व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २८

देवाचं राज्य सुरू झालंय!

देवाचं राज्य सुरू झालंय!

“जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं आणि त्याच्या ख्रिस्ताचं झालं आहे.”​—प्रकटी. ११:१५.

गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!

सारांश *

१. आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी आहे, आणि का?

 आज आपण जगाची परिस्थिती पाहिली तर काय दिसतं? कुटुंबातली नाती बिघडत चालली आहेत. लोक खूप क्रूर, हिंसक आणि स्वार्थी बनले आहेत. बऱ्‍याच लोकांचा अधिकाऱ्‍यांवरून भरवसा उडालाय. ही सगळी परिस्थिती पाहून तुम्हाला कधीकधी निराश वाटतं का? कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पण खरं पाहिलं, तर आज घडत असलेल्या या सगळ्या वाईट गोष्टींमुळेच आपल्याला ही खातरी मिळते की लवकरच चांगली परिस्थिती येईल. आपण असं का म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये ‘शेवटच्या दिवसांबद्दलच्या’ एका लक्षवेधक भविष्यवाणीत जसं सांगण्यात आलं होतं अगदी तसंच आज लोक वागत आहेत. (२ तीम. ३:१-५) ही भविष्यवाणी इतक्या अचूकपणे पूर्ण होत आहे, की कोणताही प्रामाणिक माणूस त्याला नाकारू शकत नाही. आणि ही भविष्यवाणी अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की देवाच्या राज्याचा राजा, ख्रिस्त येशू याचं राज्य स्वर्गात सुरू झालंय. पण बायबलमध्ये देवाच्या राज्याबद्दलची ही काही एकच भविष्यवाणी नाही. देवाच्या राज्याबद्दलच्या आणखी बऱ्‍याच भविष्यवाण्या अलीकडच्या वर्षांमध्ये पूर्ण झाल्या आहेत. त्यांबद्दल चर्चा केल्यामुळे आपला विश्‍वास नक्कीच खूप मजबूत होईल.

ज्याप्रमाणे जिगसॉ पझल गेममध्ये चित्राचे छोटे-छोटे तुकडे एकमेकांना जोडून एक पूर्ण चित्र तयार केलं जातं त्याचप्रमाणे बायबलच्या दानीएल आणि प्रकटीकरण पुस्तकातल्या भविष्यवाण्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे याचं परीक्षण केल्यानंतर आपण अंताच्या किती जवळ येऊन पोहोचलो आहोत याचं एक स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. (परिच्छेद २ पाहा)

२. या लेखात आपण काय पाहणार आहोत आणि यामुळे काय स्पष्ट होईल? (पहिल्या पानावरच्या चित्राबद्दल सांगा.)

या लेखात आपण (१) एका अशा भविष्यवाणीबद्दल पाहणार आहोत, जी आपल्याला समजून घ्यायला मदत करते की देवाचं राज्य कधी सुरू झालं. तसंच, (२) देवाच्या राज्याचा राजा म्हणून येशूने स्वर्गात राज्य सुरू केलंय हे दाखवणाऱ्‍या भविष्यवाण्यांबद्दलही आपण पाहू. यासोबतच (३)  देवाच्या राज्याच्या शत्रूंचा कशा प्रकारे नाश होईल याबद्दलच्या भविष्यवाण्यांवरही आपण चर्चा करू. तुम्ही कधी जिगसॉ पझल पाहिलंय का? हा एक असा गेम असतो ज्यात चित्राचे छोटे-छोटे तुकडे एकमेकांना जोडून एक पूर्ण चित्र तयार केलं जातं. त्याच प्रकारे या सगळ्या भविष्यवाण्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याचं परीक्षण केल्यावर आपण अंताच्या किती जवळ येऊन पोहोचलो आहोत याचं एक स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहील.

देवाचं राज्य कधी सुरू झालं हे आपल्याला कसं कळतं?

३. दानीएल ७:१३, १४ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीवरून आपल्याला कोणती खातरी मिळते?

