व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १५

‘बोलण्याच्या बाबतीत’ तुमचं एक चांगलं उदाहरण आहे का?

‘बोलण्याच्या बाबतीत’ तुमचं एक चांगलं उदाहरण आहे का?

“बोलण्यात . . . विश्‍वासू जणांसमोर एक चांगलं उदाहरण ठेव.”—१ तीम. ४:१२.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश a

१. आपल्याला बोलण्याची क्षमता कोणी दिली?

 यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि त्याने आपल्याला बोलण्याची क्षमता दिली आहे. पहिला मानव आदाम याला बनवण्यात आलं तेव्हापासूनच तो त्याच्या स्वर्गातल्या पित्याशी बोलू शकत होता. तसंच, तो नवनवीन शब्दसुद्धा बनवू शकत होता. या क्षमतेचा उपयोग करून त्याने सगळ्या प्राण्यांना नावं दिली. (उत्प. २:१९) जरा विचार करा, जेव्हा तो पहिल्यांदा एका दुसऱ्‍या मानवासोबत, म्हणजे त्याच्या प्रिय पत्नीसोबत बोलला असेल तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल!—उत्प. २:२२, २३.

२. बोलण्याच्या क्षमतेचा गैरवापर कसा होऊ लागला? आणि आज लोकांचं बोलणं कसं झालं आहे?

पण काही काळानंतरच बोलण्याच्या या क्षमतेचा गैरवापर होऊ लागला. सैतान हव्वाशी खोटं बोलला आणि त्यामुळे मानवांनी पाप केलं आणि ते अपरिपूर्ण बनले. (उत्प. ३:१-४) आदामनेसुद्धा आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा दुरुपयोग केला. त्याने आधी आपल्या चुकांचा दोष हव्वावर आणि नंतर यहोवावरही लावला. (उत्प. ३:१२) पुढे काइनने आपला भाऊ हाबेल याचा खून केल्यानंतर, तो यहोवाशी खोटं बोलला. (उत्प. ४:९) नंतर काइनचा वंशज लामेख याने बदला घेण्याबद्दल एक कविता रचली. त्यातून दिसून येतं, की त्याच्या काळातले लोक किती हिंसक होते. (उत्प. ४:२३, २४) आजसुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. आज राजकारणातले बरेच लोक चारचौघात सर्रासपणे असभ्य भाषा वापरतात. शिवाय, चित्रपटांमध्येसुद्धा लोक घाणेरडी भाषा बोलताना आणि शिवीगाळ करताना दाखवले जातात. अशीच भाषा आपल्याला शाळा, कॉलेज आणि कामाच्या ठिकाणीही ऐकायला मिळते. यावरून कळतं की जगाचे नैतिक स्तर किती घसरले आहेत आणि भाषा किती खालच्या थराला गेली आहे.

३. आपण सावध का राहिलं पाहिजे आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आपण जर सावध राहिलो नाही, तर आपणसुद्धा घाणेरडी भाषा ऐकून-ऐकून तसंच बोलायला लागू. हे खरं आहे, की ख्रिस्ती असल्यामुळे आपण कधीच अशी भाषा बोलणार नाही. पण आपल्याला जर यहोवाचं मन आनंदित करायचं असेल तर आपण आणखी काहीतरी केलं पाहिजे. आपण बोलण्याच्या क्षमतेचा चांगल्या प्रकारे, म्हणजेच यहोवाची स्तुती करण्यासाठी वापर केला पाहिजे. हे आपण सेवाकार्यात, मंडळीमध्ये आणि इतर वेळी एकमेकांशी बोलताना कसं करू शकतो ते पाहू. पण त्याआधी आपलं बोलणं चांगलं असावं असं यहोवाला का वाटतं त्याबद्दल चर्चा करू या.

आपलं बोलणं चांगलं असावं असं यहोवाला का वाटतं?

आपल्या मनात काय आहे हे आपल्या बोलण्यातून कसं दिसून येतं? (परिच्छेद ४-५ पाहा) d

४. मलाखी ३:१६ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा आपल्या बोलण्याकडे लक्ष का देतो?

