व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४४

देवाच्या वचनाचा सर्व बाजूंनी अभ्यास करा

देवाच्या वचनाचा सर्व बाजूंनी अभ्यास करा

‘सत्याची रुंदी, लांबी, उंची आणि खोली पूर्णपणे समजून घ्या.’​—इफिस. ३:१८.

गीत ९८ देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र

सारांश a

१-२. बायबल वाचायचा आणि त्याचा अभ्यास करायचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता? उदाहरण द्या.

 कल्पना करा की तुम्ही एक घर विकत घ्यायचा विचार करत आहात. पण एखादं घर विकत घेण्याआधी तुम्ही कोणत्या-कोणत्या गोष्टी तपासून पाहाल? फक्‍त घराचा फोटो बघून तुम्ही नक्कीच घर घेणार नाही. तर तुम्ही ते घर कसं दिसतं, त्याच्या खोल्या कशा आहेत हे प्रत्यक्ष जाऊन पाहाल. ते घर तुम्ही सगळ्या बाजूंनी म्हणजे पुढून, मागून, आतून, बाहेरून कसं दिसतंय हे फिरून पाहाल. इतकंच नाही, तर त्या घराचा नकाशासुद्धा पाहाल आणि हे माहीत करून घ्यायचा प्रयत्न कराल की ते घर कसं बांधण्यात आलंय. थोडक्यात, ते घर घेण्याआधी तुम्ही त्या घराचे सगळे पैलू तपासून पाहाल.

बायबल वाचून त्याचा अभ्यास करत असतानासुद्धा आपण असंच केलं पाहिजे. एका विद्वानाने बायबलच्या संदेशाची तुलना “एका मोठ्या इमारतीशी” केली, जी “खूप उंच आहे आणि जिचा पाया अतिशय खोल आहे.” तर मग बायबलमध्ये जे लिहिलंय ते आपण चांगल्या प्रकारे कसं समजून घेऊ शकतो? तुम्ही जर ते भरभर वाचलं तर त्यातल्या फक्‍त मूलभूत गोष्टी म्हणजे, ‘देवाच्या पवित्र वचनांच्या प्राथमिक गोष्टीच’ तुम्हाला समजतील. (इब्री ५:१२) त्याऐवजी एखादं घर घेताना ते जसं तुम्ही “आतून” फिरून पाहाल, त्याचप्रमाणे बायबल समजून घेण्यासाठी तुम्ही त्याचा खोलवर अभ्यास कराल. बायबलचा अभ्यास करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे, बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टीचा एकमेकांशी कसा  संबंध आहे हे तपासून पाहणं. बायबलचा अभ्यास करताना तुम्ही कोणती  बायबल सत्यं मानता इतकंच नाही, तर ती का  मानता याचादेखील तुम्ही अभ्यास केला पाहिजे.

३. प्रेषित पौलने आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींना काय करायची विनंती केली आणि का? (इफिसकर ३:१४-१९)

देवाचं वचन सगळ्या बाजूने समजून घेण्यासाठी आपण त्यातली गहन सत्यं समजून घेतली पाहिजेत. प्रेषित पौलने आपल्या ख्रिस्ती भाऊबहिणींना त्यांनी “विश्‍वासाच्या पायावर मुळावलेलं आणि स्थिरावलेलं” असावं म्हणून देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करायची विनंती केली. कारण असं केल्यामुळे त्यांना “सत्याची रुंदी, लांबी, उंची  आणि खोली  पूर्णपणे समजून” घेता येणार होती. (इफिसकर ३:१४-१९ वाचा.) तर मग देवाच्या वचनातल्या माहितीचा एकूण अंदाज आणि त्याचा गहन अर्थ आपण कशा प्रकारे समजून घेऊ शकतो ते पाहू या.

बायबलची गहन सत्यं शोधा

४. यहोवासोबत आपलं नातं मजबूत करण्यासाठी आपण काय करू शकतो? उदाहरण द्या.

