व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २

गीत १९ प्रभूचं सांजभोजन

वर्षातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?

वर्षातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसासाठी तुम्ही तयार आहात का?

“माझी आठवण म्हणून हे करत राहा.”​—लूक २२:१९.

या लेखात:

स्मारकविधी इतका खास का आहे, आपण त्यासाठी कशी तयारी करू शकतो आणि स्मारकविधीला यायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो यावर विचार करा.

१. स्मारकविधी हा वर्षांतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस का आहे? (लूक २२:१९, २०)

 यहोवाच्या लोकांसाठी ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी हा वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आणि येशूनेसुद्धा ही एकमेव गोष्ट करण्यासाठी आपल्या शिष्यांना आज्ञा दिली होती. (लूक २२:१९, २० वाचा.) बऱ्‍याच कारणांसाठी आपण स्मारकविधीची उत्सुकतेने वाट पाहत असतो. त्यांपैकी काही कारणांचा आता आपण विचार करू या.

२. कोणत्या कारणांमुळे आपण स्मारकविधीसाठी उत्सुक असतो?

खंडणी बलिदान किती महत्त्वाचं आहे या गोष्टीवर विचार करायला स्मारकविधीमुळे आपल्याला मदत होते. तसंच आपण कोणकोणत्या मार्गांनी येशूच्या बलिदानाबद्दल कदर दाखवू शकतो याचीही आपल्याला आठवण होते. (२ करिंथ. ५:१४, १५) तसंच, स्मारकविधीला उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला ‘एकमेकांना प्रोत्साहनसुद्धा’ देता येतं. (रोम. १:१२) दरवर्षी बरेच अक्रियाशील प्रचारकसुद्धा स्मारकविधीला उपस्थित राहतात. त्या ठिकाणी प्रेमळपणे त्यांचं स्वागत केलं जातं. आणि त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना यहोवाकडे परत यायला मदत झाली आहे. तसंच, तिथे उपस्थित राहिल्यामुळे आस्था दाखवणाऱ्‍या बऱ्‍याच लोकांना तिथे जे पाहायला आणि ऐकायला मिळालं, त्यामुळे त्यांना जीवनाच्या मार्गावर चालायलासुद्धा मदत झाली आहे. म्हणूनच स्मारकविधीचं आपल्या सगळ्यांच्या मनात एक खास स्थान आहे!

३. स्मारकविधीमुळे जगभरातल्या भाऊबहिणींमध्ये असलेली एकता कशी दिसून येते? (चित्रसुद्धा पाहा.)

स्मारकविधीमुळे जगभरातल्या सगळ्या भाऊबहिणींमध्ये असलेली एकता कशी दिसून येते याचाही विचार करा. जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी सूर्य जसा मावळत जातो तसतसं यहोवाचे साक्षीदार स्मारकविधीसाठी एकत्र येतात. त्यात खंडणी बलिदान किती महत्त्वाचं आहे यावर जोर देणारं भाषण आपण सगळे ऐकतो. तसंच, यहोवाच्या स्तुतीसाठी आपण दोन गीतं गातो. उपस्थित असलेल्यांमध्ये प्रतिकं फिरवली जातात. आणि या कार्यक्रमादरम्यान जेव्हा चार प्रार्थना होतात तेव्हा आपण मनापासून “आमेन” म्हणतो. २४ तासांच्या आत जगभरातल्या सगळ्या मंडळ्या याच पद्धतीने स्मारकविधी पाळतात. आपण एकतेने यहोवा आणि येशूचा अशा प्रकारे आदर करतो तेव्हा त्यांना किती आनंद होतं असेल याचा विचार करा!

स्मारकविधी जगभरातल्या भाऊबहिणींना एकतेच्या बंधनात बांधतो (परिच्छेद ३ पाहा) f


४. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: स्मारकविधीसाठी आपण आपलं मन कसं तयार करू शकतो? इतरांना याचा फायदा व्हावा म्हणून आपण त्यांना कशी मदत करू शकतो? आणि अक्रियाशील प्रचारकांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या पवित्र विधीसाठी तयार व्हायला मदत करतील.

