व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ५

गीत २५ एक खास प्रजा

मी तुला कधीच सोडणार नाही!

मी तुला कधीच सोडणार नाही!

[देवाने ] म्हटलं आहे: ‘मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.’”​—इब्री १३:५ख.

या लेखात:

उरलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात घेतलं जाईल तेव्हा पृथ्वीवर असलेल्या यहोवाच्या सेवकांना तो सोडणार नाही याची आपण खातरी का बाळगू शकतो ते पाहा.

१. पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍तांना स्वर्गात कधी घेतलं जाईल?

 काही वर्षांआधी यहोवाच्या लोकांना असा प्रश्‍न होता, की ‘उरलेल्या अभिषिक्‍त जनांना स्वर्गात कधी घेतलं जाईल?’ आधी आपल्याला असं वाटायचं, की कदाचित हर्मगिदोनच्या युद्धानंतर नंदनवन पृथ्वीवर काही अभिषिक्‍त जन थोड्या काळासाठी राहतील. पण १५ जुलै २०१३ च्या टेहळणी बुरूज  अंकात असं सांगितलं होतं, की हर्मगिदोनचं युद्ध सुरू होण्याआधी  पृथ्वीवर उरलेल्या सर्व अभिषिक्‍तांना स्वर्गात घेतलं जाईल.​—मत्त. २४:३१.

२. काही जणांच्या मनात कोणता प्रश्‍न येऊ शकतो? आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत?

पण कदाचित काही जण म्हणतील, ‘मोठ्या संकटादरम्यान’ यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या ख्रिस्ताच्या ‘दुसऱ्‍या मेंढरांचं’ काय होईल? (योहा. १०:१६; मत्त. २४:२१) काहींना याची चिंता वाटू शकते, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात घेतल्यावर आपण कदाचित एकटे पडू. बायबलमधल्या दोन अहवालांमुळे त्यांना कदाचित असं वाटू शकतं. ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आपल्याला चिंता करायची गरज का नाही हेसुद्धा आपण पाहणार आहोत.

काय होणार नाही?

३-४. काही जणांना कदाचित कोणत्या गोष्टीची भीती वाटू शकते आणि का?

कदाचित काहींना अशी चिंता वाटेल, की नियमन मंडळातले अभिषिक्‍त बांधव आपलं मार्गदर्शन करायला नसतील तेव्हा दुसरी मेंढरं सत्यापासून भरकटतील. बायबलमधल्या काही अहवालांमुळे त्यांना कदाचित असं वाटेल. याची दोन उदाहरणं आपण पाहू या. पहिलं उदाहरण महायाजक यहोयादाचं आहे. तो यहोवाचा एक विश्‍वासू सेवक होता. त्याने आणि त्याची पत्नी यहोशबाथने यहोआश लहान असताना त्याला वाचवलं आणि त्याला एक चांगला आणि विश्‍वासू राजा बनण्यासाठी मदत केली. यहोयादा जिवंत होता तोपर्यंत यहोआश चांगला वागला पण त्याचा मृत्यू झाल्यावर तो वाईट मार्गाला लागला. त्याने यहूदाच्या दुष्ट प्रमुखांचं ऐकलं आणि यहोवाला सोडून दिलं.​—२ इति. २४:२, १५-१९.

दुसरं उदाहरण दुसऱ्‍या शतकातल्या ख्रिश्‍चनांचं आहे. येशूच्या प्रेषितांपैकी, योहान हा शेवटचा प्रेषित होता. ख्रिश्‍चनांसमोर त्याचं एक चांगलं उदाहरण होतं आणि त्याने बऱ्‍याच जणांना यहोवाची धीराने आणि विश्‍वासूपणे सेवा करायला मदत केली होती. (३ योहा. ४) येशूच्या इतर प्रेषितांसारखंच योहानलासुद्धा काही काळ ख्रिस्ती मंडळीत पसरणाऱ्‍या धर्मत्यागाविरूद्ध लढावं लागलं होतं. त्याने हा धर्मत्याग जणू “रोखून” धरला होता. (१ योहा. २:१८; २ थेस्सलनी. २:७.) पण योहानचा मृत्यू झाल्यानंतर धर्मत्याग वणव्यासारखा पसरला आणि काही दशकातच ख्रिस्ती मंडळी पूर्णपणे भ्रष्ट झाली.