मलाखी ३:१६ वाचा. या वचनात सांगितल्याप्रमाणे जे लोक यहोवाची भीती बाळगतात आणि त्याच्या नावावर मनन करतात त्यांच्या बोलण्याकडे यहोवा लक्ष देतो आणि त्यांचं नाव आपल्या ‘स्मरण पुस्तकात’ लिहितो. पण यहोवा असं का करतो? कारण आपल्या बोलण्यावरून कळतं की आपल्या मनात काय आहे. येशूने म्हटलं: “अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.” (मत्त. १२:३४) त्यामुळे आपण जे काही बोलतो त्यावरून यहोवावर आपलं किती प्रेम आहे हे दिसून येतं. आणि जे यहोवावर प्रेम करतात त्यांना नवीन जगात सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी त्याची इच्छा आहे.

५. (क) आपल्या बोलण्याचा आपल्या उपासनेशी कसा संबंध आहे? (ख) चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण बोलण्याच्या बाबतीत काय लक्षात ठेवलं पाहिजे?

आपण ज्या प्रकारे बोलतो त्यावरून ठरतं की यहोवा आपली उपासना स्वीकारेल की नाही. (याको. १:२६) जे लोक यहोवावर प्रेम करत नाहीत ते खूप रागाने, उद्धटपणे आणि गर्विष्ठपणे बोलतात. (२ तीम. ३:१-५) पण आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचं नाही, तर आपल्याला आपल्या बोलण्यातून यहोवाचं मन आनंदित करायचं आहे. जरा विचार करा, आपण जर सभांमध्ये आणि प्रचारात खूप आदराने बोललो पण घरच्यांशी कठोरपणे किंवा त्यांना घालून-पाडून बोललो तर यहोवाला ते आवडेल का?—१ पेत्र ३:७.

६. किमच्या चांगल्या बोलण्याचा काय परिणाम झाला?

आपण आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा चांगला वापर करतो तेव्हा आपण यहोवाचे उपासक आहोत हे दिसून येतं. त्यामुळे “देवाची सेवा करणारा आणि न करणारा, यांतला फरक” लोक ओळखू शकतात. (मला. ३:१८) हीच गोष्ट किम b नावाच्या बहिणीसोबत घडली. तिला तिच्या वर्गातल्या एका मुलीसोबत एका प्रोजेक्टवर काम करायला सांगितलं होतं. सोबत काम केल्यावर त्या मुलीला कळलं की किम शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. तिच्या लक्षात आलं की किम कोणाबद्दल वाईट बोलत नाही, सगळ्यांसोबत चांगली वागते आणि शिवीगाळ करत नाही. किम इतकी वेगळी का आहे, हे समजल्यावर ती मुलगी काही काळाने बायबल अभ्यास करायला तयार झाली. खरंच विचार करा, अशा प्रकारे आपल्या चांगल्या बोलण्यामुळे लोक सत्य शिकायला तयार होतात तेव्हा यहोवाला किती आनंद होत असेल!

७. बोलण्याच्या क्षमतेचा वापर आपण कसा केला पाहिजे?

यहोवाचा आदर होईल आणि आपल्या भाऊबहिणींसोबत आपलं नातं आणखी घट्ट होईल, अशा प्रकारे आपलं बोलणं असावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. म्हणून ‘बोलण्याच्या बाबतीत आपण एक चांगलं उदाहरण’ कसं मांडू शकतो याचे काही मार्ग आता आपण पाहू या.

सेवाकार्यात चांगलं उदाहरण ठेवा

सेवाकार्यात आपण प्रेमळपणे बोलतो तेव्हा यहोवाला आनंद होतो (परिच्छेद ८-९ पाहा)

८. सेवाकार्यात आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

दुसरे आपल्यासोबत कठोरपणे बोलतात तेव्हा त्यांच्याशी प्रेमळपणे आणि आदराने बोला.  येशू पृथ्वीवर होता तेव्हा लोकांनी त्याच्यावर खोटा आरोप लावला, की तो दारुडा आहे, खादाड आहे, सैतानाची कार्य करतो, शब्बाथ मोडतो आणि इतकंच काय तर देवाची निंदाही करतो. (मत्त. ११:१९; २६:६५; लूक ११:१५; योहा. ९:१६) असं असलं तरी, येशूने त्यांना रागाने उत्तर दिलं नाही किंवा तो त्यांच्याबद्दल वाईट बोलला नाही. आपल्यासोबतही कोणी कठोरपणे बोललं तर आपण येशूसारखंच त्यांना उलट उत्तर देणार नाही किंवा त्यांच्याशी कठोरपणे बोलणार नाही. (१ पेत्र २:२१-२३) पण हे खरं आहे, की असं करणं सोपं नाही. (याको. ३:२) मग आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

९. सेवाकार्यात आपल्यावर कोणी रागावलं तर आपल्याला कशामुळे मदत होईल?