ख्रिस्ती या नात्याने आपण फक्‍त बायबलचं वरवरचं ज्ञान घेण्यातच समधान मानणार नाही. तर पवित्र शक्‍तीच्या मदतीने आपण ‘देवाच्या गहन गोष्टींचाही’ अभ्यास करायचा मनापासून प्रयत्न करू. (१ करिंथ. २:९, १०) तर मग, देवासोबत आपलं नातं मजबूत होईल, असा एखादा व्यक्‍तिगत अभ्यासाचा उपक्रम का सुरू करू नये? उदाहरणार्थ, प्राचीन काळात यहोवाने त्याच्या सेवकांना कसं प्रेम दाखवलं त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. आणि यावरून त्याचं आपल्यावरही प्रेम आहे हे कसं स्पष्ट होतं ते तुम्ही पाहू शकता. जसं यहोवाने इस्राएली लोकांना उपासनेची जी व्यवस्था करून दिली होती, तिची तुलना तुम्ही आज देवाने ख्रिश्‍चनांना उपासनेची जी व्यवस्था घालून दिली आहे तिच्याशी करू शकता. आणि त्या गोष्टी एकमेकांशी कशा जुळतात हे तुम्ही पाहू शकता. किंवा कदाचित, येशूने पृथ्वीवर असताना बायबलच्या कोणकोणत्या भविष्यवाण्या पूर्ण केल्या यांचा सखोल अभ्यासही करू शकता.

५. तुम्हाला व्यक्‍तिगत अभ्यासामध्ये कोणत्या विषयांवर संशोधन करायला आवडेल?

बायबलचा काळजीपूर्वक अभ्यास करणाऱ्‍या काही भाऊबहिणींना असं विचारण्यात आलं, की त्यांना बायबलमधल्या खासकरून कोणत्या गहन गोष्टींचा अभ्यास करायला आवडेल. तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या “ व्यक्‍तिगत अभ्यासासाठी काही विषय” या चौकटीत देण्यात आल्या आहेत. वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स  आणि यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  या साहित्यांमधून या विषयांवर अभ्यास केल्यामुळे तुम्हालाही बरंच काही शिकायला मिळू शकतं. बायबलचा गहन अभ्यास केल्यामुळे तुमचा विश्‍वास मजबूत होऊ शकतो आणि तुम्हाला “देवाचं ज्ञान” मिळू शकतं. (नीति. २:४, ५) आता आपण बायबलच्या काही गहन सत्यांवर चर्चा करू या, ज्यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करता येईल.

देवाच्या उद्देशांबद्दल खोलवर विचार करा

६. (क) योजना आणि उद्देश यांमध्ये काय फरक आहे? (ख) मानव आणि पृथ्वीसाठी देवाचा उद्देश ‘सर्वकाळासाठी’ आहे असं का म्हणता येईल? (इफिसकर ३:११)

उदाहरणार्थ, देवाच्या उद्देशाबद्दल बायबल काय म्हणतं याचाच विचार करा. यासाठी आपण योजना आणि उद्देश यांमध्ये काय फरक आहे ते आधी पाहू या. समजा, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर तिथे जाण्यासाठी तुम्ही आधीच योजना  करता. म्हणजे, कोणकोणत्या मार्गांनी तिथे पोहोचायचं आहे हे तुम्ही आधीच ठरवता. पण जर मार्गात काही अडथळे आले तर तुमची योजना असफल होते. पण उद्देशाच्या  बाबतीत असं नाही. उद्देशाची तुलना आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणाशी करू शकतो. आपल्याला माहीत आहे की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. पण त्यासाठी निश्‍चित मार्ग ठरवलेला नसतो. आणि त्यामुळेच गरजेप्रमाणे तुम्ही तुमचा मार्ग बदलू शकता. म्हणजेच योजना आणि उद्देश यांमध्ये खूप मोठा फरक आहे. यहोवाने त्याच्या ‘सर्वकाळाच्या उद्देशाबद्दल’ आपल्याला हळूहळू कळवलं आहे आणि याबद्दल आपण त्याचे खरंच आभार मानले पाहिजे. (इफिस. ३:११) “यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वकाही घडवून आणतो,” त्यामुळे आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मार्गाने तो नेहमी यशस्वी ठरतो. (नीति. १६:४) आणि तो जे काही करतो त्याचे परिणाम कायम राहतात. तर मग यहोवाचा उद्देश काय आहे? आणि तो पूर्ण करण्यासाठी यहोवाने कोणकोणते फेरबदल केले आहेत?

