व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३८

भरवशालायक असल्याचं दाखवून द्या

भरवशालायक असल्याचं दाखवून द्या

“बदनामी करणारा गुप्त गोष्टी सगळ्यांना सांगत फिरतो, पण जो भरवशालायक असतो, तो त्या गुप्त ठेवतो.”​—नीति. ११:१३.

गीत ५३ ऐक्य जपू या

सारांश *

१. भरवशालायक व्यक्‍ती कशी असते?

 जो भरवशालायक असतो तो दिलेला शब्द पाळतो आणि नेहमी खरं बोलतो. (स्तो. १५:४) लोकांनाही माहीत असतं, की आपण अशा व्यक्‍तीवर भरवसा ठेवू शकतो. आपल्या भाऊबहिणींनी आपल्याबद्दलही असा विचार करावा अशी आपली इच्छा आहे. तर मग, त्यांचा भरवसा मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

२. भरवशालायक असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

आपण इतरांना आपल्यावर भरवसा ठेवायला लावू शकत नाही. आपण तो भरवसा कमवला पाहिजे. भरवसा हा पैशासारखा असतो. तो कमवणं कठीण आहे पण गमावणं सोपं आहे. यहोवाने नक्कीच आपला भरवसा जिंकलाय असं आपण म्हणू शकतो. कारण “त्याची सर्व कार्यं भरवशालायक आहेत.” (स्तो. ३३:४) त्यामुळे आपण त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो आणि तो कधीच आपली निराशा करणार नाही. आणि आपणही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा अशी त्याची इच्छा आहे. (इफिस. ५:१) आता आपण यहोवाच्या काही सेवकांची उदाहरणं पाहू ज्यांनी त्याचं अनुकरणं केलं आणि भरवशालायक असल्याचं दाखवून दिलं. तसंच, भरवशालायक होण्यासाठी कोणते पाच गुण आपण स्वतःमध्ये वाढवू शकतो तेही आपण पाहू या.

यहोवाच्या भरवशालायक सेवकांकडून शिका

३-४. दानीएल संदेष्ट्याने भरवशालायक असल्याचं कसं दाखवून दिलं? आणि आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे?

भरवशालायक असण्याच्या बाबतीत दानीएल  संदेष्ट्याने आपल्यासमोर एक खूप चांगलं उदाहरण मांडलंय. त्याला बाबेलमध्ये कैदी बनवून नेण्यात आलं होतं. तरीसुद्धा काही काळातच भरवशालायक असण्याच्या बाबतीत त्याने एक चांगलं नाव कमवलं होतं. आणि जेव्हा यहोवाच्या मदतीने त्याने बाबेलच्या नबुखद्‌नेस्सर राजाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, तेव्हा लोकांचा त्याच्यावरचा भरवसा आणखीनच वाढला. एकदा तर दानीएलला असा एक संदेश राजाला सांगायचा होता जो नक्कीच त्याला आवडणार नव्हता. यहोवा त्याच्यावर नाराज आहे असं दानीएलला राजाला सांगायचं होतं. हा संदेश सांगण्यासाठी धैर्याची गरज होती. कारण नबुखद्‌नेस्सरचा खूप तापट स्वभाव होता. पण असं असतानाही दानीएलने राजाला तो संदेश सांगितला आणि अशा रीतीने आपण भरवशालायक असल्याचं दाखवून दिलं. (दानी. २:१२; ४:२०-२२, २५) मग बऱ्‍याच वर्षांनंतर बाबेलच्या राजमहालाच्या भिंतीवर एक गूढ संदेश दिसला. या गूढ संदेशाचा अचूक अर्थ सांगून दानीएलने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं की तो भरवशालायक आहे. (दानी. ५:५, २५-२९) पुढे, मेदचा राजा दारयावेश आणि त्याच्या अधिकाऱ्‍यांनीही ही गोष्ट ओळखली की दानीएलकडे “विलक्षण बुद्धिमत्ता” आहे. दानीएल “भरवशालायक असून त्याच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा किंवा अप्रामाणिकपणा” नाही ही गोष्ट त्यांनी मान्य केली. (दानी. ६:३, ४) अशा प्रकारे यहोवाची उपासना न करणाऱ्‍या राजांनीही ही गोष्ट ओळखली, की यहोवाचा हा सेवक भरवशालायक आहे.

