व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १६

आपल्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते द्या आणि आनंदी राहा

आपल्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते द्या आणि आनंदी राहा

“प्रत्येकाने आपापल्या कामांचं परीक्षण करावं.”​—गलती. ६:४.

गीत १० “हा मी आहे, मला पाठीव!”

सारांश a

१. आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे खूप आनंद होतो?

 यहोवाची इच्छा आहे की आपण आनंदी राहावं. असं आपण यासाठी म्हणू शकतो कारण आनंद हा पवित्र शक्‍तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२) बायबल असंही म्हणतं की घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे. जेव्हा आपण सेवाकार्यात पूर्ण मनाने भाग घेतो आणि आपल्या भाऊबहिणींना वेगवेगळ्या मार्गांनी मदत करतो, तेव्हा आपल्याला भरपूर आनंद होतो.​—प्रे. कार्यं २०:३५.

२-३. (क) गलतीकर ६:४ या वचनात सांगितल्याप्रमाणे कोणत्या दोन गोष्टींमुळे आपल्याला यहोवाची सेवा आनंदाने करायला मदत होईल? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

गलतीकर ६:४, मध्ये प्रेषित पौलने सांगितलं की आपण आनंदी राहण्यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत. (वाचा.) पहिली गोष्ट म्हणजे, आपण यहोवाला आपल्या परीने  सर्वात चांगलं ते दिलं पाहिजे. जर आपण  सर्वात चांगलं ते दिलं तर आपल्याला आनंद होईल. (मत्त. २२:३६-३८) दुसरी गोष्ट म्हणजे, आपण स्वतःची तुलना इतरांशी करू नये. आपल्याकडे जी शक्‍ती आणि कौशल्य आहे, तसंच आपल्याला जे प्रशिक्षण मिळालं आहे त्यामुळे यहोवाच्या सेवेत आपल्याला खूप काही करता येतं. आणि यासाठी आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की हे सर्व काही आपल्याला यहोवानेच दिलं आहे. तसंच, इतर जण सेवाकार्यातल्या काही पैलूंमध्ये आपल्यापेक्षा चांगलं करत असतील तर आपण त्याबद्दलसुद्धा आनंद मानला पाहिजे. कारण ते आपल्या कौशल्यांचा वापर स्वतःच्या नावासाठी नाही तर यहोवाच्या गौरवासाठी करतात. त्यामुळे आपण त्यांच्याशी स्पर्धा करण्याऐवजी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे.

यहोवाच्या सेवेत आपल्याला जास्त करता येत नाही म्हणून आपण कदाचित निराश होऊ. पण याचा सामना करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते हे या लेखात आपण पाहू या. तसंच, आपल्या क्षमतांचा आपण चांगल्या परीने कसा वापर करू शकतो आणि आपण इतरांच्या उदाहरणांतून काय शिकू शकतो हेही आपण पाहू या.

आपण जास्त करू शकत नाही तेव्हा

जीवनात आपण प्रत्येक वेळी यहोवाला आपल्या परीने सर्वात चांगलं ते दिलं तर त्याला आनंद होईल (परिच्छेद ४-६ पाहा) b

४. आपण कधीकधी कशामुळे निराश होऊ शकतो? एक उदाहरण द्या.

वाढत्या वयामुळे किंवा आजारपणामुळे यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांना आधीसारखी सेवा करता येत नाही. कॅरल नावाच्या बहीणीसोबतही हेच घडलं. एक काळ असा होता जेव्हा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी त्या सेवा करत होत्या. त्या वेळी त्यांच्याकडे ३५ बायबल अभ्यास होते आणि त्यांनी बऱ्‍याच लोकांना बाप्तिस्मा घ्यायलाही मदत केली होती. त्या आपल्या सेवेमुळे खूप खूश होत्या. पण नंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे त्यांना जास्तकरून घरीच राहावं लागायचं. त्या म्हणतात: “तब्येत खराब असल्यामुळे मला इतरांसारखी यहोवाची सेवा करता येत नाही. मला वाटतं की मी त्यांच्याएवढी विश्‍वासू नाहीये, मी कुठेतरी कमी पडते. खरंतर, मला खूपकाही करावंसं वाटतं पण मी करू शकत नाही आणि यामुळे मी निराश होते.” कॅरल आजारी आहेत तरी त्यांना त्यांच्या परीने होता होईल तितकं करायचं आहे आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपला प्रेमळ आणि दयाळू पिता यहोवा या बहिणीची नक्कीच कदर करत असेल!

