व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २७

‘यहोवावर आशा ठेवा’

‘यहोवावर आशा ठेवा’

“यहोवावर आशा ठेव; धैर्यवान हो आणि आपलं मन खंबीर कर.”​—स्तो. २७:१४.

गीत २४ ध्येय डोळ्यांपुढे ठेवा!

सारांश *

१. (क) यहोवाने आपल्याला कोणती आशा दिली आहे? (ख) ‘यहोवावर आशा ठेवण्याचा’ काय अर्थ होतो? (“शब्दांचा अर्थ” पाहा.)

 यहोवावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांना त्याने एक खूप सुंदर आशा दिली आहे. लवकरच तो आजार, दुःख आणि मृत्यू या गोष्टी कायमच्या काढून टाकणार आहे. (प्रकटी. २१:३, ४) तसंच त्याच्यावर आशा ठेवणारे “नम्र लोक” त्याच्या मदतीने या पृथ्वीला एक सुंदर नंदनवन बनवतील. (स्तो. ३७:९-११) आणि त्या वेळी आपल्या प्रत्येकाचं यहोवासोबत एक खूप जवळचं नातं असेल. आज आपलं त्याच्याशी जे नातं आहे त्यापेक्षाही जवळचं आणि मजबूत ते नातं असेल. खरंच यहोवाने आपल्याला किती सुंदर आशा दिली आहे! पण यहोवाने वचन दिलेल्या या सर्व गोष्टी खरंच घडतील असं आपण का म्हणू शकतो? कारण तो दिलेलं वचन कधीच मोडत नाही. आणि म्हणूनच आपण ‘यहोवावर आशा ठेवू शकतो.’ * (स्तो. २७:१४) तो जोपर्यंत त्याचा उद्देश पूर्ण करत नाही तोपर्यंत धीराने आणि आनंदाने त्याची वाट पाहत राहण्याद्वारे आपण दाखवतो की आपण खरंच त्याच्यावर आशा ठेवत आहोत.​—यश. ५५:१०, ११.

२. आज आपण यहोवाचं कोणतं वचन पूर्ण झालेलं पाहत आहोत?

यहोवा दिलेलं वचन नेहमी पूर्ण करतो हे त्याने आधीच दाखवून दिलंय. याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात पाहायला मिळतं. तिथे यहोवाने असं वचन दिलं होतं की आपल्या काळात तो सर्व राष्ट्रांच्या, वंशांच्या आणि भाषा बोलणाऱ्‍या लोकांना एकत्र आणेल आणि ते सर्व ऐक्याने त्याची शुद्ध उपासना करतील. आज हे शब्द पूर्ण झाले आहेत आणि आपण या लोकांच्या गटाला “मोठा लोकसमुदाय” म्हणून ओळखतो. (प्रकटी. ७:९, १०) या मोठ्या लोकसमुदायात सगळ्या वंशांचे, देशांचे आणि संस्कृतींचे स्त्रीपुरुष आणि मुलं आहेत. ते संपूर्ण जगात एका प्रेमळ कुटुंबाप्रमाणे शांतीने आणि ऐक्याने यहोवाची उपासना करत आहेत. (स्तो. १३३:१; योहान १०:१६) आणि आज ते चांगल्या जगाच्या त्यांच्या आशेबद्दल इतरांनाही आवेशाने सांगत आहेत. (मत्त. २८:१९, २०; प्रकटी. १४:६, ७; २२:१७) तुम्हीसुद्धा जर या मोठ्या लोकसमुदायाचा भाग असाल तर ही आशा नक्कीच तुम्हालाही खूप प्रिय असेल.

३. सैतान आपल्याला काय पटवून द्यायचा प्रयत्न करतो?

