व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ६

गीत १० यहोवाचा जयजयकार करा!

“यहोवाच्या नावाचं गुणगान करा”

“यहोवाच्या नावाचं गुणगान करा”

“यहोवाच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा, यहोवाच्या नावाचं गुणगान करा.”​—स्तो. ११३:१.

या लेखात:

संधी मिळते तेव्हा यहोवाच्या पवित्र नावाची स्तुती करण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला प्रेरणा मिळते हे जाणून घ्या.

१-२. यहोवाच्या नावावर कलंक लावण्यात आला तेव्हा त्याला कसं वाटलं असेल हे आपण कसं समजून घेऊ शकतो?

 कल्पना करा, की तुमच्या जवळची एक व्यक्‍ती तुमच्याबद्दल काहीतरी खूप वाईट बोलते. तुम्हाला माहीत आहे, की ते खोटं आहे. पण काही जण त्या गोष्टीवर विश्‍वास ठेवतात. इतकंच नाही, तर ते इतरांनासुद्धा त्या गोष्टीबद्दल सांगत सुटतात. आणि ते लोकही त्यावर विश्‍वास ठेवतात. अशा वेळी तुम्हाला कसं वाटेल? तुम्हाला जर लोकांची आणि तुमचं नाव खराब होईल या गोष्टीची काळजी असेल तर या बदनामीमुळे तुम्हाला खूप वाईट वाटेल. नाही का?​—नीति. २२:१.

या उदाहरणातून यहोवाच्या नावाला कलंक लावण्यात आला तेव्हा त्याला कसं वाटलं असेल हे आपण समजू शकतो. स्वर्गात राहणाऱ्‍या त्याच्या एका मुलाने पहिल्या स्त्रीला म्हणजे हव्वाला त्याच्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. आणि तिने त्यावर विश्‍वास ठेवला. या खोट्या गोष्टीमुळे आपल्या पहिल्या पालकांनी यहोवाविरुद्ध बंड केलं. आणि याचा परिणाम म्हणजे संपूर्ण मानवी कुटुंबांमध्ये पाप आणि मृत्यू पसरला. (उत्प. ३:१-६; रोम. ५:१२) आज जगात ज्या काही समस्या आपण पाहतो, म्हणजे मृत्यू, युद्ध, गरीबी या सगळ्या गोष्टी एदेन बागेत पसरवलेल्या त्याच खोट्या गोष्टीचा परिणाम आहेत. यहोवाची अशी बदनामी केल्यामुळे आणि त्याचा जो परिणाम झालाय, त्यामुळे त्याला वाईट वाटतंय का? हो नक्कीच! तरीसुद्धा, त्याचं मन त्यामुळे कटू झालेलं नाही किंवा तो मनात राग बाळगून नाही. उलट बायबल म्हणतं, की तो ‘आनंदी देव’ आहे.​—१ तीम. १:११.

३. आज आपल्याजवळ कोणता बहुमान आहे?

एक छोटीशी आज्ञा पाळून यहोवाचं नाव पवित्र करण्याच्या कामात सहभाग घेण्याचा बहुमान आज आपल्याजवळ आहे. ती आज्ञा आहे: “यहोवाच्या नावाचं गुणगान करा.” (स्तो. ११३:१) आपण यहोवाबद्दल इतरांना सत्य सांगून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू शकतो. मग तुम्ही या कामात सहभाग घ्याल का? आपल्या देवाची मनापासून स्तुती करण्यासाठी कोणत्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात, ते आता आपण पाहू या.

आपण यहोवाच्या नावाची स्तुती करतो तेव्हा त्याला आनंद होतो

४. आपण यहोवाची स्तुती करतो तेव्हा त्याला आनंद का होतो? स्पष्ट करा. (चित्रसुद्धा पाहा.)

जेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या नावाची स्तुती करतो तेव्हा त्याला आनंद होतो. (स्तो. ११९:१०८) मग याचा अर्थ आपल्या सर्वसमर्थ देवाला अपरिपूर्ण मानवांसारखं प्रशंसेची गरज आहे, असा होतो का? नक्कीच नाही. एक उदाहरण घ्या. एक लहान मुलगी आपल्या इवल्याशा हातांनी आपल्या पप्पांना मिठ्ठी मारते आणि म्हणते, “तुम्ही सगळ्यात बेस्ट पप्पा आहात!” आपल्या मुलीने अचानक बोललेल्या या गोष्टीमुळे तिच्या वडिलांना खूप कौतुक वाटतं आणि त्यांना खूप आनंद होतो. का? कारण आपल्या लहान मुलीच्या स्तुतीची त्यांना गरज होती, त्यासाठी ते तिच्यावर अवलंबून होते म्हणून? नाही. उलट, तिच्या वडिलांचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आपल्या मुलीचंही आपल्यावर प्रेम आहे, हे पाहून त्यांना खूप आनंद होतो. त्यांना माहीत आहे, की पुढे हीच गोष्ट तिच्या आनंदात भर घालेल. त्याचप्रमाणे आपण जेव्हा आपल्या महान पित्याची स्तुती करतो, तेव्हा त्यालाही आनंद होतो!

आपलं मूल आपल्यावर प्रेम करतंय आणि कदर दाखवतंय हे पाहून जसा एक पिता खूश होतो, तसंच आपण यहोवाच्या नावाची स्तुती करतो तेव्हा त्याला आनंद होतो (परिच्छेद ४ पाहा)


५. देवाच्या नावाची स्तुती करून आपण कोणती गोष्ट खोटी असल्याचं सिद्ध करू शकतो?

जेव्हा आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याची स्तुती करतो, तेव्हा सैतानाने केलेला आणखी एक दावा खोटा असल्याचं आपण दाखवून देत असतो. सैतानाने असा दावा केला, की कोणताही माणूस यहोवाच्या नावासाठी विश्‍वासूपणे त्याची बाजू घेऊ शकत नाही. कारण त्याच्या मते इतकी एकनिष्ठा आपण दाखवू शकणार नाही. त्याचं असं म्हणणं होतं, की जर यहोवाची आज्ञा न मानण्यातच आपलं भलं आहे, असं जर आपल्याला वाटलं तर आपण त्याची सेवा करायचं सोडून देऊ. (ईयो. १:९-११; २:४) पण यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करणाऱ्‍या ईयोबने सैतान खोटा असल्याचं सिद्ध केलं. मग तुमच्याबद्दल काय? आज आपल्या प्रत्येकाकडे विश्‍वासूपणे त्याची बाजू घ्यायचा आणि एकनिष्ठपणे त्याची सेवा करून त्याचं मन आनंदित करायचा बहुमान आहे. (नीति. २७:११) हा खरंच आपल्यासाठी एक सन्मान आहे!

६. आपण दावीद राजासारखं आणि लेव्यांसारखं कसं वागू शकतो? (नहेम्या ९:५)

यहोवासाठी असलेलं प्रेम विश्‍वासू लोकांना मनापासून त्याच्या नावाची स्तुती करायला प्रवृत्त करतं. दावीद राजाने असं लिहिलं: “माझ्या जिवा, यहोवाची स्तुती कर! मी अगदी अंतःकरणापासून त्याच्या पवित्र नावाची स्तुती करीन.” (स्तो. १०३:१) दावीदला हे माहीत होतं, की यहोवाच्या नावाची स्तुती करणं म्हणजेच यहोवाची स्तुती करणं. त्यामुळे जेव्हा आपण यहोवाचं नाव ऐकतो, तेव्हा आपण आपोआपच तो कशा प्रकारची व्यक्‍ती आहे, त्याचे सुंदर गुण कोणते आहेत आणि त्याने केलेल्या अद्‌भुत गोष्टी कोणत्या आहेत यांवर विचार करतो. देवाच्या नावाला आपण पवित्र मानावं आणि त्याची स्तुती करावी अशी दावीदची इच्छा होती. आणि हे सगळं त्याला “अगदी अंतःकरणापासून” करायचं होतं. त्याचप्रमाणे लेवी म्हणून सेवा करणाऱ्‍या लोकांनीसुद्धा यहोवाची स्तुती करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी नम्रपणे कबूल केलं, की आपण यहोवाच्या नावाचा कितीही महिमा आणि स्तुती केली तरी त्याच्या पवित्र नावासाठी ती कमीच आहे. (नहेम्या ९:५ वाचा.) यात काहीच शंका नाही, की अशा प्रकारे नम्रपणे आणि मनापासून यहोवाची स्तुती केल्यामुळे यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल.

