व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

मी यहोवाबद्दल शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद अनुभवलाय

मी यहोवाबद्दल शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद अनुभवलाय

मी अमेरिकेतल्या पेन्सिल्व्हेनिया राज्यातल्या ईस्टन शहरात लहानाचा मोठा झालो. लहानपणी माझं विद्यापीठातून शिक्षण घेण्याचं आणि मोठं नाव कमवण्याचं स्वप्न होतं. मला अभ्यास करायला खूप आवडायचं. आणि गणित आणि सायन्समध्ये मला चांगले मार्क मिळायचे. १९५६ मध्ये तर काळ्या वर्णाच्या विद्यार्थ्यांपैकी सगळ्यात चांगले मार्क मिळाल्याबद्दल एका नागरी हक्क संस्थेने मला २५ डॉलरचं बक्षीस दिलं. पण नंतर माझी ध्येयं बदलली. असं का घडलं?

मी यहोवाबद्दल कसं शिकलो?

१९४० नंतर माझ्या आईवडिलांनी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबल अभ्यास सुरू केला. त्यांचा अभ्यास मध्येच बंद पडला पण माझ्या आईला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! मासिकं मिळत राहिली. मग १९५० मध्ये आम्हाला न्यू यॉर्क शहरात होणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचं आमंत्रण मिळालं. आणि आम्ही कुटुंब मिळून त्या अधिवेशनाला गेलो.

याच्या काही दिवसांनीच ब्रदर लॉरेन्स जेफरीस आम्हाला भेटायला येऊ लागले. त्यांनी माझ्यात आवड घेतली आणि ते मला सत्य शिकायला मदत करू लागले. जेव्हा मला कळलं की यहोवाचे साक्षीदार राजकारणात आणि सैन्यात भाग घेत नाहीत तेव्हा सुरुवातीला मला ते पटलं नाही. आणि मी ब्रदर जेफरीसला तसं सांगितलंसुद्धा. मी म्हणालो, “अमेरिकेतल्या सगळ्यांनीच जर युद्धात जायला नकार दिला तर शत्रू येऊन आपल्या देशावर कब्जा करतील.” पण ब्रदर जेफरीसने मला खूप शांतपणे समजावून सांगितलं. ते म्हणाले, “तुला काय वाटतं जर अमेरिकेतल्या सर्व लोकांनी यहोवा देवाची सेवा करायला सुरुवात केली आणि शत्रूंनी जर त्यांच्यावर हल्ला केला तर यहोवा देव काय करेल?” त्यांनी मला या आणि दुसऱ्‍या विषयांबद्दल समजावून सांगितलं तेव्हा मला समजलं की मी चुकीचा विचार करत होतो. यामुळे मला सत्याबद्दल आणखीन शिकून घ्यावंसं वाटलं.

माझा बाप्तिस्मा

माझ्या आईने तळघरात टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांची जुनी मासिकं ठेवली होती. ती मी तासन्‌तास वाचत बसायचो. हळूहळू मला कळू लागलं की हेच सत्य आहे. म्हणून मग मी ब्रदर जेफरीससोबत बायबल अभ्यास करायला तयार झालो. मी सगळ्या सभांनाही जाऊ लागलो. मी जे शिकत होतो ते मला मनापासून आवडू लागलं आणि लवकरच मी एक प्रचारक बनलो. “यहोवाचा मोठा दिवस जवळ आला आहे,” हे जेव्हा मला समजलं तेव्हा माझी ध्येयं बदलली. (सफ. १:१४) आता मला विद्यापीठात जाऊन शिकायचं नव्हतं. त्याऐवजी मला लोकांना बायबलमधली सत्यं शिकायला मदत करायची होती.

१३ जून १९५६ ला माझं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण झालं. त्याच्या तीन दिवसांनंतर एका विभागीय संमेलनात माझा बाप्तिस्मा झाला. मी यहोवाबद्दल शिकण्यासाठी आणि दुसऱ्‍यांना त्याच्याबद्दल शिकवण्यासाठी आपलं आयुष्य वापरायचं ठरवलं. यामुळे मला इतके आशीर्वाद मिळतील याची मला त्या वेळी कल्पनाही नव्हती.