सैतानाची हीच इच्छा आहे की तुम्ही आशा सोडून द्यावी. त्याला कसंही करून तुम्हाला हे पटवून द्यायचंय की यहोवाला तुमची पर्वा नाही आणि त्याने दिलेली वचनं तो पूर्ण करणार नाही. पण जर सैतान तुम्हाला हे पटवून देण्यात यशस्वी झाला, आणि जर आपण आपली आशा सोडून दिली, तर आपण खचून जाऊ आणि कदाचित यहोवाची सेवा करायचंही सोडून देऊ. ईयोबच्या बाबतीतही सैतानाने हेच करायचा प्रयत्न केला होता.

४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत? (ईयो. १:९-१२)

ईयोबने यहोवाला सोडून द्यावं म्हणून सैतानाने कोणकोणते डावपेच वापरले याबद्दल आपण या लेखात चर्चा करू या. (ईयोब १:९-१२ वाचा.) यासोबतच ईयोबच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो, तसंच देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि तो त्याची वचनं नक्की पूर्ण करेल हे आपण आठवणीत का ठेवलं पाहिजे याबद्दलही आपण चर्चा करू.

ईयोबने आशा सोडून द्यावी म्हणून सैतान प्रयत्न करतो

५-६. ईयोबवर एकाच वेळी कोणकोणती संकटं आली?

ईयोबच्या आयुष्यात सगळंकाही व्यवस्थित चाललं होतं. यहोवासोबत त्याचं जवळचं नातं होतं. त्याचं एक मोठं आनंदी कुटुंब होतं. आणि त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती होती. (ईयो. १:१-५) पण फक्‍त एका दिवसात त्याने आपलं जवळपास सगळं गमावलं. सर्वात आधी त्याची धनसंपत्ती गेली. (ईयो. १:१३-१७) मग त्याच दिवशी त्याची सगळी मुलं एका दुर्घटनेत मारली गेली. खरंच ईयोबवर किती मोठं दुःख कोसळलं होतं! कुटुंबात एक जरी मूल वारलं तरी आईवडिलांचं जीवन पार उद्ध्‌वस्त होऊन जातं. मग कल्पना करा, की आपली दहा मुलं वारली आहेत हे कळल्यावर ईयोब आणि त्याची पत्नी किती हादरून गेले असतील आणि दुःखामुळे त्यांची काय अवस्था झाली असेल. अहवालात म्हटलंय की दुःखामुळे ईयोबने आपला झगा फाडला आणि तो अक्षरशः जमिनीवर कोसळला!​—ईयो. १:१८-२०.

यानंतर सैतानाने ईयोबच्या आरोग्यावर हल्ला केला आणि त्याची अगदी दयनीय अवस्था करून टाकली. (ईयो. २:६-८; ७:५) एकेकाळी ईयोबला समाजात खूप मानसन्मान होता. लोक सल्ला घ्यायला त्याच्याकडे यायचे. (ईयो. ३१:१८) पण आता त्याला कोणीही विचारत नव्हतं. तो अगदी एकटा पडला होता. त्याच्या भावांनी, जवळच्या मित्रांनी, इतकंच काय तर त्याच्या घरच्या नोकरांनीसुद्धा त्याला एक प्रकारे वाळीत टाकलं होतं!​—ईयो. १९:१३, १४, १६.

ईयोबला किती दुःख झालं असेल हे आज बरेच साक्षीदार समजू शकतात (परिच्छेद ७ पाहा) *

७. (क) ईयोबवर आलेल्या संकटांबद्दल त्याला काय वाटलं, पण तरीही त्याने काय केलं नाही? (ख) चित्रात दाखवल्याप्रमाणे आज यहोवाच्या एखाद्या सेवकावर कशा प्रकारे संकट येऊ शकतं?

