व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्त्रियांबद्दल तुमचा यहोवासारखाच दृष्टिकोन आहे का?

स्त्रियांबद्दल तुमचा यहोवासारखाच दृष्टिकोन आहे का?

विश्‍वासू बहिणींसोबत a मिळून यहोवाची उपासना करायचा आपल्याला एक बहुमान मिळाला आहे. या विश्‍वासू आणि मेहनती बहिणींवर आपलं प्रेम आहे आणि आपल्याला नक्कीच त्यांची कदर आहे. म्हणून भावांनो, बहिणींशी दयेने, आदराने आणि भेदभाव न करता वागायचा प्रयत्न करा. अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला काही वेळा असं करणं कठीण जाऊ शकतं. पण त्यासोबतच इतरही काही कारणं आहेत, ज्यांमुळे भावांना असं करणं कठीण जाऊ शकतं.

काही लोक अशा संस्कृतीत वाढले असतात, ज्यात स्त्रियांना कमी लेखलं जातं. उदाहरणार्थ, बोलिव्हियामध्ये राहणारे हॅन्स नावाचे विभागीय पर्यवेक्षक म्हणतात: “काही जण पुरुष प्रधान संस्कृतीत वाढलेले असतात. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी आहेत हे त्यांच्या मनात कोरलेलं असतं.” ताइवानमध्ये राहणारे शेंगशीॲन नावाचे वडील म्हणतात: “मी जिथे राहतो तिथे बरेच पुरुष असा विचार करतात, की स्त्रियांनी पुरुषांमध्ये बोलू नये. आणि जर एखाद्याने स्त्रीचं मत विचारलं, तर इतर जण त्याला कमी लेखतात.” तसंच काही जण इतर काही मार्गांनी स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी असल्याचं दाखवतात. उदाहरणार्थ, असं करण्यासाठी ते त्यांच्याबद्दल विनोद करून त्यांची थट्टा करतात.

पण एक चांगली गोष्ट अशी आहे, की एखादा पुरुष कोणत्याही संस्कृतीत वाढला असला तरी स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी आहेत असा विचार करायचं तो टाळू शकतो. (इफिस. ४:२२-२४) असं करण्यासाठी तो यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. या लेखात आपण यहोवा स्त्रियांना कसं वागवतो, भाऊ यहोवासारखंच स्त्रियांना कसं वागवू शकतात आणि मंडळीतले वडील बहिणींना आदर दाखवण्याच्या बाबतीत पुढाकार कसा घेऊ शकतात हे पाहणार आहोत.

यहोवा स्त्रियांशी कसं वागतो?

स्त्रियांशी वागण्याच्या बाबतीत यहोवाने सर्वात उत्तम उदाहरण मांडलं आहे. तो एक दयाळू आणि प्रेमळ पिता आहे आणि त्याच्या सगळ्या मुलांवर त्याचं सारखंच प्रेम आहे. (योहा. ३:१६) आणि विश्‍वासू बहिणी त्याच्यासाठी लाडक्या मुलींसारख्या आहेत. यहोवा कोणत्या मार्गांनी स्त्रियांना आदर दाखवतो ते आता आपण पाहू या.

यहोवा त्यांच्या बाबतीत भेदभाव करत नाही.  यहोवाने स्त्री आणि पुरुष दोघांनाही त्याच्या प्रतिरूपात बनवलं आहे. (उत्प. १:२७) त्याने पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त बुद्धिमान किंवा हुशार बनवलं नाही. तसंच तो पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त महत्त्व देत नाही. (२ इति. १९:७) बायबलचं सत्य शिकून घेण्यासाठी आणि त्याच्या सुंदर गुणांचं अनुकरण करण्यासाठी त्याने स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखीच बौद्धिक क्षमता दिली आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही विश्‍वासाला समान महत्त्व देतो. मग त्यांची आशा नंदनवन पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची असो, किंवा स्वर्गात राजे आणि याजक म्हणून सेवा करायची असो. (२ पेत्र १:१, तळटीप.) तर मग स्पष्टच आहे की यहोवा स्त्रियांच्या बाबतीत कोणताही भेदभाव करत नाही.