५. बायबलमधल्या या दोन अहवालांवरून आपण कोणते निष्कर्ष काढू नये?

या दोन अहवालांवरून आपण असं म्हणू शकतो का, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात घेतल्यावर दुसऱ्‍या मेंढरांसोबतही असंच काहीसं होईल? यहोआश जसा त्याला मिळालेल्या प्रशिक्षणापासून भरकटला तसंच विश्‍वासू ख्रिस्तीही त्या वेळी भरकटतील का? किंवा दुसऱ्‍या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणे तेही धर्मत्यागात वाहवत जातील का? मुळीच नाही!  आपण याची खातरी बाळगू शकतो, की अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना स्वर्गात घेतलं गेल्यावर दुसऱ्‍या मेंढरांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल आणि ते आध्यात्मिकरीत्या प्रगती करतील. पण आपण हे इतकं खातरीने का म्हणू शकतो?

शुद्ध उपासना पुन्हा कधीच भ्रष्ट होणार नाही

६. आपण कोणत्या तीन काळांबद्दल थोडक्यात पाहणार आहोत?

शुद्ध उपासना कधीच भ्रष्ट होणार नाही, अगदी पुढे येणाऱ्‍या कठीण काळातसुद्धा. पण असं आपण खातरीने का म्हणू शकतो? बायबलमध्ये आपल्या काळाबद्दल जे सांगितलंय त्यामुळे आपण हे खातरीने म्हणू शकतो. हा काळ प्राचीन इस्राएलच्या काळापेक्षा आणि दुसऱ्‍या शतकातल्या ख्रिश्‍चनांच्या काळापेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे आता आपण या तीन काळांचं बारकाईने परीक्षण करू या: (१) प्राचीन इस्राएलचा काळ, (२) प्रषितांच्या मृत्यूनंतरचा काळ, आणि (३) आपला काळ, जेव्हा ‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील.’​—प्रे. कार्यं ३:२१.

७. राजांनी आणि इतर लोकांनी वाईट मार्ग निवडला तरी विश्‍वासू इस्राएली निराश का झाले नाहीत?

प्राचीन इस्राएलचा काळ.  मोशेच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याने इस्राएली लोकांना म्हटलं: “मला चांगलं माहीत आहे, की मी मेल्यावर तुम्ही नक्की दुष्टपणे वागाल आणि मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या मार्गापासून भरकटाल.” (अनु. ३१:२९) मोशेने त्यांना असाही इशारा दिला, की ते जर यहोवाच्या विरुद्ध गेले तर त्यांना बंदिवासात जावं लागेल. (अनु. २८:३५, ३६) आणि पुढे असंच झालं! पुढे येणाऱ्‍या काही शतकांमध्ये बऱ्‍याच राजांनी वाईट मार्ग निवडला आणि त्यांचं पाहून लोकसुद्धा खोटी उपासना करू लागले. त्यामुळे त्यांना शिक्षा देण्यासाठी आणि इस्राएलच्या राजांचा राज्य करायचा अधिकार कायमचा काढून घेण्यासाठी त्यांनी यहोवाला भाग पाडलं. (यहे. २१:२५-२७) पण देवाचं वचन पूर्ण झालेलं पाहून इस्राएलमधल्या विश्‍वासू लोकांना पुढे धैर्याने त्याची सेवा करत राहायला उत्तेजन मिळालं.​—यश. ५५:१०, ११.

८. दुसऱ्‍या शतकात धर्मत्यागामुळे ख्रिस्ती मंडळी भ्रष्ट झाली याचं आपल्याला आश्‍चर्य वाटलं पाहिजे का? स्पष्ट करा.