सैतान ईयोबला असं पटवून द्यायचा प्रयत्न करत होता, की यहोवा त्याच्यावर नाराज असल्यामुळे त्याच्यावर ही सगळी दुःखं ओढावली आहेत. म्हणूनच सैतानाने ईयोबच्या दहा मुलांना ठार मारण्यासाठी एक वादळ आणलं. ईयोबची मुलं एका घरात सोबत मिळून मेजवानी करत होते तेव्हा त्या घराला वादळाचा तडाखा बसून ते कोसळलं. आणि त्यात त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. (ईयो. १:१८, १९) तसंच, ईयोबच्या कळपांना आणि त्यांची राखण करणाऱ्‍या सेवकांना भस्म करण्यासाठी त्याने आकाशातून आगीचा वर्षावही केला. (ईयो. १:१६) ज्या प्रकारे ते वादळ आलं आणि आकाशातून आगीचा वर्षाव झाला, त्यावरून ईयोबला वाटलं की यहोवानेच ती संकटं आणली आहेत. आणि म्हणून त्याने असा निष्कर्ष काढला, की आपण काहीतरी चूक केल्यामुळे यहोवा त्याच्यावर नाराज आहे. पण असं असलं तरी, ईयोबने आपल्या स्वर्गातल्या पित्याची निंदा केली नाही. उलट तो म्हणाला, की इतक्या वर्षांपासून देवाने मला कितीतरी चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. मग देवाकडून फक्‍त चांगलं तेच का घ्यावं, वाईट का घेऊ नये? शेवटी तो म्हणाला: “यहोवाच्या नावाची स्तुती होत राहो.” (ईयो. १:२०, २१; २:१०) ईयोबची सगळी संपत्ती, त्याची मुलं आणि त्याचं आरोग्य त्याने गमावलं होतं तरीसुद्धा तो यहोवाला विश्‍वासू राहिला. म्हणून सैतानाने एक नवीन युक्‍ती लढवली. ती कोणती होती?

८. ईयोबच्या बाबतीत सैतानाने आणखी कोणती युक्‍ती लढवली?

सैतानाने ईयोबच्या तीन मित्रांचा वापर करून त्याला स्वतःच्याच नजरेत पाडायचा प्रयत्न केला. त्या तिघांनीही ईयोबवर बरेच आरोप लावले. आणि ईयोबने केलेल्या वाईट गोष्टींमुळेच त्याच्यावर ही दुःख ओढावली आहेत असं त्यांनी त्याला सांगायचा प्रयत्न केला. (ईयो. २२:५-९) तसंच, त्यांनी त्याला असंही पटवून द्यायचा प्रयत्न केला की त्याने कितीही चांगल्या गोष्टी केल्या, तरी देवाला त्यामुळे काही फरक पडत नाही. (ईयो. ४:१८; २२:२, ३; २५:४) एका अर्थाने ते ईयोबच्या मनात शंका निर्माण करत होते. देवाचं त्याच्यावर प्रेम नाही, तो त्याची काळजी घेणार नाही आणि त्याची सेवा करायचा काहीच उपयोग नाही असं ते त्याला सांगायचा प्रयत्न करत होते. ईयोबच्या जागी जर दुसरा कोणी असता, तर या शब्दांमुळे तो किती खचून गेला असता!

९. कोणत्या गोष्टीमुळे ईयोब हिम्मत हारला नाही?

