व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २५

क्षमा करणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो

क्षमा करणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो

“यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली तशी तुम्हीही करा.”​—कल. ३:१३.

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

सारांश *

१. मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना यहोवा प्रेमळपणे काय सांगतो?

 यहोवा आपला निर्माणकर्ता, आपल्याला नियम देणारा आणि आपला न्यायाधीश आहे. (स्तो. १००:३; यश. ३३:२२) त्यामुळे आपण पाप करतो तेव्हा आपल्याला क्षमा करायचा त्याला अधिकार आहे. पण तो आपला प्रेमळ पितासुद्धा आहे. आणि म्हणून आपण मनापासून पश्‍चात्ताप करतो तेव्हा तो आपल्याला क्षमा करायला नेहमी तयार असतो. (स्तो. ८६:५) यशया संदेष्ट्याद्वारे यहोवा आपल्याला प्रेमळपणे असं सांगतो: “तुमची पापं रक्‍तासारखी लाल असली, तरी ती बर्फासारखी शुभ्र केली जातील.”​—यश. १:१८.

२. इतरांसोबत चांगलं नातं टिकवून ठेवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे?

आपण सगळे अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हातून चुका होतात आणि आपण एकमेकांचं मन दुखावतो. (याको. ३:२) मग याचा अर्थ असा होतो का, की आपण एकमेकांसोबत चांगलं नातं ठेवूच शकत नाही? नाही, याचा असा अर्थ होत नाही. आपण नक्कीच एकमेकांसोबत चांगलं नातं ठेवू शकतो. पण त्यासाठी आपण एकमेकांना क्षमा करायला शिकलं पाहिजे. (नीति. १७:९; १९:११; मत्त. १८:२१, २२) यहोवाची इच्छा आहे की जेव्हा आपण छोट्यामोठ्या चुका करतो आणि एकमेकांना दुखावतो, तेव्हा आपण एकमेकांना माफ केलं पाहिजे. (कलस्सै. ३:१३) आणि असं करणं हे आपलं कर्तव्यच आहे. कारण यहोवा आपल्याला कितीतरी वेळा “मोठ्या मनाने” क्षमा करतो.​—यश. ५५:७.

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

या लेखात आपण पाहणार आहोत की अपरिपूर्ण असतानाही आपण यहोवासारखंच इतरांना क्षमा कशी करू शकतो? अशी कोणती पापं आहेत जी आपण मंडळीतल्या वडिलांच्या लक्षात आणून दिली पाहिजेत? आपण इतरांना क्षमा केली पाहिजे असं यहोवा आपल्याला का सांगतो? आणि इतरांनी केलेल्या पापांमुळे ज्या भाऊबहिणींनी नुकसान सहन केलंय त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो?

एखाद्याच्या हातून गंभीर पाप होतं तेव्हा

४. (क) जेव्हा एखाद्याच्या हातून गंभीर पाप होतं तेव्हा त्याने काय केलं पाहिजे? (ख) वडील काय ठरवतात आणि यासाठी ते काय करतात?

एखादं गंभीर पाप झालं असेल, तर ते मंडळीतल्या वडिलांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. अशा गंभीर पापांची काही उदाहरणं आपल्याला १ करिंथकर ६:९, १० मध्ये वाचायला मिळतात. ही अशी पापं आहेत ज्यांमुळे देवाच्या नियमांचा घोर अपमान होतो. एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीच्या हातून जर असं गंभीर पाप घडलं तर त्याने यहोवाकडे ते कबूल केलं पाहिजे आणि मंडळीतल्या वडिलांना जाऊन सांगितलं पाहिजे. (स्तो. ३२:५; याको. ५:१४) वडिलांकडे जाणं का गरजेचं आहे? हे खरंय, की फक्‍त यहोवाच ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर आपल्या पापांची पूर्णपणे क्षमा करू शकतो. * पण पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला मंडळीत राहू द्यायचं की नाही हे बायबल तत्त्वांच्या आधारावर ठरवायची जबाबदारी यहोवाने वडिलांवर सोपवली आहे. (१ करिंथ. ५:१२) कोणताही निर्णय घेण्याआधी वडील काही प्रश्‍नांवर विचार करतात. जसं की, पाप करणाऱ्‍याने ते जाणूनबुजून केलंय का? त्याने ते ठरवून केलंय का? इतरांपासून लपवून ठेवायचा त्याने प्रयत्न केला का? बऱ्‍याच काळापासून तो ते पाप करत होता का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्याला मनापासून पश्‍चात्ताप झालाय हे दिसून येतंय का? आणि यहोवाने त्याला माफ केलंय याची काही चिन्ह दिसतात का?​—प्रे. कार्यं ३:१९.