पायनियर म्हणून शिकणं आणि शिकवणं

माझ्या बाप्तिस्म्याच्या सहा महिन्यांनंतर मी पायनियर सेवा सुरू केली. डिसेंबर १९५६ च्या राज्य सेवेत एक लेख आला होता, “जास्त गरज असलेल्या ठिकाणी तुम्ही जाऊन सेवा करू शकता का?” तो लेख वाचल्यावर मला वाटलं, मी हे करू शकतो. मला खरंच अशा ठिकाणी जाऊन सेवा करायची होती जिथे प्रचारकांची खूप गरज होती.​—मत्त. २४:१४.

मी साऊथ कॅरोलाइना इथल्या एजफिल्ड शहरात राहायला गेलो. तिथल्या मंडळीत फक्‍त चारच प्रचारक होते आणि मी गेल्यावर तिथे पाच झाले. एका ब्रदरच्या घरात हॉलमध्ये आमच्या सभा व्हायच्या. दर महिन्यात मी प्रचारात १०० तास घालवायचो. मला प्रचार कार्यात पुढाकार घ्यावा लागायचा आणि मंडळीत भाषणं द्यावी लागायची. त्यामुळे मी खूप बिझी असायचो. पण मंडळीत मी जितकं जास्त काम केलं तितकं मला यहोवाबद्दल शिकायला मिळालं.

एजफिल्डपासून काही अंतरावर असलेल्या जॉन्स्टन नावाच्या गावात मी एका स्त्रीसोबत बायबल अभ्यास करायचो. तिचा स्वतःचा व्यवसाय होता. त्या वेळी मला कामाची खूप गरज होती. आणि तिने मला तिच्याकडे पार्ट-टाईम काम दिलं. तसंच तिने आम्हाला राज्य सभागृहासाठी वापरायला एक जागाही दिली.

ज्या ब्रदरने माझ्यासोबत बायबल अभ्यास केला होता त्यांचा मुलगा जॉली जेफरीस हा न्यू यॉर्क ब्रुकलिनमधून एजफिल्डला आला आणि माझा पायनियर सोबती बनला. एका ब्रदरने आम्हाला ट्रेलर (राहायची सोय असलेली गाडी) दिलं. त्यात आम्ही राहू लागलो.

त्या वेळी दक्षिण भागात खूप कमी पगार मिळायचा. म्हणजे दिवसभर काम केल्यावर जेमतेम दोन किंवा तीन डॉलर मिळायचे. एकदा तर माझ्याकडे फक्‍त थोडेसेच पैसे होते. आणि मग मी सामान घेतलं तर तेही संपले. मग मी दुकानातून जेव्हा बाहेर आलो तेव्हा एक माणूस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला: “तू माझ्याकडे काम करशील का? तुला मी दर तासाला एक डॉलर देईल.” त्याने मला बांधकामाच्या ठिकाणी तीन दिवसांसाठी साफसफाईचं काम दिलं. खरंच, यहोवाच मला एजफिल्डमध्ये राहायला मदत करत होता याचा मला पुरावा मिळाला. माझ्याजवळ जास्त पैसे नव्हते. तरीसुद्धा मी १९५८ मध्ये न्यू यॉर्क सिटीत झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला जाऊ शकलो.

आमच्या लग्नाच्या दिवशी

अधिवेशनाच्या दुसऱ्‍या दिवशी एक खास गोष्ट घडली. रूबी वॉडलिंग्टन हिच्याशी माझी भेट झाली. ती टेनेस्सी राज्यातल्या गॅलेटिन नावाच्या ठिकाणी रेग्युलर पायनियर म्हणून सेवा करत होती. आम्हाला दोघांनाही मिशनरी सेवा करायची होती. म्हणून आम्ही अधिवेशनात झालेल्या गिलियड सभेला हजर राहिलो. पुढे आम्ही एकमेकांना पत्र लिहत राहिलो. मग एकदा मला गॅलेटिनमध्ये जाहीर भाषण द्यायला बोलावण्यात आलं. मी या संधीचा फायदा घेऊन तिला लग्नासाठी विचारलं. तिने होकार दिल्यामुळे मी गॅलेटिनमध्ये राहायला गेलो आणि १९५९ मध्ये आमचं लग्न झालं.