ते चित्र डोळ्यापुढे उभं करायचा प्रयत्न करा. आजारामुळे अगदी बेजार झालेला ईयोब राखेत बसलाय. त्याला सतत असाहाय्य वेदना होता आहेत. (ईयो. २:८) डोंगराएवढ्या दुःखाखाली ईयोब अगदी दबून गेलाय. आपल्या लेकरांना गमावल्याच्या दुःखाने त्याच्या मनाला पोखरून टाकलंय. त्याचे मित्र सारखे त्याला दोष लावत आहेत आणि तो एक वाईट माणूस आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करत आहेत. पण सुरवातीला ईयोब एक शब्दही बोलत नाही. (ईयो. २:१३–३:१) ईयोब काहीच बोलत नाही हे पाहून त्याच्या मित्रांना कदाचित वाटलं असेल, की त्याने देवाला सोडून दिलंय आणि आता तो त्याची निंदा करेल. पण जर त्यांना खरंच असं वाटलं असेल, तर त्यांची किती घोर निराशा झाली असेल. कारण काही वेळाने ईयोबने कदाचित त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्या डोळ्यात डोळे घालून असं म्हटलं: “मरेपर्यंत मी माझा खरेपणा सोडणार नाही!” (ईयो. २७:५) इतकं दुःख सोसूनसुद्धा ईयोब हिम्मत का हारला नाही? आणि त्याचा विश्‍वास इतका मजबूत का होता? कारण दुःखांनी त्याला चारही बाजूंनी घेरलं होतं तरी त्याने क्षणभरासाठीही आपली आशा नजरेआड होऊ दिली नाही. या सगळ्या दुःखातून आपला प्रेमळ देव एक ना एक दिवस आपल्याला नक्की सोडवेल याची त्याला पक्की खातरी होती. आपला जीव जरी गेला तरी यहोवा आपल्याला पुन्हा जिवंत करेल हे त्याला माहीत होतं.​—ईयो. १४:१३-१५.

ईयोबच्या उदाहरणातून आपण काय शिकतो?

१०. ईयोबच्या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

१० ईयोबच्या अहवालातून आपण हे शिकतो, की सैतान आपल्याला यहोवाला सोडून द्यायला कधीच भाग पाडू शकत नाही. तसंच, आपल्यासोबत जे काही घडतं, त्याची यहोवाला पूर्ण कल्पना असते हेसुद्धा आपण शिकतो. तसंच, ईयोबसोबत जे घडलं त्यात कोणते वादविषय आहेत हेसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे समजतं. ईयोबकडून आपण आणखी कोणत्या गोष्टी शिकतो हे आता पाहू या.

११. जर आपण यहोवावर भरवसा ठेवला तर आपण कोणत्या गोष्टींची खातरी ठेवू शकतो? (याकोब ४:७)

११ ईयोबने हे दाखवून दिलं, की जर आपण यहोवावर भरवसा ठेवला, तर आपण कोणत्याही कठीण परिस्थितीचा धीराने सामना करू शकतो आणि सैतानाचा विरोध करू शकतो. असं केल्यामुळे काय होईल? बायबल आपल्याला सांगतं की यामुळे सैतान आपल्यापासून दूर पळेल.​—याकोब ४:७ वाचा.

१२. पुनरुत्थानाच्या आशेमुळे ईयोबला संकटांतही टिकून राहायला कशी मदत झाली?

१२ आपण पुनरुत्थानाची आशा मनाशी घट्ट धरून ठेवली पाहिजे. याआधीच्या लेखात आपण पाहिलं होतं की आपण यहोवाला सोडून द्यावं म्हणून सैतान आपल्याला बऱ्‍याचदा मरणाचा धाक दाखवतो. ईयोबच्या बाबतीतही त्याने हेच केलं. त्याने असा दावा केला की आपला जीव वाचवण्यासाठी ईयोब काहीही करायला तयार होईल. अगदी यहोवाला सोडून द्यायलाही तो मागे-पुढे पाहणार नाही. पण हा सैतानाचा गैरसमज होता. कारण संकटांनी ईयोबला चारही बाजूंनी घेरलं आणि मृत्यू त्याला डोळ्यासमोर दिसत होता, तेव्हासुद्धा त्याने यहोवाकडे पाठ फिरवली नाही. ईयोबला ही खातरी होती की यहोवा त्याला सांभाळेल. तसंच, आज ना उद्या यहोवा आपल्याला या सगळ्या संकटांतून सोडवेल अशी पक्की आशाही त्याच्या मनात होती. आणि या आशेनेच त्याला टिकून राहायला मदत केली. ईयोबला हा विश्‍वास होता, की जरी तो जिवंत असताना यहोवाने त्याला संकटांतून सोडवलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला, तरी यहोवा त्याला भविष्यात पुन्हा जिवंत करेल. पुनरुत्थानाच्या आशेबद्दल ईयोबच्या मनात जराही शंका नव्हती. जर आपल्यालाही या आशेवर पूर्ण भरवसा असला, तर कोणी आपल्याला मरणाचा धाक जरी दाखवला तरी आपण कधीच यहोवाला सोडणार नाही.

