व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १०

“जुनं व्यक्‍तिमत्व” काढून टाका!

“जुनं व्यक्‍तिमत्व” काढून टाका!

“आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व त्याच्या वाईट सवयींसोबत काढून टाका.”—कलस्सै. ३:९.

गीत ३४ आपल्या नावाला जागू या!

सारांश *

१. बायबलचा अभ्यास सुरू करण्याआधी तुमचं जीवन कसं होतं?

 यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू करण्याआधी तुमचं जीवन कसं होतं हे तुम्हाला आठवतं का? बऱ्‍याच जणांना आज ते आठवायलाही आवडत नाही. कारण आपल्यापैकी बहुतेक जणांचं व्यक्‍तिमत्त्व आणि विचार आधी जगातल्या लोकांसारखे होते. योग्य काय आणि अयोग्य काय याबद्दल जगाच्या विचारसरणीप्रमाणे आपण वागायचो. थोडक्यात आपण “कोणतीही आशा नसलेले आणि जगात देवाशिवाय” असलेले लोक होतो. (इफिस. २:१२) पण बायबल अभ्यास सुरू केल्यापासून आपलं जीवन किती बदललं!

२. तुम्ही बायबलचा अभ्यास करू लागला तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टी समजल्या?

तुम्ही बायबलचा अभ्यास करू लागला तेव्हा तुम्हाला समजलं, की स्वर्गात आपला एक पिता आहे, जो आपल्यावर जिवापाड प्रेम करतो. आणि यामुळे त्याचं मन आनंदीत करण्याची आणि त्याच्या उपासकांच्या कुटुंबाचा एक भाग बनण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली. पण यासाठी तुम्हाला तुमच्या विचारसरणीत आणि वागण्या-बोलण्यात मोठमोठे बदल करावे लागतील, हे तुम्ही ओळखलं. तसंच, यहोवाच्या नियमांप्रमाणे आणि तत्त्वांप्रमाणे जगायलाही तुम्हाला शिकून घ्यावं लागेल याची जाणीव तुम्हाला झाली.—इफिस. ५:३-५.

३. कलस्सैकर ३:९, १० या वचनांप्रमाणे यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो आणि या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

यहोवा आपला निर्माणकर्ता आणि पिता असल्यामुळे त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांनी कसं वागलं पाहिजे, हे ठरवण्याचा त्याला अधिकार आहे. आणि बाप्तिस्मा घेण्याआधी आपण आपलं “जुनं व्यक्‍तिमत्व त्याच्या वाईट सवयींसोबत काढून [टाकावं]”, अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. * (कलस्सैकर ३:९, १० वाचा.) हा लेख बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असलेल्यांना तीन प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायला मदत करेल. (१) “जुनं व्यक्‍तिमत्त्व” म्हणजे काय? (२) आपण ते काढून टाकावं असं यहोवा आपल्याला का सांगतो? (३) आपण हे कसं करू शकतो? आपल्यापैकी ज्यांचा आधीच बाप्तिस्मा झाला आहे, त्यांनाही या अभ्यासामुळे मदत होईल. कारण जुन्या व्यक्‍तिमत्त्वातले वाईट गुण आपल्यामध्ये पुन्हा येऊ देण्याचं आपण कसं टाळू शकतो, हे समजून घ्यायला तो आपल्याला मदत करेल.

“जुनं व्यक्‍तिमत्त्व” म्हणजे काय?

४. एखाद्यावर जेव्हा त्याच्या ‘जुन्या व्यक्‍तिमत्त्वाचा’ प्रभाव असतो, तेव्हा तो कसं वागतो?

एखाद्यावर जेव्हा त्याच्या ‘जुन्या व्यक्‍तिमत्त्वाचा’ प्रभाव असतो तेव्हा तो सहसा आपल्या शारीरिक इच्छांप्रमाणे विचार करतो आणि वागतो. अशी व्यक्‍ती कदाचित स्वार्थी असेल, तिला लवकर राग येत असेल, दुसऱ्‍यांनी तिच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची ती कदर करत नसेल. तसंच, अशी व्यक्‍ती कदाचित गर्विष्ठपण असेल. कदाचित तिला अश्‍लील साहित्य पाहायला, तसंच ज्यात अनैतिक आणि हिंसक गोष्टी दाखवल्या जातात, असे चित्रपट पाहायला तिला आवडत असेल. अशा व्यक्‍तीमध्येही काही चांगले गुण नक्कीच असतील. आणि चुकीच्या गोष्टी बोलल्यावर किंवा केल्यावर तिला कदाचित त्याबद्दल वाईटही वाटत असेल. पण आपली विचारसरणी किंवा वागणूक बदलण्याची कदाचित तिला इच्छाच होत नसेल.—गलती. ५:१९-२१; २ तीम. ३:२-५.