५. (क) जास्त सेवा करता येत नसल्यामुळे आपण निराश होत असलो तर आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? (ख) चित्रात दाखवल्याप्रमाणे एका भावाने त्याच्या आयुष्यात नेहमी यहोवाला सर्वात चांगलं कसं दिलं?

तुमच्या परिस्थितीमुळे तुम्हाला जास्त करता येत नसेल आणि तुम्ही निराश होत असाल तर स्वतःला विचारा: ‘यहोवाची माझ्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे?’ त्याची हीच अपेक्षा आहे की तुमच्या सध्याच्या परिस्थितीनुसार तुमच्या परीने तुम्ही सर्वात चांगलं ते द्यावं. ८० वर्षांच्या एका वयस्कर बहिणीचा विचार करा. त्यांना वाटतं की ४० वर्षांच्या असताना त्या जितकं करू शकत होत्या तितकं त्यांना आता करता येत नाही. आणि यामुळे त्या दुःखी होतात. त्या यहोवाची सेवा मनापासून करत आहेत पण त्यांना वाटतं की तो त्यांच्यावर खूश नाही. पण खरंच असं आहे का? जरा विचार करा, त्या ४० वर्षांच्या होत्या तेव्हाही त्या यहोवाची मनापासून सेवा करत होत्या आणि आता ८० वर्षांच्या असतानाही त्या मनापासून सेवा करत आहेत. याचाच अर्थ, त्या आपल्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते देत आहेत. त्या बहिणीसारखं आपल्यालाही कधीकधी वाटू शकतं, की आपण यहोवाच्या सेवेत जितकं करत आहोत ते पुरेसं नाही, आणि यहोवा खूश होत नसेल. पण आपण लक्षात ठेवू शकतो, की आपण किती करू शकतो हे यहोवाला चांगलं माहीत आहे आणि आपण मनापासून त्याची सेवा केली तर तो खूश होईल. जर आपण सर्वात चांगलं ते दिलं तर तो नक्कीच आपल्याला “शाब्बास!” म्हणेल.—मत्तय २५:२०-२३ सोबत तुलना करा.

६. आपण मारियाच्या उदाहरणातून काय शिकू शकतो?

आपली परिस्थिती चांगली नसली तरी आपण आनंदी राहू शकतो. यासाठी आपण यहोवाच्या सेवेत काय करू शकत नाही यापेक्षा काय करू शकतो  यावर लक्ष लावलं पाहिजे. मारीया नावाच्या बहिणीचा विचार करा. आजारी असल्यामुळे ती प्रचारात जास्त जाऊ शकत नाही. सुरुवातीला ती निराश झाली आणि आपण काहीच कामाचे नाही असं तिला वाटायचं. पण नंतर तिने तिच्या मंडळीतल्या एका दुसऱ्‍या बहिणीचा विचार केला, जी आजारी असल्यामुळे बिछान्यावरून उठू शकत नव्हती. मारीयाने त्या बहिणीला मदत करायचं ठरवलं. मारीया म्हणते: “आम्ही टेलीफोन आणि पत्राने प्रचार करू लागलो. जेव्हा-जेव्हा आम्ही एकत्र प्रचार करायचो तेव्हा-तेव्हा मला खूप आनंद व्हायचा की मी त्या बहिणीला मदत करू शकले.” मारीयासारखंच आपणही काय करू शकत नाही, यापेक्षा काय करू शकतो यावर विचार केला तर आपल्याला आनंदी राहता येईल. पण समजा आपली परिस्थिती चांगली आहे, यहोवाच्या सेवेत जास्त करण्यासाठी आपल्याकडे क्षमता आणि कौशल्यं आहेत तेव्हा आपण काय करू शकतो? चला पुढे आपण याबद्दल पाहू या.

तुमच्याकडे कौशल्यं असतील तर त्यांचा उपयोग करा

७. प्रेषित पेत्रने ख्रिश्‍चनांना कोणता सल्ला दिला?

