व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४८

“तुम्ही पवित्र असलं पाहिजे”

“तुम्ही पवित्र असलं पाहिजे”

‘तुम्ही आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा.’ —१ पेत्र १:१५.

गीत २९ खरेपणाने चालणे

सारांश *

१. प्रेषित पेत्रने आपल्या भाऊबहिणींना काय सल्ला दिला, आणि तो सल्ला लागू करणं अशक्य आहे असं आपल्याला का वाटू शकतं?

आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची, प्रेषित पेत्रने पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना जो सल्ला दिला त्यापासून आपल्या सगळ्यांनाच फायदा होऊ शकतो. त्याने त्यांना म्हटलं: “ज्या पवित्र देवाने तुम्हाला बोलावलं आहे, त्याच्यासारखं तुम्हीसुद्धा आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा. कारण असं लिहिलं आहे: ‘तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी पवित्र आहे.’” (१ पेत्र १:१५, १६) या शब्दांवरून दिसून येतं, की पवित्र असण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे, आणि आपण त्याचं अनुकरण करू शकतो. तसंच, आपण आपल्या सगळ्या वागणुकीत पवित्र असू शकतो. खरंतर, या बाबतीत आपण पवित्र असलंच पाहिजे. पण ही गोष्ट आपल्याला अशक्य वाटेल, कारण आपण अपरिपूर्ण आहोत. पेत्रचंच उदाहरण घ्या. त्याने अनेक चुका केल्या, पण त्याचं उदाहरण दाखवून देतं, की आपण ‘पवित्र होऊ’ शकतो.

२. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करणार आहोत?

या लेखात आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांचा विचार करणार आहोत: पवित्र असणं म्हणजे काय? यहोवाच्या पवित्रतेबद्दल बायबल काय म्हणतं? आपण आपल्या सर्व वागणुकीत पवित्र कसे होऊ शकतो? आणि पवित्र असण्याचा आणि यहोवासोबत असलेल्या आपल्या नात्याचा एकमेकांशी काय संबंध आहे?

पवित्र असणं म्हणजे काय?

३. पवित्र असणं म्हणजे काय याबद्दल आज अनेकांना काय वाटतं? पण त्याबद्दलची अचूक माहिती आपल्याला कुठे मिळेल?

अनेकांना वाटतं, की पवित्र किंवा धार्मिक लोक साधू-संतांसारखा वेगळा पोषाख करणारे आणि धीरगंभीर चेहऱ्‍याचे असतात. पण हे चुकीचं आहे. कारण यहोवा पवित्र आहे आणि तरीसुद्धा बायबल म्हणतं, की तो एक ‘आनंदी देव’ आहे. (१ तीम. १:११) शिवाय, जे त्याची उपासना करतात तेसुद्धा आनंदी असतात. (स्तो. १४४:१५) येशू जेव्हा पृथ्वीवर होता तेव्हा त्याने अशा लोकांचा धिक्कार केला जे इतरांपेक्षा वेगळा पोषाख करायचे आणि लोकांसमोर धार्मिकतेचा आव आणायचे. (मत्त. ६:१; मार्क १२:३८) पण पवित्रतेबद्दलचा आपला दृष्टिकोन फार वेगळा आहे. आपला दृष्टिकोन बायबलमध्ये पवित्रतेबद्दल जे म्हटलं आहे त्यानुसार आहे. आणि आपल्याला खातरी आहे, की आपला पवित्र आणि प्रेमळ देव आपल्याला कधीच अशी आज्ञा देणार नाही, जी आपण पाळू शकत नाही. त्यामुळे ‘तुम्ही  पवित्र असलं पाहिजे’ असं जे यहोवा म्हणतो ते नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी पवित्र असणं म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊ या.

४. “पवित्र” आणि “पवित्रता” या शब्दांचा काय अर्थ होतो?

पवित्र असणं म्हणजे काय? बायबलमध्ये “पवित्र” आणि “पवित्रता” या शब्दांचा अर्थ, नैतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून शुद्ध असणं असा आहे. तसंच, यहोवाच्या सेवेसाठी वेगळं करणं असाही त्या शब्दांचा अर्थ होतो. दुसऱ्‍या शब्दांत, आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल, तर आपलं वागणं-बोलणं नेहमी शुद्ध असलं पाहिजे, यहोवाला आवडेल अशा पद्धतीने आपण त्याची उपासना केली पाहिजे आणि त्याच्यासोबत आपलं एक जवळचं नातं असलं पाहिजे. आपल्यासारखी अपवित्र माणसं एका पवित्र देवासोबत जवळचं नातं जोडू शकतात ही कल्पनाच किती भारावून टाकणारी आहे!

“यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!”

५. विश्‍वासू स्वर्गदूतांकडून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?

यहोवा सर्व बाबतींत शुद्ध आणि पवित्र आहे. हे आपल्याला सराफदूतांनी केलेल्या त्याच्या वर्णनातून दिसून येतं. हे स्वर्गदूत यहोवाच्या राजासनाच्या अगदी जवळ असतात. त्यांच्यापैकी काही जण घोषणा करतात: “सैन्यांचा देव यहोवा हा पवित्र, पवित्र, पवित्र आहे!” (यश. ६:३) अर्थात, आपल्या पवित्र देवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी स्वर्गदूतांनी पवित्र असणं गरजेचं आहे आणि ते तसेच आहेत. ते इतके पवित्र आहेत, की यहोवाचा एखादा स्वर्गदूत जर पृथ्वीवर एखाद्या ठिकाणी आला, तर ती जागासुद्धा पवित्र होते. मोशे जेव्हा जळणाऱ्‍या काटेरी झुडपाजवळ होता तेव्हा अगदी तसंच झालं.—निर्ग. ३:२-५; यहो. ५:१५.

प्राचीन इस्राएलमधला महायाजक. त्याच्या पगडीवर, “पावित्र्य यहोवाचं आहे,” असे शब्द कोरलेली सोन्याची पट्टी आहे. (परिच्छेद ६-७ पाहा)

६-७. (क) निर्गम १५:१, ११ या वचनांत सांगितल्याप्रमाणे मोशने इस्राएली लोकांना यहोवाच्या पवित्रतेची आठवण कशी करून दिली? (ख) यहोवा पवित्र देव आहे याची इस्राएली लोकांना कशी आठवण करून दिली जायची? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

इस्राएली लोकांनी तांबडा समुद्र पार केल्यानंतर मोशेने त्यांना याची आठवण करून दिली, की त्यांचा देव यहोवा एक पवित्र देव आहे. (निर्गम १५:१, ११ वाचा.) कारण इजिप्तमधल्या देवांची उपासना करणाऱ्‍या लोकांचं आचरण मुळीच पवित्र नव्हतं. कनानमधल्या देवांची उपासना करणाऱ्‍या लोकांचंही आचरण तसंच होतं. ते उपासनेत लहान मुलांचा बळी द्यायचे आणि अतिशय घृणास्पद लैंगिक कामंही करायचे. (लेवी. १८:३, ४, २१-२४; अनु. १८:९, १०) पण यहोवा आपल्या लोकांकडून असल्या गोष्टींची कधीच अपेक्षा करत नाही. तो त्यांना कोणतंही वाईट किंवा अनैतिक काम करायला लावत नाही. कारण तो प्रत्येक बाबतीत पवित्र आहे. आणि ही गोष्ट प्राचीन काळातल्या महायाजकाच्या कपाळावर असलेल्या सोन्याच्या पट्टीवरून स्पष्ट व्हायची. कारण त्या पट्टीवर, “पावित्र्य यहोवाचं आहे” हे शब्द कोरलेले होते.—निर्ग. २८:३६-३८.

पट्टीवरचे ते शब्द पाहून लोकांना याची आठवण व्हायची, की यहोवा खऱ्‍या अर्थाने पवित्र आहे. पण अशा लोकांबद्दल काय जे महायाजकाला जवळून पाहू शकत नव्हते? यहोवा एक पवित्र देव आहे या गोष्टीची आठवण त्यांना कशी होणार होती? नियमशास्त्रातून! कारण त्या काळात सगळ्या पुरुषांसमोर, स्त्रियांसमोर आणि लहान मुलांसमोर नियमशास्त्र वाचलं जायचं. तुम्ही जर त्यांच्यामध्ये असता तर तुम्हालाही असे शब्द ऐकायला मिळाले असते: “मी तुमचा देव यहोवा आहे. . . . तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी पवित्र आहे.” “तुम्ही माझ्या दृष्टीत पवित्र असलं पाहिजे, कारण मी यहोवा पवित्र आहे.”—लेवी. ११:४४, ४५; २०:७, २६.