प्रेषितांच्या मृत्यूनंतरचा काळ.  दुसऱ्‍या शतकातल्या ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये धर्मत्याग पसरला याचं आपल्याला आश्‍चर्य वाटलं पाहिजे का? मुळीच नाही. येशूने आधीच भविष्यवाणी केली होती, की धर्मत्याग मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. (मत्त. ७:२१-२३; १३:२४-३०, ३६-४३) आणि येशूची ही भविष्यवाणी पूर्ण व्हायला पहिल्या शतकातच सुरुवात झाली होती. पौल, पेत्र आणि योहान या प्रेषितांनीसुद्धा त्याबद्दल लिहिलं. (२ थेस्सलनी. २:३, ७; २ पेत्र २:१; १ योहा. २:१८) दुसऱ्‍या शतकात, धर्मत्यागामुळे ख्रिस्ती मंडळी भ्रष्ट झाली. आणि अशा प्रकारे खोट्या ख्रिस्ती धर्माची सुरुवात झाली आणि खोट्या धर्माचं जागतिक साम्राज्य असलेल्या मोठ्या बाबेलचा हा ख्रिस्ती धर्म प्रमुख भाग बनला. आणि अशा प्रकारे येशूने केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली.

९. आपला काळ प्राचीन इस्राएलच्या काळापेक्षा आणि दुसऱ्‍या शतकातल्या काळापेक्षा कसा वेगळा आहे?

‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील’ तो काळ.  आपला काळ प्राचीन इस्राएलच्या काळापेक्षा आणि दुसऱ्‍या शतकात धर्मत्याग पसरला त्या काळापेक्षा वेगळा आहे. या काळाला आपण काय म्हणतो? या काळाला आपण सहसा या दुष्ट व्यवस्थेचे ‘शेवटचे दिवस’ म्हणतो. (२ तीम. ३:१) पण बायबल सांगतं, की याच वेळी एका खास आणि मोठ्या काळाची सुरुवात झाली. हा काळ मसीहाचं राज्य पृथ्वीला नंदनवन बनवेल आणि संपूर्ण मानवजात परिपूर्ण होईल तोपर्यंत चालू राहील. या काळाला ‘सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या होतील’ तो काळ असं म्हटलंय. (प्रे. कार्यं ३:२१) हा काळ १९१४ ला सुरू झाला. पण मग हा काळ सुरू झाला तेव्हा कोणत्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या झाल्या? येशूला स्वर्गात राजा म्हणून नेमण्यात आलं. त्यामुळे यहोवाकडे आता पुन्हा एकदा त्याच्या वतीने राज्य करणारा दावीदच्या घराण्यातला राजा होता. पण फक्‍त हीच गोष्ट पूर्वीसारखी झाली नाही. त्यानंतर लगेचच शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली. (यश. २:२-४; यहे. ११:१७-२०) मग ती पुन्हा भ्रष्ट होईल का?

१०. (क) बायबल आपल्या काळात होणाऱ्‍या शुद्ध उपासनेबद्दल काय सांगतं? (यशया ५४:१७) (ख) अशा भविष्यवाण्यांमुळे आपल्याला कोणती खातरी मिळते?

१० यशया ५४:१७ वाचा. या भविष्यवाणीचा विचार करा: “तुझ्यावर चालवायला बनवलेलं कोणतंही  हत्यार तुझ्यावर चालणार नाही.”  ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे. तसंच पुढे दिलेले शब्दसुद्धा आपल्या काळात पूर्ण होत आहेत: “तुझी सर्व मुलं यहोवाने शिकवलेली असतील, आणि तुझ्या मुलांना भरपूर शांती मिळेल. नीतिमत्त्वाच्या मजबूत पायावर तुझी स्थापना होईल. . . . तुला कसलीच भीती वाटणार नाही आणि कोणीही तुला घाबरवणार नाही, कारण भीती तुझ्या जवळपासही फिरकणार नाही.” (यश. ५४:१३, १४) इतकंच नाही तर ‘या जगाच्या व्यवस्थेचा देवही’ म्हणजे स्वतः सैतानही यहोवाचे लोक आज चालवत असलेलं शैक्षणिक काम थांबवू शकत नाही. (२ करिंथ. ४:४) शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली आहे आणि ती पुन्हा कधीही भ्रष्ट होणार नाही. ती कायम अशीच चालू राहील. खरंच, आपल्यावर चालवायला बनवलेलं कोणतंही हत्यार आपल्यावर चालणार नाही!

पुढे काय होईल?

