व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १२

यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा

यहोवाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी सृष्टीचं निरीक्षण करा

‘जगाच्या निर्मितीपासूनच देवाचे अदृश्‍य गुण हे त्याने निर्माण केलेल्या गोष्टींवरून अगदी स्पष्टपणे दिसून येतात.’​—रोम. १:२०.

गीत ११ सृष्टी यहोवाची स्तुती गाते

सारांश a

१. कोणत्या एका मार्गाने ईयोब यहोवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू शकला?

 आपल्या संपूर्ण आयुष्यात ईयोब बऱ्‍याच लोकांसोबत बोलला असेल. पण यहोवासोबत त्याचं जे बोलणं झालं ते तो आयुष्यात कधीच विसरला नसेल. कारण त्या वेळी यहोवाने ईयोबला त्याने निर्माण केलेल्या अद्‌भुत गोष्टींचं निरीक्षण करायला सांगितलं. त्यावरून यहोवा किती बुद्धिमान आहे आणि आपल्या सेवकांची काळजी घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, यावर ईयोबचा भरवसा आणखी वाढला. उदाहरणार्थ, त्याने ईयोबला आठवण करून दिली, की तो जर पृथ्वीवरच्या सगळ्या प्राण्यांची काळजी घेऊ शकतो तर ईयोबचीपण काळजी घेऊ शकतो. (ईयो. ३८:३९-४१; ३९:१, ५, १३-१६) सृष्टीतली अशी बरीचशी उदाहरणं लक्षात घेतल्यावर ईयोबला देवाच्या अप्रतिम गुणांबद्दल बरंच काही शिकायला मिळालं.

२. यहोवाने निर्माण केलेल्या सृष्टीचं परीक्षण करणं नेहमीच सोपं का नसतं?

आपणही सृष्टीचं निरीक्षण करून देवाबद्दल बरंच काही शिकू शकतो. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. आपण जर शहराच्या गजबजलेल्या वातावरणात राहत असू तर निसर्गातल्या गोष्टी आपल्याला फारशा पाहायला मिळणार नाहीत. आणि आपण जरी शहरापासून दूर एखाद्या गावात राहत असलो, तरी निसर्गातल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याजवळ कदाचित पुरेसा वेळ नसेल. पण तरी, सृष्टीतल्या गोष्टींचं निरीक्षण करण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी वेळ काढणं का महत्त्वाचं आहे यावर आपण चर्चा करू या. यहोवा आणि येशूने आपल्याला शिकवण्यासाठी सृष्टीतल्या गोष्टींचा कसा उपयोग केला? आणि निसर्गातून आणखी जास्त शिकण्यासाठी आपण काय करू शकतो? या प्रश्‍नांवर आपण या लेखात चर्चा करू या.

आपण सृष्टीचं निरीक्षण का केलं पाहिजे?

आदामने सृष्टीचा मनसोक्‍त आनंद घ्यावा आणि प्राण्यांना नावं द्यावीत अशी यहोवाची इच्छा होती (परिच्छेद ३ पाहा)

३. आदामने सृष्टीचा आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा होती हे कशावरून दिसून येतं?

पहिला मानव आदाम याने सृष्टीचा मनसोक्‍त आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा होती. त्याला राहण्यासाठी यहोवाने एक सुंदर नंदनवन बनवलं होतं. त्या नंदनवनाची देखभाल करायचं आणि ते आणखी वाढवायचं कामही यहोवाने त्याला दिलं होतं. (उत्प. २:८, ९, १५) विचार करा, बागेची देखभाल करताना बिया कशा रूजतात आणि फुलं कशी बहरतात हे पाहून आदाम किती अवाक झाला असेल! खरंच, एदेन बागेची देखभाल करायचा किती मोठा बहुमान आदामला मिळाला होता. आणि यासोबतच यहोवाने आदामला बागेतल्या वेगवेगळ्या प्राण्यांना नावं देण्याचं कामही दिलं होतं. (उत्प. २:१९, २०) तसं पाहिलं तर यहोवा स्वतः प्रत्येक प्राण्याला नाव देऊ शकला असता. पण त्याने ते काम आदामला दिलं. प्रत्येक प्राण्याला नाव देताना आदामने त्या प्राण्याचा बारकाईने अभ्यास केला असेल, त्याच्या गुण-वैशिष्ट्यांचं आणि त्याच्या हालचालींचं खूप जवळून निरीक्षण केलं असेल. या सगळ्या गोष्टींमधून आदामला नक्कीच खूप आनंद मिळाला असेल. त्यासोबतच सृष्टीतून दिसून येणारी आपल्या पित्याची अफाट बुद्धी, त्याची कला आणि कल्पकता पाहून त्याबद्दल कदर वाढवण्याची सुंदर संधीही आदामकडे होती.