दानीएल ७:१३, १४ इथे दिलेल्या भविष्यवाणीवरून आपल्याला ही खातरी मिळते की देवाच्या राज्यासाठी ख्रिस्त येशू हा सगळ्यात योग्य राजा आहे. भविष्यवाणीत सांगितलंय, की सगळ्या राष्ट्रांचे लोक आनंदाने “त्याची सेवा” करतील आणि त्याच्या राज्याचा कधीही नाश होणार नाही. दानीएलच्या पुस्तकातल्या आणखी एका भविष्यवाणीत असं सांगितलं होतं, की सात काळ म्हटलेला एक लाक्षणिक काळ पूर्ण झाल्यानंतर येशू त्याचं राज्य सुरू करेल. मग येशूने त्याचं राज्य नेमकं कधी सुरू केलं, हे आपल्याला कसं कळतं?

४. येशूने राज्य नेमकं कधी सुरू केलं हे आपल्याला दानीएल ४:१०-१७ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीवरून कसं कळतं? (तळटीपसुद्धा पाहा.)

दानीएल ४:१०-१७ वाचा. भविष्यवाणीत सांगितलेले “सात काळ” २,५२० वर्षांचा काळ आहे. हा काळ इ.स.पू. ६०७ मध्ये सुरू झाला. त्या वर्षी बॅबिलोनी लोकांनी यरुशलेममध्ये देवाच्या वतीने राज्य करणाऱ्‍या शेवटच्या राजाला सत्तेवरून काढून टाकलं. इ.स.पू. ६०७ मध्ये सुरू झालेले सात काळ कधी पूर्ण झाले? इ.स. १९१४ मध्ये जेव्हा यहोवाने देवाच्या राज्याचा राजा म्हणून “कायदेशीर हक्क” असलेल्या येशूवर आपलं राज्य सोपवलं त्या वेळी हे सात काळ पूर्ण झाले. *​—यहे. २१:२५-२७.

५. ‘सात काळांबद्दलच्या’ भविष्यवाणीमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

या भविष्यवाणीमुळे आपल्याला कसा फायदा होतो?  ‘सात काळांबद्दल’ जाणून घेतल्यामुळे आपल्याला ही खातरी मिळते, की यहोवाने जे काही सांगितलंय ते तो अगदी योग्य वेळेवर पूर्ण करतो. ज्याप्रमाणे त्याने ठरवलेल्या निश्‍चित वेळी येशूला राजा बनवलं त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या भविष्यवाण्यासुद्धा तो अगदी योग्य वेळी पूर्ण करेल. आपण पूर्ण खातरीने म्हणू शकतो की यहोवाचा दिवस अगदी योग्य वेळी येईल. “त्याला उशीर होणार नाही.”​—हब. २:३.

ख्रिस्ताने राज्य सुरू केलंय हे आपल्याला कसं समजतं?

६. (क) येशूने स्वर्गात राज्य सुरू केलंय हे कशावरून दिसून येतं? (ख) प्रकटीकरण ६:२-८ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीवरून आपल्याला या गोष्टीची खातरी कशी मिळते?

येशूने आपल्या शिष्यांना अशा काही जागतिक घडामोडींबद्दल सांगितलं, ज्यांवरून ते ओळखू शकतील की स्वर्गात त्याचं राज्य सुरू झालंय. त्याने सांगितलं होतं की युद्ध, दुष्काळ आणि भूकंप होतील. तसंच, “ठिकठिकाणी” रोगांच्या साथी येतील असंही त्याने सांगितलं होतं. अलीकडेच आलेली कोविड-१९ महामारी याचंच एक उदाहरण आहे. बायबलमध्ये या सगळ्या घटनांना “चिन्ह” असं म्हटलंय. आणि त्यावरून कळतं, की ख्रिस्ताचं राज्य सुरू झालंय. (मत्त. २४:३, ७; लूक २१:७, १०, ११) येशूच्या मृत्यूनंतर तो स्वर्गात परत गेल्यावर ६० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर, त्याने प्रेषित योहानलाही या घटना घडतील असं पुन्हा सांगितलं. (प्रकटीकरण ६:२-८ वाचा.) १९१४ मध्ये येशूने राज्य सुरू केलं तेव्हापासून आतापर्यंत या सगळ्या घटना घडल्या आहेत.

