व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ९

येशूसारखी निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवा

येशूसारखी निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवा

“घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रे. कार्यं २०:३५.

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

सारांश *

१. आज यहोवाच्या लोकांमध्ये कोणती चांगली मनोवृत्ती पाहायला मिळते?

 बायबलमध्ये खूप आधीच ही भविष्यवाणी केली होती, की यहोवाचे लोक त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या मुलाच्या नेतृत्वाखाली “स्वेच्छेने पुढे येतील.” (स्तो. ११०:३) आज ती भविष्यवाणी पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. दरवर्षी यहोवाचे आवेशी सेवक लाखो-करोडो तास प्रचारकार्यात खर्च करतात. आणि हे काम ते स्वतःच्या इच्छेने आणि स्वतःच्या खर्चाने करतात. तसंच, ते आपल्या भाऊबहिणींना शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक रितीने मदत करण्यासाठीही भरपूर वेळ देतात. याशिवाय, सभांचे भाग तयार करण्यासाठी आणि भाऊबहिणींना मेंढपाळ भेट देण्यासाठी जबाबदार बांधव कितीतरी तास खर्च करत असतात. पण हे सगळं ते का करतात? कारण यहोवावर आणि लोकांवर त्यांचं मनापासून प्रेम आहे.—मत्त. २२:३७-३९.

२. रोमकर १५:१-३ मध्ये सांगितल्याप्रमाणे येशूने कोणत्या बाबतीत आपल्यासमोर एक चांगलं उदाहरण मांडलं?

स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करण्याच्या बाबतीत येशूने खूप चांगलं उदाहरण आपल्यासमोर मांडलं. त्याच्या या उदाहरणाचा अनुकरण करायचा आपण होता होईल तितका प्रयत्न करतो. (रोमकर १५:१-३ वाचा.) आणि त्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात. येशूने म्हटलं होतं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रे. कार्यं २०:३५.

३. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

इतरांना मदत करण्यासाठी येशूने कोणते त्याग केले आणि आपणही हे कसं करू शकतो, याची चर्चा या लेखात केली जाईल. यासोबतच, अशा प्रकारची मनोवृत्ती वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, याचीही चर्चा या लेखात केली जाईल.

येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करा

येशू खूप थकला होता, पण लोकांचा एक मोठा समुदाय त्याच्याकडे आला तेव्हा त्याने काय केलं? (परिच्छेद ४ पाहा)

४. येशूने कशा प्रकारे स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार केला?

येशू खूप थकलेला असतानाही त्याने इतरांना मदत केली.  एकदा येशू डोंगरावर प्रार्थना करायला गेला होता. ते ठिकाण बहुतेक कफर्णहूमच्या आसपास असावं. दिवस उजाडल्यावर तो खाली आला तेव्हा त्याने पाहिलं की लोकांचा एक मोठा समुदाय तिथे जमला आहे. येशूने रात्रभर प्रार्थना केली होती. कदाचित तो खूप थकलेला असेल. पण लोकांना पाहून त्याला त्यांचा खूप कळवळा आला. कारण त्यांच्यामध्ये अनेक गरीब आणि आजारी लोक होते. त्याने त्या सगळ्यांना बरं केलं. आणि लोकांना प्रेरणा देण्यासाठी त्याने एक प्रवचन दिलं, ज्याला सहसा ‘डोंगरावरचं प्रवचन’ असं म्हटलं जातं.—लूक ६:१२-२०.

आपण आपल्या जीवनात येशूसारखी निःस्वार्थ मनोवृत्ती कशी दाखवू शकतो? (परिच्छेद ५ पाहा)

५. कुटुंबप्रमुख येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करतात?

कुटुंबप्रमुख येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करत आहेत?  कल्पना करा: एक कुटुंबप्रमुख दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येतो, तेव्हा तो अगदी थकून गेलेला असतो. त्यामुळे ‘आज कौटुंबिक उपासना करायला नको,’ असं त्याला वाटतं. पण मग, ती करण्यासाठी तो यहोवाकडे शक्‍ती मागतो. यहोवा त्याची प्रार्थना ऐकतो आणि त्या संध्याकाळी नेहमीप्रमाणे त्यांची कौटुंबिक उपासना होते. त्या दिवशी मुलांना एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो; तो म्हणजे, आपले आईवडील दुसऱ्‍या कोणत्याही गोष्टीपेक्षा आध्यात्मिक गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतात.