प्रेषित पेत्रने आपल्या पहिल्या पत्रात ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला, की त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांचा आणि कौशल्यांचा त्यांनी इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी उपयोग करावा. त्याने म्हटलं, की आपण “देवाची अपार कृपा मिळालेले कारभारी आहोत. त्यामुळे, चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकाला ज्या प्रमाणात दान मिळालं आहे, त्याप्रमाणे त्याने ते इतरांच्या सेवेसाठी उपयोगात आणावं.”  (१ पेत्र ४:१०) याचाच अर्थ, आपल्याजवळ असलेल्या कौशल्यांचा किंवा क्षमतांचा आपण पुरेपूर उपयोग केला पाहिजे. आपण असा विचार करू नये की आपण असं केलं तर इतर लोक आपल्यावर जळतील किंवा त्यामुळे निराश होतील. आपण आपल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग केला नाही, तर आपण यहोवाला आपल्या परीने सगळ्यात चांगलं ते देत नसू.

८. पहिले करिंथकर ४:६, ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे, आपण आपल्या कौशल्यांबद्दल बढाई का मारू नये?

हे खरंय की आपण आपल्या क्षमतांचा नक्कीच पुरेपूर उपयोग केला पाहिजे. पण त्याबद्दल आपण बढाई मारू नये. (१ करिंथकर ४:६, ७ वाचा.) उदाहरणार्थ, बायबल अभ्यास सुरू करण्यात तुम्ही खूप कुशल असाल आणि या कौशल्याचा तुम्ही नक्कीच उपयोग केला पाहिजे. पण त्याबद्दल आपण फुशारकी मारू नये. समजा अलीकडेच तुम्हाला प्रचारात एक चांगली व्यक्‍ती भेटली आणि लगेच एक बायबल अभ्यासही सुरू झाला. तुम्ही हा अनुभव तुमच्या प्रचाराच्या ग्रुपला सांगायला खूप उत्सुक असाल. प्रचारानंतर तुम्ही ग्रुपमध्ये एकत्र भेटता तेव्हा एक बहीण तिने प्रचारात मासिक कसं दिलं याबद्दलचा अनुभव सांगते. मग आता तुम्ही काय करणार? तुमचा अनुभवही तुम्ही लगेच सांगाल का? हे खरंय, की तुमचा अनुभव ऐकून ग्रुपमधल्या सगळ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल, पण तरीसुद्धा तुम्ही तो सांगायची घाई करणार नाही. कारण तुम्ही जर तसं केलं तर त्या बहिणीला वाटेल की ती तुमच्या इतकी कुशल नाही. आणि यामुळे कदाचित सेवेमधला तिचा आनंद कमी होऊ शकतो. म्हणून मग तुम्ही तुमचा अनुभव नंतर केव्हातरी सांगायचं ठरवाल. असं करून तुम्ही हेच दाखवता की, तुम्ही तुमच्या भाऊबहिणींचा विचार करत आहात. पण बायबल अभ्यास सुरू करण्याचं जे कौशल्यं तुमच्याकडे आहे, त्याचा मात्र तुम्ही उपयोग करत राहाल.

९. आपण आपल्या क्षमतांचा कसा उपयोग केला पाहिजे?

आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याजवळ ज्या काही क्षमता आहेत त्या आपल्याला यहोवानेच दिल्या आहेत. त्यामुळे आपण त्यांचा उपयोग लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे म्हणून नाही, तर मंडळीला प्रोत्साहन मिळेल यासाठी केला पाहिजे. (फिलिप्पै. २:३) अशा प्रकारे आपण आपल्या क्षमतांचा उपयोग यहोवाच्या कामासाठी केला तर आपण नक्कीच आनंदी होऊ. कारण आपण तसं इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नाही तर यहोवाची स्तुती करण्यासाठी करतो.

१०. आपण दुसऱ्‍यांना कमी का लेखू नये?