४. (क) सृष्टीतल्या गोष्टींचं निरीक्षण करण्याचं एक कारण काय आहे? (ख) सृष्टीतल्या खासकरून कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात?

आपण सृष्टीचं निरीक्षण का करावं याचं एक कारण म्हणजे तशी स्वतः यहोवाची इच्छा आहे. “आपले डोळे वर करा आणि आकाशाकडे बघा” असं तो आपल्याला म्हणतो. आणि या सगळ्या गोष्टींना “कोणी बनवलं?” असं तो आपल्याला विचारतो. या प्रश्‍नाचं उत्तर अगदी स्पष्टच आहे. (यश. ४०:२६) यहोवाने फक्‍त आकाशच नाही, तर सबंध पृथ्वीला आणि समुद्राला अनेक आश्‍चर्यकारक गोष्टींनी भरून टाकलंय. आणि या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला मिळतं. (स्तो. १०४:२४, २५) तसंच यहोवाने आपल्याला कशा प्रकारे बनवलंय याचाही विचार करा. निसर्गातल्या गोष्टींमध्ये लपलेली सुंदरता ओळखून तिचा आनंद घेण्याची क्षमता त्याने आपल्याला दिली आहे. शिवाय पाहण्याची, ऐकण्याची, स्पर्श करण्याची, चव घेण्याची आणि गंध ओळखण्याची क्षमता वापरून निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद घेण्याची कुवतसुद्धा त्याने आपल्याला दिली आहे.

५. रोमकर १:२० मध्ये सांगितल्याप्रमाणे, यहोवाने निर्माण केलेल्या सृष्टीतल्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

आपण सृष्टीचं निरीक्षण का केलं पाहिजे याचं आणखी एक कारण बायबलमध्ये सांगितलंय. ते म्हणजे, सृष्टीतून आपल्याला यहोवाच्या गुणांबद्दल शिकायला मिळतं. (रोमकर १:२० वाचा.) उदाहरणार्थ, सृष्टीतल्या गोष्टींचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला असं दिसून येईल, की त्यांची रचना अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे. त्यातून यहोवाची बुद्धी दिसून येते. तसंच खाण्यासाठी यहोवाने किती वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या आहेत याचाही विचार करा. यावरून मानवांवर त्याचं किती प्रेम आहे हे दिसून येतं. जेव्हा आपण यहोवाने बनवलेल्या गोष्टींमधून त्याचं व्यक्‍तिमत्त्व पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखू लागतो आणि त्याच्या आणखी जवळ जातो. चला तर मग, यहोवाने निर्माण केलेल्या काही गोष्टींवरून त्याने माणसांना महत्त्वाच्या गोष्टी कशा शिकवल्या याबद्दल आपण पाहू या.

स्वतःबद्दल सांगण्यासाठी देव सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग करतो

६. स्थलांतर करणाऱ्‍या पक्ष्यांना पाहून आपण काय शिकू शकतो?

