व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ११

बाप्तिस्म्यानंतरही “नवीन व्यक्‍तिमत्त्व” विकसित करत राहा

बाप्तिस्म्यानंतरही “नवीन व्यक्‍तिमत्त्व” विकसित करत राहा

“देवाकडून असलेलं नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला.”—कलस्सै. ३:१०.

गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे

सारांश *

१. आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला कशामुळे आकार मिळतो?

 आपण यहोवाला आवडेल अशा प्रकारची व्यक्‍ती बनावं अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. मग आपला बाप्तिस्मा होऊन काही दिवस झालेले असोत किंवा बरीच वर्षं. पण यहोवाला आवडेल अशी व्यक्‍ती बनण्यासाठी चुकीचे विचार आपण टाळले पाहिजेत आणि योग्य प्रकारे विचार करायला शिकलं पाहिजे. का बरं? कारण सहसा आपण जसा विचार करतो त्याप्रमाणेच आपल्या व्यक्‍तिमत्त्वाला आकार मिळतो. आपण जर सतत शारीरिक इच्छांबद्दल विचार करत राहिलो, तर आपण चुकीच्या गोष्टी बोलू आणि आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडतील. (इफिस. ४:१७-१९) पण तेच जर आपण चांगल्या गोष्टींवर विचार करत राहिलो, तर यहोवाला आवडेल अशा प्रकारे बोलणं आणि वागणं आपल्याला शक्य होईल.—गलती. ५:१६.

२. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहोत?

मागच्या लेखात आपण पाहिलं होतं, की आपल्या मनात कधीच वाईट विचार येणार नाहीत असं नाही. पण त्या वाईट विचारांप्रमाणे वागायचं की नाही हे आपल्या हातात आहे. बाप्तिस्मा घेण्याआधी, आपण यहोवा ज्या गोष्टींचा द्वेष करतो त्या गोष्टी बोलणं आणि त्यांप्रमाणे वागणं सोडून दिलं पाहिजे. जुनं व्यक्‍तिमत्त्व काढून टाकण्यासाठी हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. पण खऱ्‍या अर्थाने यहोवाचं मन आनंदित करायचं असेल, तर ही आज्ञासुद्धा पाळणं गरजेचं आहे: “नवीन व्यक्‍तिमत्त्व घाला.” (कलस्सै. ३:१०) या लेखात आपण दोन प्रश्‍नांवर विचार करू या. “नवीन व्यक्‍तिमत्त्व” म्हणजे काय? आणि आपण नवीन व्यक्‍तिमत्त्व ‘घालून’ म्हणजेच विकसित करून ते कसं टिकवून ठेवू शकतो?

“नवीन व्यक्‍तिमत्त्व” म्हणजे काय?

३. “नवीन व्यक्‍तिमत्त्व” म्हणजे काय आणि एखाद्याने ते विकसित केलं आहे, हे कशावरून दिसून येतं? (गलतीकर ५:२२, २३)

नवीन व्यक्‍तिमत्त्व म्हणजे आपल्या वागण्या-बोलण्यात यहोवाच्या गुणांचं अनुकरण करणं. आपल्याला जर नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करायचं असेल, तर देवाच्या पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारे गुण आपण स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. असं केल्यामुळे देवाची पवित्र शक्‍ती आपल्या विचारांवर, भावनांवर आणि आपल्या कार्यांवर प्रभाव करू लागते. (गलतीकर ५:२२, २३ वाचा.) नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करणाऱ्‍याचं यहोवावर आणि त्याच्या लोकांवर प्रेम असतं. (मत्त. २२:३६-३९) त्याला वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करावा लागला, तरी तो आनंदाने यहोवाची सेवा करत राहतो. (याको. १:२-४) तो नेहमी शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतो. (मत्त. ५:९) तसंच, तो नेहमी इतरांशी सहनशीलतेने आणि दयाळूपणे वागतो. (कलस्सै. ३:१३) चांगल्या गोष्टी करायला त्याला आवडतं आणि तो त्या नेहमी करत राहतो. (लूक ६:३५) आपल्या स्वर्गीय पित्यावर त्याचा किती मजबूत विश्‍वास आहे हे त्याच्या जीवनातून दिसून येतं. (याको. २:१८) कोणी त्याला चीड आणायचा प्रयत्न केला तरी तो सौम्यपणे उत्तर देतो. आणि वाईट गोष्टी करायचा मोह होतो तेव्हा तो आत्मसंयम दाखवतो.—१ करिंथ. ९:२५, २७; तीत ३:२.