७. आपण प्रचारकार्यात आणि आपल्या दररोजच्या जीवनात यहोवाची स्तुती कशी करू शकतो?

आजही इतरांशी बोलताना यहोवाबद्दलची कदर आणि त्याच्याबद्दलचं प्रेम आपल्या बोलण्यातून दिसून येतं तेव्हा यहोवाला आनंद होतो. प्रचारकार्यात आपण हे नेहमी लक्षात ठेवतो, की आपला उद्देश लोकांना यहोवाच्या जवळ आणणं आणि आपल्याला आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल जसं वाटतं तसंच त्यांनाही वाटावं म्हणून त्यांची मदत करणं हा आहे. (याको. ४:८) बायबल यहोवाचं कसं वर्णन करतं, त्याच्या प्रेमाबद्दल, न्यायाबद्दल, बुद्धीबद्दल, शक्‍तीबद्दल आणि इतर चांगल्या गुणांबद्दल ते काय सांगतं हे लोकांना दाखवायला आपल्याला आनंद होतो. तसंच, आपण होता होईल तितकं त्याचं अनुकरण करून त्याची स्तुती करतो आणि त्याचं मन आनंदित करतो. (इफिस. ५:१) असं केल्यामुळे आपण या दुष्ट जगापेक्षा वेगळे असल्याचं दिसून येतं. लोकांच्याही ते लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्या मनात कदाचित असा प्रश्‍न येईल की आपण असे का आहोत. (मत्त. ५:१४-१६) आपण जेव्हा आपल्या दररोजच्या जीवनात त्यांच्याशी बोलतो तेव्हा आपण याचं कारण त्यांना सांगू शकतो. त्यामुळे प्रामाणिक मनाचे लोक यहोवाकडे आकर्षित होतील. अशा प्रकारे आपण जेव्हा यहोवाची स्तुती करतो तेव्हा त्याच्या मनाला आनंद होतो.​—१ तीम. २:३, ४.

आपण जेव्हा यहोवाच्या नावाची स्तुती करतो तेव्हा येशूला आनंद होतो

८. यहोवाच्या नावाची स्तुती करण्यात येशूचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे असं का म्हणता येईल?

स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेल्या सगळ्या बुद्धिमान प्राण्यांमध्ये यहोवाला येशूपेक्षा कोणीच जास्त चांगल्या प्रकारे ओळखत नाही. (मत्त. ११:२७) येशूचं त्याच्या पित्यावर प्रेम आहे आणि त्याने नेहमी त्याच्या पित्याच्या नावाची स्तुती करण्यात एक चांगलं उदाहरण मांडलं. (योहा. १४:३१) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री आपल्या पित्याला प्रार्थना करताना, त्याने पृथ्वीवर केलेल्या कामाबद्दल असं म्हटलं: “मी त्यांना तुझं नाव प्रकट केलंय.” (योहा. १७:२६) त्याने जे म्हटलं त्याचा काय अर्थ होता?

९. आपला पिता कसा आहे हे येशूने उदाहरण देऊन आणखी स्पष्ट कसं केलं?

येशूने लोकांना फक्‍त देवाचं नाव सांगितलं नाही. कारण यहुद्यांना देवाचं नाव यहोवा आहे हे आधीपासूनच माहीत होतं. येशूने त्यांना आपल्या “पित्याला प्रकट” करण्यातसुद्धा चांगलं उदाहरण मांडलं. (योहा. १:१७, १८) उदाहरणार्थ, हिब्रू शास्त्रवचनांत यहोवा दयाळू आणि करुणामय असल्याचं म्हटलंय. (निर्ग. ३४:५-७) येशूने एका पित्याचं आणि त्याच्या हरवलेल्या मुलाचं उदाहरण देऊन हे सत्य आणखी स्पष्ट केलं. या उदाहरणातला पिता जेव्हा आपल्या पश्‍चात्तापी मुलाला “दूर असतानाच” पाहतो तेव्हा तो त्याच्याकडे धावत जातो, त्याला मिठी मारतो आणि त्याला मनापासून क्षमा करतो. यहोवा किती दयाळू आणि कनवाळू आहे याचं चित्र या उदाहरणामुळे आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. (लूक १५:११-३२) येशूने आपला पिता जसा आहे अगदी तसंच त्याला प्रकट केलं.