५. वडील पापी व्यक्‍तीला जी मदत करतात त्यामुळे कोणते चांगले परिणाम होतात?

जेव्हा वडील पाप केलेल्या व्यक्‍तीला भेटतात तेव्हा त्याच्या बाबतीत यहोवाने जो निर्णय घेतलाय तोच निर्णय घ्यायचा ते प्रयत्न करतात. (मत्त. १८:१८) या व्यवस्थेचा मंडळीला कसा फायदा होतो? यामुळे मंडळीचं संरक्षण होतं. कारण पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या ज्या लोकांपासून यहोवाच्या मेंढरांना नुकसान होऊ शकतं त्यांना मंडळीतून काढून टाकलं जातं. (१ करिंथ. ५:६, ७, ११-१३; तीत ३:१०, ११) तसंच, यामुळे पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीलासुद्धा पश्‍चात्ताप करायला आणि यहोवाकडून माफी मिळवायला मदत होते. (लूक ५:३२) पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व्यक्‍तीला यहोवासोबतचं आपलं नातं पुन्हा मजबूत करता यावं म्हणून वडील त्याच्यासाठी प्रार्थना करतात.​—याको. ५:१५.

६. बहिष्कृत झाल्यावरही एका व्यक्‍तीला क्षमा मिळू शकते का? स्पष्ट करा.

पाप केलेल्या व्यक्‍तीला भेटल्यावर जर वडिलांच्या हे लक्षात आलं की तिला पश्‍चात्ताप झालेला नाही, तर अशा व्यक्‍तीला मंडळीतून बहिष्कृत केलं जातं. जर त्याने कायद्याविरुद्ध गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होईल आणि वडील त्याला वाचवायचा प्रयत्न करणार नाहीत. कारण कायदा मोडणाऱ्‍या कोणत्याही  व्यक्‍तीचा न्याय करून त्याला शिक्षा देण्याची परवानगी यहोवाने सरकारांना दिली आहे; मग त्याला पश्‍चात्ताप झालेला असो किंवा नसो. (रोम. १३:४) असं असलं तरी, पुढे जर त्या व्यक्‍तीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने मनापासून पश्‍चात्ताप करून स्वतःमध्ये बदल केला तर यहोवा त्याला माफ करायला तयार आहे. (लूक १५:१७-२४) त्याने खूप गंभीर पाप केलेलं असलं तरी यहोवा त्याला क्षमा करेल.​—२ इति. ३३:९, १२, १३; १ तीम. १:१५.

७. एखाद्याला क्षमा करायचा काय अर्थ होतो?

एखाद्या व्यक्‍तीला माफ केलं जावं की नाही हे ठरवायची जबाबदारी आपल्यावर नाही. तो निर्णय यहोवाचा आहे, त्यामुळे आपल्याला चिंता करायची गरज नाही. पण एक गोष्ट आहे जी आपल्याला ठरवायची आहे. ती कोणती? एखाद्याने केलेल्या गंभीर पापामुळे आपलं नुकसान झालं असेल, तर तिला माफ करायचा निर्णय आपण घेऊ शकतो. ती स्वतः आपल्याकडे येऊन माफी मागेल किंवा मागणारही नाही. पण ती माफी मागो किंवा न मागो, आपण तिला माफ करायचा निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच तिच्याबद्दल आपल्या मनात असलेला राग आणि नाराजी आपण मनातून काढून टाकू शकतो. पण हे नेहमीच सोपं नसतं. त्याला बराच वेळही लागू शकतो. खासकरून जेव्हा आपल्या भावना खूप दुखावलेल्या असतात किंवा आपलं खूप नुकसान झालेलं असतं. १५ सप्टेंबर, १९९४ च्या टेहळणी बुरूज  अंकात असं म्हटलं होतं: “पाप करणाऱ्‍याला क्षमा केल्याने तुम्ही दोषाकडे दुर्लक्ष करत आहात असा अर्थ होत नाही, हे ओळखा. ख्रिश्‍चनांसाठी क्षमाशीलता म्हणजे, विश्‍वासाने ती गोष्ट यहोवाच्या हातात सोडणे. तो विश्‍वाचा नीतिमान न्यायाधीश आहे व योग्य वेळी न्याय तडीस नेईल.” तर यावरून कळतं, की दुसऱ्‍यांना माफ करणं म्हणजे ती गोष्ट यहोवाच्या  हातात सोपवून देणं आणि हा भरवसा ठेवणं की तो योग्य न्याय करेल. पण आपण दुसऱ्‍यांना क्षमा करावी असं यहोवाला आपल्याला का सांगतो?

