व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १४

वडिलांनो, प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा

वडिलांनो, प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा

“माझं अनुकरण करा.”—१ करिंथ. ११:१.

गीत ३१ आम्ही यहोवाचे साक्षीदार!

सारांश *

१-२. आज मंडळीतल्या वडीलांना प्रेषित पौलच्या उदाहरणाचा फायदा होऊ शकतो, असं का म्हणता येईल?

 प्रेषित पौलचं आपल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम होतं. त्यांच्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. (प्रे. कार्यं २०:३१) म्हणून मंडळीतले भाऊबहिणसुद्धा त्याच्यावर खूप प्रेम करायचे. एकदा तर इफिसमधल्या वडिलांना जेव्हा कळलं, की पौलची आणि आपली आता भेट होणार नाही, तेव्हा “ते सगळे खूप रडू लागले.” (प्रे. कार्यं २०:३७) आज आपल्या मेहनती वडीलांचंही आपल्या भाऊबहिणींवर खूप प्रेम आहे. आणि त्यांची मदत करण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. (फिलिप्पै. २:१६, १७) पण काही वेळा त्यांना वेगवेगळ्या आव्हानांनाही तोंड द्यावं लागतं. मग अशा आव्हानांवर मात करण्यासाठी कोणती गोष्ट त्यांना मदत करू शकते?

मंडळीतले वडील पौलच्या उदाहरणावर विचार करू शकतात. (१ करिंथ. ११:१) पौल काही स्वर्गदूत नव्हता, ज्याला सगळं काही जमत होतं. तो आपल्यासारखाच एक अपरिपूर्ण व्यक्‍ती होता. योग्य त्या गोष्टी करायला काही वेळा त्यालाही संघर्ष करावा लागायचा. (रोम. ७:१८-२०) त्याला बऱ्‍याच समस्यांनाही तोंड द्यावं लागलं. पण असं असतानाही, भाऊबहिणींसाठी मेहनत घ्यायचं त्याने थांबवलं नाही आणि सेवेतला आपला आनंद कमी होऊ दिला नाही. आज मंडळीतले वडीलसुद्धा त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात आणि सेवेतला आपला आनंद टिकवून ठेवू शकतात. त्यांना हे कसं करता येईल, ते आता आपण पाहू या.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या लेखात आपण अशा चार गोष्टींवर चर्चा करू या, ज्या करणं कदाचित वडिलांना अवघड जाऊ शकतं: (१) इतर जबाबदाऱ्‍यांसोबतच प्रचारकार्यासाठी पुरेसा वेळ काढणं, (२) प्रेमळ मेंढपाळ या नात्याने भाऊबहिणींना उत्तेजन देण्यासाठी वेळ काढणं, (३) स्वतःच्या कमतरतांचा सामना करणं आणि (४) इतरांच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करून, त्यांच्यासोबत काम करणं. प्रेषित पौलने या अडचणींवर कशा प्रकारे मात केली आणि आज वडील त्याच्या उदाहरणाचं कशा प्रकारे अनुकरण करू शकतात, ते आपण पाहू या.

इतर जबाबदाऱ्‍यांसोबतच प्रचारकार्यासाठीही पुरेसा वेळ काढणं

४. प्रचारकार्यात पुढाकार घेणं कधीकधी वडीलांना अवघड का जाऊ शकतं?

हे आव्हान का असू शकतं?  प्रचारकार्यात पुढाकार घेण्यासोबतच वडिलांना मंडळीत इतरही बऱ्‍याच जबाबदाऱ्‍या असतात. उदाहरणार्थ, आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत ते आळीपाळीने अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतात. तसंच, मंडळीचा बायबल अभ्यासही ते चालवतात. ते मंडळीत बरेच भागही सादर करतात. यासोबतच साहाय्यक सेवकांना प्रशिक्षण देण्यात आणि भाऊबहिणींना उत्तेजन देण्यात त्यांचा बराच वेळ जात असतो. (१ पेत्र ५:२) याशिवाय काही वडील, सभागृहाच्या आणि संघटनेच्या इतर बांधकाम प्रकल्पात, त्यांची देखभाल करण्याच्या कामात सहभाग घेत असतात. असं असलं तरी, मंडळीतल्या इतर भाऊबहिणींप्रमाणेच प्रचाराचं काम त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं.—मत्त. २८:१९, २०.

