या लोकांकडे आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्याची इच्छा आणि आवेश आहे. इतकंच नाही, तर त्यांच्यामध्ये वेगवेगळी कौशल्यं आणि क्षमतासुद्धा आहेत. यालाच यशयाने “राष्ट्रांचं दूध,” असं म्हटलं. (यश. ६०:५, १६) याचा यहोवाच्या लोकांना खूप उपयोग होत आहे. त्यामुळे आज २४० देशांमध्ये प्रचाराचं काम केलं जात आहे आणि १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रकाशनं तयार केली जात आहेत.

निर्णय घेण्याची हीच वेळ आहे

१४. आज लोकांनी कोणता निर्णय घेणं गरजेचं आहे?

१४ या शेवटल्या दिवसांत राष्ट्रांना हालवलं जात असल्यामुळे लोकांवर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यांना हे ठरवायचं आहे, की ते कोणाला पाठिंबा देतील; देवाच्या राज्याला, की या दुष्ट जगातल्या सरकारांना? आज यहोवाचे लोक ज्या देशांमध्ये राहतात, तिथल्या कायद्यांचं ते पालन करतात, पण कोणत्याही राजकीय गोष्टींमध्ये ते सहभाग घेत नाहीत. (रोम. १३:१-७) कारण देवाचं राज्यच मानवांच्या सगळ्या समस्यांचा अंत करेल हे त्यांना माहीत आहे. आणि ते राज्य या जगाचा भाग नाही, हे ते ओळखतात.—योहा. १८:३६, ३७.

१५. प्रकटीकरणाच्या पुस्तकात कोणत्या एका मोठ्या परीक्षेबद्दल सांगितलं आहे?

१५ प्रकटीकरणाच्या पुस्तकात असं सांगितलं आहे, की देवाच्या लोकांच्या एकनिष्ठेची मोठी परीक्षा होईल. या परीक्षेमुळे आपल्याला विरोधाचा आणि छळाचा सामना करावा लागेल. या जगातली सरकारं आपल्यावर असा दबाव आणतील, की आपण त्यांचीच उपासना करावी. आणि जे असं करणार नाहीत त्यांचा ते छळ करतील. (प्रकटी. १३:१२, १५) ते ‘लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, स्वतंत्र आणि गुलाम अशा सर्व लोकांना बळजबरी करतील, की त्यांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी.’ (प्रकटी. १३:१६) प्राचीन काळात गुलामाच्या शरीरावर एक कायमची खूण केली जायची. यावरून त्याचा मालक कोण आहे हे समजायचं. अगदी तसंच, आजसुद्धा सगळ्यांकडून अशी अपेक्षा केली जाईल, की त्यांनीही एका अर्थाने स्वतःच्या कपाळावर आणि हातावर खूण करून घ्यावी; म्हणजे आपल्या विचारांतून आणि कामांतून हे दाखवून द्यावं, की ते आजच्या सरकारांना पाठिंबा देतात आणि तेच त्यांचे खरे मालक आहेत.

१६. आतापासूनच यहोवाला एकनिष्ठ राहणं का महत्त्वाचं आहे?

१६ मग आपण स्वतःवर ही खूण करून घेऊ का? आणि जगातल्या सरकारांना पाठिंबा देऊ का? जे ही खूण करून घेणार नाहीत त्यांना अनेक संकटांचा आणि धोक्याचा सामना करावा लागेल. प्रकटीकरणाच्या पुस्तकात असं म्हटलं आहे, की ज्या व्यक्‍तीवर ही खूण आहे ‘त्या व्यक्‍तीशिवाय कोणीही खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही.’ (प्रकटी. १३:१७) पण जे लोक प्रकटीकरण १४:९, १० मध्ये सांगितलेली खूण स्वतःवर करून घेतात त्यांच्या बाबतीत देव काय करेल हे देवाच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे ही खूण करून घेण्याऐवजी ते आपल्या हातावर “मी यहोवाचा आहे,” असं लिहितील. (यश. ४४:५) आपण पूर्णपणे यहोवाला एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याची हीच वेळ आहे. जर आपण यहोवाला एकनिष्ठ राहिलो, तर तोही आनंदाने म्हणेल, की ‘आपण त्याचे आहोत.’

राष्ट्रांना शेवटचं हालवलं जाईल

१७. यहोवाच्या सहनशीलतेबद्दल आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१७ या शेवटच्या दिवसांत यहोवाने खूप सहनशीलता दाखवली आहे. कारण कोणाचाही नाश व्हावा असं त्याला वाटत नाही. (२ पेत्र ३:९) म्हणूनच त्याने सगळ्यांना पश्‍चात्ताप करायची आणि योग्य निर्णय घ्यायची संधी दिली आहे. पण यहोवा आणखी जास्त काळ सहन करणार नाही. जे लोक त्याने दिलेल्या संधीचा फायदा करून घेत नाहीत त्यांची स्थिती मोशेच्या काळातल्या फारोसारखी होईल. यहोवा फारोला म्हणाला, “आतापर्यंत मी माझा हात उगारून तुझ्यावर आणि तुझ्या लोकांवर भयानक पीडा आणली असती आणि या पृथ्वीवरून तुझा पूर्णपणे नाश केला असता. पण, तुला माझी ताकद दाखवण्यासाठी आणि माझं नाव संपूर्ण पृथ्वीवर जाहीर करण्यासाठी, मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.” (निर्ग. ९:१५, १६) शेवटी सर्व राष्ट्रांना हे मान्य करावंच लागेल, की यहोवा हाच खरा देव आहे. (यहे. ३८:२३) हे कसं घडून येईल?