यहोवा आपल्याला क्षमा करायला का सांगतो?

८. इतरांना माफ केल्यामुळे यहोवाच्या दयेबद्दल आपल्याला कदर आहे हे कसं दिसून येतं?

माफ केल्यामुळे यहोवाच्या दयेबद्दल आपण कदर दाखवतो.  येशूने लोकांना एक उदाहरण दिलं ज्यात त्याने यहोवाची तुलना एका मालकाशी केली. त्या मालकाच्या दासांपैकी एका दासावर त्याचं खूप मोठं कर्ज असतं. पण तरी मालक ते मोठं कर्ज माफ करतो. पण याच दासाचं दुसऱ्‍या एका दासावर थोडंसं कर्ज असतं. तो मात्र त्या दुसऱ्‍या दासाला दया दाखवत नाही आणि त्याचं कर्ज माफ करत नाही. (मत्त. १८:२३-३५) या उदाहरणातून येशू आपल्याला काय शिकवायचा प्रयत्न करत होता? यहोवाने आपल्याला किती दया दाखवली आहे, याची जर आपल्याला मनापासून कदर असेल तर आपोआपच आपल्याला इतरांना माफ करावंसं वाटेल. (स्तो. १०३:९) याबद्दल बऱ्‍याच वर्षांआधी एका टेहळणी बुरूज मासिकात असं म्हटलं होतं: “यहोवाने आपल्याला ख्रिस्ताद्वारे जी क्षमा केली आहे आणि जी दया दाखवली ती इतकी मोठी आहे, की आपण दुसऱ्‍यांना कितीही वेळा माफ केलं तरी आपण कधीच त्याची बरोबरी करू शकणार नाही.”

९. यहोवा कोणाला दया दाखवतो? (मत्तय ६:१४, १५)

क्षमा करणाऱ्‍यांनाच क्षमा केली जाईल.  जे दुसऱ्‍यांना दया दाखवतात त्यांना यहोवासुद्धा दया दाखवतो. (मत्त. ५:७; याको. २:१३) येशूने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं तेव्हा त्यानेसुद्धा ही गोष्ट स्पष्ट केली. (मत्तय ६:१४, १५ वाचा.) आणि बऱ्‍याच शतकांआधी यहोवाने ईयोबच्या बाबतीत जे केलं त्यावरूनही ही गोष्ट दिसून आली. अलीफज, बिल्दद आणि सोफर या ईयोबच्या मित्रांनी त्याला पुष्कळ बरं-वाईट बोलून त्याचं मन दुखावलं होतं. पण यहोवाने ईयोबला त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सांगितलं. आणि त्याने तसं केल्यानंतर यहोवाने त्याला आशीर्वाद दिला.​—ईयो. ४२:८-१०.

१०. मनात राग ठेवल्यामुळे काय नुकसान होतं? (इफिसकर ४:३१, ३२)

