व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३५

धीर दाखवत राहा

धीर दाखवत राहा

‘सहनशीलतेचं वस्त्र घाला.’​—कलस्सै. ३:१२.

गीत १२९ शेवटपर्यंत धीर धरू

सारांश a

१. धीर दाखवणाऱ्‍या लोकांबद्दल आपल्याला आदर का वाटतो?

 धीर धरायला तयार असणारी माणसं आपल्या सगळ्यांनाच आवडतात. जे लोक चीडचीड न करता किंवा अस्वस्थ न होता धीराने वाट पाहायला तयार असतात, त्यांचा आपण आदर करतो. आणि आपल्याकडून चुका होतात तेव्हा इतर लोक धीराने आपलं समजून घ्यायला तयार असतात तेव्हा त्यांच्याबद्दलही आपल्याला आदर वाटतो. आपण बायबल अभ्यास करत होतो तेव्हा बायबलची एखादी शिकवण शिकायला, ती स्वीकारायला किंवा ती लागू करायला आपल्याला कठीण जायचं, त्या वेळी बायबल शिकवणारे आपले शिक्षक आपल्याशी खूप धीराने वागले. त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा देव आपल्या बाबतीत धीर दाखवतो त्यासाठी आपण त्याचे मनापासून आभारी आहोत!​—रोम. २:४.

२. कोणकोणत्या परिस्थितींमध्ये आपल्याला धीर दाखवणं कठीण जाऊ शकतं?

इतरांनी धीर दाखवल्यावर आपल्याला बरं वाटतं. पण काही वेळा आपल्याला धीर दाखवणं कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कुठेतरी जायला आपल्याला उशीर झाला असेल आणि आपण ट्राफिकमध्ये अडकलो असलो, तर आपल्याला शांत राहायला कदाचित कठीण जाईल. तसंच, दुसरे जेव्हा आपल्याला चीड आणतात तेव्हा कदाचित आपल्याला राग येईल. इतकंच काय तर यहोवाने नवीन जगाचं जे वचन दिलंय त्यासाठी धीराने वाट पाहणंसुद्धा आपल्याला कठीण जाऊ शकतं. धीराचा हा गुण आणखीन वाढवण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? धीर दाखवण्याचा काय अर्थ होतो आणि हा गुण इतका महत्त्वाचा का आहे, याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. धीराचा गुण वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला मदत होऊ शकते हेसुद्धा आपण या लेखात पाहू या.

धीर दाखवण्याचा काय अर्थ होतो?

३. धीर दाखवणाऱ्‍या व्यक्‍तीला भडकवलं जातं तेव्हा ती कशी वागते?

आपण कोणत्या चार मार्गांनी धीराचा गुण दाखवू शकतो याचा विचार करा. पहिला, धीर धरणारी व्यक्‍ती लगेच रागवत नाही.  त्या व्यक्‍तीला जेव्हा भडकवलं जातं किंवा ती तणावात असते तेव्हा ती शांत राहते आणि लगेच रागवत नाही. “लगेच न रागावणारा” हे शब्द बायबलमध्ये पहिल्यांदा जिथे आलेत, तिथे ते यहोवासाठी वापरण्यात आलेत. यहोवाबद्दल बायबलमध्ये असं म्हटलंय: “यहोवा, यहोवा, दयाळू, करुणामय आणि सहनशील देव; [किंवा “लगेच न रागावणारा”] एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला.”​—निर्ग. ३४:६, तळटीप.

४. वाट पाहावी लागते तेव्हा धीर दाखवणारी व्यक्‍ती कसं वागते?

दुसरा मार्ग म्हणजे, धीर दाखवणारी व्यक्‍ती शांतपणे वाट पाहते.  जर एखाद्या गोष्टीला गरजेपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर अशी व्यक्‍ती अस्वस्थ किंवा उतावीळ होण्याचं टाळते. (मत्त. १८:२६, २७) आपल्याला बऱ्‍याचदा धीराने वाट पाहावी लागू शकते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्‍ती बोलत असेल, तर आपण तिचं बोलणं न तोडता शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. (ईयो. ३६:२) त्याच प्रकारे आपल्या बायबल विद्यार्थ्याला बायबलची एखादी शिकवण समजून घ्यायला किंवा वाईट सवयीवर ताबा मिळवायला मदत करण्यासाठीही आपल्याला धीराची गरज लागू शकते.

५. धीर दाखवण्याचा आणखी एक मार्ग कोणता?