दानीएलच्या उदाहरणावर विचार करताना आपण स्वतःला हे प्रश्‍न विचारू शकतो: ‘यहोवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांमध्ये मी कशा प्रकारचं नाव कमवलंय? लोक मला एक जबाबदार आणि भरवशालायक व्यक्‍ती म्हणून ओळखतात का?’ या प्रश्‍नांवर विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण भरवशालायक असतो तेव्हा यहोवाची स्तुती होते.

महत्त्वाची कामं करण्यासाठी नहेम्याने भरवशालायक माणसांची निवड केली (परिच्छेद ५ पाहा)

५. लोक हनन्याहला भरवशालायक का समजायचे?

इ.स.पू. ४५५ मध्ये राज्यपाल नहेम्याने यरुशलेमच्या भिंती पुन्हा बांधल्या. शहराची काळजी घेण्यासाठी तो अशा लोकांना शोधत होता जे भरवशालायक असतील. त्याने निवडलेल्या लोकांमध्ये किल्ल्याचा अधिकारी हनन्याहसुद्धा  होता. बायबलमध्ये म्हटलंय की हनन्याह “खूप भरवशालायक माणूस होता आणि तो इतर बऱ्‍याच लोकांपेक्षा खऱ्‍या देवाची जास्त भीती बाळगायचा.” (नहे. ७:२) यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि त्याला नाराज करण्याची भीती असल्यामुळे हनन्याह त्याच्यावर सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचा. या गुणांमुळे आपल्यालाही यहोवाची प्रामाणिकपणे सेवा करायला आणि भरवशालायक व्हायला मदत होईल.

६. तुखिक पौलचा एक भरवशालायक मित्र होता असं का म्हणता येईल?

आता तुखिक  याचं उदाहरण पाहू या. तो प्रेषित पौलचा एक भरवशालायक सोबती होता. पौल कैदेत होता तेव्हा तुखिकने त्याला खूप मदत केली आणि म्हणून पौलने त्याला “विश्‍वासू सेवक” म्हटलं. (इफिस. ६:२१, २२) त्याने इफिस आणि कलस्सै इथल्या भावांना पौलची पत्रं पोहोचवली. आणि इतकंच नाही तर त्यांना प्रोत्साहन आणि सांत्वनसुद्धा दिलं. तुखिकप्रमाणेच आज विश्‍वासू आणि भरवशालायक बांधव आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करतात.​—कलस्सै. ४:७-९.

७. भरवशालायक असण्याबद्दल तुमच्या मंडळीतल्या वडिलांकडून आणि सहायक सेवकांकडून तुम्ही काय शिकू शकता?

आज आपल्या मंडळीतल्या वडिलांची आणि सहायक सेवकांची आपल्याला खूप कदर वाटते. कारण तेसुद्धा भरवशालायक आहेत. दानीएल, हनन्याह आणि तुखिकप्रमाणेच तेसुद्धा आपल्या जबाबदाऱ्‍या प्रामाणिकपणे पार पाडतात. उदाहरणार्थ, आठवड्याच्या सभेला आपण जातो तेव्हा कार्यक्रमातले वेगवेगळे भाग भाऊबहिणींना नेमून देण्यात आले असतील की नाही, अशी शंका आपल्याला नसते. आणि या भाऊबहिणींना नेमून दिलेले भाग जेव्हा ते प्रामाणिकपणे तयार करतात आणि सादर करतात, तेव्हा वडील या गोष्टीची कदर करतात. तसंच विचार करा, जेव्हा आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना रविवारच्या सभेला यायचं आमंत्रण देतो तेव्हा जाहीर भाषण द्यायला कोणाला नेमलं असेल की नाही, अशी भीती आपल्या मनात असते का? नक्कीच नाही. तसंच सेवाकार्यासाठी आवश्‍यक असलेलं सगळं साहित्य नक्की मिळेल याचीही खातरी आपल्याला असते. खरंच, हे विश्‍वासू बांधव आध्यात्मिक रीतीने आपली खूप चांगली काळजी घेतात आणि म्हणून आपण यहोवाचे आभार मानले पाहिजे. पण मग आपणसुद्धा भरवशालायक आहोत हे आपण कसं दाखवू शकतो?