४. गलतीकर ५:२२, २३ आणि बायबलच्या इतर वचनांमध्ये सांगितलेले सगळे गुण आपण का दाखवले पाहिजेत?

नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करण्यासाठी आपण गलतीकर ५:२२, २३ या वचनांत आणि बायबलच्या इतर वचनांत सांगितलेले सगळे गुण स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न केला पाहिजे. * हे गुण वेगवेगळ्या कपड्यांसारखे नाहीत, जे आपण एका वेळी एकच घालतो. उलट, हे सगळे गुण आपण एकाच वेळी विकसित करण्याची गरज आहे. कारण या गुणांचे काही पैलू इतर गुणांमध्येही दिसून येतात. उदाहरणार्थ, आपलं जर इतरांवर मनापासून प्रेम असेल, तर आपण आपोआपच त्यांच्याशी सहनशीलतेने आणि दयाळूपणे वागू. तसंच, जर आपल्यामध्ये सौम्यता आणि आत्मसंयम असेल, तरच आपल्याला इतरांना चांगुलपणा दाखवता येईल.

आपण नवीन व्यक्‍तिमत्त्व कसं विकसित करू शकतो?

आपण जितकं जास्त येशूसारखा विचार करायला शिकू, तितकंच त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचं अनुकरण करायला आपल्याला सोपं जाईल (परिच्छेद ५, ८, १०, १२, १४ पाहा)

५. “ख्रिस्ताचं मन” समजून घेणं म्हणजे काय आणि आपण येशूबद्दल का जास्त जाणून घेतलं पाहिजे? (१ करिंथकर २:१६)

१ करिंथकर २:१६ वाचा. नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करण्यासाठी आपल्याला “ख्रिस्ताचं मन” समजणं गरजेचं आहे. याचा अर्थ आपण येशूची विचारसरणी जाणून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. येशूने देवाच्या पवित्र शक्‍तीद्वारे उत्पन्‍न होणारे गुण अगदी पूर्णपणे दाखवले. एका स्वच्छ आरशासारखा तो यहोवाचे गुण अगदी जसेच्या तसे प्रतिबिंबित करतो. (इब्री १:३) म्हणून आपण येशूसारखा विचार करायला शिकलं पाहिजे. कारण जितकं जास्त आपण असं करू, तितकं जास्त आपण त्याच्यासारखे वागू आणि त्याच्या व्यक्‍तिमत्त्वाचं तितकंच जास्त अनुकरण करायला आपल्याला शक्य होईल.—फिलिप्पै. २:५.

६. नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

पण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करणं आपल्याला खरंच शक्य आहे का? कदाचित आपल्याला वाटेल, की ‘येशू तर परिपूर्ण आहे. मला कधीच त्याच्यासारखं होता येणार नाही.’ जर तुम्हालाही असं वाटत असेल तर या गोष्टी लक्षात घ्या. पहिली, यहोवाने आपल्याला अशा प्रकारे बनवलं आहे, की आपण त्याचे आणि येशूचे गुण दाखवू शकतो. म्हणून त्याच्या गुणांचं अनुकरण करायचा आपण प्रयत्न केला तर काही प्रमाणात का होईना, आपण तसं करण्यात नक्कीच यशस्वी होऊ. (उत्प. १:२६) दुसरी गोष्ट म्हणजे, देवाची पवित्र शक्‍ती ही या विश्‍वातली सगळ्यात ताकदवान शक्‍ती आहे. आणि पवित्र शक्‍तीच्या मदतीने तुम्ही अशा गोष्टी करू शकता, ज्या तुम्ही स्वतःच्या बळावर कधीच करू शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, पवित्र शक्‍तीद्वारे उत्पन्‍न होणारे गुण आपण पूर्णपणे दाखवावेत अशी यहोवा सध्या आपल्याकडून अपेक्षा करत नाही. खरंतर पृथ्वीवर जगण्याची आशा असलेल्या लोकांना परिपूर्ण होण्यासाठी आपल्या प्रेमळ पित्याने १,००० वर्षं राखून ठेवली आहेत. (प्रकटी. २०:१-३) आज तो आपल्याकडून फक्‍त इतकीच अपेक्षा करतो, की आपण मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून राहावं आणि आपल्याकडून होता होईल तितका प्रयत्न करावा.