तिसरा मार्ग म्हणजे, धीर धरणारी व्यक्‍ती अविचारीपणे वागत नाही.  ही गोष्ट खरी आहे की कधीकधी आपल्याला पटकन पाऊल उचलायची गरज लागते. पण धीर धरणाऱ्‍या व्यक्‍तीला जेव्हा एक महत्त्वाचं काम करायचं असतं, तेव्हा ती घाईघाईने ते सुरू करत नाही, किंवा ते कसंबसं उरकून टाकत नाही. उलट, ती त्यासाठी पुरेसा वेळ देते आणि आधीपासूनच एक चांगली योजना बनवते. त्यानंतर ठरवलेल्या वेळेत ती ते काम पूर्ण करते.

६. जेव्हा परीक्षा येते तेव्हा धीर धरणारी व्यक्‍ती तिचा सामना कसा करते?

चौथा मार्ग म्हणजे, धीर धरणारी व्यक्‍ती कुठलीही तक्रार न करता परीक्षांचा सामना सहनशीलतेने करते.  या ठिकाणी धीराचा आणि सहनशीलतेचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्यावर जेव्हा परीक्षा येतात तेव्हा आपल्या मनात काय चाललंय हे जवळच्या एका मित्राला सांगणं चुकीचं नाही. पण धीर धरणारी व्यक्‍ती सहनशीलतेने परीक्षांचा सामना करत राहते आणि आशावादी दृष्टिकोन ठेवते. (कलस्सै. १:११) ख्रिस्ती या नात्याने आपण सगळ्यांनीच या मार्गांनी धीर दाखवला पाहिजे. का बरं? याची काही कारणं आता आपण पाहू या.

धीर दाखवणं इतकं महत्त्वाचं का आहे?

योग्य वेळ आली की आपल्याला कापणी करता येईल हा भरवसा ठेवून शेतकरी जसं धीराने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे योग्य वेळ आली की यहोवा त्याची सर्व अभिवचनं पूर्ण करेल याची आपण खातरी बाळगून धीराने वाट पाहू शकतो (परिच्छेद ७ पाहा)

७. याकोब ५:७, ८ प्रमाणे धीर दाखवणं इतकं महत्त्वाचं का आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

आपल्याला जर सर्वकाळाचं जीवन हवं असेल, तर धीर धरण्याची खूप गरज आहे. प्राचीन काळातल्या विश्‍वासू सेवकांप्रमाणेच, देवाची वचनं पूर्ण होईपर्यंत आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. (इब्री ६:११, १२) बायबलमध्ये आपली तुलना एका शेतकऱ्‍यासोबत केली आहे. (याकोब ५:७, ८ वाचा.) एक शेतकरी पिकाची पेरणी करण्यासाठी आणि त्याला पाणी घालण्यासाठी खूप मेहनत घेतो. पण ते नेमकं कधी वाढेल हे त्याला माहीत नसतं. तरी तो धीराने वाट पाहतो. कारण त्याला पुढे चांगलं पीक मिळेल याची खातरी असते. त्याच प्रकारे, आपल्याला जरी ‘माहीत नसलं की प्रभू कोणत्या दिवशी येणार आहे,’ तरी आपण ख्रिस्ताच्या मागे चालत राहायचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. (मत्त. २४:४२) आपण जर धीराने वाट पाहिली, तर आपण ही खातरी ठेवू शकतो की यहोवा त्याची वचनं योग्य वेळी पूर्ण करेल. पण जर आपण धीर सोडला तर आपण वाट पाहून थकून जाऊ आणि सत्यापासून वाहवत जाऊ. इतकंच काय तर आपण कदाचित तात्पुरता आनंद देणाऱ्‍या गोष्टींच्या मागे धावू. पण जर आपण धीर धरला, तर आपण शेवटपर्यंत सहनशील राहू आणि आपल्याला सर्वकाळचं जीवन मिळेल.​—मीखा ७:७; मत्त. २४:१३.

