व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १२

जखऱ्‍याने जे पाहीलं ते तुम्ही पाहू शकता का?

जखऱ्‍याने जे पाहीलं ते तुम्ही पाहू शकता का?

“‘माझ्या पवित्र शक्‍तीने हे सगळं घडून येईल,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”—जख. ४:६.

गीत ३३ वैऱ्‍यांना भिऊ नको!

सारांश *

१. बंदिवासात असलेले यहुदी का आनंदी होते?

 यहूदी लोकांमध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. कारण बाबेलच्या बंदिवासात त्यांनी बरीच वर्ष घालवल्यानंतर आता यहोवा देवाने त्यांची सुटका करण्यासाठी पर्शियाचा राजा कोरेश ‘याचं मन प्रेरित केलं होतं.’ राजाने अशी घोषणा केली, की सर्व यहुद्यांनी आपल्या मायदेशी परत जाऊन “इस्राएलचा देव यहोवा याचं मंदिर पुन्हा बांधावं.” (एज्रा १:१, ३) कल्पना करा, यहुद्यांना ही गोष्ट ऐकून किती आनंद झाला असेल! कारण देवाने आपल्या लोकांना जो देश दिला होता तिथे खरी उपासना आता पुन्हा सुरू होणार होती.

२. परत आलेल्या यहुद्यांनी सुरुवातीला कशा प्रकारे उत्साहाने काम केलं?

इ.स.पू. ५३७ मध्ये बंदिवासात असलेल्या यहुद्यांचा पहिला गट यरुशलेमला परत आला. हे शहर पूर्वी दक्षिणेकडच्या यहूदाच्या राज्याचं राजधानी शहर होतं आणि इथेच यहोवाचं मंदिर होतं. परत आलेल्या यहुद्यांनी मंदिर पुन्हा बांधायचा काम लगेच सुरू केलं. आणि इ.स.पू. ५३६ मध्ये त्यांनी मंदिराचा पाया घालण्याचं काम पूर्ण केलं होतं.

३. यहुद्यांना कोणी आणि कसा विरोध केला?

पण मंदिर पुन्हा बांधायचं काम सुरू केल्यानंतर यहुद्यांना खूप विरोध होऊ लागला. “आजूबाजूच्या राष्ट्रांचे लोक सतत त्यांना निराश करू लागले आणि त्यांचं मन खचवू लागले.” (एज्रा ४:४) मग इ.स.पू. ५२२ मध्ये अर्तहशश्‍त राजा बनल्यावर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. * कारण विरोधकांनी या संधीचा फायदा घेऊन मंदिराचं बांधकाम पूर्णपणे थांबवण्याचा कट रचला. “त्यांनी कायद्याच्या नावाखाली अत्याचार करण्याच्या योजना आखल्या.” (स्तो. ९४:२०) त्यांनी अर्तहशश्‍त राजाला सांगितलं, की यहुदी लोक त्याच्याविरूद्ध बंड करायच्या विचारात आहेत. (एज्रा ४:११-१६) ही गोष्ट पूर्णपणे खोटी होती. पण तरीही राजाने त्यांच्या म्हणण्यावर विश्‍वास ठेवला. आणि मंदिराच्या बांधकामावर बंदी आणली. (एज्रा ४:१७-२३) अशा प्रकारे, मंदिराचं बांधकाम बंद पडलं.—एज्रा ४:२४.