यहोवा स्त्रियांचं ऐकतो.  स्त्रियांच्या भावना काय आहेत आणि त्यांना कशाची चिंता आहे याची यहोवाला काळजी आहे. उदाहरणार्थ, यहोवाने राहेल आणि हन्‍नाची प्रार्थना ऐकली आणि त्याचं उत्तर दिलं. (उत्प. ३०:२२; १ शमु. १:१०, ११, १९, २०) यहोवाने बायबलच्या लेखकांना अशा काही अहवालांबद्दल लिहायला सांगितलं, ज्यात पुरुषांनी स्त्रियांचं म्हणणं ऐकलं. उदाहरणार्थ, यहोवाने सांगितल्यानुसार अब्राहामने त्याची पत्नी सारा हीचं म्हणणं ऐकलं. (उत्प. २१:१२-१४) दावीद राजाने अबीगईलचं ऐकलं. खरंतर, यहोवानेच तिला त्याच्याशी बोलायला पाठवलं होतं असं त्याला वाटलं. (१ शमु. २५:३२-३५) आपल्या पित्याच्या गुणांचं हुबेहूब अनुकरण करणाऱ्‍या येशूनेही त्याची आई मरीया हीचं ऐकलं. (योहा. २:३-१०) यावरून स्पष्ट होतं की स्त्रियांना आदर दाखवण्याचा यहोवाचा एक मार्ग म्हणजे तो त्यांचं ऐकतो.

यहोवा त्यांच्यावर भरवसा ठेवतो.  उदाहरणार्थ, संपूर्ण पृथ्वीची काळजी घेण्याच्या कामात मदत करण्यासाठी यहोवाने हव्वावर भरवसा असल्याचं दाखवलं. (उत्प. १:२८) आणि त्यावरून त्याने दाखवलं, की तो तिला तिच्या पतीपेक्षा म्हणजे आदामपेक्षा कमी समजत नाही. उलट तो तिला त्याच्यासाठी योग्य अशी सहायक समजतो. यहोवाने दबोरा आणि हुल्दा संदेष्टीवर विश्‍वास ठेवला आणि त्यांना आपल्या लोकांना ज्यात एक राजा आणि शास्तासुद्धा होता, सल्ला देण्यासाठी वापरलं. (शास्ते ४:४-९; २ राजे २२:१४-२०) आजही यहोवा ख्रिस्ती स्त्रियांवर भरवसा ठेवतो आणि त्यांना त्याच्या कामात वापरतो. या विश्‍वासू बहिणी प्रचारक, पायनियर आणि मिशनरी म्हणून सेवा करतात, राज्य सभागृह आणि शाखा कार्यालयांचं डिझाईन, बांधकाम आणि त्याची देखभाल करण्याच्या कामातसुद्धा त्या मदत करतात. तसंच काही बहिणी बेथेलमध्ये आणि भाषांतर कार्यालयात सेवा करतात. या बहिणी यहोवासाठी एका मोठ्या सैन्यासारख्या आहेत. आणि तो आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांना वापरतो. (स्तो. ६८:११) यावरून स्पष्ट होतं, की यहोवा स्त्रियांना कमजोर किंवा कमी समजत नाही.

भाऊ, बहिणींसोबत यहोवासारखंच वागायला कसं शिकू शकतात?

भावांनो, यहोवा स्त्रियांशी जसं वागतो तसंच तुम्ही वागत आहात का, हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारसरणीचं आणि वागण्याचं प्रामाणिकपणे परीक्षण करावं लागेल. असं करण्यासाठी आपल्याला मदतीची गरज आहे. जसं की, वैद्यकीय उपकरणांचा वापर करून एखाद्या व्यक्‍तीच्या हृदयात काय समस्या आहे, हे आपण समजू शकतो. तसंच एक चांगला मित्र आणि देवाचं वचन आपल्या मनात खोलवर कुठेतरी स्त्रियांबद्दल चुकीचे विचार आहेत का, हे समजायला आपल्याला मदत करू शकतं. मग ही मदत मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो?