८. इतरांसोबत एक चांगलं नातं टिकवून ठेवण्यासाठी धीरामुळे कशी मदत होऊ शकते? (कलस्सैकर ३:१२, १३)

धीर धरल्यामुळे आपल्याला इतरांसोबत चांगलं नातं टिकवून ठेवता येतं. आपल्यात जर धीर असेल तर दुसरे जेव्हा बोलत असतील तेव्हा आपण त्यांचं लक्ष देऊन ऐकू. (याको. १:१९) धीरामुळे शांती टिकून राहते. तसंच, धीरामुळे आपण तणावात असताना इतरांचं मन दुखावेल असं काहीही बोलत नाही किंवा करत नाही. आपल्यात धीर असेल तर जेव्हा कोणी आपल्या भावना दुखावतं तेव्हा आपण लगेच रागवणार नाही. बदला घेण्याच्या भावनेने काही करण्याऐवजी आपण ‘एकमेकांचं सहन करत राहू आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत राहू.’​—कलस्सैकर ३:१२, १३ वाचा.

९. जेव्हा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, तेव्हा धीरामुळे आपल्याला कशी मदत होईल? (नीतिवचनं २१:५)

धीर धरल्यामुळे आपल्याला चांगले निर्णय घेता येतील. आपण घाईगडबडीत किंवा भावनेच्या भरात निर्णय न घेता आपल्यापुढे जे पर्याय आहेत त्यांचा विचार करून, संशोधन करण्यासाठी वेळ काढून निर्णय घेऊ. (नीतिवचनं २१:५ वाचा.) उदाहरणार्थ, जर आपण नोकरी शोधत असू तर कदाचित आपल्याला मिळालेली पहिली नोकरी करण्याचा आपण विचार करू. पण या नोकरीमुळे कदाचित आपल्याला सभांना आणि प्रचाराला जाता येणार नाही. पण जर आपल्यात धीर असला तर ही नोकरी कुठे आहे, त्यात आपला किती वेळ जाईल आणि त्याचा आपल्या कुटुंबावर आणि यहोवासोबतच्या नात्यावर काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू. धीर धरल्यामुळे कोणतेही चुकीचे निर्णय घेण्यापासून आपण दूर राहू.

आपण धीराचा गुण कसा वाढवू शकतो?

१०. एक ख्रिस्ती व्यक्‍ती धीराचा गुण कशा प्रकारे वाढवू शकते आणि दाखवत राहू शकते?

१० धीरासाठी प्रार्थना करा.  धीर हा पवित्र शक्‍तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) त्यामुळे आपण पवित्र शक्‍तीसाठी प्रार्थना करू शकतो आणि हा गुण वाढवण्यासाठी यहोवाकडे मदत मागू शकतो. आपल्या धीराची परीक्षा होईल अशी परिस्थिती जर आपल्यावर आली, तर आपल्याला धीर दाखवता यावा म्हणून आपण पवित्र शक्‍ती ‘मागत राहू’ शकतो. (लूक ११:९, १३) त्याच प्रकारे परिस्थितीकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठीसुद्धा आपण त्याच्याकडे मदत मागू शकतो. प्रार्थना केल्यानंतर आपण दररोज धीर दाखवण्याचा होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे. आपण धीरासाठी जितकी जास्त प्रार्थना करू आणि धीर धरत राहण्याचा जितका प्रयत्न करू, तितका हा गुण आपल्या मनात रुजेल आणि आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचा भाग बनेल.

११-१२. यहोवाने धीर कसा दाखवला?

११ बायबलमधल्या उदाहरणांवर मनन करा.  बायबलमध्ये अशा बऱ्‍याच लोकांची उदाहरणं आहेत ज्यांनी धीर दाखवला. या लोकांच्या अहवालांवर मनन केल्यामुळे आपण वेगवेगळ्या मार्गांनी धीर दाखवायला शिकू शकतो. यांपैकी काही उदाहरणं पाहण्याआधी आपण धीराचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे यहोवाचं उदाहरण पाहू.

१२ एदेनच्या बागेत, सैतानाने यहोवाच्या नावाची बदनामी केली. त्याने हव्वाच्या मनात यहोवा एक न्यायी आणि प्रेमळ शासक आहे की नाही, अशी शंका निर्माण केली. यहोवाने या बदनामी करणाऱ्‍याचा लगेच नाश केला नाही. उलट त्याने धीर आणि संयम दाखवला. कारण त्याला हे माहीत होतं, की त्याची राज्य करायची पद्धत योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी वेळ लागेल. धीर दाखवत असताना त्याने त्याच्या नावाची होणारी सगळी बदनामीही सहन केली. त्यासोबतच जास्तीत जास्त लोकांना सर्वकाळच्या जीवनाची संधी मिळावी म्हणून आजपर्यंत यहोवा धीराने वाट पाहतोय. (२ पेत्र ३:९, १५) त्यामुळे लाखो लोकांना त्याला ओळखता आलंय. यहोवाने धीर दाखवल्यामुळे जे फायदे होणार आहेत, त्यांकडे जर आपण लक्ष दिलं, तर आपल्यालासुद्धा धीर धरता येईल. आणि अंत आणण्याच्या त्याच्या योग्य वेळेची वाट पाहता येईल.