७. आदाम आणि हव्वाने बंड केल्यानंतर देवाने आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कोणते फेरबदल केले? (मत्तय २५:३४)

यहोवाने आपल्या पहिल्या पालकांना म्हणजे आदाम आणि हव्वाला त्याच्या उद्देशाबद्दल सांगितलं होतं. तो म्हणजे: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका आणि . . . सर्व प्राणी यांवर अधिकार चालवा.” (उत्प. १:२८) पण आदाम आणि हव्वाने जेव्हा बंड केलं, तेव्हा सर्व मानवी कुटुंब पापी बनलं. त्यामुळे यहोवाच्या मूळ उद्देशाला जरी अडथळा निर्माण झाला, तरी तो पूर्ण व्हायचा राहिला नाही. यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्याचा मार्ग बदलला. त्याने लगेच एक स्वर्गीय राज्य स्थापन करायचं ठरवलं. आणि त्या राज्याद्वारे तो मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा मूळ उद्देश पूर्ण करणार होता. (मत्तय २५:३४ वाचा.) आणि मग जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा यहोवाने प्रेमळपणे आपल्या पहिल्या मुलाला पृथ्वीवर त्याच्या राज्याबद्दल शिकवण्यासाठी पाठवलं. तसंच त्याने पाप आणि मृत्यूपासून मानवांची सुटका होण्यासाठी आपल्या मुलाचं जीवन खंडणी बलिदान म्हणून दिलं. मग देवाच्या राज्याचा राजा म्हणून स्वर्गात राज्य करण्यासाठी देवाने येशूला पुन्हा जिवंत केलं. पण देवाच्या उद्देशाबद्दल शिकण्यासारख्या अशा आणखी बऱ्‍याच गोष्टी आहेत.

स्वर्गात आणि पृथ्वीवर असणारे सर्व विश्‍वासू सेवक एकत्र मिळून यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करतील त्या काळाची कल्पना करा. (परिच्छेद ८ पाहा)

८. (क) बायबलचा मुख्य विषय काय आहे? (ख) इफिसकर १:८-११ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाचा अंतिम उद्देश काय आहे? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

यहोवा येशूच्या राज्याद्वारे पृथ्वीबद्दल असलेला आपला उद्देश पूर्ण करेल. आणि हे करत असताना तो आपल्या नावावर लागलेला कलंक मिटवेल. हाच बायबलचा मुख्य विषय आहे. यहोवाचा उद्देश कधीच बदलत नाही. त्याने आपल्याला अशी खातरी दिली आहे, की तो काहीही करून आपला उद्देश पूर्ण करेल. (यश. ४६:१०, ११, तळटिपा; इब्री ६:१७, १८) काळाच्या ओघात तो पृथ्वीला एका सुंदर नंदनवनात बदलून टाकेल, जिथे आदाम आणि हव्वाचे परीपूर्ण आणि नीतिमान वंशज राहतील आणि “सर्वकाळ जीवनाचा आनंद” लुटतील. (स्तो. २२:२६) पण यहोवाला याहीपेक्षा मोठा उद्देश साध्य करायचा आहे. त्याचा अंतिम उद्देश हाच आहे, की स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेल्या त्याच्या सर्व विश्‍वासू सेवकांना एकत्र करणं. त्यांना एकत्र केल्यानंतर स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेले त्याचे सर्व विश्‍वासू सेवक त्याला आपला सर्वोच्च शासक मानतील आणि त्याच्या अधीन राहतील. (इफिसकर १:८-११ वाचा.) यहोवा ज्या पद्धतीने आपला उद्देश पूर्ण करतो ते पाहून तुम्हाला आश्‍चर्य वाटत नाही का?

