व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

मी यहोवाने दाखवलेल्या मार्गाने चालायचं निवडलं

मी यहोवाने दाखवलेल्या मार्गाने चालायचं निवडलं

तरुणपणीच मी माझ्या आवडीची नोकरी निवडली होती आणि ते काम मला आवडत असल्यामुळे मी खूप खूश होतो. मी स्वतःसाठी हा मार्ग निवडला होता, पण यहोवाने मला एक वेगळा मार्ग दाखवला. आणि त्याने मला जणू असं वचन दिलं “मी तुला सखोल समज देईन आणि ज्या मार्गाने तू गेलं पाहिजे तो तुला दाखवीन.” (स्तो. ३२:८) यहोवाने दाखवलेल्या मार्गाने चालायचं निवडल्यामुळे मला त्याच्या सेवेत अनेक चांगल्या संधी आणि भरपूर आशीर्वाद मिळाले. त्याच्या आशीर्वादानेच मला आफ्रिकेत ५२ वर्षं सेवा करता आली.

इंग्लंडमधून आफ्रिकेत

माझा जन्म १९३५ मध्ये डार्लस्टन इथे झाला. इंग्लंडच्या या भागाला ब्लॅक कंट्री असं म्हटलं जायचं. कारण तिथे आसपासच्या कारखान्यांतला काळा धूर हवेत पसरलेला असायचा. मी चारएक वर्षांचा होतो तेव्हा माझे आईवडील यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागले. मी १४-१५ वर्षांचा झालो तेव्हा मला खातरी पटली की हेच सत्य आहे. आणि म्हणून १९५२ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी मी बाप्तिस्मा घेतला.

त्याच दरम्यान मी गाड्यांचे पार्ट बनवणाऱ्‍या एका फॅक्टरीत काम करू लागलो. फॅक्टरीत एका मोठ्या पदावर काम करण्यासाठी माझं प्रशिक्षण सुरू झालं. या नोकरीत मी खूप खूश होतो.

माझं प्रशिक्षण सुरू असताना मला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला. एका प्रवासी पर्यवेक्षकाने मला विलनहॉलच्या आमच्या मंडळीच्या सभेत पुस्तक अभ्यास घेशील का, असं विचारलं. पण समस्या अशी होती की त्या वेळी मी दोन मंडळयांच्या सभांना जायचो. आठवड्यादरम्यान मी माझ्या घरापासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रॉम्सग्रोव्ह इथल्या मंडळीत जायचो. कारण हे ठिकाण माझ्या फॅक्टरीपासून जवळ होतं. आणि शनिवारी-रविवारी मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात असल्यामुळे मी तिथल्या मंडळीत, म्हणजेच विलनहॉलच्या मंडळीत सभेला जायचो.

यहोवाच्या संघटनेला मदत करायची इच्छा असल्यामुळे, मी प्रवासी पर्यवेक्षकांना होकार दिला. त्यासाठी मला मनापासून आवडणारी माझी नोकरी सोडावी लागणार होती. पण तरी मी तयार झालो. त्या वेळी मी यहोवाने दाखवलेला मार्ग निवडला याचा मला जराही पस्तावा नाही. कारण त्यामुळेच माझं संपूर्ण आयुष्य खूप आनंदात गेलं.

ब्रॉम्सग्रोव्ह मंडळीत माझी भेट ॲनशी झाली. ती सुंदर होती आणि यहोवाच्या सेवेत खूप उत्साही होती. १९५७ मध्ये आमचं लग्न झालं. आणि सोबत मिळून आम्ही पायनियर सेवा, खास पायनियर सेवा, प्रवासी कार्य तसंच बेथेल सेवा यांसारख्या वेगवेगळ्या मार्गांनी यहोवाची सेवा केली. ॲनने मला संपूर्ण आयुष्यात खूप चांगली साथ दिली आहे आणि आम्ही आनंदाने आमचं आयुष्य घालवलं.