८. लेवीय १९:२ आणि १ पेत्र १:१४-१६ या वचनांतून आपण काय शिकतो?

आता आपण लेवीय १९:२ या वचनातल्या एका विधानावर आपलं लक्ष केंद्रित करू या. हे शब्द सर्व इस्राएली लोकांना वाचून दाखवले जायचे. यहोवा मोशेला म्हणाला: “इस्राएलच्या सर्व लोकांना सांग, ‘तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी तुमचा देव यहोवा पवित्र आहे.’” पुढे अनेक वर्षांनंतर पेत्रने कदाचित याच वचनाचा संदर्भ घेऊन ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: ‘तुम्ही पवित्र व्हा.’ (१ पेत्र १:१४-१६ वाचा.) अर्थात, आज आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या आधीन नाही. तरी पेत्रने जे म्हटलं त्यावरून लेवीय १९:२ मधले शब्द किती खरे आहेत, हे आपल्याला समजतं. तिथे असं म्हटलं आहे, की यहोवा पवित्र आहे आणि जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांनीसुद्धा पवित्र असण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे; मग आपल्याला स्वर्गातल्या जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरच्या जीवनाची.—१ पेत्र १:४; २ पेत्र ३:१३.

‘तुम्ही आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हा’

९. लेवीय पुस्तकाच्या १९ व्या अध्यायाचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

आपल्याला आपल्या पवित्र देवाला खूश करायची इच्छा आहे. त्यामुळे आपणसुद्धा पवित्र असलं पाहिजे. मग आपण पवित्र कसं होऊ शकतो? त्यासाठी लेवीय १९ व्या अध्यायात यहोवाने आपल्याला मोलाचा सल्ला दिला आहे. या अध्यायाबद्दल हिब्रू भाषेचे एक तज्ज्ञ, मार्कस कालीश यांनी असं म्हटलं: “लेवीय पुस्तकातला आणि बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांतला हा सगळ्यात महत्त्वाचा अध्याय आहे.” आणि लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे या अध्यायाच्या सुरुवातीला असं म्हटलं आहे: ‘तुम्ही पवित्र असलं पाहिजे.’ तर आता ही गोष्ट लक्षात घेऊन आपण त्या अध्यायातल्या काही वचनांचं परीक्षण करू या आणि त्यांतून काय शिकायला मिळतं ते पाहू या.

लेवीय १९:३ मध्ये आईवडिलांबद्दल जी आज्ञा देण्यात आली आहे त्यावरून आपण काय शिकतो? (परिच्छेद १०-१२ पाहा) *

१०-११. लेवीय १९:३ मध्ये आपल्याला कोणती आज्ञा देण्यात आली आहे, आणि ती पाळणं का महत्त्वाची आहे?

१० इस्राएली लोकांनी पवित्र असलं पाहिजे असं म्हटल्यानंतर यहोवाने पुढे म्हटलं: “तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा आदर केला पाहिजे. . . .  मी तुमचा देव यहोवा आहे.”—लेवी. १९:२, ३.

११ तर हे स्पष्टच आहे, की आईवडिलांचा आदर करण्याची जी आज्ञा यहोवाने दिली आहे ती आपण पाळली पाहिजे. तो प्रसंग आठवा जेव्हा एका माणसाने येशूला विचारलं: “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी मी कोणतं चांगलं काम केलं पाहिजे?” त्या व्यक्‍तीला उत्तर देताना येशूने असंही म्हटलं, की त्याने आपल्या वडिलांचा आणि आईचाही आदर करावा. (मत्त. १९:१६-१९) शास्त्री आणि परूशी मात्र या आज्ञेपासून पळवाट काढायचा प्रयत्न करत होते. आणि असं वागून ते ‘देवाचं वचन तुच्छ लेखत होते.’ त्यामुळे येशूने त्यांना धिक्कारलं. (मत्त. १५:३-६) ‘देवाच्या वचनात,’ दहा आज्ञांपैकी पाचवी आज्ञा, तसंच लेवीय १९:३ मधली आज्ञासुद्धा येते. (निर्ग. २०:१२) लेवीय १९:३ मध्ये आईवडिलांचा आदर करण्याची जी आज्ञा देण्यात आली आहे, त्याआधी काय म्हटलं आहे त्याकडे लक्ष द्या. तिथे म्हटलं आहे: “तुम्ही पवित्र असलं पाहिजे, कारण मी तुमचा देव यहोवा पवित्र आहे.”

