व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४५

यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा

यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याच्या बहुमानाची कदर करा

‘ज्याने आकाश, पृथ्वी निर्माण केली त्याची उपासना करा.’​—प्रकटी. १४:७.

गीत ९३ आमच्या सभेवर आशीर्वाद दे!

सारांश a

१. एक स्वर्गदूत काय म्हणत आहे आणि त्यामुळे आपण काय केलं पाहिजे?

 जर एक स्वर्गदूत तुमच्याकडे आला आणि त्याला तुमच्याशी काहीतरी बोलायचं असेल, तर तुम्ही त्याचं ऐकून घ्याल का? खरंतर आज “प्रत्येक लोकसमूहाच्या, राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या” लोकांशी एक स्वर्गदूत बोलत आहे. तो काय म्हणतोय? ‘देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा, ज्याने आकाश, पृथ्वी निर्माण केली त्याची उपासना करा.’ (प्रकटी. १४:६, ७) यहोवाच हा एकमेव खरा देव आहे ज्याची आपण सगळ्यांनीच उपासना केली पाहिजे. त्याच्या महान आध्यात्मिक मंदिरात उपासना करण्याची मौल्यवान संधी त्याने आपल्याला दिली आहे. यासाठी आपण खरंच त्याचे खूप आभार मानले पाहिजे.

२. यहोवाचं आध्यात्मिक मंदिर कशाला सूचित करतं? (“ आध्यात्मिक मंदिर कशाला सूचित करत नाही?” ही चौकटसुद्धा पाहा.)

आध्यात्मिक मंदिर नेमकं काय आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला कुठे मिळू शकते? आध्यात्मिक मंदिर ही खरोखरची इमारत नाही. हे यहोवाला मान्य असलेल्या पद्धतीने त्याची उपासना करण्यासाठी त्याने घालून दिलेली व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था येशूच्या खंडणी बलिदानावर आधारित आहे.  प्रेषित पौलने यहूदीयामध्ये राहणाऱ्‍या पहिल्या शतकातल्या इब्री ख्रिश्‍चनांना लिहिलेल्या पत्रात याबद्दल सांगितलं. b

३-४. यहूदीयामध्ये राहणाऱ्‍या इब्री ख्रिश्‍नांबद्दल पौलला कोणती चिंता वाटत होती आणि त्याने त्यांना कशी मदत केली?

यहूदीयामधल्या इब्री ख्रिश्‍चनांना पौलने पत्र का लिहिलं असावं? कदाचित याची दोन मुख्य कारणं असतील. पहिलं, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. कारण त्यांच्यापैकी बरेच जण आधी यहुदी धर्मातले होते. आणि आता ख्रिश्‍चन बनल्यानंतर यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांनी त्यांची थट्टा केली असेल. का? कारण ख्रिश्‍चनांकडे त्या वेळी उपासनेसाठी मंदिर नव्हतं, देवाला बलिदानं देण्यासाठी वेदी नव्हती आणि त्यांच्या वतीने त्या वेदीवर देवाला अर्पणं देण्यासाठी याजकही नव्हते. यामुळे कदाचित हे शिष्य निराश झाले असतील आणि त्यांचा विश्‍वासही कमजोर झाला असेल. (इब्री २:१; ३:१२, १४) इतकंच काय, तर त्यांच्यापैकी काही जणांना पुन्हा यहुदी धर्मात जायची इच्छा झाली असेल.

हे पत्र लिहिण्याचं दुसरं कारण म्हणजे, प्रेषित पौलने दाखवून दिल्याप्रमाणे इब्री ख्रिश्‍चन देवाच्या वचनात दिलेलं ‘जड अन्‍न’ म्हणजेच, नवीन किंवा गहन आध्यात्मिक शिकवणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. (इब्री ५:११-१४) त्यामुळे त्यांच्यापैकी काही जण मोशेचं नियमशास्त्र अजूनही मानत होते. पौलने त्यांना समजावून सांगितलं, की नियमशास्त्रामधल्या बलिदानांमुळे पाप पूर्णपणे काढून टाकलं जाऊ शकत नाही. त्यामुळेच नियमशास्त्र “रद्द” करण्यात आलं होतं. यापुढे पौलने त्यांना देवाच्या वचनातली काही गहन सत्यं शिकवली. त्याने भाऊबहिणींना याची आठवण करून दिली, की येशूच्या बलिदानाच्या आधारावर त्यांना जास्त “चांगली आशा” मिळू शकते. यामुळे ते “देवाच्या जवळ” येऊ शकतात.​—इब्री ७:१८, १९.

