व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५०

चांगल्या मेंढपाळाचं ऐका

चांगल्या मेंढपाळाचं ऐका

‘माझी मेंढरं माझा आवाज ऐकतील.’—योहा. १०:१६.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१. येशूने आपल्या शिष्यांची तुलना मेंढरांशी का केली?

शिष्यांसोबत आपलं किती जवळचं नातं आहे हे समजावून सांगण्यासाठी येशूने स्वतःची तुलना एका चांगल्या मेंढपाळाशी आणि शिष्यांची तुलना मेंढरांशी केली. (योहा. १०:१४) आणि ही तुलना योग्यच आहे. कारण मेंढरं आपल्या मेंढपाळाला ओळखतात आणि त्याच्या आवाजाला लगेच प्रतिसाद देतात. ही गोष्ट एका पर्यटकाने प्रत्यक्ष अनुभवली. तो म्हणाला, “एकदा आम्हाला काही मेंढरांचे फोटो घ्यायचे होते आणि त्यासाठी आम्ही त्यांना जवळ बोलवायचा खूप प्रयत्न करत होतो. पण ते काही येत नव्हते. कारण ते आमचा आवाज ओळखत नव्हते. पण मग एक छोटा मुलगा आला. तो त्यांचा मेंढपाळ होता. त्याने फक्‍त हाक मारायचा उशीर की ती लगेच त्याच्या मागे आली.”

२-३. (क) येशूचे शिष्य त्याचा आवाज कसा ऐकतात? (ख) या आणि पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला येशूच्या शब्दांची आठवण होते. आपल्या मेंढरांबद्दल, म्हणजेच शिष्यांबद्दल तो असं म्हणाला: “ती माझा आवाज ऐकतील.” (योहा. १०:१६) पण येशू तर स्वर्गात आहे. मग आपण त्याचा आवाज कसा ऐकू शकतो? येशूने शिकवलेल्या गोष्टी आपण जीवनात लागू करतो तेव्हा खरंतर आपण त्याचा आवाज ऐकत असतो.—मत्त. ७:२४, २५.

आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत  आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत  हे येशूने आपल्याला शिकवलं. यापैकी काही गोष्टी आपण या आणि पुढच्या लेखात पाहणार आहोत. या लेखात आपण अशा दोन गोष्टी पाहू, ज्या आपण टाळल्या पाहिजेत.

“खूप जास्त चिंता करायचं सोडून द्या”

४. लूक १२:२९ या वचनात सांगितल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीची आपल्याला “खूप जास्त चिंता” वाटू शकते?

लूक १२:२९ वाचा. आपल्या रोजच्या गरजांबद्दल “खूप जास्त चिंता करायचं सोडून द्या,” असा सल्ला येशूने आपल्या शिष्यांना दिला. येशूने दिलेला सल्ला नेहमीच योग्य आणि आपल्या भल्यासाठी असतो. आणि तो पाळायचा आपली इच्छाही असते. पण कधीकधी आपल्याला ते खूप कठीण वाटू शकतं. याचं काय कारण असेल बरं?

५. काहींना आपल्या रोजच्या गरजांची चिंता का वाटते?

  काहींना आपल्या रोजच्या गरजांची, म्हणजे अन्‍न, वस्त्र, निवारा या गोष्टींची चिंता असते. ते कदाचित अशा देशांमध्ये राहत असतील जिथे गरिबी जास्त आहे. त्यामुळे ते कमवत असले तरी कुटुंबाच्या गरजा भागवणं त्यांना कठीण जात असेल. किंवा कुटुंबात कमवणाऱ्‍या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबाची परिस्थिती खूप हलाखीची झाली असेल. शिवाय, कोरोना महामारीच्या या काळात कित्येकांनी आपली नोकरी किंवा मिळकतीचं साधन गमावलं असेल. (उप. ९:११) असं काहीतरी आपल्या बाबतीतही झालं असेल तर खूप जास्त चिंता करायचं सोडून द्या  असा जो सल्ला येशूने दिला, तो आपण कसा पाळू शकतो?

चिंतेत बुडून जाण्याऐवजी यहोवावर भरवसा ठेवायला शिका (परिच्छेद ६-८ पाहा) *

६. एकदा प्रेषित पेत्रसोबत काय घडलं?