१० मनात राग ठेवल्यामुळे आपलंच नुकसान होतं.  जेव्हा आपण मनातून राग काढून टाकतो तेव्हा आपलं मन हलकं होतं, शांत होतं. आणि आपल्याला ती शांती मिळावी अशी यहोवाची इच्छा आहे. (इफिसकर ४:३१, ३२ वाचा.) म्हणूनच तो आपल्याला सांगतो की, “राग सोडून दे आणि क्रोध झटकून टाक.” (स्तो. ३७:८) हा सल्ला खरंच खूप फायद्याचा आहे. कारण मनात राग ठेवल्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडतं. (नीति. १४:३०) जसं विष प्यायल्यामुळे दुसऱ्‍या कोणाला नाही तर आपल्यालाच त्याचा त्रास होईल, तसंच मनात राग ठेवल्यामुळे आपलं मन दुखावणाऱ्‍याला नाही तर आपल्यालाच त्याचा वाईट परिणाम भोगावा लागेल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की आपण जेव्हा दुसऱ्‍यांना क्षमा करतो तेव्हा आपण स्वतःचंच भलं करत असतो. (नीति. ११:१७) कारण यामुळे आपल्याला मनाची शांती मिळते आणि आपण आनंदाने यहोवाची सेवा करत राहू शकतो.

११. बदला घ्यायच्या बाबतीत बायबल काय म्हणतं? (रोमकर १२:१९-२१)

११ बदला घेणं यहोवाचं काम आहे.  जेव्हा कोणी आपल्याविरुद्ध पाप करतं, तेव्हा त्यांचा बदला घ्यायचा अधिकार यहोवाने आपल्याला दिलेला नाही. (रोमकर १२:१९-२१ वाचा.) आपण अपरिपूर्ण आहोत आणि त्यामुळे देवासारखा एखाद्या गोष्टीचा आपण योग्यपणे न्याय करू शकत नाही. (इब्री ४:१३) शिवाय, कधीकधी आपण आपल्या भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतो. पण यहोवाने याकोबला असं लिहायची प्रेरणा दिली होती, “रागाच्या आहारी जाणारा माणूस देवाच्या नीतिमत्त्वाप्रमाणे कार्य करू शकत नाही.” (याको. १:२०) याउलट, यहोवा नीतिमान आहे आणि म्हणून आपण ही खातरी ठेवू शकतो की तो नक्कीच योग्य न्याय करेल.

राग आणि नाराजी मनातून काढून टाका. सगळंकाही यहोवावर सोपवून द्या. तो पापामुळे झालेलं सगळं नुकसान भरून काढेल (परिच्छेद १२ पाहा)

१२. यहोवावर आपला भरवसा आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१२ माफ केल्यामुळे, यहोवा योग्य न्याय करेल असा आपल्याला भरवसा आहे हे दिसून येतं.  एखादी गोष्ट आपण यहोवाच्या हातात सोपवून देतो तेव्हा आपण हे दाखवत असतो, की यहोवा झालेलं सगळं नुकसान भरून काढेल असा आपल्याला भरवसा आहे. देवाने अभिवचन दिलेल्या नवीन जगात मनावर झालेल्या जखमा “कोणालाही आठवणार नाहीत, आणि पुन्हा कधीच त्या कोणाच्या मनात येणार नाहीत.” (यश. ६५:१७) पण जेव्हा आपलं खूप मन दुखावलेलं असतं किंवा आपलं मोठं नुकसान झालेलं असतं, अशा वेळी आपल्याविरुद्ध पाप केलेल्या व्यक्‍तीबद्दल मनात असलेला राग काढून टाकणं खरंच शक्य आहे का? काही जणांनी हे कसं केलं, हे आता आपण पाहू या.

माफ केल्यामुळे ज्यांना आशीर्वाद मिळाले

१३-१४. टोनी आणि जोसच्या उदाहरणातून क्षमा करायच्या बाबतीत तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१३ इतरांनी केलेल्या पापांमुळे आपल्या बऱ्‍याच भाऊबहिणींचं मन दुखावलं होतं आणि त्यांचं मोठं नुकसान झालं होतं. पण तरीसुद्धा त्यांनी त्यांना माफ करायचा निर्णय घेतला. असं केल्यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?