स्मारकविधीसाठी आपण आपलं मन कसं तयार करू शकतो?

५. (क) खंडणी बलिदान इतकं महत्त्वाचं का आहे, यावर आपण का विचार केला पाहिजे? (स्तोत्र ४९:७, ८) (ख) येशूला का मरावं लागलं?  या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

स्मारकविधीसाठी आपलं मन तयार करण्याचा सर्वात महत्त्वाचा एक मार्ग म्हणजे येशूने दिलेलं खंडणी बलिदान किती महत्त्वाचं आहे या गोष्टीवर विचार करणं. खरंतर आपण स्वतःहून पाप आणि मृत्यूपासून कधीच सुटका मिळवू शकत नव्हतो. (स्तोत्र ४९:७, ८; येशूला का मरावं लागलं?  हा व्हिडिओसुद्धा पाहा.) a म्हणून आपल्यासाठी यहोवाने आपल्या प्रिय मुलाचं बलिदान द्यायची तरतूद केली. पण त्यासाठी यहोवा आणि येशूला खूप मोठी किंमत मोजावी लागली. (रोम. ६:२३) यहोवा आणि येशूने जे त्याग आपल्यासाठी केले, त्यावर आपण जितकं जास्त मनन करू तितकी जास्त खंडणी बलिदानाबद्दल आपल्या मनात असलेली कदर वाढत जाईल. यहोवा आणि येशूला त्यासाठी जे त्याग करावे लागले, त्यांपैकी काही गोष्टी आता आपण पाहू या. पण सर्वात आधी खंडणीच्या तरतुदीवर आपण थोडी चर्चा करू या.

६. खंडणी बलिदान म्हणजे काय?

एखादी गोष्ट पुन्हा विकत घेण्यासाठी द्यावी लागणारी किंमत म्हणजे खंडणी. आदामला जेव्हा बनवण्यात आलं तेव्हा तो परिपूर्ण होता. पण जेव्हा त्याने पाप केलं, तेव्हा त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या सर्व मुलांसाठी कायमच्या जीवनाची आशा गमावली. आदामने जे गमावलं ते पुन्हा विकत घेण्यासाठी येशूने आपल्या परिपूर्ण जीवनाचं बलिदान दिलं. पृथ्वीवर असलेल्या त्याच्या संपूर्ण जीवनात येशूने “कोणतंही पाप केलं नाही आणि कपटीपणाच्या गोष्टी त्याच्या तोंडून कधीही निघाल्या नाहीत.” (१ पेत्र २:२२) त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचं परिपूर्ण जीवन हे आदामने गमावलेल्या परिपूर्ण जीवनाच्या अगदी बरोबरीचं होतं.​—१ करिंथ. १५:४५; १ तीम. २:६.

७. येशू पृथ्वीवर असताना त्याला कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला?

पृथ्वीवर असताना येशूला बऱ्‍याच समस्यांचा सामना करावा लागला. पण तरीसुद्धा तो अगदी पूर्णपणे आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या आज्ञेत होता. येशूचा जन्म परिपूर्ण व्यक्‍ती म्हणून झाला असला, तरी लहान असताना त्याला आपल्या अपरिपूर्ण आईवडिलांच्या आज्ञेत राहावं लागलं. (लूक २:५१) तसंच, तो जेव्हा तरुण होता तेव्हा त्याच्यावर कदाचित आपल्या आईवडिलांची आज्ञा मोडण्याचा किंवा देवाला अविश्‍वासू राहायचा दबाव आला असेल आणि त्या दबावांचा त्याला प्रतिकार करावा लागला असेल. तसंच, येशू जेव्हा मोठा झाला, तेव्हा सैतानाने त्याला बऱ्‍याच वेळा मोहात पाडायचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर देवाविरुद्ध बंड करण्यासाठीसुद्धा सैतानाने त्याच्यावर सरळसरळ दबाव टाकला. (मत्त. ४:१-११) येशूला खंडणी बलिदानाची किंमत देता येऊ नये म्हणून सैतानाने जणू त्याला पाप करायला लावायचा ठाम निश्‍चयच केला होता.