सेवाकार्यात घरमालक जर आपल्याशी कठोरपणे बोलला तर लगेच वाईट वाटून घेऊ नका. सॅम नावाचा भाऊ म्हणतो, “घरमालकाला सत्य समजणं किती महत्त्वाचं आहे आणि तो पुढे जाऊन बदलू शकतो याबद्दल मी अशा वेळी विचार करतो.” कधीकधी घरमालक आपल्यावर फक्‍त यासाठी रागावतो कारण आपण त्याच्या घरी चुकीच्या वेळी गेलेलो असतो. आपल्यावर कोणी रागावलं तर आपण लूसी नावाच्या बहिणीचं अनुकरणं करू शकतो. आपणसुद्धा तिच्यासारखं मनातल्या मनात लहानशी प्रार्थना करू शकतो. शांत राहण्यासाठी आणि आपल्या तोंडून काही चुकीचं किंवा समोरच्याचा अनादर होईल असं काही निघू नये म्हणून आपण यहोवाकडे मदत मागू शकतो.

१०. १ तीमथ्य ४:१३ या वचनानुसार आपण काय करत राहिलं पाहिजे?

१० शिकवण्यात आपलं कौशल्य वाढवा.  तीमथ्य लोकांना खूप चांगल्या प्रकारे शिकवायचा. पण त्यालाही नेहमी सुधार करावा लागला. (१ तीमथ्य ४:१३ वाचा.) आपण आपल्या शिकवण्याच्या कौशल्यात आणखी सुधार कसा करू शकतो? यासाठी आपण चांगली तयारी केली पाहिजे. चांगले शिक्षक बनण्यासाठी संघटनेने आपल्याला बरीच साधनं दिली आहेत. जसं की, वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा  आणि आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य-सभेसाठी कार्यपुस्तिका  यातल्या “सेवाकार्यासाठी तयार व्हा” या भागांमध्ये खूप चांगले सल्ले दिले आहेत. या प्रकाशनांमध्ये दिलेल्या माहितीचा आपण चांगला वापर केला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा आपण चांगली तयारी करू तेव्हा आपली भीती कमी होईल आणि आपण आत्मविश्‍वासाने बोलू.

११. काही भाऊबहिणींनी आपलं शिकवण्याचं कौशल्य कसं वाढवलं आहे?

११ मंडळीतले भाऊबहीण कसं शिकवतात हेही आपण पाहू शकतो आणि आपल्या शिकवण्याचं कौशल्य वाढवू शकतो. आपण आधी ज्यांचा उल्लेख केला होता, ते सॅम स्वतःला असा प्रश्‍न विचारतात: ‘भाऊबहिणींना कोणत्या गोष्टीमुळे इतक्या चांगल्या प्रकारे शिकवता येतं?’ ते भाऊबहिणींच्या शिकवण्याची पद्धत कशी आहे, हे पाहतात आणि मग तसंच तेही शिकवण्याचा प्रयत्न करतात. तानीया नावाची एक बहीण काय करते याचाही विचार करा. वेगवेगळे भाऊ जाहीर भाषणं कशी देतात याकडे ती लक्ष देते आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करते. यामुळे तिला खूप मदत झाली आहे. प्रचारात लोक जेव्हा तिला प्रश्‍न विचारतात तेव्हा ती चांगल्या प्रकारे तर्क करू शकते आणि त्यांना उत्तरंही देऊ शकते.

सभांमध्ये चांगलं उदाहरण ठेवा

सभांमध्ये मनापासून आणि उत्साहाने गीत गायल्यामुळे आपण यहोवाचा गौरव करतो (परिच्छेद १२-१३ पाहा)

१२. काही भाऊबहीणींना कोणती गोष्ट कठीण वाटू शकते?

