व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३८

यहोवावरचं आणि आपल्या भाऊबहिणींवरचं प्रेम वाढवा

यहोवावरचं आणि आपल्या भाऊबहिणींवरचं प्रेम वाढवा

‘मी माझ्या पित्याकडे आणि तुमच्या पित्याकडे वर जातोय.’—योहान २०:१७.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१. विश्‍वासू मानवांसोबत यहोवाचं कशा प्रकारचं नातं आहे?

यहोवाच्या कुटुंबात त्याचा “पहिला जन्मलेला” येशू आणि लाखो-करोडो स्वर्गदूत आहेत. (कलस्सै. १:१५; स्तो. १०३:२०) येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने लोकांना हे समजायला मदत केली, की यहोवा हा विश्‍वासू मानवांचासुद्धा ‘पिता’ आहे. म्हणूनच आपल्या शिष्यांशी बोलताना तो म्हणाला, की यहोवा ‘माझा पिता’ आणि ‘तुमचा पिता’ आहे. (योहा. २०:१७) आपण जेव्हा यहोवाला आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा आपण आपल्या प्रेमळ भाऊबहिणींनी बनलेल्या एका मोठ्या कुटुंबाचा भाग बनतो.—मार्क १०:२९, ३०.

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पण, यहोवा आपला पिता आहे आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो हे स्वीकारणं काहींना कठीण जातं. आणि असेही काही जण आहेत ज्यांना भाऊबहिणींबद्दल खूप प्रेम आहे. मात्र ते व्यक्‍त करणं त्यांना कठीण जातं. पण यहोवा एक प्रेमळ पिता आहे हे समजायला येशू आपल्याला कशी मदत करतो ते आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, आपण त्याच्याशी जवळचं नातं कसं जोडू शकतो तेही आपण पाहणार आहोत. आणि शेवटी या लेखात आपण हे पाहू, की यहोवासारखंच आपण आपल्या भाऊबहिणींशी कसं वागू शकतो.

आपण यहोवाशी जवळचं नातं जोडावं असं त्याला वाटतं

३. आपण यहोवाशी जवळचं नातं जोडावं हे येशूने शिकवलेल्या प्रार्थनेतून कसं दिसून येतं?

येशूसाठी यहोवा एक प्रेमळ पिता आहे. तो एखाद्या कठोर अधिकाऱ्‍यासारखा नाही. त्यामुळे येशू केव्हाही अगदी सहज आपल्या पित्याशी बोलू शकतो. यहोवाबद्दल आपल्यालासुद्धा असंच वाटावं अशी येशूची इच्छा आहे. त्याने आपल्या शिष्यांना जी प्रार्थना करायला शिकवली त्यावरून हे दिसून येतं. त्या प्रार्थनेची सुरुवातच त्याने, “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या,” या शब्दांनी केली. (मत्त. ६:९) इथे येशू, यहोवाला ‘सर्वशक्‍तिमान देव,’ ‘निर्माणकर्ता’ किंवा “सर्वकाळाचा राजा” असंही म्हणू शकला असता, आणि ते मुळीच चुकीचं ठरलं नसतं. कारण शास्त्रवचनांमध्ये यहोवासाठी हे शब्दसुद्धा वापरले आहेत. (उत्प. ४९:२५; यश. ४०:२८; १ तीम. १:१७) पण या शब्दांऐवजी येशूने “पिता” हा शब्द वापरला. यावरून दिसून येतं, की आपण यहोवाशी जवळचं नातं जोडावं असं येशूला वाटतं.

४. आपण काय करावं असं यहोवाला वाटतं?

काहींच्या बाबतीत असं घडलं असेल, की त्यांच्या वडिलांनी कधीच त्यांच्यावर प्रेम केलं नसेल. ते नेहमीच त्यांच्याशी कठोरपणे वागले असतील. आणि म्हणून यहोवा एक प्रेमळ पिता आहे ही गोष्ट स्वीकारणं त्यांना कठीण जातं. पण आपल्याला कसं वाटतं आणि त्यामागचं कारण काय हे यहोवा समजून घेतो ही किती दिलासा देणारी गोष्ट आहे! आपण त्याच्याशी जवळचं नातं जोडावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणूनच त्याचं वचन आपल्याला म्हणतं, की “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.” (याको. ४:८) यहोवा आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. आणि तो आपला सगळ्यात चांगला पिता होईल असं म्हणतो.