७. येशूचं राज्य सुरू झाल्यावर पृथ्वीवर विपत्ती का ओढवली?

येशू राजा बनल्यानंतर जगाची परिस्थिती इतकी का बघडली? प्रकटीकरण ६:२ मधून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळते. तिथे सांगितलंय की येशू राजा बनल्यानंतर लगेचच त्याने एक युद्ध केलं. कोणासोबत? सैतान आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांसोबत. प्रकटीकरणाच्या १२ व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, सैतान या युद्धात हरला. आणि त्यानंतर त्याला आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांना पृथ्वीवर फेकून देण्यात आलं. यामुळे सैतान खूप क्रोधित झाला आणि त्याने आपला सगळा राग मानवजातीवर काढायला सुरवात केली. आणि म्हणून ‘पृथ्वीवर मोठी विपत्ती ओढवली’​—प्रकटी. १२:७-१२.

वाईट बातम्या ऐकून आपल्याला आनंद नक्कीच होत नाही. पण बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण होताना पाहून आपल्याला खातरी पटते की देवाचं राज्य सुरू झालंय (परिच्छेद ८ पाहा)

८. देवच्या राज्याबद्दलच्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत, हे पाहून आपल्याला कसा फायदा होतो?

या भविष्यवाण्यांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?  जागतिक घडामोडी आणि लोकांच्या प्रवृत्तीत जो बदल झालाय, त्यामुळे आपल्याला हे समजायला मदत होते की येशू राजा बनलाय. त्यामुळे जेव्हा आपण लोकांना स्वार्थीपणे किंवा क्रूरपणे वागताना पाहतो, तेव्हा निराश होण्याऐवजी आपण हे आठवणीत ठेवू शकतो की खरंतर यामुळे बायबलमधली भविष्यवाणी पूर्ण होत आहे. खरंच, देवाचं राज्य सुरू झालंय यात काहीही शंका नाही! (स्तो. ३७:१) आणि जसजसं हर्मगिदोन जवळ येईल, तसतशी जगातली ही वाईट परिस्थिती आणखीनच वाढत जाईल. (मार्क १३:८; २ तीम. ३:१३) या सगळ्या भयानक घटना आज का घडत आहेत हे समजून घ्यायला आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने आपल्याला मदत केली आहे यासाठी खरंच आपण त्याचे किती आभार मानले पाहिजेत!

देवाच्या राज्याच्या शत्रूंचा नाश कसा होईल?

९. दानीएल २:२८, ३१-३५ मध्ये दिलेल्या भविष्यवाणीत शेवटच्या महासत्तेबद्दल काय सांगितलंय, आणि ही महासत्ता केव्हा अस्तित्वात आली?

दानीएल २:२८, ३१-३५ वाचा. आज आपण ही भविष्यवाणी पूर्ण होताना पाहत आहोत. ख्रिस्ताचं राज्य सुरू झाल्यानंतर “शेवटच्या काळात” काय-काय घडेल हे नबुखद्‌नेस्सर राजाला पडलेल्या स्वप्नातून आपल्याला कळतं. येशूच्या पृथ्वीवरच्या शत्रूंमध्ये बायबल भविष्यवाणीत सांगितलेली शेवटची जागतिक महासत्तासुद्धा असणार होती. या महासत्तेला नबुखद्‌नेस्सरच्या स्वप्नात ‘लोखंड आणि मातीने बनलेल्या पावलांनी’ सूचित करण्यात आलं होतं. हीच जागतिक महासत्ता आज राज्य करत आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा ब्रिटन आणि अमेरिकेने एकजूट होऊन काम करायला सुरवात केली तेव्हा ही जागतिक महासत्ता अस्तित्वात आली. आज तिला अँग्लो-अमेरिकन महासत्ता म्हटलं जातं. ही महासत्ता आधीच्या सगळ्या महासत्तांपेक्षा वेगळी आहे. दानीएलला स्वप्नात दिसलेल्या पुतळ्याबद्दलच्या भविष्यवाणीत ज्या आणखी दोन गोष्टी सांगितल्या आहेत त्यावरून हे स्पष्ट होतं.

