व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

मी पाहिलेल्या स्वप्नापेक्षा सुंदर काहीतरी मला सापडलं

मी पाहिलेल्या स्वप्नापेक्षा सुंदर काहीतरी मला सापडलं

“काय सांगताय! हे तर माझ्या लहानपणीचं स्वप्न होतं!” असं माझ्याकडे आलेल्या दोन नवीन पेशन्टना मी उत्साहात म्हटलं. १९७१ ची गोष्टए. डॉक्टर झाल्यानंतर मी नुकतंच माझं पहिलं क्लिनिक सुरू केलं होतं. पण माझं ते स्वप्न काय होतं आणि ते दोन पेशन्ट कोण होते? त्या दिवशी त्यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या आयुष्याची दिशा कशी बदलली आणि माझं बालपणीचं स्वप्न नक्की पूर्ण होईल याची खातरी मला कशी पटली, याबद्दल सविस्तर सांगतो.

माझा जन्म १९४१ साली फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये झाला. त्या वेळी माझ्या कुटुंबाची परिस्थिती बेताची होती. मला अभ्यास करायला खूप आवडायचं. पण वयाच्या दहाव्या वर्षी मला टीबी झाला आणि माझी शाळा बंद झाली. तेव्हा मला किती वाईट वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. माझ्या फुफ्फुसांना जास्त त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी मला पूर्ण आराम करायला सांगितला होता. म्हणून वेळ घालवण्यासाठी मी डिक्शनरी वाचायचो आणि पॅरिस युनिव्हर्सिटीचे रेडिओवरचे कार्यक्रम ऐकायचो. जेव्हा डॉक्टरनी मला सांगितलं की मी बरा झालोय आणि आता शाळेला जाऊ शकतो, तेव्हा मला किती आनंद झाला मी सांगू शकत नाही. मी मनातल्या मनात म्हटलं: ‘डॉक्टरचं काम कसलं भारी असतं ना!’ तेव्हापासून मी लोकांचे आजार बरे करायचं स्वप्न पाहू लागलो. मोठं झाल्यावर तुला काय व्हायचंय, असं बाबा विचारायचे तेव्हा माझं एकच उत्तर असायचं. “मला डॉक्टर व्हायचंय!” अशा प्रकारे डॉक्टर बनून लोकांची सेवा करणं हेच माझं पहिलं प्रेम बनलं.

विज्ञानामुळे मी देवाच्या आणखी जवळ आलो

आम्ही खरंतर कॅथलिक होतो, पण फक्‍त नावापुरतं. देवाबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं आणि माझ्या कितीतरी प्रश्‍नांची उत्तरं मला अजूनही मिळाली नव्हती. युनिव्हर्सिटीत मी मेडिकलचा अभ्यास करू लागलो तेव्हा जीवसृष्टीची कोणीतरी निर्मिती केली असावी याची मला खातरी पटली.

मला अजूनही आठवतंय, मायक्रोस्कोपखाली मी पहिल्यांदा ट्यूलिप फुलाच्या पेशी पाहिल्या होत्या. उष्ण आणि थंड तापमानाखाली या पेशी कशा काम करतात हे पाहून मी थक्क झालो होतो! तसंच, पाण्यात क्षाराचं प्रमाण वाढलं की सायटोप्लाज्म (पेशीमध्ये असणारं एक घटकद्रव्य) कसा आकुंचन पावतो आणि क्षार नसलेल्या पाण्यात तो कसा प्रसरण पावतो हेसुद्धा मी पाहिलं. या आणि यासारख्या असंख्य प्रक्रियांमुळेच वेगवेगळ्या जिवांना बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणं शक्य होतं. प्रत्येक पेशीची चकित करणारी जटिलता पाहून जीवसृष्टी आपोआप आलेली नाही हे मला दिसून आलं.

मेडिकलच्या दुसऱ्‍या वर्षी देवाच्या अस्तित्वाचे आणखी पुरावे मला मिळाले. शरीरशास्त्राच्या तासाला हाताच्या कोपरापासून मनगटापर्यंतच्या भागाच्या रचनेमुळे आपली बोटं कशी मिटतात आणि सरळ होतात याचा आम्ही अभ्यास केला. स्नायू, लिगामेंट (अस्थिबंध) आणि टेंडन (स्नायुबंध) एकमेकांशी ज्या प्रकारे जोडलेले असतात ती खरंच इंजिनियरींगची एक कमाल आहे असं म्हणावं लागेल. उदाहरणार्थ, हाताच्या स्नायूंना आणि बोटाच्या दुसऱ्‍या हाडाला जोडणारे स्नायुबंध दोन भागांत दुभागलेले असतात. आणि त्यामुळे एखाद्या पुलाप्रमाणे तयार झालेल्या मधल्या जागेत बोटाच्या टोकाला जोडणारे स्नायू स्थिरावलेले असतात. त्या जागेतच त्यांची पुढे-मागे हालचाल होत असते. तसंच मजबूत ऊतकांमुळे (टिश्‍शू) हे स्नायुबंध बोटाच्या हाडांना चिकटून राहतात. या सगळ्या गोष्टी नसत्या तर ते धनुष्याच्या ताणलेल्या तारेसारखे दिसले असते आणि बोटांची हालचाल व्यवस्थित झाली नसती. मानवी शरीराच्या रचनेमागे कोणीतरी अतिशय बुद्धिमान रचनाकार आहे, हे मला स्पष्ट दिसत होतं.