१०. (क) येशूने आपल्या पित्याचं नाव वापरलं आणि इतरांनीही तसंच करावं अशी त्याची इच्छा होती हे आपण कशावरून म्हणू शकतो? (मार्क ५:१९) (चित्रसुद्धा पाहा.) (ख) आज आपण काय करावं अशी येशूची इच्छा आहे?

१० इतरांनीसुद्धा आपल्या पित्याचं नाव वापरावं अशी येशूची इच्छा होती. येशूच्या काळातल्या काही धार्मिक पुढाऱ्‍यांचं असं मत होतं, की देवाचं नाव इतकं पवित्र आहे की आपण ते उच्चारू नये. पण येशूने अशा अशास्त्रीय गोष्टींना आपल्या पित्याच्या नावाचा आदर करण्याच्या आड येऊ दिलं नाही. तसंच गरसेकरांच्या प्रदेशात त्याने दुष्ट स्वर्गदूतांच्या प्रभावाखाली असलेल्या एका माणसाला बरं केलं तेव्हा काय झालं याचा विचार करा. तिथल्या लोकांनी घाबरून येशूला तो प्रदेश सोडून जायला सांगितलं आणि तोसुद्धा त्या प्रदेशातून निघून गेला. (मार्क ५:१६, १७) पण, तिथल्या लोकांना देवाचं नाव कळावं अशी येशूची इच्छा होती. म्हणून त्याने बरं केलेल्या त्या व्यक्‍तीला अशी आज्ञा दिली, की त्याने आपण नाही तर यहोवाने  त्याच्यासाठी काय केलंय हे लोकांना सांगावं. (मार्क ५:१९ वाचा.) a आजसुद्धा आपण त्याच्या पित्याचं नाव जगाला प्रकट करावं अशी त्याची इच्छा आहे. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) जेव्हा आपण असं करतो, तेव्हा आपण आपला राजा येशूचं मन आनंदित करत असतो.

यहोवाने आपल्याला कशी मदत केली हे दुष्ट स्वर्गदूतांनी पछाडलेल्या माणसाने लोकांना सांगावं असं येशू त्याला सांगत आहे (परिच्छेद १० पाहा)


११. येशूने आपल्या शिष्यांना कशाबद्दल प्रार्थना करायला सांगितली आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे? (यहेज्केल ३६:२३)

११ आपल्या नावाला पवित्र करणं आणि आपल्यावर लागलेले सगळे आरोप मिटवणं हा यहोवाचा उद्देश आहे हे येशूला माहीत होतं. म्हणूनच त्याने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करायला शिकवलं: “हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.” (मत्त. ६:९) यहोवाच्या संपूर्ण सृष्टीला तोंड द्यावा लागणारा हा सगळ्यात मोठा वादविषय आहे हे येशूला माहीत होतं. (यहेज्केल ३६:२३ वाचा.) यहोवाचं नाव पवित्र करण्यासाठी येशूने जितकं केलं तितकं या विश्‍वातल्या दुसऱ्‍या कोणत्याच व्यक्‍तीने केलं नाही. तरीसुद्धा येशूला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर कोणता आरोप लावला? यहोवाच्या नावाची निंदा करण्याचा! आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या पवित्र नावाची बदनामी करणं किंवा त्याची निंदा करणं हे सर्वात मोठं पाप आहे याची येशूला जाणीव होती. त्यामुळे जेव्हा त्याच्यावर अशा प्रकारचा आरोप लावण्यात आला आणि त्याला दोषी ठरवण्यात आलं तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. कदाचित हेसुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं, ज्यामुळे त्याला अटक व्हायच्या काही काळाआधी ‘त्याच्या मनाला यातना’ होत होत्या.​—लूक २२:४१-४४.

१२. येशूने आपल्या पित्याचं नाव कसं पवित्र केलं?

१२ आपल्या पित्याचं नाव पवित्र करण्यासाठी येशूने प्रत्येक प्रकारचा छळ, अपमान आणि बदनामी सहन केली. पण अशा कुठल्याच गोष्टीची त्याला लाज वाटली नाही कारण आपण प्रत्येक बाबतीत आपल्या पित्याची आज्ञा पाळली हे त्याला माहीत होतं. (इब्री १२:२) तसंच, त्या कठीण काळात सैतान थेट आपल्यावर हल्ला करत आहे ही गोष्टसुद्धा येशूला माहीत होती. (लूक २२:२-४; २३:३३, ३४) आपण येशूला यहोवाविरुद्ध जायला भाग पाडू याची सैतानाला पूर्ण खातरी होती. पण याबाबतीत तो पूर्णपणे अपयशी ठरला! येशूने शेवटी हे दाखवून दिलं, की सैतान अतिशय क्रूर आणि खोटा आहे. तसंच, अगदी वाईट परिस्थितीतून जात असताना यहोवाचे विश्‍वासू सेवक त्याला एकनिष्ठ राहू शकतात हेसुद्धा येशूने सिद्ध केलं.