एकदा पेत्र आणि इतर काही शिष्य गालील समुद्रात नावेतून प्रवास करत होते. अचानक समुद्रात एक मोठं वादळ आलं. त्या वेळी येशू त्यांच्याकडे पाण्यावरून चालत येत असल्याचं त्यांना दिसला. तेव्हा पेत्र म्हणाला: “प्रभू तू असशील तर मला पाण्यावरून तुझ्याजवळ येण्याची आज्ञा दे.” येशूने त्याला “ये!” असं म्हटलं तेव्हा पेत्र नावेतून उतरला आणि पाण्यावरून चालत येशूकडे जाऊ लागला. पण मग काय झालं? आपण असं वाचतो की वादळाकडे पाहून तो अतिशय घाबरला आणि बुडू लागला. तो ओरडून म्हणाला: “प्रभू, मला वाचव!” तेव्हा येशूने लगेच आपला हात पुढे करून त्याला धरलं आणि त्याला वाचवलं. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? जोपर्यंत पेत्रचं संपूर्ण लक्ष येशूवर होतं तोपर्यंत तो खवळलेल्या समुद्राच्या पाण्यावरसुद्धा चालू शकत होता. पण वादळाकडे पाहाताच भीतीने त्याच्या पोटात गोळा आला आणि तो बुडू लागला.—मत्त. १४:२४-३१.

७. पेत्रसोबत झालेल्या घटनेतून आपण काय शिकू शकतो?

या घटनेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. पेत्र नावेतून उतरला आणि त्याने पाण्यावर पाऊल ठेवलं, तेव्हा आपलं लक्ष भरकटेल आणि आपण बुडायला लागू असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं. उलट त्याला असं वाटलं होतं की आपण थेट येशूपर्यंत चालत जाऊ. पण तसं घडलं नाही. कारण येशूकडे पाहात राहण्याऐवजी त्याचं लक्ष वादळाकडे गेलं आणि तो घाबरला. पेत्रला पाण्यावर चालत राहण्यासाठी विश्‍वासाची गरज होती. अगदी तसंच आज समस्यांचा सामना करण्यासाठी आपल्यालाही विश्‍वासाची गरज आहे. पण यहोवावरून आणि त्याने दिलेल्या अभिवचनांवरून आपलं लक्ष भरकटलं, तर आपण आध्यात्मिक रितीने बुडू शकतो. त्यामुळे वादळासारख्या कोणत्याही समस्या आपल्या जीवनात आल्या, तरी आपलं लक्ष कायम यहोवावर आणि मदत करण्याच्या त्याच्या शक्‍तीवर असलं पाहिजे. मग आपल्याला हे कसं करता येईल?

८. आपल्या रोजच्या गरजांबद्दल खूप जास्त चिंता करण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे?

समस्यांना पाहून चिंता करत बसण्याऐवजी आपण यहोवावर भरवसा ठेवायला शिकलं पाहिजे. आपण जर आध्यात्मिक गोष्टींना आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं तर यहोवा आपल्याला वचन देतो, की तो आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करायला आपल्याला नक्की मदत करेल. (मत्त. ६:३२, ३३) त्याने दिलेलं हे अभिवचन आजपर्यंत पूर्ण केलं आहे. (अनु. ८:४, १५, १६; स्तो. ३७:२५) विचार करा पक्षी अन्‍न साठवून ठेवत नाहीत, पण तरी यहोवा त्यांना खायला देतो. आणि रानातली फुलं आज आहेत, तर उद्या नाहीत. पण तरी यहोवा त्यांना सजवतो. मग तो आपल्या गरजा पूर्ण करणार नाही का? त्यामुळे काय खावं, काय प्यावं आणि काय घालावं याची आपण चिंता करत बसू नये. (मत्त. ६:२६-३०; फिलिप्पै. ४:६, ७) आईवडील जसं प्रेमापोटी आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करतात, अगदी तसंच यहोवासुद्धा प्रेमापोटी आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण करतो. त्यामुळे यहोवा आपली काळजी घेईल याबद्दल आपण कधीच शंका घेऊ नये.

९. एका जोडप्याच्या उदाहरणातून तुम्ही काय शिकू शकता?