जेव्हा आपण “जुनं व्यक्‍तिमत्त्व” काढून टाकतो तेव्हा शारीरिक इच्छांप्रमाणे असणाऱ्‍या विचारांचा आणि सवयींचा आपल्यावर प्रभाव राहत नाही (परिच्छेद ५ पाहा) *

५. आपल्या मनातून चुकीचे विचार आणि इच्छा पूर्णपणे काढून टाकणं शक्य आहे का? स्पष्ट करा (प्रे. कार्यं ३:१९)

अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्यापैकी कोणीही आपल्या मनातले सगळेच वाईट विचार आणि इच्छा पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. त्यामुळे आपण सगळेच कधीकधी असं काहीतरी बोलून जातो किंवा करतो, ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होतो. (यिर्म. १७:९; याको. ३:२) पण जेव्हा आपण जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकतो, तेव्हा आपण एक वेगळी व्यक्‍ती बनतो. शारीरिक इच्छांप्रमाणे असलेले विचार आणि सवयी आपल्यावर पूर्वीसारखं नियंत्रण करत नाहीत. उलट आपण त्यांच्यावर ताबा मिळवतो.—यश. ५५:७; प्रेषितांची कार्यं ३:१९ वाचा.

६. यहोवा आपल्याला जुन्या व्यक्‍तित्त्वानुसार असलेले चुकीचे विचार आणि वाईट सवयी सोडून देण्याचं प्रोत्साहन का देतो?

यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि त्याची इच्छा आहे, की आपण जीवनात नेहमी आनंदी राहावं. आणि म्हणूनच तो आपल्याला चुकीचे विचार आणि वाईट सवयी सोडून देण्याचं प्रोत्साहन देतो. (यश. ४८:१७, १८) त्याला माहीत आहे, की जे लोक चुकीच्या इच्छांप्रमाणे वागतात ते स्वतःचं नुकसान तर करून घेतातच, पण इतरांचं मनही ते दुखावतात. आणि जेव्हा एखादी व्यक्‍ती स्वतःचं नुकसान होईल अशा प्रकारे वागते आणि इतरांचही मन दुखावते, तेव्हा यहोवाला खूप दुःख होतं.

७. रोमकर १२:१, २ या वचनांप्रमाणे आज आपल्यासमोर कोणते पर्याय आहेत?

जेव्हा आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपले मित्र आणि घरचे लोक कदाचित आपली चेष्टा करतील. (१ पेत्र ४:३, ४) कदाचित ते म्हणतील, की “दुसऱ्‍यांच्या सांगण्यावरून स्वतःला बदलण्याची काय गरज आहे? तुला जसं वाटतं तसं वागायला तू स्वतंत्र आहेस!” पण नेहमी लक्षात ठेवा, की जे लोक यहोवाच्या तत्त्वांप्रमाणे चालायला नकार देतात, त्यांना वाटतं की ते स्वतंत्र आहेत, पण मुळात तसं नसतं. उलट, ते सैतानाच्या नियंत्रणाखाली असलेल्या जगाचे गुलाम असतात. (रोमकर १२:१, २ वाचा.) आज आपल्या सगळ्यांसमोर दोन पर्याय आहेत. एक तर आपण आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व तसंच ठेवू शकतो, जे सैतानाच्या आणि पापाच्या प्रभावाखाली आहे. किंवा मग आपण एक चांगली व्यक्‍ती बनण्यासाठी स्वतःला यहोवाच्या हाती सोपवून देऊ शकतो, म्हणजे तो आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार देईल.—यश. ६४:८.

जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे?

८. चुकीचे विचार आणि वाईट सवयी सोडायला आपल्याला कशामुळे मदत होईल?