१९६६ मध्ये आम्हाला जेव्हा गिलियडच्या ४२ व्या क्लाससाठी बोलवण्यात आलं, तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला मलावी इथे नेमणूक मिळाली. या देशाला आफ्रिकेचं ‘उबदार काळीज’ असं म्हटलं जातं. कारण इथले लोक खूप दयाळू आणि आपुलकीने वागणारे आहेत. आम्हाला वाटलं होतं, की आम्ही तिथे जास्त काळ राहू. पण तसं काही झालं नाही.

कठीण परिस्थितीतही मलावीत सेवा

मलावीत प्रवासी कार्यासाठी आम्ही हीच मोठी जीप वापरायचो

१ फेब्रुवारी, १९६७ ला आम्ही मलावीला आलो. तिथे आल्यावर महिनाभर तिथली भाषा शिकून घेण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. आणि मग प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून आमचं काम सुरू झालं. आम्ही एका मोठ्या जीपने प्रवास करायचो. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं, की ही जीप खूप दणकट आहे, मजबूत आहे आणि या जीपने तुम्ही नदीसुद्धा पार करू शकता. पण नंतर आम्हाला कळलं की ती जीप फक्‍त उथळ पाण्यातून नेण्यासारखी होती. कधीकधी आम्हाला गवताचं छप्पर असलेल्या छोट्याशा झोपडीत राहावं लागायचं. आणि पावसाळ्यात छताला आतून ताडपत्री लावावी लागायची. मिशनरी सेवेतले हे सगळे अनुभव आमच्यासाठी खूप नवीन होते. पण आम्ही खूश होतो.

त्याच वर्षी एप्रिलमध्ये आम्हाला समजलं की साक्षीदारांचा विरोध व्हायला सुरवात झाली आहे. मलावीचे राष्ट्रपती डॉ. हेस्टिंग्ज बांडा यांचं एक भाषण मी रेडिओवर ऐकलं. त्यांचं असं म्हणणं होतं की यहोवाचे साक्षीदार टॅक्स भरत नाहीत आणि देशाच्या राजकारणात लुडबूड करतात. साहजिकच, ते आरोप खोटे होते. खरंतर साक्षीदार निष्पक्ष असल्यामुळे त्यांचा विरोध केला जात होता. आणि खासकरून ते राजकीय पक्षाचे कार्ड विकत घेत नसल्यामुळे सरकारचा त्यांच्यावर राग होता.

सप्टेंबर महिन्यात आम्ही पेपरमध्ये असं वाचलं की राष्ट्रपतींनी साक्षीदारांवर सगळीकडे गोंधळ माजवत असल्याचा आरोप लावलाय. एका राजकीय परिषदेत त्यांनी अशी घोषणा केली की त्यांचं सरकार लवकरच यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी आणणार आहे. आणि तसंच झालं. २० ऑक्टोबर, १९६७ ला मलावीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी घालण्यात आली. याच्या काही दिवसांनीच पोलीस आणि अधिकाऱ्‍यांनी येऊन शाखा कार्यालय बंद केलं. तसंच मिशनरी भाऊबहिणींनाही देश सोडून जायचे आदेश देण्यात आले.

आमचे मिशनरी सोबती जॅक आणि लिंडा यांच्यासोबत आम्हाला १९६७ मध्ये अटक झाली आणि देशाबाहेर काढण्यात आलं