१० आपण सावध नसलो तर आपण आपल्या क्षमतांची तुलना इतरांच्या कमतरतांशी करू आणि हे धोक्याचं ठरू शकतं. उदाहरणार्थ, एक भाऊ खूप चांगलं जाहीर भाषण देत असेल. पण कदाचित तो मनातल्या मनात अशा एका बांधवाला कमी लेखत असेल जो त्याच्या इतकी चांगली भाषणं देत नाही. पण असं करणं चुकीचं ठरेल. कारण हा बांधव कदाचित इतर गोष्टींबाबतीत चांगला असेल, जसं की पाहुणचार करण्यात, मुलांना चांगलं वळण लावण्यात आणि आवेशाने सेवाकार्य करण्यात. यावरून आपण हेच शिकतो की आपण दुसऱ्‍यांना कमी लेखू नये. याउलट, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की सर्व भाऊबहिणींमध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि कौशल्यं आहेत. आणि ते त्यांचा उपयोग यहोवाची सेवा करण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी करत आहे.

इतरांच्या उदाहरणांतून शिका

११. आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा प्रयत्न का केला पाहिजे?

११ हे खरं आहे की आपण इतरांसोबत स्वतःची तुलना करू नये, पण देवाच्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणांतून आपण नक्कीच खूप काही शिकू शकतो. उदाहरणार्थ, आपण येशूकडून बरंच काही शिकू शकतो. तो परिपूर्ण होता. तरी अपरिपूर्ण मानव त्याने दाखवलेल्या सुंदर गुणांतून आणि कामांतून शिकू शकतात. (१ पेत्र २:२१) आपण जर त्याच्या उदाहरणाचं जवळून अनुकरण करायचा प्रयत्न केला तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे यहोवाची सेवा करता येईल आणि सेवाकार्यातलं आपलं कौशल्यंही वाढवता येईल.

१२-१३. दावीदच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१२ बायबलमध्ये अशा कितीतरी विश्‍वासू स्त्री-पुरूषांची उदाहरणं आहेत जे आपल्यासारखेच अपरिपूर्ण होते. पण तरीसुद्धा आपण त्यांच्या उदाहरणांचं अनुकरण करू शकतो. (इब्री ६:१२) दावीद राजाचाच विचार करा. त्याच्याबद्दल यहोवाने म्हटलं, की तो “माझ्या मनासारखा माणूस” आहे. (प्रे. कार्यं १३:२२) पण दावीद परिपूर्ण नव्हता. त्याने काही गंभीर चुका केल्या होत्या. असं असलं तरी तो आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. असं का म्हणता येईल? कारण जेव्हा त्याची चूक सुधारण्यात आली तेव्हा त्याने कारणं दिली नाहीत. उलट, कडक शब्दांत दिलेला सल्ला त्याने स्वीकारला आणि त्याने जे काही केलं होतं त्याबद्दल त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला.—स्तो. ५१:३, ४, १०-१२.

१३ दावीदच्या उदाहरणातून शिकण्यासाठी आपण स्वतःला काही प्रश्‍न विचारले पाहिजेत. जसं की, ‘मला सल्ला दिला जातो तेव्हा मला कसं वाटतं? मी लगेच माझ्या चुका कबूल करतो का, की कारणं द्यायचा प्रयत्न करतो? मी स्वतःच्या चुकांचा दोष लगेच दुसऱ्‍यांवर लावतो का? मी तीच चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करतो का?’ तुम्ही बायबलमधल्या इतर विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणाबद्दल वाचतानासुद्धा स्वतःला अशाच प्रकारचे प्रश्‍न विचारू शकता. तुम्ही विचार करू शकता की त्यांनाही तुमच्यासारख्याच समस्यांचा सामना करावा लागला होता का, आणि त्या वेळी त्यांनी कोणते चांगले गुण दाखवले. बायबलमधून अशा प्रत्येक सेवकाबद्दल वाचताना स्वतःला विचारा: ‘यहोवाच्या या विश्‍वासू सेवकाचं मी आणखी चांगल्या प्रकारे अनुकरण कसं करू शकतो?’