१४ फिलिपाईन्समध्ये राहणाऱ्‍या टोनीचं * उदाहरण घ्या. सत्यात येण्याआधी त्याला कळलं, की जोस नावाच्या एका माणसाने त्याच्या मोठ्या भावाचा खून केला आहे. त्या वेळी टोनी खूप रागीट स्वभावाचा होता. आणि त्याला या गोष्टीचा बदला घ्यायचा होता. पण जोसला अटक करून जेलमध्ये टाकण्यात आलं. नंतर जेव्हा जोस तुरुंगातून सुटला तेव्हा टोनीने शपथ घेतली, की तो त्याला शोधून ठार मारेल. त्यासाठी त्याने एक बंदुकही विकत घेतली. पण यादरम्यान टोनीचा यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू झाला. टोनी म्हणतो: “अभ्यास करताना मला कळलं, की मला माझ्या जीवनात बरेच बदल करावे लागतील. आणि मनातला राग काढून टाकावा लागेल.” त्यानंतर काही काळाने टोनीचा बाप्तिस्मा झाला आणि तो मंडळीत वडील म्हणून सेवा करू लागला. विचार करा टोनीला जेव्हा कळलं, की जोससुद्धा आता एक बाप्तिस्मा घेतलेला यहोवाचा सेवक बनलाय, तेव्हा त्याला कसं वाटलं असेल. दोघंही एकमेकांना भेटले तेव्हा ते एकमेकांच्या गळ्यात पडले आणि टोनीने जोसला सांगितलं, की त्याने त्याला माफ केलं आहे. टोनी म्हणतो: “जोसला माफ केल्यामुळे मला जो आनंद झाला आणि शांती मिळाली, ती शब्दांत व्यक्‍त करता येणार नाही.” खरंच, टोनीने माफ करायची तयारी दाखवली आणि म्हणून यहोवाने त्याला आशीर्वाद दिला.

पीटर आणि सूझीच्या अनुभवावरून कळतं की मनातून राग काढून टाकणं शक्य आहे (परिच्छेद १५-१६ पाहा)

१५-१६. पीटर आणि सूझीच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१५ आता पीटर आणि सूझीचा अनुभव लक्षात घ्या. १९८५ ची गोष्ट आहे. हे दोघंही राज्यसभागृहात होते आणि सभा सुरू होती. मग अचानक एक मोठा स्फोट झाला. एका माणसाने राज्य सभागृहात बॉम्ब लावला होता. या स्फोटामुळे सूझीला खूप गंभीर दुखापत झाली. तिच्या ऐकण्याच्या आणि बघण्याच्या क्षमतेवर कायमचा परिणाम झाला. आणि तिची वास घेण्याची क्षमता पूर्णपणे निघून गेली. * पीटर आणि सूझी नेहमी विचार करायचे, की ‘किती क्रूर असेल तो माणूस!’ बऱ्‍याच वर्षांनंतर त्या माणसाला अटक करण्यात आली आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पीटर आणि सूझीला जेव्हा विचारण्यात आलं, की त्यांनी त्या माणसाला माफ केलंय का, तेव्हा ते म्हणाले: “यहोवा आपल्याला शिकवतो, की मनात राग बाळगल्यामुळे शारीरिक, भावनिक आणि मानसिक रीत्या आपलंच नुकसान होतं. म्हणून त्या घटनेनंतर आम्ही यहोवाला लगेच प्रार्थना केली, की त्या व्यक्‍तीबद्दल आमच्या मनात असलेला राग आम्हाला काढून टाकायला त्याने मदत करावी म्हणजे आम्हाला आमचं जीवन शांतीने जगता येईल.”

१६ त्या व्यक्‍तीला माफ करणं पीटर आणि सूझीला सोपं गेलंय का? नाही. कारण ते सांगतात: “सूझीला झालेल्या दुखापतीमुळे जेव्हा जेव्हा तिला त्रास होतो, तेव्हा रागाच्या भावना आमच्या मनात पुन्हा उफाळून येतात. पण आम्ही त्यावर जास्त विचार करत नाही. त्यामुळे आमचा राग लगेच शांत होतो. आज आम्ही अगदी प्रामाणिकपणे असं म्हणू शकतो, की तो माणूस पुढे जर सत्यात आला, तर त्याला आम्ही आनंदाने आमचा भाऊ म्हणून स्वीकारू. या अनुभवातून आम्हाला हे शिकायला मिळालंय, की बायबलची तत्त्वं पाळल्यामुळे मनाला जी शांती मिळते, ती आणखी कशानेही मिळू शकत नाही. तसंच झालेलं नुकसान यहोवा लवकरच भरून काढेल यावर विचार केल्यामुळेही आम्हाला खूप सांत्वन मिळालंय.”