यहोवाला माहीत आहे, की आपलं व्यक्‍तिमत्त्व हे एका रात्रीत बदलू शकत नाही. चुकीचे विचार आणि वाईट सवयी सोडून देण्यासाठी आपल्याला वेळ लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. (स्तो. १०३:१३, १४) म्हणूनच तो त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पवित्र शक्‍तिद्वारे आणि त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला मदत करतो. आणि एक नवीन व्यक्‍ती बनण्यासाठी, लागणारी बुद्धी, ताकद आणि प्रोत्साहन तो आपल्याला देतो. त्याने तुम्हालाही अशा प्रकारे नक्कीच मदत केली असेल. पण जुनं व्यक्‍तिमत्त्वं काढून टाकण्यासाठी आणि बाप्तिस्म्यापर्यंत पुढेही प्रगती करत राहण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करता येतील, हे आता आपण पाहू या.

९. देवाचं वचन तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतं?

बायबलच्या मदतीने स्वतःचं प्रामाणिकपणे परिक्षण करा.  देवाचं वचन एका आरशासारखं आहे. तुमचं वागणं-बोलणं आणि तुमची विचार करण्याची पद्धत योग्य आहे की नाही, हे तपासून पाहण्यासाठी ते तुम्हाला मदत करतं. (याको. १:२२-२५) यासोबतच, तुमचा बायबल घेणारे किंवा मंडळातले इतर भाऊबहिणसुद्धा तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतात. ते बायबलमधल्या वचनांचा उपयोग करून तुमच्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत आणि कोणत्या बाबतीत तुम्ही आणखी सुधारणा केली पाहिजे, हे ओळखायला तुम्हाला मदत करतील. तसंच, वाईट सवयींवर मात करण्यासाठी बायबलवर आधारित असलेला व्यावहारिक सल्ला शोधण्यासाठीही ते तुम्हाला मदत करतील. यहोवासुद्धा तुम्हाला मदत करायला नेहमी तयार आहे. आणि तोच तुम्हाला सगळ्यात चांगली मदत करू शकतो. कारण तुमच्या मनात काय आहे, हे त्यालाच माहीत आहे. (नीति. १४:१०; १५:११) म्हणून दररोज यहोवाला प्रार्थना करण्याची आणि त्याच्या वचनाचा अभ्यास करण्याची स्वतःला सवय लावून घ्या.

१०. एलीच्या अनुभवावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१० यहोवाचे नियम आणि त्याची तत्त्वंच सगळ्यात चांगली आहेत याची खातरी बाळगा.  यहोवा आपल्याला जे काही सांगतो ते आपल्या भल्यासाठीच असतं. जे यहोवाच्या तत्त्वांप्रमाणे चालतात त्यांना हे समाधान असतं, की आपण योग्य प्रकारे वागत आहोत. त्यांच्या जीवनाला एक दिशा असते आणि ते खऱ्‍या अर्थाने आनंदी असतात. (स्तो. १९:७-११) याउलट, जे यहोवाच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात. कारण ते आपल्या शारीरिक इच्छांप्रमाणे वागतात. देवाच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यासोबत काय झालं हे एली नावाचा एक भाऊ सांगतो. त्याच्या आईवडिलांनी त्याला सत्यात वाढवलं. पण जेव्हा तो १४-१५ वर्षांचा होता, तेव्हा त्याने वाईट मुलांची संगत धरली. यामुळे त्याला ड्रग्जचं व्यसन लागलं. तसंच, तो अनैतिक कामं आणि चोरीही करू लागला. एली सांगतो की तो दिवसेंदिवस जास्त रागीट आणि हिंसक बनू लागला. तो म्हणतो: “खरंतर लहानपणापासून ज्या-ज्या गोष्टी वाईट आहेत असं मी शिकलो होतो, त्या सगळ्या गोष्टी मी करू लागलो.” पण लहानपणापासून एली ज्या गोष्टी शिकला होता, त्या तो पूर्णपणे विसरला नव्हता. काही काळाने त्याने पुन्हा बायबलचा अभ्यास सुरू केला. त्याने आपल्या वाईट सवयी सोडण्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि २००० साली त्याचा बाप्तिस्मा झाला. यहोवाच्या तत्त्वांप्रमाणे वागल्यामुळे त्याला कोणते फायदे झाले आहेत? तो सांगतो: “आज माझं मन मला खात नाही आणि माझा विवेक शुद्ध आहे.” * या अनुभवावरून हेच दिसून येतं, की जे यहोवाच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचंच नुकसान करून घेतात. पण तरीसुद्धा, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी त्यांना मदत करायला यहोवा नेहमी तयार असतो.

११. यहोवाला कोणकोणत्या गोष्टींची घृणा वाटते?