७. आता आपण काय पाहणार आहोत?

आपण येशूचं अनुकरण नेमकं कसं करू शकतो? हे जाणून घेण्यासाठी आता आपण देवाच्या पवित्र शक्‍तीद्वारे उत्पन्‍न होणाऱ्‍या चार गुणांचं थोडक्यात परीक्षण करू या. आणि यापैकी प्रत्येक गुण येशूने कसा दाखवला हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू या. तसंच, नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करण्यात आपण स्वतः किती प्रगती केली आहे, हे तपासून पाहायला मदत करतील असे काही प्रश्‍नही आपण पाहू.

८. येशूने प्रेम कसं दाखवलं?

येशूचं त्याच्या पित्यावर मनापासून प्रेम असल्यामुळे त्याने त्याच्यासाठी आणि आपल्यासाठीही बरेच त्याग केले. (योहा. १४:३१; १५:१३) लोकांवर त्याचं किती मनापासून प्रेम आहे हे त्याने पृथ्वीवर असताना वेगवेगळ्या मार्गांनी दाखवून दिलं. काही लोक त्याचा विरोध करायचे तरीसुद्धा तो नेहमी सर्वांशी प्रेमाने आणि सहानुभूतीने वागायचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांवर प्रेम असल्यामुळे त्याने देवाच्या राज्याबद्दल त्यांना शिकवलं. (लूक ४:४३, ४४) तसंच, पापी लोकांच्या हातून एक यातनादायक मृत्यू सहन करून देवाबद्दल आणि मानवजातीबद्दल त्याच्या मनात किती निःस्वार्थ प्रेम होतं हे त्याने दाखवून दिलं. असं करून त्याने आपल्या सगळ्यांसाठी कायमच्या जीवनाचा मार्ग मोकळा केला.

९. इतरांना प्रेम दाखवण्याच्या बाबतीत मी येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

आपल्या स्वर्गीय पित्यावर आपलं प्रेम असल्यामुळेच आपण समर्पण करून बाप्तिस्मा घेतला. पण प्रेषित योहानने म्हटलं की ‘जो आपल्या भावावर प्रेम करत नाही तो न पाहिलेल्या देवावर प्रेम करूच शकत नाही.’ (१ योहा. ४:२०) म्हणून जर आपलं यहोवावर खरंच प्रेम असेल तर आपणही लोकांशी ज्या प्रकारे वागतो त्याद्वारे हे प्रेम दाखवून दिलं पाहिजे. आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारले पाहिजेत: ‘मी खरंच लोकांवर मनापासून प्रेम करतो का? ते माझ्याशी वाईट वागतात तेव्हासुद्धा मी त्यांच्याशी सहानुभूतीने वागतो का? लोकांवर प्रेम असल्यामुळे मी त्यांना यहोवाबद्दल शिकून घ्यायला मदत करण्यासाठी माझा वेळ आणि माझ्याजवळ असलेल्या इतर गोष्टींचा वापर करतो का? बहुतेक लोक मी घेत असलेल्या मेहनतीची कदर करत नाहीत किंवा विरोध करतात तेव्हासुद्धा मी हे काम आनंदाने करत राहतो का? शिष्य बनवण्याच्या कामात जास्त वेळ घालवता यावा म्हणून मला जीवनात काही फेरबदल करता येतील का?’—इफिस. ५:१५, १६.