५. यहोवाशी जवळचं नातं जोडायला येशू आपल्याला कशी मदत करू शकतो? (लूक १०:२२)

यहोवाशी जवळचं नातं जोडायला येशू आपल्याला मदत करू शकतो. कारण येशू यहोवाला खूप जवळून ओळखतो आणि त्याच्यामध्ये यहोवासारखेच गुण आहेत. म्हणून त्याने म्हटलं, “ज्याने मला पाहिलंय, त्याने पित्यालाही पाहिलंय.” (योहा. १४:९) एका मोठ्या भावाप्रमाणे येशू आपल्याला हे शिकवतो, की आपण आपल्या पित्याचा आदर कसा करू शकतो, आणि त्याचं कसं ऐकू शकतो. तसंच, आपल्यामुळे पित्याचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी आपण कशी घेऊ शकतो, हेसुद्धा येशू आपल्याला शिकवतो. पण यहोवा किती प्रेमळ आहे हे येशूने खासकरून स्वतःच्या जीवनातून दाखवून दिलं. (लूक १०:२२ वाचा.) याची काही उदाहरणं आता आपण पाहू.

एक प्रेमळ पिता असल्यामुळे यहोवाने एका स्वर्गदूताला पाठवून आपल्या मुलाला धीर दिला (परिच्छेद ६ पाहा) *

६. यहोवाने येशूची प्रार्थना ऐकली असं आपण का म्हणू शकतो?

यहोवा आपल्या मुलांच्या प्रार्थना ऐकतो.  येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने अनेकदा यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने त्याची प्रत्येक प्रार्थना ऐकली. (लूक ५:१६) उदाहरणार्थ, १२ प्रेषितांची निवड करायचा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी येशूने यहोवाला प्रार्थना केली आणि यहोवाने ती ऐकली. (लूक ६:१२, १३) तसंच, भयंकर त्रासात असताना येशूने केलेली प्रार्थनासुद्धा यहोवाने ऐकली. आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री येशू खूप दुःखात होता आणि लवकरच त्याला खूप काही सोसावं लागणार होतं. त्या वेळी त्याने यहोवाला कळकळून प्रार्थना केली. तेव्हा यहोवाने येशूची प्रार्थना फक्‍त ऐकलीच नाही, तर एका स्वर्गदूताला पाठवून आपल्या प्रिय मुलाला धीरही दिला.—लूक २२:४१-४४.

७. यहोवा आपल्या प्रार्थनांचं उत्तर देतो हे जाणून तुम्हाला कसं वाटतं?

आजसुद्धा यहोवा आपल्या सेवकांच्या प्रार्थना ऐकतो आणि अगदी योग्य वेळी, योग्य पद्धतीने त्यांची उत्तरं देतो. (स्तो. ११६:१, २) भारतातल्या आपल्या एका बहिणीने हे स्वतः कसं अनुभवलं ते पाहू या. चिंतेमुळे बऱ्‍याच काळापासून ती खूप खचून गेली होती. म्हणून तिने यहोवाला कळकळून प्रार्थना केली. ती म्हणते, “मे २०१९ च्या ब्रॉडकास्टींगमध्ये हेच सांगितलं होतं, की आपण चिंतेचा आणि निराशेचा सामना कसा करू शकतो. याचीच तर मला खूप गरज होती. खरंच, यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं.”

८. यहोवाचं आपल्या मुलावर प्रेम आहे हे त्याने कसं दाखवलं?

यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो आपली चांगली काळजी घेतो. येशू पृथ्वीवर होता तेव्हा यहोवाने त्याच्याबद्दल असंच प्रेम आणि काळजी दाखवली. (योहा. ५:२०) त्याने येशूला आपला विश्‍वास मजबूत ठेवायला मदत केली, तो दुःखात असताना त्याचं सांत्वन केलं आणि रोजच्या जीवनात त्याला ज्या गोष्टींची गरज होती त्या पुरवल्या. तसंच, आपल्या मुलावर आपलं किती प्रेम आहे आणि आपण त्याच्यावर किती खूश आहोत हे यहोवाने आपल्या शब्दांतून व्यक्‍त केलं. (मत्त. ३:१६, १७) आपला प्रेमळ पिता नेहमी आपल्यासोबत असेल हे येशूला माहीत होतं. आणि म्हणून त्याला कधीच एकटं वाटलं नाही.—योहा. ८:१६.

९. यहोवा आपल्यावर प्रेम करतो हे कसं दिसून येतं?

येशूसारखंच आपणसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे यहोवाचं प्रेम आणि काळजी अनुभवली आहे. जसं की, यहोवाने आपल्याला त्याच्याशी मैत्री करण्याची संधी दिली आहे. आणि प्रेमळ भाऊबहिणींच्या रूपात एक खूप मोठं कुटुंब दिलं आहे. हे भाऊबहीण आपल्याला आनंदी राहायला मदत करतात आणि आपण दुःखात असतो तेव्हा आपल्याला धीर देतात. (योहा. ६:४४) तसंच, आपला विश्‍वास मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्यासुद्धा तो आपल्याला पुरवत राहतो. इतकंच नाही, तर आपल्या रोजच्या गरजाही तो पूर्ण करतो. (मत्त. ६:३१, ३२) यहोवा आपल्यावर किती प्रेम करतो याचा विचार केल्यावर त्याच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढतं.

आपल्या भाऊबहिणींशी यहोवासारखंच वागा

१०. आपण आपल्या भाऊबहिणींवर कसं प्रेम केलं पाहिजे?

१० आपल्या सगळ्या भाऊबहिणींवर यहोवाचं खूप प्रेम आहे. पण भाऊबहिणींवर यहोवासारखं प्रेम करणं आपल्याला कधीकधी कठीण जाऊ शकतं. कारण आपण वेगवेगळ्या संस्कृतीत आणि वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले असतो. शिवाय, आपण सगळेच चुकतो आणि कधी ना कधी एकमेकांची मनं दुःखावतो. पण असं असलं, तरी आपण आपसातलं प्रेम टिकवून ठेवू शकतो. ते कसं? भाऊबहिणींवर यहोवासारखंच प्रेम करून. (इफिस. ५:१, २; १ योहा. ४:१९) आपल्या भाऊबहिणींवर यहोवा कसं प्रेम करतो ते आता आपण पाहू या.

११. येशूने यहोवासारखीच ‘कोमल दया’ कशी दाखवली?

११यहोवा ‘कोमल दया’ दाखवतो.  (लूक १:७८) एका दयाळू व्यक्‍तीला इतरांचं दुःख पाहवत नाही. त्यांचं दुःख कसं दूर करता येईल आणि त्यांना दिलासा कसा देता येईल, याचा तो विचार करतो. येशू ज्या प्रकारे लोकांशी वागला त्यातून यहोवाची दया दिसून आली. (योहा. ५:१९) उदाहरणार्थ, येशूने एकदा लोकांचा एक मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्याला “त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले आणि भरकटलेले होते.” (मत्त. ९:३६) पण त्यांच्याबद्दल त्याला फक्‍त वाईटच वाटलं नाही, तर त्यांचं दुःख दूर करण्यासाठी त्याने पाऊलही उचललं. त्याने आजाऱ्‍यांना बरं केलं. तसंच, ‘कष्ट करणाऱ्‍या आणि ओझ्याने दबलेल्या लोकांना’ दिलासा दिला.—मत्त. ११:२८-३०; १४:१४.

यहोवाप्रमाणेच आपल्या भाऊबहिणींना दया आणि उदारता दाखवा (परिच्छेद १२-१४ पाहा) *

१२. आपण कशा प्रकारे आपल्या भाऊबहिणींना मदत करू शकतो?