बाळाच्या जन्माच्या वेळी कोणकोणत्या गोष्टी घडतात यांचा अभ्यास केल्यावर तर मी आणखीनच थक्क झालो आणि रचनाकाराबद्दल असलेली माझी कदर आणखी वाढली. जन्माआधी बाळाला आपल्या आईच्या नाळेतून ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे बाळाच्या फुफ्फुसांत द्राक्षाच्या घडाप्रमाणे असलेले वायुकोश (ॲल्विओलाय) अजून मिटलेल्या स्थितीतच असतात. बाळाच्या जन्माची वेळ जवळ येऊ लागते तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा द्रवपदार्थ या वायुकोशांमध्ये आतल्या बाजूने अस्तर लावल्याप्रमाणे पसरतो. आणि मग बाळाचा जन्म झाल्यावर बाळ पहिल्यांदा श्‍वास घेतं तेव्हा एकापाठोपाठ एक अशा अनेक अद्‌भुत गोष्टी घडतात. बाळाच्या हृदयाला असलेलं छिद्र बंद होतं आणि त्यामुळे रक्‍त फुफ्फुसांपर्यंत पोचवलं जातं. या महत्त्वाच्या क्षणी हवा फुफ्फुसांतल्या मिटलेल्या वायुकोशांत झपाट्याने भरू लागते. पण वायुकोशांत असलेल्या त्या विशिष्ट द्रवपदार्थामुळे वायुकोश एकमेकांना चिकटत नाहीत. आणि अशा प्रकारे काही क्षणातच बाळ स्वतःहून श्‍वास घ्यायला तयार असतं.

अशा एकापेक्षा एक अद्‌भुत गोष्टी बनवणाऱ्‍या निर्माणकर्त्याला जाणून घ्यायची माझी खूप इच्छा होती. म्हणून मी अगदी मनापासून बायबल वाचू लागलो. जवळजवळ ३,००० वर्षांपूर्वी देवाने इस्राएल राष्ट्रासोबत केलेल्या करारात स्वच्छतेबद्दल दिलेले नियम वाचून मला खूप आश्‍चर्य वाटलं. देवाने त्यांना मलमूत्र झाकून टाकायला, नियमितपणे पाण्याचा वापर करून स्वतःला स्वच्छ ठेवायला आणि संसर्गजन्य आजार झालेल्या व्यक्‍तीला इतरांपासून वेगळं ठेवायला सांगितलं होतं. (लेवी. १३:५०; १५:११; अनु. २३:१३) आजार कसे पसरतात याबद्दल मागच्या दीडशे वर्षांतच शास्त्रज्ञांना जे समजलं आहे, ते बायबलमध्ये हजारो वर्षांपूर्वी सांगितलं होतं. तसंच, बायबलमधल्या लेवीय पुस्तकात लैंगिक स्वच्छतेबद्दल दिलेल्या नियमांमुळेच संपूर्ण राष्ट्राचं आरोग्य कसं चांगलं राहायचं हेसुद्धा मला समजलं. (लेवी. १२:१-६; १५:१६-२४) देवाने हे सगळे नियम इस्राएल राष्ट्राच्या भल्यासाठीच दिले होते आणि त्यांचं पालन करणाऱ्‍यांना तो भरभरून आशीर्वाद द्यायचा हे माझ्या लक्षात आलं. मला खातरी पटली, की बायबल हे देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं पुस्तक आहे. एका अशा देवाच्या, ज्याचं नाव त्या वेळी मला माहीत नव्हतं.

होणाऱ्‍या बायकोची भेट आणि यहोवाची ओळख

मी आणि लायडी, ३ एप्रिल १९६५ रोजी आमच्या लग्नाच्या दिवशी

युनिव्हर्सिटीत मेडिकलचं शिक्षण घेत असताना मी लायडी नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडलो. माझं शिक्षण सुरू असतानाच १९६५ मध्ये आम्ही लग्न केलं. १९७१ पर्यंत आम्हाला तीन मुलं झाली. आम्हाला एकूण सहा मुलं आहेत. लायडीने मला माझ्या डॉक्टरी पेशात आणि कुटुंबातही खूप साथ दिली.