एका चांगल्या मित्राला विचारा.  (नीति. १८:१७) तुम्ही प्रेमळ आणि समजूतदार अशा एका भरवशालायक मित्राची मदत घेऊ शकता. तुम्ही त्याला विचारू शकता: “मी बहिणींशी कसं वागतो असं तुला वाटतं? मी त्यांना आदर देतोय असं तुला वाटतंय का? त्यांच्याशी आणखी चांगल्याप्रकारे वागण्यासाठी मी आणखी काय करू शकतो?” तुमच्या मित्राने काही गोष्टी सुचवल्या तर लगेच वाईट वाटून घेऊ नका, उलट त्याने सुचवलेल्या गोष्टी लागू करायला तयार असा.

देवाच्या वचनाचा अभ्यास करा.  आपण स्त्रियांना योग्य वागणूक देत आहोत की नाही हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास करून आपल्या मनोवृत्तीचं आणि आपल्या वागण्या-बोलण्याचं परीक्षण करणं. (इब्री ४:१२) बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला अशा काही पुरुषांबद्दल वाचायला मिळेल, ज्यांनी स्त्रियांना चांगली वागणूक दिली आणि ज्यांनी दिली नाही. मग आपण त्यांची तुलना स्वतःशी करू शकतो. तसंच आपण बायबलच्या वचनांची तुलना करून पाहू शकतो. त्यामुळे एकाच वचनाचा संदर्भ घेऊन स्त्रियांबद्दल चुकीचा दृष्टिकोन बाळगायचं आपण टाळू शकतो. जसं की, १ पेत्र ३:७ मध्ये पत्नींविषयी असं म्हटलंय, की त्या “नाजूक भांड्यासारख्या आहेत हे ओळखून त्यांना मान द्या.” b याचा अर्थ असा होता का, की त्यांची बुद्धी आणि क्षमता पुरुषांपेक्षा कमी आहे? मुळीच नाही! पेत्रच्या शब्दांची तुलना आपण गलतीकर ३:२६-२९ सोबत करू शकतो. त्यात असं म्हटलंय, की यहोवाने पुरुषांसोबत स्त्रियांनाही येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी निवडलंय. अशा प्रकारे देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे आणि एखाद्या चांगल्या मित्राला किंवा मैत्रिणीला त्यांचं मत विचारल्यामुळे आपण स्त्रियांना योग्य वागणूक कशी द्यायची हे शिकू शकतो.

मंडळीतले वडील बहिणींना कसा आदर देऊ शकतात?

मंडळीतल्या प्रेमळ वडिलांचं अनुकरण करून भाऊ, बहिणींना आदर द्यायचं शिकू शकतात. मंडळीतले वडील बहिणींना आदर देण्यासाठी कसा पुढाकार घेऊ शकतात याचे काही मार्ग आता आपण पाहू या.

ते बहिणींची प्रशंसा करतात.  पौलने याबाबतीत जे उत्तम उदाहरण मांडलं आहे त्याचं ते अनुकरण करतात. रोममधल्या मंडळीला लिहिलेल्या पत्रात पौलने उघडपणे बऱ्‍याच बहिणींची प्रशंसा केली. (रोम. १६:१२) मंडळीत पौलचं हे पत्र वाचण्यात आलं असेल, तेव्हा या बहिणींना खरंच किती आनंद झाला असेल! त्याचप्रमाणे मंडळीतले वडील बहिणीच्या सुंदर गुणांची आणि यहोवाच्या सेवेत त्या घेत असलेल्या मेहनतीची मनापासून प्रशंसा करतात. यामुळे बहिणींना याची जाणीव होते, की त्यांचा किती आदर केला जातो आणि त्यांची किती कदर केली जाते. यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्यासाठी, या बहिणींना कदाचित अशाच प्रोत्साहनदायक शब्दांची गरज असेल.​—नीति. १५:२३.