६. येशूने स्वतःसाठी काढलेला वेळ इतरांना मदत करण्यासाठी कसा दिला, याचं एक उदाहरण द्या.

स्वतःसाठी काढलेला वेळसुद्धा येशू इतरांसाठी द्यायला तयार होता.  आपल्या मित्राला, म्हणजे बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानला मारून टाकण्यात आलं आहे, हे येशूने ऐकलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? त्याला नक्कीच खूप दुःख झालं असेल. बायबल म्हणतं: “[योहानच्या मृत्यूबद्दल] ऐकल्यावर, एकांत मिळावा म्हणून येशू नावेत बसून अशा एका ठिकाणी निघून गेला, जिथे कोणीही राहत नव्हतं.” (मत्त. १४:१०-१३) या वेळी येशूला एकांताची किती गरज होती हे आपण समजू शकतो. आपल्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू होतो, तेव्हा आपल्यापैकी काही जणांनासुद्धा थोडा एकांत हवा असतो. पण येशूला तसा एकांत मिळाला नाही. कारण लोकांचा एक मोठा समुदाय आधीच तिथे जाऊन पोहोचला होता. मग त्यांना पाहून येशूने काय केलं? त्यांना आपल्या मदतीची आणि देवाकडून मिळणाऱ्‍या सांत्वनाची किती गरज आहे, हे पाहून “येशूला त्यांचा कळवळा आला.” म्हणून तो त्यांची मदत करण्यासाठी लगेच पुढे आला, आणि “त्यांना [थोड्या नाही तर] बऱ्‍याच गोष्टी शिकवू लागला.”—मार्क ६:३१-३४; लूक ९:१०, ११.

७-८. मंडळीत जेव्हा कोणाला मदतीची गरज असते तेव्हा प्रेमळ वडील येशूचं अनुकरण कसं करतात, याचं एक उदाहरण द्या.

प्रेमळ वडील येशूच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करतात?  निःस्वार्थ भावनेने आपल्यासाठी काम करणाऱ्‍या वडिलांची आपण मनापासून कदर करतो. मंडळीतल्या वडिलांना कोणकोणती कामं करावी लागतात हे सहसा भाऊबहिणींना माहीत नसतं. उदाहरणार्थ, मंडळीत एखाद्याला तातडीच्या उपचारांची गरज असते, तेव्हा हॉस्पिटल संपर्क समितीचे सदस्य त्याच्या मदतीला धावून जातात. असे तातडीचे प्रसंग सहसा रात्री-अपरात्रीच उद्‌भवतात. पण समस्येत असलेल्या आपल्या भाऊबहिणींबद्दल काळजी वाटत असल्यामुळे हे प्रेमळ वडील आणि त्यांच्या कुटुंबातले सदस्य स्वतःचा नाही, तर भाऊबहिणींचा विचार करतात.

याशिवाय मंडळीतले वडील, राज्य सभागृहाच्या बांधकामात आणि इतर बांधकाम प्रकल्पात, तसंच विपत्ती मदतकार्यातही हातभार लावतात. इतकंच नाही, तर मंडळीतल्या भाऊबहिणींना शिकवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठीही त्यांचा बराच वेळ खर्च होतो. अशा सगळ्या कामांसाठी आपण या भावांची आणि त्यांच्या कुटुंबांची मनापासून प्रशंसा केली पाहिजे. त्यांच्या या निःस्वार्थ मनोवृत्तीचं यहोवा त्यांना प्रतिफळ देईल. पण मंडळीसाठी काम करत असताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याचीही वडिलांनी काळजी घेतली पाहिजे.

निःस्वार्थ मनोवृत्ती कशी उत्पन्‍न करावी?

९. फिलिप्पैकर २:४, ५ मध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या ख्रिश्‍चनांनी कोणती मनोवृत्ती उत्पन्‍न केली पाहिजे?