आपल्याला जेव्हा भडकवलं जातं, तेव्हा आपल्यात जर धीर असला तर आपण लगेच रागवणार नाही (परिच्छेद १३ पाहा)

१३. येशूने धीराच्या बाबतीत आपल्या पित्याचं हुबेहूब अनुकरण कसं केलं? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ धीर दाखवण्याच्या बाबतीत येशूने आपल्या पित्याचं हुबेहूब अनुकरण केलं. आणि पृथ्वीवर असताना त्याने हा गुण अगदी चांगल्या प्रकारे दाखवला. धीर दाखवणं त्याच्यासाठी नेहमीच सोपं नव्हतं; खासकरून, शास्त्री आणि परूश्‍यांसारख्या ढोंगी लोकांसोबत वागताना. (योहा. ८:२५-२७) आपल्या पित्याप्रमाणेच येशूसुद्धा कधीही लगेच रागवला नाही. त्याला जेव्हा भडकवण्यात आलं किंवा त्याचा अपमान करण्यात आला तेव्हा त्याने बदला घेतला नाही. (१ पेत्र २:२३) येशूने कोणतीही तक्रार न करता सर्व परीक्षा धीराने सहन केल्या. त्यामुळेच बायबलमध्ये त्याच्याबद्दल असं म्हटलंय: “ज्याने पापी लोकांचं इतकं अपमानास्पद बोलणं सहन केलं त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या.” (इब्री १२:२, ३) यहोवाच्या मदतीने आपणसुद्धा आपल्यापुढे येणाऱ्‍या परीक्षांचा धीराने सामना करू शकतो.

आपण जर अब्राहामसारखा धीर दाखवला, तर आपण याची खातरी ठेवू शकतो की यहोवा आता तर आपल्याला आशीर्वाद देईलच पण भविष्यात त्याच्या नवीन जगातही भरभरून आशीर्वाद देईल (परिच्छेद १४ पाहा)

१४. अब्राहामने दाखवलेल्या धीरातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (इब्री लोकांना ६:१५) (चित्रसुद्धा पाहा.)

१४ आपल्यापैकी काही जणांना कदाचित असं वाटलं असेल, की अंत खूप वर्षांआधीच यायला पाहिजे होता. आणि आता कदाचित आपल्याला अशी चिंता वाटत असेल की आपण जिवंत असेपर्यंत कदाचित अंत येणार नाही. पण धीराने वाट पाहायला कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होऊ शकते? अब्राहामचं उदाहरण लक्षात घ्या. तो ७५ वर्षांचा होता आणि त्याला मूलबाळ नव्हतं. तेव्हा यहोवाने त्याला असं वचन दिलं होतं: ‘मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनवीन.’ (उत्प. १२:१-४) पण अब्राहामने हे वचन पूर्ण होताना पाहिलं का? पूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात नक्की पाहिलं. त्याने फरात नदी पार केल्याच्या २५ वर्षांनंतर, यहोवाने चमत्कार केला आणि इसहाकचा जन्म झाला. मग त्याच्या ६० वर्षांनंतर एसाव आणि याकोब या त्याच्या नातवंडांचा जन्म झाला. (इब्री लोकांना ६:१५ वाचा.) पण अब्राहामने कधीच त्याच्या संततीला मोठं राष्ट्र होताना पाहिलं नाही आणि त्याने त्यांना वचन दिलेल्या देशाचा ताबा मिळवतानाही पाहिलं नाही. पण या विश्‍वासू माणसाची यहोवासोबत चांगली मैत्री असल्यामुळे तो आनंदी होता. (याको. २:२३) जेव्हा अब्राहामला पुन्हा उठवलं जाईल आणि जेव्हा त्याला कळेल, की आपल्या विश्‍वासामुळे आणि धीरामुळे सगळ्या राष्ट्रांना किती आशीर्वाद मिळाले आहेत तेव्हा तो किती खूश होईल! (उत्प. २२:१८) मग यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? यहोवाची वचनं पूर्ण होताना कदाचित आपण लगेच पाहू शकणार नाही, पण जर आपण अब्राहामसारखा धीर दाखवला, तर आपण ही खातरी बाळगू शकतो, की यहोवा आपल्याला आता आशीर्वाद देईल आणि भविष्यात त्याच्या नवीन जगात आणखीन भरभरून आशीर्वाद देईल.​—मार्क १०:२९, ३०.