यहोवा आपल्या गरजा कशा पुरवतो हे दाखवणारं एक उदाहरण पाहा. पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्‍या एका जोडप्याला काही बहिणींना सभांना घेऊन जायचं होतं. या बहिणी, आश्रयासाठी इतर देशांतून आलेल्या लोकांच्या छावणीत राहत होत्या. म्हणून ते जोडपं आपली जुनी कार घेऊन जवळजवळ एक तासाचा प्रवास करत त्या ठिकाणी पोचलं. बांधव सांगतात: “सभा संपल्यावर आम्ही त्या बहिणींना घरी जेवायला बोलवलं. पण आमच्या लक्षात आलं, की त्यांना देण्यासाठी घरात काहीच नव्हतं.” मग या जोडप्याने काय केलं? बांधव पुढे सांगतात: “जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा आम्हाला दिसलं की कोणीतरी आमच्या दरवाजासमोर खाण्या-पिण्याच्या वस्तू भरलेल्या दोन मोठ्या बॅगा ठेवल्या आहेत. त्या कोणी ठेवल्या होत्या हे आम्हाला माहीत नाही. पण यहोवाने आमची गरज पूर्ण केली होती.” याच्या काही काळानंतर या जोडप्याची कार खराब झाली. प्रचारकार्याला जाण्यासाठी त्यांना कारची खूप गरज होती. पण कारची दुरुस्ती करता येईल इतके पैसे त्यांच्याकडे नव्हते. कार नीट करायला किती खर्च येईल याचा अंदाज घेण्यासाठी बांधव ती कार घेऊन एका गॅरेजमध्ये गेले. मग कार तिथे लावून जात असताना एक माणूस तिथे आला आणि “ही कार कोणाचीए?” असं विचारू लागला. तेव्हा बांधवाने त्याला सांगितलं की ती कार त्याची आहे आणि दुरुस्तीसाठी त्याने ती इथे आणली आहे. यावर त्या माणसाने बांधवाला म्हटलं: “ठिकए, पण माझ्या पत्नीला सेम याच टाईपची आणि याच कलरची कार हवीए. कितीला विकाल ही कार?” बांधवाला ती कार विकून इतके पैसे मिळाले की तेवढ्या पैशात त्याने दुसरी कार विकत घेतली. बांधव शेवटी म्हणतात: “त्या दिवशी मी खूप भारावून गेलो होतो. कारण आम्हाला जाणवलं ही काही अशीच घडून आलेली गोष्ट नव्हती, तर यहोवाने ती घडवून आणली होती.”

१०. स्तोत्र ३७:५ हे वचन आपल्याला काय करायचं प्रोत्साहन देतं?

१० आपण जर आपल्या मेंढपाळाचं ऐकलं आणि आपल्या रोजच्या गरजांबद्दल खूप जास्त चिंता करायचं सोडून दिलं, तर यहोवा आपली काळजी घेईल अशी खातरी आपण बाळगू शकतो. (स्तोत्र ३७:५ वाचा; १ पेत्र ५:७)  पाचव्या परिच्छेदात आपण ज्या वेगवेगळ्या परिस्थितींबद्दल पाहिलं होतं त्यांचा विचार करा. आत्तापर्यंत कदाचित घरात कमवून आणाऱ्‍या व्यक्‍तीद्वारे किंवा आपल्या नोकरीद्वारे यहोवाने आपल्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या असतील. पण जर आता कमावत्या व्यक्‍तीला ते शक्य नसेल किंवा आपली नोकरी गेली असेल तर काय? अशा वेळी यहोवा कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या गरजा नक्की पूर्ण करेल आणि आपली काळजी घेईल याची खातरी आपण बाळगू शकतो. आता आपण आणखी एका गोष्टीकडे लक्ष देऊ जी आपण टाळली पाहिजे.

“दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या”

इतरांच्या चुका नाही, तर त्यांच्यातले चांगले गुण पाहा (परिच्छेद ११, १४-१६ पाहा) *

११. मत्तय ७:१, २ मध्ये येशूने आपल्याला काय सल्ला दिला, पण तो पाळणं कठीण का असू शकतं?

११ मत्तय ७:१, २ वाचा. अपरिपूर्ण असल्यामुळे मानवांमध्ये इतरांचे दोष काढायची वृत्ती असते हे येशूला माहीत होतं. म्हणून तो म्हणाला: “दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या.”  आपल्या भाऊबहिणींच्या चुकांकडे दुर्लक्ष करायचा आपण खूप प्रयत्न करतो. पण शेवटी आपण सगळे अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे बऱ्‍याचदा आपलं लक्ष त्यांच्या चुकांकडे जातं आणि आपण त्यांची टीका करतो. मग आपण काय केलं पाहिजे? आपण येशूचं ऐकलं पाहिजे आणि इतरांचे दोष काढायचं सोडून दिलं पाहिजे.

