व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण चिंतेचा सामना करताना मन शांत कसं ठेवू शकतो?

आपण चिंतेचा सामना करताना मन शांत कसं ठेवू शकतो?

चिंतांमुळे आपण पार खचून जाऊ शकतो. (नीति. १२:२५) असं कधी तुमच्या बाबतीत घडलं आहे का? ‘हे सगळं माझ्या सहन शक्‍तीपलीकडे आहे,’ असं तुम्हाला वाटलं आहे का? आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी असं वाटलं असेल. याची वेगवेगळी कारणं असू शकतात. कोणी कुटुंबातल्या आजारी व्यक्‍तीचा सांभाळ करत असेल, कोणी जवळच्या व्यक्‍तीला मृत्यूमध्ये गमावलं असेल, कोणी नैसर्गिक आपत्तीचा किंवा इतर कोणत्यातरी समस्येचा सामना केला असेल. या सगळ्यामुळे आपण मनाने आणि शरीराने थकून गेलो असू आणि आणखी सहन करायची शक्‍ती आपल्यात उरली नाही असं आपल्याला वाटत असेल. पण अशा वेळी मन शांत ठेवून आपण चिंतेचा सामना कसा करू शकतो? a

चिंतेचा सामना कसा करायचा याबद्दल दावीद राजाच्या उदाहरणातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. त्याच्या जीवनात बरेच चढ-उतार आले आणि काही वेळा तर त्याच्या जिवालाही धोका होता. (१ शमु. १७:३४, ३५; १८:१०, ११) पण या सगळ्या चिंतांचा दावीदने कसा सामना केला? आणि त्याच्याकडून आपण काय शिकू शकतो?

दावीदने चिंतांचा सामना कसा केला?

दावीदच्या जीवनात एकाच वेळी बऱ्‍याच समस्या आल्या. एका प्रसंगाचा विचार करा. दावीद शौल राजापासून आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता, त्या वेळेची ही घटना आहे. एकदा दावीद आणि त्याची माणसं युद्धावरून परत आली तेव्हा जे काही घडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला! शत्रूंनी त्यांची मालमत्ता लुटली होती, त्यांची घरदारं जाळून टाकली होती आणि त्यांच्या बायका-मुलांना कैद करून नेलं होतं. त्यामुळे दावीदला आणि त्याच्या माणसांना खूप दुःख झालं. बायबल म्हणत, “दावीद आणि त्याच्यासोबतचे लोक मोठमोठ्याने रडू लागले. ते इतके रडले की त्यांच्यात आणखी रडण्याची शक्‍ती उरली नाही.” त्यात भर म्हणजे, दावीदच्या विश्‍वासातली माणसंही त्याला ‘दगडमार करायच्या गोष्टी करू लागली.’ (१ शमु. ३०:१-६) दावीदसमोर एकाच वेळी तीन मोठमोठ्या समस्या आल्या. त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव धोक्यात होता, त्याची स्वतःची माणसं त्याला मारून टाकतील अशी भीती त्याला होती, शिवाय शौल राजा अजूनही त्याचा पिच्छा करत होता. दावीद चिंतेत किती बुडून गेला असेल याची नक्कीच आपण कल्पना करू शकतो!

मग दावीदने काय केलं? तो लगेच “मदतीसाठी आपला देव यहोवा याच्याकडे वळला आणि त्याला बळ मिळालं.” नेहमीप्रमाणे दावीदने यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली, आणि पूर्वी यहोवाने आपल्याला कशा प्रकारे मदत केली होती हे त्याने आठवलं. (१ शमु. १७:३७; स्तो. १८:२, ६) तसंच, आपल्याला यहोवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे हे ओळखून पुढे काय करायचं याबद्दल त्याने यहोवाचा सल्ला घेतला. आणि मार्गदर्शन मिळाल्यावर त्याने लगेच पाऊल उचललं. याचा परिणाम असा झाला, की यहोवाच्या मदतीने दावीद आणि त्याची माणसं आपली मालमत्ता परत मिळवू शकले आणि आपल्या कुटुंबाला सोडवू शकले. (१ शमु. ३०:७-९, १८, १९) दावीदने कोणत्या तीन गोष्टी केल्या याकडे तुम्ही लक्ष दिलं का? त्याने मदतीसाठी यहोवाला प्रार्थना केली,  यहोवाने पूर्वी आपल्याला कशी मदत केली होती ते त्याने आठवलं  आणि यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे लगेच पाऊल उचललं.  दावीदप्रमाणे आपणही या तीन गोष्टी कशा करू शकतो ते आता पाहू या.