१२. लेवीय १९:३ मधली आज्ञा आपण कशी पाळू शकतो?

१२ आईवडिलांचा आदर करण्याचा जो सल्ला यहोवाने दिला आहे, तो लक्षात घेऊन आपण स्वतःला विचारलं पाहिजे: ‘मी माझ्या आईवडिलांचा आदर करतो का?’ या बाबतीत पूर्वी आपण कुठे तरी कमी पडलो असं जर तुम्हाला जाणवलं, तर निराश होऊ नका. कारण अजूनही संधी आहे. पूर्वी तुम्ही जे केलं ते तर तुम्ही बदलू शकत नाही. पण इथून पुढे तुम्ही तुमच्या आईवडिलांचा होईल तितका आदर करायचा निश्‍चय करू शकता. तुम्ही आता त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू शकता. किंवा मग त्यांना गरजेच्या वस्तू पुरवू शकता. त्यांना भावनिक आधार देऊ शकता. आणि यहोवाच्या जवळ राहायला आणि त्याची सेवा करत राहायला त्यांना मदत करू शकता. असं करून तुम्ही हे दाखवून देता, की तुम्ही लेवीय १९:३ मधली आज्ञा पाळत आहात.

१३. (क) लेवीय १९:३ मध्ये आणखी कोणती आज्ञा देण्यात आली आहे? (ख) आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? (लूक ४:१६-१८)

१३ पवित्र असण्याबद्दल आणखी एक गोष्ट लेवीय १९:३ मध्ये सांगितली आहे. तिथे शब्बाथ पाळण्याची आज्ञा दिली आहे. नियमशास्त्राच्या अधीन नसल्यामुळे आज आपल्याला ती आज्ञा पाळायची गरज नाही. पण इस्राएली लोक शब्बाथ कसा पाळायचे आणि त्यापासून त्यांना कसा फायदा व्हायचा, यातून आपण बरंच काही शिकू शकतो. शब्बाथाच्या दिवशी इस्राएली लोकांना आपल्या रोजच्या कामातून विश्रांती घ्यायची होती आणि आपलं सगळं लक्ष आध्यात्मिक गोष्टींकडे लावायचं होतं. * आणि म्हणूनच येशूसुद्धा प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी आपल्या गावातल्या सभास्थानात जायचा आणि देवाचं वचन वाचायचा. (निर्ग. ३१:१२-१५; लूक ४:१६-१८ वाचा.) तर मग लेवीय १९:३ मध्ये शब्बाथ पाळण्याची जी आज्ञा दिली आहे, त्यावरून आज आपण काय शिकू शकतो? हेच, की आपल्या रोजच्या कामातून आपण काही वेळ आध्यात्मिक गोष्टींसाठी बाजूला काढला पाहिजे. या बाबतीत तुम्हाला काही सुधारणा करायची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही जर नियमितपणे आपल्या रोजच्या कामातून आध्यात्मिक गोष्टींसाठी थोडा वेळ बाजूला काढला, तर यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी घट्ट होईल. आणि पवित्र असण्यासाठी हे खूप गरजेचं आहे.

यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी घट्ट करा

१४. लेवीय १९ व्या अध्यायात कोणती गोष्ट वारंवार सांगण्यात आली आहे?

१४ लेवीय १९ व्या अध्यायात आणखी एक महत्त्वाची गोष्ट वारंवार सांगण्यात आली आहे ज्यामुळे पवित्र राहायला आपल्याला मदत होते. चौथ्या वचनाच्या शेवटी म्हटलं आहे: “मी तुमचा देव यहोवा आहे.” हे शब्द संपूर्ण अध्यायात १६ वेळा वाचायला मिळतात. यावरून दहा आज्ञांमधली पहिली आज्ञा आपल्याला आठवते. तिथे म्हटलं आहे: “मी तुमचा देव यहोवा आहे . . . माझ्याशिवाय तुम्हाला इतर कोणतेही देव नसावेत.” (निर्ग. २०:२, ३) आपल्याला जर पवित्र व्हायचं असेल, तर यहोवासोबतच्या आपल्या नात्यामध्ये कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही व्यक्‍ती येणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपण असा निश्‍चय केला पाहिजे, की आपण असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे यहोवाच्या पवित्र नावाचा अपमान होईल.—लेवी. १९:१२; यश. ५७:१५.

