व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १८

तुम्ही आध्यात्मिक ध्येयं कशी ठेवू शकता आणि ती कशी गाठू शकता?

तुम्ही आध्यात्मिक ध्येयं कशी ठेवू शकता आणि ती कशी गाठू शकता?

“या गोष्टींबद्दल खोलवर विचार करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल.”—१ तीमथ्य ४:१५.

गीत ४० पहिल्याने राज्यासाठी झटा!

सारांश a

१. आपण कोणती आध्यात्मिक ध्येयं ठेवू शकतो?

 खरे ख्रिस्ती या नात्याने आपलं यहोवावर खूप प्रेम आहे. म्हणूनच पूर्ण जीव ओतून आपण त्याची सेवा करावी अशी आपली इच्छा आहे. पण असं करण्यासाठी आपल्याला काही ख्रिस्ती गुण वाढवणं, यहोवाच्या सेवेत उपयोगी पडतील अशी कौशल्यं शिकून घेणं आणि वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या भाऊबहिणींची मदत करणं, यांसारखी काही आध्यात्मिक ध्येयं ठेवावी लागतील. b

२. आपण आध्यात्मिक ध्येयं ठेवून ती गाठण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?

आध्यात्मिक ध्येयं ठेवून आपण ती गाठण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, आपलं आपल्या स्वर्गातल्या पित्यावर प्रेम आहे. आणि आपण जेव्हा त्याच्या सेवेत आपल्या कौशल्यांचा आणि क्षमतेचा पुरेपूर वापर करतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तसंच, आपल्या भाऊबहिणींची मदत करायची आपली मनापासून इच्छा असल्यामुळे आपण आध्यात्मिक ध्येयं ठेवतो आणि गाठण्याचा प्रयत्न करतो. (१ थेस्सलनी. ४:९, १०) आपण सत्यात कितीही वर्षांपासून असलो, तरी आपण आध्यात्मिक ध्येयं ठेवून ती गाठण्याचा प्रयत्न करू शकतो. हे कसं करता येईल ते आता पाहू या.

३. १ तीमथ्य ४:१२-१६ मध्ये सांगितल्याप्रमाणे पौलने तीमथ्यला काय करण्याचं प्रोत्साहन दिलं?

प्रेषित पौलने जेव्हा तीमथ्यला पहिलं पत्र लिहिलं, तेव्हा तीमथ्य एक अनुभवी वडील होता. पण तरीही पौलने त्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रगती करत राहण्याचं प्रोत्साहन दिलं. (१ तीमथ्य ४:१२-१६ वाचा.) पौलच्या शब्दांकडे लक्ष दिलं तर आपल्याला असं दिसून येईल, की तीमथ्यला त्याने दोन गोष्टींमध्ये प्रगती करायला सांगितली. एक म्हणजे, प्रेम, विश्‍वास आणि शुद्धता यांसारखे ख्रिस्ती गुण वाढवण्यासाठी त्याने त्याला सांगितलं. आणि दुसरं म्हणजे, सार्वजनिक वाचन करणं, इतरांना मार्गदर्शन देणं आणि शिकवणं यांसारखी कौशल्यं वाढवण्यासाठी त्याने त्याला प्रोत्साहन दिलं. तेव्हा तीमथ्यचं उदाहरण लक्षात घेऊन आपल्यालाही साध्य करता येतील अशी ध्येयं आपण कशी ठेवू शकतो आणि आध्यात्मिक प्रगती कशी करू शकतो ते आता आपण पाहू या. तसंच, वेगवेगळ्या मार्गांनी आपण आपली सेवा कशी वाढवू शकतो, हेसुद्धा पाहू या.

ख्रिस्ती गुण वाढवा

४. फिलिप्पैकर २:१९-२२ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या गोष्टींमुळे तीमथ्य यहोवाचा चांगला सेवक बनला?