दावीदने केला तसा चिंतेचा सामना करा

१. प्रार्थना करा. आपल्याला जर चिंतांनी घेरलं, तर आपण मदतीसाठी आणि बुद्धीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकतो. प्रार्थनेत आपण मनमोकळेपणाने यहोवाला सगळं काही सांगू शकतो. पण काही वेळा परिस्थितीमुळे अशा प्रकारे बराच वेळ प्रार्थना करणं आपल्याला शक्य नसेल, तर आपण मनातल्या मनात एक छोटीशी प्रार्थना करू शकतो. आपण मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करतो तेव्हा दावीदसारखाच आपला त्याच्यावर भरवसा आहे हे दिसून येतं. दावीदने म्हटलं, “यहोवा माझा खडक आणि माझा मजबूत गड आहे, तोच मला वाचवतो. माझा देव माझा खडक आहे, मी त्याचा आश्रय घेतलाय.” (स्तो. १८:२) पण प्रार्थनेमुळे खरंच काही फरक पडतो का? याबद्दल कॉलिया नावाची एक पायनियर बहीण काय म्हणते त्याचा विचार करा. ती म्हणते, “प्रार्थना केल्यावर माझं मन शांत होतं. यहोवा जसा विचार करतो तसा मी विचार करू लागते आणि त्याच्यावरचा माझा भरवसा आणखी वाढतो.” खरंच, प्रार्थनेत खूप ताकद आहे. त्यामुळे आपल्याला चिंतेचा सामना करायला मदत होते आणि याबद्दल आपण यहोवाचे खूप आभारी आहोत.

२. आठवा.  तुमच्या आयुष्यातल्या अशा काही परीक्षा तुम्हाला आठवतात का, ज्यांचा यहोवाच्या मदतीने तुम्ही सामना करू शकला आहात? यहोवाने आपल्याला आणि प्राचीन काळातल्या त्याच्या सेवकांना कशी मदत केली याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपल्याला खूप बळ मिळतं. आणि तो पुढेसुद्धा आपल्याला अशीच मदत करत राहील हा भरवसाही वाढतो. (स्तो. १८:१७-१९) जोशूआ नावाचे मंडळीतले एक वडील म्हणतात, “आजपर्यंत यहोवाने माझ्या अनेक प्रार्थनांची उत्तरं दिली. त्या सगळ्यांची मी एक यादीच बनवली आहे. त्यामुळे मी यहोवाकडे जे काही मागीतलं होतं ते त्याने मला कसं दिलं, हे नेहमी लक्षात ठेवायला मला मदत होते.” खरंच, आजपर्यंत यहोवाने आपल्यासाठी काय-काय केलं आहे ते आपण आठवतो, तेव्हा चिंतेचा चांगल्या प्रकारे सामना करण्यासाठी आपल्याला आणखी ताकद मिळते.

३. पाऊल उचला.  एखाद्या परिस्थितीत काय करायचं ते ठरवण्याआधी बायबलमध्ये काय सांगितलं आहे ते पाहा. कारण बायबलमधला सल्ला सगळ्यात भरवशालायक आहे. (स्तो. १९:७, ११) बऱ्‍याच जणांनी अनुभवलं आहे, की एखाद्या वचनाबद्दल आपल्या प्रकाशनांत संशोधन केल्यामुळे ते वचन जीवनात कसं लागू होऊ शकतं हे त्यांना आणखी चांगल्या प्रकारे समजलं आहे. जॅरेड नावाचे मंडळीतले एक वडील म्हणतात: “संशोधन केल्यामुळे मला एखादं वचन आणखी चांगलं समजतं आणि त्यातून यहोवाला मला काय सांगायचं आहे हेसुद्धा कळतं. त्यामुळे ती गोष्ट माझ्या मनात पक्की बसते आणि त्याप्रमाणे पाऊल उचलायला मला मदत होते.” त्याच प्रकारे, आपण जेव्हा बायबलमधून यहोवाचं मार्गदर्शन घेतो आणि पावलं उचलतो, तेव्हा मन शांत ठेवून चिंतांचा सामना करायला आपल्याला मदत होऊ शकते.

चिंतेचा सामना करायला यहोवा तुम्हाला मदत करेल

दावीदला माहीत होतं की आपण यहोवाच्या मदतीने कोणत्याही चिंतेचा सामना करू शकतो. देवाच्या मदतीची त्याला इतकी कदर होती की तो म्हणाला: “देवाच्या सामर्थ्याने मी तट ओलांडू शकतो . . . खरा देवच माझ्यावर सामर्थ्याचं वस्त्र पांघरतो.” (स्तो. १८:२९, ३२) कधीकधी जीवनात येणाऱ्‍या समस्या उंच तटासारख्या, भिंतीसारख्या आहेत आणि त्या आपल्याला पार करता येणार नाहीत असं कदाचित आपल्याला वाटेल. पण समस्या कितीही मोठ्या असल्या तरी यहोवाच्या मदतीने आपण त्यांचा सामना करू शकतो. आपण जेव्हा मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करतो,  त्याने आपल्यासाठी जे काही केलं आहे ते आठवतो  आणि त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे पाऊल उचलतो  तेव्हा आपण एका गोष्टीची खातरी बाळगू शकतो. ती म्हणजे, चिंतेचा सामना करण्यासाठी तो आपल्याला बुद्धी आणि बळ नक्कीच देईल!

a एखादी व्यक्‍ती जर बऱ्‍याच काळापासून तीव्र चिंतेचा सामना करत असेल, तर तिला वैद्यकीय उपचारांची गरज पडू शकते.