१२-१३. यहोवाच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१२ या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण केलं पाहिजे. तो नेहमी लोकांमधल्या चांगल्या गोष्टी पाहतो. दावीदच्या बाबतीत त्याने हेच केलं. दावीद राजाने आपल्या आयुष्यात काही गंभीर चुका केल्या होत्या. त्याने बथशेबाशी व्यभिचार केला होता आणि कट रचून तिच्या पतीचा खून केला होता. (२ शमु. ११:२-४, १४, १५, २४) यामुळे त्याने स्वतःलाच नाही, तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही खूप दुःख दिलं होतं. (२ शमु. १२:१०, ११) आणखी एका वेळी त्याने आपल्या सैन्यातल्या लोकांची संख्या मोजायची आज्ञा दिली. कदाचित आपल्या मोठ्या सैन्याचा गर्व त्याच्या मनात निर्माण झाला असेल. यावरून त्याने दाखवून दिलं, की यहोवापेक्षा त्याचा आपल्या सैन्यावर जास्त भरवसा होता. पण या गोष्टीचा शेवटी काय परिणाम झाला? जवळजवळ ७०,००० इस्राएली लोक एका साथीच्या रोगामुळे मेले.—२ शमु. २४:१-४, १०-१५.

१३ तुम्ही जर त्या काळात जगत असता तर दावीदबद्दल तुम्ही कसा विचार केला असता? यहोवाने त्याला कधीच माफ करू नये असा तुम्ही विचार केला असता का? पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, यहोवाने त्याला माफ केलं! कारण दावीदने किती मनापासून पश्‍चात्ताप केला होता आणि आपल्या एकंदर आयुष्यात आपल्यावर किती विश्‍वास दाखवला होता हे यहोवाने पाहिलं. यहोवाला माहीत होतं, की दावीदचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपलं मन आनंदित करायची त्याची मनापासून इच्छा आहे. तर मग, यहोवा आपल्यामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी पाहतो हे जाणून तुम्हाला आनंद होत नाही का?—१ राजे ९:४; १ इति. २९:१०, १७.

१४. कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करायला मदत होईल?

१४ यहोवा जर अपरिपूर्ण मानवांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही, तर आपण एकमेकांकडून तशी अपेक्षा का करावी? उलट, यहोवासारखं आपण एकमेकांमधल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. इतरांच्या चुका काढणं आणि त्यांची टीका करणं खूप सोपं असतं. पण या बाबतीत आपण यहोवासारखा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. इतरांच्या चुका दिसत असल्या, तरी त्यांकडे दुर्लक्ष करून आपण त्यांच्यासोबत मिळूनमिसळून राहिलं पाहिजे. पैलू न पाडलेला हिरा अजिबात आकर्षक वाटत नाही. तो खडबडीत असतो आणि त्याला काहीच चकाकी नसते. पण पैलू पाडल्यावर आणि पॉलिश केल्यावर तो किती सुंदर दिसेल, हे हिऱ्‍यांची पारख असलेला व्यक्‍तीच समजू शकतो. यहोवा आणि येशूसुद्धा आपल्याकडे असंच पाहतात. म्हणून आपणही इतरांच्या चुकांकडे नाही, तर त्यांच्यातल्या चांगल्या गुणांकडे पाहिलं पाहिजे.

१५. इतरांबद्दल मत बनवण्याआधी त्यांची परिस्थिती समजून घेणं का गरजेचं आहे?

१५ इतरांमधले चांगले गुण पाहण्यासोबतच आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, संपूर्ण माहिती नसताना आपण इतरांबद्दल चुकीचं मत बनवू नये. तर त्यांची परिस्थिती काय आहे हे समजून घ्यायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. या उदाहरणाचाच विचार करा: एकदा येशू मंदिरात होता तेव्हा त्याने एका गरीब विधवेला दानपेटीत दोन नाणी टाकताना पाहिलं. पण ते पाहून त्याने असा विचार केला नाही, की ‘तिने दोनच नाणी का टाकली?’ तिने किती दान दिलं याकडे येशूने लक्ष दिलं नाही, तर तिने जे काही दिलं ते कोणत्या भावनेने दिलं आणि तिची परिस्थिती काय होती याकडे येशूने लक्ष दिलं. आणि त्याबद्दल त्याने तिची प्रशंसा केली.—लूक २१:१-४.

१६. वेरॉनिकाच्या अनुभवातून तुम्ही काय शिकू शकता?

१६ इतरांच्या परिस्थितीचा विचार करणं किती महत्त्वाचं आहे हे समजण्यासाठी आपण वेरॉनिका नावाच्या एका बहिणीचा अनुभव पाहू या. ती ज्या मंडळीत सेवा करत होती तिथे एक आई आणि तिचा मुलगा होता. वेरॉनिका म्हणते: “सुरुवातीला मला असं वाटायचं, की ते नियमिपणे सभांना आणि सेवेला येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी चांगला विचार करत नव्हते. पण मग एकदा मी त्या बहिणीसोबत प्रचारकार्यात गेले. तिच्यासोबत काम करताना तिने मला सांगितलं, की तिच्या मुलाला ऑटिझम नावाचा एक मनोविकार आहे. घर चालवण्यासाठी आणि आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी ती बहीण खूप मेहनत करत होती. मुलाच्या आजारामुळे काही वेळा सभांना यायला तिला जमायचं नाही. अशा वेळी ती दुसऱ्‍या मंडळीच्या सभांना जायची.” वेरॉनिका म्हणते, की “तिच्या या परिस्थितीची मला काहीच कल्पना नव्हती. पण यहोवाची सेवा करण्यासाठी ती किती मेहनत घेत आहे, हे पाहून आता मला तिच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर वाटतो.”