१५. लेवीय १९:५-८, २१, २२ या वचनांमधून आपल्याला कोणती प्रेरणा मिळते?

१५ यहोवाच्या आज्ञा पाळून इस्राएली लोकांनी दाखवून दिलं, की ते यहोवाला आपला देव मानतात. लेवीय १८:४ मध्ये म्हटलं आहे: “तुम्ही माझे न्याय-निर्णय पाळले पाहिजेत आणि माझ्या नियमांप्रमाणे चाललं पाहिजे. मी तुमचा देव यहोवा आहे.” आणि असे कितीतरी न्याय-निर्णय १९ व्या अध्यायात वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, वचन ५-८, २१, २२ यांमध्ये प्राण्यांच्या अर्पणांबद्दल सांगितलं आहे. यहोवाला दिल्या जाणाऱ्‍या या “पवित्र अर्पणाचा अनादर” होणार नाही, अशा प्रकारे इस्राएली लोकांनी ती अर्पणं द्यायची होती. ही वचनं वाचल्यावर आपल्याला यहोवाला खूश करायची आणि त्याला स्तुतीचं बलिदान द्यायची प्रेरणा मिळते.—इब्री १३:१५.

१६. लेवीय १९:१९ या वचनातून आपण काय शिकतो?

१६ पवित्र असण्यासाठी आपण इतर लोकांपेक्षा वेगळे आहोत, हे दिसून आलं पाहिजे. पण हे इतकं सोपं नाही. कारण शाळासोबती, कामावरचे लोक, सत्यात नसलेले नातेवाईक आणि इतर जण कदाचित आपल्यावर अशा काही गोष्टींमध्ये सहभागी होण्याचा दबाव टाकतील, ज्या यहोवाच्या उपासनेच्या आड येतात. अशा वेळी आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. मग तो घेण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? त्यासाठी आपण लेवीय १९:१९ मध्ये दिलेलं तत्त्व लक्षात ठेवू शकतो. तिथे असं म्हटलं आहे: ‘तुम्ही दोन प्रकारच्या धाग्यांपासून बनवलेले कपडे घालू नका.’ हा नियम पाळल्यामुळे इस्राएली लोक आजूबाजूच्या राष्ट्रांपासून वेगळे दिसून यायचे. आज आपण हा नियम पाळत नसलो तरी त्यातलं तत्त्व नक्कीच पाळतो. आपण अशा लोकांसारखं बनायचं टाळतो, ज्यांच्या शिकवणी आणि विश्‍वास बायबलप्रमाणे नाहीत. मग ते आपले शाळासोबती असोत, कामावरचे लोक असोत किंवा नातेवाईक असोत. याचा असा अर्थ होत नाही, की नातेवाइकांवर किंवा इतर लोकांवर आपलं प्रेम नाही. पण आपण यहोवाचे उपासक असल्यामुळे जीवनातल्या महत्त्वाच्या गोष्टींच्या बाबतीत आपण इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. कारण पवित्र असण्याचा अर्थ यहोवाच्या सेवेसाठी वेगळं असणं असाही होतो.—२ करिंथ. ६:१४-१६; १ पेत्र ४:३, ४.

लेवीय १९:२३-२५ या वचनांमधून इस्राएली लोकांना कोणत्या गोष्टीची आठवण व्हायची, आणि या वचनांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? (परिच्छेद १७-१८ पाहा) *

१७-१८. लेवीय १९:२३-२५ या वचनातून आपण काय शिकतो?

१७ “मी तुमचा देव यहोवा आहे,” या शब्दांवरून इस्राएली लोकांना याची आठवण व्हायची, की यहोवासोबतच्या नात्याला त्यांनी आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिलं पाहिजे. हे ते कसं करू शकत होते? याचं उत्तर लेवीय १९:२३-२५ मध्ये सांगितलं आहे. (वाचा.) इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात पोचल्यानंतर हे शब्द कसे पाळणार होते, ते आता आपण पाहू या. एखाद्या माणसाने जर फळझाडं लावली, तर तीन वर्षांपर्यंत त्याला त्याची फळं खायची नव्हती. आणि चौथ्या वर्षी त्याला त्याची सगळी फळं देवाच्या उपासना मंडपात अर्पण करायची होती. पण पाचव्या वर्षापासून तो त्या झाडाची फळं खाऊ शकत होता. या आज्ञेवरून इस्राएली लोकांना याची जाणीव व्हायची, की त्यांनी स्वतःच्या गरजांना जीवनात सर्वात जास्त महत्त्व देऊ नये. उलट, आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. आणि त्याच्या उपासनेला जीवनात सर्वात जास्त महत्त्वं दिलं पाहिजे. कारण यहोवा स्वतः त्यांच्या गरजा पूर्ण करणार होता. तसंच, या नियमामुळे इस्राएली लोकांना उपासना मंडपात उदार मनाने भेट द्यायचं प्रोत्साहनही मिळायचं.