यहोवाने प्रत्येक गोष्टीसाठी वेळ ठरवली आहे.  दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासून ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत, इस्राएली लोकांना उत्तरेच्या दिशेने स्थलांतर करणारे करकोचा पक्षी उडताना दिसायचे. या पक्षांबद्दल देवाने इस्राएली लोकांना सांगितलं: “आकाशात उडणाऱ्‍या करकोचा पक्ष्यालाही आपल्या स्थलांतराची वेळ माहीत असते.” (यिर्म. ८:७) ज्या प्रकारे यहोवाने या पक्ष्यांना स्थलांतर करायची वेळ ठरवून दिली आहे, त्याच प्रकारे त्याने आपला न्यायदंड बजावण्यासाठीही एक वेळ ठरवली आहे. आजसुद्धा आपण स्थलांतर करणाऱ्‍या पक्षांना पाहतो, तेव्हा देवाने या दुष्ट जगाचा नाश करण्यासाठी एक वेळ ‘नेमली आहे’ अशी खातरी आपण बाळगू शकतो.​—हब. २:३.

७. आकाशात उंच भरारी घेणाऱ्‍या पक्ष्याला पाहून आपल्याला कोणत्या गोष्टीची खातरी मिळते? (यशया ४०:३१)

यहोवा त्याच्या सेवकांना बळ देतो.  यहोवाने यशयाद्वारे असं वचन दिलं, की त्याच्या सेवकांना जेव्हा कमजोर किंवा निराश असल्यासारखं वाटतं, तेव्हा तो त्यांना शक्‍ती देईल आणि ते “गरुडांसारखे पंख पसरून उंच भरारी घेतील.” (यशया ४०:३१ वाचा.) गरुड पक्षी आपले पंख फारसे न हलवता वरच्या दिशेने वाहणाऱ्‍या हवेच्या प्रवाहाचा वापर करून उंच भरारी कशी घेतो, हे इस्राएली लोक नेहमीच पाहायचे. ते पाहून त्यांना एक गोष्ट शिकायला मिळाली. आणि तीच गोष्ट आज आपल्यालाही शिकायला मिळते. ती म्हणजे, यहोवा जर या पक्षांना बळ देतो, तर तो आपल्या सेवकांनाही नक्कीच ताकद देऊ शकतो. तुम्ही जेव्हा गरुडासारख्या एखाद्या शक्‍तिशाली पक्षाला आकाशात उंच भरारी घेताना पाहता, तेव्हा हे लक्षात घ्या की यहोवा तुम्हालाही तुमच्या समस्यांचा सामना करण्यासाठी शक्‍ती देऊ शकतो.

८. सृष्टीतल्या गोष्टींचं निरीक्षण केल्यामुळे ईयोबला काय शिकायला मिळालं, आणि आपण काय शिकू शकतो?

यहोवा भरवशालायक आहे.  यहोवाने सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग करून ईयोबला आपल्यावरचा भरवसा वाढवायला मदत केली. (ईयो. ३२:२; ४०:६-८) ईयोबशी बोलताना देवाने तारे, ढग, कडाडणाऱ्‍या विजा यांसारख्या बऱ्‍याच गोष्टींबद्दल सांगितलं. तसंच, त्याने रानबैल आणि घोडे यांसारख्या प्राण्यांबद्दलही त्याला सांगितलं. (ईयो. ३८:३२-३५; ३९:९, १९, २०) या सगळ्या गोष्टींतून ईयोबला देवाच्या असीम शक्‍तीचेच नाही, तर त्याच्या अपार प्रेमाचे आणि अफाट बुद्धीचेही कितीतरी पुरावे मिळाले. आणि त्यामुळे त्याचा यहोवावरचा भरवसा आणखी वाढला. (ईयो. ४२:१-६) त्याच प्रकारे आपणही जेव्हा सृष्टीतल्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा यहोवा आपल्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान आणि शक्‍तिशाली आहे याची आठवण आपल्याला होते. तसंच, तो आपल्या सगळ्या समस्या काढून टाकू शकतो आणि तो तसं लवकरच करणार आहे. या गोष्टीमुळे त्याच्यावरचा आपला भरवसा आणखी वाढतो.

