व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ७

गीत ५२ ख्रिस्ती समर्पण

नाझीरांकडून शिकायला मिळणारे धडे

नाझीरांकडून शिकायला मिळणारे धडे

“नाझीर असण्याच्या त्याच्या संपूर्ण काळात तो यहोवासाठी पवित्र आहे.”​—गण. ६:८.

या लेखात:

आत्मत्यागी वृत्तीने आणि धैर्याने यहोवाची सेवा करत राहायला नाझीरांच्या उदाहरणामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते ते पाहा.

१. प्राचीन काळापासून यहोवाच्या सेवकांनी कोणती चांगली मनोवृत्ती दाखवली आहे?

 यात काहीच शंका नाही, की यहोवासोबतचं तुमचं नातं तुमच्यासाठी खूप अनमोल आहे. आणि असा विचार करणारे तुम्ही एकटेच नाही. प्राचीन काळापासून असे बरेच लोक आहेत ज्यांना तुमच्यासारखंच वाटतं. (स्तो. १०४:३३, ३४) यहोवाची उपासना करण्यासाठी त्यांनी बरेच त्याग केले. प्राचीन इस्राएलमध्ये नाझीर म्हणून सेवा करणाऱ्‍यांचीसुद्धा अशीच वृत्ती होती. ते कोण होते आणि त्यांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

२. (क) नाझीर कोण होते? (गणना ६:१, २) (ख) काही इस्राएली नाझीर म्हणून सेवा करायचा नवस का करायचे?

ज्या हिब्रू शब्दाचं भाषांतर “नाझीर” असं करण्यात आलंय, त्याचा अर्थ “निवडलेला,” “समर्पित केलेला” किंवा “वेगळा केलेला” असा होतो. यहोवाची एका खास पद्धतीने सेवा करण्यासाठी जे इस्राएली लोक आवेशाने काही विशिष्ट त्याग करायचे त्यांच्यासाठी हा शब्द अगदी योग्य होता. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे एखादा पुरुष किंवा स्त्री यहोवाला खास नवस करून काही काळासाठी नाझीर म्हणून सेवा करू शकत होती. a (गणना ६:१, २ वाचा.) यहोवाला हा नवस केल्यामुळे किंवा वचन दिल्यामुळे त्यांना अशा काही गोष्टी कराव्या लागायच्या ज्या इतर इस्राएली लोकांना करायची गरज नव्हती. पण मग, एक इस्राएली व्यक्‍ती नाझीर व्हायचा नवस का करायची? कदाचित यहोवावर असलेल्या प्रेमामुळे प्रवृत्त होऊन आणि त्याच्या अनमोल आशीर्वादांची मनापासून कदर असल्यामुळे एखादी इस्राएली व्यक्‍ती असं करत असावी.​—अनु. ६:५; १६:१७.

३. आज देवाचे लोक नाझीरांसारखेच आहेत असं का म्हणता येईल?

मोशेच्या नियमशास्त्राची जागा ‘ख्रिस्ताच्या नियमाने’ घेतली तेव्हा नाझीर म्हणून सेवा करण्याची व्यवस्था बंद झाली. (गलती. ६:२; रोम. १०:४) पण नाझीर लोकांप्रमाणेच यहोवाचे लोक आजसुद्धा पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्‍तीने त्याची सेवा करायची इच्छा असल्याचं दाखवत आहेत. (मार्क १२:३०) आपण जेव्हा आपलं जीवन यहोवाला समर्पित करतो तेव्हा आपण स्वतःहून एक नवस करत असतो. आणि हा नवस पूर्ण करण्यात यहोवाच्या इच्छेप्रमाणे जगणं आणि बरेच त्याग करणं सामील आहे. नाझीर म्हणून सेवा करणारे त्यांचा नवस कसा पूर्ण करायचे याचं परीक्षण करून आपण आपला नवस कसा पूर्ण करू शकतो याबद्दलचे मौल्यवान धडे आपल्याला शिकता येतील. b (मत्त. १६:२४) चला तर मग आपण याबद्दल थोडी माहिती घेऊ.

आत्मत्यागी वृत्ती दाखवा

४. गणना ६:३, ४ प्रमाणे नाझीर म्हणून सेवा करणाऱ्‍यांचा त्याग कसा दिसून यायचा?

गणना ६:३, ४ वाचा. नाझीरांना सर्व प्रकारचं मद्य आणि दाक्षवेलावर उगवणारी कोणतीही गोष्ट, जसं की द्राक्षं आणि मनुके खायचे नव्हते. पण इतर इस्राएली मात्र ते खात होते आणि त्याचा आनंद घेत होते. आणि त्यात चुकीचं असं काहीच नव्हतं. बायबलसुद्धा सांगतं, की द्राक्षारस हा “मनाला आनंद देणारा” आहे आणि देवाकडून आपल्याला मिळालेली ती एक भेटच आहे. (स्तो. १०४:१४, १५) पण तरी, नाझीर म्हणून जीवन जगणारे या सगळ्या गोष्टींचा स्वतःहून त्याग करायचे. c

तुम्ही नाझीरांसारखं त्याग करायला तयार आहात का? (परिच्छेद ४-६ पाहा)


५. मेडियन आणि मार्सेला यांनी कोणते त्याग केले आणि का?