१४. आपल्या भाऊबहिणींच्या उदाहरणांवर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

१४ आपण आपल्या भाऊबहिणींच्या उदाहरणातूनही बरंच काही शिकू शकतो; मग ते लहान असोत किंवा मोठे. उदाहरणार्थ, तुमच्या मंडळीत असं कोणी आहे का जो बऱ्‍याच काळापासून एखाद्या समस्येचा विश्‍वासूपणे सामना करत आहे. जसं की, मित्रांच्या दबावाचा, कुटुंबाच्या विरोधाचा किंवा एखाद्या आजाराचा. त्या भावामध्ये किंवा बहिणीमध्ये तुम्हाला असे काही गुण दिसतात का, जे तुम्हाला स्वतःमध्ये वाढवायला आवडतील? अशा चांगल्या उदाहरणांबद्दल विचार केल्यावर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या समस्यांचा सामना करायला मदत होईल. खरंच, आपण यहोवाचे किती आभारी आहोत, की विश्‍वासाची अशी जिवंत उदाहरणं आपल्यामध्ये आहेत.—इब्री १३:७; याको. १:२, ३.

यहोवाची आनंदाने सेवा करा

१५. पौलने दिलेल्या सल्ल्याचा उपयोग करून आपण आज यहोवाची सेवा आनंदाने कशी करत राहू शकतो?

१५ आपल्याला जर मंडळीतली शांती आणि एकता टिकवून ठेवायची असेल, तर आपल्यापैकी प्रत्येकाने यहोवाच्या सेवेत सगळ्यात चांगलं ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांचाच विचार करा. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या आणि दान देण्यात आले होते. (१ करिंथ. १२:४, ७-११) पण त्यामुळे त्यांनी एकमेकांशी स्पर्धा केली नाही किंवा त्यांच्यात फूट पडली नाही. उलट, पौलने त्यांना प्रोत्साहन देणारा सल्ला दिलं, की “ख्रिस्ताच्या शरीराला मजबूत” करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. तसंच, पौलने इफिसकरांना असं म्हटलं, “जेव्हा प्रत्येक अवयव योग्य प्रकारे कार्य करतो, तेव्हा शरीराची वाढ होते आणि ते प्रेमात स्वतःला मजबूत करत राहतं.” (इफिस. ४:१-३, ११, १२, १६) बऱ्‍याच ख्रिश्‍चनांनी पौलच्या या सल्ल्याप्रमाणे काम केलं आणि त्यामुळे मंडळीतली शांती आणि एकता वाढली. हीच गोष्ट आज आपल्या मंडळ्यांमध्येही आपल्याला पाहायला मिळते.

१६. आपण काय करायचं ठरवलं पाहिजे? (इब्री लोकांना ६:१०)

१६ आपण हे ठरवलं पाहिजे, की आपण कधीच इतरांसोबत स्वतःची तुलना करणार नाही. उलट आपण येशूच्या उदाहरणातून शिकलं पाहिजे आणि त्याच्यासारखे गुण दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासोबतच, आपण बायबल काळातल्या आणि आजच्या काळातल्या विश्‍वासू सेवकांच्या उदाहरणातूनही शिकलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या परीने यहोवाला सर्वात चांगलं ते दिलं तर “तुमचं काम . . . विसरून जायला [तो] अन्यायी नाही.” (इब्री लोकांना ६:१० वाचा.) यहोवाला खूश करण्यासाठी तुम्ही मनापासून जे काही करता त्याची यहोवा कदर करतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि आनंदाने त्याची सेवा करत राहा.

गीत ४५ उन्‍नती करू या!

a दुसरे ज्या प्रकारे यहोवाची सेवा करत आहेत, ते पाहून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. पण आपण स्वतःची तुलना त्यांच्याशी करू नये. असं केल्यामुळे आपण गर्विष्ठ किंवा निराश होऊ शकतो. या लेखातून आपण शिकणार आहोत की आपण या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो आणि यहोवाच्या सेवेत आनंदी कसं राहू शकतो.

b चित्राचं वर्णन: एका बांधवाने तरुणपणी बेथेलमध्ये सेवा केली. त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यांनी आपल्या पत्नीसोबत पायनियरिंग केली. काही काळानंतर त्यांना मुलं झाली तेव्हा त्यांनी त्यांना सेवाकार्य कसं करायचं ते शिकवलं. पण आता त्या बांधवाचं खूप वय झालं आहे, पण तरी ते पत्राने साक्षकार्य करून यहोवाला सर्वात चांगलं ते देत आहे