११. अभिषिक्‍त जन स्वर्गात गेल्यावर मोठ्या लोकसमुदायाला सोडून दिलं जाणार नाही असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

११ अभिषिक्‍त जणांना स्वर्गात घेतल्यावर काय होईल?  लक्षात असू द्या की येशू आपला मेंढपाळ आहे. आणि तोच ख्रिस्ती मंडळीचं मस्तक आहे. येशूने स्पष्टपणे सांगितलं होतं: “तुमच्यात प्रमुख फक्‍त एकच, म्हणजे ख्रिस्त आहे.” (मत्त. २३:१०) स्वर्गात राज्य करणारा आपला राजा त्याचं काम पूर्ण करायला कधीच अपयशी ठरणार नाही. येशू त्याच्या अनुयायांचं मार्गदर्शन करत असल्यामुळे त्यांना घाबरायची काय गरज? हे खरं आहे, की ख्रिस्त त्या वेळी आपल्या लोकांचं मार्गदर्शन कसं करेल याबद्दल सगळीच माहिती आपल्याला नाही. म्हणून आपला भरवसा वाढवतील अशा बायबलमधल्या काही उदाहरणांवर आपण विचार करू या.

१२. (क) यहोवाने मोशेचा मृत्यू झाल्यावर त्याच्या लोकांची काळजी कशी घेतली? (ख) एलीयाची नेमणूक बदलल्यावर यहोवाने त्याच्या लोकांची काळजी कशी घेतली? (चित्रसुद्धा पाहा.)

१२ इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात जाण्याआधी मोशेचा मृत्यू झाला. मग देवाच्या लोकांचं काय झालं? यहोवाने त्यांना असंच सोडून दिलं का? नाही. जोपर्यंत ते यहोवाला विश्‍वासू होते, तोपर्यंत तो त्यांची काळजी घेत राहिला. मोशेचा मृत्यू होण्याआधी यहोवाने त्याला त्याच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी यहोशवाला नेमायला सांगितलं. मोशे बरीच वर्षं यहोशवाला प्रशिक्षण देत होता. (निर्ग. ३३:११; अनु. ३४:९) त्यासोबतच, त्याने लोकांचं नेतृत्व करण्यासाठी हजार जणांवर, शंभर जणांवर, पन्‍नास जणांवर आणि अगदी दहा जणांवरही काही अनुभवी माणसांना प्रमुख म्हणून नेमलं होतं. (अनु. १:१५) अशा प्रकारे देवाच्या लोकांची चांगली काळजी घेण्यात आली. एलीयाचंसुद्धा असंच उदाहरण आहे. तो बरीच वर्षं इस्राएलमध्ये शुद्ध उपासनेसाठी पुढाकार घेत होता. पण अशी एक वेळ आली जेव्हा यहोवाने त्याची नेमणूक बदलून त्याला यहूदामध्ये दक्षिणेकडे पाठवलं. (२ राजे २:१; २ इति. २१:१२) मग इस्राएलच्या दहा वंशाच्या राज्यातल्या विश्‍वासू लोक एकटे पडले का? नाही. त्यासाठी एलीया बरीच वर्षं अलीशाला प्रशिक्षण देत होता. यासोबतच ‘संदेष्ट्यांच्या पुत्रांनाही’ सुव्यवस्थित पद्धतीने प्रशिक्षण दिलं गेलं. (२ राजे २:७) त्यामुळे देवाच्या लोकांचं नेतृत्व करण्यासाठी तिथे बरेच विश्‍वासू पुरुष होते. अशा प्रकारे देवाचा उद्देश पूर्ण होत गेला आणि त्याने त्याच्या विश्‍वासू उपासकांची काळजी घेतली.

मोशेने (डावीकडे) आणि एलीयाने (उजवीकडे) त्यांच्यानंतर जबाबदारी सांभाळण्यासाठी योग्य व्यक्‍तीला प्रशिक्षण दिलं (परिच्छेद १२ पाहा)


१३. इब्री लोकांना १३:५ख मधून आपल्याला कोणती खातरी मिळते? (चित्रसुद्धा पाहा.)

