व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ८

तुम्ही दिलेला सल्ला इतरांना स्वीकारायला सोपा जातो का?

तुम्ही दिलेला सल्ला इतरांना स्वीकारायला सोपा जातो का?

“तेल आणि धूप यांमुळे जसा मनाला आनंद होतो, तसाच प्रामाणिक सल्ल्याने जुळलेल्या मैत्रीच्या गोड नात्यानेही होतो.”—नीति. २७:९.

गीत ४२ “दुर्बळांना साहाय्य करावे”

सारांश *

१-२. सल्ला देण्याच्या बाबतीत एका बांधवाला काय शिकायला मिळालं?

 बऱ्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपली एक बहीण काही काळापासून सभेला येत नव्हती म्हणून दोन वडील तिला भेटायला गेले. जे वडील तिच्यासोबत बोलत होते त्यांनी तिला, सभेला उपस्थित राहणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल एकापाठोपाठ एक अशी बरीच वचनं दाखवली. बोलणं झाल्यावर त्यांना वाटलं की आपल्या या भेटीचा त्या बहिणीला नक्कीच फायदा होईल. पण जेव्हा हे दोन भाऊ जायला निघाले तेव्हा ती बहीण त्यांना म्हणाली, “माझ्या आयुष्यात काय चाललंय याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही.” तिची समस्या काय आहे, तिची परिस्थिती काय आहे याबद्दल तिला काहीच न विचारता या भावांनी तिला सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी दिलेला सल्ला काहीच उपयोगाचा नाही असं तिला वाटलं.

ही गोष्ट आठवून त्या बहिणीशी बोलणारे वडील म्हणतात: “त्या वेळी मला असं वाटलं, की ती बहीण आपल्याशी उद्धट वागतेय. पण नंतर मी त्या गोष्टीचा बराच विचार केला आणि माझ्या लक्षात आलं, की योग्य वचनं दाखवण्याऐवजी मी तिला योग्य प्रश्‍न विचारले असते तर बरं झालं असतं. तिच्या आयुष्यात सगळं काही ठीक चाललंय ना, असं मी तिला विचारायला पाहिजे होतं.” या अनुभवातून त्या वडिलांना बरंच काही शिकायला मिळालं. आज ते मंडळीत एक प्रेमळ आणि समंजस मेंढपाळ म्हणून काम करत आहेत.

३. मंडळीत कोण कोण सल्ला देऊ शकतं?

  सल्ला देण्याची जबाबदारी खासकरून मंडळीतल्या वडिलांची असते. पण काही वेळा मंडळीतल्या भाऊबहिणींनाही एकमेकांना सल्ला द्यावा लागू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या भावाला किंवा बहिणीला सत्यात असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना सल्ला द्यावा लागू शकतो. (स्तो. १४१:५; नीति. २५:१२) किंवा तीत २:३-५ मध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या बाबतीत मंडळीतल्या वयस्कर स्त्रियांना, मंडळीतल्या “तरुण स्त्रियांना” सल्ला द्यावा लागू शकतो. तसंच, पालकांनासुद्धा बऱ्‍याचदा आपल्या मुलांना सुधारावं लागतं. त्यामुळे हा लेख जरी वडिलांना लक्षात ठेवून लिहिण्यात आला असला, तरी त्याचा फायदा आपल्या सर्वांनाच होऊ शकतो. कारण इतरांचं ‘मन आनंदित होईल,’ असा व्यावहारिक आणि प्रोत्साहनदायक सल्ला कसा देता येईल, हे या लेखात सांगण्यात आलं आहे.—नीति. २७:९.

४. या लेखात आपण कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत?

सल्ला देण्याआधी कोणत्या चार प्रश्‍नांचा आपण विचार केला पाहिजे याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. ते प्रश्‍न आहेत: (१) सल्ला देण्यामागचं कारण योग्य आहे का? (२) सल्ला द्यायची खरंच गरज आहे का? (३) सल्ला कोणी दिला पाहिजे? आणि (४) समोरच्याला फायदा होईल असा सल्ला कसा देता येईल?

सल्ला देण्यामागचं कारण योग्य आहे का?