१०. (क) अँग्लो-अमेरिकन महासत्तेबद्दल दानीएलच्या भविष्यवाणीत जे सांगण्यात आलं होतं ते आज कसं पूर्ण होत आहे? (ख) आपण कोणत्या बाबतीत सावध असलं पाहिजे? (“ धोक्यापासून सावध राहा!” ही चौकटसुद्धा पहा)

१० पुतळ्याच्या दृष्टान्तात आधीच्या सगळ्या महासत्तांना सोनं किंवा चांदी यासारख्या फक्‍त एकाच धातुने सूचित करण्यात आलं आहे. पण अँग्लो-अमेरिकन महासत्तेला मात्र लोखंड आणि मातीच्या मिश्रणाने सूचित केलं आहे. माती ही ‘मानवांच्या वंशजांना’ म्हणजेच सर्वसाधारण लोकांना सूचित करते. (दानी. २:४३, तळटीप.) आणि या महासत्तेवर सामान्य लोकांचा किती प्रभाव आहे, हे आज आपण स्पष्टपणे पाहू शकतो. आज आपण पाहतो की सर्वसामान्य लोक आपल्या अधिकारांसाठी लढतात, आंदोलनं करतात तसंच कामगार आपले हक्क मिळवण्यासाठी यूनियन बनवतात, तसंच निवडणुकांचा काय परिणाम असेल आणि कोणतं सरकार सत्तेवर येईल हेसुद्धा लोकच ठरवतात. त्यामुळे या महासत्तेची ताकद कमजोर होते आणि तिला आपली धोरणं पूर्णपणे अमलात आणता येत नाहीत.

११. अँग्लो-अमेरिकन महासत्ता आज राज्य करत आहे यावरून आपल्याला कोणती खातरी मिळते, आणि का?

११ दानीएलला दिसलेल्या दृष्टान्तात पुतळ्याची पावलं अँग्लो-अमेरिकन महासत्तेला सूचित करतात. यावरून दिसून येतं, की ही शेवटची जागतिक महासत्ता आहे. यानंतर दुसरी कोणतीही महासत्ता येणार नाही. उलट, हर्मगिदोनाच्या वेळी देवाच्या राज्याद्वारे या महासत्तेचा आणि इतर सर्व मानवी सरकारांचा नाश होईल. *​—प्रकटी. १६:१३, १४, १६; १९:१९, २०.

१२. मोठ्या पुतळ्याबद्दल दानीएलने केलेल्या भविष्यवाणीमुळे आपल्याला कसा फायदा होतो?

१२ या भविष्यवाणीचा आपल्याला कसा फायदा होतो?  दानीएलची भविष्यवाणी स्पष्टपणे दाखवून देते की आज आपण शेवटच्या काळात जगत आहोत. २,५०० वर्षांआधी दानीएलने अशी भविष्यवाणी केली होती की बाबेलनंतर आणखी चार महासत्ता येतील आणि त्या देवाच्या लोकांवर राज्य करतील. शिवाय, दानीएलच्या भविष्यवाणीवरून हेही कळतं त्यांपैकी अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्ता ही शेवटची महासत्ता असेल. या भविष्यवाणीमुळे खरंच आपल्याला खूप सांत्वन आणि दिलासा मिळतो. कारण यातून आपल्याला कळतं की देवाचं राज्य लवकरच सगळ्या मानवी सरकारांचा पूर्णपणे नाश करेल आणि संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल.​—दानी. २:४४.

१३. प्रकटीकरण १७:९-१२ मध्ये उल्लेख केलेला ‘आठवा राजा’ आणि ‘दहा राजे’ कोणाला सूचित करतात आणि ही भविष्यवाणी कशी पूर्ण झाली आहे?