माहिती गुप्त ठेवून भरवशालायक असल्याचं दाखवून द्या

८. इतरांबद्दल काळजी असली तरीही आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (नीतिवचनं ११:१३)

आपल्या भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. पण असं असलं तरी त्यांच्या खासगी गोष्टी जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करू नये. पहिल्या शतकातल्या ख्रिस्ती मंडळीत काही जणांना ‘गप्पा मारण्याची सवय होती आणि ते दुसऱ्‍यांच्या कामांत लुडबुड करायचे. तसंच, ज्यांबद्दल त्यांनी बोलायला नको अशा गोष्टींबद्दल ते बोलायचे.’ (१ तीम. ५:१३) आपल्याला त्यांच्यासारखं होण्याची इच्छा नाही. पण कदाचित एखादा भाऊ किंवा बहीण स्वतःहून आपल्याला त्यांच्याबद्दल एखादी खासगी माहिती सांगेल, आणि अशी अपेक्षा करेल की आपण ती दुसऱ्‍या कोणाला सांगू नये. उदाहरणार्थ, कदाचित एखादी बहीण आपल्याला तिला झालेल्या एखाद्या आजाराबद्दल सांगेल किंवा दुसऱ्‍या एखाद्या समस्येबद्दल सांगेल. आणि याबद्दल आपण कुठे बोलू नये असं कदाचित ती म्हणेल. अशा वेळी आपण तिच्या विनंतीला मान देऊन ती माहिती स्वतःजवळच ठेवली पाहिजे. * (नीतिवचनं ११:१३ वाचा.) पण अशा इतरही काही परिस्थिती असतात जेव्हा आपण माहिती गुप्त ठेवली पाहिजे. त्याबद्दल आता पाहू या.

९. कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपण भरवशालायक आहोत हे कसं दाखवून देऊ शकतो?

कुटुंबामध्ये.  कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावर ही जबाबदारी आहे की त्याने कुटुंबाच्या खासगी गोष्टी दुसऱ्‍या कोणाला सांगू नये. उदाहरणार्थ, एखाद्या पतीला आपल्या पत्नीची एखादी सवय विचित्र वाटत असेल. मग तो इतरांना त्याबद्दल सांगेल का आणि तिला अवघडल्यासारखं वाटेल असं काही करेल का? नक्कीच नाही. त्याचं आपल्या पत्नीवर प्रेम असल्यामुळे तिला वाईट वाटेल असं काहीही तो करणार नाही. (इफिस. ५:३३) तसंच, तरुणांनाही असं वाटतं की इतरांनी आपल्याशी आदराने वागावं. आईवडिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्या मुलांच्या चुका इतरांना सांगू नये. कारण असं केल्यामुळे त्यांना अपमान झाल्यासारखं वाटू शकतं. (कलस्सै. ३:२१) तसंच मुलांनीसुद्धा समजूतदारपणे वागलं पाहिजे आणि घरातली खासगी माहिती दुसऱ्‍यांना सांगू नये. (अनु. ५:१६) जेव्हा कुटुंबातला प्रत्येक सदस्य घरातली खासगी माहिती गुप्त ठेवतो तेव्हा कुटुंबातली नाती आणखी घट्ट होतात.

१०. खरा मित्र कसा असतो? (नीतिवचनं १७:१७)

१० मैत्रीच्या नात्यात.  कधीकधी आपल्याला आपल्या जवळच्या मित्रासमोर आपलं मन मोकळं करावंसं वाटतं आणि त्याला मनातलं सगळं काही सांगावंसं वाटतं. पण असं करणं सगळ्यांसाठीच सोपं नसतं. आपल्या मनातले विचार इतरांसमोर बोलून दाखवणं काही जणांना कठीण जातं. आणि आपल्या मित्राने आपल्या खासगी गोष्टी इतरांना सांगितल्यात हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा तर आपल्याला धक्काच बसतो. पण तेच जेव्हा तो एखाद्या ‘खऱ्‍या मित्रासारखा’ आपल्या खासगी गोष्टी गुप्त ठेवतो तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं!​—नीतिवचनं १७:१७ वाचा.