११ यहोवाप्रमाणेच वाईट गोष्टींचा द्वेष करायला शिका.  (स्तो. ९७:१०) बायबलमध्ये सांगितलं आहे, की “गर्विष्ठ नजर, खोटं बोलणारी जीभ, [आणि] निर्दोष रक्‍त सांडणारे हात,” यांसारख्या गोष्टींची यहोवाला घृणा वाटते. (नीति. ६:१६, १७) तसंच, ‘हिंसक आणि कपटी लोकांचीही यहोवाला घृणा वाटते.’ (स्तो. ५:६) यहोवाला अशा प्रवृत्तींचा आणि वाईट कामांचा इतका तिटकारा आहे, की नोहाच्या काळात त्याने सगळ्या दुष्ट लोकांचा नाश केला. कारण त्यांनी संपूर्ण पृथ्वीवर हिंसाचार माजवला होता. (उत्प. ६:१३) अजून एका उदाहरणाचा विचार करा. मलाखी संदेष्ट्याद्वारे यहोवाने सांगितलं, की जे आपल्या लग्नाच्या जोडीदाराला धोका देतात आणि चुकीच्या कारणांवरून घटस्फोट घेतात अशा लोकांची त्याला घृणा वाटते. त्यांची उपासना तो मुळीच स्वीकारत नाही आणि अशा वाईट वागणुकीचा तो त्यांच्याकडून हिशोब घेईल.—मला. २:१३-१६; इब्री १३:४.

यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टी करण्याचा विचारही आपल्याला सडलेलं फळ खाण्यासारखा किळसवाणा वाटला पाहिजे (परिच्छेद ११-१२ पाहा)

१२. ‘वाईटाचा द्वेष करणं’ म्हणजे नेमकं काय?

१२ यहोवाची इच्छा आहे, की आपण ‘वाइटाचा द्वेष करावा.’ (रोम. १२:९) या ठिकाणी, “द्वेष” असं भाषांतर केलेल्या मूळ भाषेतल्या शब्दाचा अर्थ, एखाद्या गोष्टीबद्दल किळस किंवा खूप जास्त घृणा वाटणं असा होतो. कल्पना करा, की कोणी तुम्हाला एखादं सडलेलं फळ दिलं आणि ते खायला सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल? त्या कल्पनेनेच तुम्हाला मळमळायला लागेल. त्याच प्रकारे, यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टी करण्याचा विचारही आपल्याला असाच किळसवाणा वाटला पाहिजे.

१३. आपण आपल्या विचारांचं रक्षण का केलं पाहिजे?

१३ तुमच्या विचारांचं रक्षण करा.  आपण जसा विचार करतो, त्याप्रमाणेच वागतो. येशूने शिकवलं होतं, की आपल्या हातून गंभीर पाप होऊ नये म्हणून आपण चुकीचे विचार आपल्या मनातून लगेच काढून टाकले पाहिजेत. (मत्त. ५:२१, २२, २८, २९) आपल्या स्वर्गातल्या पित्याचं मन आनंदित करावं अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे, नाही का? तर मग आपल्या मनात येणारे वाईट विचार आपण लगेच मनातून काढून टाकणं किती गरजेचं आहे!

१४. आपण ज्या गोष्टी बोलतो त्यांवरून काय दिसून येतं आणि आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे?

१४ बोलण्यावर नियंत्रण ठेवा.  येशूने म्हटलं: “ज्या गोष्टी तोंडातून निघतात त्या माणसाच्या हृदयातून येतात.” (मत्त. १५:१८) आपण आतून कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत हे आपल्या बोलण्यावरून दिसून येतं. म्हणून या प्रश्‍नांवर विचार करा: ‘खरं बोलल्यामुळे मला काही त्रास होणार असेल, तरीसुद्धा मी खरं बोलायला तयार असतो का? एक विवाहित व्यक्‍ती म्हणून, माझ्या वागण्या-बोलण्यामुळे विरुद्धलिंगी व्यक्‍तीच्या मनात चुकीचे विचार येणार नाहीत याची मी काळजी घेतो का? माझ्या बोलण्यात मी अश्‍लील गोष्टींचा उल्लेख करायचं टाळतो का? कोणी चीड येण्यासारखं वागलं तरीसुद्धा मी त्यांच्याशी शांतपणे बोलतो का?’ या प्रश्‍नांवर विचार केल्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल. आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व एखाद्या शर्टासारखं आहे अशी जर कल्पना केली, तर आपण ज्या वाईट गोष्टी बोलतो त्यांची तुलना त्या शर्टावरच्या बटनांशी करता येईल. तुम्ही जर शर्टाची बटनं उघडली तर तुम्हाला शर्ट काढायला सोपं जाईल. त्याचप्रमाणे इतरांना टाकून बोलणं, खोटं बोलणं किंवा अश्‍लील विषयांवर बोलणं, यांसारख्या वाईट गोष्टी तुम्ही काढून टाकायचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकायला जास्त सोपं जाईल.