येशूने आपल्या पित्याबद्दल शिकवताना सृष्टीतल्या गोष्टींचा उपयोग केला

९-१०. सूर्यप्रकाश आणि पाऊस यांवरून यहोवाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं?

येशूला सृष्टीबद्दल बरंच काही माहीत आहे. कारण यहोवा या विश्‍वाची निर्मिती करत होता तेव्हा येशूला एक ‘कुशल कारागीर’ म्हणून आपल्या पित्यासोबत काम करायची संधी मिळाली होती. (नीति. ८:३०) पुढे जेव्हा तो पृथ्वीवर आला तेव्हा आपल्या शिष्यांना पित्याबद्दल शिकवण्यासाठी त्याने सृष्टीतल्या बऱ्‍याच गोष्टींचा उपयोग केला. चला, याची काही उदाहरणं आता आपण पाहू या.

१० यहोवा सगळ्यांवर प्रेम करतो.  डोंगरावरच्या आपल्या प्रवचनात येशूने सृष्टीतल्या अशा दोन गोष्टींकडे शिष्यांचं लक्ष वेधलं, ज्यांचा लोक सहसा जास्त विचार करत नाहीत. त्या म्हणजे, सूर्यप्रकाश आणि पाऊस. या दोन्ही गोष्टी जीवनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. यहोवाला पाहिजे असतं तर जे लोक त्याची सेवा करत नाहीत त्यांना त्याने या गोष्टी पुरवल्या नसत्या. पण त्याचं सगळ्यांवर प्रेम असल्यामुळे तो सर्वांना त्या पुरवतो. (मत्त. ५:४३-४५) येशूने या गोष्टीचा उपयोग करून आपल्या शिष्यांना शिकवलं, की आपणही सगळ्यांवर प्रेम करावं अशी यहोवाची इच्छा आहे. सूर्यास्ताचं नयनरम्य दृश्‍य पाहताना किंवा तजेला देणाऱ्‍या पावसाच्या सरी झेलताना नेहमी या गोष्टीची आठवण ठेवा, की यहोवा कोणताही भेदभाव न करता सगळ्यांवर खूप प्रेम करतो. आपणही सगळ्यांना राज्याचा संदेश सांगून त्याच्यासारखंच सर्वांवर प्रेम करू शकतो.

११. पक्ष्यांना पाहून आपण कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतो?

११ यहोवा आपल्या सगळ्या गरजा पुरवतो.  पुढे डोंगरावरच्या प्रवचनात येशूने म्हटलं: “आकाशातल्या पक्ष्यांकडे निरखून पाहा. ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत; तरीही स्वर्गातला तुमचा पिता त्यांना खाऊ घालतो.” येशू हे शब्द बोलला तेव्हा ऐकणाऱ्‍या लोकांना नक्कीच आकाशात उडणारे पक्षी दिसत असतील. त्यामुळे येशूने असं विचारलं: “तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का?” (मत्त. ६:२६) यहोवा आपल्या सेवकांच्या गरजा नक्की पूर्ण करेल हे येशूने किती प्रेमळपणे समजावून सांगितलं! (मत्त. ६:३१, ३२) पक्षांच्या या उदाहरणातून आजसुद्धा देवाच्या विश्‍वासू सेवकांना दिलासा मिळतो. स्पेनमध्ये राहणाऱ्‍या एका पायनियर बहिणीचा विचार करा. तिला राहण्यासाठी चांगली जागा मिळत नव्हती. आणि त्यामुळे ती खूप निराश झाली होती. पण जेव्हा तिने दाणे टिपणाऱ्‍या पक्ष्यांना पाहिलं, तेव्हा तिची चिंता दूर झाली. ती म्हणते: “त्या पक्ष्यांनी मला आठवण करून दिली की जर यहोवा त्यांची काळजी घेतो तर तो माझीही घेईल.” आणि तसंच झालं. काही काळानंतर तिला राहण्यासाठी एक चांगली जागा मिळाली.