१३. तुम्ही तुमच्या वैभवी राजाला कसं खूश करू शकता?

१३ तुमच्या वैभवी राजाला तुम्हाला खूश करायचं आहे का? तर मग यहोवाच्या नावाची स्तुती करत राहा आणि इतरांना त्याच्या सुंदर गुणांबद्दल शिकून घ्यायला मदत करा. असं केल्यामुळे तुम्ही येशूचं अनुकरण कराल. (१ पेत्र २:२१) तसंच, येशूप्रमाणे तुम्ही यहोवाचं मन आनंदित कराल आणि देवाचा विरोध करणाऱ्‍या सैतानाला खोटं ठरवाल.

आपण यहोवाच्या नावाची स्तुती करतो तेव्हा लोकांचा जीव वाचतो

१४-१५. आपण लोकांना यहोवाबद्दल शिकवतो तेव्हा त्याचे कोणते परिणाम पाहायला मिळतात?

१४ आपण यहोवाच्या नावाची स्तुती करतो तेव्हा लोकांचा जीव वाचवत असतो. कसं? सैतानाने या जगातल्या ‘विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मनं आंधळी केली आहेत.’ (२ करिंथ. ४:४) त्यामुळे सैतानाने पसरवलेल्या खोट्या गोष्टींवर ते विश्‍वास ठेवतात. जसं की, देव अस्तित्त्वात नाही, देव आपल्यापासून खूप दूर आहे आणि त्याला माणसांची काळजी नाही, तो कठोर आहे आणि ज्यांनी चुका केल्या आहेत त्यांचा तो अनंतकाळ छळ करतो. अशा सगळ्या खोट्या गोष्टींच्या मागे एकच उद्देश आहे. तो म्हणजे, यहोवाच्या नावावर कलंक लावणं आणि त्याच्या नावाची बदनामी करणं. त्यामुळे लोकांना देवाच्या जवळ जाण्याची इच्छा राहणार नाही असं त्याला वाटतं. पण आपल्या कामामुळे सैतानाचा हा उद्देश फसतो. कारण आपण लोकांना आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दलचं सत्य सांगतो आणि त्याच्या पवित्र नावाची स्तुती करतो. याचा काय परिणाम होतो?

१५ देवाच्या वचनात असलेल्या सत्यांमध्ये जबरदस्त ताकद आहे. जेव्हा आपण यहोवाबद्दल आणि तो नेमका कसा आहे याबद्दल लोकांना सांगतो, तेव्हा त्याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतात. सैतानाच्या खोट्या गोष्टींमुळे लोकांच्या डोळ्यांवर असलेली पट्टी हळूहळू गळू लागते. आणि ते आपल्याप्रमाणेच आपल्या पित्याचे सुंदर गुण पाहू लागतात. त्याच्या अमर्याद ताकदीमुळे ते थक्क होऊन जातात. (यश. ४०:२६) त्याच्या परिपूर्ण न्यायावर ते भरवसा ठेवू लागतात. (अनु. ३२:४) त्याच्या असीम बुद्धीमुळे त्यांचे डोळे उघडतात. (यश. ५५:९; रोम. ११:३३) आणि तो प्रेमाचं स्वरूप आहे हे समजल्यामुळे त्यांना दिलासा मिळतो. (१ योहा. ४:८) ते जसजसं यहोवाच्या जवळ जाऊ लागतात तसतसं त्याची मुलं या नात्याने अनंतकाळ जगण्याची त्यांची आशा आणखी मजबूत होते. खरंच लोकांना आपल्या स्वर्गातल्या पित्याजवळ आणण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळालाय! शिवाय, आपण जेव्हा या कामात सहभाग घेतो तेव्हा यहोवा आपल्याला त्याचे “सहकारी” मानतो.​—१ करिंथ. ३:५,.