५. इब्री लोकांना या पुस्तकातून आपल्याला काय समजून घेण्याची गरज आहे आणि का?

पौलने इब्री ख्रिश्‍चनांना सांगितलं, की ते आधी ज्या पद्धतीने उपासना करत होते त्यापेक्षा आता ते ज्या पद्धतीने उपासना करत आहेत ती खूप श्रेष्ठ आहे. त्याने असंही म्हटलं, की नियमशास्त्राप्रमाणे यहुदी लोक उपासनेत ज्या गोष्टी करत होते त्या “सगळ्या येणाऱ्‍या गोष्टींच्या छाया  आहेत, पण वास्तविकता  ही ख्रिस्तामध्ये आहे.” (कलस्सै. २:१७) जेव्हा एखाद्या वस्तूची छाया किंवा सावली पडते तेव्हा आपल्याला त्या वस्तूचा सर्वसाधारण आकार समजतो. पण ती छाया खरोखरची वस्तू नसते. त्याचप्रमाणे यहुदी लोकांची उपासना करायची पद्धत ही पुढे येणाऱ्‍या वास्तविक गोष्टींची फक्‍त एक छाया होती. आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून यहोवाने जी व्यवस्था केली आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. कारण त्यामुळेच आपल्याला यहोवाला मान्य असलेल्या पद्धतीने उपासना करता येईल. चला, आता आपण इब्री लोकांना पुस्तकात सांगितल्याप्रमाणे “छाया” (यहुद्यांची उपासनेची पद्धत) आणि ‘वास्तविकतेची’ (ख्रिश्‍चनांची उपासनेची पद्धत) तुलना करून पाहू या. यामुळे आध्यात्मिक मंदिर म्हणजे नेमकं काय आणि त्यात कुठल्या गोष्टी येतात, हे समजून घेता येईल.

उपासना मंडप

६. उपासना मंडपाचा वापर कसा केला जायचा?

छाया.  इ.स.पू. १५१२ मध्ये मोशेने जो उपासना मंडप उभारला होता त्याच्या आधारावर पौल इथे बोलत होता. (“छाया—वास्तविकता” ही चौकट पाहा.) उपासना मंडप तंबूसारखा दिसायचा. सुरुवातीला इस्राएली लोक जिथे-जिथे जायचे तिथे-तिथे त्यांना हा उपासना मंडप घेऊन जावा लागायचा. यरुशलेममध्ये मंदिर बांधायच्या आधी जवळपास ५०० वर्षांपर्यंत त्यांनी या उपासना मंडपाचा वापर केला. (निर्ग. २५:८, ९; गण. ९:२२) इस्राएली लोक हा मंडप देवासमोर जाण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी आणि बलिदानं देण्यासाठी वापरायचे. यालाच “भेटमंडप” असंही म्हटलं गेलं. (निर्ग. २९:४३-४६) पण हा उपासना मंडप आणखीन मोठ्या गोष्टीला सूचित करत होता जी ख्रिश्‍चनांसाठी महत्त्वाची असणार होती.

७. आध्यात्मिक मंदिर कधी अस्तित्वात आलं?