प्रशंसा करा

बहिणींची प्रशंसा करताना ती मनापासून आणि एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी करा. का? जेसिका नावाची बहीण म्हणते: “जेव्हा भाऊ ‘खूप छान’ असं म्हणून आमची प्रशंसा करतात, तेव्हा चांगलं वाटतं. पण जेव्हा ते एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी आमची प्रशंसा करतात तेव्हा आणखी छान वाटतं. जसं की, आमची मुलं जेव्हा सभेत शांत बसतात तेव्हा, किंवा एखाद्या बायबल विद्यार्थ्याला सभेला घेऊन येण्यासाठी आम्ही मेहनत घेतो तेव्हा.” वडील एखाद्या विशिष्ट गोष्टींसाठी बहिणींची प्रशंसा करतात, तेव्हा मंडळीत आपलं एक स्थान आहे आणि मंडळीत आपली गरज आहे हे बहिणींना जाणवतं.

ते त्यांचं ऐकतात.  जे वडील नम्र असतात, ते फक्‍त आपल्याकडेच काम करायच्या चांगल्या कल्पना आहेत असा विचार करत नाहीत. असे वडील बहिणींनाही त्यांचं मत विचारतात. आणि त्या जेव्हा बोलतात तेव्हा ते लक्ष देऊन ऐकतात. असं करून वडील बहिणींना प्रोत्साहन देतात आणि त्यांनासुद्धा फायदा होतो. बेथेलमध्ये सेवा करणारा हरार्दो नावाचा एक वडील म्हणतो: “मला असं दिसून आलंय की बहिणींना त्यांचं मत विचारल्यामुळे मला माझं काम आणखी चांगल्याप्रकारे करता आलंय.” अशा प्रकारची कामं करायचा त्यांना भावांपेक्षा जास्त अनुभव असतो. मंडळ्यांमध्येही बहिणी पायनियर म्हणून सेवा करतात आणि त्यामुळे त्यांच्या भागाबद्दल त्यांना जास्त माहिती असते. ब्रायन नावाचे वडील म्हणतात: “बहिणींकडे असे बरेच चांगले गुण आणि कौशल्यं आहेत, ज्यांचा संघटनेला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे आपण त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला पाहिजे.”

ऐका

समंजस वडील बहिणींनी सुचवलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाहीत. का? ॲडवर्ड नावाचे वडील म्हणतात: “एखाद्या बहिणीचं मत आणि तिचा अनुभव विचारात घेतल्यामुळे एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूंनी विचार करायला आणि सहानुभूती दाखवायला मदत होते.” (नीति. १:५) बहिणीने सुचवलेल्या गोष्टी जरी लागू करता येत नसल्या, तरी वडील तिने या गोष्टीचा विचार केला आणि आपलं मत मांडलं याबद्दल तिची प्रशंसा करू शकतात.

ते बहिणींना ट्रेनिंग देतात.  जे वडील पुढचा विचार करतात, ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी बहिणींना ट्रेनिंग देतात. उदाहरणार्थ, बाप्तिस्मा झालेला भाऊ नसल्यावर क्षेत्र सेवेची सभा कशी घ्यायची याचं ट्रेनिंग ते बहिणींना देतात. तसंच, संघटनेच्या बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामांत मदत करता यावी म्हणून ते बहिणींना त्यासाठी लागणारी साधनं आणि मशीन कशा वापरायच्या हेसुद्धा शिकवतात. बेथेलमध्येसुद्धा बहिणींना मेंटेनंस, खरेदी-विक्री, अकाऊंटिंग, कंप्यूटर प्रोग्रामिंग आणि यांसारख्या इतर विभागांमध्ये काम करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. जेव्हा वडील बहिणींना ट्रेनिंग देतात तेव्हा ते दाखवतात की ते वेगवेगळ्या कामांसाठी बहिणींवर भरवसा ठेवतात.