१६. देवाचं नाव कळल्यावर काही जणावंर काय परिणाम झाला? उदाहरणं द्या.

१६ सुरुवातीला आपण लोकांना फक्‍त देवाचं नाव यहोवा आहे असं शिकवतो. पण तेवढंच जाणून घेतल्यामुळे एका प्रामाणिक व्यक्‍तीच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. आलिया b नावाच्या एका तरुण मुलीचं उदाहरण घ्या. ती एका वेगळ्या धार्मिक संस्कृतीत वाढली होती. पण तिला तिच्या धर्मात आवड नव्हती आणि तिला देव आपल्यापासून खूप दूर आहे असं वाटायचं. नंतर साक्षीदारांसोबत अभ्यास केल्यामुळे तिचे विचार बदलले. आता तिला देव मित्रासारखा वाटू लागला. बऱ्‍याच बायबलमधून देवाचं नाव काढून त्या जागी ‘प्रभू’ यासारख्या पदव्या वापरल्या आहेत याचं तिला खूप आश्‍चर्य वाटलं. देवाचं नाव जाणून घेतल्यामुळे तिच्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळालं. ती खूप आनंदाने सांगते: “माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राला एक नावसुद्धा आहे! देवाचं नाव जाणून घेतल्यामुळे मला खूप समाधान मिळालंय. हा माझ्यासाठी एक मोठा बहुमानच आहे.” स्टिव्ह नावाचा एक संगीतकार एका कट्टर यहुदी कुटुंबातून होता. धर्मात चाललेला ढोंगीपणा पाहून त्याने धर्मापासून दूर राहायचं ठरवलं. पण त्याच्या आईचा मृत्यू झाला, तेव्हा साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायला तो तयार झाला. आणि त्याला जेव्हा देवाचं नाव कळलं तेव्हा त्याच्यावर खूप जबरदस्त परिणाम झाला. तो म्हणतो: “मला कधीच देवाचं नाव माहीत नव्हतं. देव एक खरीखुरी व्यक्‍ती आहे हे मला पहिल्यांदाच कळलं. आता मी त्याला एक व्यक्‍ती म्हणून पाहू शकतो. त्यामुळे मला एक मित्र आहे या गोष्टीची जाणीव झाली.”

१७. तुम्ही यहोवाच्या नावाची स्तुती करत राहायचा निश्‍चय का केलाय? (चित्रसुद्धा पाहा.)

१७ प्रचारकार्यात आणि इतरांना शिकवताना तुम्ही देवाचं पवित्र नाव यहोवा आहे हे लोकांना सांगता का? आपला देव नेमका कसा आहे हे समजून घ्यायला तुम्ही त्यांना मदत करता का? असं करून तुम्ही देवाच्या नावाची स्तुती करत असता. यहोवा या नावामागे कशा प्रकारची व्यक्‍ती आहे हे लोकांना समजून घ्यायला मदत करत असताना तुम्ही असंच यहोवाच्या नावाची स्तुती करत राहा. म्हणजे त्यामुळे लोकांचा जीव वाचेल. आणि तुमचा राजा, येशू ख्रिस्ताचं तुम्हाला अनुकरण करता येईल. याहून महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या प्रेमळ पित्याचं मन आनंदित कराल. तुम्ही “सदासर्वकाळ [त्याच्या] नावाचं गुणगान” कराल हीच आमची प्रार्थना.​—स्तो. १४५:२.

लोकांना यहोवाबद्दल आणि तो कसा आहे याबद्दल शिकवून आपण यहोवाच्या नावाची स्तुती करत असतो (परिच्छेद १७ पाहा)

देवाच्या नावाची स्तुती केल्यामुळे . . .

  • यहोवाला कसा आनंद होतो?

  • येशू ख्रिस्ताला कसा आनंद होतो?

  • लोकांचे जीव कसे वाचतात?

गीत २ देवाचं अतुल्य नाव!

a पुराव्यावरून स्पष्टपणे दिसतं की मार्कने मूळ लिखाणामध्ये या अहवालात देवाचं नाव वापरलं होतं. त्यामुळे पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  यात देवाचं नाव ठेवण्यात आलंय. या वचनावर हिंदीमध्ये असलेली ‘अध्ययन नोट’ पाहा.

b काही नावं बदलण्यात आली आहेत.