वास्तविकता.  प्राचीन काळातल्या उपासना मंडपाला ‘स्वर्गीय गोष्टींची छाया’ असं म्हणण्यात आलंय. आणि हे यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराला सूचित करतं. पौलने म्हटलं की “हा मंडप [किंवा, उपासना मंडप] सध्याच्या काळासाठी एक उदाहरण आहे.” (इब्री ८:५; ९:९) त्यामुळे जेव्हा पौलने इब्री लोकांना हे पत्र लिहिलं तोपर्यंत हे आध्यात्मिक मंदिर ख्रिश्‍चनांसाठी वास्तविक बनलं होतं. इ.स. २९ मध्ये हे अस्तित्वात आलं. त्या वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाला आणि पवित्र शक्‍तीने त्याचा अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून तो आध्यात्मिक मंदिरात यहोवाचा “श्रेष्ठ महायाजक” म्हणून सेवा करू लागला. c​—इब्री ४:१४; प्रे. कार्यं १०:३७, ३८.

महायाजक

८-९. इब्री लोकांना ७:२३-२७ प्रमाणे इस्राएलच्या महायाजकांमध्ये आणि श्रेष्ठ महायाजक येशू ख्रिस्तामध्ये कोणता फरक आहे?

छाया.  महायाजकालाच लोकांच्या वतीने देवाकडे जायची परवानगी होती. जेव्हा उपासना मंडपाची स्थापना करण्यात आली तेव्हा यहोवाने अहरोनला इस्राएलचा पहिला महायाजक म्हणून नियुक्‍त केलं. पण पौलने जसं म्हटलं तसं “पूर्वी एकापाठोपाठ एक बऱ्‍याच जणांना याजक बनावं लागायचं. कारण मृत्यूमुळे त्यांना याजक म्हणून कायम सेवा करत राहणं शक्य नव्हतं.” d (इब्री लोकांना ७:२३-२७ वाचा.) अपरिपूर्ण असल्यामुळे महायाजकांना स्वतःच्या पापांसाठीसुद्धा बलिदानं द्यावी लागायची. इथेच आपल्याला इस्राएलचा महायाजक आणि श्रेष्ठ महायाजक येशू ख्रिस्त यांच्यातला फरक स्पष्टपणे दिसून येतो.

वास्तविकता.  आपला महायाजक येशू ख्रिस्त “माणसाने नाही, तर यहोवाने उभारलेल्या खऱ्‍या मंडपातल्या परमपवित्र स्थानाचा सेवक आहे.” (इब्री ८:१, २) पौलने म्हटलं की “हा याजक सदासर्वकाळ जिवंत असल्यामुळे, त्याच्या याजकपदाला वारसदारांची गरज नाही.” हा विषय समजून सांगताना पौलने पुढे म्हटलं की तो “निष्कलंक, पापी लोकांपेक्षा वेगळा” आहे आणि इस्राएलच्या महायाजकाप्रमाणे त्याला “स्वतःच्या पापांसाठी” रोजच्या रोज बलिदानं अर्पण करायची गरज नाही. आता आपण पाहू की प्राचीन इस्राएलमधली वेदी आणि त्यावर दिली जाणारी बलिदानं कोणत्या गोष्टींची छाया होती.

वेदी आणि अर्पणं

१०. तांब्याच्या वेदीवर दिली जाणारी अर्पणं कशाला सूचित करत होती?

१० छाया.  उपासना मंडपाच्या प्रवेशाजवळ तांब्याची एक वेदी होती. आणि या वेदीवर यहोवासाठी प्राण्यांची अर्पणं दिली जायची. (निर्ग. २७:१, २; ४०:२९) पण या अर्पणांमुळे लोकांना त्यांच्या पापांची पूर्णपणे आणि कायमची सुटका मिळणं शक्य नव्हतं. (इब्री १०:१-४) उपासना मंडपात सतत दिली जाणारी प्राण्यांची ही अर्पणं पुढे दिल्या जाणाऱ्‍या एकाच अर्पणाला सूचित करत होती. या अर्पणामुळे मानवजातीची पापांपासून कायमची सुटका होणार होती.