तीमथ्यमध्ये काही उल्लेखनीय ख्रिस्ती गुण होते. त्यामुळेच तो यहोवाचा चांगला सेवक बनू शकला. (फिलिप्पैकर २:१९-२२ वाचा.) पौलने त्याच्याविषयी जे लिहिलं त्यावरून कळतं, की तो नम्र, एकनिष्ठ, मेहनती आणि भरवशालायक होता. तो प्रेमळ स्वभावाचा होता आणि त्याला भाऊबहिणींची मनापासून काळजी होती. म्हणूनच पौलचा तीमथ्यवर भरवसा होता आणि त्यामुळेच त्याने त्याला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्‍या दिल्या. (१ करिंथ. ४:१७) त्याचप्रमाणे, आपणही जेव्हा स्वतःमध्ये ख्रिस्ती गुण वाढवतो, तेव्हा यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि मंडळीतल्या भाऊबहिणींनाही आपला फायदा होतो.—स्तो. २५:९; १३८:६.

तुम्हाला स्वतःमध्ये वाढवावासा वाटतो असा एखादा ख्रिस्ती गुण निवडा (परिच्छेद ५-६ पाहा)

५. (क) तुम्हाला कोणता ख्रिस्ती गुण स्वतःमध्ये वाढवायचा आहे, हे तुम्ही कसं ठरवू शकता? (ख) चित्रात दाखवल्याप्रमाणे, एक तरूण बहीण सहानुभूती दाखवण्याच्या तिच्या ध्येयावर कशा प्रकारे काम करत आहे?

विशिष्ट ध्येय ठेवा.  तुम्हाला स्वतःमध्ये कोणत्या बाबतीत सुधारणा करायची आहे, त्याबद्दल प्रार्थनापूर्वक विचार करा. मग असा एक ख्रिस्ती गुण निवडा जो तुम्हाला स्वतःमध्ये वाढवायचा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतःला असं विचारू शकतो: ‘मी भाऊबहिणींना सहानुभूती कशी दाखवू शकतो? त्यांना मदत करायची इच्छा मी स्वतःमध्ये वाढवू शकतो का? मी इतरांसोबत शांती राखायला आणि त्यांना माफ करायला तयार असतो का?’ तसंच, तुम्हाला आणखी कुठे सुधारणा करता येईल याबद्दल तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रालासुद्धा विचारू शकता किंवा त्याचा सल्ला घेऊ शकता.—नीति. २७:६.

६. एखादा ख्रिस्ती गुण वाढवण्याचं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मेहनत घेऊ शकता?

ध्येय गाठण्यासाठी मेहनत घ्या.  याचा एक मार्ग म्हणजे, ज्या गुणावर तुम्हाला काम करायचं आहे त्यावर संशोधन करा. समजा, तुम्हाला इतरांना माफ करायची वृत्ती स्वतःमध्ये वाढवायची गरज आहे. असं असेल, तर ज्यांनी क्षमाशील वृत्ती दाखवली आणि ज्यांनी दाखवली नाही, अशी बायबलमधली काही उदाहरणं तुम्ही वाचू शकता आणि त्यावर मनन करू शकता. जसं की, येशूच्या उदाहरणाचा विचार करा. तो क्षमा करायला नेहमी तयार होता. (लूक ७:४७, ४८) इतरांनी आधी केलेल्या चुकांकडे लक्ष देण्याऐवजी पुढे ते काय चांगलं करू शकतात याकडे त्याने लक्ष दिलं. याउलट त्या काळात परूशी लोक “इतरांना अगदीच तुच्छ लेखायचे.” (लूक १८:९) मग अशा काही उदाहरणांवर मनन केल्यानंतर स्वतःला विचारा: ‘मला इतरांमधले चांगले गुण दिसतात का? मी त्यांच्या कोणत्या गुणांकडे जास्त लक्ष देतो?’ तुम्हाला जर एखाद्याला माफ करायला कठीण जात असेल, तर त्यांच्यात कोणकोणते चांगले गुण आहेत ते सगळे लिहून काढा. आणि मग स्वतःला विचारा: ‘माझ्या जागी येशू असता तर त्याने या व्यक्‍तीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं असतं? त्याने त्याला माफ केलं नसतं का?’ असं केल्यामुळे इतरांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला बदलता येईल. सुरुवातीला कदाचित ज्याने आपलं मन दुखावलं आहे, त्याला माफ करणं आपल्याला कठीण जाईल. पण अशा प्रकारे जर आपण प्रयत्न करत राहिलो, तर इतरांना माफ करणं आपल्याला सोपं जाईल.