४. मंदिराच्या बांधकामाला विरोध होऊ लागला तेव्हा यहोवाने काय केलं? (यशया ५५:११)

यहोवाचे उपासक नसलेल्या आणि पर्शियाच्या काही अधिकाऱ्‍यांना मंदिराचं बांधकाम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होऊ द्यायचं नव्हतं. पण यहोवाने ठरवलं होतं, की मंदिराचं बांधकाम चालू राहील. आणि तो जे काही ठरवतो, ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतो. (यशया ५५:११ वाचा.) मग मंदिराचं बांधकाम सुरू राहण्यासाठी यहोवाने काय केलं? त्याने जखऱ्‍या नावाच्या एका धैर्यवान संदेष्ट्याला निवडलं आणि त्याला आठ रोमांचक दृष्टान्त दाखवले. आणि हे दृष्टान्त जखऱ्‍याने यहुदी लोकांना सांगून त्यांना प्रोत्साहन द्यावं अशी यहोवाची इच्छा होती. या दृष्टान्तांतून यहुद्यांना समजलं, की त्यांना त्यांच्या विरोधकांना घाबरण्याची काहीच गरज नाही. तसंच, यहोवाने त्यांच्यावर सोपवलेलं काम करत राहण्याचं उत्तेजनही त्यांना मिळालं. आणि या दृष्टान्तांपैकी पाचव्या दृष्टान्तात जखऱ्‍याने एक दीपवृक्ष आणि जैतुनाची दोन झाडं पाहिली.

५. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आपण सगळेच कधी-ना-कधी निराश होतो. त्यामुळे जखऱ्‍याच्या पाचव्या दृष्टान्तातून यहोवाने इस्राएली लोकांना कसं प्रोत्साहन दिलं, हे आता आपण पाहू या. आपल्याला विरोधाचा सामना करावा लागतो किंवा अचानक आपली परिस्थिती बदलते किंवा संघटनेकडून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचा उद्देश आपल्याला समजत नाही, तेव्हासुद्धा यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहायला हा दृष्टान्त आपल्याला मदत करेल.

विरोधाचा सामना करावा लागतो तेव्हा

जखऱ्‍याने एका दृष्टान्तात जैतुनाची दोन झाडं सात दिवे असलेल्या एका दीपवृक्षाला तेल पुरवत असल्याचं पाहिलं. (परिच्छेद ६ पाहा)

६. जखऱ्‍या ४:१-३ मधल्या दृष्टान्तातून यहुद्यांना कसं प्रोत्साहन मिळालं? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा)

जखऱ्‍या ४:१-३ वाचा. दीपवृक्ष आणि जैतुनाच्या दोन झाडांच्या दृष्टान्तामुळे यहुद्यांना विरोध होत असतानाही आपलं काम करत राहायला धैर्य मिळालं. दृष्टान्तात दीपवृक्षाला सतत तेलाचा पुरवठा मिळत होता याकडे तुम्ही लक्ष दिलं का? दीपवृक्षाच्या शेजारी असलेल्या जैतुनाच्या दोन झाडांमधून एका वाटीत तेल पडत होतं. आणि त्या वाटीतून दीपवृक्षाच्या सात दिव्यांना तेल मिळत होतं. आणि त्यामुळे हे दिवे न विझता सतत जळत होते. हा दृष्टान्त पाहून जखऱ्‍याने विचारलं: “या गोष्टींचा काय अर्थ होतो?” तेव्हा स्वर्गदूताने त्याला सांगीतलं: “‘सैन्याच्या बळाने नाही किंवा माणसाच्या ताकदीने नाही, तर माझ्या पवित्र शक्‍तीने हे सगळं घडून येईल,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.” (जख. ४:४, ६) जैतुनाच्या झाडांमधून येणारं ते तेल यहोवाच्या सामर्थ्यशाली पवित्र शक्‍तीला सुचित करतं. दीपवृक्षाला जसा तेलाचा सतत पुरवठा होत होता तसाच यहोवा आपल्या लोकांना सतत पवित्र शक्‍ती पुरवत राहील असा त्याचा अर्थ होतो. देवाच्या पवित्र शक्‍तीसमोर पर्शियाच्या साम्राज्याची किंवा त्याच्या सैन्याची ताकद काहीच नव्हती. यहोवा आपल्या लोकांच्या बाजूने असल्यामुळे कोणताही विरोध आला तरी ते मंदिराचं बांधकाम पूर्ण करतील हे या दृष्टान्तातून स्पष्ट झालं. खरंच, हा किती प्रोत्साहन देणारा दृष्टान्त होता! यहुद्यांना फक्‍त यहोवावर भरवसा ठेवायचा होता आणि कामाला पुन्हा सुरूवात करायची होती. आणि त्यांनी अगदी हेच केलं, त्यांच्या कामावर बंदी असूनही त्यांनी बांधकाम सुरू केलं.