१३ या दोन्ही उदाहरणांचा विचार केल्यावर तुम्हाला काय वाटतं, उरलेल्या अभिषिक्‍त जणांना स्वर्गात घेतलं गेल्यानंतर काय होईल? आपल्याला याचा विचार करायची गरज नाही. कारण बायबल एक साधंच पण खातरी करून देणारं सत्य सांगतं: यहोवा पृथ्वीवर असलेल्या त्याच्या लोकांना कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.  (इब्री लोकांना १३:५ख वाचा.) मोशे आणि एलीयासारखंच आज आपलं नेतृत्व करणाऱ्‍या अभिषिक्‍तांच्या छोट्या गटाला इतरांना प्रशिक्षण देण्याचं महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत आहे. अनेक दशकांपासून नियमन मंडळाचे सदस्य दुसऱ्‍या मेंढरांमधल्या भावांना पुढाकार घेण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी वडीलांना, विभागीत पर्यवेक्षकांना, शाखा समिती सदस्यांना, बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या पर्यवेक्षकांना आणि इतरांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या प्रशाला आयोजित केल्या आहेत. नियमन मंडळ स्वतः वेगवेगळ्या समित्यांमध्ये सहायक म्हणून सेवा करणाऱ्‍या बांधवांना प्रशिक्षण देत आहेत. हे सहायक जबाबदाऱ्‍यांचं मोठं ओझं अगदी विश्‍वासूपणे पेलत आहेत आणि ख्रिस्ताच्या मेढरांची काळजी घेण्यासाठी चांगल्या प्रकारे तयार आहेत.

नियमन मंडळाने त्यांच्या सहायकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि वडिलांना, विभागीय पर्यवेक्षकांना, शाखा समितीच्या सदस्यांना, बेथेलमध्ये सेवा करणाऱ्‍या पर्यवेक्षकांना आणि जगभरातल्या मिशनऱ्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या प्रशालांचा आयोजन करण्यात खूप मेहनत घेतली आहे (परिच्छेद १३ पाहा)


१४. या चर्चेचा मुख्य मुद्दा काय आहे?

१४ तर आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा हा आहे: मोठ्या संकटाचा शेवट होत असताना जेव्हा उरलेल्या अभिषिक्‍तांना स्वर्गात घेतलं जाईल तेव्हा पृथ्वीवर शुद्ध उपासना आता जशी चालू आहे तशीच चालू राहील. येशू ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली यहोवाचे लोक त्याची विश्‍वासूपणे सेवा करत राहतील. हे खरं आहे, की त्या वेळी मागोगचा गोग म्हणजे राष्ट्रांचा समूह त्यांच्यावर रागाने पेटून हल्ला करेल. (यहे. ३८:१८-२०) पण फक्‍त काही वेळासाठीच असणारा हा हल्ला अपयशी ठरेल. त्यामुळे देवाचे लोक त्याची उपासना करायचं थांबवणार नाहीत आणि तो त्यांना वाचवेल. एका दृष्टान्तात प्रेषित योहानने दुसऱ्‍या मेंढरांचा एक “मोठा लोकसमुदाय” पाहिला. योहानला सांगण्यात आलं की हा “मोठा लोकसमुदाय,” ‘मोठ्या संकटातून बाहेर येईल.’ (प्रकटी. ७:९, १४) यावरून आपण खातरीने म्हणू शकतो, की त्यांना सुरक्षित ठेवलं जाईल!

१५-१६. प्रकटीकरण १७:१४ मध्ये सांगितल्याप्रमाणे हर्मगिदोनच्या युद्धात ख्रिस्ताचे अभिषिक्‍त जन काय करतील आणि ही गोष्ट प्रोत्साहन देणारी का आहे?