१७. याकोब २:८ मध्ये आपल्याला काय सल्ला दिला आहे, आणि आपण तो कसा पाळू शकतो?

१७ आपल्या एखाद्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल आपण चुकीचं मत बनवलं होतं असं जर आपल्या लक्षात आलं तर आपण काय केलं पाहिजे? आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला आपल्या भाऊबहिणींवर प्रेम करायला सांगितलं आहे. (याकोब २:८ वाचा.) त्यासोबतच आपण यहोवाला कळकळून प्रार्थनाही केली पाहिजे. आणि या बाबतीत त्याने आपली मदत करावी अशी विनंती केली पाहिजे. पण प्रार्थना करण्यासोबतच आपण त्याप्रमाणे वागलंही पाहिजे. म्हणजे ज्या व्यक्‍तीबद्दल आपण चुकीचं मत बनवलं होतं तिच्याशी आपण बोललं पाहिजे, तिच्यासोबत वेळ घालवला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्‍तीच्या परिस्थितीबद्दल आपल्याला जास्त जाणून घेता येईल. आपण तिच्यासोबत सेवाकार्य करू शकतो किंवा तिला आपल्या घरी जेवायला बोलवू शकतो. यामुळे आपल्याला तिला आणखी चांगल्या प्रकारे ओळखता येईल आणि यहोवा आणि येशूप्रमाणेच तिच्यातले चांगले गुण पाहता येतील. यावरून हेच दिसून येईल, की “दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या,”  असा जो सल्ला आपल्या मेंढपाळाने दिला आहे, तो आपण पाळत आहोत.

१८. आपण आपल्या मेंढपाळाचं ऐकतो हे कसं दिसून येईल?

१८ मेंढरं जशी आपल्या मेंडपाळाचं ऐकतात, तसं आपणही आपल्या मेंढपाळाचं, येशूचं ऐकलं पाहिजे. आपण जर आपल्या रोजच्या गरजांबद्दल खूप जास्त चिंता करायचं सोडून दिलं आणि दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून दिलं, तर यहोवा आणि येशू आपल्याला आशीर्वाद देतील. त्यामुळे आपण ‘लहान कळपातले’ असो किंवा ‘दुसऱ्‍या मेंढरांपैकी’ असो, आपण सगळ्यांनीच आपल्या मेंढपाळाचं ऐकलं पाहिजे. (लूक १२:३२; योहा. १०:११, १४, १६) पुढच्या लेखात आपण येशूने शिकवलेल्या अशा दोन गोष्टी पाहू ज्या आपण केल्या पाहिजेत.

गीत ५३ ऐक्य जपू या

^ परि. 5 “माझी मेंढरं माझा आवाज ऐकतील,” असं जेव्हा येशूने म्हटलं तेव्हा त्याला असं म्हणायचं होतं, की त्याची मेंढरं त्याच्या शिकवणी ऐकतील आणि त्याप्रमाणे जीवन जगतील. या लेखात आपण येशूने शिकवलेल्या दोन महत्त्वाच्या शिकवणींबद्दल पाहणार आहोत. एक खूप जास्त चिंता न करण्याबद्दल आहे, तर दुसरी इतरांचे दोष काढण्याच्या वृत्तीबद्दल आहे. या बाबतीत येशूने दिलेला सल्ला आपण कसा पाळू शकतो ते पाहू या.

^ परि. 51 चित्रांचं वर्णन: नोकरी गेल्यामुळे एका भावाकडे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यात, त्याला आपलं घरही सोडावं लागतं. त्यामुळे यहोवावरून त्याचं लक्ष सहज भरकटू शकतं आणि तो चिंतेत बुडू शकतो.

^ परि. 53 चित्रांचं वर्णन: एक भाऊ सभेला उशिरा येत आहे. पण त्याच्यात बरेच चांगले गुण आहेत. तो खूप चांगलं साक्षकार्य करतो, एका वयस्कर बहिणीला मदत करतो आणि राज्य सभागृहाची साफसफाई करण्यात मदत करतो.