१३. ईयोबच्या बाबतीत सैतानाने जे डावपेच वापरले, ते समजून घेणं का गरजेचं आहे?

१३ ईयोबच्या बाबतीत सैतानाने जे डावपेच वापरले, ते आपण समजून घेतले पाहिजेत. कारण आज आपल्या बाबतीतही तो असेच डावपेच वापरतो. सैतानाने असा आरोप लावला, की “माणूस  [फक्‍त ईयोबच नाही] आपल्या जीवाच्या बदल्यात आपल्याकडे असलेलं सर्वकाही देईल.” (ईयो. २:४, ५) दुसऱ्‍या शब्दात सैतानाचं म्हणणं आहे, की यहोवाच्या सेवकांचं त्याच्यावर फक्‍त नावापुरतंच प्रेम आहे. आणि जर परिस्थिती जीवावर बेतली तर ते त्याच्याकडे पाठ फिरवायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. तसंच, सैतानाचा असाही दावा आहे, की देवाचं आपल्यावर काही प्रेम नाही आणि आपण त्याच्या मनासारखं वागायचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला काही फरक पडत नाही. पण सैतानाचे हे डावपेच माहीत असल्यामुळे आपण फसत नाही आणि यहोवावर आशा ठेवतो.

१४. आपल्यावर संकटं येतात तेव्हा आपल्याला स्वतःबद्दल काय समजतं? उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१४ जेव्हा आपल्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा स्वतःला आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्याची ती एक संधी आहे, असं आपण समजलं पाहिजे. ईयोबला ज्या संकटांचा सामना करावा लागला, त्यामुळे त्याला आपल्यातल्या कमतरता ओळखता आल्या आणि स्वतःमध्ये सुधारणा करता आली. जसं की, आपल्याला आणखी नम्र व्हायची गरज आहे, हे त्याला समजलं. (ईयो. ४२:३) ईयोबप्रमाणेच जेव्हा आपल्यावरही संकटं येतात, तेव्हा आपल्यालाही स्वतःबद्दल बरंच काही समजतं. निक  * नावाच्या एका भावाला आरोग्याच्या गंभीर समस्या असूनही त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. ते म्हणतात: “जेलमध्ये गेल्यावर आपलं खरं व्यक्‍तिमत्त्व बाहेर येतं. हे आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा एक्स-रे काढून पाहिल्यासारखंच आहे.” आपल्यात कोणत्या कमतरता आहेत हे कळल्यावर आपण त्यात सुधारणा करायचा प्रयत्न करू शकतो.

१५. आपण कोणाचं ऐकलं पाहिजे आणि का?

१५ आपण आपल्या शत्रूंचं नाही तर यहोवाचं ऐकलं पाहिजे. यहोवा ईयोबशी बोलला तेव्हा त्याने लक्ष देऊन ऐकलं. यहोवाने ईयोबला बरेच प्रश्‍न विचारले आणि त्याला विचार करायला लावला. एक प्रकारे यहोवा ईयोबला असं म्हणत होता, ‘तुझ्यासोबत जे काही घडलंय, ते सगळं मला माहीत आहे. मी निर्माण केलेल्या गोष्टींमधून तुला माझी शक्‍ती दिसत नाही का? मग जर मी इतक्या अद्‌भूत गोष्टी निर्माण करू शकतो, तर मी तुझी काळजी घेऊ शकत नाही का?’ यहोवा किती चांगला आहे, याची ईयोबला जाणीव झाली आणि तो नम्रपणे म्हणाला: “मी आपल्या कानांनी तुझ्याबद्दल ऐकलं होतं, पण आता मी प्रत्यक्ष तुला डोळ्यांनी पाहतोय.” (ईयो. ४२:५) ईयोब हे शब्द बोलला तेव्हा तो कदाचित अजूनही तसाच राखेत बसलेला असेल. त्याच्या शरीरावरच्या फोडांच्या जखमांमुळे त्याला अजूनही वेदना होत असतील. आणि आपली मुलं गेल्याचं दुःख अजूनही त्याच्या मनात सलत असेल. पण असं असली तरी यहोवाने ईयोबला आपल्या प्रेमाची खातरी दिली आणि आपण त्याच्यावर खूश असल्याचं त्याला दाखवून दिलं.​—ईयो. ४२:७, ८.