१०. येशूने कशा प्रकारे नेहमी शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला?

१० येशू शांतीप्रिय स्वभावाचा होता. जेव्हा लोक त्याच्याशी वाईट वागले तेव्हा तो त्यांच्याशी तसाच वागला नाही. उलट, शांती टिकवून ठेवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. त्याने लोकांनाही आपसातले वाद मिटवण्याचं प्रोत्साहन दिलं. उदाहरणार्थ, त्याने लोकांना शिकवलं, की यहोवाने त्यांची उपासना स्वीकारावी असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी आपल्या भावाशी समेट केला पाहिजे. (मत्त. ५:९, २३, २४) तसंच, आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण यावरून त्याच्या प्रेषितांमध्ये नेहमी वाद व्हायचे. पण येशूने त्यांना योग्यपणे विचार करायला बऱ्‍याच वेळा मदत केली.—लूक ९:४६-४८; २२:२४-२७.

११. आपणही कशा प्रकारे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करू शकतो?

११ जर आपल्यालाही येशूप्रमाणे शांती टिकवून ठेवायची असेल, तर आपल्यामुळे वाद निर्माण होणार नाही फक्‍त इतकाच प्रयत्न करणं पुरेसं नाही. तर मतभेद होतात तेव्हा समेट करण्यासाठी पुढाकार घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे. तसंच, आपण आपल्या भाऊबहिणींनाही आपसातले वाद मिटवायचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. (फिलिप्पै. ४:२, ३; याको. ३:१७, १८) आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो: ‘इतरांशी समेट करणं मला खरंच महत्त्वाचं वाटतं का? त्यासाठी मी कुठपर्यंत प्रयत्न करायला तयार आहे? जेव्हा एखादा भाऊ किंवा बहीण माझं मन दुखावते, तेव्हा मी मनात त्यांच्याबद्दल राग बाळगतो का? समेट करण्यासाठी समोरच्या व्यक्‍तीने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा मी करतो का? की, मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्याकडे जातो. आणि त्या व्यक्‍तीची चूक होती असं वाटत असलं, तरी मी हे करायला तयार असतो का? जेव्हा शक्य असतं, तेव्हा मी इतरांनाही त्यांचे मतभेद सोडवायचं प्रोत्साहन देतो का?’

१२. येशूने दयाळूपणा कसा दाखवला?

१२ येशू दयाळू होता. (मत्त. ११:२८-३०) तो लोकांशी कोमलतेने आणि समंजसपणे वागायचा. एकदा एक स्त्री आपल्या आजारी मुलीला घेऊन येशूकडे आली आणि तिला बरं करण्याची विनंती करू लागली. ती स्त्री इस्राएली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला येशूने तिची विनंती मान्य केली नाही. पण तिचा विश्‍वास किती मजबूत आहे, हे पाहून त्याने दयाळूपणे तिच्या मुलीला बरं केलं. (मत्त. १५:२२-२८) येशू दयाळू असला तरी भावनेच्या आहारी जाऊन तो कधीच चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नव्हता. आपल्या जवळच्या लोकांवर त्याचं प्रेम असल्यामुळे काही वेळा तो त्यांच्याशी कडकपणे वागला. आणि असं करून त्याने दयाळूपणा दाखवला. उदाहरणार्थ, पेत्रने जेव्हा त्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने सर्व शिष्यांच्या देखत त्याला खडसावलं. (मार्क ८:३२, ३३) येशूने पेत्रचा अपमान करण्यासाठी असं केलं नाही. तर मर्यादा सोडून वागणं किती चुकीचं आहे, हे पेत्रला आणि इतर शिष्यांना कळावं म्हणून त्याने असं केलं. त्या वेळेस पेत्रला थोडं वाईट वाटलं असेल. पण येशूने त्याची चूक सुधारल्यामुळे त्याला नक्कीच फायदा झाला.

१३. आपण येशूप्रमाणे दयाळूपणा कसा दाखवू शकतो?