५. सल्ला देण्याआधी वडिलांनी काय केलं पाहिजे? (१ करिंथकर १३:४, ७)

वडिलांना मंडळीतल्या प्रत्येक सदस्याची मनापासून काळजी असते. आणि त्या काळजीपोटीच चुकीच्या मार्गावर जाणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला ते सल्ला देतात. (गलती. ६:१) पण एखाद्याला सल्ला देण्याआधी प्रेषित पौलने सांगितलेल्या प्रेमाच्या वेगवेगळ्या पैलूंवर त्यांनी विचार केला, तर त्यांना चांगल्या प्रकारे सल्ला देता येईल. त्याने म्हटलं: “प्रेम सहनशील आणि दयाळू असतं. . . . प्रेम सगळं सहन करतं, सगळ्या गोष्टींवर भरवसा ठेवायला तयार असतं, सगळ्या गोष्टींची आशा धरतं, सगळ्या बाबतींत धीर धरतं.” (१ करिंथकर १३:४,  वाचा.) यावर मनन केल्यामुळे वडिलांना सल्ला देण्यामागच्या त्यांच्या हेतूंचं परीक्षण करता येईल. आणि आपल्या भावाला योग्य मनोवृत्तीने सल्ला देता येईल. त्या भावाला जर हे जाणवलं, की वडील आपल्याला काळजीपोटी आणि प्रेमापोटी सल्ला देत आहेत, तर त्याला सल्ला स्वीकारणं मुळीच कठीण जाणार नाही.—रोम. १२:१०.

६. सल्ला देण्याच्या बाबतीत पौलने कसं चांगलं उदाहरण मांडलं?

वडिलांसाठी प्रेषित पौलने एक चांगलं उदाहरण मांडलं. जेव्हा थेस्सलनीका इथल्या मंडळीतल्या लोकांना सल्ला देण्याची गरज होती, तेव्हा पौल त्यांना सल्ला द्यायला कचरला नाही. पण सल्ला देण्याआधी त्याने आपल्या पत्रात थेस्सलनीका इथल्या भाऊबहिणींनी विश्‍वासूपणे केलेल्या कार्याबद्दल, त्यांनी प्रेमळपणे घेतलेल्या परिश्रमांबद्दल आणि दाखवलेल्या धीराबद्दल त्यांची प्रशंसा केली. इतकंच नाही, तर त्याने त्यांची परिस्थिती समजून घेतली. त्यांना किती समस्यांचा आणि छळाचा सामना करावा लागत असेल याचा विचार केला. (१ थेस्सलनी. १:३; २ थेस्सलनी. १:४) शिवाय, त्याने त्यांना हेसुद्धा सांगितलं, की ते इतर भाऊबहिणींसाठी एक चांगलं उदाहरण आहेत. (१ थेस्सलनी. १:८, ९) पौलने त्यांचं केलेलं हे कौतुक ऐकून त्यांना किती आनंद झाला असेल. पौलचं तिथल्या भाऊबहिणींवर खरंच खूप प्रेम होतं. त्यामुळे आपल्या दोन्ही पत्रात पौलने थेस्सलनीकाकरांना जो सल्ला दिला, तो त्यांनी आनंदाने स्वीकारला.—१ थेस्सलनी. ४:१, ३-५, ११; २ थेस्सलनी. ३:११, १२.

७. काही जणांना सल्ला दिल्यावर राग का येतो?

आपण जर योग्य पद्धतीने सल्ला दिला नाही तर काय होऊ शकतं? एक अनुभवी वडील असं म्हणतात: “काही जणांना सल्ला दिला, की त्यांना लगेच राग येतो. त्यांना तो आवडत नाही. तो सल्ला चुकीचा होता म्हणून नाही, तर तो प्रेमळपणे देण्यात आला नव्हता म्हणून त्यांना राग येतो.” यातून आपल्याला काय समजतं? हेच की, चिडून दिलेल्या सल्ल्यापेक्षा प्रेमळपणे दिलेला सल्ला स्वीकारणं जास्त सोपं असतं.

सल्ला द्यायची खरंच गरज आहे का?

८. कोणालाही सल्ला देण्याआधी एका वडिलाने स्वतःला काय विचारलं पाहिजे?

वडिलांनी केव्हाही सल्ला द्यायची घाई करू नये. सल्ला देण्याआधी एखाद्या वडिलाने स्वतःला हे विचारलं पाहिजे: ‘मला खरंच त्या व्यक्‍तीशी बोलायची गरज आहे का? तिचं वागणं चुकीचं आहे याची मला पक्की खातरी आहे का? तिचं वागणं खरंच बायबलच्या विरोधात आहे का? की हा फक्‍त आमच्या दोघांमधल्या दृष्टिकोनातला फरक आहे?’ वडिलांनी कधीच “बोलण्याची घाई” करू नये. (नीति. २९:२०) एखाद्याला सल्ला द्यायची खरंच गरज आहे का याबद्दल जर एका वडिलाला शंका असेल, तर तो दुसऱ्‍या एका वडिलाशी बोलू शकतात. आणि त्या व्यक्‍तीचं वागणं बायबलच्या विरोधात आहे का आणि तिला सल्ला द्यायची खरंच गरज आहे का यावर ते विचार करू शकतात.—२ तीम. ३:१६, १७.