५. प्रचारकार्य करण्याच्या बाबतीत पौलने कशा प्रकारे एक चांगलं उदाहरण मांडलं?

पौलचं उदाहरण.  पौल प्रचारकाची जबाबदारी का चांगल्या प्रकारे पार पाडू शकला, याचं कारण त्याने फिलिप्पैकर १:१० मध्ये सांगितलं आहे. तो म्हणतो: “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.” पौल स्वतः या सल्ल्याप्रमाणे वागला. त्याला प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आणि बरीच दशकं त्याने प्रचाराच्या कामाला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्वं दिलं. त्याने “सार्वजनिक रीत्या आणि घरोघरी” जाऊन प्रचार केला. (प्रे. कार्यं २०:२०) त्याने फक्‍त आठवड्याच्या एखाद-दिवशी किंवा दिवसाच्या एका ठराविक वेळेलाच प्रचारकार्य केलं नाही. तर मिळणाऱ्‍या प्रत्येक संधीचा त्याने वापर केला. उदाहरणार्थ अथेन्समध्ये आपल्या बांधवांची वाट पाहत असतानासुद्धा त्याने प्रचार केला. त्याने तिथे असलेल्या अधिकाऱ्‍यांना आणि जबाबदारीच्या पदावर असलेल्या काही लोकांना प्रचार केला. आणि त्यांच्यातल्या काही जणांनी त्याला चांगला प्रतिसादही दिला. (प्रे. कार्यं १७:१६, १७, ३४) इतकंच नाही, तर तुरुंगात असतानाही त्याने इतरांना साक्ष दिली.—फिलिप्पै. १:१३, १४; प्रे. कार्यं २८:१६-२४.

६. पौलने बांधवांना कोणतं प्रशिक्षण दिलं?

पौलने त्याच्या वेळचा चांगला उपयोग केला. तो बऱ्‍याच वेळा इतरांनाही त्याच्यासोबत प्रचारकार्य करायला बोलवायचा. उदाहरणार्थ, त्याने आपल्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍यात मार्क म्हटलेल्या योहानला आपल्यासोबत घेतलं. आणि दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यात तीमथ्यला घेतलं. (प्रे. कार्यं १२:२५; १६:१-४) पण यासोबतच त्याने मंडळीतल्या जबाबदाऱ्‍या कशा पार पाडायच्या, मेंढपाळ भेटी देऊन भाऊबहिणींची काळजी कशी घ्यायची, आणि एक प्रभावी शिक्षक कसं बनता येईल याबद्दलही त्यांना नक्कीच शिकवलं असेल, यात शंका नाही.—१ करिंथ. ४:१७.

प्रचार करण्यासाठी नेहमी तयार असण्याद्वारे पौलचं अनुकरण करा (परिच्छेद ७ पाहा) *

७. इफिसकर ६:१४, १५ मध्ये पौलने दिलेला सल्ला वडील कसा लागू करू शकतात?

वडील काय शिकू शकतात?  प्रेषित पौलसारखंच मंडळीतले वडीलसुद्धा घरोघरच्या प्रचारकार्यातच नाही तर इतर वेळीही देवाच्या राज्याचा संदेश सांगू शकतात. (इफिसकर ६:१४, १५ वाचा.) उदाहरणार्थ, ते बाजारात गेल्यावर किंवा कामाच्या ठिकाणी इतरांना साक्ष देऊ शकतात. तसंच, ते संघटनेच्या बांधकाम प्रकल्पात काम करत असताना शेजारपाजारच्या लोकांना आणि ज्यांच्याकडून ते बांधकामाचं साहित्य घेतात, त्यांनासुद्धा प्रचार करू शकतात. यासोबतच, पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करून, ते प्रचारकार्यात साहाय्यक सेवकांना आणि इतरांना प्रशिक्षण देऊ शकतात.

८. कधीकधी वडिलांना काय करावं लागू शकतं?