१५. आपल्या वैयक्‍तिक अभ्यासात आपण कशावर संशोधन करू शकतो?

१५ बायबलमध्ये आणखीन अशा बऱ्‍याच लोकांची उदाहरणं आहेत, ज्यांनी धीर दाखवला. (याको. ५:१०) आपण आपल्या वैयक्‍तिक अभ्यासात या उदाहरणांवर संशोधन करू शकतो का? b उदाहरणार्थ, दावीदचा फार कमी वयात इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करण्यात आला. पण राज्यपद मिळवण्यासाठी त्याला बरीच वर्षं थांबावं लागलं. तसंच, शिमोन आणि हन्‍ना वचन दिलेल्या मसीहाच्या येण्याची वाट पाहत होते, पण त्यासोबतच ते यहोवाची विश्‍वासूपणे सेवाही करत होते. (लूक २:२५, ३६-३८) यांसारख्या अहवालांचा अभ्यास करताना, पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करा: ‘या व्यक्‍तीला धीर दाखवण्यासाठी कोणत्या गोष्टीने मदत केली असेल? धीर दाखवल्यामुळे तिला काय फायदा झाला? मी त्या व्यक्‍तीचं अनुकरण कसं करू शकतो?’ यासोबतच ज्यांनी धीर दाखवला नाही त्यांच्या उदाहरणांवर विचार केल्यामुळेही आपल्याला फायदा होऊ शकतो. (१ शमु. १३:८-१४) तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘कोणत्या गोष्टीमुळे त्यांना धीर दाखवता आला नाही? त्यामुळे त्यांना कोणते परिणाम भोगावे लागले?’

१६. धीर धरण्याचे कोणते काही फायदे आहेत?

१६ धीर धरल्यामुळे होणाऱ्‍या फायद्यांचा विचार करा.  जेव्हा आपण धीर धरतो तेव्हा आपण आनंदी असतो आणि शांत राहतो. त्याच प्रकारे धीर दाखवल्यामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. जेव्हा आपण दुसऱ्‍यांसोबत धीराने वागतो, तेव्हा त्यांच्यासोबतचं आपलं नातं आणखीन घट्ट होतं. मंडळीमधल्या भाऊबहिणींची एकतासुद्धा मजबूत होते. जेव्हा कोणी आपल्याला भडकवतं तेव्हा आपण लगेच न रागवल्यामुळे परिस्थिती आणखीन बिघडत नाही. (स्तो. ३७:८, तळटीप; नीति. १४:२९) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण धीर दाखवतो, तेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याचं अनुकरण करत असतो आणि त्याच्या आणखीन जवळ जातो.

१७. आपण काय करायचा निश्‍चय केला आहे?

१७ धीर हा असा एक सुंदर गुण आहे ज्यामुळे आपल्याला बरेच फायदे होऊ शकतात. धीर दाखवणं नेहमीच सोपं नसलं, तरी यहोवाच्या मदतीने हा गुण आपण स्वतःमध्ये वाढवत राहू शकतो. आपण धीराने नवीन जगाची वाट पाहत असताना खातरीने असं म्हणू शकतो: “हे यहोवा, आम्ही तुझी वाट पाहत  आहोत. तू नेहमी आमच्यावर एकनिष्ठ प्रेम करत राहा.” (स्तो. ३३:२२) चला, तर आपण सगळे जण धीर दाखवत राहायचा निश्‍चय करू या!

गीत ४१ यहोवा माझी प्रार्थना ऐक

a सैतानाच्या या जगात, धीर दाखवण्याचा गुण फार दुर्मिळ होत चाललाय. पण बायबल म्हणतं की आपण सहनशील असलं पाहिजे, म्हणजे धीर धरायला शिकलं पाहिजे. या लेखात आपण पाहणार आहोत, की धीराचा हा गुण इतका महत्त्वाचा का आहे आणि आपण तो कसा वाढवू शकतो.

b धीर दाखवण्याबद्दल बायबलमध्ये असलेले अहवाल पाहण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  यामध्ये “भावना, गुण आणि वर्तणूक” शीर्षकाखाली “सहनशीलता” हे उपशीर्षक पाहा.