७. कोणत्या घटनेमुळे मंदिराचं बांधकाम करणाऱ्‍या यहुद्यांना दिलासा मिळाला?

मग एक अशी घटना घडली ज्यामुळे मंदिराचं बांधकाम करणाऱ्‍या यहुद्यांना दिलासा मिळाला. ती घटना काय होती? इ.स.पू. ५२० मध्ये पर्शियावर दारयावेश नावाचा नवीन राजा राज्य करत होता. त्याच्या राज्याच्या दुसऱ्‍या वर्षी त्याला असं कळलं की मंदिराच्या बांधकामावर लावलेली बंदी बेकायदेशीर होती. तेव्हा त्याने एक असं फरमान काढलं ज्याचं सगळ्यांनाच आश्‍चर्य वाटलं. त्याने मंदिराचं बांधकाम पूर्ण करण्याचा आदेश दिला. (एज्रा ६:१-३) पण तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने आजूबाजूच्या राष्ट्रांना असा हुकूम दिला की त्यांनी मंदिराच्या बांधकामात कोणताही व्यत्यय आणू नये. उलट, बांधकामासाठी लागणारा खर्च आणि इतर वस्तू त्यांना पुरवाव्यात असा राज्याने हुकूम दिला. (एज्रा ६:७-१२) अशा प्रकारे, इ.स.पू. ५१५ मध्ये म्हणजे जवळपास पाच वर्षांत यहुद्यांनी मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं.—एज्रा ६:१५.

विरोधाचा सामना करत असताना यहोवाच्या पवित्र शक्‍तीवर विसंबून राहा (परिच्छेद ८ पाहा)

८. विरोध झाला तरी तुम्ही धैर्याने यहोवाची सेवा का करत राहू शकता?

आजसुद्धा यहोवाच्या बऱ्‍याच उपासकांना विरोधाचा सामना करावा लागतो. काही साक्षीदार अशा देशांमध्ये राहतात जिथे आपल्या कामावर बंदी आहे. अशा देशांत राहणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींना कधीकधी अटक केली जाते आणि “राज्यपालांच्या आणि राज्यांच्या समोर” नेलं जातं. यामुळे त्या अधिकाऱ्‍यांना साक्ष मिळते. (मत्त. १०:१७, १८) काही वेळा सरकार बदलून नवीन सरकार आलं, तर आपल्या भाऊबहिणींना यहोवाची उपासना करण्याची सूट मिळते. किंवा एखादा प्रामाणिक न्यायाधीश साक्षीदारांच्या बाजूने निर्णय देतो तेव्हा आपल्याला आपलं काम करत राहणं शक्य होतं. पण विरोध नेहमी सरकारी अधिकाऱ्‍यांकडून होतो असं नाही. काही साक्षीदार अशा देशांमध्ये राहतात जिथे त्यांना उपासना करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून विरोधाचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरचे लोक, त्यांना कसंही करून यहोवाची उपासना करण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतात. (मत्त. १०:३२-३६) पण विरोध होत असतानाही जेव्हा आपले भाऊबहीण यहोवाची उपासना करत राहतात, तेव्हा बऱ्‍याच वेळा त्यांच्या कुटुंबातले सदस्य त्यांना विरोध करायचं सोडून देतात. आणि अशीही काही उदाहरणं आहेत, ज्यात पूर्वी तीव्र विरोध करणारे घरचे सदस्यच नंतर साक्षीदार बनले आणि आवेशाने यहोवाची सेवा करू लागले. म्हणून जर तुम्हीही विरोधाचा सामना करत असाल तर निराश होऊ नका, उलट धैर्याने यहोवाची सेवा करत राहा. कारण यहोवा आणि त्याची सामर्थ्यशाली पवित्र शक्‍ती तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाही.