१२ आपण सर्वच उत्साहाने गीत गाऊन आणि चांगल्या प्रकारे तयार केलेली उत्तरं देऊन सभांमध्ये सहभाग घेऊ शकतो. (स्तो. २२:२२) पण काही जणांना सगळ्यांसमोर गीत गायला आणि उत्तरं द्यायला कठीण वाटू शकतं. तुम्हालाही असंच वाटतं का? वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही, बऱ्‍याच भाऊबहिणींना असं वाटतं. पण त्यांना आपल्या भीतीवर मात करायला कशामुळे मदत झाली ते आता आपण पाहू या.

१३. सभांमध्ये मनापासून आणि उत्साहाने गाण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

१३ मनापासून आणि उत्साहाने गीत गा.  आपण सभांमध्ये राज्यगीतं का गातो? कारण ती गायल्यामुळे यहोवाची स्तुती होते आणि हेच गीत गाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. सारा नावाची बहीण म्हणते की तिला इतकं काही चांगलं गाता येत नाही. असं असलं तरी तिला यहोवाची स्तुती करायची इच्छा आहे. म्हणून ती सभांमधल्या भागांची जेव्हा तयारी करते तेव्हा ती गीतांचाही सराव करते. सभांमधल्या भागांचा गीतांच्या बोलांशी कसा संबंध आहे याकडे ती लक्ष देते. याबद्दल ती म्हणते, “असं केल्यामुळे मी कसं गाते याकडे माझं जास्त लक्ष जात नाही, तर गाण्यांच्या बोलांकडे माझं लक्ष जातं.”

१४. तुम्हाला जर उत्तरं द्यायला भीती वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता?

१४ प्रत्येक सभेत उत्तरं देण्याचा प्रयत्न करा.  काही जणांना असं करणं कठीण जाऊ शकतं. आधी उल्लेख केलेली तानीया म्हणते, “लोकांना माहीत जरी नसलं तरी चारचौघांत बोलायला मला भीती वाटते, मला टेन्शन येतं.” म्हणून उत्तरं देणं तिला कठीण जातं असं ती म्हणते. पण असं असलं तरी ती उत्तरं द्यायचा पुरेपूर प्रयत्न करते. तयारी करताना ती नेहमी लक्षात ठेवते की प्रश्‍नाचं पहिलं उत्तर हे थेट आणि थोडक्यात असलं पाहिजे. ती म्हणते, “याचा अर्थ जर माझं उत्तर लहान, सरळ आणि मुख्य मुद्दा स्पष्ट करणारं असलं, तर त्यात काहीच हरकत नाही. कारण अभ्यास घेणाऱ्‍या बांधवालाही तसंच उत्तर अपेक्षित असतं.”

१५. उत्तरांबद्दल आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१५ काही भाऊबहीण लाजाळू नसतात. पण तरीही त्यांना उत्तरं द्यायची भीती वाटू शकते. पण का? जुलिएट नावाची एक बहीण म्हणते, “मी कधीकधी उत्तरं देत नाही. कारण मला वाटतं की माझं उत्तर अगदी साधं आणि इतकं काही खास नाही.” पण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की चांगलं उत्तर देण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, जी मेहनत घेतो ती यहोवासाठी जास्त महत्त्वाची आहे. c आपल्याला भीती वाटत असली तरी आपण सभांमध्ये उत्तरं देतो, यहोवाचा गौरव करतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो.

इतर वेळी एकमेकांशी बोलताना चांगलं उदाहरण ठेवा

१६. आपण कशा प्रकारचं बोलणं टाळलं पाहिजे?