स्वतःचं क्लिनिक उघडण्याआधी मी तीन वर्षं एका हॉस्पिटलमध्ये काम केलं. माझं क्लिनिक उघडल्यानंतर काही काळातच मी सुरुवातीला सांगितलेलं जोडपं माझ्याकडे उपचारासाठी आलं. मी त्या व्यक्‍तीला औषधं लिहून देणार इतक्यात त्याची बायको म्हणाली: “डॉक्टर प्लीज रक्‍ताचा अंश नसलेली औषधंच लिहून द्या.” मी आश्‍चर्याने म्हणालो: “का? असं का?” तेव्हा ती म्हणाली: “आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत.” मला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काही माहीत नव्हतं. आणि ते रक्‍त घेत नाहीत हेही माहीत नव्हतं. तिने आपलं बायबल काढलं आणि ते रक्‍त का घेत नाहीत याचं कारण सांगण्यासाठी मला काही वचनं दाखवली. (प्रे. कार्यं १५:२८, २९) मग त्या दोघांनी मला देवाचं राज्य भविष्यात कशा प्रकारे दुःख, आजारपण आणि मृत्यू काढून टाकणार आहे ते दाखवलं. (प्रकटी. २१:३, ४) हे ऐकताच मी आश्‍चर्याने म्हणालो: “काय सांगताय! हे तर माझ्या लहानपणीचं स्वप्न होतं! लोकांचं दुःखणं बरं करण्यासाठीच तर मी डॉक्टर बनलो!” मी इतका आनंदी झालो होतो की आम्ही चक्क दीड तास याबद्दल बोलत राहिलो. त्यांच्या त्या भेटीनंतर माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. मनातून मी आता कॅथलिक राहिलो नव्हतो. आणि ज्या निर्माणकर्त्याबद्दल माझ्या मनात इतकी कदर होती त्याचं नाव यहोवा आहे, हेसुद्धा मला तेव्हाच कळालं होतं!

त्यानंतर तीन वेळा ते माझ्या क्लिनिकला आले आणि प्रत्येक वेळी आम्ही जवळपास तासभर बोललो. आम्हाला जास्त वेळ बायबलवर चर्चा करता यावी म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलवलं. लायडीसुद्धा आमच्यासोबत बायबल अभ्यासाला बसायची. पण आम्ही आजपर्यंत मानत असलेल्या काही कॅथलिक शिकवणी चुकीच्या आहेत हे मान्य करायला ती तयार नव्हती. त्यामुळे मग मी एका पाळकाला घरी बोलवलं. आणि चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या गोष्टींवर आम्ही फक्‍त बायबलचा वापर करून रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. त्या चर्चेनंतर लायडीला खातरी पटली, की यहोवाचे साक्षीदार जे शिकवतात तेच खरंय. पुढे यहोवावरचं आमचं प्रेम वाढत गेलं आणि १९७४ मध्ये आम्ही दोघांनी बाप्तिस्मा घेतला.

आम्ही यहोवाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं

मानवांसाठी देवाचा किती चांगला उद्देश आहे, हे समजल्यावर आमच्या जीवनावर त्याचा खोलवर प्रभाव पडला. यहोवाची सेवा करणं हीच माझ्यासाठी आणि लायडीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट बनली. आपल्या मुलांनाही बायबलच्या तत्त्वांनुसार वाढवायचा निश्‍चय आम्ही केला. आम्ही त्यांना देवावर आणि इतरांवर प्रेम करायला शिकवलं. आणि त्यामुळेच आम्ही सर्व जण एकमेकांच्या आणखी जवळ आलो.—मत्त. २२:३७-३९.

मुलं लहान होती तेव्हा कोणतेही निर्णय घेताना आमच्या दोघांत कायम एकमत असायचं. मुलांनाही हे चांगलंच माहीत होतं. यावरून होणाऱ्‍या गमती आठवून मी आणि लायडी अजूनही खूप हसतो. “तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं,” हा येशूने दिलेला नियम आमच्या घरात अगदी काटेकोरपणे पाळला जायचा. (मत्त. ५:३७) एकदा, आमची एक मुलगी १७ वर्षांची होती तेव्हा तिला आपल्या काही मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायचं होतं. लायडीने तिला नाही म्हणून सांगितलं. तेव्हा तिच्या सोबत्यांपैकी एकाने म्हटलं: “मम्मी नाही म्हणते तर पप्पांना विचार!” तेव्हा आमची मुलगी पटकन म्हणाली: “काही उपयोग नाही, तेपण नाहीच म्हणतील. त्या दोघांचं उत्तर कधीच वेगळं नसतं!” बायबल तत्त्वांचं पालन करण्याच्या बाबतीत आमची मतं वेगवेगळी कधीच नसतात, हे आमच्या सगळ्या मुलांना माहीत होतं. आज आमचं एक मोठं कुटुंब आहे आणि त्यांपैकी जवळपास सगळेच यहोवाची सेवा करत आहेत याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो!