फिलिप्पैकर २:४, ५ वाचा. आपण सगळेच वडील म्हणून जबाबदारी सांभाळत नसलो, तरी येशूसारखी निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे. येशूबद्दल बायबल म्हणतं, की तो एका “दासासारखा” बनला. (फिलिप्पै. २:७) या शब्दाचा काय अर्थ होतो याचा विचार करा. एक इमानदार दास किंवा सेवक सतत आपल्या मालकाला खूश करण्याची संधी शोधत असतो. आपण सर्व यहोवाचे दास आणि आपल्या भाऊबहिणींची सेवा करणारे आहोत. त्यामुळे तुम्हालासुद्धा यहोवासाठी आणि आपल्या भाऊबहिणींसाठी नक्कीच जास्तीत जास्त काम करायची इच्छा असेल. त्यासाठी पुढे सुचवलेल्या गोष्टी तुम्ही करू शकता.

१०. आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारले पाहिजेत?

१० आपल्या मनोवृत्तीचं परीक्षण करा.  स्वतःला विचारा: ‘इतरांना मदत करण्यासाठी मी स्वतःचा वेळ आणि शक्‍ती खर्च करायला कितपत तयार असतो? उदाहरणार्थ, मला जर एखाद्या वयस्कर बांधवाला भेटायला सांगितलं किंवा एखाद्या वयस्कर बहिणीला सभांना घेऊन यायला सांगितलं, तर माझी प्रतिक्रिया काय असते? अधिवेशनाच्या ठिकाणी साफसफाईचं काम करायचं असतं किंवा राज्यसभागृहामध्ये काही काम असतं, तेव्हा ते करण्यासाठी मी लगेच पुढे येतो का?’ आपण फक्‍त स्वतःचा विचार न करता आपला वेळ, शक्‍ती आणि आपल्या जवळ असलेल्या इतर गोष्टी दुसऱ्‍यांना मदत करण्यासाठी वापरतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. कारण मुळात, आपण जेव्हा त्याला आपलं जीवन समर्पित केलं, तेव्हा हेच वचन दिलं होतं, की आपल्याजवळ जे काही आहे त्याचा उपयोग आपण त्याची सेवा करण्यासाठी करू. तर मग, या बाबतीत आपल्या मनोवृत्तीत बदल करायची गरज आहे, असं जर आपल्याला जाणवलं तर आपण काय केलं पाहिजे?

११. निःस्वार्थ मनोवृत्ती उत्पन्‍न करण्यासाठी प्रार्थनेमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

११ यहोवाला कळकळून प्रार्थना करा.  समजा तुम्हाला असं जाणवलं, की तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीत कुठंतरी बदल करायची गरज आहे. पण तो बदल करायची इच्छाच तुम्हाला होत नसेल तर काय? अशा वेळी यहोवाला कळकळून प्रार्थना करा. तुम्हाला कसं वाटतं हे त्याला खरंखरं सांगा. आणि त्याने ते बदल करायची “इच्छा” तुमच्यात निर्माण करावी आणि त्यासाठी ‘ताकद’ द्यावी म्हणून त्याला विनंती करा.—फिलिप्पै. २:१३.

१२. बाप्तिस्मा घेतलेले तरूण बांधव पुढे आल्यामुळे मंडळीला आणि संघटनेला कसा फायदा होऊ शकतो?

१२ तुम्ही जर बाप्तिस्मा घेतलेले एक तरुण बांधव असाल, तर आपल्या भाऊबहिणींची जास्तीत जास्त मदत करायची इच्छा स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. काही देशांमध्ये वडिलांची संख्या जास्त आहे आणि सहायक सेवकांची संख्या कमी आहे. आणि बहुतेक सहायक सेवक मध्यम वयाचे किंवा वयस्कर आहेत. आज यहोवाच्या संघटनेत वाढ होत असल्यामुळे यहोवाच्या लोकांची काळजी घेण्यासाठी तरुण बांधवांची खूप गरज आहे. तुम्ही जर कोणत्याही मार्गाने मदत करायची तयारी दाखवली, तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. कारण त्यामुळे तुम्ही यहोवाचं मन आनंदित कराल, मंडळीत एक चांगलं नाव कमवाल आणि इतरांना मदत केल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल.