वडील आपल्या घरच्या लोकांना गोपनीय माहिती सांगत नाहीत (परिच्छेद ११ पाहा) *

११. (क) वडील आणि त्यांच्या पत्नी आपण भरवशालायक आहोत हे कसं दाखवून देतात? (ख) मंडळीतली एक समस्या हाताळल्यानंतर वडील आपल्या कुटुंबाला गुप्त गोष्टी सांगत नाहीत यावरून आपण काय शिकू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

११ मंडळीमध्ये.  मंडळीतले वडील भरवशालायक असतात. ते ‘वाऱ्‍यापासून लपण्याची जागा, आणि वादळी पावसापासून मिळणाऱ्‍या आसऱ्‍यासारखे’ असतात. (यश. ३२:२) आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतो. आणि आपण त्यांना सांगितलेली माहिती ते इतर कोणाला सांगणार नाहीत याची आपल्याला खातरी असते. काही गोष्टी त्यांना गुप्त ठेवाव्या लागतात. त्यामुळे अशी माहिती त्यांच्याकडून काढून घ्यायचा आपण प्रयत्न करणार नाही. तसंच त्यांच्या पत्नींचीही आपण कदर करतो, कारण त्या आपल्या पतीकडून गोपनीय माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. खरंतर वडिलांच्या पत्नींना भाऊबहिणींबद्दल गुप्त गोष्टी माहीत नसणं ही त्यांच्यासाठी एक चांगलीच गोष्ट आहे. याबद्दल एका वडिलांची पत्नी असं म्हणते: “माझे पती मला मंडळीतली गुप्त माहिती सांगत नाहीत. जसं की, ते कोणाला मेंढपाळ भेटी देतात किंवा कोणत्या भाऊबहिणींना आध्यात्मिक मदतीची गरज आहे हे सांगत नाहीत. इतकंच काय तर त्यांची नावंही मला माहीत नसतात आणि खरंतर हे चांगलंच आहे. कारण ज्या समस्यांबद्दल मी काही करू शकत नाही, त्यांबद्दल मला विनाकारण चिंता करावी लागत नाही. आणि यामुळे मी मंडळीतल्या सगळ्यांसोबत नेहमीसारखंच मिळून-मिसळून राहू शकते. शिवाय मला याची खातरी असते की जेव्हा मी माझ्या पतीला माझ्या भावनांबद्दल किंवा समस्यांबद्दल सांगते तेव्हा त्या गोष्टीसुद्धा ते कोणाला सांगणार नाहीत.” साहजिकच, फक्‍त वडिलांनीच नाही, तर आपण सर्वांनीच भरवशालायक असण्याच्या बाबतीत एक चांगलं नाव कमवलं पाहिजे. मग यासाठी कोणते गुण आपल्याला मदत करतील? आपण अशा पाच गुणांवर आता चर्चा करू या.

भरवशालायक व्यक्‍ती बनण्यासाठी हे गुण वाढवा

१२. भरवसा हा प्रेमावर आधारित असतो असं का म्हणता येईल? एक उदाहरण द्या.

१२ प्रेम  भरवशाचा आधार आहे. येशूने म्हटलं होतं की यहोवावर प्रेम करणं आणि आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम करणं या दोन सगळ्यात महत्त्वाच्या आज्ञा आहेत. (मत्त. २२:३७-३९) यहोवा स्वतः भरवशालायक आहे. आणि यहोवावर आपलं प्रेम असल्यामुळे त्याच्या परिपूर्ण उदाहरणाचं अनुकरण करायची प्रेरणा आपल्याला मिळते. उदाहरणार्थ, भाऊबहिणींवर प्रेम असल्यामुळे आपण त्यांच्या खासगी गोष्टी गुप्त ठेवतो. त्यांचं ज्यामुळे नुकसान होईल किंवा त्यांना अवघडल्यासारखं वाटेल किंवा ज्यामुळे त्यांच्या भावना दुखावतील अशा कोणत्याही गोष्टी आपण इतरांना सांगणार नाही.​—योहा. १५:१२.

१३. भरवशालायक होण्यासाठी नम्रतेचा गुण आपल्याला कशी मदत करू शकतो?