तीन दिवस जेलमध्ये काढल्यानंतर आम्हाला ब्रिटनच्या अधिकाराखाली असलेल्या मॉरिशस या देशात पाठवण्यात आलं. पण मॉरिशसचे अधिकारीही आम्हाला मिशनरी म्हणून तिथे राहू द्यायला तयार नव्हते. म्हणून मग आम्हाला ऱ्‍होडेशियाल पाठवण्यात आलं, त्याला आता झिंबाब्वे म्हणतात. तिथे पोहोचल्यावर आम्हाला प्रवेश देण्यात आला नाही. आणि एक अधिकारी आमच्याशी खूप उद्धटपणे वागला. तो म्हणाला, “तुम्हाला मलावीमधूनही हाकलून दिलं, आणि मॉरिशसमध्येही राहू दिलं नाही. म्हणून काय आता इथे आलाय?” ॲनला तर रडायलाच आलं. कोणीच आम्हाला राहू द्यायला तयार नव्हतं. असं वाटत होतं, सगळं सोडून सरळ इंग्लंडला घरी निघून जावं. शेवटी अधिकाऱ्‍यांनी आम्हाला त्या रात्री शाखा कार्यालयात राहायची परवानगी दिली. पण दुसऱ्‍या दिवशी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन हजेरी लावावी अशी अट त्यांनी घातली. दुसऱ्‍या दिवशी दुपारी आम्ही अपेक्षाही केली नव्हती अशी बातमी आम्हाला मिळाली. आम्हाला झिंबाब्वेमध्ये राहायची परवानगी मिळाली! त्या दिवशी मला खातरी पटली की यहोवाच आम्हाला मार्ग दाखवतोय. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही.

झिंबाब्वेतून मलावीसाठी सेवा करायची नवीन नेमणूक

१९६८ साली झिंबाब्वे बेथेलमध्ये ॲनसोबत

झिंबाब्वेच्या शाखा कार्यालयात मला सेवा विभागात काम करण्यासाठी नेमण्यात आलं. तिथे मी मलावी आणि मोझांबिक या देशांचं काम पाहत होतो. मलावीमधल्या भाऊबहिणींचा खूप भयानक छळ केला जात होता. मलावीच्या विभागीय पर्यवेक्षकांनी पाठवलेले रिपोर्ट इंग्रजीत भाषांतर करायचं काम मला देण्यात आलं होतं. एक दिवशी रात्री मी उशिरापर्यंत एक रिपोर्ट तयार करत होतो. मलावीतल्या भाऊबहिणींचा किती छळ केला जातोय याबद्दल वाचून मी अक्षरशः रडलो. * पण त्यांची एकनिष्ठा, विश्‍वास आणि धीर पाहून मला खूप प्रोत्साहनसुद्धा मिळालं.​—२ करिंथ. ६:४, ५.

जे भाऊबहीण अजूनही मलावीत होते आणि जे मोझांबिकमध्ये पळून गेले होते, त्या सगळ्यांना आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी आम्ही हरतऱ्‍हेने मेहनत घेत होतो. मलावीत सगळ्यात जास्त बोलल्या जाणाऱ्‍या चिचेवा भाषेत भाषांतराचं काम करणाऱ्‍या भाऊबहिणींना झिंबाब्वे इथे राहणाऱ्‍या एका भावाच्या मोठ्या मळ्यावर हलवण्यात आलं. त्या भावाने आपल्या मळ्यावर त्यांच्यासाठी घरं आणि एक ऑफिससुद्धा बांधून दिलं. आणि यामुळे आपल्या प्रकाशनांचं भाषांतर करायचं महत्त्वाचं काम सुरू राहिलं.

दरवर्षी आम्ही मलावीतल्या विभागीय पर्यवेक्षकांची झिंबाब्वेमध्ये चिचेवा भाषेतल्या प्रांतीय अधिवेशनाला हजर राहण्यासाठी व्यवस्था करायचो. तिथे त्यांना अधिवेशनातल्या भाषणाच्या आउटलाईन दिल्या जायच्या. मग मलावीला परत गेल्यानंतर ते तिथल्या बांधवांना जमेल तसं ती माहिती द्यायचा प्रयत्न करायचे. एकदा तर हे भाऊ झिंबाब्वेला आले होते, तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी राज्य सेवा प्रशाला आयोजित केली. या सगळ्या धाडसी विभागीय पर्यवेक्षकांना प्रोत्साहन द्यायचा या प्रशालेचा उद्देश होता.