८. येशूला आणखी कोणत्या परीक्षांचा सामना करावा लागला?

येशूच्या पृथ्वीवरच्या सेवाकार्यात, त्याला आणखी बऱ्‍याच परीक्षांचा सामना करावा लागला. लोकांनी त्याचा छळ केला. इतकंच नाही तर त्यांनी त्याला ठार मारायचासुद्धा प्रयत्न केला. (लूक ४:२८, २९; १३:३१) तसंच त्याला आपल्या शिष्यांच्या कमतरता सहन कराव्या लागल्या. (मार्क ९:३३, ३४) जेव्हा त्याला न्यायाधीशांसमोर उभं करण्यात आलं, तेव्हा त्याचा खूप छळ करण्यात आला आणि त्याची थट्टा करण्यात आली. आणि त्यानंतर त्याला अतिशय वेदनादायक आणि अपमानास्पद मृत्यू सहन करावा लागला. (इब्री १२:१-३) त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटकांमध्ये तर त्याला यहोवाच्या संरक्षणाशिवाय सगळं काही एकट्यानेच सहन करावं लागलं. b​—मत्त. २७:४६.

९. येशूच्या बलिदानाबद्दल तुम्हाला कसं वाटतं? (१ पेत्र १:८)

हे स्पष्टच आहे, की येशूला खंडणी देण्यासाठी खूप काही सहन करावं लागलं. आपल्यासाठी तो स्वतःहून खंडणी द्यायला तयार झाला, या गोष्टीवर मनन केल्यामुळे त्याच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढत नाही का?​—१ पेत्र १:८ वाचा.

१०. खंडणी बलिदानासाठी यहोवाला कोणता त्याग करावा लागला?

१० यहोवाबद्दल काय? येशूला खंडणी देता यावी म्हणून त्याने स्वतः कोणता त्याग केला? वडिलांचं आणि मुलाचं जसं खूप जवळचं नातं असतं, तसंच यहोवा आणि येशूचं आहे. (नीति. ८:३०) पृथ्वीवर असताना येशूला जे सहन करावं लागलं ते पाहून यहोवाला कसं वाटलं असेल, याचा विचार करा. त्याच्या मुलाला दिली गेलेली वाईट वागणूक, अपमान आणि त्याचा छळ पाहून नक्कीच यहोवाला खूप वेदना झाल्या असतील.

११. येशूचा छळ करून त्याला ठार मारण्यात आलं तेव्हा यहोवाला कसं वाटलं असेल, हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

११ ज्या आईवडिलांनी आपल्या मुलाला मृत्यूमध्ये गमावलंय, त्यांना आपल्या मुलाला गमवायचं दुःख काय असतं ते चांगलं माहीत आहे. तसं पाहायला गेलं तर पुनरुत्थानावर आपला ठाम विश्‍वास आहे. पण तरीसुद्धा आपल्या प्रिय व्यक्‍तीचा जेव्हा मृत्यू होतो, तेव्हा आपल्याला होणारं दुःख आणि वेदना कमी होत नाहीत. यावरून आपण समजू शकतो, की इ.स. ३३ च्या निसान १४ तारखेला जेव्हा यहोवाने आपल्या प्रिय मुलाला वेदना सहन करत मरताना पाहिलं असेल तेव्हा त्याला किती दुःख झालं असेल! c​—मत्त. ३:१७.

१२. स्मारकविधी येईपर्यंत आपण काय करू शकतो?