१६. कठीण परिस्थितींचा सामना करत असताना आपण यशया ४९:१५, १६ यात सांगितलेली कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१६ आजसुद्धा कदाचित लोक आपला अपमान करतील. आणि जणू काही आपली किंमतच नाही अशा प्रकारे आपल्याशी वागतील. कदाचित ते आपलं आणि आपल्या संघटनेचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील. आणि आपल्यावर “सर्व प्रकारचे खोटे आरोप” लावतील. (मत्त. ५:११) पण ईयोबच्या अहवालातून आपल्याला हे शिकायला मिळतं, की यहोवाला आपल्याबद्दल हा भरवसा आहे की आपल्याला संकटांचा सामना करावा लागला, तरी आपण त्याला एकनिष्ठ राहू. यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आणि जे त्याची आशा धरतात, त्यांना तो कधीच सोडणार नाही. (यशया ४९:१५, १६ वाचा.) म्हणून देवाचे शत्रू आपली बदनामी करण्यासाठी जी खोटी माहिती पसरवतात तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका! टर्की इथे राहणाऱ्‍या जेम्स नावाच्या एका भावाच्या अनुभवाकडे लक्ष द्या. त्यांच्या कुटुंबाला खूप कठीण परीक्षांचा सामना करावा लागला. जेम्स म्हणतात: “लोक यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बऱ्‍याच वाईट गोष्टी बोलायचे. पण आमच्या लक्षात आलं की आम्ही जर या खोट्या गोष्टी ऐकत बसलो, तर त्यामुळे आम्ही निराश होऊ. म्हणून आम्ही राज्याच्या आशेवर पूर्ण लक्ष लावायचं ठरवलं आणि यहोवाची सेवा करायचं सोडलं नाही. यामुळे आम्हाला आनंदी राहता आलं.” खरंच, आपण ईयोबसारखं शत्रूंचं नाही तर यहोवाचं ऐकलं पाहिजे. जर आपण असं केलं, तर आपल्या शत्रूंनी कितीही खोट्या गोष्टी पसरवल्या तरीही आपली आशा कधीच मावळणार नाही.

तुमची आशा तुम्हाला टिकून राहायला मदत करेल

ईयोब शेवटपर्यंत विश्‍वासू राहिल्यामुळे यहोवाने त्याला भरपूर आशीर्वाद दिले. त्याने आणि त्याच्या पत्नीने पुढे आयुष्यभर यहोवाचे आशीर्वाद अनुभवले (परिच्छेद १७ पाहा) *

१७. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्राच्या ११ व्या अध्यायात ज्या विश्‍वासू सेवकांबद्दल सांगितलं आहे त्यांच्या उदाहरणावरून तुम्हाला काय शिकायला मिळतं?