आपणसुद्धा यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी बरेच त्याग करतो. मेडियन आणि मार्सेला यांच्या उदाहरणाचाच विचार करा. d हे ख्रिस्ती जोडपं खूप सोईस्कर जीवन जगत होतं. मेडियनकडे चांगली नोकरी असल्यामुळे ते एका सुंदर घरात राहत होते. पण त्यांना यहोवाची सेवा आणखी चांगल्या प्रकारे करायची होती. म्हणून त्यांनी आपल्या जीवनात काही बदल केले. ते म्हणतात: “आम्ही आमचा खर्च कमी केला. त्यासाठी आम्ही एक छोटं घर घेतलं आणि कारसुद्धा विकली.” मेडियन आणि मार्सेला यांना हे सगळे त्याग करायची गरज नव्हती. पण असं केल्यामुळे त्यांना त्यांची सेवा वाढवता येणार होती. म्हणूनच त्यांनी हे त्याग करायचा निर्णय घेतला. आणि या निर्णयामुळे ते आज खूश आणि समाधानी आहेत.

६. आज भाऊबहीण त्याग का करतात? (चित्रसुद्धा पाहा.)

यहोवाच्या सेवेत जास्त वेळ देता यावा म्हणून बरेच भाऊबहीण आनंदाने बऱ्‍याच गोष्टींचा त्याग करतात. (१ करिंथ. ९:३-६) आपण असे त्याग केले पाहिजेत अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करत नाही. किंवा ज्या गोष्टींचा आपण त्याग करतो त्या चुकीच्या आहेत असंही काही नाही. उदाहरणार्थ, काही जण त्यांच्या आवडीची नोकरी, घर, किंवा त्यांनी पाळलेल्या प्राण्यांचाही त्याग करतात. बऱ्‍याच जणांनी लवकर लग्न न करण्याचा किंवा लगेच कुटुंब न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही जण आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जावं लागलं तरी, गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करतात. त्यांनी स्वतःहून असे त्याग केले आहेत, कारण त्यांना यहोवाला सगळ्यात चांगलं ते द्यायची इच्छा आहे. पण याची नेहमी खातरी असू द्या, की यहोवाच्या सेवेत तुम्ही जे काही त्याग करता, मग ते छोटे असोत की मोठे, यहोवा त्यांची मनापासून कदर करतो आणि त्यांना मौल्यवान समजतो.​—इब्री ६:१०.

इतरांपासून वेगळे असल्याचं दाखवून द्या

७. नाझीर म्हणून सेवा करणाऱ्‍या व्यक्‍तीला कोणत्या समस्येचा सामना करावा लागायचा? (गणना ६:५) (चित्रसुद्धा पाहा.)

गणना ६:५ वाचा. नाझीर आपले केस कापत नव्हते. आपण यहोवाला पूर्णपणे अधीन आहोत हे दाखवण्याचा तो एक मार्ग होता. एक नाझीर खूप जास्त काळासाठी नाझीर म्हणून सेवा करत असेल तर त्याच्या वाढलेल्या केसांवरून ते दिसून यायचं. इतर लोकांनी जर नाझीर असण्याच्या त्याच्या नवसाला पाठिंबा दिला तर त्याला त्याचा नवस पूर्ण करायला सोपं जायचं. पण इस्राएलच्या इतिहासात असा एक काळ होऊन गेला जेव्हा नाझीरांना इतरांकडून पाठिंबा नव्हता आणि त्यांची कदरही नव्हती. आमोस संदेष्ट्याच्या काळात धर्मत्यागी इस्राएली लोक ‘नाझीरांना द्राक्षारस पाजत राहिले.’ द्राक्षारसापासून दूर राहायचा त्यांचा नवस मोडावा हा त्यामागचा उद्देश असावा. (आमो. २:१२) कधीकधी आपला नवस पूर्ण करण्यासाठी आणि इतरांपासून आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्यासाठी नाझीरांना खरंच धाडस दाखवावं लागलं असेल.

आपला नवस पूर्ण करायची इच्छा असलेला नाझीर इतरांपेक्षा वेगळं दिसायला तयार असायचा (परिच्छेद ७ पाहा)


८. बेंजामीनच्या अनुभवातल्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळालं?