९. एखाद्याच्या पेहरावाबद्दल त्याला सल्ला देताना आपण पौलकडून काय शिकू शकतो? (१ तीमथ्य २:९, १०)

उदाहरणार्थ, एक परिस्थिती विचारात घ्या. समजा एखाद्या वडिलाला असं वाटलं, की एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा पेहराव बरोबर नाही. तर त्या व्यक्‍तीशी बोलण्याआधी त्यांनी स्वतःला हे विचारलं पाहिजे: ‘सल्ला देण्यासाठी माझ्याकडे खरंच बायबलवर आधारित एखादं ठोस कारण आहे का?’ आपण आपली मतं इतरांवर कधीच लादत नाही. त्यामुळे सल्ला देण्याआधी वडील दुसऱ्‍या एखाद्या वडिलाशी किंवा एखाद्या अनुभवी प्रचारकाशी बोलू शकतात आणि त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे विचारू शकतात. आणि मग सोबत मिळून ते पेहरावाबद्दल पौलने दिलेल्या सल्ल्यावर विचार करू शकतात. (१ तीमथ्य २:९, १० वाचा.) एका ख्रिस्ती व्यक्‍तीचा पेहराव कसा असला पाहिजे याबद्दल पौलने कोणतेही नियम दिले नाहीत. तर तो कसा शालीन आणि सभ्य असला पाहिजे याबद्दल त्याने काही तत्त्वं दिली. एक ख्रिस्ती व्यक्‍ती या तत्त्वांना धरून आपल्या आवडीनिवडींप्रमाणे पेहराव करू शकते ही गोष्ट त्याला माहीत होती. म्हणून एखाद्याच्या पेहरावाबद्दल सल्ला देण्याची खरंच गरज आहे का हे ठरवताना, वडिलांनी त्या व्यक्‍तीचा पेहराव शालीन आणि सभ्य आहे का याचा विचार केला पाहिजे.

१०. आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१० आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की एखाद्या गोष्टीबद्दल दोन ख्रिस्ती व्यक्‍ती वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात. आणि हे दोन्हीही निर्णय बरोबर असू शकतात. म्हणून काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याबद्दल आपण स्वतःचं मत आपल्या भाऊबहिणींवर लादू नये.—रोम. १४:१०.

सल्ला कोणी दिला पाहिजे?

११-१२. एखाद्याला सल्ला देण्याची गरज असते, तेव्हा वडिलांनी स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत, आणि का?

११ सल्ला देण्याची गरज आहे हे दिसून आल्यावर प्रश्‍न येतो, की तो कोणी दिला पाहिजे? एखाद्या विवाहित बहिणीला किंवा लहान मुलांना सल्ला देण्याआधी मंडळीतले वडील त्यांच्या कुटुंबप्रमुखाशी बोलतील. आणि मग कुटुंबप्रमुख कदाचित स्वतःच आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी या बाबतीत बोलायचं ठरवेल. * किंवा मग वडील कुटुंबप्रमुखाला सोबत घेऊन सल्ला देतील. आणि  परिच्छेद ३ मध्ये सांगितल्याप्रमाणे काही वेळा एका वयस्कर बहिणीने एका तरुण बहिणीला सल्ला देणं जास्त चांगलं राहील.

१२ वडिलांनी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणालाही सल्ला देण्याआधी त्यांनी स्वतःला हे विचारलं पाहिजे: ‘हा सल्ला मी दिलेला चांगला राहील, की आणखी कोणीतरी दिलेला जास्त चांगला राहील?’ उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती जर कमीपणाच्या भावनेशी लढत असेल, तर अशा वेळी याच समस्येचा सामना केलेल्या एखाद्या वडिलाने तिला सल्ला दिलेला जास्त चांगलं राहील. म्हणजे मग ते वडील तिच्या भावना समजून तिच्याशी बोलू शकतील. आणि त्या व्यक्‍तीलाही तो सल्ला स्वीकारायला सोपं जाईल. पण प्रत्येक वेळी असे कोणी वडील असोत किंवा नसोत, भाऊबहिणींना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याची जबाबदारी सगळ्याच वडिलांची आहे. सल्ला देण्याची गरज पडते तेव्हा कोण सल्ला देतो, यापेक्षा सल्ला देणं जास्त महत्त्वाचं आहे.