१३ प्रकटीकरण १७:९-१२ वाचा. या वचनांमध्ये शेवटच्या काळाबद्दल आणखी एक भविष्यवाणी आहे. ती कशी पूर्ण झाली, ते आता आपण पाहू या. पहिल्या महायुद्धात बऱ्‍याच देशांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे जगातले राजकीय पुढारी, परत असं होऊ नये आणि जगात शांती टिकून राहावी म्हणून काय करता येईल याबद्दल विचार करू लागले. आणि म्हणून जानेवारी १९२० मध्ये त्यांनी ‘लीग ऑफ नेशन्स’ ही संघटना स्थापन केली. ऑक्टोबर १९४५ मध्ये संयुक्‍त राष्ट्रसंघाने लीग ऑफ नेशन्सची जागा घेतली. भविष्यवाणीत याच संघटनेला “आठवा राजा” म्हटलंय. पण ती एक जागतिक महासत्ता नाही. उलट या संघटनेला पाठिंबा देणाऱ्‍या सरकारांवरच तिची ताकद आणि तिचा प्रभाव अवलंबून आहे. या सगळ्या सरकारांना भविष्यवाणीत लाक्षणिक भाषेमध्ये ‘दहा राजे’ असं म्हटलंय.

१४-१५. (क) ‘मोठ्या बाबेलबद्दल’ आपल्याला प्रकटीकरण १७:३-५ मधून काय कळतं? (ख) खोट्या धर्मांसोबत आज काय घडत आहे?

१४ प्रकटीकरण १७:३-५ वाचा. देवाकडून मिळालेल्या एका दृष्टान्तात प्रेषित योहानला एक वेश्‍या दिसली. तिला “मोठी बाबेल” असं म्हटलंय. ती खोट्या धर्मांच्या जागतिक साम्राज्याला सूचित करते. या दृष्टान्तातून आपल्याला काय कळतं? खोट्या धार्मिक संघटनांनी बऱ्‍याच काळापासून जगातल्या सरकारांसोबत खूप जवळून काम केलंय. आणि त्यांना आपला पूर्ण पाठिंबासुद्धा दिलाय. पण लवकरच यहोवा “आपला विचार पूर्ण करण्याचं” या सरकारांच्या मनात घालेल. याचा काय परिणाम होईल? ही सरकारं म्हणजेच “दहा राजे” खोट्या धार्मिक संघटनांवर हल्ला करतील आणि त्यांचा पूर्णपणे नाश करतील.​—प्रकटी. १७:१, २, १६, १७.

१५ मोठ्या बाबेलचा नाश जवळ आहे असं आपण का म्हणू शकतो? यासाठी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल, की प्राचीन काळात बॅबिलोन (बाबेल) शहराला फरात (युफ्रेटिस) नदीच्या पाण्यामुळे संरक्षण मिळायचं. मोठ्या बाबेलला म्हणजेच खोट्या धर्मांना पाठिंबा देणाऱ्‍या लाखो लोकांची तुलना प्रकटीकरणाच्या पुस्तकात याच संरक्षण देणाऱ्‍या ‘पाण्याच्या प्रवाहांशी’ केली आहे. (प्रकटी. १७:१५) पण भविष्यवाणीत असंही सांगितलं आहे, की हे पाणी ‘आटून जाईल.’ यावरून दिसतं, की बरेच लोक खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला पाठिंबा द्यायचं सोडून देतील. (प्रकटी. १६:१२) आज ही भविष्यवाणी पूर्ण होताना दिसत आहे. कारण आज बऱ्‍याच लोकांचा धर्मांवरून विश्‍वास उडालाय. आणि आता ते आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दुसरीकडे जाऊ लागले आहेत.

१६. संयुक्‍त राष्ट्रसंघाची स्थापना आणि मोठ्या बाबेलचा नाश याबद्दलच्या भविष्यवाण्या समजून घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