यहूदीयामधले ख्रिस्ती यार्देन नदी पार करून पेल्ला शहरात पळून गेले. जे आधीच तिथे पोहचले होते ते नुकतंच तिथे आलेल्या ख्रिश्‍चनांना अन्‍नधान्य वाटत आहेत. (परिच्छेद १३ पाहा)

१३-१४. भाऊबहिणींना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१३ इतरांच्या गरजा ओळखण्याचा प्रयत्न करा.  प्रेषित पौलने यहूदीयामध्ये राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “चांगल्या गोष्टी करायला आणि तुमच्याजवळ जे आहे, त्यातून इतरांनाही द्यायला विसरू नका कारण अशा बलिदानांमुळे देवाला खूप आनंद होतो.” (इब्री १३:१६) हा खरंच किती योग्य सल्ला होता! ते जर पौलने दिलेल्या या सल्ल्याप्रमाणे वागले असतील आणि एकमेकांना मदत करत राहिले असतील, तर पुढे अचानक आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं त्यांना नक्कीच जास्त सोपं गेलं असेल. कारण पौलचं हे पत्र मिळाल्याच्या काही काळानंतरच यहूदीयामधल्या ख्रिश्‍चनांना आपली घरंदारं, उद्योगधंदे आणि सत्यात नसलेले नातेवाईक सोडून ‘डोंगरांकडे पळून जावं’ लागलं. (मत्त. २४:१६) आणि अशा वेळी त्यांनी एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं होतं.

१४ आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे हे आपले भाऊबहीण नेहमीच स्वतःहून आपल्याला सांगणार नाहीत. उदाहरणार्थ, एखादा भाऊ आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एकटा पडला असेल, दुःखात बुडाला असेल. अशा वेळी त्या भावाला जेवण बनवण्यासाठी, कुठे येण्या-जाण्यासाठी किंवा घरातली इतर कामं करण्यासाठी कदाचित मदतीची गरज असेल. पण आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून कदाचित तो हे बोलून दाखवणार नाही. पण आपण पुढे येऊन त्याला हवी ती मदत केली, तर त्याला खरंच किती बरं वाटेल! आपण कधीच असा विचार करू नये, की ‘कोणीतरी त्याला मदत करेलच. आपण नाही केली तरी चालेल.’ किंवा आपण असाही विचार करू नये, की ‘त्याला जर मदतीची गरज असेल तर तो सांगेल मला.’ उलट आपण स्वतःला असं विचारलं पाहिजे: ‘मी जर त्याच्या जागी असतो, तर मला कोणत्या मदतीची गरज पडली असती?’

१५. निःस्वार्थ मनोवृत्ती ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१५ इतरांना तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलता येईल असा स्वभाव ठेवा.  तुम्हाला असे काही भाऊबहीण नक्कीच माहीत असतील, जे इतरांना मदत करायला केव्हाही तयार असतात. ते कधीच असं दाखवत नाहीत, की आपल्यामुळे त्यांना त्रास होतो. गरज पडेल तेव्हा ते लगेच आपल्या मदतीला धावून येतील अशी आपल्याला खातरी असते. आपल्यालाही त्यांच्यासारखंच व्हायला आवडेल, नाही का? चाळिशीत असलेल्या ॲलन नावाच्या एका वडिलालासुद्धा स्वतःमध्ये हाच गुण उत्पन्‍न करायची इच्छा आहे. येशूच्या निःस्वार्थ मनोवृत्तीचा विचार करून ॲलन असं म्हणतात: “येशू खूप व्यस्त असायचा. पण तरीसुद्धा लहान-मोठे असे सगळ्या वयाचे लोक त्याच्याकडे येऊन मनमोकळपणाने बोलायचे आणि कोणताही संकोच न करता त्याच्याकडे मदत मागायचे. येशूला आपली किती काळजी आहे हे त्या लोकांना जाणवायचं. मलासुद्धा मनापासून असं वाटतं, की मी येशूसारखं व्हावं. माझ्याबद्दल भाऊबहिणींना जाणवलं पाहिजे, की मला त्यांची काळजी आहे, त्यांच्याबद्दल आपुलकी आहे. आणि सगळ्यांना माझ्याशी मनमोकळेपणाने बोलता आलं पाहिजे.”