मंडळीत शिकणं आणि शिकवणं

मी जेव्हा २३ वर्षांचा होतो त्या वेळी मला गॅलेटिनमध्ये मंडळीचा सेवक (आता ज्याला वडील वर्गाचे संयोजक म्हणतात) म्हणून नियुक्‍त करण्यात आलं. त्या वेळी चार्ल्स थॉम्प्सन यांना नुकतंच विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं. आणि त्यांनी सगळ्यात आधी आमच्याच मंडळीला भेट दिली. ते खूप अनुभवी होते. तरीसुद्धा मंडळीतल्या भाऊबहिणींना कोणत्या गोष्टींची गरज आहे त्याबद्दल आणि दुसरे विभागीय पर्यवेक्षक मंडळीची देखरेख कशी करतात याबद्दल ते मला विचारायचे. त्यांच्याकडून मी एक गोष्ट शिकलो. कोणताही निर्णय घेण्याआधी प्रश्‍न विचारणं आणि सगळी माहिती घेणं चांगलं असतं.

मे १९६४ मध्ये मला एका महिन्याच्या राज्य सेवा प्रशालेसाठी बोलवण्यात आलं. ही प्रशाला न्यू यॉर्कच्या साऊथ लॅनसिंग इथे झाली. या प्रशालेमुळे मला यहोवाबद्दल आणखीन शिकून घ्यावंसं वाटू लागलं. आणि त्याच्यासोबतचं माझं नातं आणखीन मजबूत झालं.

विभागीय आणि प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून शिकणं आणि शिकवणं

जानेवारी १९६५ मध्ये मला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं आणि मी आणि रूबी मंडळ्यांना भेटी देऊ लागलो. आमच्या विभागाचं क्षेत्र खूप मोठं होतं. म्हणजे टेनेस्सी मधल्या नॉक्सविल पासून व्हर्जिनिया मधल्या रिचमंडपर्यंतच्या मंडळ्यांना आम्हाला भेटी द्यायच्या होत्या. नॉर्थ कॅरोलाइना, केन्टुकी आणि वेस्ट व्हर्जिनिया मधल्या मंडळ्यांनासुद्धा आम्हाला भेटी द्यायच्या होत्या. मी फक्‍त काळ्या वर्णाचे भाऊबहीण असलेल्या मंडळ्यांनाच भेट द्यायचो. कारण त्या काळी अमेरिकेच्या दक्षिण भागात वर्णभेद होता. त्यामुळे काळ्या आणि गोऱ्‍या वर्णाचे भाऊबहीण एकत्र भेटू शकत नव्हते. आमच्या विभागातले भाऊबहीण गरीब होते. त्यामुळे आमच्याकडे जे काही होतं त्यातून आम्ही गरजू भाऊबहिणींना मदत करायला शिकलो. खूप वर्षांपासून विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्‍या एका भावाने मला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली. ते म्हणाले: “मंडळीत जाताना एखाद्या साहेबासारखा नाही तर भावासारखा वाग. त्यांना तू भावासारखा वाटलास तरच  तू त्यांना मदत करू शकशील.”

आम्ही एकदा एका लहानशा मंडळीला भेट देत होतो, तेव्हा रूबीने एका तरुण स्त्रीचा अभ्यास सुरू केला. तिला एक वर्षाची मुलगीही होती. मंडळीत कोणालाही तिचा बायबल अभ्यास घेणं शक्य नसल्यामुळे रूबी पत्राद्वारे तिच्यासोबत अभ्यास करू लागली. आमच्या पुढच्या भेटीच्या वेळी ती स्त्री प्रत्येक सभेला आली. मग दोन खास पायनियर बहिणी त्या मंडळीत आल्या आणि त्यांनी त्या स्त्रीचा अभ्यास सुरू ठेवला. आणि काही काळातच त्या स्त्रीचा बाप्तिस्मा झाला. याच्या जवळपास ३० वर्षांनंतर म्हणजे १९९५ मध्ये पॅटरसनच्या बेथेलमध्ये एक तरुण बहीण रूबीजवळ आली आणि तिने स्वतःची ओळख करून दिली. रूबीने ज्या स्त्रीसोबत अभ्यास केला होता त्या स्त्रीची ही मुलगी होती. ती आणि तिचे पती गिलियड प्रशालेच्या १०० व्या क्लासमध्ये विद्यार्थी होते.