सेवेत उपयोगी पडतील अशी कौशल्य शिकून घ्या

राज्य सभागृहाची देखभाल करायचं काम शिकून घ्या (परिच्छेद ७ पाहा) e

७. नीतिवचनं २२:२९ मध्ये सांगितल्याप्रमाणे आज यहोवा आपल्या कुशल सेवकांचा कशा प्रकारे वापर करत आहे?

यहोवाच्या सेवेत उपयोगी पडेल असं कौशल्य शिकून घेण्याचं ध्येयसुद्धा तुम्ही ठेवू शकता. बेथेल गृहाच्या इमारती, संमेलन गृह आणि आपली राज्य सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाऊबहिणींची गरज असते. अशा भाऊबहिणींनी बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्‍या अनुभवी भाऊबहिणींकडून वेगवेगळी कौशल्यं शिकून घेतली आहेत. उदाहरणार्थ, चित्रात दाखवल्याप्रमाणे संमेलन गृहांची आणि राज्य सभागृहांची दुरुस्ती करण्यासाठी भाऊ आणि बहिणी वेगवेगळी कौशल्यं शिकत आहेत. अशा आणि यांसारख्या अनेक मार्गांनी “सर्वकाळाचा राजा” यहोवा देव आणि “राजांचा राजा” येशू ख्रिस्त आपल्या कुशल सेवकांचा वापर करून अनेक अद्‌भुत गोष्टी साकारत आहेत. (१ तीम. १:१७; ६:१५; नीतिवचनं २२:२९ वाचा.) खरंच, स्वतःच्या स्तुतीसाठी नाही, तर यहोवाच्या गौरवासाठी आपल्या कौशल्यांचा वापर व्हावा आणि त्यासाठी आपण मेहनत घ्यावी अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे.—योहा. ८:५४.

८. तुम्हाला कोणतं कौशल्य शिकायचं आहे, हे तुम्ही कसं ठरवू शकता?

विशिष्ट ध्येय ठेवा.  तुम्ही कोणतं कौशल्य शिकू शकता? याबद्दल कदाचित तुम्ही तुमच्या मंडळीतल्या वडिलांना किंवा तुमच्या विभागीय पर्यवेक्षकांना विचारू शकता. समजा, त्यांनी तुम्हाला बोलण्याचं आणि शिकवण्याचं कौशल्य वाढवायला सांगितलं, तर बोलण्याच्या किंवा शिकवण्याच्या कोणत्या पैलूवर खासकरून तुम्ही काम करावं हे त्यांना विचारा. मग त्यावर काम करण्यासाठी व्यावहारिक पावलं उचला.

९. एखादं कौशल्य शिकून घेण्याचं ध्येय गाठण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मेहनत घेऊ शकता?

ध्येय गाठण्यासाठी मेहनत घ्या.  तुम्हाला जर शिकवण्याचं कौशल्य वाढवायचं असेल, तर वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा या माहितीपत्रकाचा तुम्ही चांगला अभ्यास केला पाहिजे. आठवड्यादरम्यानच्या सभेत तुम्हाला जर एखादा भाग मिळाला असेल, तर आधीच एखाद्या अनुभवी बांधवाला तो ऐकवा. आणि त्यामध्ये कुठे सुधारणा करता येईल ते त्याला विचारा. अशा प्रकारे तुम्ही जर आधीपासूनच चांगली केली, तर तुम्ही मेहनत घेत आहात आणि भरवशालायक आहात हे इतरांना दिसून येईल.—नीति. २१:५; २ करिंथ. ८:२२.

१०. कौशल्य वाढवण्यासाठी आपण कसा प्रयत्न करू शकतो याचं एक उदाहरण द्या.