११. येशूने ज्या वेदीवर स्वतःचं जीवन अर्पण केलं ती कशाला सूचित करते? (इब्री लोकांना १०:५-७, १०)

११ वास्तविकता.  येशूला माहीत होतं की यहोवाने त्याला पृथ्वीवर त्याचं मानवी जीवन संपूर्ण मानवजातीसाठी खंडणी बलिदान म्हणून अर्पण करायला पाठवलंय. (मत्त. २०:२८) म्हणून बाप्तिस्म्याच्या वेळी येशूने यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला सादर केलं. (योहा. ६:३८; गलती. १:४) त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की येशूने त्याचं जीवन एका लाक्षणिक वेदीवर अर्पण केलं. ही लाक्षणिक वेदी कशाला सूचित करते? ही वेदी आपल्या मुलाने त्याचं परिपूर्ण मानवी जीवन अर्पण करावं अशी जी देवाची “इच्छा” होती, त्या इच्छेला सूचित करते. अशा प्रकारे येशूचं जीवन “एकदाच” सर्व लोकांच्या पापांसाठी प्रायश्‍चित्त म्हणून देण्यात आलं. म्हणजेच जे येशूवर विश्‍वास ठेवतात त्यांची पापं कायमची झाकून टाकली जावीत म्हणून ते देण्यात आलं. (इब्री लोकांना १०:५-७, १० वाचा.) आता आपण उपासना मंडपाच्या आत ज्या गोष्टी होत्या त्या कशाला सूचित करत होत्या ते पाहू या.

पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान

१२. पवित्र स्थानात आणि परमपवित्र स्थानात कोण जाऊ शकत होतं?

१२ छाया.  उपासना मंडपात आणि नंतर यरुशलेममध्ये बांधण्यात आलेल्या मंदिरांची रचना एकसारखीच होती. त्यांमध्ये दोन भाग असायचे. “पवित्र स्थान” आणि “परमपवित्र स्थान.” या दोन्ही भागांना भरतकाम केलेल्या पडद्याने विभागलेलं होतं. (इब्री ९:२-५; निर्ग. २६:३१-३३) पवित्र स्थानात  सोन्याचा दीपवृक्ष होता, धूप जाळण्याची वेदी होती आणि अर्पणाची भाकरी ठेवण्यासाठी एक मेज होतं. फक्‍त ‘अभिषिक्‍त याजकच’ पवित्र सेवा करण्यासाठी पवित्र स्थानात जायचे. (गण. ३:३, ७, १०) परमपवित्र स्थानात  सोन्याने मढवलेली कराराची पेटी होती. ही यहोवाच्या उपस्थितीला सूचित करत होती. (निर्ग. २५:२१, २२) वर्षातून येणाऱ्‍या प्रायश्‍चित्ताच्या दिवशी महायाजकालाच त्या पडद्याच्या पलीकडे असणाऱ्‍या परमपवित्र स्थानात जायची परवानगी होती. (लेवी. १६:२, १७) दरवर्षी येणाऱ्‍या प्रायश्‍चित्ताच्या दिवशी तो स्वतःच्या आणि संपूर्ण राष्ट्राच्या पापांच्या प्रायश्‍चित्तासाठी परमपवित्र स्थानात जायचा. कालांतराने यहोवाने त्याच्या पवित्र शक्‍तीद्वारे उपासना मंडपातल्या या सगळ्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट केला.​—इब्री ९:६-८. e

१३. उपासना मंडपातलं पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान कशाला सूचित करतं?

१३ वास्तविकता.  ख्रिस्ताच्या शिष्यांपैकी फक्‍त मोजक्याच लोकांना पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात येत आहे. यामुळे यहोवासोबत त्यांचं एक खास नातं तयार होतं. हे १,४४,००० जण येशूसोबत स्वर्गात याजक म्हणून सेवा करतील. (प्रकटी. १:६; १४:१) देवाच्या या मुलांना पृथ्वीवर असताना पवित्र शक्‍तीने अभिषिक्‍त करण्यात येतं. उपासना मंडपातलं पवित्र स्थान  हे त्यांच्या या अभिषिक्‍त असण्याच्या स्थितीला सूचित करतं. (रोम. ८:१५-१७) उपासना मंडपातलं परमपवित्र स्थान  हे स्वर्गाला सूचित करतं, जिथे यहोवाचं अस्तित्व आहे. पवित्र आणि परमपवित्र स्थानाला विभाजित करणारा “पडदा” हा येशूच्या हाडामांसाच्या शरीराला सूचित करतो. या शरीरामुळे आध्यात्मिक मंदिराचा श्रेष्ठ महायाजक म्हणून त्याला स्वर्गात जाता येणार नव्हतं. आपलं हाडामांसाचं शरीर मानवजातीसाठी बलिदान दिल्यामुळे सर्व अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी स्वर्गातल्या जीवनाचा मार्ग येशूने मोकळा केला. पण यासाठी त्यांना स्वतःच्या हाडामांसाच्या शरीराचा त्याग करणंही गरजेचं आहे. (इब्री १०:१९, २०; १ करिंथ. १५:५०) येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर तो आध्यात्मिक मंदिराच्या परमपवित्र स्थानात जाऊ शकला, जिथे बाकीचे सर्व अभिषिक्‍त जण त्याला येऊन मिळतील.