१६. स्तोत्र ११९:५९, ६० हे वचन लागू केल्यामुळे आपल्याला येशूचं जवळून अनुकरण कसं करता येईल?

१६ तुम्हाला येशूच्या उदाहरणाचं पूर्णपणे अनुकरण करता आलं नाही, तरी निराश होऊ नका. (याको. ३:२) एखादी कला शिकताना विद्यार्थ्याला आपल्या शिक्षकाच्या कलेची हुबेहूब नक्कल करता येत नाही. पण तो आपल्या चुकांमधून शिकत जातो आणि आपल्या शिक्षकाचं होता होईल तितक्या जवळून अनुकरण करायचा प्रयत्न करतो. आणि असं करून तो आपली कला सुधारत राहतो. अगदी तसंच, बायबलच्या आपल्या अभ्यासातून आपण जे काही शिकतो त्याप्रमाणे जर आपण काम करत राहिलो आणि आपल्या चुका सुधारत राहिलो, तर आपल्याला येशूचं आणखी जवळून अनुकरण करता येईल.—स्तोत्र ११९:५९, ६० वाचा.

निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवण्याचे फायदे

येशूसारखी निःस्वार्थ मनोवृत्ती दाखवून मंडळीतले वडील तरुणांसमोर एक चांगलं उदाहरण मांडतात (परिच्छेद १७ पाहा) *

१७-१८. येशूच्या निःस्वार्थ मनोवृत्तीचं अनुकरण केल्यामुळे कोणते फायदे होतील?

१७ आपण जेव्हा निःस्वार्थ मनोवृत्तीने काम करतो तेव्हा इतरांनाही तेच करायची प्रेरणा मिळते. टिम नावाचे एक वडील म्हणतात: “आपल्यामध्ये असे कितीतरी बांधव आहेत ज्यांनी प्रगती केली आणि खूप कमी वयात ते सहायक सेवक बनले. याचं एक कारण म्हणजे इतरांना मदत करण्यासाठी भाऊबहीण किती उत्सुक असतात, तयार असतात हे त्यांनी पाहिलं. आणि त्यांनाही तेच करावंसं वाटलं. हे तरुण बांधव निःस्वार्थ वृत्तीने मंडळीत मदत करतात आणि वडिलांच्या कामात हातभार लावतात.”

१८ आज जगातले बहुतेक लोक खूप स्वार्थी आहेत. पण यहोवाचे लोक अगदी वेगळे आहेत. येशूच्या निःस्वार्थ मनोवृत्तीचा आपल्या मनावर प्रभाव पडल्यामुळे आपण त्याच्यासारखं निःस्वार्थी बनायचा प्रयत्न करतो. आपण जरी त्याच्या पावलांचं जसंच्या तसं अनुकरण करू शकत नसलो, तरी त्यांचं “जवळून अनुकरण” नक्कीच करू शकतो. (१ पेत्र २:२१) आपण जर येशूच्या निःस्वार्थ मनोवृत्तीचं अनुकरण करायचा होता होईल तितका प्रयत्न केला, तर यहोवाला खूश केल्याचा आनंद आपल्याला मिळेल.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

^ परि. 5 येशूने नेहमी स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार केला. या बाबतीत आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो, ते या लेखात आपण पाहणार आहोत. तसंच, येशूसारखी मनोवृत्ती दाखवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो, हेसुद्धा या लेखात आपण पाहू या.

^ परि. 57 चित्राचं वर्णन: मंडळीतले दोन वडील आपल्या बाबांना हॉस्पिलमध्ये भेटायला आले आहेत हे पाहून डॅन नावाचा एक तरुण भाऊ खूप प्रभावित होतो. आणि त्यामुळे त्यालाही मंडळीतल्या भाऊबहिणींच्या गरजा ओळखून त्यांना मदत करायची प्रेरणा मिळते. डॅनला इतरांची किती काळजी आहे हे पाहून बेन नावाचा एक तरुण भाऊ खूप प्रभावित होतो. आणि त्यामुळे त्यालाही राज्य सभागृहाच्या साफसफाईत हातभार लावायची प्रेरणा मिळते.