भविष्याबद्दल खोलवर विचार करा

९. बायबल वाचल्यामुळे आपल्याला भविष्यात किती दूरपर्यंत पाहता येतं?

यहोवाने एदेन बागेत जी भविष्यवाणी केली, तिचा विचार करा. ही भविष्यवाणी आपल्याला उत्पत्ती ३:१५ मध्ये वाचायला मिळते. b या भविष्यवाणीमध्ये अशा घटनांबद्दल सांगण्यात आलं होतं, ज्यांमुळे यहोवाचा उद्देश पूर्ण होणार होता. पण या घटना हजारो वर्षांनंतर घडणार होत्या. या घटनांमध्ये अब्राहामच्या वंशावळीतून ख्रिस्ताचा जन्म होणंसुद्धा सामील होतं. (उत्प. २२:१५-१८) मग इ.स. ३३ मध्ये, भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे येशूच्या टाचेवर घाव करण्यात येणार होता. (प्रे. कार्यं ३:१३-१५) या भविष्यवाणीच्या शेवटच्या घटनेत सैतानाचं डोकं ठेचलं जाणार होतं. आणि ही घटना आजपासून हजारपेक्षा जास्त वर्षांनंतर घडणार आहे. (प्रकटी. २०:७-१०) तसंच, सैतानाच्या व्यवस्थेमध्ये आणि यहोवाच्या संघटनेमध्ये असलेल्या शत्रुत्वाचा शेवट होत असताना कोणत्या घटना घडतील हेसुद्धा बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे.

१०. (क) लवकरच कोणत्या घटना घडणार आहेत? (ख) आपण आपल्या मनाची तयारी कशी करू शकतो? (तळटीप पाहा.)

१० बायबल आपल्याला हादरून सोडणाऱ्‍या ज्या घटनांबद्दल सांगतं त्यांचाही विचार करा. सगळ्यात आधी राष्ट्रं “शांती आहे, सुरक्षा आहे,” अशी घोषणा करतील. (१ थेस्सलनी. ५:२, ३) आणि मग “एकाएकी” ही राष्ट्रं खोट्या धर्मावर हल्ला करतील, तेव्हा मोठ्या संकटाला सुरुवात होईल. (प्रकटी. १७:१६) त्यानंतर लोक “मनुष्याच्या मुलाला आकाशातल्या ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना” पाहतील, तेव्हा कदाचित आकाशामध्ये अद्‌भुत चिन्हसुद्धा दिसेल. (मत्त. २४:३०) येशू संपूर्ण मानवजातीवर आपला न्यायदंड बजावेल आणि मेंढरांना बकऱ्‍यांपासून वेगळं करेल. (मत्त. २५:३१-३३, ४६) पण यादरम्यान सैतान शांत बसणार नाही. द्वेषाने आणि तिरस्काराने तो राष्ट्रांच्या समूहाला एकत्र करेल आणि त्यांना यहोवाची शुद्ध उपासना करणाऱ्‍या उपासकांवर हल्ला करण्यासाठी चेतवेल. या राष्ट्रांच्या समूहालाच बायबलमध्ये मागोग देशचा गोग असं म्हटलंय. (यहे. ३८:२, १०, ११) मग एक अशी वेळ येईल जेव्हा पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त जणांना वरती स्वर्गात घेतलं जाईल. आणि ते ख्रिस्तासोबत आणि स्वर्गातल्या इतर स्वर्गदूतांसोबत हर्मगिदोनचं युद्ध लढण्यासाठी त्यांना जाऊन मिळतील. हर्मगिदोन ही मोठ्या संकटाची शेवटची घटना असेल. c (मत्त. २४:३१; प्रकटी. १६:१४, १६) आणि त्यानंतर मग पृथ्वीवर ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याची सुरुवात होईल.​—प्रकटी. २०:६.