परिस्थिती अचानक बदलते तेव्हा

९. नवीन मंदिराचा पाया घातला जात होता तेव्हा काही यहुदी दुःखी का होते?

नवीन मंदिराचा पाया घातला जात होता तेव्हा यहुद्यांपैकी काही लोक मोठमोठ्याने रडू लागले. (एज्रा ३:१२) ते का रडत होते? कारण शलमोनने बांधलेलं सुंदर मंदिर त्यांनी पाहिलं होतं. आणि त्या मंदिराच्या तुलनेत “हे मंदिर काहीच नाही” असं त्यांना वाटलं. (हाग्ग. २:२, ३) पूर्वीच्या आणि आत्ताच्या मंदिरात किती फरक आहे हे पाहून ते खूप दुःखी झाले. पण त्यांच्या या निराशेवर मात करण्यासाठी जखऱ्‍याच्या दृष्टान्त त्यांना मदत करणार होता. तो कसा?

१०. स्वर्गदूताच्या शब्दांमुळे निराशेवर मात करायला यहुद्यांना कशी मदत झाली?

१० जखऱ्‍या ४:८-१० वाचा. स्वर्गदूताने म्हटलं, की यहुद्यांचा राज्यपाल असलेल्या “जरूब्बाबेलच्या हातात ओळंबा पाहून त्यांना खूप आनंद होईल.” त्याच्या या शब्दांचा काय अर्थ होता? ओळंबा, भिंत सरळ रेषेत बांधली जात आहे की नाही हे पाहण्याचं एक साधन आहे. त्यामुळे स्वर्गदूत देवाच्या लोकांना असं आश्‍वासन देत होता, की जुन्या मंदिराच्या तुलनेत हे नवीन मंदिर जरी सर्वसाधारण वाटत असलं तरी त्याचं बांधकाम नक्की पूर्ण होईल, आणि ते यहोवाच्या स्तरांप्रमाणे असेल. या मंदिरामुळे जर यहोवाला आनंद होणार असेल, तर मग त्यांना का होऊ नये? या नवीन मंदिरात यहोवाच्या अपेक्षांप्रमाणे उपासना केली जाणार होती आणि हेच त्याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. त्या यहुद्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे त्याची उपासना करण्यावर आणि त्याचं मन आनंदित करण्यावर लक्ष देणं महत्त्वाचं होतं. आणि असं केल्यामुळे ते पुन्हा आनंदी होऊ शकत होते.

बदललेल्या परिस्थितीची चांगली बाजू पाहायचा प्रयत्न करा (परिच्छेद ११-१२ पाहा) *

११. आपल्या काही भाऊबहिणींना कोणती गोष्ट कठीण जाते?

११ बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं आपल्यापैकी बऱ्‍याच जणांना कठीण जातं. उदाहरणार्थ, खास पूर्ण वेळेच्या सेवेत बरीच वर्षं सेवा केलेल्या काही भाऊबहिणींची नेमणूक बदलण्यात आली आहे. तर इतर काही जणांना बऱ्‍याच वर्षांपासून केलेली आणि मनापासून आवडणारी जबाबदारी वाढत्या वयामुळे सोडावी लागली आहे. असे बदल होतात तेव्हा वाईट वाटणं साहजिक आहे. असा निर्णय का घेण्यात आला किंवा हा निर्णय बरोबर नव्हता असं कदाचित आपल्याला सुरुवातीला वाटेल. पूर्वीचं जीवन किती चांगलं होतं हे आठवून कदाचित आपण निराश होऊ. आणि आता यहोवासाठी आपण जास्त काही करू शकत नाही असं आपल्याला वाटायला लागेल. (नीति. २४:१०) पण जखऱ्‍याचा दृष्टान्त आपल्याला पूर्वीसारखीच उत्साहाने सेवा करत राहायला कशी मदत करू शकतो?