१२ स्मारकविधी येईपर्यंत व्यक्‍तिगत अभ्यासासाठी किंवा कौटुंबिक उपासनेसाठी तुम्ही ‘खंडणी बलिदान’ या विषयावर असणारा एखादा उपक्रम हाती घेऊ शकता का? त्यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  या साधनाचा किंवा बायबल अभ्यासासाठी असलेल्या इतर साधनांचा वापर करून या विषयावर सखोल अभ्यास करू शकता. d यासोबतच आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य​—सभेसाठी कार्यपुस्तिका  यात स्मारकविधीसाठी दिलेल्या बायबल वाचनाच्या आराखड्याचा वापर करून तुम्ही बायबल वाचन करू शकता. तसंच, स्मारकविधीच्या दिवशी सकाळच्या उपासनेचा जो खास कार्यक्रम तयार करण्यात आलेला असतो, तोसुद्धा तुम्ही न विसरता पाहू शकता. अशा प्रकारे जेव्हा स्मारकविधीसाठी तुम्ही स्वतःचं मन तयार कराल, तेव्हा तुम्हाला तर फायदा होईलच पण इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून तुम्हाला त्यांना मदत करता येईल.​—एज्रा ७:१०.

स्मारकविधीचा फायदा करून घेण्यासाठी इतरांनाही मदत करा

१३. स्मारकविधीचा फायदा करून घ्यायला इतरांना मदत करण्यासाठी आपण सगळ्यात आधी काय करू शकतो?

१३ स्मारकविधीचा फायदा करून घेण्यासाठी आपण इतरांना कशी मदत करू शकतो? त्यासाठी साहजिकच सर्वात आधी आपल्याला त्यांना आमंत्रण द्यावं लागेल. तसंच, प्रचारकार्यात आपल्याला नेहमी भेटणाऱ्‍या लोकांना आमंत्रण देण्यासोबतच आपण आपल्या ओळखीच्या लोकांची लिस्ट बनवून त्यांनाही आमंत्रण देऊ शकतो. यामध्ये आपले नातेवाईक, कामावरचे लोक, शाळा-कॉलेजमधले आपले मित्र किंवा इतर लोकही असू शकतात. आपल्याकडे आमंत्रण पत्रिकेच्या छापील प्रती जरी नसल्या, तरी आपण त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या पत्रिकेची लिंक पाठवू शकतो. कोण जाणे त्यातले किती लोक येतील!​—उप. ११:६.

१४. आपण जेव्हा इतरांना वैयक्‍तिकरीत्या आमंत्रण देतो तेव्हा त्याचे काय परिणाम होऊ शकतात, ते उदाहरण देऊन सांगा.

१४ जेव्हा आपण एखाद्याला स्मारकविधीसाठी वैयक्‍तिकरीत्या आमंत्रण देतो तेव्हा कदाचित त्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहावंसं वाटेल. आपल्या एका बहिणीचा पती सत्यात नाही, पण तो तिला म्हणाला, की तो तिच्यासोबत स्मारकविधीला येणार आहे. हे ऐकून आपल्या बहिणीला खूप आश्‍चर्य वाटलं. कारण बऱ्‍याच वर्षांपासून ती त्याला स्मारकविधीला यायला सांगत होती. पण तो कधीच आला नाही. मग या वेळी असं काय वेगळं झालं होतं? तो म्हणाला, की त्याला एक खास आमंत्रण मिळालंय. मंडळीतल्या एका ओळखीच्या वडिलांनी त्याला हे आमंत्रण दिलं होतं. याचा काय परिणाम झाला? तो त्या वर्षीच्या स्मारकविधीला गेलाच, पण त्यानंतरच्या स्मारकविधींनासुद्धा उपस्थित राहिला.

१५. स्मारकविधीचं आमंत्रण देताना आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे?