झिंबाब्वेमध्ये एका चिचेवा आणि शोना भाषेच्या अधिवेशनात मी चिचेवा भाषेत भाषण देताना

१९७५ साली फेब्रुवारी महिन्यात, मी मलावी मधून मोझांबिकमध्ये पळून गेलेल्या भाऊबहिणींना भेटायला गेलो. ते तिथे शरणार्थी शिबिरांमध्ये राहत होते. असं असलं तरी ते यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्‍या सगळ्या सूचना पाळत होते. वडील वर्गाची व्यवस्था सुरू करायची जी नवीन सूचना देण्यात आली होती, तीसुद्धा त्यांनी लागू केली होती. या नवीन वडीलांनी बऱ्‍याच आध्यात्मिक गोष्टींची व्यवस्था केली होती. जसं की, जाहीर भाषण, दैनिक वचनाची चर्चा, टेहळणी बुरूज अभ्यास, इतकंच काय तर संमेलनंसुद्धा. आपल्या अधिवेशनांसारखंच छावण्यांमध्ये त्यांनी, साफसफाईसाठी, जेवण वाटपासाठी आणि सुरक्षेसाठी वेगवेगळे विभाग तयार केले होते. यहोवाच्या आशीर्वादाने या विश्‍वासू भावांनी इतकं चांगलं काम केलं होतं, की ते पाहून मला खूप प्रोत्साहन मिळालं.

१९७९ च्या जवळपास झांबीयाचं शाखा कार्यालय मलावी देशाचं काम पाहू लागलं. असं असलं तरी मी मलावीमधल्या भाऊबहिणींबद्दल नेहमी विचार करायचो. आणि इतर बऱ्‍याच भाऊबहिणींप्रमाणे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो. मी झिंबाब्वेच्या शाखा समितीचा सदस्य असल्यामुळे मला बऱ्‍याच वेळा आपल्या जागतिक मुख्यालयाच्या बांधवांसोबत तसंच, मलावी, दक्षिण आफ्रिका आणि झांबीयाच्या जबाबदार भावांसोबतही भेटायची संधी मिळायची. आणि प्रत्येक वेळी आम्ही याचाच विचार करायचो की मलावीमधल्या भाऊबहिणींसाठी आणखी काय करता येईल?

काही काळाने छळाचा जोर थोडा कमी झाला. देश सोडून गेलेले भाऊबहीण हळूहळू मलावीला परत येऊ लागले. आणि जे मलावीतच होते त्यांनासुद्धा आता पूर्वीसारखा छळाचा सामना करावा लागत नव्हता. आसपासचे बरेच देश यहोवाच्या लोकांना कायदेशीर मान्यता देत होते आणि त्यांच्यावरचे निर्बंध हटवत होते. १९९१ मध्ये मोझांबिकनेपण असंच केलं. पण आम्ही विचार करायचो, की ‘मलावीतल्या भाऊबहिणींना स्वातंत्र्य कधी मिळेल?’

पुन्हा एकदा मलावीमध्ये

शेवटी मलावीतली राजकीय परिस्थिती बदलली आणि १९९३ मध्ये सरकारने यहोवाच्या साक्षीदारांवरची बंदी उठवली. त्याच दरम्यान, मी एका मिशनरी भावाशी बोलत होतो तेव्हा त्यांनी मला विचारलं, “मग आता तुम्ही मलावीत परत जाणार का?” त्या वेळी मी ५९ वर्षांचा होतो, त्यामुळे मी म्हणालो, “नाही ओ, आता वय झालंय.” पण आश्‍चर्य म्हणजे अगदी त्याच दिवशी नियमन मंडळाकडून आम्हाला मलावीला परत जायचं आमंत्रण आलं.