१२. परिस्थिती बदलते तेव्हासुद्धा आनंदी राहायला जखऱ्‍याच्या दृष्टान्तामुळे आपल्याला कशी मदत होते?

१२ जेव्हा आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा आपल्याला बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं सोपं जातं. आज यहोवा त्याच्या संघटनेत मोठमोठ्या गोष्टी घडवून आणत आहे. आणि त्याचे सहकारी म्हणून काम करण्याचा खास सुहक्क आपल्याला मिळालेला आहे. (१ करिंथ. ३:९) आपल्या जबाबदाऱ्‍या कदाचित बदलत राहतील. पण यहोवाचं आपल्यावर असलेलं प्रेम कधीच बदलणार नाही. म्हणून संघटनेत बदल होतो आणि त्याचा तुमच्यावर परिणाम होतो तेव्हा हे का झालं, कशाला झालं यावर विचार करत बसू नका. “पूर्वीचे दिवस” आठवून दुःखी होण्यापेक्षा, झालेल्या बदलाची चांगली बाजू बघण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. (उप. ७:१०) तुम्ही आता पूर्वीसारख्या कोणत्या गोष्टी करू शकत नाही यावर विचार करण्याऐवजी तुम्ही काय करू शकता यावर विचार करा. जखऱ्‍याच्या दृष्टान्तातून, कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू पाहणं किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला शिकायला मिळतं. असं केल्यामुळे आपली परिस्थिती बदलते तेव्हासुद्धा आपण आनंदी राहू शकतो आणि यहोवाची विश्‍वासाने सेवा करू शकतो.

मार्गदर्शन स्वीकारणं कठीण वाटतं तेव्हा

१३. मंदिराचं बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय चुकीचा आहे असं काही यहुद्यांना का वाटलं असेल?

१३ मंदिराच्या बांधकामावर बंदी घालण्यात आली होती. तरीसुद्धा, आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोवाने ज्यांना नियुक्‍त केलं होतं, म्हणजे महायाजक येशूवा (यहोशवा) आणि राज्यपाल जरूब्बाबेल यांनी देवाचं मंदिर पुन्हा बांधायला सुरुवात केली. (एज्रा ५:१, २) काही यहुद्यांना हा निर्णय चुकीचा वाटला असेल. कारण मंदिराचं बांधकाम शत्रूंपासून लपवता येणार नव्हतं. यहुद्यांना माहीत होतं की त्यांचे शत्रू काहीही करून मंदिराचं बांधकाम बंद पाडायचा प्रयत्न करतील. म्हणून यहोशवा आणि जरूब्बाबेल यांना, आपल्या कामाला यहोवाचा पाठिंबा आहे या गोष्टीची खातरी हवी होती. मग त्यांना ती खातरी कशी मिळाली?

१४. महायाजक यहोशवा आणि राज्यपाल जरूब्बाबेल यांना यहोवाने कोणती खातरी दिली?

१४ जखऱ्‍या ४:१२, १४ वाचा. स्वर्गदूताने जखऱ्‍याला सांगितलं, की दृष्टान्तातली जैतुनाची दोन झाडं ‘दोन अभिषिक्‍तांना’ म्हणजे यहोशवा आणि जरूब्बाबेल यांना सूचित करतात. त्याने सांगितलं की ते दोघं यहोवाजवळ म्हणजे “संपूर्ण पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे” आहेत. यापेक्षा मोठा सन्मान आणखी कोणता असू शकतो! यावरून कळून आलं, की यहोवाचा त्यांच्यावर पूर्ण भरवसा होता. आणि म्हणून त्यांनी कोणतंही मार्गदर्शन दिलं तरी यहुदी लोक त्यांच्यावर भरवसा ठेवू शकत होते. कारण यहोवा आपल्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी त्या दोघांचा उपयोग करत होता.