पुढे आम्हाला मध्य फ्लॉरिडा विभागात नेमण्यात आलं. तिथे आम्हाला एका कारची गरज होती. आणि आम्हाला एक कार स्वस्तात मिळाली. पण पहिल्याच आठवड्यात इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाला. पण आता आमच्याजवळ कार दुरुस्त करायलाही पैसे नव्हते. मग मला एका भावाची आठवण आली जे आम्हाला मदत करू शकतील. त्यांच्याकडे काम करणाऱ्‍या एका मेकॅनिकला त्यांनी आमची कार दुरुस्त करायला सांगितलं आणि त्यांनी आमच्याकडून पैसेही घेतले नाहीत. “तुमचं काम झालंय. काळजी करू नका,” इतकंच ते म्हणाले. वर बक्षीस म्हणून त्यांनी आम्हाला थोडे पैसेही दिले. खरंच, यहोवा आपल्या लोकांची किती चांगल्या प्रकारे काळजी घेतो याचं हे एक चांगलं उदाहरण होतं. तसंच आम्हाला हेही शिकायला मिळालं की आपण इतरांना उदारपणे मदत केली पाहिजे.

आम्ही जेव्हा मंडळ्यांना भेटी द्यायचो तेव्हा आम्ही सहसा भाऊबहिणींच्या घरी राहायचो. त्यामुळे बऱ्‍याच भाऊबहिणींसोबत आमचं जवळचं नातं जुळलं. एकदा एका कुटुंबासोबत राहताना मी मंडळीचा रिपोर्ट टाईप करत होतो. मग बाहेर जाताना तो रिपोर्ट त्या टाईपरायटरमध्येच राहून गेला. आणि संध्याकाळी परत येऊन पाहतो तर काय, त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाने माझा तो रिपोर्ट चक्क पूर्ण करून ठेवला होता! त्याने केलेल्या या “मदतीबद्दल” बरीच वर्षं मी त्याला चिडवत राहिलो.

१९७१ मध्ये मला संघटनेकडून एक पत्र आलं. मला न्यू यॉर्क सिटीमध्ये प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं होतं. आम्हाला धक्काच बसला! आम्ही तिथे राहायला गेलो तेव्हा मी फक्‍त ३४ वर्षांचा होतो. आणि मी त्यांचा पहिलाच काळ्या वर्णाचा प्रांतीय पर्यवेक्षक होतो. तिथल्या भाऊबहिणींनी आमचं खूप प्रेमाने स्वागत केलं.

प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून मला प्रत्येक शनिवारी-रविवारी होणाऱ्‍या विभागीय संमेलनांमध्ये यहोवाबद्दल शिकवायला मिळायचं, तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. बऱ्‍याच विभागीय पर्यवेक्षकांकडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता. त्यांच्यापैकी एकाने तर माझ्या बाप्तिस्म्याच्या वेळी भाषण दिलं होतं. आणखी एक विभागीय पर्यवेक्षक थियोडोर जॅरस होते. ते नंतर नियमन मंडळाचे सदस्य बनले. तसंच ब्रुकलीन बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या बऱ्‍याच बांधवांसोबत काम करण्याचीही मला संधी मिळाली. या सर्व विभागीय पर्यवेक्षकांनी आणि बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या बांधवांनी कधीही माझ्यावर दडपण येऊ दिलं नाही. मी खूप आनंदाने त्यांच्यासोबत काम करू शकलो. हे बांधव किती प्रेमळ मेंढपाळ आहेत, ते देवाच्या वचनावर कसं अवलंबून राहतात, तसंच संघटनेला किती एकनिष्ठ आहेत हे मी जवळून पाहू शकलो. ते सगळेच खूप नम्र होते आणि यामुळे मला प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून काम करणं खूप सोपं गेलं.

पुन्हा विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा

१९७४ मध्ये नियमन मंडळाने दुसऱ्‍या काही विभागीय पर्यवेक्षकांना प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून नेमलं. आणि मला पुन्हा विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. पण या वेळी आम्हाला साउथ कॅरोलाइनामध्ये जायचं होतं. आनंदाची गोष्ट म्हणजे तोपर्यंत वर्णभेद मिटला होता आणि भाऊबहीण मोकळेपणाने एकमेकांना भेटू शकत होते. यामुळे सगळेच खूप आनंदी होते.

१९७६ च्या शेवटी मला अटलांटा शहरापासून ते कोलंबस शहरापर्यंत असलेल्या जॉर्जिया विभागात नेमण्यात आलं. त्या विभागात काम करत असताना झालेली एक घटना मी कधीच विसरू शकत नाही. काळ्या वर्णाच्या एका साक्षीदार कुटुंबाच्या घरावर बॉम्ब हल्ला झाल्यामुळे त्यांच्या पाच मुलांचा मृत्यू झाला. मी त्या मुलांच्या अंत्यविधीचं भाषण दिलं. त्यांच्या आईला खूप दुखापत झाली होती. ती हॉस्पिटलमध्ये होती. काळ्या आणि गोऱ्‍या वर्णाचे कितीतरी भाऊबहीण त्या जोडप्याला सांत्वन देण्यासाठी सतत हॉस्पिटलमध्ये येत होते. भाऊबहिणींचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे मी त्या वेळी पाहू शकलो. जेव्हा भाऊबहीण एकमेकांना प्रेमळपणे आधार देतात तेव्हा अशा कठीण प्रसंगांचा धीराने सामना करणं शक्य होतं.