१८. (क) हाग्गय २:६, २०-२२ या वचनामध्ये राष्ट्रांना हालवण्याबद्दल जे म्हटलं आहे ते काय आहे? (ख) हाग्गयची ही भविष्यवाणी भविष्यात पूर्ण होईल असं आपण का म्हणू शकतो?

१८ हाग्गय २:६, २०-२२ वाचा. हाग्गयने ही भविष्यवाणी लिहिली त्याच्या अनेक शतकांनंतर प्रेषित पौलने दाखवून दिलं, की हे शब्द भविष्यात पूर्ण होतील. त्याने लिहिलं, “आता त्याने असं वचन दिलं आहे: ‘मी पुन्हा एकदा पृथ्वीलाच नाही, तर आकाशालाही हालवीन.’ ‘पुन्हा एकदा’ असं जे म्हटलं आहे, त्यावरून दिसून येतं, की हालवता येणाऱ्‍या गोष्टी, म्हणजे घडवण्यात आलेल्या गोष्टी नाहीशा केल्या जातील. हे यासाठी, की ज्या हालवल्या जाऊ शकत नाहीत अशा गोष्टी टिकून राहाव्यात.” (इब्री १२:२६, २७) इथे पौल पृथ्वीच्या आणि आकाशाच्या हालवण्याबद्दल बोलतो. याचा अर्थ, जे फारोसारखे वागतात त्यांचा, म्हणजे जे यहोवाचा अधिकार स्वीकारत नाहीत त्यांचा कायमचा नाश केला जाईल. त्यामुळे ही भविष्यवाणी हाग्गय २:७ मध्ये सांगितलेल्या भविष्यवाणीपेक्षा वेगळी आहे.

१९. कोणती गोष्ट हालवली जाणार नाही?

१९ कोणती गोष्ट हालवली जाणार नाही किंवा नाहीशी केली जाणार नाही? याचं उत्तर पौलने पुढं दिलं आहे. तो म्हणतो, “आपल्याला एक असं राज्य मिळणार आहे जे कधीच हालवलं जाऊ शकत नाही. म्हणूनच, आपण नेहमी देवाच्या अपार कृपेचा लाभ घेऊ या. यामुळे आपल्याला देवाची भीती आणि आदर बाळगून, तो स्वीकारेल अशा पद्धतीने त्याची पवित्र सेवा करता येईल.” (इब्री १२:२८) तर, राष्ट्रांना शेवटचं हालवलं जाईल त्यानंतर फक्‍त देवाचं राज्यच कायम टिकेल, ते कधीही नाहीसं होणार नाही.—स्तो. ११०:५, ६; दानी. २:४४.

२०. लोकांना कोणता निर्णय घ्यावा लागेल, आणि योग्य निर्णय घेण्यासाठी आपण त्यांना कशी मदत करू शकतो?

२० आता वेळ फार कमी उरला आहे. त्यामुळे लोकांना हा निर्णय घ्यायचा आहे, की नाश होणाऱ्‍या या जगाला ते पाठिंबा देत राहतील, की सर्वकाळचं जीवन मिळवून देणाऱ्‍या देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतील. (इब्री १२:२५) आपल्या प्रचार कार्याद्वारे आपण लोकांना योग्य निर्णय घ्यायला मदत करू शकतो. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याला पाठिंबा द्यायला मदत करू या. आणि येशूचे शब्द कायम लक्षात ठेवू या. त्याने म्हटलं, “सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर अंत येईल.”—मत्त. २४:१४

गीत ३१ आम्ही यहोवाचे साक्षीदार!

^ परि. 5 या लेखात हाग्गय २:७ या वचनावर सुधारित समज देण्यात आली आहे. सध्या सर्व राष्ट्रांना हालवून टाकण्याचं जे महत्त्वाचं काम चालू आहे त्यात आपण सहभाग कसा घेऊ शकतो, हे या लेखात आपण पाहणार आहोत. तसंच, या कामाला काही जण चांगला प्रतिसाद कसा देतात आणि काही जण चांगला प्रतिसाद न देता विरोध कसा करतात, हेही या लेखात आपण पाहू या.

^ परि. 4 हाग्गयने आपलं काम चांगल्या प्रकारे पूर्ण केलं असं म्हणता येईल, कारण इ.स.पू. ५१५ मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं.

^ परि. 10 ही एक सुधारित समज आहे. पूर्वी आपण असं म्हणायचो, की चांगल्या मनाचे लोक यहोवाकडे राष्ट्रांना हालवल्यामुळे येत नाहीत. १५ मे २००६ च्या प्रहरीदुर्ग या हिंदी अंकातला “पाठको के प्रश्‍न” हा लेख पाहा.

^ परि. 63 चित्रांचं वर्णन: देवाच्या लोकांनी मंदिराचं बांधकाम आवेशाने पूर्ण करावं असं प्रोत्साहन हाग्गयने त्यांना दिलं. आधुनिक काळात देवाच्या लोकांनी राज्याचा संदेश आवेशाने सांगितला. देव लवकरच या जगाचा नाश करेल असा संदेश एक जोडपं देत आहे.