१५. यहोवाच्या वचनातून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचा आपण आदर करतो हे आपण कसं दाखवू शकतो?

१५ आजही यहोवा आपल्या लोकांना मार्गदर्शन पुरवत आहे. त्याच्या वचनाद्वारे म्हणजेच बायबलद्वारे तो आज आपल्याला सांगतो की आपण त्याची उपासना कशी केली पाहिजे. बायबलमधून मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाचा आपण आदर करतो हे आपण कसं दाखवू शकतो? ते समजून घेण्यासाठी वेळ देऊन आणि त्याकडे बारकाईने लक्ष देऊन आपण हे दाखवू शकतो. स्वतःला हे प्रश्‍न विचारा: ‘बायबल किंवा आपली इतर प्रकाशनं वाचताना मी काही वेळ थांबून वाचलेल्या माहितीवर मनन करतो का? बायबलमधली जी सत्यं समजायला कठीण आहेत त्यांचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी संशोधन करतो का? की मी फक्‍त माहिती घेण्यासाठी वरवर वाचतो?’ (२ पेत्र ३:१६) यहोवा आपल्याला जे शिकवत आहे त्यावर मनन करण्यासाठी आपण वेळ काढला तर आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागणं आणि आपलं प्रचाराचं काम पूर्ण करणं शक्य होईल.—१ तीम. ४:१५, १६.

‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाकडून’ मिळणाऱ्‍या मार्गदर्शनावर भरवसा ठेवा (परिच्छेद १६ पाहा) *

१६. बुद्धिमान दासाकडून मिळालेलं मार्गदर्शन आपल्याला पूर्णपणे समजत नाही तेव्हा आपण काय केलं पाहिजे?

१६ आज यहोवा आपल्याला ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाद्वारे’ मार्गदर्शन पुरवत आहे. (मत्त. २४:४५) काही वेळा बुद्धिमान दासाने दिलेला सल्ला आपल्याला पूर्णपणे समजत नाही. जसं की, हे बांधव कदाचित आपल्याला एखाद्या नैसर्गिक विपत्तीचा सामना कसा करावा याबद्दल काही खास सूचना देतील. पण आपल्याला कदाचित असं वाटेल, की अशा प्रकारची विपत्ती आपल्या भागात येण्याची शक्यता कमी आहे. किंवा महामारीच्या काळात विश्‍वासू आणि बुद्धिमान दास गरजेपेक्षा जास्त खबरदारी घेत आहेत असं कदाचित आपल्याला वाटेल. आपल्याला दिलं जाणारं मार्गदर्शन व्यावहारिक नाही असं आपल्याला वाटलं, तर आपण काय केलं पाहिजे? यहोशवा आणि जरूब्बाबेल यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा त्या काळातल्या यहुद्यांना कसा फायदा झाला याचा आपण विचार करू शकतो. तसंच आपण बायबलमधल्या इतर अहवालांचाही विचार करू शकतो. काही वेळा देवाच्या लोकांना असं मार्गदर्शन देण्यात आलं, जे मानवांच्या दृष्टिकोनातून व्यावहारिक नव्हतं. पण त्याचं पालन केल्यामुळे त्यांचे जीव वाचले.—शास्ते ७:७; ८:१०.

जखऱ्‍याने जे पाहिलं ते पाहण्याचा प्रयत्न करा

१७. दीपवृक्ष आणि जैतुनाच्या दोन झाडांच्या दृष्टान्तामुळे यहुद्यांना कशी मदत झाली?