१५ लक्षात असू द्या, आपण ज्यांना आमंत्रण दिलंय त्यांच्या मनात भरपूर प्रश्‍न असतील. खासकरून जेव्हा त्यांना आपल्या सभांबद्दल काहीच माहीत नसतं तेव्हा. त्यांच्या मनात कोणते प्रश्‍न असतील याचा अंदाज बांधून त्यांची उत्तरं कशी देता येतील याची चांगली तयारी आपण करू शकतो. (कलस्सै. ४:६) उदाहरणार्थ, ते विचारतील: ‘हा कार्यक्रम नेमका कसा असतो? तो किती वेळ चालतो? यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घालावे लागतात का? तिथे येण्यासाठी फी भरावी लागते का? तिथे देणगी घेतली जाते का?’ वगैरे. एखाद्याला आपण आमंत्रण देतो तेव्हा आपण त्यांना स्वतःहून विचारू शकतो, की त्यांना याबद्दल काही विचारायचं आहे का? आणि मग आपण त्यांना त्या प्रश्‍नांची उत्तरं देऊ शकतो. आपण त्यांना येशूच्या बलिदानाची आठवण ठेवा  आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात?  हे व्हिडिओ दाखवू शकतो. यामुळे त्यांना आपल्या सभा कशा चालवल्या जातात हे समजून घ्यायला मदत होईल. तसंच कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकातल्या २८ व्या धड्यामध्ये जे सुंदर मुद्दे सांगितले आहेत, तेसुद्धा आपण त्यांना सांगू शकतो.

१६. स्मारकविधीला आलेल्या लोकांच्या मनात कदाचित कोणते प्रश्‍न येतील?

१६ स्मारकविधीनंतरसुद्धा आवड दाखवणाऱ्‍या नवीन लोकांना प्रश्‍न असतील. ते कदाचित विचार करतील, ‘द्राक्षारस आणि भाकर मोजक्याच लोकांनी का खाल्ली?’ तसंच, हा विधी आपण वर्षातून एकदाच करतो, याचंही त्यांना आश्‍चर्य वाटेल. ‘यहोवाच्या साक्षीदारांच्या सगळ्या सभा अशाच प्रकारे असतात का?’ असाही प्रश्‍न त्यांच्या मनात येईल. स्मारकविधीच्या भाषणात यांपैकी बऱ्‍याच प्रश्‍नांची उत्तरं दिलेली असली तरी नवीन लोकांना याचं कदाचित आणखी स्पष्टीकरण हवं असेल. jw.org वर “यहोवाचे साक्षीदार प्रभुभोजनाचा विधी चर्चपेक्षा वेगळ्या पद्धतीने का पाळतात?” हा लेख आहे. या लेखामुळे तुम्हाला त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायला मदत होईल. ‘योग्य मनोवृत्तीच्या’ लोकांना स्मारकविधीच्या आमंत्रणाचा फायदा व्हावा, म्हणून आपण स्मारकविधीच्या आधी, त्या दरम्यान आणि त्यानंतरही त्यांना हवी ती मदत करू शकतो.​—प्रे. कार्यं १३:४८.

अक्रियाशील प्रचारकांना मदत करा

१७. अक्रियाशील प्रचारकांना वडील कशी मदत करू शकतात? (यहेज्केल ३४:१२, १६)

१७ स्मारकविधीच्या काळात, वडील अक्रियाशील प्रचारकांना कशी मदत करू शकतात? तुम्हाला त्यांची काळजी आहे हे तुम्ही त्यांना दाखवू शकता. (यहेज्केल ३४:१२, १६ वाचा.) स्मारकविधीच्या आधी जास्तीत जास्त अक्रियाशील प्रचारकांशी संपर्क करा. तुम्हाला शक्य त्या पद्धतीने त्यांना मदत करायची इच्छा आहे आणि तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना सांगा. त्यांना स्मारकविधीचं आमंत्रण द्या. जर ते उपस्थित राहिले तर त्यांचं प्रेमाने स्वागत करा. स्मारकविधीनंतरसुद्धा या प्रिय भाऊबहिणींच्या संपर्कात राहा. आणि यहोवाकडे परत यायला त्यांना लागेल ती मदत पुरवा.​—१ पेत्र २:२५.