१६ “शिवीगाळ” आणि सर्व प्रकारच्या वाईट बोलण्यापासून दूर राहा.  (इफिस. ४:३१) आधी चर्चा केल्याप्रमाणे, ख्रिस्ती व्यक्‍तीने दुसऱ्‍यांशी बोलताना असभ्य भाषा, वाईट बोलणं या सगळ्यांपासून दूर राहिलं पाहिजे. पण आपल्याला अशाही शब्दांपासून आणि भाषेपासून दूर राहायला हवं जी आपल्याला सरळ-सरळ असभ्य वाटत नाही. उदाहरण द्यायचं झालं, तर नकळतपणे आपण दुसऱ्‍या संसकृतीच्या, वंशाच्या किंवा देशाच्या लोकांबद्दल मस्करी करू, त्यांची टीका करू. पण आपल्याकडून असं होऊ नये म्हणून आपण सावध असलं पाहिजे. तसंच, आपण टोमणे मारणार नाही आणि लोकांना दुःख होईल असं बोलणार नाही. एक भाऊ म्हणतो, “मला आठवतं मीही लोकांना टोमणे मारले आहेत, त्यांना दुःख होईल असं बोललोय. मला वाटायचं मी मस्करी करतोय आणि लोकांना त्याचा त्रास होणार नाही. पण खरंतर, लोकांच्या भावना दुःखावल्या जायच्या. पण माझ्या बायकोने मला खूप मदत केली. जेव्हा कधी मी तिला किंवा दुसऱ्‍याला वाईट वाटेल असं बोलायचो, तेव्हा ती मला याबद्दल सांगायची. पण ते ती मला सगळ्यांसमोर नाही तर एकट्यात समजावून सांगायची. तिने अशा प्रकारे मला बरीच वर्षं मदत केली.”

१७. इफिसकर ४:२९ मध्ये सांगितल्यानुसार आपण एकमेकांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो?

१७ प्रोत्साहन मिळेल असं बोला.  दुसऱ्‍यांची टीका किंवा तक्रार करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन मिळेल असं बोला. (इफिसकर ४:२९ वाचा.) यहोवाने इस्राएली लोकांसाठी खूप काही केलं होतं. पण त्याबद्दल ते आभार मानण्याऐवजी सारखी तक्रार करायचे. लक्षात असू द्या, जर एकाने तक्रार केली तर त्याचं पाहून इतर जणसुद्धा तक्रार करायला लागू शकतात. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा दहा हेरांनी वचन दिलेल्या देशाबद्दल वाईट बातमी सांगितली तेव्हा सर्व इस्राएली मोशेविरुद्ध “कुरकुर करू लागले.” (गण. १३:३१–१४:४) पण तक्रार करण्याऐवजी जर आपण दुसऱ्‍यांची प्रशंसा केली तर याचा चांगला परिणाम होऊ शकतो. इफ्ताहच्या मुलीचंच उदाहरण घ्या. तिच्या मैत्रिणी तिला दर वर्षी भेटायला यायच्या तेव्हा त्या तिची प्रशंसा करायच्या, कौतुक करायच्या. आणि यामुळे तिला यहोवाची सेवा करत राहायचं प्रोत्साहन मिळालं. (शास्ते ११:४०) आधी उल्लेख केलेली सारा म्हणते, “जेव्हा आपण एखाद्याची प्रशंसा करतो तेव्हा त्यांना आपण एक प्रकारे खातरी देत असतो, की यहोवा आणि मंडळीतले इतर लोक त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांना खूप मौल्यवान लेखतात.” तर मग, जेव्हा कधी तुम्हाला संधी मिळेल तेव्हा लोकांचं भरभरून कौतुक करा.

१८. स्तोत्रं १५:१, २ या वचनांनुसार आपण खरं का बोललं पाहिजे आणि यात काय सामील आहे?

१८ खरं बोला.  आपण जर खोटं बोललो तर यहोवा कधीच खूश होणार नाही. कारण त्याला सर्व प्रकारच्या खोट्या गोष्टींचा तिटकारा आहे. (नीति. ६:१६, १७) आज बऱ्‍याच लोकांना असं वाटू शकतं की खोटं बोलण्यात काहीच गैर नाही. पण यहोवा याबद्दल काय विचार करतो हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. (स्तोत्र १५:१, २ वाचा.) हे खरंय की आपण सरळ-सरळ खोटं बोलणार नाही. पण आपण अर्धसत्य सांगून लोकांचा चुकीचा समज होईल अशीही माहिती देणार नाही.