१५. जुनं व्यक्‍तिमत्त्व “वधस्तंभावर” खिळण्याचा काय अर्थ होतो?

१५ योग्य पावलं उचलायला मागेपुढे पाहू नका.  आपल्या जीवनात बदल करण्याची गोष्ट आपण किती गंभीरतेने घेतली पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी प्रेषित पौलने एक जबरदस्त उदाहरण वापरलं. तो म्हणाला, की आपण आपलं जुनं व्यक्‍तिमत्त्व “वधस्तंभावर” खिळलं पाहिजे. (रोम. ६:६) म्हणजेच आपण ख्रिस्ताचं अनुकरण केलं पाहिजे. आणि यहोवाला न आवडणाऱ्‍या सवयींना आणि विचारांना मारून टाकलं पाहिजे. आपण ही पावलं उचलली तरच आपला विवेक शुद्ध राहील आणि कायमच्या जीवनाची आपली आशा पक्की होईल. (योहा. १७:३; १ पेत्र ३:२१) नेहमी लक्षात असू द्या, की आपल्या सोयीसाठी यहोवा त्याचे नियम आणि तत्त्वं बदलणार नाही. उलट, त्याच्या नियमांप्रमाणे आणि तत्त्वांप्रमाणे वागण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करावे लागतील.—यश. १:१६-१८; ५५:९.

१६. चुकीच्या इच्छांविरुद्ध लढत राहण्याचा निश्‍चय तुम्ही का केला पाहिजे?

१६ चुकीच्या इच्छांविरुद्ध लढत राहा.  बाप्तिस्मा झाल्यानंतरही तुम्हाला चुकीच्या इच्छांविरुद्ध लढत राहावं लागेल. मॉरिशियो नावाच्या एका भावाचं उदाहरण घ्या. तरुणपणापासूनच तो समलैंगिक जीवन जगू लागला. पुढे त्याची भेट यहोवाच्या लोकांशी झाली आणि तो बायबलचा अभ्यास करू लागला. आपल्या जीवनात योग्य ते बदल केल्यानंतर, २००२ साली त्याचा बाप्तिस्मा झाला. बरीच वर्षं यहोवाची सेवा केल्यानंतरही मॉरिशियो म्हणतो, “खरं सांगायचं, तर आजही मला कधीकधी चुकीच्या इच्छांशी संघर्ष करावा लागतो.” पण यामुळे निराश होण्याऐवजी मॉरिशियो म्हणतो, “मला माहितीए की जेव्हा मी या इच्छा मारून टाकतो, तेव्हा मी यहोवाचं मन आनंदित करतो. आणि याच गोष्टीचं मला समाधानए.” *

१७. नबीहाच्या या अनुभवात तुम्हाला कोणती गोष्ट सगळ्यात जास्त आवडली?

१७ मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा, आणि स्वतःवर नाही तर त्याच्या पवित्र शक्‍तीवर अवलंबून राहा.  (गलती. ५:२२; फिलिप्पै. ४:६) जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकण्यासाठी आणि ते परत आपल्यामध्ये येऊ नये यासाठी आपण होता होईल तितका प्रयत्न करत राहिलं पाहिजे. नबीहा नावाच्या एका बहिणीचं उदाहरण लक्षात घ्या. ती सहा वर्षांची असताना तिचे वडील कुटुंबाला सोडून निघून गेले. ती म्हणते, “ते दुःख सहन करणं मला खूप कठीण गेलं. माझ्या मनावर त्याचा खूप खोलवर परिणाम झाला.” नबीहा जसजशी मोठी होऊ लागली, तसतसा तिचा स्वभाव खूप रागीट आणि भांडखोर बनला. पुढे ती ड्रग्स विकू लागली. यामुळे तिला अटक झाली आणि काही वर्षं तिला जेलमध्ये राहावं लागलं. मग जेलमध्ये प्रचारकार्य करायला आलेल्या साक्षीदारांनी तिच्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. हळूहळू नबीहाने स्वतःमध्ये मोठमोठे बदल करायला सुरुवात केली. ती म्हणते, “पूर्वीच्या काही वाईट सवयी सोडायला मला जास्त अवघड गेलं नाही. पण सिगारेटची सवय सोडणं तेवढं सोपं नव्हतं.” या सवयीवर मात करण्यासाठी नबीहाला एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रयत्न करावा लागला. पण शेवटी तिचं ते व्यसन सुटलं. ती हे कशामुळे करू शकली? ती सांगते: “माझ्या स्वतःच्या प्रयत्नांपेक्षा मला वाटतं यहोवाला सतत मदतीसाठी प्रार्थना केल्यामुळेच मला ही सवय सोडता आली.” आता ती दुसऱ्‍यांना असं सांगते, की “जर मी यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी इतके मोठे बदल करू शकले, तर मग ते कोणीही करू शकेल.” *