वडिलांनी मंडळीच्या किंवा संघटनेच्या इतर कामांमध्ये इतकं व्यस्त असू नये, की ज्यामुळे त्यांना प्रचारकार्यासाठी वेळ मिळणार नाही. म्हणून प्रचारकार्यात आणि इतर जबाबदाऱ्‍यांमध्ये योग्य तो समतोल राखण्यासाठी ते कदाचित काही जबाबदाऱ्‍यांना नाही म्हणू शकतात. कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याआधी वडील प्रार्थनापूर्वक विचार करू शकतात, की ‘जबाबदारी स्वीकारल्यानंतर मला जास्त महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ देता येईल का? जसं की, दर आठवडी कौटुंबिक उपासना करणं, प्रचारकार्यात आवेशाने सहभाग घेणं आणि मुलांना प्रचारकार्याचं प्रशिक्षण देणं?’ काही वडिलांना जबाबदाऱ्‍यांना ‘नाही’ म्हणणं कठीण जाऊ शकतं. पण तुम्ही याची खातरी बाळगू शकता, की जेव्हा तुम्ही जास्त महत्त्वाच्या गोष्टी करता याव्यात म्हणून काही जबाबदाऱ्‍यांना नाही म्हणता तेव्हा यहोवा ते समजून घेतो.

प्रेमळ मेंढपाळ या नात्याने आपली जबाबदारी पार पाडणं

९. इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे वडिलांना कोणती गोष्ट करायला कठीण जाऊ शकतं?

हे आव्हान का असू शकतं?  या शेवटल्या काळात यहोवाच्या लोकांना बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. म्हणून आपल्या सगळ्यांनाच प्रोत्साहनाची, मदतीची आणि सांत्वनाची गरज पडते. तसंच, भाऊबहिणींच्या हातून काही चुकीचं होऊ नये म्हणूनसुद्धा त्यांना मदत करायची गरज पडू शकते. (१ थेस्सलनी. ५:१४) हे खरं आहे, की भाऊबहिणींना तोंड द्याव्या लागणाऱ्‍या प्रत्येक समस्यांना वडील सोडवू शकत नाहीत. तरीसुद्धा आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी वडिलांना जे काही करता येईल ते त्यांनी करावं असं यहोवाला वाटतं. मग इतर गोष्टींमध्ये व्यस्त असतानाही वडील या गोष्टींसाठी कसा वेळ काढू शकतात?

इतरांची प्रशंसा करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या (परिच्छेद १०, १२ पाहा) *

१०. पौलने भाऊबहिणींची काळजी कशी घेतली? (१ थेस्सलनीकाकर २:७)

१० पौलचं उदाहरण.  आपल्या भाऊबहिणींची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पौल नेहमी तयार असायचा. आज वडीलसुद्धा प्रेषित पौलच्या या उदाहरणाचं अनुकरण करून मंडळीतल्या भाऊबहिणींना प्रेम आणि आपुलकी दाखवू शकतात. (१ थेस्सलनीकाकर २:७ वाचा.) मंडळीतल्या भाऊबहिणींवर आपलं आणि यहोवाचं किती प्रेम आहे या गोष्टीची जाणीव पौलने त्यांना करून दिली. (२ करिंथ. २:४; इफिस. २:४, ५) त्याने भाऊबहिणींना आपल्या मित्रासारखं समजलं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. तो त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलला. त्याने आपल्या चिंता आणि कमतरता त्यांना सांगितल्या. आणि असं करून त्याचा त्यांच्यावर किती भरवसा आहे, हे त्याने दाखवलं. (२ करिंथ. ७:५; १ तीम. १:१५) पण पौलने आपल्या समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या भाऊबहिणींना मदत करायचा प्रयत्न केला.

११. पौलने आपल्या भाऊबहिणींना सल्ला का दिला?

११ पौलला काही वेळा आपल्या भाऊबहिणींना सल्ला द्यायची गरज पडली. पण त्याने कधीही त्यांना वैतागून किंवा रागावून सल्ला दिला नाही. उलट त्याला त्यांची काळजी असल्यामुळे आणि त्यांना धोक्यापासून वाचवण्याची इच्छा असल्यामुळे त्याने प्रेमळपणे त्यांना सल्ला दिला. त्याने त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सल्ला द्यायचा प्रयत्न केला. आणि भाऊबहीण या सल्ल्याला कसा प्रतिसाद देत आहेत, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, करिंथ मंडळीला त्याने पत्र लिहिलं आणि त्यांना कडक शब्दात सल्ला दिला. आणि हे पत्र पाठवल्यानंतर त्याने तीतला त्या मंडळीत पाठवलं. कारण हा सल्ला मिळाल्यानंतर भाऊबहिणींनी काय केलं, हे त्याला जाणून घ्यायचं होतं. जेव्हा त्याला समजलं, की मंडळीतल्या भाऊबहिणींनी त्याचा सल्ला स्वीकारला आहे, तेव्हा त्याला नक्कीच खूप आनंद झाला असेल.—२ करिंथ. ७:६, ७.