१७. मायराच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

१७ मायरा सत्य शिकली तेव्हा तिचं आधीच लग्न झालं होतं आणि तिला दोन मुलं होती. पण तिच्या नवऱ्‍याने सत्य स्वीकारलं नाही. पुढे त्याने व्यभिचार केला आणि त्यांना सोडून तो निघून गेला. मायरा म्हणते: “आपली जवळची व्यक्‍ती जेव्हा आपल्याला धोका देते तेव्हा खूप धक्का बसतो. विश्‍वासच बसत नाही. खूप दुःख होतं, पस्तावा होतो. त्या व्यक्‍तीवर आणि स्वतःवरही खूप राग येतो. माझा नवरा दोन मुलांची जबाबदारी माझ्यावर टाकून गेला तेव्हा मलाही असंच वाटलं.” नवऱ्‍याशी तिचा संबंध तर कायमचा तुटला, पण विश्‍वासघाताचं दुःख तिला विसरणं शक्य नव्हतं. मायरा म्हणते: “त्या भावना मला कित्येक महिने छळत राहिल्या त्यामुळे यहोवासोबतच्या आणि इतरांसोबतच्या माझ्या नात्यावर त्याचा परिणाम होत होता.” पण आता मायरा सांगते की तिने आपल्या मनातून तो राग काढून टाकलाय. आता तिच्या मनात नवऱ्‍याबद्दल काही नाराजी नाही. उलट तिला असं वाटतं की, त्यानेही यहोवाबद्दल शिकावं. आता मायरा भविष्याकडे आशेने पाहते. तिने एकटीनेच आपल्या दोन मुलांना सत्यात वाढवलं आणि आज ती त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबांसोबत आनंदाने यहोवाची सेवा करत आहे.

यहोवाचा परिपूर्ण न्याय

१८. यहोवा या विश्‍वाचा सर्वोच्च न्यायाधीश असल्यामुळे आपण कोणती खातरी ठेवू शकतो?

१८ कोणाचाही न्याय करायची जबाबदारी आपल्यावर नाही. म्हणून आपण त्याबद्दल चिंता करायची गरज नाही. तो न्याय यहोवा करेल. कारण तोच या विश्‍वातला सर्वोच्च न्यायाधीश आहे. (रोम. १४:१०-१२) चूक काय आणि बरोबर काय हे यहोवाच सांगू शकतो. आणि त्याच्या या परिपूर्ण स्तरांप्रमाणे तो नेहमी योग्य न्याय करेल याची खातरी आपण ठेवू शकतो. (उत्प. १८:२५; १ राजे ८:३२) तो कधीच कोणावर अन्याय करणार नाही!

१९. यहोवा लवकरच काय करणार आहे?

१९ माणसाच्या अपरिपूर्णतेमुळे आणि पापांमुळे झालेले वाईट परिणाम यहोवा लवकरच पूर्णपणे काढून टाकेल. आपण त्या काळाची आतुरतेने वाट पाहत आहोत. त्या वेळी आपल्या सगळ्या शारीरिक समस्या दूर केल्या जातील. तसंच आपल्या मनावर झालेल्या जखमासुद्धा कायमच्या भरून काढल्या जातील. (स्तो. ७२:१२-१४; प्रकटी. २१:३, ४) त्यांची आठवणसुद्धा कधी आपल्या मनात येणार नाही. तो सुंदर काळ यायची वाट पाहत असताना, आपण यहोवाचे आभार मानू शकतो, की त्याने आपल्याला त्याचं अनुकरण करून इतरांना माफ करायची क्षमता दिली आहे.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

^ पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना माफ करायला यहोवा नेहमी तयार असतो. म्हणून कोणी जर आपलं मन दुखावलं तर आपणही त्याच्यासारखंच माफ करायला तयार असलं पाहिजे. या लेखात आपण पाहणार आहोत की अशा कोणत्या चुका आहेत ज्यांची आपण क्षमा करू शकतो, आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण मंडळीतल्या वडिलांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. तसंच आपण एकमेकांना क्षमा करावी असं यहोवा आपल्याला का सांगतो आणि असं केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतील हेसुद्धा आपण पाहणार आहोत.

^ १५ एप्रिल, १९९६ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.

^ काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ JW ब्रॉडकास्टिंगवर असलेला शुल्स: सदमे से उबरा जा सकता है  हा व्हिडिओ पाहा.