१० तुम्ही जे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहात, ते तुम्हाला कठीण वाटत असेल तर काय? हार मानू नका आणि त्यावर काम करत राहा! गॅरी नावाच्या एका भावाचं उदाहरण घ्या. त्याला नीट वाचता येत नव्हतं. त्यामुळे मंडळीच्या सभांमध्ये मोठ्याने वाचायला त्याला खूप लाज वाटायची. पण तो प्रयत्न करत राहिला. तो म्हणतो, की मंडळीतल्या अनुभवी बांधवांकडून आणि आपल्या प्रकाशनांतून त्याला जे प्रशिक्षण मिळालं त्यामुळे आता त्याला फक्‍त सभेतच नाही, तर संमेलनं आणि अधिवेशनांमध्येही भाषणं देता येतात.

११. तीमथ्यप्रमाणे जास्त जबाबदाऱ्‍या पार पाडता याव्यात म्हणून कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

११ तीमथ्य एक प्रभावी वक्‍ता किंवा एक उत्कृष्ट शिक्षक बनला का? बायबल याबद्दल काही सांगत नाही. पण पौलचा सल्ला मानल्यामुळे तीमथ्य आपल्या जबाबदाऱ्‍या नक्कीच आणखी चांगल्या प्रकारे पार पाडू शकला असेल यात काही शंका नाही. (२ तीम. ३:१०) त्याचप्रमाणे आपणही जर आपली कौशल्यं वाढवत राहिलो, तर आपल्यालाही यहोवाच्या सेवेत आणखी जबाबदाऱ्‍या चांगल्या प्रकारे पार पाडता येतील.

वेगवेगळ्या मार्गांनी इतरांची मदत करणं

१२. इतरांनी केलेल्या मदतीमुळे तुम्हाला कसा फायदा झाला आहे?

१२ इतर जण आपली मदत करतात तेव्हा आपल्याला फायदा होतो. जसं की, आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमीट असतो तेव्हा इस्पितळ संपर्क समितीमध्ये (HLC) किंवा रूग्ण भेट गटात काम करणारे वडील आपल्याला भेटायला येतात तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. जेव्हा आपल्या जीवनात एखादी समस्या येते तेव्हा आपलं ऐकून घेण्यासाठी आणि आपल्याला सांत्वन देण्यासाठी वडील वेळ काढतात तेव्हा आपल्याला हिंमत मिळते. तसंच आपल्याला जेव्हा एखादा बायबल अभ्यास घेण्यासाठी मदतीची गरज असते, तेव्हा एखादा अनुभवी पायनियर भाऊ किंवा बहीण आपल्यासोबत येतात आणि आपल्याला काही गोष्टी सुचवतात तेव्हाही आपल्याला खूप मदत होते. हे सगळे भाऊबहीण आपल्याला मदत करण्यासाठी नेहमी आनंदाने तयार असतात. आपणही इतर भाऊबहिणींना मदत करायला तयार असलो तर आपल्याला तसाच आनंद अनुभवता येईल. येशूने म्हटलं होतं, “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रे. कार्यं २०:३५) म्हणून तुम्हीही इतरांची मदत करायचं ध्येय ठेवू शकता.

१३. कोणतंही ध्येय ठेवताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१३ तुम्हाला जर एखादं ध्येय ठेवायचं असेल, तर आपल्यासमोर एखादं विशिष्ट ध्येय ठेवणं महत्त्वाचं आहे. हे समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ या. समजा तुम्ही असा विचार केला, की ‘मला मंडळीत आणखी सेवा करायची इच्छा आहे.’ पण असा विचार करणं हे विशिष्ट ध्येय ठेवण्यासारखं होणार नाही. कारण हे ध्येय नेमकं कसं गाठायचं हे तुम्हाला समजणार नाही. किंवा ते ध्येय तुम्ही पूर्ण केलं आहे की नाही हेसुद्धा तुम्हाला तपासून पाहता येणार नाही. म्हणूनच ध्येय ठेवताना नेहमी स्पष्ट आणि विशिष्ट ध्येय ठेवा. त्यासाठी हवं असेल तर तुमचं ध्येय काय आहे, आणि ते तुम्ही कसं गाठणार आहात ते लिहून ठेवा.

१४. ध्येय पूर्ण करत असताना परिस्थितीशी जुळवून घेणं का महत्त्वाचं आहे?