१७ जखऱ्‍याला दाखवण्यात आलेल्या पाचवा दृष्टान्त लहानसाच असला, तरी त्यामुळे यहुद्यांना त्यांचं काम आणि त्यांची उपासना आवेशाने करत राहायला मदत मिळाली. त्या दृष्टान्तातून त्यांना जे शिकायला मिळालं, त्याप्रमाणे वागल्यामुळे यहोवा किती प्रेमळपणे आपल्याला पाठिंबा आणि मार्गदर्शन देत आहे, हे त्यांना अनुभवायला मिळालं. अशा रितीने यहोवाने त्याच्या सामर्थ्यशाली पवित्र शक्‍तीद्वारे त्यांना त्यांचं काम करत राहायला आणि त्यांचा हरवलेला आनंद परत मिळवायला मदत केली.—एज्रा ६:१६.

१८. जखऱ्‍याच्या दृष्टान्तामुळे तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडायला हवा?

१८ जखऱ्‍याला दिसलेल्या दीपवृक्ष आणि जैतुनाच्या दोन झाडांच्या दृष्टान्तामुळे तुमच्या जीवनावरही जबरदस्त प्रभाव पडू शकतो. हा दृष्टान्त तुम्हाला कशी मदत करेल? तो तुम्हाला विरोधकांचा सामना करण्यासाठी लागणारी ताकद  देईल. तसंच तुमची परिस्थिती अचानक बदलली, तरी तुमचा आनंद  टिकवून ठेवायला तो तुम्हाला मदत करेल. याशिवाय, बुद्धिमान दासाने दिलेल्या मार्गदर्शनाचा उद्देश पूर्णपणे समजत नाही तेव्हासुद्धा त्यांच्यावर भरवसा  ठेवून त्या मार्गदर्शनाप्रमाणे वागायला हा दृष्टान्त तुम्हाला मदत करेल. जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जखऱ्‍याने जे पाहिलं ते पाहायचा प्रयत्न करा. म्हणजेच, यहोवा आपल्या लोकांची किती प्रेमळपणे काळजी घेत आहे याचा पुरावा पाहण्याचा प्रयत्न करा. आणि मग, यहोवावर भरवसा ठेवून पूर्ण मनाने त्याची उपासना करत राहा. (मत्त. २२:३७) जर तुम्ही असं केलं, तर यहोवा तुम्हाला कायम आनंदाने त्याची उपासना करत राहायला मदत करेल.—कलस्सै. १:१०, ११.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

^ परि. 5 जखऱ्‍याच्या काळात देवाचे लोक शुद्ध उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी संघर्ष करत होते. त्या वेळी यहोवाने जखऱ्‍याला बरेच रोमांचक दृष्टान्त दाखवले. या दृष्टान्तांमुळे जखऱ्‍या आणि यहोवाच्या लोकांना त्यांच्यासमोर असलेल्या समस्यांवर आणि अडचणींवर मात करायला खूप हिंमत आणि ताकद मिळाली. आज आपल्यासमोरसुद्धा समस्या आणि अडचणी आहेत. जखऱ्‍याला दाखवलेले दृष्टान्त आज आपल्यालाही यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करायला मदत करू शकतात. या लेखात जखऱ्‍याला दाखवलेल्या, दीपवृक्ष आणि जैतुनाची झाडं असलेल्या दृष्टान्तातून आपल्याला कोणते महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात, ते पाहू या.

^ परि. 3 याच्या काही वर्षांनंतर म्हणजे नहेम्या राज्यपाल होता तेव्हा अर्तहशश्‍त नावाच्याच एका दुसऱ्‍या राज्याने यहुद्यांना मदत केली.

^ परि. 60 चित्रांचं वर्णन: वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे बदललेल्या परिस्थितीशी आपल्याला जुळवून घ्यावं लागेल, असं एका भावाला जाणवतं.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: यहोवाने जसा यहोशवा आणि जरूब्बाबेलला पाठिंबा दिला तसाच तो आज ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासालाही’ पाठिंबा देत आहे, यावर एक बहीण विचार करत आहे.