१६ या भविष्यवाण्यांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?  संयुक्‍त राष्ट्रसंघाची स्थापना आणि खोट्या धर्माला कमी होत चाललेला पाठिंबा, या गोष्टींमुळे हे आणखीनच स्पष्टपणे दिसून येतं, की आपण आज शेवटच्या काळात जगत आहोत. आज जरी मोठ्या बाबेलला पाठिंबा देणाऱ्‍या लाक्षणिक पाण्याचे प्रवाह आटत चालले आहेत, तरीसुद्धा तिचा नाश मात्र एका वेगळ्याच कारणामुळे होईल. याआधी आपण पाहिल्याप्रमाणे यहोवा आपला विचार पूर्ण करायचं ‘दहा राजांच्या’ म्हणजेच संयुक्‍त राष्ट्रसंघाला पाठिंबा देणाऱ्‍या राजकीय सरकारांच्या मनात घालेल. मोठ्या बाबेलच्या नाशामुळे हे जग हादरून जाईल. * (प्रकटी. १८:८-१०) यामुळे कदाचित बऱ्‍याच कठीण परिस्थितींचा सामना करावा लागेल. पण देवाचे लोक त्या वेळी आनंदी असतील. याची दोन कारणं आहेत. एकतर, यहोवा देवाच्या एका जुन्या शत्रूचा पूर्णपणे नाश झालेला असेल. आणि दुसरं कारण म्हणजे, या दुष्ट जगापासून आपली सुटका अगदी जवळ आली असेल.​—लूक २१:२८.

यहोवावर भरवसा ठेवून भविष्याचा सामना करा

१७-१८. (क) आपण आपला विश्‍वास कसा मजबूत करू शकतो? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१७ दानीएलने भविष्यवाणीत सांगितलं होतं, की “खरं ज्ञान खूप वाढेल.” आणि अगदी असंच घडलंय! आपल्या काळाबद्दल केलेल्या भविष्यवाण्यांचा अर्थ आपल्याला स्पष्टपणे समजलाय. (दानी. १२:४, ९, १०) या सगळ्या भविष्यवाण्या किती तंतोतंत पूर्ण होत आहेत, हे पाहून आपण थक्क होतो आणि यहोवाबद्दल आणि त्याच्या प्रेरित वचनाबद्दल आपल्या मनातला आदर आणखी वाढतो. (यश. ४६:१०; ५५:११) म्हणून बायबलचा सखोल अभ्यास करून आणि इतरांनाही यहोवासोबत एक जवळचं नातं जोडायला मदत करून आपला विश्‍वास दिवसेंदिवस मजबूत करत राहा. जे यहोवावर पूर्ण भरवसा ठेवतात, त्यांचं तो रक्षण करेल आणि त्यांना “कायम टिकणारी शांती” देईल.​—यश. २६:३.

१८ पुढच्या लेखात आपण शेवटल्या काळाच्या ख्रिस्ती मंडळीबद्दल केलेल्या भविष्यवाण्यांकडे लक्ष देऊ या. त्यांचं परीक्षण केल्यावर आपल्याला कळेल, की शेवटच्या काळाबद्दल केलेल्या इतर भविष्यवाण्यांच्या एकंदरीत चित्रात या भविष्यवाण्यासुद्धा अगदी अचूकपणे बसतात. तसंच सध्या राज्य करत असलेला आपला राजा येशू, त्याच्या एकनिष्ठ अनुयायांचं कशा प्रकारे मार्गदर्शन आणि नेतृत्व करत आहे, हेसुद्धा आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येईल.

गीत १७ साक्षीदारांनो, पुढे चला!

^ आज आपण इतिहासातल्या सगळ्यात रोमांचक काळात जगत आहोत. कारण देवाचं राज्य सुरू झालंय. याबद्दल बायबलच्या बऱ्‍याच भविष्यवाण्यांमध्ये आधीपासूनच सांगण्यात आलं होतं. त्यांपैकी काही भविष्यवाण्यांवर आपण या लेखात चर्चा करणार आहोत. यामुळे आपल्याला यहोवावरचा आपला विश्‍वास आणखी मजबूत करायला, तसंच, आता आणि येणाऱ्‍या दिवसांत यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून आपलं मन शांत ठेवायलाही मदत होईल.

^ कायम जीवनाचा आनंद घ्या! पुस्तकातला धडा ३२ मुद्दा ४ आणि jw.org वर १९१४ पासून देवाचं राज्य सुरू झालं हा व्हिडिओ पाहा

^ दानीएलच्या भविष्यवाणीबद्दल जास्त माहितीसाठी जून १५, २०१२ च्या टेहळणी बुरूज अंकात पान १४-१९ वर पाहा.

^ भविष्यात लवकरच काय होणार आहे याबद्दल आणखी माहितीसाठी परमेश्‍वर का राज पुस्तकातला अध्याय २१ पाहा.