करोडो वर्षं यहोवाबद्दल शिकत राहिल्यानंतर यहोवासोबतचं तुमचं नातं किती घट्ट झालं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? (परिच्छेद ११ पाहा)

११. अनंतकाळाचं जीवन तुमच्यासाठी इतकं विशेष का आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

११ आता हजार वर्षांनंतर भविष्य कसं असेल त्याचा विचार करा. बायबल म्हणतं की आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला “अनंतकाळाची जाणीव दिली आहे.” (उप. ३:११) अनंतकाळ जगल्यामुळे आपल्यावर आणि यहोवासोबतच्या आपल्या नात्यावर कसा परिणाम होईल त्याचा विचार करा. यहोवा के करीब  पुस्तकात पान ३१९ वर आपली उत्सुकता वाढवणारी एक गोष्ट सांगितली आहे. तिथे म्हटलंय: “शेकडो, हजारो, लाखो, इतकंच नाही तर करोडो वर्षं जगल्यानंतर आपल्याला आता जितकं माहीत आहे, त्याहून कितीतरी पटीने जास्त आपण यहोवाबद्दल शिकून घेतलेलं असेल. पण तरीसुद्धा अजून बऱ्‍याच गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत, असं आपल्याला वाटेल. . . . अनंतकाळाचं जीवन आपण कल्पनाही केली नसेल इतकं अद्‌भुत आणि रोमांचक असेल. पण त्या काळात यहोवासोबतचं आपलं नातं मजबूत करणं हीच सगळ्यात सुंदर गोष्ट असेल.” पण तोपर्यंत बायबलचा अभ्यास करत असताना आपण आणखी कोणत्या गोष्टी जाणून घेऊ शकतो?

वर स्वर्गात पाहा

१२. आपण वर स्वर्गात कसं पाहू शकतो? उदाहरण द्या.

१२ “अतिशय उंच ठिकाणी,” स्वर्गात यहोवाचं अस्तित्व कसं आहे याची एक झलक बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. (यश. ३३:५) यहोवाबद्दल आणि त्याच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाबद्दल बायबलमध्ये बऱ्‍याच आश्‍चर्यकारक गोष्टी सांगितल्या आहेत. (यश. ६:१-४; दानी. ७:९, १०; प्रकटी. ४:१-६) उदाहरणार्थ, यहेज्केलच्या समोर जेव्हा “आकाश उघडलं आणि [त्याला] देवाकडून दृष्टान्त मिळू लागले” तेव्हा त्याने ज्या रोमांचक गोष्टी पाहिल्या, त्यांबद्दल आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं.​—यहे. १:१.

१३. इब्री लोकांना ४:१४-१६ मध्ये सांगितल्याप्रमाणे येशूची स्वर्गात जी भूमिका आहे, त्याबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला विशेष वाटते?

१३ सध्या स्वर्गातून राज्य करत असलेला राजा आणि सहानुभूती असलेला महायाजक या नात्याने येशूची जी भूमिका आहे त्याचा विचार करा. त्याच्याद्वारे आपण प्रार्थना करून देवाच्या “अपार कृपेच्या राजासनापुढे” जाऊ शकतो आणि योग्य वेळी त्याच्याकडे दयेसाठी आणि मदतीसाठी विनंती करू शकतो. (इब्री लोकांना ४:१४-१६ वाचा.) यहोवा आणि येशूने आपल्यासाठी स्वर्गातून जे केलंय आणि सध्या जे करत आहेत, त्यावर आपण दररोज विचार केला पाहिजे. त्यांच्या प्रेमाचा आपल्यावर खोलवर प्रभाव झाला पाहिजे. आणि आवेशाने यहोवाची सेवा आणि उपासना करण्यासाठी आपण प्रवृत्त झालं पाहिजे.​—२ करिंथ. ५:१४, १५.

आपण इतरांना यहोवाचे साक्षीदार आणि येशूचे शिष्य बनण्यासाठी मदत केली आहे या जाणीवेमुळे नवीन जगात आपल्याला किती आनंद होईल याची कल्पना करा! (परिच्छेद १४ पाहा)

१४. यहोवा आणि येशूबद्दल आपल्या मनात कदर आहे, हे दाखवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता? (चित्रंसुद्धा पाहा.)