सत्यात आल्यानंतर यहोवाच्या सेवेला माझ्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व असलं तरी डॉक्टर या नात्यानेही मला देवाच्या लोकांची सेवा करायची होती. त्यामुळे पॅरिसमधल्या बेथेलगृहात आणि नंतर लुविअर्स इथल्या नवीन बेथेलगृहात मी डॉक्टर म्हणून सेवा करू लागलो. गेल्या पन्‍नासएक वर्षांपासून मी तिथे येऊन-जाऊन सेवा करत आहे. या काळात बेथेल कुटुंबातल्या अनेकांसोबत माझी खूप चांगली मैत्री झाली आहे. त्यांपैकी काहींनी तर वयाची नव्वदी ओलांडली आहे. एकदा तर एक गंमतच झाली! एक मुलगा नवीनच बेथेलमध्ये सेवा करायला आला होता. आणि बोलता बोलता कळलं की २० वर्षांआधी त्याचा जन्म झाला तेव्हा मीच डिलिव्हरी केली होती!

यहोवा त्याच्या लोकांची किती काळजी घेतो हे मी जवळून पाहिलं

या संपूर्ण काळात, मी पाहिलं की यहोवा कशा प्रकारे आपल्या संघटनेद्वारे त्याच्या लोकांचं मार्गदर्शन आणि संरक्षण करतो. त्यामुळे यहोवावरचं माझं प्रेम आणखीनच वाढलं आहे. १९८० च्या दशकात, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना रक्‍त न घेण्याच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या भूमिकेबद्दल आणखी चांगली समज मिळावी म्हणून नियमन मंडळाने अमेरिकेत एक कार्यक्रम राबवला.

मग १९८८ मध्ये नियमन मंडळाने बेथेलमध्ये ‘हॉस्पिटल इन्फॉरमेशन सर्व्हिसेस’ (हॉस्पिटल माहिती सेवा) नावाचा एक नवीन विभाग सुरू केला. सुरुवातीला, भाऊबहिणींना योग्य उपचार मिळावा म्हणून अमेरिकेत ज्या हॉस्पिटल संपर्क समित्या (HLC) स्थापन करण्यात आल्या होत्या त्यांची देखरेख हा विभाग करायचा. हीच व्यवस्था नंतर संपूर्ण जगात राबवण्यात आली तेव्हा फ्रान्समध्येसुद्धा हॉस्पिटल संपर्क समित्या स्थापन करण्यात आल्या. यहोवाची संघटना आपल्या आजारी भाऊबहिणींची त्यांच्या गरजेच्या वेळी किती प्रेमाने काळजी घेते, त्यांना मदत करते हे पाहून मला खरंच नवल वाटतं!

माझं स्वप्न शेवटी पूर्ण झालं!

देवाच्या राज्याबद्दल लोकांना सांगताना आजही आम्हाला खूप आनंद होतो

डॉक्टर होऊन लोकांची सेवा करणं हेच माझं पहिलं प्रेम होतं. पण जीवनात सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे याचा विचार केल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, आध्यात्मिक रितीने लोकांना बरं करणं, म्हणजे आपल्याला जीवन देणाऱ्‍या यहोवा देवासोबत पुन्हा नातं जोडण्यासाठी त्यांना मदत करणं, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर आम्ही दोघं रेग्युलर पायनियर बनलो. आणि देवाच्या राज्याबद्दल लोकांना सांगण्यात जास्तीत जास्त वेळ खर्च करू लागलो. आजही जीव वाचवण्याच्या या कामात आम्ही आमच्याकडून होईल तितकं करतो.

२०२१ मध्ये लायडी सोबत

लोकांचं दुखणं थोडंफार कमी करण्यासाठी सध्या मी माझ्यापरीने होईल तितकं करायचा प्रयत्न करतो. पण मला माहीतए, की जगातला चांगल्यातला चांगला डॉक्टरसुद्धा आजार आणि मृत्यू काढून टाकू शकत नाही. त्यामुळे त्या काळाची मी खूप आतुरतेने वाट पाहतोय, जेव्हा दुःख, आजार आणि मरण यांचं नावसुद्धा नसेल. लवकरच येणाऱ्‍या त्या नवीन जगात देवाच्या निर्मितीबद्दल आणि त्याने बनवलेल्या माणसाच्या अद्‌भुत शरीररचनेबद्दल जाणून घ्यायला माझ्याजवळ अगणित वर्षं असतील. जे स्वप्नं मी लहानपणापासून बघत आलो, ते लवकरच खऱ्‍या अर्थाने पूर्ण होईल, याची मला पक्की खातरी आहे!