१३ नम्रता  आपल्याला भरवशालायक होण्यासाठी मदत करते. एक नम्र व्यक्‍ती एखादी गोष्ट सगळ्यात आधी सांगून इतरांना प्रभावित करायचा प्रयत्न करत नाही. (फिलिप्पै. २:३) एक नम्र व्यक्‍ती कधीही असं दाखवत नाही की मी इतरांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, माझ्याकडे काहीतरी गुप्त माहिती आहे पण ती मी तुम्हाला सांगू शकत नाही, असं ती कधीही भासवायचा प्रयत्न करत नाही. तसंच एक नम्र व्यक्‍ती बायबलमध्ये किंवा आपल्या बायबल आधारित प्रकाशनांमध्ये ज्या गोष्टींबद्दल सांगितलेलं नाही त्यांबद्दल स्वतःचे अंदाज बांधून इतरांना सांगणार नाही.

१४. समंजसपणा आपल्याला भरवशालायक होण्यासाठी कशी मदत करतो?

१४ समंजसपणा  एका ख्रिस्ती व्यक्‍तीला “शांत राहण्याची वेळ आणि बोलण्याची वेळ” कोणती आहे हे समजून घ्यायला मदत करेल. (उप. ३:७) “बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ” अशी एक म्हण आहे. दुसऱ्‍या शब्दांत म्हणायचं तर कधीकधी बोलण्यापेक्षा शांत राहणंच जास्त चांगलं असतं. म्हणूनच नीतिवचनं ११:१२ यात असा सल्ला दिलाय: “जो खरोखर समंजस असतो, तो शांत राहतो.” उदाहरणार्थ, मंडळीत सेवा करणाऱ्‍या एका अनुभवी वडिलांचा विचार करा. त्यांना इतर मंडळ्यांमधल्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी मदत करायला सहसा बोलवलं जातं. त्यांच्याच मंडळीत सेवा करणाऱ्‍या दुसऱ्‍या एका वडिलाने त्यांच्याबद्दल असं म्हटलं, “ते मंडळ्यांबद्दलची गोपनीय माहिती आपल्या तोंडून जाऊ नये याची नेहमी काळजी घेतात.” या वडिलांच्या समंजसपणामुळे त्यांच्या मंडळीच्या वडील वर्गातल्या सर्व भावांना त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. कारण त्यांना याची खातरी आहे की त्यांची गोपनीय माहितीसुद्धा ते कधीच इतरांना सांगणार नाही.

१५. प्रामाणिक राहिल्यामुळे आपण इतरांचा भरवसा कसा जिंकू शकतो याचं एक उदाहरण द्या.

१५ प्रामाणिकपणा  हासुद्धा भरवशालायक असण्याचाच एक भाग आहे. प्रामाणिक व्यक्‍तीवर आपला भरवसा असतो कारण तो नेहमी खरं तेच बोलेल हे आपल्याला माहीत असतं. (इफिस. ४:२५; इब्री १३:१८) उदाहरणार्थ, तुम्हाला आपलं शिकवण्याचं कौशल्य वाढवायचं आहे. त्यासाठी तुम्ही कोणालातरी तुमचं भाषण ऐकायला सांगता आणि कुठे सुधारणा करता येतील याबद्दल सूचना देण्याची विनंती करता. तुम्हाला कोणाबद्दल असा भरवसा वाटेल की तो तुम्हाला अगदी प्रामाणिक सल्ला देईल​—जो फक्‍त वरवर प्रशंसा करतो अशा व्यक्‍तीबद्दल, की जो तुम्हाला खरं सांगतो आणि प्रेमळपणे ते सांगतो अशा व्यक्‍तीबद्दल? उत्तर स्पष्टच आहे. बायबलमध्ये असं म्हटलंय: “मनात लपवलेल्या प्रेमापेक्षा उघडपणे दिलेलं ताडन बरं. मित्राने केलेले घाव विश्‍वासू असतात.” (नीति. २७:५, ६) एका मित्राचा प्रामाणिक सल्ला जरी सुरवातीला आपल्याला ऐकायला चांगला वाटत नसला तरी पुढे आपल्याला त्यामुळे कायमचा फायदा होईल.

१६. आत्मसंयम किती महत्त्वाचा आहे हे नीतिवचनं १०:१९ या वचनातून आपल्याला कसं कळतं?