झिंबाब्वेमध्ये आमच्या नेमणुकीत आम्ही खूप खूश होतो. त्यामुळे हा निर्णय घेणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आम्हाला इथल्या जीवनाची सवय झाली होती आणि बऱ्‍याच भाऊबहिणींशी खूप चांगली मैत्रीही झाली होती. नियमन मंडळाने आम्हाला सांगितलं होतं, की जर मलावीला जायची आमची इच्छा नसेल तर आम्ही झिंबाब्वेमध्येच राहून पुढे सेवा करू शकतो. त्यामुळे खरंतर आम्ही झिंबाब्वेमध्येच राहू शकत होतो. एका अर्थाने त्या वेळीही आम्ही स्वतःचा मार्ग निवडू शकत होतो. पण मला अब्राहाम आणि साराचं उदाहरण आठवलं. त्यांचंही बरंच वय झालं होतं. पण जेव्हा यहोवाने त्यांना सांगितलं, तेव्हा ते आपलं घर आणि आपलं आरामाचं जीवन सोडून जायला तयार झाले होते.​—उत्प. १२:१-५.

आम्हीसुद्धा यहोवाच्या संघटनेने सांगितल्याप्रमाणे १ फेब्रुवारी १९९५ ला मलावीला परत आलो. २८ वर्षांपूर्वी बरोबर याच दिवशी आम्ही इंग्लंडहून मलावीला आलो होतो. मलावीला परत आल्यानंतर एक शाखा समिती नेमण्यात आली. या समितीत माझ्या सोबत आणखी दोन भाऊ होते. आम्ही लगेचच मलावीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचं कार्य पुन्हा एकदा सुरू करायच्या कामाला लागलो.

यहोवाच्या आशीर्वादाने मलावीत वाढ

मलावीमध्ये यहोवाने किती झपाट्याने वाढ घडवून आणली हे पाहणं खरंच एक आशीर्वाद आहे! १९९३ मध्ये प्रचारकांची संख्या ३०,००० इतकी होती. आणि १९९८ मध्ये ती वाढून ४२,००० झाली. * क्षेत्रात होणारी ही वाढ पाहून नियमन मंडळाने नवीन शाखाकार्यालय बांधण्यासाठी परवानगी दिली. आम्ही लिलाँग्वेमध्ये ३० एकर जमीन विकत घेतली. आणि मला बांधकाम समितीमध्ये नियुक्‍त करण्यात आलं.

२००१ च्या मे महिन्यात नियमन मंडळाचे सदस्य गाय पियर्स यांनी मलावीमधल्या बेथेल कार्यालयाच्या समर्पणाचं भाषण दिलं. या कार्यक्रमाला मलावीतले दोन हजार पेक्षा जास्त प्रचारक उपस्थित होते. त्यांच्यापैकी बहुतेक जण ४० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्यात होते. या विश्‍वासू भाऊबहिणींनी बंदीच्या काळात बऱ्‍याच वर्षांपर्यंत खूप भयानक परीक्षांचा सामना केला होता. ते गरीब असले तरी आध्यात्मिक अर्थाने श्रीमंत होते. आणि नवीन बेथेल पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. ते बेथेलमध्ये फिरत असताना आफ्रिकन पद्धतीने राज्यगीतं गात होते. संपूर्ण बेथेलमध्ये त्यांचा तो सुंदर आवाज घुमत होता. तो खरंच एक हृदयस्पर्शी अनुभव होता. परीक्षांमध्ये विश्‍वासूपणे टिकून राहणाऱ्‍यांना यहोवा किती भरभरून आशीर्वाद देतो, याचाच हा एक पुरावा होता.