१२. मत्तय १०:२९-३१ मध्ये चिमण्यांबद्दल जे सांगितलंय, त्यावरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

१२ यहोवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे.  येशूने आपल्या शिष्यांना प्रचाराला पाठवण्याआधी, विरोध होण्याबद्दल त्यांच्या मनात असलेली भीती दूर करायला मदत केली. (मत्तय १०:२९-३१ वाचा.) त्याने त्यांना इस्राएलमध्ये सर्रासपणे पाहायला मिळणाऱ्‍या एका पक्ष्याबद्दल, म्हणजेच चिमणीबद्दल सांगितलं. येशूच्या काळात या पक्ष्याची किंमत खूपच कमी होती. असं असलं तरी येशूने शिष्यांना म्हटलं: “यांपैकी एकही  तुमच्या पित्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही.” त्याने पुढे म्हटलं: “पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.” असं म्हणून त्याने शिष्यांना याची खातरी करून दिली, की त्यांच्यापैकी प्रत्येक जण  यहोवाच्या नजरेत खूप मौल्यवान आहे आणि म्हणून त्यांना विरोधाला घाबरण्याची गरज नाही. शिष्य जेव्हा गावांमध्ये आणि नगरांमध्ये प्रचार करत असतील तेव्हा चिमण्यांना पाहून त्यांना नक्कीच येशूचे हे शब्द आठवले असतील. तुम्ही जेव्हा छोट्या-छोट्या पक्ष्यांना पाहाल तेव्हा हे नेहमी लक्षात असू द्या, की यहोवाला तुमची काळजी आहे, कारण “पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही जास्त मौल्यवान आहात.” यहोवाच्या मदतीने तुम्ही धैर्याने कुठल्याही विरोधाचा सामना करू शकता.​—स्तो. ११८:६.

सृष्टीतून आपण यहोवाबद्दल आणखी जास्त कसं शिकू शकतो?

१३. सृष्टीतून शिकण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१३ आपण सृष्टीतल्या गोष्टींमधून यहोवाबद्दल आणखी बरंच काही शिकू शकतो. ते कसं? त्यासाठी आपण सगळ्यात आधी सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी वेळ काढला पाहिजे. आणि मग त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं याचा विचार केला पाहिजे. असं करणं कदाचित नेहमीच सोपं नसेल. कॅमरूनमध्ये राहणारी जेराल्डिन नावाची बहीण म्हणते: “मी शहरात लहानाची मोठी झाले. त्यामुळे निसर्गातल्या गोष्टींचं निरीक्षण करण्यासाठी मला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागायचा.” तसंच अल्फान्सो नावाचे एक वडील म्हणतात: “एक गोष्ट मला समजली, की यहोवाच्या सृष्टीचं निरीक्षण करण्यासाठी आणि त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर विचार करण्यासाठी मला एकांतात वेळ घालवावा लागेल आणि त्यासाठी एक वेळ ठरवावी लागेल.”

दावीदने आपल्या आजूबाजूच्या सृष्टीचं निरीक्षण केलं आणि त्यातून यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं यावर मनन केलं (परिच्छेद १४ पाहा)

१४. देवाच्या सृष्टीवर मनन केल्यामुळे दावीदला काय शिकायला मिळालं?

१४ यहोवाच्या सृष्टीवर दावीदने खूप खोलवर विचार केला. त्याने यहोवाला असं म्हटलं: “तू आपल्या हातांनी निर्माण केलेलं आकाश आणि तू घडवलेले चंद्र-तारे जेव्हा मी पाहतो, तेव्हा माझ्या मनात विचार येतो, नाशवंत माणूस काय आहे, की तू त्याला आठवणीत ठेवावं? आणि मानव काय आहे, की तू त्याची काळजी घ्यावी?” (स्तो. ८:३, ४) दावीदने रात्रीच्या वेळी ताऱ्‍यांनी भरलेलं सुंदर आकाशच पाहिलं नाही, तर हे तारे देवाबद्दल काय शिकवतात यावरसुद्धा मनन केलं. हे अगणित तारे बनवणारा यहोवा किती महान आहे, हे तो शिकला. तसंच इतर वेळी त्याने यावरसुद्धा विचार केला, की आईच्या गर्भात त्याची किती अद्‌भुत रितीने जडणघडण झाली होती. अशा विस्मयकारक गोष्टींवर मनन केल्यामुळे यहोवा किती बुद्धिमान आहे, याबद्दलची त्याची कदर आणखी वाढली.​—स्तो. १३९:१४-१७.