१२. वडील कशाप्रकारे भाऊबहिणींना प्रोत्साहन देऊ शकतात?

१२ वडील काय शिकू शकतात?  आज वडीलसुद्धा पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवू शकतात. असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, भाऊबहिणींशी चांगलं बोलता यावं म्हणून ते सभेला थोडं लवकर येऊ शकतात. एखाद्या भावाला किंवा बहिणीला हवं असलेलं प्रोत्साहन देण्यासाठी काही मिनिटंच हवी असतात. (रोम. १:१२; इफिस. ५:१६) तसंच, पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करून वडील भाऊबहिणींचा विश्‍वास वाढण्यासाठी बायबलची काही वचनं त्यांना दाखवू शकतात. आणि यहोवाचं त्यांच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव त्यांना करून देऊ शकतात. यासोबतच, त्यांचंही भाऊबहिणींवर किती प्रेम आहे हे त्यांना व्यक्‍त करू शकतात. ते नेहमी त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात आणि वेळोवेळी त्यांची प्रशंसा करतात. जेव्हा-जेव्हा त्यांना भाऊबहिणींना सल्ला देण्याची गरज पडते, तेव्हा ते तो देवाच्या वचनाच्या आधारावर देतात. तसंच, भाऊबहिणींना सल्ला स्वीकारता यावा म्हणून ते तो स्पष्टपणे पण सौम्यतेने देण्याचा प्रयत्न करतात.—गलती. ६:१.

स्वतःच्या कमतरतांचा सामना करणं

१३. आपल्या कमतरतांबद्दल वडिलांना कसं वाटू शकतं?

१३ हे आव्हान का असू शकतं?  वडीलसुद्धा आपल्यासारखेच अपरिपूर्ण आहेत. त्यांच्या हातूनसुद्धा चुका होऊ शकतात. (रोम. ३:२३) त्यामुळे कधीकधी त्यांना आपल्या कमतरतांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवणं अवघड जाऊ शकतं. आपल्या कमतरतांचा विचार करून कदाचित त्यांच्यापैकी काहीजण निराश होतील. तर काही जण कदाचित आपल्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतील आणि आपल्याला बदल करायची काहीच गरज नाही असं त्यांना वाटेल.

१४. फिलिप्पैकर ४:१३ प्रमाणे आपल्या कमतरतांचा सामना करण्यासाठी पौलला कशामुळे मदत झाली?

१४ पौलचं उदाहरण.  पौल नम्र होता. त्यामुळे आपल्या कमतरतांवर मात करण्यासाठी आपल्याला फक्‍त स्वतःच्या ताकदीवरच नाही तर देवाच्या मदतीवर अवलंबून रहावं लागेल हे त्याला माहीत होतं. आधी तो ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा उद्धट स्वभावाचा माणूस होता. पण नंतर त्याला कळलं, की हे चुकीचं होतं आणि म्हणून त्याने स्वतःमध्ये बदल केले. (१ तीम. १:१२-१६) यहोवाच्या मदतीने तो एक नम्र, प्रेमळ आणि दयाळू वडील बनला. त्याला आपल्या कमतरतांची जाणीव होती. पण त्यावर विचार करत बसण्याऐवजी यहोवा आपल्याला माफ करेल या गोष्टीवर त्याने भरवसा ठेवला. (रोम. ७:२१-२५) त्याने स्वतःबद्दल कधीच अवाजवी अपेक्षा ठेवल्या नाहीत. उलट स्वतःमध्ये ख्रिस्ती गुण उत्पन्‍न करण्यासाठी त्याने मेहनत घेतली. आणि आपली सेवा पूर्ण करण्यासाठी तो नम्रपणे यहोवावर विसंबून राहिला.—१ करिंथ. ९:२७; फिलिप्पैकर ४:१३ वाचा.

व्यक्‍तिगत कमतरतांवर मात करण्यासाठी मेहनत घ्या (परिच्छेद १४-१५ पाहा) *

१५. स्वतःच्या कमतरतांचा सामना करत असताना वडिलांनी काय केलं पाहिजे?