१२ आपले भाऊबहीण कोणत्या समस्यांचा सामना करत आहेत हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण त्यांना दया दाखवू शकत नाही. उदाहरणार्थ, आपल्या एखाद्या बहिणीला आरोग्याची गंभीर समस्या असेल. त्याबद्दल ती कधी बोलत नसेल. पण कोणी जर तिची मदत केली तर तिला खूप बरं वाटेल. अशा परिस्थितीत स्वतःला विचारा: ‘कुटुंबाची काळजी घेणं तिला कठीण जात असेल का? कोणी जर तिला घरकामात मदत केली तर तिला बरं वाटेल का?’ किंवा मग, मंडळीत असा एखादा भाऊ असेल ज्याची नोकरी गेली आहे. मग आपलं नाव कळू न देता, आपण त्याला पैशाच्या रूपात थोडीफार मदत करू शकतो का, म्हणजे दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्याचा खर्च भागेल?

१३-१४. आपण यहोवाप्रमाणे उदारता कशी दाखवू शकतो?

१३यहोवा उदार मनाचा आहे.  (मत्त. ५:४५) दया दाखवण्यासाठी भाऊबहिणींनी मदत मागेपर्यंत आपण थांबून नाही राहिलं पाहिजे. त्यांनी मदत मागायच्या आधीच आपण त्यांना मदत केली पाहिजे. या बाबतीत यहोवाचं चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. विचार करा, आपण त्याच्याकडे विनंती करत नाही, पण तो दररोज आपल्यावर सूर्य उगवतो. आणि सूर्यप्रकाशामुळे सगळ्यांनाच फायदा होतो; जे त्याला मानत नाहीत अगदी त्यांनासुद्धा. खरंच, आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करून यहोवा हेच दाखवतो, की त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे! यहोवा प्रेमळ आणि उदार असल्यामुळेच आपण त्याच्यावर खूप प्रेम करतो.

१४ आपल्या स्वर्गातल्या पित्याप्रमाणेच आपले भाऊबहीण उदारता दाखवण्यासाठी आणि एकमेकांना मदत करण्यासाठी स्वतःहून पुढे येतात. उदाहरणार्थ, २०१३ साली फिलिपीन्समध्ये हायान नावाचं एक भयानक चक्रीवादळ आलं आणि त्यात बरीच नासधूस झाली. अनेक भाऊबहिणींच्या घरांचं आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पण अशा वेळी जगभरातले भाऊबहीण लगेच त्यांच्या मदतीला धावून आले. काहींनी दान देऊन मदत केली, तर काहींनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बांधकामाला हातभार लावला. त्यामुळे एका वर्षाच्या आतच जवळजवळ ७५० नवीन घरं बांधण्यात आली किंवा दुरुस्त करण्यात आली. तसंच, कोव्हीड-१९ महामारीच्या काळातसुद्धा भाऊबहिणींनी एकमेकांना मदत करण्यासाठी किती मेहनत घेतली हे आपल्याला माहीत आहे. अशा प्रकारे, आपल्या आध्यात्मिक कुटुंबाला मदत करण्यासाठी आपण लगेच पुढे येतो तेव्हा आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं.

१५-१६. कलस्सैकर ३:१३ या वचनात सांगितल्याप्रमाणे आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो?

१५यहोवा क्षमा करणारा देव आहे.  (कलस्सैकर ३:१३ वाचा.) आपण दररोज कितीतरी वेळा चुकतो. पण यहोवा मोठ्या मनाने आपल्याला क्षमा करतो. (स्तो. १०३:१०-१४) येशूसुद्धा आपल्या पित्यासारखाच क्षमाशील आहे. येशूचे शिष्य बऱ्‍याचदा चुकले. पण तरीसुद्धा येशूने त्यांच्या चुका माफ केल्या. आणि मानवांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याने स्वतःचं जीवनही बलिदान केलं. (१ योहा. २:१,२) खरंच, यहोवा आणि येशू खूप क्षमाशील आहेत. यामुळे तुम्हाला त्यांच्याशी आणखी जवळचं नातं जोडावसं वाटत नाही का?