१३ ज्या लोकांवर तुमचं प्रेम आहे त्यांच्याशी जर खरंच तुम्हाला दयाळूपणे वागायचं असेल, तर काही वेळा तुम्हाला त्यांच्याशी स्पष्ट शब्दांत बोलावं लागेल. पण असं करताना येशूचं अनुकरण करा आणि नेहमी देवाच्या वचनावर आधारित सल्ला द्या. सल्ला देताना सौम्यपणे बोला. तुम्ही ज्यांना सल्ला देत आहात त्यांच्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करा. त्यांचं यहोवावर आणि तुमच्यावर प्रेम असल्यामुळे तुम्ही दिलेला सल्ला ते नक्की स्वीकारतील असा भरवसा ठेवा. स्वतःला असे प्रश्‍न विचारा: ‘एखादी जवळची व्यक्‍ती चुकीचं काही करते, तेव्हा त्याबद्दल बोलायचं धाडस माझ्यामध्ये आहे का? सल्ला द्यायची गरज असते तेव्हा मी सौम्यतेने बोलतो की कठोरपणे? सल्ला देण्यामागचा माझा हेतू काय आहे? मला त्याचा राग आलाय म्हणून मी सल्ला देतोय, की त्याची काळजी असल्यामुळे देतोय?’

१४. येशूने चांगुलपणा कसा दाखवला?

१४ चांगुलपणा काय असतो, हे येशूला फक्‍त माहीतच नव्हतं, तर त्याने तो आपल्या कामांतून दाखवलासुद्धा. येशूचं आपल्या पित्यावर प्रेम असल्यामुळे तो नेहमी योग्य ते करतो आणि ते चांगल्या हेतूने करतो. पृथ्वीवर असताना तो नेहमी लोकांसाठी चांगल्या गोष्टी करून, त्यांना मदत करायचा प्रयत्न करायचा. आपणही या बाबतीत येशूचं अनुकरण केलं पाहिजे. चांगलं काय आहे, हे फक्‍त माहीत असणंच पुरेसं नाही, तर ते योग्य हेतूने करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण कदाचित कोणी म्हणेल: ‘एखादा माणूस चांगलं काम करतोय, पण त्याचा हेतू चुकीचा आहे, असं कधी होऊ शकतं का?’ हो. असं होऊ शकतं. उदाहरणार्थ, येशूने अशा लोकांबद्दल सांगितलं जे गरिबांना दान द्यायचे, पण दुसऱ्‍यांनी आपल्याला पाहावं या उद्देशाने द्यायचे. अशा उद्देशाने केलेल्या चांगल्या कामांची यहोवाच्या नजरेत काहीच किंमत नाही.—मत्त. ६:१-४.

१५. आपण खऱ्‍या अर्थाने चांगुलपणा कसा दाखवू शकतो?

१५ जेव्हा आपण मनात कोणताही स्वार्थ न ठेवता चांगली कामं करतो, तेव्हाच आपण खऱ्‍या अर्थाने चांगुलपणा दाखवत असतो. म्हणून स्वतःला विचारा: ‘योग्य काय आहे ते मला माहीत आहे. पण मी त्याप्रमाणे खरंच वागतो का? चागंली कामं करण्यामागचा माझा हेतू काय असतो?’

आपण नवीन व्यक्‍तिमत्त्व कसं टिकवून ठेवू शकतो?

१६. आपण दररोज काय करत राहिलं पाहिजे आणि का?