१५ वडील काय शिकू शकतात?  वडील अपरिपूर्ण असल्यामुळे त्यांनी आपल्या चुका मान्य कराव्यात आणि स्वतःमध्ये सुधारणा करून, ख्रिस्ती व्यक्‍तिमत्वं विकसित करत राहावं अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो. (इफिस. ४:२३, २४) त्यांनी देवाच्या वचनाचा अभ्यास करून स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे आणि गरज असेल त्या ठिकाणी सुधारणा केली पाहिजे. असं केल्यामुळे आनंदी राहायला आणि वडील या नात्याने आपली जबाबदारी पूर्ण करायला यहोवा त्यांना मदत करेल.—याको. १:२५.

इतरांच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यासोबत काम करणं

१६. वडिलांनी इतरांच्या कमतरतांवर जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं?

१६ हे आव्हान का असू शकतं?  वडील जेव्हा मंडळीतल्या भाऊबहिणींसोबत मिळून वेळ घालवतात, त्यांच्यासोबत मिळून काम करतात तेव्हा त्यांच्या कमतरतासुद्धा त्यांना स्पष्टपणे दिसू लागतात. अशा वेळेस त्यांच्यासोबत वागताना जर त्यांनी काळजी घेतली नाही, तर त्यांना राग येऊ शकतो, ते कठोरपणे वागू शकतात, त्यांच्याबद्दल चुकीचा ग्रह करून घेऊ शकतात किंवा त्यांचे दोष काढू शकतात. त्यांनी असंच करावं अशी सैतानाची इच्छा आहे. म्हणूनच, पौलने ख्रिश्‍चनांना याबाबतीत सावध केलं होतं.—२ करिंथ. २:१०, ११.

१७. भाऊबहिणींबद्दल पौलचा दृष्टिकोन कसा होता?

१७ पौलचं उदाहरण.  पौलला आपल्या भाऊबहिणींच्या कमतरता माहीत होत्या. कारण काही वेळा त्याला स्वतःला सुद्धा त्यांच्या चुकांची झळ बसली होती. पण तरीसुद्धा पौलने त्यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. त्यांनी जरी चुका केल्या, तरी ते मुळात वाईट नाहीत या गोष्टीची त्याला जाणीव होती. त्याचं आपल्या भाऊबहिणींवर प्रेम होतं आणि त्यांच्या चांगल्या गुणांकडे त्याने लक्ष दिलं. त्याला माहीत होतं, की योग्य ते करणं भाऊबहिणींना कठीण जात असलं तरी स्वतःमध्ये बदल करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठी त्यांना फक्‍त मदतीची गरज आहे.

१८. युवदीया आणि सुंतुखेसोबत पौल ज्याप्रकारे वागला त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (फिलिप्पैकर ४:१-३)

१८ फिलिप्पै इथल्या दोन बहिणींमध्ये म्हणजे युवदीया आणि सुंतुखे यांच्यामध्ये वाद झाला तेव्हा पौलने काय केलं त्याचा विचार करा. (फिलिप्पैकर ४:१-३ वाचा.) त्यांच्यात मतभेद असल्यामुळे त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. पण पौल त्यांच्यावर रागावला नाही किंवा त्याने त्यांची टीका केली नाही. तर त्याने त्यांच्यातले चांगले गुण पाहिले. पौलला माहीत होतं की या दोघींनीही बराच काळ विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली होती. आणि यहोवाचं त्यांच्यावर प्रेम आहे हे पण त्याला माहीत होतं. म्हणून त्याने त्यांना आपसातले वाद मिटवण्याचं प्रोत्साहन दिलं. अशा प्रकारे भाऊबहिणींबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगल्यामुळे, त्याला आनंदी राहायला आणि भाऊबहिणींसोबत आपलं नातं टिकवून ठेवायला मदत झाली.

इतरांबद्दल टिकात्मक दृष्टिकोन ठेवू नका (परिच्छेद १९ पाहा) *

१९. (क) वडील भाऊबहिणींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवू शकतात? (ख) या परिच्छेदासाठी असलेल्या चित्रातून तुम्हाला काय शिकायला मिळतं?