१५. सृष्टीतून तुम्हाला यहोवाच्या कोणत्या गुणांबद्दल शिकायला मिळालं याची काही उदाहरणं द्या. (स्तोत्र १४८:७-१०)

१५ दावीदसारखं सृष्टीतल्या गोष्टींवर खोलवर मनन करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करायची गरज नाही. तुमच्या आजूबाजूला तुम्हाला अशा बऱ्‍याच गोष्टी दिसतील, ज्यांतून यहोवाचे अनेक गुण तुम्हाला समजतील. उदाहरणार्थ, सूर्याची उबदार किरणं अंगावर घेताना आपण यहोवाच्या ताकदीची कल्पना करू शकतो. (यिर्म. ३१:३५) तसंच, एखाद्या पक्ष्याला आपण घरटं बनवताना पाहतो तेव्हा यहोवा किती बुद्धिमान आहे याची आपल्याला जाणीव होते. तसंच एखादं कुत्र्याचं पिल्लू गोल-गोल फिरून स्वतःचीच शेपटी पकडायचा प्रयत्न करतं तेव्हा यहोवाच्या विनोदबुद्धीची आपल्याला कल्पना येते. जेव्हा आई आपल्या बाळाला खेळवत असते, त्याचा लाड करत असते, तेव्हा यहोवा किती प्रेमळ आहे हे आपल्याला कळतं आणि त्यासाठी आपण त्याचे आभार मानू शकतो. यहोवाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट, मग ती लहान असो, मोठी असो, जवळ असो किंवा लांब असो, यहोवाची भरभरून स्तुती करते. त्यामुळे सृष्टीतून आपण यहोवाबद्दल बरंच काही शिकू शकतो.​—स्तोत्र १४८:७-१० वाचा.

१६. आपण काय करायचा निर्धार केला पाहिजे?

१६ आपला देव सगळ्यात बुद्धिमान आहे. तो आपली काळजी घेतो, त्याच्याकडे विलक्षण कलाबुद्धी आहे आणि तो खूप शक्‍तिशाली आहे. हे आणि असे अनेक गुण निसर्गात अगदी सहजपणे पाहायला मिळतात, फक्‍त आपण ते पाहायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे यहोवाच्या सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आणि त्यातून आपल्याला यहोवाबद्दल जे काही शिकायला मिळतं, त्यावर मनन करण्यासाठी आपण नियमितपणे वेळ काढू या. यामुळे, आपल्या निर्माणकर्त्यासोबतची आपली मैत्री आणखी घट्ट होईल. (याको. ४:८) पण सृष्टीतल्या गोष्टी दाखवून आईवडील आपल्या मुलांना यहोवासोबत जवळची मैत्री करायला कशी मदत करू शकतात? हे आपण पुढच्या लेखात पाहू या.

गीत ५ देवाची अद्‌भुत कार्यं

a यहोवाने निर्माण केलेली सृष्टी पाहून आपण आश्‍चर्यचकित होऊन जातो. सूर्याच्या अफाट शक्‍तीपासून ते फुलांच्या नाजूक पाकळ्यांपर्यंत त्याने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहून आपण थक्क होतो. यहोवाने सृष्टीमध्ये ज्या गोष्टी निर्माण केल्या आहेत, त्यांवरून तो कशा प्रकारचा देव आहे याबद्दल आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. देवाने निर्माण केलेल्या गोष्टींचं निरीक्षण करण्यासाठी आपण वेळ का काढला पाहिजे? आणि असं केल्यामुळे देवासोबत असलेली आपली मैत्री आणखी घट्ट कशी होऊ शकते याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.