इतरांची बदनामी करणारं संभाषण, प्रोत्साहन देणाऱ्‍या गोष्टीकडे वळवल्यामुळे आपण यहोवाचं मन आनंदित करतो (परिच्छेद १९ पाहा)

१९. आपण आणखी कोणत्या गोष्टीबद्दल सावध असलं पाहिजे?

१९ दुसऱ्‍यांबद्दल वाईट बोलू नका.  (नीति. २५:२३; २ थेस्सलनी. ३:११) दुसऱ्‍यांबद्दल चुकीच्या गोष्टी ऐकल्याने आपल्यावर कसा वाईट परिणाम होऊ शकतो, याबद्दल आधी उल्लेख केलेली जुलिएट म्हणते: “एखादा जेव्हा दुसऱ्‍यांबद्दल वाईट बोलतो तेव्हा मला ते प्रोत्साहन देणारं वाटत नाही. आणि त्याच्यावरचा माझा भरवसाही उडतो. कारण मी विचार करते की जर हा आज दुसऱ्‍यांबद्दल वाईट बोलतोय तर तो उद्या माझ्याबद्दलही दुसऱ्‍यांना वाईट सांगू शकतो.” तेव्हा, जर तुमच्या लक्षात आलं की एखादी व्यक्‍ती तुम्हाला इतरांबद्दल काही वाईट सांगत आहे तर संभाषण लगेच प्रोत्साहन देणाऱ्‍या गोष्टीकडे वळवा.—कलस्सै. ४:६.

२०. तुम्ही बोलण्याच्या बाबतीत काय करायचा पक्का निर्धार केला आहे?

२० आज असभ्य आणि वाईट भाषा बोलणारे लोक सगळीकडे असल्यामुळे आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांचा आपल्यावर प्रभाव पडू नये आणि आपलं बोलणं यहोवाचं मन आनंदित करणारं असावं म्हणून आपण मेहनत घेतली पाहिजे. लक्षात असू द्या, बोलण्याची क्षमता ही यहोवाकडून एक भेट आहे आणि आपण तिचा चांगला वापर करावा अशी त्याची इच्छा आहे. आपण सेवाकार्यात, सभांमध्ये आणि इतर वेळी एकमेकांसोबत बोलताना आपलं बोलणं चांगलं ठेवण्यासाठी मेहनत घेतली आणि समोरच्याला प्रोत्साहन मिळेल असंच बोललो तर यहोवा त्यावर भरभरून आशीर्वाद देईल. पुढे जेव्हा या दुष्ट जगाचा नाश होईल तेव्हा यहोवाचा आदर होईल अशा प्रकारे बोलणं आपल्याला सोपं जाईल. (यहू. १५) पण तोपर्यंत आपण पक्का निर्धार करू या की आपल्या “तोंडातून निघणाऱ्‍या शब्दांमुळे” नेहमी यहोवाचं मन आनंदित होईल.—स्तो. १९:१४.

गीत ५२ मनाचे रक्षण करा

a यहोवाने आपल्याला बोलण्याची एक अनोखी क्षमता दिली आहे. पण दुःखाची गोष्ट म्हणजे बरेच लोक या क्षमतेचा वापर देवाच्या इच्छेप्रमाणे करत नाहीत. सध्याच्या या दुष्ट जगात लोकांचं बोलणं खूप वाईट होत चाललं आहे. मग अशा वेळी आपण आपलं बोलणं चांगलं आणि प्रोत्साहन देणारं कसं ठेवू शकतो? सेवाकार्यात, सभेत आणि इतर वेळी एकमेकांशी बोलताना यहोवा खूश होईल अशा प्रकारे आपण कसं बोलू शकतो? या लेखात आपल्याला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील.

b काही नावं बदलली आहेत.

c उत्तरं देण्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी जानेवारी २०१९ च्या टेहळणी बुरूज अंकातला “मंडळीमध्ये यहोवाची स्तुती करा” हा लेख पाहा.

d चित्राचं वर्णन: रागाने बोलणाऱ्‍या घरमालकाला एक भाऊ कठोरपणे उत्तर देतो; मंडळीत एक भाऊ मनापासून आणि उत्साहाने गीत गात नाही; एक बहीण, दुसऱ्‍याची बदनामी होईल अशा प्रकारचं बोलणं ऐकत आहे.