१५ पण काही जणांच्या मनात कदाचित असे प्रश्‍न येतील: ‘मग अभिषिक्‍त जणांचं काय? पृथ्वीवरून स्वर्गात गेल्यावर ते काय करतील?’ बायबलमध्ये या प्रश्‍नाचं थेट उत्तर आहे. ते सांगतं, की या जगाच्या राजकीय सत्ता “कोकऱ्‍यासोबत लढतील,” पण साहजिकच त्यांचा पराभव होईल. आपण वाचतो, की “कोकरा त्यांच्यावर विजय मिळवेल.” या कोकऱ्‍याला कोण मदत करेल? वचनात याचं उत्तर दिलंय, की ज्यांना “बोलवण्यात” आणि ‘निवडण्यात’ आलंय, तसंच जे “विश्‍वासू” आहेत ते कोकऱ्‍याला मदत करतील. (प्रकटीकरण १७:१४ वाचा.) हे कोण आहेत? ते पुनरुत्थान झालेले अभिषिक्‍त जन आहेत! तेव्हा मोठ्या संकटाचा शेवट होत असताना, उरलेल्या अभिषिक्‍त जणांना पृथ्वीवरून स्वर्गात घेतलं जाईल, तेव्हा त्यांना सर्वात आधी लढावं लागेल. खरंच ही किती जबरदस्त नेमणूक आहे! यहोवाचे साक्षीदार बनण्याआधी काही अभिषिक्‍त जणांनी लढाईचं काम केलंय. काही जण तर या जगाच्या लष्करी सैन्यात होते. पण नंतर ते खरे ख्रिस्ती बनले. आणि त्यांनी शांतीच्या मार्गावर चालायचं शिकून घेतलं. (गलती. ५:२२; २ थेस्सलनी. ३:१६) त्यांनी आपली सगळी शस्त्रं टाकून दिली. पण जेव्हा ते स्वर्गात जातील आणि ख्रिस्तासोबत आणि पवित्र स्वर्गदूतांसोबत सेवा करतील तेव्हा ते देवाच्या शत्रूंविरुद्ध शेवटची लढाई लढतील.

१६ विचार करा, सध्या पृथ्वीवर काही अभिषिक्‍त जन खूप वयस्कर आहेत. काही जणांची तब्येत तर खूपच नाजूक आहे. पण स्वर्गात जेव्हा त्यांचं पुनरुत्थान होईल तेव्हा ते खूप शक्‍तिशाली आणि अमर असतील. त्यांना विजयी राजा येशू ख्रिस्तासोबत लढण्यासाठी नेमण्यात येईल. आणि हर्मगिदोनचं युद्ध लढल्यानंतर ते मानवजातीला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी मदत करतील. एक अपरिपूर्ण व्यक्‍ती म्हणून ते आज आपल्या प्रिय भाऊबहिणींसाठी जास्त काही करू शकत नाहीत. पण जेव्हा ते स्वर्गात जातील तेव्हा ते त्यांच्यासाठी बरंच काही करू शकतील, यात शंका नाही!

१७. हर्मगिदोनच्या युद्धादरम्यान देवाचे सगळे विश्‍वासू सेवक सुरक्षित असतील असं आपल्याला का म्हणता येईल?

१७ तुम्ही दुसऱ्‍या मेढरांपैकी एक आहात का? जर असाल तर हर्मगिदोनचं युद्ध सुरू होईल तेव्हा तुम्हाला  काय करायची गरज असेल? फक्‍त यहोवावर भरवसा ठेवून तुम्हाला त्याच्या मार्गदर्शनाचं पालन करावं लागेल. यात काय सामील आहे याबद्दल बायबल म्हणतं: “आपापल्या आतल्या खोल्यांमध्ये जा, दारं लावून घ्या. देवाचा क्रोध शांत होईपर्यंत थोडा वेळ लपून राहा.” (यश. २६:२०) त्या वेळी यहोवाचे सगळे विश्‍वासू सेवक सुरक्षित असतील, मग ते स्वर्गात असोत किंवा पृथ्वीवर. पौलसारखंच आपल्यालाही याची खातरी आहे, की ‘कोणतंही सरकार, सध्याच्या गोष्टी, भविष्यातल्या गोष्टी  . . . आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळं करू शकणार नाहीत.’ (रोम. ८:३८, ३९) नेहमी लक्षात ठेवा: यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तो तुम्हाला कधीच  टाकून देणार नाही!

पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त जणांना जेव्हा स्वर्गात घेतलं जाईल तेव्हा . . .

  • काय होणार नाही?

  • शुद्ध उपासना भ्रष्ट होणार नाही याची आपण खातरी का बाळगू शकतो?

  • यहोवा त्याच्या लोकांची काळजी घेईल याची आपण खातरी का बाळगू शकतो?

गीत ८ यहोवा आमचा गड