१९ वडील काय शिकू शकतात?  वडिलांनो, भाऊबहिणींमध्ये असलेले चांगले गुण पाहण्याचा प्रयत्न करा. मंडळीतला प्रत्येक जण अपरिपूर्ण जरी असला, तरी त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये बरेच चांगले गुण आहेत ज्यांची आपण कदर करू शकतो. (फिलिप्पै. २:३) हे खरं आहे, की वडिलांना मंडळीतल्या भाऊबहिणींच्या विचारसरणीत सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी मदत करावी लागते. म्हणून ते पौलसारखंच त्यांच्या बारीकसारीक चुकांकडे लक्ष देत नाहीत. ते नेहमी लक्षात ठेवतात, की भाऊबहिणींचं यहोवावर प्रेम आहे. तेही यहोवाची सेवा करत आहेत आणि योग्य ते करण्यासाठी ते स्वतःमध्ये बदल करायला तयार आहेत. अशा प्रकारे वडील जेव्हा इतरांच्या चांगल्या गुणांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मंडळीमध्ये प्रेम आणि एकता वाढते.

पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करत राहा

२०. पौलच्या उदाहरणातून शिकण्यासाठी वडील आणखी काय करू शकतात?

२० पौलच्या उदाहरणाचा आणखी अभ्यास केल्यामुळे वडिलांनो तुम्हाला नक्कीच खूप मदत होईल. उदाहरणार्थ, देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या  या पुस्तकात आणि टेहळणी बुरूज  अंकात पौलच्या उदाहरणातून शिकता येईल अशी बरीच माहिती तुम्हाला मिळू शकते. * ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही स्वतःला विचारू शकता, ‘वडील म्हणून आनंदाने सेवा करण्यासाठी मला पौलच्या उदाहरणातून कशी मदत होऊ शकते?’

२१. वडील कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतात?

२१ वडीलांनो नेहमी लक्षात ठेवा, की यहोवा तुमच्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करत नाही. तुम्ही फक्‍त त्याला विश्‍वासू राहावं असं त्याला वाटतं. (१ करिंथ. ४:२) पौल यहोवाला विश्‍वासू राहिला आणि त्याने सेवेत मेहनत घेतली. आणि यहोवाला या गोष्टीचा आनंद होता. तुम्हीही त्याच्या सेवेत जे काही करायचा प्रयत्न करत आहात त्याची तो कदर करतो या गोष्टीची नेहमी खातरी बाळगा. यहोवाला माहीत आहे, की “तुम्ही पवित्र जनांची सेवा केली आणि अजूनही करत आहात.” म्हणूनच “तुमचं काम आणि देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेलं प्रेम” तो कधीच विसरणार नाही.—इब्री ६:१०.

गीत २० आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

^ परि. 5 मंडळीत प्रेमळ, मेहनती आणि काळजी घेणारे वडील असणं हा खरंच यहोवाकडून एक आशीर्वाद आहे! या लेखात वडिलांना सामना कराव्या लागणाऱ्‍या अशा चार आव्हानांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना प्रेषित पौलच्या उदाहरणातून कशी मदत होऊ शकते तेही आपण पाहणार आहोत. या लेखामुळे आपल्या सगळ्यांनाच वडिलांबद्दल सहानुभूती बाळगायला, त्यांना प्रेम दाखवायला आणि त्यांचं काम हलकं करायला मदत होईल.

^ परि. 20 साक्ष द्या  अध्या. १२ ¶१७-१९; अध्या. १४ ¶१-४; अध्या. १४ ¶८-१०; अध्या. २१ ¶६-७; टेहळणी बुरूज८७  ४/१ १६ ¶२; टे.बु.८७  १२/१ २५-२६ ¶१३-१६; टे.बु.९७  ८/१ १७-१९ ¶१०-१७; टे.बु.९७  ८/१ २८ ¶७-१३; टे.बु.११ ६/१५ २० ¶१-५; अभ्यास लेख माहितीपत्रक,  १९९४, पृ. ४८-५०

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: कामावरून घरी जात असताना एक भाऊ आपल्या सहकर्मचाऱ्‍याला देवाच्या राज्याबद्दल सांगत आहे.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: एक वडील एकटं-एकटं राहणाऱ्‍या एका भावाची प्रेमळपणे विचारपूस करत आहेत.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: एक भाऊ कोणत्यातरी गोष्टीला घेऊन नाराज आहे आणि वडील त्याला प्रेमाने सल्ला देत आहेत.

^ परि. 68 चित्रांचं वर्णन: एक भाऊ स्वेच्छेने काम करत आहे. पण काम करताना त्याचं लक्ष दुसरीकडे जातं, तरीसुद्धा वडील ते पाहून चिडत नाहीत.