१८ लेवीय १९:२३-२५ मध्ये जो नियम दिला आहे, त्यावरून आपल्याला येशूच्या डोंगरावरील प्रवचनातल्या शब्दांची आठवण होते. त्यात त्याने म्हटलं: ‘काय खावं, काय प्यावं अशी चिंता करायचं सोडून द्या.’ पुढे येशूने म्हटलं: “तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे हे स्वर्गातल्या तुमच्या पित्याला माहीत आहे.” यहोवा जर पक्ष्यांना अन्‍न पुरवतो आणि त्यांची काळजी घेतो, तर तो नक्कीच आपल्याही गरजा पूर्ण करेल. (मत्त. ६:२५, २६, ३२) म्हणून यहोवा आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करेल असा भरवसा आपण ठेवला पाहिजे. तसंच, कोणताही दिखावा न करता जे गरजू आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. इतकंच नाही, तर मंडळीचा खर्च भागवण्यासाठी आपण दान द्यायलाही नेहमी तयार असलं पाहिजे. आपण दाखवलेली ही उदारता पाहून यहोवा त्याची परतफेड करेल. (मत्त. ६:२-४) आपण उदारता दाखवतो तेव्हा हेच दिसून येतं, की लेवीय १९:२३-२५ मधलं तत्त्व आपल्याला समजलं आहे.

१९. लेवीय १९ व्या अध्यायातल्या ज्या वचनांवर आपण चर्चा केली, त्यांतून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१९ आत्तापर्यंत आपण लेवीय १९ अध्यायातल्या फक्‍त काही वचनांचं परीक्षण केलं. आपणसुद्धा आपल्या पवित्र देवासारखं कसं होऊ शकतो, ते आपण पाहीलं. त्याचं अनुकरण करून आपण ‘आपल्या सर्व वागणुकीत पवित्र व्हायचा’ प्रयत्न करतो. (१ पेत्र १:१५) आणि अनेक जण आपलं हे चांगलं आचरण पाहून देवाचा गौरव करतात. (१ पेत्र २:१२) पण लेवीय १९ व्या अध्यायात अजूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे. पुढच्या लेखात आपण या अध्यायातली आणखी काही वचनांवर चर्चा करणार आहोत, आणि जीवनातल्या कोणत्या गोष्टींमध्ये आपण पवित्र होऊ शकतो ते पाहणार आहोत.

गीत १ यहोवाचे गुण

^ परि. 5 यहोवावर आपलं खूप प्रेम आहे आणि त्याला खूश करायची आपली मनापासून इच्छा आहे. यहोवा पवित्र आहे आणि त्याची उपासना करणाऱ्‍यांनीही पवित्र असावं असं त्याला वाटतं. पण आपण तर अपरिपूर्ण मानव आहोत. मग हे शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. प्रेषित पेत्रने आपल्या भाऊबहिणींना जो सल्ला दिला आणि यहोवाने प्राचीन इस्राएलला जो सल्ला दिला त्यावरून दिसून येतं, की आपणही आपल्या सर्व वागणुकीत पवित्र होऊ शकतो.

^ परि. 13 शब्बाथाची व्यवस्था आणि त्यापासून आपल्याला काय शिकायला मिळतं याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी डिसेंबर २०१९ च्या टेहळणी बुरूज  अंकातला, “काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे,” हा लेख पाहा.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन: एक बांधव आपल्या पत्नी आणि मुलीसोबत त्याच्या पालकांना भेटून त्यांच्यासोबत वेळ घालवत आहे. आणि नेहमी त्यांच्या संपर्कात राहायचा प्रयत्न करत आहे.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: एक इस्राएली शेतकरी त्याने लावलेल्या झाडांवरची फळं पाहत आहे.