१७ ईयोबसारख्याच यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांनी कठीण परीक्षांचा सामना करत असतानाही आपलं धैर्य खचू दिलं नाही. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात प्रेषित पौलने ‘साक्षीदारांचा एक मोठा ढग’ या शब्दांत त्यांचं वर्णन केलं आहे. (इब्री १२:१) संकटांचा सामना करावा लागला तरी ते आयुष्यभर यहोवाला विश्‍वासू राहिले. (इब्री ११:३६-४०) त्यांनी दाखवलेला धीर आणि त्यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ होती का? निश्‍चितच नाही! त्यांच्या आयुष्यात त्यांना यहोवाची सगळी वचनं पूर्ण होताना जरी पाहायला मिळाली नाहीत, तरी त्यांनी यहोवावर आशा ठेवायचं सोडलं नाही. आणि यहोवा आपल्यावर खूश आहे, या गोष्टीची खातरी असल्यामुळे त्यांना हा पूर्ण विश्‍वास होता, की यहोवाने दिलेली सगळी वचनं भविष्यात पूर्ण होतील. (इब्री ११:४, ५) या सगळ्या विश्‍वासू सेवकांची उदाहरणं आपल्याला शेवटपर्यंत यहोवावर आशा ठेवायची प्रेरणा देतात.

१८. तुम्ही कोणता निश्‍चय केला आहे? (इब्री लोकांना ११:६)

१८ आज जगाची परिस्थिती दिवसेंदिवस आणखी वाईट होत चालली आहे. (२ तीम. ३:१३) आपल्याला माहीत आहे, की सैतान पुढेही देवाच्या लोकांवर परीक्षा आणत राहील. पण येणाऱ्‍या दिवसांत आपल्याला कोणत्याही कठीण परीक्षांचा सामना करावा लागला, तरीसुद्धा आपण यहोवाच्या सेवेत मेहनत घेत राहू या आणि हा विश्‍वास बाळगू या, की आपण एका “जिवंत देवावर आशा ठेवली आहे.” (१ तीम. ४:१०) यहोवाने ईयोबला ज्या प्रकारे आशीर्वाद दिले त्यावरून हे कळतं, की “यहोवा दयाळू आणि कृपाळू आहे.” (याको. ५:११) म्हणून आपण शेवटपर्यंत एकनिष्ठ राहायचा निश्‍चय करू या. कारण आपल्याला ही खातरी आहे, की “त्याचा मनापासून शोध घेणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देतो.”​—इब्री लोकांना ११:६ वाचा.

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

^ भयानक संकटांचा सामना करण्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला लगेच ईयोबची आठवण होते. यहोवाच्या त्या विश्‍वासू सेवकासोबत जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? आपण हे शिकतो, की सैतान आपल्याला कधीच यहोवाला सोडून द्यायला भाग पाडू शकत नाही. तसंच, आपल्यासोबत जे काही घडतं त्याची यहोवाला पूर्ण कल्पना असते. आपण हेही शिकतो, की जसं यहोवाने ईयोबला त्याच्या सगळ्या संकटांतून सोडवलं तसंच तो आपल्यालाही लवकरच सगळ्या संकटातून सोडवेल. या तिन्ही गोष्टींची आपल्याला पक्की खातरी आहे हे जर आपण आपल्या जीवनातून दाखवून दिलं, तर असं म्हणता येईल की आपण खरंच ‘यहोवावर आशा ठेवत’ आहोत.

^ शब्दांचा अर्थ: ज्या हिब्रू शब्दाचं भाषांतर ‘आशा ठेवणं’ असं करण्यात आलं आहे त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीची उत्सुकतेने ‘वाट पाहणं’ असा होतो. तसंच, एखाद्यावर भरवसा ठेवणं किंवा त्याच्यावर विसंबून राहणं, हा अर्थसुद्धा त्यातून निघतो.​—स्तो. २५:२, ३; ६२:५.

^ काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ चित्रांचं वर्णन: आपल्या सगळ्या मुलांचा मृत्यू झालाय हे कळलं तेव्हा ईयोब आणि त्याच्या बायकोवर आभाळ कोसळलं.

^ चित्रांचं वर्णन: ईयोबवर आलेल्या सगळ्या संकटांमध्ये तो शेवटपर्यंत टिकून राहिला. तो आणि त्याची बायको, यहोवाने दिलेल्या आशीर्वादांचा विचार करत आहेत.