१६ आपण बाप्तिस्मा घेतला आहे, म्हणजे आपण नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित केलं आहे आणि आता पुढे काही करण्याची गरज नाही, असा आपण विचार करू नये. आपलं नवीन व्यक्‍तिमत्त्व हे ‘नवीन कपड्यांसारखं’ आहे. आणि आपण ते नेहमी चांगल्या स्थितीत ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारे गुण आपण दररोजच्या जीवनात दाखवले पाहिजेत. यहोवा आजपर्यंत काम करत आला आहे आणि त्याची पवित्र शक्‍तीसुद्धा एक क्रियाशील शक्‍ती आहे. (उत्प. १:२) म्हणून आपणसुद्धा पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारे गुण दाखवत राहण्यासाठी काम करत राहिलं पाहिजे. येशूचा शिष्य याकोब याने म्हटलं: ‘विश्‍वास कार्यांशिवाय निर्जीव आहे.’ (याको. २:२६) पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या इतर सर्व गुणांच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्ट खरी आहे. जेव्हा आपण हे गुण दाखवतो, तेव्हा देवाची पवित्र शक्‍ती आपल्यामध्ये कार्य करत आहे, हे दिसून येतं.

१७. पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारे गुण दाखवण्यात आपण कमी पडतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे?

१७ बाप्तिस्मा होऊन बरीच वर्षं झाली असली तरीसुद्धा पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणारे गुण दाखवण्यात आपण कमी पडतो. पण यामुळे निराश होण्याऐवजी सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. समजा तुमच्या हातून तुमचा आवडता ड्रेस फाटला तर तुम्ही काय कराल? तुम्ही लगेच तो फेकून द्याल का? नाही. उलट तुम्ही तो शिवून घ्याल आणि पुन्हा फाटू नये म्हणून जपाल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या वेळी तुम्ही दयाळूपणे, सहनशीलतेने किंवा प्रेमळपणे वागायला चुकलात तर निराश होऊ नका. तुम्ही माफी मागू शकता. प्रामाणिकपणे माफी मागितल्यामुळे तुमचे बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील. आणि पुन्हा अशी चूक आपल्या हातून होऊ नये म्हणून काळजी घ्या.

१८. तुम्ही कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकता?

१८ आपल्यासमोर येशूचं एक चांगलं उदाहरण आहे, ही किती आनंदाची गोष्ट आहे! जितका जास्त आपण त्याच्यासारखा विचार करू, तितकं जास्त आपण त्याच्यासारखं वागू. आणि जितकं जास्त आपण त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न करू, तितकं जास्त आपल्याला नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करता येईल. या लेखात आपण पवित्र शक्‍तीमुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या फक्‍त चार गुणांचं परीक्षण केलं. मग इतर गुणांबद्दल काय? तुम्ही त्यांच्याबद्दलसुद्धा आणखी जास्त जाणून घेऊ शकता. आणि तुम्ही ते गुण कितपत दाखवत आहात, यावर विचार करू शकता. या विषयावर आधारित असणारे बरेच लेख तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  या प्रकाशनात मिळतील. यात “ख्रिस्ती जीवन” आणि मग “आत्म्याचे फळ” या विषयाखाली तुम्ही पाहू शकता. तुम्ही या गोष्टीची नेहमी खातरी बाळगू शकता, की नवीन व्यक्‍तिमत्त्व विकसित करून ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही होता होईल तितका प्रयत्न करत राहिला, तर यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल.

गीत २९ खरेपणाने चालणे

^ परि. 5 आपण कुठेही राहत असलो किंवा आपली परिस्थिती कशीही असली, तरी आपण सगळे “नवीन व्यक्‍तिमत्त्व” विकसित करू शकतो. यासाठी आपण आपल्या विचारसरणीत सुधारणा करून येशूसारखं बनत राहायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येशू कसा विचार करायचा आणि तो इतरांशी कसा वागला याची काही उदाहरणं आपण या लेखात पाहू या. तसंच, बाप्तिस्मा घेतल्यानंतरही आपण त्याचं अनुकरण कसं करत राहू शकतो हेसुद्धा आपल्याला या लेखात पाहायला मिळेल.

^ परि. 4 गलतीकर ५:२२, २३ यात ज्या ९ गुणांबद्दल सांगितलं आहे, फक्‍त तेच गुण पवित्र शक्‍ती आपल्याला उत्पन्‍न करायला मदत करते असं नाही. याबद्दल आणखी माहितीसाठी टेहळणी बुरूज मासिकाच्या जून २०२० च्या अंकात “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.