तुम्ही नक्कीच प्रगती करून बाप्तिस्मा घेऊ शकता!

१८. १ करिंथकर ६:९-११ या वचनांप्रमाणे देवाच्या बऱ्‍याच सेवकांना कोणती गोष्ट करणं शक्य झालं आहे?

१८ पहिल्या शतकात यहोवाने ज्या स्त्रीपुरुषांना ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी निवडलं होतं, तेसुद्धा एकेकाळी वाईट सवयींचे गुलाम होते. त्यांच्यापैकी काही जण व्यभिचारी, समलैंगिक तर काही जण चोर होते. पण देवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने ते आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करू शकले. (१ करिंथकर ६:९-११ वाचा.) तसंच आजसुद्धा, लाखो लोकांना आपल्या जीवनात बदल करायला बायबलमुळे मदत झाली आहे. * त्यांनी आपल्या खोलवर रूजलेल्या आणि जुन्या वाईट सवयींवर मात केली आहे. त्यांच्या उदाहरणावरून हेच दिसून येतं, की तुम्हीसुद्धा बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी तुमच्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करू शकता आणि वाईट सवयींवर मात करू शकता.

१९. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ ज्यांना बाप्तिस्मा घ्यायची इच्छा आहे, त्यांनी जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकायचा प्रयत्न करण्यासोबतच, नवीन व्यक्‍तिमत्त्व घालण्यासाठीही मेहनत घेतली पाहिजे. आपण हे नेमकं कसं करू शकतो आणि इतर जण आपल्याला हे करण्यासाठी मदत कशी करू शकतात हे आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

^ परि. 5 बाप्तिस्मा घेण्यासाठी आपण आपल्या व्यक्‍तिमत्त्वात बदल करायला तयार असलं पाहिजे. जुनं व्यक्‍तिमत्त्व म्हणजे काय?  आपण ते का  काढून टाकलं पाहिजे? आणि आपण ते कसं  करू शकतो? हे समजून घ्यायला हा लेख आपल्याला मदत करेल. आणि पुढच्या लेखात आपण पाहू, की बाप्तिस्मा झाल्यानंतरही आपण आपल्या नवीन व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा कशी करत राहू शकतो.

^ परि. 3 शब्दांचा अर्थ: ‘जुनं व्यक्‍तिमत्व काढून टाकणं’ म्हणजे यहोवाला न आवडणाऱ्‍या गुणांना आणि इच्छांना आपल्यातून काढून टाकणं. याची सुरुवात बाप्तिस्मा घेण्याआधी होते.—इफिस. ४:२२.

^ परि. 10 आणखी माहितीसाठी १ एप्रिल २०१२ च्या टेहळणी बुरूज  मासिकातला “बायबलने बदलले जीवन!—‘मी यहोवाकडे परत वळलं पाहिजे.’” हा लेख पाहा.

^ परि. 16 जास्त माहितीसाठी १ मे २०१२ च्या टेहळणी बुरूज  (इंग्रजी) अंकातला “द बायबल चेंजेस लाईव्ज्‌—‘दे वेअर व्हेरी काईंड टू मी’” हा लेख पाहा.

^ परि. 17 जास्त माहितीसाठी १ ऑक्टोबर २०१२ च्या टेहळणी बुरूज  अंकातला, “द बायबल चेंजेस लाईव्ज्‌—‘आय बिकेम ॲन अँग्री, ॲग्रेसिव्ह यंग वूमन,’” हा लेख पाहा.

^ परि. 64 चित्राचं वर्णन: चुकीच्या विचारांवर आणि सवयींवर मात करणं हे जुने कपडे काढून टाकण्यासारखं आहे.