प्रशिक्षण द्या

वडिलांकडून मिळालेल्या ट्रेनिंगचा वापर करून बऱ्‍याच बहिणी इतरांना मदत करतात. उदाहरणार्थ, ज्या बहिणींना बांधकामाचं ट्रेनिंग मिळालंय ते नैसर्गिक विपत्तीनंतर इतरांची घरं बांधायला मदत करतील. काही बहिणी सार्वजनिक साक्षकार्याबद्दल त्यांना जे ट्रेनिंग मिळालंय त्याचा उपयोग इतर बहिणींना ट्रेनिंग देण्यासाठी करतील. जे वडील त्यांना ट्रेनिंग देतात त्यांच्याबद्दल बहिणींना कसं वाटतं? जेनिफर नावाची बहीण म्हणते: “मी जेव्हा एका राज्य सभागृहाच्या बांधकाम प्रकल्पात काम करत होते, तेव्हा एका भावाने मला ट्रेनिंग देण्यासाठी वेळ काढला. मी केलेलं काम पाहून त्यांनी माझी प्रशंसा केली. त्यांनी माझ्यावर भरवसा ठेवला आणि मी हे काम करू शकते याची त्यांना खात्री होती. म्हणून त्यांच्यासोबत काम करायला मला चांगलं वाटलं.”

मंडळीतल्या स्त्रियांशी बहिणींसारखं वागा

यहोवासारखंच आपलंही आपल्या विश्‍वासू बहिणींवर प्रेम आहे! म्हणूनच आपण त्यांना आपल्या कुटुंबाचाच एक भाग मानतो. (१ तीम. ५:१, २) त्यांच्यासोबत मिळून सेवा करणं हा एक बहुमान आहे, असं आपण समजतो आणि त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो. आणि आपण त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांची कदर करतो हे जेव्हा त्यांना जाणवतं तेव्हा ते पाहून आपल्याला आनंद होतो. वेनेस्सा नावाची एक बहीण म्हणते: “मी यहोवाचे खूप आभार मानते की त्याने मला त्याच्या संघटनेचा भाग व्हायची संधी दिली. त्याच्या या संघटनेत असे पुष्कळ भाऊ आहेत ज्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं.” ताइवानमध्ये राहणारी एक बहीण म्हणते: “यहोवा आणि त्याची संघटना स्त्रियांचा खूप आदर करते आणि त्यांच्या भावनांचीही कदर करते, याबद्दल मी त्यांची खरंच खूप आभारी आहे. त्यामुळे माझा विश्‍वास आणखी मजबूत होतो आणि संघटनेचा भाग असण्याचा जो बहुमान मला मिळालाय त्याबद्दल माझी कदर आणखी वाढते.”

जेव्हा यहोवा पाहतो, की विश्‍वासू भाऊ स्त्रियांबद्दल त्याच्यासारखाच दृष्टिकोन ठेवतात आणि त्याच्यासारखंच वागतात, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! (नीति. २७:११) स्कॉटलंडमध्ये वडील म्हणून सेवा करणारा बेंजामीन नावाचा एक भाऊ म्हणतो: “जगात स्त्रियांना खूप कमी लेखलं जातं. म्हणून जेव्हा स्त्रिया राज्य सभागृहात येतात तेव्हा आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि आपण त्यांचा आदर करतो, हे त्यांना जाणवलं पाहिजे.” तेव्हा यहोवाचं अनुकरण करायचा आपण पुरेपूर प्रयत्न करू या आणि आपल्या प्रिय बहिणींना जो आदर मिळाला पाहिजे आणि जे प्रेम मिळालं पाहिजे, ते देऊ या.​—रोम. १२:१०.

a या लेखात “बहिणी” असं जिथं म्हटलं आहे, तिथे एखाद्या व्यक्‍तीच्या बहिणीबद्दल नाही तर ख्रिस्ती बहिणींबद्दल बोलण्यात आलं आहे.

b स्त्रियांना ‘नाजूक भांडं’ असं जे म्हटलंय त्याचा काय अर्थ होतो याबद्दल जास्त माहितीसाठी १ जून २००६ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “‘नाजूक पात्राचे’ मूल्य” आणि १ मार्च २००५ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “विवाहित जोडप्यांकरता सुज्ञ मार्गदर्शन” हा लेख पाहा.