१८. अक्रियाशील प्रचारकांना आपण सगळेच कशी मदत करू शकतो? (रोमकर १२:१०)

१८ स्मारकविधीला आलेल्या अक्रियाशील प्रचारकांना मंडळीतले सगळेच मदत करू शकतात. कसं? त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागून. (रोमकर १२:१० वाचा.) लक्षात असू द्या, त्यांना सभेला यायला कदाचित अवघडल्यासारखं वाटत असेल. भाऊबहीण आपल्याबद्दल काय बोलतील याचीही त्यांना कदाचित भीती वाटत असेल. e म्हणून अवघडल्यासारखं वाटेल असे प्रश्‍न त्यांना विचारू नका किंवा त्यांच्या मनाला लागेल असं काहीही बोलू नका. (१ थेस्सलनी. ५:११) ते आपले भाऊबहीणच आहेत, हे विसरू नका. त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा उपासना करायला आपल्याला नक्कीच आनंद होईल!​—स्तो. ११९:१७६; प्रे. कार्यं २०:३५.

१९. येशूच्या मृत्यूची आठवण केल्यामुळे कोणते फायदे होतात?

१९ येशूने आपल्याला दरवर्षी त्याच्या मृत्यूची आठवण करायची आज्ञा दिली. त्यासाठी आपण खरंच खूप आभारी आहोत, कारण त्याचं महत्त्व आपल्याला माहीत आहे. आपण जेव्हा स्मारकविधीला उपस्थित राहतो, तेव्हा आपल्याला आणि इतरांनासुद्धा बऱ्‍याच मार्गांनी फायदा होतो. (यश. ४८:१७, १८) आपलं यहोवा आणि येशूवरचं प्रेम वाढतं. तसंच, त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय, त्याबद्दल आपल्याला किती कदर आहे हे आपण दाखवून देतो. यासोबतच, इतर भाऊबहिणींसोबत असलेलं आपलं नातं आणखी घट्ट होतं. खंडणी बलिदानामुळे इतरांना कसा फायदा होऊ शकतो हे समजून घ्यायला आपण त्यांना मदत करू शकतो. वर्षाच्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवसासाठी म्हणजेच या वर्षीच्या स्मारकविधीसाठी तयार राहायला आपण होता होईल ते करू या!

तुमचं उत्तर काय असेल?

  • आपण स्मारकविधीसाठी आपलं मन कसं तयार करू शकतो?

  • स्मारकविधीचा फायदा करून घेण्यासाठी आपण इतरांना कशी मदत करू शकतो?

  • आपण मंडळीतल्या अक्रियाशील प्रचारकांना कशी मदत करू शकतो?

गीत १८ खंडणीसाठी कृतज्ञ

a jw.org वर दिलेल्या सर्च बॉक्सचा वापर करून तुम्ही या लेखात दिलेले व्हिडिओ आणि लेख शोधू शकता.

b एप्रिल २०२१ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “वाचकांचे प्रश्‍न” हा लेख पाहा.

e चित्रं आणि “ मंडळीतले भाऊबहीण कसे वागले?” ही चौकट पाहा. एक अक्रियाशील भाऊ राज्य सभागृहात यायला कचरत असतो, पण तो हिंमत करून आत येतो. भाऊबहीण त्याचं प्रेमाने स्वागत करतात आणि त्यालाही ते खूप छान वाटतं.

f चित्रांचं वर्णन: जगातल्या एका भागाचे लोक स्मारकविधी पाळत आहेत आणि त्याच वेळी जगाच्या दुसऱ्‍या भागाचे लोक त्या खास विधीची तयारी करत आहेत.