शाखाकार्यालयाचं बांधकाम पूर्ण झाल्यावर देशभरात बरीच राज्य सभागृहं बांधली जाऊ लागली. आणि अशा बऱ्‍याच सभागृहांच्या समर्पण कार्यक्रमांमध्ये मला भाषण द्यायची संधी मिळाली. गरीब देशांमध्ये कमीत कमी वेळेत नवीन राज्य सभागृह बांधून द्यायच्या संघटनेच्या योजनेमुळे मलावीतल्या बऱ्‍याच मंडळ्यांना फायदा झाला. पूर्वी काही मंडळ्यांच्या सभा नीलगिरीच्या लाकडांपासून बनवलेल्या शेडखाली व्हायच्या. त्यांची छतं गवताची असायची आणि बसण्यासाठी मातीचे बेंच असायचे. आता भावांनी उत्साहाने भट्ट्यांमध्ये विटा तयार करून सुंदर राज्य सभागृहं उभी केली आहेत. राज्य सभागृहं सुंदर होती. पण बसण्यासाठी त्यांना खुर्चीऐवजी बेंचच आवडायचे. कारण ते म्हणायचे, की बेंचवर थोडं मागेपुढे सरकलं की आणखी एक जण सहज मावतो.

यहोवाने भाऊबहिणींना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी कशी मदत केली हे पाहूनही मला खूप आनंद झाला. तरुण आफ्रिकन भावांचं मला खासकरून कौतुक करावसं वाटतं. कारण ते मदत करायला नेहमी तयार असायचे आणि संघटनेकडून मिळालेल्या प्रशिक्षणातून आणि प्रत्यक्ष काम करून त्यांनी बऱ्‍याच नवीन गोष्टी शिकून घेतल्या. यामुळे ते बेथेलमध्ये आणि मंडळ्यांमध्ये आणखी जास्त जबाबदाऱ्‍या हाताळू शकले. तसंच, मलावीच्या बऱ्‍याच भावांना विभागीय पर्यवेक्षक म्हणूनसुद्धा नेमण्यात आलं. आणि यामुळे भाऊबहिणींना विश्‍वास मजबूत करायला खूप मदत झाली. या विभागीय पर्यवेक्षकांपैकी बरेच जण विवाहित होते. मलावीतल्या संस्कृतीत विवाहित जोडप्यांवर कुटुंब वाढवण्यासाठी घरच्यांकडून खूप दबाव असतो. पण तरीसुद्धा या विश्‍वासू जोडप्यांनी यहोवाची आणखी जास्त सेवा करता यावी म्हणून मुलं न होऊ द्यायचं निवडलं.

योग्य निर्णय घेतल्याचं समाधान!

ॲनसोबत ब्रिटन बेथेलमध्ये

आफ्रिकेत ५२ वर्षं घालवल्यानंतर मला काही आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे मलावीतल्या शाखा समितीने असं सुचवलं, की आम्हाला ब्रिटनला परत पाठवलं जावं. आणि नियमन मंडळानेही याला अनुमती दिली. मलावी सोडताना आम्हाला खूप वाईट वाटलं. पण ब्रिटनमधलं बेथेल कुटुंब आमच्या म्हातारपणात आमची खूप चांगली काळजी घेत आहे.

आज मी खातरीने म्हणू शकतो, की यहोवाने दाखवलेल्या मार्गाने चालायचं मी निवडलं हा माझ्या जीवनातला सगळ्यात चांगला निर्णय होता. जर मी स्वतःच्या समजशक्‍तीवर अवलंबून राहिलो असतो, तर काय माहीत आज मी कुठे असतो? माझ्यासाठी योग्य काय, हे यहोवाला माहीत होतं. आणि त्याने माझे सगळे ‘मार्ग मोकळे केले.’ (नीति. ३:५, ६) तरुणपणी मला एका मोठ्या कंपनीत काम करायला मिळालं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण यहोवाच्या जागतिक संघटनेत काम केल्यामुळे मला जे समाधान मिळालंय त्याची तुलना कशाशीच केली जाऊ शकत नाही. यहोवाची सेवा करणं हाच माझा सगळ्यात मोठा आनंद होता आणि आजही आहे!

^ मलावीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांचा इतिहास १९९९ ईअर बुक ऑफ जेहोवाज विट्‌नेसेस, या पुस्तकात पान १४८-२२३ मध्ये दिला आहे.

^ सध्या मलावीत एक लाखाहून जास्त प्रचारक आहेत.