१४. इब्री लोकांना ९:१२, २४-२६ प्रमाणे यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराची व्यवस्था श्रेष्ठ कशी आहे?

१४ खंडणी बलिदानावर आणि येशू ख्रिस्ताच्या याजकपदाच्या आधारावर शुद्ध उपासनेसाठी यहोवाने जी व्यवस्था केली आहे ती किती श्रेष्ठ आहे हे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. इस्राएलमधले महायाजक माणसांनी बनवलेल्या परमपवित्र स्थानात प्राण्यांच्या अर्पणांचं रक्‍त घेऊन जायचे. पण येशू यहोवा पुढे जाण्यासाठी सगळ्यात पवित्र ठिकाणी म्हणजे “प्रत्यक्ष स्वर्गात गेला.” त्याने “स्वतःचं बलिदान देऊन पाप नाहीसं” केलं. अशा रितीने त्याने आपल्यावतीने स्वतःच्या परिपूर्ण मानवी जीवनाचं मोल सादर केलं. (इब्री लोकांना ९:१२, २४-२६ वाचा.) येशूचं बलिदान हे एक असं अर्पण होतं, ज्यामुळे आपली पापं कायमची नाहीशी झाली. आपली आशा स्वर्गातली असो किंवा पृथ्वीवरची, आपण सर्व जण यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात त्याची उपासना करू शकतो. याबद्दलच आता आपण पुढे पाहू या.

अंगणं

१५. उपासना मंडपाच्या अंगणात कोण सेवा करायचे?

१५ छाया.  उपासना मंडपात एक अंगण असायचं. हे कुंपण असलेलं एक मोठं मैदान होतं. इथे याजक आपली कामं करायचे. या अंगणात होमार्पण देण्यासाठी तांब्याची एक मोठी वेदी होती. त्यासोबत याजकांना आपली पवित्र सेवा करता यावी म्हणून स्वतःला शुद्ध करण्याकरता तांब्याचं एक मोठं भांडंही होतं. (निर्ग. ३०:१७-२०; ४०:६-८) यानंतर जी मंदिरं बांधण्यात आली तिथे एक बाहेरचं अंगणसुद्धा होतं, जिथे याजक नसलेले लोक उभे राहून देवाची उपासना करायचे.

१६. आध्यात्मिक मंदिराच्या आतल्या आणि बाहेरच्या अंगणात कोण सेवा करतं?

१६ वास्तविकता.  स्वर्गात येशूसोबत याजक म्हणून सेवा करण्याच्या आधी पृथ्वीवर उरलेले अभिषिक्‍तजन आध्यात्मिक मंदिराच्या आतल्या अंगणात  विश्‍वासूपणे सेवा करतात. उपासना मंडपात असलेल्या पाण्याच्या मोठ्या भांड्यामुळे त्यांना आणि सर्व ख्रिश्‍चनांना नैतिक रितीने आणि आध्यात्मिक रितीने शुद्ध राहण्याची आठवण होते. पण ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त भावांना पाठिंबा देणारा “मोठा लोकसमुदाय” यहोवाची कुठे उपासना करतो? प्रेषित योहानने म्हटलं, की मोठा लोकसमुदाय ‘राजासनासमोर उभं राहून मंदिरात रात्रंदिवस यहोवाची पवित्र सेवा करत आहे.’ मोठा लोकसमुदाय ही सेवा पृथ्वीवर असलेल्या आध्यात्मिक मंदिराच्या बाहेरच्या अंगणात  करतो. (प्रकटी. ७:९, १३-१५) शुद्ध उपासनेच्या यहोवाच्या व्यवस्थेत आपला सहभाग असणं हा आपल्यासाठी एक मोठा बहुमान आहे!