बेथेलमध्ये शिकणं आणि शिकवणं

१९७७ मध्ये एका प्रोजेक्टवर काम करायला आम्हाला काही महिन्यांसाठी ब्रुकलीन बेथेलमध्ये बोलावण्यात आलं होतं. प्रोजेक्ट संपत आला तेव्हा नियमन मंडळाचे दोन सदस्य मला आणि रूबीला येऊन भेटले आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला पुढे बेथेलमध्येच राहून काम करायला आवडेल का? आम्ही हो म्हटलं.

मी २४ वर्षं सेवा विभागात काम केलं. या विभागात बऱ्‍याचदा नाजूक आणि किचकट विषयांवरचे प्रश्‍न हाताळले जातात. या प्रश्‍नांची उत्तरं देण्यासाठी नियमन मंडळ बायबल तत्त्वांवर आधारित मार्गदर्शन पुरवत आलंय. विभागीय पर्यवेक्षक, वडील आणि पायनियर यांना प्रशिक्षण देण्यासाठी या माहितीचा वापर केला जातो. या प्रशिक्षणामुळे कितीतरी भाऊबहिणींना आध्यात्मिक रित्या प्रगती करायला मदत झाली आहे आणि यामुळे यहोवाची संघटना आणखी मजबूत झाली आहे.

१९९५ ते २०१८ पर्यंत मी मुख्यालयाचा प्रतिनिधी (ज्यांना आधी झोन ओव्हरसियर म्हणायचे) म्हणून बऱ्‍याच शाखा कार्यालयांना भेटी दिल्या. या भेटींदरम्यान मी शाखा समितींच्या बांधवांना, बेथेलमधल्या भाऊबहिणींना आणि मिशनरी भाऊबहिणींना भेटून त्यांना प्रोत्साहन द्यायचो. तसंच त्यांना काही समस्या असतील तर त्यासुद्धा ऐकून घ्यायचो. या सर्व भाऊबहिणींचे अनुभव ऐकल्यामुळे मला आणि रूबीला नेहमीच प्रोत्साहन मिळालंय. उदाहरणार्थ, २००० मध्ये आम्ही रवांडाला गेलो होतो. तिथल्या भाऊबहिणींना १९९४ मध्ये झालेल्या जातीय संहारादरम्यान कशा परिस्थितीतून जावं लागलं हे ऐकल्यावर आम्ही हेलावून गेलो. बऱ्‍याच भाऊबहिणींनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं होतं. इतकं सगळं सहन करूनही त्या भाऊबहिणींनी आपला विश्‍वास, आशा आणि आनंद टिकवून ठेवला होता आणि हे पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं.

आमच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवशी

आता आम्ही दोघांनीही वयाची ऐंशी पार केलीय. मागच्या २० वर्षांपासून मी अमेरिकेच्या शाखा समितीमध्ये सेवा करत आहे. मी कधीच विद्यापीठात जाऊन शिक्षण घेतलं नाही. पण तरी यहोवाकडून आणि त्याच्या संघटनेकडून मला सगळ्यात उच्च दर्जाचं शिक्षण मिळालंय. यामुळे मला इतरांना बायबलची सत्यं शिकवणं आणि त्यांना कायमचे आशीर्वाद मिळवायला मदत करणं शक्य झालंय. (२ करिंथ. ३:५; २ तीम. २:२) बायबलचं शिक्षण घेतल्यामुळे लोकांचं जीवन कसं सुधारतं आणि आपल्या निर्माणकर्त्यासोबत त्यांचं नातं कसं घट्ट होतं हे मी पाहिलंय. (याको. ४:८) रूबी आणि मी नेहमी इतरांना हेच प्रोत्साहन देतो की तुम्हीसुद्धा यहोवाबद्दल शिकत राहा आणि बायबलमधली सत्यं इतरांना सांगत राहा. कारण यहोवाच्या सेवकासाठी यापेक्षा मोठा बहुमान दुसरा कोणताच असू शकत नाही!