व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही एक चांगले सहकारी आहात का?

तुम्ही एक चांगले सहकारी आहात का?

‘मी एका कुशल कारागिरासारखा त्याच्यासोबत होतो. मी सतत त्याच्यासमोर आनंदी असायचो.’ (नीति. ८:३०) पृथ्वीवर येण्याआधी येशूने स्वर्गात आपल्या पित्यासोबत अगणित वर्षं घालवली. त्या काळात त्याने आपल्या पित्यासोबत मिळून कसं काम केलं त्याचं वर्णन आपल्याला इथे वाचायला मिळतं. देवासोबत मिळून काम करताना त्याला कसं वाटायचं याबद्दल या वचनात म्हटलं आहे: ‘मी सतत त्याच्यासमोर आनंदी असायचो.’

स्वर्गात असताना, एकमेकांसोबत मिळून काम कसं करायचं हे येशू आपल्या पित्याकडून शिकला. पुढे जेव्हा तो पृथ्वीवर आला तेव्हा इतरांनाही त्याच्याकडून ही गोष्ट शिकायला मिळाली. येशूच्या या उदाहरणाचं आपण कसं अनुकरण करू शकतो? त्याच्या उदाहरणाचं जर आपण जवळून परीक्षण केलं, तर तीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. आणि त्यामुळे एक चांगला सहकारी बनायला आपल्याला मदत होईल.

यहोवा आणि येशूचं उदाहरण लक्षात ठेवून आपणसुद्धा जे काही शिकलो ते इतरांना आनंदाने सांगितलं पाहिजे

पहिली गोष्ट: ‘एकमेकांचा आदरा करा’

एक चांगला सहकारी नम्र असतो. तो इतरांवर स्वतःची छाप पाडायचा किंवा स्वतःकडेच इतरांचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत नाही; तर आपल्यासोबत काम करणाऱ्‍या लोकांना तो महत्त्व देतो. हीच गोष्ट येशू आपल्या पित्याकडून शिकला. खरंतर, यहोवानेच सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. पण निर्मितीच्या या कामात आपल्या मुलाने किती महत्त्वाची भूमिका पार पाडली याकडे यहोवाने इतरांचं लक्ष वेधलं. आणि ही गोष्ट त्याने जे म्हटलं त्यातून दिसून येते: देवाने म्हटलं: ‘आपण आपल्या  प्रतिरूपाचा माणूस निर्माण करू.’ (उत्प. १:२६) यावरून येशूला यहोवाची नम्रता आणखी चांगल्या प्रकारे समजली असेल.—स्तो. १८:३५.

अशीच नम्रता पृथ्वीवर असताना येशूनेही दाखवली. लोकांनी त्याची प्रशंसा केली, तेव्हा त्याचं सगळं श्रेय त्याने देवाला दिलं. (मार्क १०:१७, १८; योहा. ७:१५, १६) येशूचे आपल्या शिष्यांसोबत खूप चांगले संबंध होते. त्याने त्यांना दासांसारखं नाही, तर मित्रांसारखं वागवलं. (योहा. १५:१५) नम्र राहणं किती महत्त्वाचं आहे हे शिकवण्यासाठी त्याने आपल्या शिष्यांचे पायही धुतले. (योहा. १३:५, १२-१४) येशूसारखंच आपणही नेहमी स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार केला पाहिजे. कामाचं श्रेय कोणाला मिळेल याचा विचार न करता आपण जेव्हा एकमेकांचा आदर करतो, तेव्हा आपण जास्तीत जास्त काम पूर्ण करू शकतो.—रोम. १२:१०.

एका नम्र व्यक्‍तीला याचीही जाणीव असते, की “पुष्कळ जणांच्या सल्ल्यामुळे कामात यश मिळतं.” (नीति. १५:२२) आपल्याकडे कामाचा कितीही अनुभव असला किंवा आपल्याकडे कितीही क्षमता असल्या, तरी आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, की असा कोणीही माणूस नाही ज्याला सगळं काही माहीत असतं. येशूनेसुद्धा कबूल केलं, की अशा काही गोष्टी होत्या ज्या त्या वेळी त्यालाही माहीत नव्हत्या. (मत्त. २४:३६) इतकंच नाही, तर आपल्या अपरिपूर्ण शिष्यांचं मत जाणून घ्यायलाही तो उत्सुक होता. (मत्त. १६:१३-१६) म्हणूनच त्याच्या शिष्यांना त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं. आपणसुद्धा नम्र राहून आपल्या मर्यादा लक्षात घेतल्या आणि इतरांची मतं विचारात घेतली, त्यांचं ऐकून घेतलं, तर त्यांच्यासोबत आपले संबंध चांगले राहतील आणि आपल्या कामात आपल्याला “यश” मिळेल.