१६ आपण मोठ्या मनाने एकमेकांना क्षमा करतो तेव्हा आपल्यातलं प्रेम आणखी वाढतं. (इफिस. ४:३२) पण इतरांना क्षमा करणं नेहमीच सोपं नसतं. त्यासाठी कदाचित आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतील. एका बहिणीचाच अनुभव घ्या. टेहळणी बुरूज  अंकात एक लेख आला होता. त्याचा विषय होता, “एकमेकांना मनापासून क्षमा करा.” * त्या लेखामुळे या बहिणीला इतरांना क्षमा करायला खूप मदत झाली. ती म्हणते, “या लेखाचा अभ्यास केल्यावर मला समजलं, की इतरांना क्षमा केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो. त्यात असं सांगितलं होतं, की इतरांना क्षमा करण्याचा अर्थ असा होत नाही, की त्यांनी जे केलं ते योग्य होतं असं म्हणणं, किंवा त्यांच्या वागण्याचा आपल्याला काहीच त्रास झाला नाही असं म्हणणं. उलट, इतरांना क्षमा करण्याचा अर्थ असा होतो, की त्यांच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग काढून टाकणं आणि आपल्या मनाची शांती टिकवून ठेवणं.” आपण जेव्हा एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करतो तेव्हा हेच दाखवतो, की आपलं त्यांच्यावर प्रेम आहे आणि आपण आपल्या पित्याचं, यहोवाचं अनुकरण करत आहोत.

यहोवाच्या कुटुंबात असल्याचा आनंद माना

लहान-मोठ्या सगळ्यांनीच आपल्या भाऊबहिणींबद्दल प्रेम दाखवलं आहे (परिच्छेद १७ पाहा) *

१७. मत्तय ५:१६ यात सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याचा गौरव कसा करू शकतो?

१७ यहोवाच्या कुटुंबाचा भाग असणं हा खरंच आपल्यासाठी एक खूप मोठा बहुमान आहे. या कुटुंबात जगभरातले आपले सगळे भाऊबहीण आहेत आणि ते सगळे एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. आपल्या या कुटुंबात जास्तीत जास्त लोकांनी सामील होऊन यहोवाची उपासना करावी अशीच आपली इच्छा आहे. त्यामुळे आपण नेहमी याची काळजी घेतली पाहिजे, की आपण असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल आणि त्याच्या सेवकांबद्दल लोक चुकीचा विचार करतील. याउलट, आपण नेहमी असं वागू ज्यामुळे लोकांना यहोवाबद्दल शिकावसं वाटेल आणि त्याची उपासना करावीशी वाटेल.मत्तय ५:१६ वाचा.

१८. धैर्याने साक्ष द्यायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

१८ आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याचं ऐकतो म्हणून काही वेळा लोक आपली टीका किंवा छळही करतील. त्यामुळे आपल्या विश्‍वासाबद्दल इतरांशी बोलायला जर आपल्याला भीती वाटत असेल, तर आपण काय करू शकतो? अशा वेळी यहोवा आणि त्याचा मुलगा आपली मदत करतील याची खातरी आपण बाळगू शकतो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं होतं, “तेव्हा कसं बोलावं किंवा काय बोलावं, याची काळजी करू नका. तुम्ही काय बोलावं हे त्या वेळी तुम्हाला सुचेल. कारण बोलणारे फक्‍त तुम्ही नसून, तुमच्या पित्याची पवित्र शक्‍ती तुमच्याद्वारे बोलत असते.”—मत्त. १०:१९, २०.

१९. रॉबर्टने कशा प्रकारे धैर्याने साक्ष दिली?