१४ ध्येय ठेवताना आपण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार असलं पाहिजे. का बरं? कारण परिस्थिती कधी आणि कशी बदलेल हे आपल्या हातात नसतं. एक उदाहरण घ्या: थेस्सलनीका इथे एक नवीन मंडळी सुरू करण्यासाठी प्रेषित पौलने मदत केली. आणि तिथेच राहून तिथल्या नवीन भाऊबहिणींना मदत करायचं त्याचं ध्येयं होतं. पण विरोधकांनी पौलला ते शहर सोडायला भाग पाडलं. (प्रे. कार्यं १७:१-५, १०) जर पौल तिथे थांबला असता, तर तिथल्या भाऊबहिणींचा जीव धोक्यात आला असता. पण पौलने त्यांना मदत करायचं सोडलं नाही. त्याने बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतलं. आणि थेस्सलनीका इथल्या भाऊबहिणींच्या मदतीसाठी तीमथ्यला पाठवलं. (१ थेस्सलनी. ३:१-३) त्यांच्या मदतीसाठी तीमथ्य तिथे आला तेव्हा भाऊबहिणींना नक्कीच खूप आनंद झाला असेल!

१५. परिस्थिती बदलते तेव्हा आपण काय केलं पाहिजे? उदाहरण द्या.

१५ आपण पौलच्या या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. कदाचित आपणही एखादं ध्येय ठेवलं असेल, पण परिस्थिती बदल्यामुळे आपल्याला ते गाठता येत नसेल. (उप. ९:११) अशा वेळी, आपण दुसरं एखादं ध्येय ठेवू शकतो जे आपल्याला सहज गाठता येईल. टेड आणि हायडी यांनीही तेच केलं. आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना बेथेल सेवा सोडावी लागली. पण यहोवावर प्रेम असल्यामुळे आणखी कोणत्या मार्गाने आपली सेवा वाढवता येईल याचा ते विचार करू लागले. सगळ्यात आधी त्यांनी नियमित पायनियर म्हणून सेवा करायला सुरुवात केली. मग काही काळाने त्यांना खास पायनियर म्हणून नियुक्‍त करण्यात आलं. आणि टेडला पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. पण त्यानंतर विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करण्यासाठी असणारी वयाची अट बदलली. त्यामुळे टेड आणि हायडी यांना जाणवलं, की आता त्यांना पर्यायी विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करता येणार नव्हती. यामुळे ते थोडे निराश झाले. पण आपण इतर मार्गांनीही यहोवाची सेवा करू शकतो ही गोष्ट त्यांना माहीत होती. टेड म्हणतात, “फक्‍त एकाच मार्गाने सेवा करण्यात अडून राहण्यापेक्षा इतर मार्गांनीही सेवा करण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे, हे आम्ही शिकलो आहोत.”

१६. गलतीकर ६:४ या वचनातून आपण काय शिकू शकतो?

१६ आपल्या आयुष्यात जे काही घडतं, त्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं. त्यामुळे सध्या यहोवाच्या सेवेत आपल्याकडे जी जबाबदारी आहे, ती आपल्याकडे कायमच असेल असं म्हणता येणार नाही. म्हणून आपल्याकडे असलेल्या जबाबदारीमुळे यहोवा आपल्यावर प्रेम करतो, असा आपण विचार करू नये. आणि स्वतःची तुलनाही इतरांशी करू नये. हायडी म्हणते, “इतरांच्या आयुष्यात जे चाललंय त्याची तुलना आपण जर स्वतःच्या आयुष्याशी करत राहिलो तर आपल्याला कधीच आनंदी राहता येणार नाही.” (गलतीकर ६:४ वाचा.) म्हणून इतरांना मदत करण्याचे आणि यहोवाची सेवा करण्याचे वेगवेगळे मार्ग आपण शोधले पाहिजेत. c

१७. तुम्हाला जर यहोवाची आणखी जास्त सेवा करायची असेल तर तुम्ही काय करू शकता?