मंडळीतले वडील एकमेकांसोबत काम करतात तेव्हा खासकरून त्यांनी येशूच्या या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करताना किंवा निर्णय घेताना यहोवाची पवित्र शक्‍ती कोणालाही प्रेरणा देऊ शकते हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. चर्चा करण्यासाठी सगळे वडील एकत्र येतात तेव्हा प्रत्येकाला आपलं मत मनमोकळेपणाने सांगता येईल असं वातावरण ठेवायचा ते प्रयत्न करतात. यामुळे संपूर्ण मंडळीला फायदा होईल असे निर्णय त्यांना सोबत मिळून घेता येतील.

दुसरी गोष्ट: “तुमचा समजूतदारपणा सर्वांना कळून येऊ द्या”

एक चांगला सहकारी इतरांसोबत खूप समजूतदारपणे वागतो. एखाद्या गोष्टीवर तो अडून राहत नाही, तर नमतं घ्यायला तयार असतो. मानवांसोबत वागताना आपल्या पित्याने किती समजूतदारपणा दाखवला, हे येशूने अनेकदा जवळून पाहिलं होतं. उदाहरणार्थ, मानव पापी असल्यामुळे त्यांच्यासाठी मृत्यू अटळ होता. पण यातून त्यांची सुटका करण्यासाठी यहोवाने आपल्या मुलाला पाठवलं आणि मानवांना आशा दिली.—योहा. ३:१६.

येशूनेसुद्धा समजूतदारपणा दाखवला. जेव्हा गरज होती किंवा योग्य होतं तेव्हा तो बदल करायला तयार होता. एखाद्या गोष्टीवर तो विनाकारण अडून राहिला नाही. उदाहरणार्थ, येशूला खरंतर इस्राएली लोकांना मदत करायला पाठवलं होतं. पण तरीसुद्धा फेनिकेच्या एका स्त्रीला त्याने मदत केली. (मत्त. १५:२२-२८) तसंच, तो आपल्या शिष्यांसोबतही खूप समजूतदारपणे वागला. ते कधीच चुकणार नाहीत अशी अपेक्षा त्याने त्यांच्याकडून केली नाही. त्याच्या जवळच्या मित्राने, पेत्रने त्याला नाकारलं, तेव्हा येशूने मोठ्या मनाने त्याला माफ केलं. याशिवाय येशूने पुढे त्याला मोठ्या जबाबदाऱ्‍यासुद्धा दिल्या. (लूक २२:३२; योहा. २१:१७; प्रे. कार्यं २:१४; ८:१४-१७; १०:४४, ४५) आपणसुद्धा येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करून बदल करायला तयार असलं पाहिजे. त्यामुळे ‘आपला समजूतदारपणा सर्वांना कळून येईल.’—फिलिप्पै. ४:५.

समजूतदारपणामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या लोकांसोबत जुळवून घ्यायला आणि मिळूनमिसळून काम करायला मदत होते. येशू सगळ्यांशीच इतका चांगला वागायचा, की त्याचा द्वेष करणाऱ्‍या शत्रूंनी त्याच्यावर असा आरोप लावला, की तो “जकातदारांचा आणि पापी लोकांचा मित्र” आहे. पण खरंतर जकातदार आणि पापी लोकांनी त्याच्या संदेशाला प्रतिसाद दिला होता. (मत्त. ११:१९) येशूसारखंच आपणसुद्धा इतरांसोबत मिळूनमिसळून काम करतो का? लुईस नावाच्या बांधवाचाच विचार करा. त्यांनी अनेक वर्ष प्रवासी कार्यात आणि बेथेलमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत काम केलं. ते म्हणतात: ‘आपण सगळेच अपरिपूर्ण आहेत आणि इतर अपरिपूर्ण लोकांसोबत काम करणं, हे वेगवेगळ्या आकाराच्या ओबडधोबड दगडांनी एक सरळ भिंत बांधण्यासारखं आहे. प्रत्येक दगड वेगळ्या आकाराचा असल्यामुळे तो योग्य जागी बसवण्यासाठी वेळ आणि मेहनत लागू शकते. पण तरी त्यापासून एक सरळ भिंत तयार केली जाऊ शकते. एकमेकांसोबत मिळूनमिसळून काम करण्यासाठी मीसुद्धा स्वतःमध्ये बरेच बदल केले आहेत. त्यामुळे एकत्र मिळून आम्हाला ते काम पूर्ण करता आलं.’ ही खरंच किती चांगली मनोवृत्ती आहे!