१६ आत्मसंयम  हा इतरांचा भरवसा जिंकण्यासाठी खूप महत्त्वाचा गुण आहे. आपल्याजवळ असलेली एखादी गोपनीय माहिती जेव्हा इतरांना सांगायचा आपल्याला मोह होतो, तेव्हा आत्मसंयम हा गुण ती माहिती गुप्त ठेवायला आपल्याला मदत करतो. (नीतिवचनं १०:१९ वाचा.) सोशल मिडियाचा वापर करत असताना आपल्या आत्मसंयमाची परीक्षा होऊ शकते. जर आपण खबरदारी बाळगली नाही तर नकळत आपल्याकडून गोपनीय माहिती इतरांना कळू शकते आणि मग ती वाऱ्‍यासारखी पसरू शकते. आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून एकदा का आपल्याकडून काही महिती गेली, की मग पुढे तिचा कसा उपयोग होईल किंवा त्यामुळे कायकाय नुकसान होईल यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं. आणि म्हणूनच आत्मसंयम खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा विरोधक आपल्याकडून माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करतात, तेव्हा आत्मसंयमाचा हा गुण आपल्याला शांत राहायला मदत करेल आणि आपण त्यांना अशी कोणतीही माहिती देणार नाही ज्यामुळे आपल्या भाऊबहिणींसाठी धोका निर्माण होईल. हे अशा एखाद्या देशात घडू शकतं जिथे आपल्या कामावर सरकारने बंदी घातली आहे किंवा निर्बंध लादले आहेत. जर आपण अशा देशात राहत असू तर पोलीस आपली चौकशी करू शकतात आणि आपल्या कामाबद्दल आणि भाऊबहिणींबद्दल आपल्याला प्रश्‍न विचारू शकतात. या आणि अशा इतर परिस्थितींमध्येही आपण बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे “आपल्या तोंडाला लगाम” घातला पाहिजे. (स्तो. ३९:१) आपण आपल्या घरच्या लोकांसोबत, मित्रांसोबत, भाऊबहिणींसोबत किंवा इतर कोणासोबतही व्यवहार करतो तेव्हा आपण भरवशालायक असलं पाहिजे. आणि भरवशालायक असण्यासाठी आत्मसंयम खूप महत्त्वाचा आहे.

१७. मंडळीत सगळ्यांना एकमेकांवर भरवसा ठेवणं सोपं जावं म्हणून आपण काय करू शकतो?

१७ आपण प्रेमळ आणि भरवशालायक असलेल्या भाऊबहिणींच्या एका मोठ्या परिवाराचा भाग आहोत यासाठी आपण यहोवाचे किती आभार मानले पाहिजेत! पण आपल्या भाऊबहिणींचा भरवसा मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर आपल्यापैकी प्रत्येकाने प्रेम, नम्रता, समंजसपणा, प्रामाणिकपणा आणि आत्मसंयम यांसारखे गुण स्वतःमध्ये वाढवायचा प्रयत्न केला, तर मंडळीत सगळ्यांना एकमेकांवर भरवसा ठेवणं सोपं जाईल. आपण भरवशालायक आहोत हे दाखवून देण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहावे लागतील. तर मग आपण सर्व जण यहोवा देवाचं अनुकरण करत राहू या आणि भरवशालायक असल्याचं दाखवून देऊ या!

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

^ इतरांनी आपल्यावर भरवसा ठेवावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण भरवशालायक आहोत हे आपण आधी दाखवून दिलं पाहिजे. भरवशालायक असणं इतकं महत्त्वाचं का आहे आणि इतरांनी आपल्यावर भरवसा ठेवावा म्हणून आपण कोणते गुण स्वतःमध्ये वाढवू शकतो याबद्दल आपण या लेखात पाहू.

^ मंडळीत एखाद्याच्या हातून गंभीर पाप झाल्याचं जर आपल्याला समजलं, तर आपण त्याला वडिलांकडे जाऊन मदत घेण्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे. जर त्याने तसं केलं नाही तर आपण मंडळीच्या वडिलांना त्याबद्दल सांगितलं पाहिजे. आणि असं करून आपण यहोवाला आणि ख्रिस्ती मंडळीला एकनिष्ठ आहोत हे दाखवून दिलं पाहिजे.

^ चित्राचं वर्णन: मंडळीतली एक समस्या हाताळल्यानंतर वडील आपल्या कुटुंबाला गोपनीय माहिती सांगत नाहीत.