१९ रॉबर्ट नावाच्या एका बांधवाचं उदाहरण विचारात घ्या. त्याने नुकताच बायबलचा अभ्यास सुरू केला होता. बायबलचं त्याला फारसं ज्ञानही नव्हतं. पण त्याच वेळी त्याला दक्षिण आफ्रिकेतल्या एका कोर्टात हजर व्हायला सांगण्यात आलं. त्याने सैन्यात भरती व्हायला नकार का दिला, याचं कारण त्याला तिथे विचारण्यात आलं. तेव्हा त्याने धैर्याने म्हटलं, की त्याचं त्याच्या भाऊबहिणींवर खूप प्रेम असल्यामुळे त्याने नकार दिला. त्यावर न्यायाधीशाने अचानक त्याला विचारलं, “कोण आहेत तुझे भाऊबहीण?” न्यायाधीश असं काही विचारेल असं रॉबर्टला वाटलं नव्हतं. पण त्याच वेळी, त्या दिवसाचं दैनिक वचन त्याला आठवलं. ते वचन होतं, मत्तय १२:५०. त्यात म्हटलं आहे, “जो स्वर्गातल्या माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई.” रॉबर्टने जरी नुकताच बायबल अभ्यास सुरू केला होता, तरी यहोवाच्या पवित्र शक्‍तीने त्याला या आणि अचानक विचारलेल्या इतर प्रश्‍नांची उत्तरं द्यायला मदत केली. खरंच, यहोवाला रॉबर्टचा किती अभिमान वाटला असेल! आपणसुद्धा कठीण परिस्थितीत यहोवावर भरवसा ठेवून धैर्याने साक्ष देतो तेव्हा त्याला आपला खूप अभिमान वाटतो.

२०. आपण काय करत राहिलं पाहिजे? (योहान १७:११, १५)

२० अशा प्रेमळ कुटुंबाचा आपण भाग आहोत याची आपण कायम कदर बाळगली पाहिजे. आपला पिता यहोवा हा सगळ्यात चांगला पिता आहे. आणि आपल्या कुटुंबातले भाऊबहीण आपल्यावर जिवापाड प्रेम करतात. या गोष्टींना आपण कधीच कमी लेखू नये. पण सैतान आणि त्याचे दुष्ट साथीदार आपल्या या कुटुंबात फूट पाडण्याचा सतत प्रयत्न करतात. ते आपल्याला असा विचार करायला लावतात, की यहोवा आपल्यावर प्रेम करत नाही आणि तो आपल्याला मदत करणार नाही. पण येशूने पित्याला अशी प्रार्थना केली, की त्याने आपल्या कुटुंबातली एकता टिकवून ठेवावी आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करावं. (योहान १७:११, १५ वाचा.) आणि आजसुद्धा यहोवा त्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. त्यामुळे येशूप्रमाणे आपण ही खातरी बाळगू शकतो, की आपला स्वर्गातला पिता आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्याला मदत करायला नेहमी तयार असतो. त्यामुळे यहोवावरचं आणि आपल्या भाऊबहिणींवरचं आपलं प्रेम आपण वाढवत राहू या.

गीत ३१ आम्ही यहोवाचे साक्षीदार!

^ परि. 5 आपण सगळे एका मोठ्या कुटुंबाचा भाग आहोत. या कुटुंबात एकमेकांवर प्रेम करणारे आपले सर्व भाऊबहीण आहेत. आणि आपल्यातलं हे प्रेम आणखी वाढावं असं सगळ्यांनाच वाटतं. आपल्याला हे कसं वाढवता येईल? आपला प्रेमळ पिता आपल्याशी ज्या प्रकारे वागतो त्याचं अनुकरण करून; तसंच, येशूचं आणि आपल्या भाऊबहिणींचं अनुकरण करून आपल्याला हे करता येईल.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन: येशू गेथशेमाने बागेत होता तेव्हा यहोवाने आपला एक स्वर्गदूत पाठवून त्याला धीर दिला.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: कोव्हीड-१९ महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी खाण्यापिण्याचे पदार्थ पॅक करून त्यांच्या घरी पोहचवले.

^ परि. 61 चित्रांचं वर्णन: तुरुंगात असलेल्या एका भावाला प्रोत्साहन देण्यासाठी एक आई आपल्या मुलीला पत्र लिहायला मदत करत आहे.