इतरांना फायदा होईल असा सल्ला कसा देता येईल?

ख्रिस्ती वडिलांनी “ऐकायला उत्सुक” का असलं पाहिजे? (परिच्छेद १३-१४ पाहा)

१३-१४. वडिलांनी लक्ष देऊन ऐकणं का महत्त्वाचं आहे?

१३ लक्ष देऊन ऐका.  एखाद्याला सल्ला द्यायचा असतो तेव्हा वडील स्वतःला विचारू शकतात: ‘या भावाच्या परिस्थितीबद्दल मला कितपत माहीत आहे? त्याच्या आयुष्यात काय चाललंय? तो अशा काही समस्यांचा सामना करत आहे का, ज्यांची मला काहीच कल्पना नाही? सध्या त्याला सर्वात जास्त कशाची गरज आहे?’

१४ सल्ला देण्याच्या बाबतीत याकोब १:१९ मध्ये दिलेलं तत्त्व आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तिथे याकोबने म्हटलं: “प्रत्येकाने ऐकायला उत्सुक आणि बोलण्यात संयमी असावं; लगेच रागावू नये.” एखाद्या वडिलाला कदाचित असं वाटेल, की आपल्याला त्या व्यक्‍तीची सगळी परिस्थिती माहीत आहे. पण खरंच तसं आहे का? नीतिवचनं १८:१३ मध्ये जे सांगितलं आहे त्याकडे लक्ष द्या. तिथं म्हटलं आहे: “जो ऐकून घेण्याआधीच उत्तर देतो, त्याच्यासाठी ते मूर्खपणाचं आणि लाजिरवाणं ठरतं.” त्यामुळे थेट त्या व्यक्‍तीशी बोलूनच त्याची परिस्थिती काय आहे, हे समजून घेणं चांगलं आहे. एखाद्याला सल्ला देण्याआधी वडिलांनी त्याचं लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या वडिलांना काय शिकायला मिळालं ते आठवा. त्यांच्या हे लक्षात आलं, की आपण जे बोलायचं ठरवलं होतं ते बोलण्याआधी आपण त्या बहिणीला हे विचारायला हवं होतं: “कसं चाललंय सिस्टर, सगळं ठिकए ना?” आपले भाऊबहीण कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, हे वडिलांनी समजून घ्यायचा प्रयत्न केला, तर त्यांना मदत करणं आणि प्रोत्साहन देणं सोपं जाईल.

१५. नीतिवचनं २७:२३ मधलं तत्त्व वडील कसं लागू करू शकतात?

१५ कळपाला जाणून घ्या.  लेखाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे चांगला सल्ला देण्यासाठी फक्‍त काही वचनं दाखवणं किंवा काही गोष्टी सुचवणं पुरेसं नाही; तर आपल्या भाऊबहिणींना हे जाणवलं पाहिजे, की आपल्याला त्यांची काळजी आहे, आपण त्यांना समजून घेतो आणि आपल्याला त्यांना मदत करायची इच्छा आहे. (नीतिवचनं २७:२३ वाचा.) त्यामुळे वडिलांनी मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत आपुलकीचं नातं जोडलं पाहिजे.

काय केल्यामुळे इतरांना सल्ला देणं वडिलांना सोपं जाईल? (परिच्छेद १६ पाहा)

१६. सल्ला देताना कोणती गोष्ट वडिलांना मदत करेल?

१६ आपल्या मंडळीतले वडील आपल्याला सल्ला द्यायचा असतो तेव्हाच आपल्याशी बोलतात, असं भाऊबहिणींना कधीच वाटू देऊ नका. त्यासाठी नेहमी आपल्या भाऊबहिणींशी बोलत जा. आणि ते समस्यांचा सामना करत असताना तुम्हाला त्यांची काळजी वाटते, हे त्यांना जाणवू द्या. एक अनुभवी वडील म्हणतात, की “आपण जर असं केलं, तर भाऊबहिणींसोबत आपण एक आपुलकीचं नातं जोडू शकतो.” त्यामुळे पुढे कधी त्यांना सल्ला द्यावा लागला तर तुम्हाला तो सहज देता येईल. आणि भाऊबहिणींनाही तो सहज स्वीकारता येईल.