यहोवाची उपासना करण्याचा बहुमान

१७. यहोवाला कोणती अर्पणं देण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे?

१७ आज सर्व ख्रिश्‍चनांकडे यहोवाला अर्पण देण्याची एक खास संधी आहे. ते देवाच्या राज्यासाठी आपला वेळ, शक्‍ती आणि साधनसंपत्तीचा वापर करून असं करू शकतात. प्रेषित पौलने इब्री ख्रिश्‍चनांना सांगितलं, की ते नेहमी “देवाला स्तुतीचं बलिदान, म्हणजेच त्याच्या नावाची जाहीर रीत्या घोषणा करणाऱ्‍या आपल्या ओठांचं फळ अर्पण करू” शकतात. (इब्री १३:१५) यहोवाची उपासना करण्याचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे, त्याची आपल्याला कदर आहे, हे आपण यहोवाला चांगल्यातलं चांगलं अर्पण देऊन दाखवू शकतो.

१८. इब्री लोकांना १०:२२-२५ प्रमाणे आपण कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये आणि कोणती गोष्ट विसरू नये?

१८ इब्री लोकांना १०:२२-२५ वाचा. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्राच्या समाप्तीला पौल उपासनेच्या अशा पैलूंबद्दल सांगतो, ज्यांकडे आपण कधीच दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. यांमध्ये यहोवाला प्रार्थना करणं, आपल्या आशेबद्दल लोकांना सांगणं, एक मंडळी म्हणून सभांसाठी एकत्र येणं आणि ‘[यहोवाचा] दिवस जसजसा जवळ येत असल्याचं आपण पाहतो’ तसतसं एकमेकांना जास्त प्रोत्साहन देणं या गोष्टी येतात. प्रकटीकरणाच्या अहवालाच्या शेवटी यहोवाचा स्वर्गदूत दोनदा एका गोष्टीवर भर देतो. तो म्हणतो: “देवाची उपासना कर!” (प्रकटी. १९:१०; २२:९) या लेखात आपण यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराबद्दलचं गहन सत्य शिकलो. तसंच आपण हेही शिकलो, की आपल्याकडे आपल्या महान देवाची उपासना करण्याचा एक बहुमान आहे. तर मग, आपण या दोन्ही गोष्टी कधीच विसरू नये!

गीत ८८ तुझे मार्ग मला शिकव

a देवाच्या वचनात असलेल्या गहन शिकवणींपैकी एक म्हणजे, यहोवाचं महान आध्यात्मिक मंदिर. हे मंदिर काय आहे? या मंदिराबद्दल इब्री लोकांना पुस्तकात जी बारीकसारीक माहिती देण्यात आली आहे, त्याबद्दल या लेखात आपण चर्चा करणार आहोत. यहोवाची उपासना करण्याचा जो बहुमान आपल्याला मिळालाय त्याबद्दल या लेखामुळे आपल्या मनात कदर वाढेल.

b इब्री लोकांना या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती घेण्यासाठी jw.org वर इब्री लोकांना पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ पाहा.

c ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतलं इब्री लोकांना हे एकच असं पुस्तक आहे ज्यात येशूला महायाजक म्हटलंय.

d एका संदर्भानुसार, इ.स. ७० मध्ये यरुशलेममधल्या मंदिराचा नाश होईपर्यंत इस्राएलमध्ये जवळजवळ ८४ महायाजक असावेत.

e प्रायश्‍चित्ताच्या दिवशी महायाजक जी कामं करायचा ती कशाला सूचित करतात हे जाणून घेण्यासाठी jw.org वर द टेन्ट  हा व्हिडिओ पाहा.