एक चांगला सहकारी इतरांवर अधिकार गाजवण्यासाठी त्यांना लागणारी किंवा महत्त्वाची माहिती कधीच स्वतःकडे लपवून ठेवत नाही

मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत काम करताना आपण समजूतदारपणा कसा दाखवू शकतो? मंडळीतले भाऊबहीण वेगवेगळ्या वयोगटातले असतात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या असतात. त्यामुळे प्रचारकार्यात त्यांच्यासोबत काम करताना आपण त्यांच्याशी समजूतदारपणे वागलं पाहिजे. जसं की, प्रचार करताना त्यांचं वय लक्षात घेऊन आपल्याला कदाचित त्यांच्यासोबत हळूहळू चालावं लागेल. किंवा अधूनमधून थांबावं लागेल. किंवा प्रचार करायची जी पद्धत त्यांना आवडत असेल, कदाचित त्याच पद्धतीने आपल्याला त्यांच्यासोबत काम करावं लागेल. असा समजूतदारपणा दाखवल्यामुळे त्यांनाही प्रचारकार्यातून भरपूर आनंद मिळेल.

तिसरी गोष्ट: मनाचा मोठेपणा आणि उदारता दाखवा

चांगला सहकारी हा उदार मनाचा असतो. (१ तीम. ६:१८) आपल्या पित्यासोबत मिळून काम करताना, येशूने पाहिलं असेल, की यहोवा कोणत्याही गोष्टी लपवून ठेवत नाही. यहोवाने “आकाश तयार केलं,” तेव्हा येशू ‘तिथे होता.’ आणि त्याला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. (नीति. ८:२७) पुढे येशू पृथ्वीवर आला तेव्हा “पित्याकडून ऐकलेल्या सगळ्या गोष्टी” त्याने आनंदाने आपल्या शिष्यांना सांगितल्या. (योहा. १५:१५) यहोवा आणि येशूचं हे उदाहरण लक्षात ठेवून, आपणसुद्धा जे काही शिकलो ते इतरांना आनंदाने सांगितलं पाहिजे. एक चांगला सहकारी इतरांवर अधिकार गाजवण्यासाठी त्यांना लागणारी किंवा महत्त्वाची माहिती कधीच स्वतःकडे लपवून ठेवत नाही. उलट त्याला जे काही शिकलायला मिळालं ते इतरांना सांगायला तो नेहमी तयार असतो.

इतरांसोबत मिळून काम करताना आपण एकमेकांची प्रशंसाही केली पाहिजे. कोणी आपल्या कामाची प्रशंसा केली तर आपल्याला बरं वाटत नाही का? येशूने आपल्या शिष्यांची प्रशंसा करायची एकही संधी सोडली नाही. (मत्त. २५:१९-२३; लूक १०:१७-२० यासोबत तुलना करा.) इतकंच नाही, तर त्याने त्यांना म्हटलं, की ते त्याच्याहून ‘मोठी कार्यं‘ करतील. (योहा. १४:१२) अगदी आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्रीसुद्धा त्याने आपल्या विश्‍वासू प्रेषितांची प्रशंसा केली. तो म्हणाला: ‘माझ्या परीक्षांमध्ये माझ्यासोबत राहिलेले तुम्हीच आहात.’ (लूक २२:२८) हे शब्द ऐकून शिष्यांना किती बरं वाटलं असेल! त्यामुळे आणखी काम करायची त्यांना नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. आपणही इतरांची प्रशंसा केली, तर त्यांना बरं वाटेल आणि आणखी चांगल्या प्रकारे काम करायची प्रेरणा त्यांना मिळेल.

तुम्हीसुद्धा इतरांचे चांगले सहकारी बनू शकता

कायोड नावाचा एक भाऊ म्हणतो: “एक चांगला सहकारी कधीच चुकत नाही, असं नाही. त्याच्याकडूनही चूका होतात. पण कामावरचं वातावरण तो नेहमी खेळीमेळीचं ठेवायचा प्रयत्न करतो. आणि कोणावरही कामाचा ताण राहणार नाही याची तो काळजी घेतो.” तुमच्यासोबत काम करणाऱ्‍यांनाही तुमच्याबद्दल असंच वाटतं का? या बाबतीत तुमच्याबद्दल इतरांना काय वाटतं, हे तुम्ही त्यांना विचारू शकता. येशूच्या शिष्यांना जसं त्याच्यासोबत काम करायला आवडायचं, तसं जर त्यांनाही तुमच्यासोबत काम करायला आवडत असेल, तर प्रेषित पौलप्रमाणे तुम्हीही असं म्हणू शकता: “तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमचे सहकारी आहोत.”—२ करिंथ. १:२४.