वडिलांनी धीराने आणि प्रेमाने सल्ला का दिला पाहिजे? (परिच्छेद १७ पाहा)

१७. वडिलांना प्रेमाने आणि धीराने वागण्याची जास्त गरज केव्हा असू शकते?

१७ धीर धरा आणि प्रेमाने वागा.  बायबलमधून दिलेला सल्ला एखाद्याला पटत नाही, तेव्हा खासकरून वडिलांना त्यांच्याशी प्रेमाने आणि धीराने वागण्याची गरज आहे. एक व्यक्‍ती दिलेला सल्ला लगेच स्वीकारत नाही किंवा त्याप्रमाणे काम करत नाही असं दिसतं, तेव्हा वडिलांनी तिच्यावर रागवू नये किंवा चिडू नये. येशूबद्दल बायबलमध्ये काय म्हटलं होतं ते आठवा: “तो गवताची वाकलेली काडी तोडणार नाही आणि मिणमिणती वात विझवणार नाही.” (मत्त. १२:२०) म्हणून वडिलांनी त्या व्यक्‍तीसाठी यहोवाला प्रार्थना केली पाहिजे. आपल्याला सल्ला का दिला जात आहे हे त्या व्यक्‍तीला समजण्यासाठी आणि त्याप्रमाणे काम करण्यासाठी यहोवाने तिला मदत करावी अशी प्रार्थना वडिलांनी केली पाहिजे. ज्या भावाला सल्ला देण्यात आला आहे, त्याला त्यावर विचार करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे वडील जर त्याच्याशी प्रेमाने आणि धीराने वागले, तर सल्ला कशा प्रकारे दिला जात आहे याकडे नाही, तर काय सल्ला दिला जात आहे याकडे लक्ष द्यायला त्याला मदत होईल. शिवाय, सल्ला हा नेहमी यहोवाच्या वचनावरच आधारित असला पाहिजे.

१८. (क) सल्ला देताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? (ख) चौकटीतल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे आईवडील कशावर चर्चा करत आहेत?

१८ आपल्या चुकांमधून शिका.  आपण अपरिपूर्ण असल्यामुळे या लेखात सांगितलेल्या गोष्टी आपल्याला अचूकपणे पाळता येणार नाहीत. (याको. ३:२) म्हणून आपल्याकडून चुका होतात तेव्हा आपण त्यांतून शिकलं पाहिजे. आपल्या भाऊबहिणींबद्दल आपल्याला काळजी आणि प्रेम आहे हे जर त्यांना जाणवलं, तर ते आपल्या चुका माफ करायला तयार असतील.—“ दोन शब्द आईवडिलांसाठी” ही चौकट पाहा.

आपण काय शिकलो?

१९. आपण आपल्या भाऊबहिणींचं मन कशा प्रकारे आनंदित करू शकतो?

१९ आपण पाहिलं, की चांगला सल्ला देणं हे नेहमीच सोपं नसतं. आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत, मग आपण सल्ला देणारे असो किंवा स्वीकारणारे असो. त्यामुळे या लेखात दिलेली तत्त्वं लक्षात ठेवा. सल्ला देण्यामागचं कारण योग्य आहे, याची खातरी करा. तसंच, सल्ला देण्याची खरंच गरज आहे का आणि तुम्ही तो दिला पाहिजे का, हे तपासून पाहा. सल्ला देण्याआधी प्रश्‍न विचारा आणि लक्ष देऊन ऐका. म्हणजे मग ती व्यक्‍ती कोणत्या समस्येचा सामना करत आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. गोष्टींना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या भाऊबहिणींसोबत जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं जोडा. आणि आपलं ध्येय कायम लक्षात ठेवा. आपला सल्ला फक्‍त चांगलाच नाही, तर ऐकणाऱ्‍याला ‘आनंद देणाराही’ असला पाहिजे.—नीति. २७:९.

गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”

^ परि. 5 सल्ला देणं नेहमी सोपं नसतं. मग समोरच्याला प्रोत्साहन मिळेल आणि त्याला फायदा होईल अशा प्रकारे आपण सल्ला कसा देऊ शकतो? इतरांना सहज स्वीकारता येईल असा सल्ला द्यायला हा लेख तुम्हाला आणि खास करून वडिलांना मदत करेल.

^ परि. 11 फेब्रुवारी २०२१ च्या टेहळणी बुरूज  अंकातला, “वडिलांना मंडळीत कोणता अधिकार देण्यात आला आहे?” हा लेख पाहा.