१७ तुम्ही जर तुमचं जीवन साधं ठेवलं आणि विनाकारण कर्ज घ्यायचं टाळलं, तर तुम्हाला यहोवाची आणखी जास्त सेवा करता येईल. मोठं ध्येय गाठता यावं म्हणून छोटी-छोटी ध्येयं ठेवा. जसं की, तुम्हाला जर नियमित पायनियर म्हणून सेवा करायची असेल, तर सध्या तुम्ही दर महिन्याला सहायक पायनियर म्हणून सेवा करू शकता का? जर तुम्हाला सहायक सेवक म्हणून सेवा करायची असेल, तर तुम्ही प्रचारकार्यात जास्त वेळ देऊ शकता का, आणि मंडळीतल्या आजारी आणि वयस्कर भाऊबहिणींना भेटण्यासाठी वेळ काढू शकता का? अशा प्रकारे छोटी-छोटी ध्येयं ठेवल्यामुळे तुम्हाला जो अनुभव मिळेल त्यामुळे भविष्यात मोठ्या जबाबदाऱ्‍या पार पाडायला तुम्हाला मदत होईल. म्हणून तुम्हाला जी काही जबाबदारी दिली जाईल त्यात होताहोईल तितकं करण्याचा प्रयत्न करा.—रोम. १२:११.

तुम्हाला गाठता येईल असं विशिष्ट ध्येय ठेवा (परिच्छेद १८ पाहा) f

१८. बेवर्ली यांच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (चित्र पाहा)

१८ ध्येय ठेवायला आणि ते गाठायला वयाची मर्यादा नसते. ७५ वर्षांच्या बेवर्ली नावाच्या एका बहिणीचंच उदाहरण घ्या. त्यांना एक गंभीर आजार असल्यामुळे चालता येत नव्हतं. पण स्मारकविधीच्या मोहिमेत सहभाग घ्यायची त्यांची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी काही विशिष्ट ध्येयं ठेवली. आणि ही ध्येयं गाठता आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे इतरांनाही आपली सेवा वाढवायचं प्रोत्साहन मिळालं. परिस्थितीमुळे आपल्या वृद्ध भाऊबहिणींना जरी जास्त काही करता येत नसलं, तरी ते घेत असलेल्या मेहनतीची यहोवा कदर करतो.—स्तो. ७१:१७, १८.

१९. प्रगती करत राहण्यासाठी तुम्ही कोणती काही ध्येयं ठेवू शकता?

१९ तुम्हाला गाठता येतील अशी ध्येयं नेहमी ठेवा. यहोवाला आनंद होईल असे गुण स्वतःमध्ये वाढवा. यहोवाच्या सेवेत आणि त्याच्या संघटनेत उपयोगी पडतील अशी कौशल्य शिकून घ्या. आपल्या भाऊबहिणींची मदत करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधा. d म्हणजे यहोवाच्या आशीर्वादाने तीमथ्यसारखीच तुमचीही “प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल.”—१ तीम. ४:१५.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

a तीमथ्य एक कुशल प्रचारक होता. तरीसुद्धा पौलने त्याला सेवेत आणखी प्रगती करण्याचं प्रोत्साहन दिलं. पौलचा हा सल्ल्या मानल्यामुळे तीमथ्य यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करू शकला. तुम्हाला तीमथ्यसारखंच यहोवाची आणि आपल्या भाऊबहिणींची सेवा करायची इच्छा आहे का? नक्कीच असेल. मग कोणती ध्येयं ठेवल्यामुळे तुम्हाला हे करायला मदत होईल? आणि अशी ध्येयं ठेवण्यासाठी आणि गाठण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल?

b शब्दांचा अर्थ: आध्यात्मिक ध्येय म्हणजे यहोवाची चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी आणि त्याचं मन आनंदित करण्यासाठी आपण घेत असलेली मेहनत.

d कायम जीवनाचा आनंद घ्या! या पुस्तकातला “पुढेही प्रगती करत राहा,” हे शीर्षक असलेला धडा ६० पाहा.

e चित्रांचं वर्णन: एक भाऊ दोन बहिणींना दुरुस्तीचं काम शिकवत आहे आणि त्या बहिणी शिकवल्याप्रमाणे काम करत आहेत.

f चित्रांचं वर्णन: एक वयस्कर बहीण घरातून बाहेर पडू शकत नाही. पण टेलीफोनवरून ती लोकांना स्मारकविधीचं आमंत्रण देत आहे.