व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

नवीन जगात पृथ्वीवर कोणा-कोणाचं पुनरुत्थान होईल? आणि पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांच्यासोबत काय होईल?

बायबलमध्ये याबद्दल काय सांगितलंय ते पाहू या.

प्रेषितांची कार्यं २४:१५ या वचनात आपण असं वाचतो की “नीतिमान  आणि अनीतिमान”  अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं पुनरुत्थान होणार आहे. यांपैकी नीतिमान असे लोक आहेत ज्यांनी त्यांचा मृत्यू होण्याआधी देवाच्या आज्ञा पाळल्या होत्या आणि त्यामुळे त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. (मला. ३:१६) तर अनीतिमान लोकांमध्ये असे लोक असतील ज्यांना यहोवाबद्दल शिकून घेण्याची पुरेशी संधी मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यामुळे त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत.

योहान ५:२८, २९ या वचनांमध्येसुद्धा त्याच दोन गटांबद्दल सांगितलंय ज्यांचा उल्लेख प्रेषितांची कार्यं २४:१५ मध्ये केला आहे. या वचनांत येशूने म्हटलं, की “चांगली कामं करणाऱ्‍यांना  सर्वकाळाचं जीवन मिळेल [म्हणजे “जीवनाचं पुनरुत्थान,”  तळटीप], तर वाईट कामं करणाऱ्‍यांचा  न्याय केला जाईल [म्हणजे “न्यायाचं पुनरुत्थान,”  तळटीप].” नीतिमान लोकांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी चांगली कामं केली होती. त्यांची नावं अजूनही जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत आणि त्यामुळे पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांना सर्वकाळाचं जीवन मिळेल. याउलट, अनीतिमान लोक त्यांच्या मृत्यूच्या आधी वाईट कामं करायचे. त्यांची नावं अजून जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत. पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांचा न्याय केला जाईल. नवीन जगात त्यांना यहोवाबद्दल शिकून घ्यायची संधी दिली जाईल आणि ते स्वतःमध्ये बदल करतात की नाही याकडे लक्ष दिलं जाईल. आणि जर त्यांनी स्वतःमध्ये बदल केला तर त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जातील.

प्रकटीकरण २०:१२, १३ यात असं सांगितलं आहे, की पुनरुत्थान झालेल्या सगळ्यांनाच  ‘गुंडाळ्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टी’ पाळाव्या लागतील. म्हणजेच नवीन जगात ज्या नवीन आज्ञा आणि नियम दिले जातील त्यांप्रमाणे त्यांना वागावं लागेल. आणि जे असं करणार नाहीत त्यांचा नाश केला जाईल.​—यश. ६५:२०.

दानीएल १२:२ यात असं सांगितलं होतं, की ज्यांना पुन्हा जिवंत केलं जाईल त्यांच्यापैकी काही जण “बदनामी आणि सर्वकाळाचा अपमान सहन करण्यासाठी उठतील.” या वचनात पुनरुत्थान झालेल्यांसोबत शेवटी काय होईल ते सांगितलंय. काही जणांना सर्वकाळाचं  जीवन” मिळेल तर काहींना “सर्वकाळाचा  अपमान” सहन करावा लागेल. याचा अर्थ, १,००० वर्षांच्या शेवटी काहींना सर्वकाळाचं जीवन मिळेल तर इतरांचा कायमचा नाश केला जाईल.​—प्रकटी. २०:१५; २१:३, ४.

हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. पुनरुत्थान झालेल्या दोन गटांची तुलना आपण अशा लोकांसोबत करू शकतो ज्यांना दुसऱ्‍या एखाद्या देशात जाऊन राहायचंय. या लोकांपैकी काहींना तिथलं सरकार कामाचा व्हिसा (व्हिसा म्हणजे एखाद्या देशात राहायची लेखी परवानगी) किंवा रहिवासी व्हिसा देतं. आणि यामुळे त्या देशात राहताना त्यांना काही प्रमाणात स्वातंत्र्य आणि काही हक्कसुद्धा दिले जातात. पुनरुत्थान झालेले नीतिमान लोक या लोकांसारखे आहेत. याउलट, पुनरुत्थान झालेले अनीतिमान लोक अशा लोकांसारखे आहेत ज्यांना एखाद्या देशात राहण्यासाठी फक्‍त तात्पुरता व्हिसा किंवा फक्‍त काही दिवस तिथे राहायची परवानगी मिळते. जर या लोकांना त्या नवीन देशात पुढेही राहायचं असेल तर त्यांना काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्याच प्रकारे, पुनरुत्थान झालेल्या अनीतिमान लोकांना यहोवाचे नियम शिकून घ्यावे लागतील आणि त्यांप्रमाणे वागून आपण नीतिमान आहोत हे दाखवून द्यावं लागेल. तरच त्यांना नवीन जगात राहता येईल. नवीन देशात राहायला आलेल्या लोकांना सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा व्हिसा मिळालेला असला, तरीसुद्धा त्यांच्यापैकी काहींना शेवटी तिथलं नागरिकत्व मिळतं तर काहींना त्या देशातून बाहेर काढलं जाऊ शकतं. नवीन देशात त्यांचे व्यवहार आणि वागणूक कशी आहे याच्या आधारावर हे ठरवलं जातं. त्याच प्रकारे, पुनरुत्थान झालेल्या सगळ्यांसोबत शेवटी काय होईल हे नवीन जगात त्यांनी दाखवलेल्या विश्‍वासूपणावर आणि त्यांच्या वागणुकीवर अवलंबून असेल.

यहोवा हा दयाळू तर आहेच, पण त्यासोबतच तो न्यायीसुद्धा आहे. (अनु. ३२:४; स्तो. ३३:५) तो प्रेमळ देव असल्यामुळे तो नीतिमान आणि अनीतिमान अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचं पुनरुत्थान करेल. पण पुनरुत्थान झालेल्या सर्वांनीच त्याच्या आज्ञा पाळाव्यात आणि त्याच्या तत्त्वांप्रमाणे चालावं अशी तो अपेक्षा करेल. जे त्याच्यावर प्रेम करतील आणि त्याच्या तत्वांप्रमाणे वागतील फक्‍त त्यांनाच नवीन जगात कायमसाठी राहू दिलं जाईल.