१४ देवाबद्दल आणि त्याच्या मुलाबद्दल आपल्या मनात कदर आहे, हे दाखवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे लोकांना यहोवाचा साक्षीदार आणि येशूचा शिष्य बनण्यासाठी मदत करणं. (मत्त. २८:१९, २०) देवाबद्दल आणि ख्रिस्ताबद्दल आपल्या मनात कदर आहे, हे दाखवण्यासाठी प्रेषित पौलनेही हेच केलं. त्याला माहीत होतं, की “सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं आणि त्यांना सत्याचं अचूक ज्ञान मिळावं” हीच यहोवाची इच्छा आहे. (१ तीम. २:३, ४) म्हणून त्याने प्रचार कार्यात मेहनत घेतली आणि ‘कसंही करून काहींचं तारण करता यावं,’ म्हणून जास्तीत जास्त लोकांना मदत करायचा प्रयत्न केला.​—१ करिंथ. ९:२२, २३.

देवाच्या वचनाचा बारकाईने अभ्यास करून आनंद मिळवा

१५. स्तोत्र १:२ मध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होऊ शकतो?

१५ स्तोत्रकर्त्याने म्हटलं, की जो “यहोवाच्या नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो, आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो,” तो माणूस आनंदी आणि यशस्वी आहे. त्याने म्हटलेले हे शब्द खरंच बरोबर आहेत. (स्तो. १:१-३) जोसफ रॉदरहॅम या बायबल भाषांतरकाराने स्टडीज्‌ इन द साम्स  या त्याच्या पुस्तकात या वचनाबद्दल एक गोष्ट लिहिली आहे. त्याने म्हटलं: “प्रत्येक व्यक्‍तीला देवाच्या मार्गदर्शनाची इतकी गोडी असली पाहिजे, की त्याने तिचा शोध केला पाहिजे, त्यातून शिकलं पाहिजे आणि त्याच्यावर मनन केलं पाहिजे. त्याने पुढे असंही म्हटलं, की एखाद्या दिवशी आपण बायबल वाचलं नाही, तर तो दिवस वाया गेल्यासारखा आहे.” तुम्हीसुद्धा जर बायबलचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातल्या माहितीचा एकमेकाशी कसा संबंध आहे, हे शोधायचा प्रयत्न केला, तर तुम्हालासुद्धा बायबलचा अभ्यास करण्यात खूप आनंद होईल. खरंच देवाच्या वचनाचा सगळ्या बाजूने अभ्यास करणं किती आनंद देणारी गोष्ट आहे!

१६. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१६ यहोवा त्याच्या वचनातून आपल्याला जी मौल्यवान सत्यं शिकवतो, ती आपल्या समजशक्‍तीपलीकडे नाहीत. पुढच्या लेखात आपण अशाच एका गहन सत्याबद्दल म्हणजे यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराबद्दल पाहू या. पौलने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात याबद्दल सांगितलं होतं. आम्हाला आशा आहे, की या विषयावर अभ्यास केल्यामुळे तुम्हाला खरंच खूप आनंद होईल!

गीत ९४ देवाच्या वचनासाठी आभारी

a बायबलचा अभ्यास केल्यामुळे तुम्ही आयुष्यभर आनंदी राहू शकता. आणि त्यामुळे तुम्हाला फायदा होईल आणि आपल्या स्वर्गातल्या पित्यासोबतचं तुमचं नातं मजबूत होईल. या लेखात आपण देवाच्या वचनातल्या सत्याची “रुंदी, लांबी, उंची आणि खोली” कशी मोजता येईल ते पाहणार आहोत.

b जुलै २०२२ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणारी बायबलची पहिली भविष्यवाणी” हा लेख पाहा.

c भविष्यात लवकरच हादरून सोडणाऱ्‍या घटना घडतील. त्यासाठी तयार राहायला आपण काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी राज किताब  पुस्तकाच्या पान २३० वर दिलेली माहिती पाहा.