आपण स्वभावाने लाजाळू असलो किंवा धाडसी नसलो, तरी यहोवाच्या मदतीने आपण इतरांपासून वेगळे आहोत हे धैर्याने दाखवू शकतो. नॉर्वेमध्ये राहणाऱ्‍या दहा वर्षांच्या बेंजामीनचं उदाहरण घ्या. युद्धग्रस्त युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या शाळेत एक कार्यक्रम ठेवला होता. त्यात सर्व मुलांना युक्रेनच्या ध्वजाच्या रंगांचे कपडे घालून गीत गायला सांगितलं होतं. पण बेंजामीनने या कार्यक्रमात भाग घ्यायचं नाही असं ठरवलं. म्हणून तो दूर जाऊन उभा राहिला. पण त्याच्या शिक्षिकेने त्याला पाहिलं आणि ती मोठ्याने त्याला म्हणाली: “इथे ये पटकन आणि आमच्यासोबत उभा राहा. आम्ही सगळे थांबलोय तुझ्यासाठी!” हे ऐकून बेंजामीन धाडसाने शिक्षिकेकडे गेला आणि म्हणाला: “मी याबाबतीत कोणाचीही बाजू घेत नाही आणि म्हणून मी या कार्यक्रमात भाग घेणार नाही. खरंतर, युद्धात भाग घ्यायला नको म्हटल्यामुळेच बरेचसे यहोवाचे साक्षीदार तुरुंगात आहेत.” बेंजामीनच्या शिक्षिकेने त्याचं ऐकल्यानंतर त्याचं म्हणणं मान्य केलं आणि त्याला तिथून जायला सांगितलं. पण त्यानंतर त्याच्या वर्गातली मुलं त्याने कार्यक्रमात का भाग घेतला नाही असं त्याला विचारू लागली. तो इतका घाबरला, की त्याला रडायलाच येणार होतं. पण त्याने शिक्षिकेला जे सांगितलं होतं तेच त्याने धैर्याने अख्ख्या वर्गाला सांगितलं. नंतर बेंजामीनने आपल्या आईवडिलांना असं सांगितलं, की यहोवानेच त्याला आपल्या विश्‍वासाची बाजू घ्यायला मदत केली होती.

९. आपण यहोवाचं मन कसं आनंदित करू शकतो?

यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागायची निवड करत असल्यामुळे आपण जगातल्या लोकांपासून वेगळे दिसतो. कामाच्या ठिकाणी किंवा शाळेत असताना आपण यहोवाचे साक्षीदार आहोत अशी ओळख करून द्यायला आपल्याला धाडसाची गरज असते. या जगाची वृत्ती आणि लोकांची जीवनशैली दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. आणि त्यामुळे आपल्याला बायबल तत्त्वांप्रमाणे जीवन जगणं आणि इतरांना आनंदाचा संदेश सांगणं आणखीनच कठीण जाऊ शकतं. (२ तीम. १:८; ३:१३) असं असलं तरी हे नेहमी लक्षात ठेवा, की जेव्हा आपण यहोवाची सेवा न करणाऱ्‍या लोकांपासून वेगळे आहोत हे धैर्याने दाखवतो तेव्हा यहोवाला ‘मनापासून आनंद होतो.’​—नीति. २७:११; मला. ३:१८.

तुमच्या जीवनात यहोवाला पहिलं स्थान द्या

१०. गणना ६:६, ७ मध्ये दिलेली आज्ञा पाळणं नाझीरांना कठीण का जात असावं?

१० गणना ६:६, ७ वाचा. नाझीर कोणत्याही मृतदेहाच्या जवळ जाऊ शकत नव्हता. तसं पाहिलं तर हा एक मोठा त्याग आहे असं वाटणार नाही. पण बायबलच्या काळात जेव्हा एका नाझीराच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू व्हायचा तेव्हा ती परिस्थिती त्याच्यासाठी एक मोठं आव्हान असायची. कारण अंत्यविधीच्या प्रथांमध्ये कुटुंबातल्या सदस्यांनी मृत व्यक्‍तीच्या जवळ असणं गरजेचं होतं. (योहा. १९:३९, ४०; प्रे. कार्यं ९:३६-४०) पण अशा परिस्थितीत एक नाझीर अशा प्रथांपासून दूर राहायचा. अशा अतिशय दुःखाच्या काळातसुद्धा एका नाझीराला आपला नवस पूर्ण करण्यासाठी भक्कम विश्‍वास दाखवावा लागायचा. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी यहोवाने त्याच्या विश्‍वासू सेवकांना नक्कीच बळ दिलं असेल.

११. कुटुंबासाठी एखादी गोष्ट करताना किंवा निर्णय घेताना एका ख्रिस्ती व्यक्‍तीचा काय निर्धार असला पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)

११ ख्रिस्ती या नात्याने आपण आपलं समर्पणाचं वचन खूप गंभीरतेने घेतो. आणि याचा परिणाम आपण कुटुंबासाठी जे काही करतो आणि जे निर्णय घेतो त्यावर होतो. शास्त्रवचनांमध्ये कुटुंबासाठी ज्या जबाबदाऱ्‍या दिल्या आहेत त्या आपण प्रामाणिकपणे पार पाडतो, पण यहोवा आपल्याकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतो त्याऐवजी आपण कुटुंबातल्या सदस्यांच्या इच्छांना कधीच जास्त महत्त्व देणार नाही. (मत्त. १०:३५-३७; १ तीम. ५:८) यामुळे कधीकधी आपल्या घरचे लोक आपल्यावर नाराज होतील. पण तरीसुद्धा आपण यहोवाचं मन आनंदित करायचा प्रयत्न करतो.

कितीही कठीण परिस्थिती आली तरी यहोवाच्या इच्छेला पहिलं स्थान द्यायला तुम्ही तयार आहात का? (परिच्छेद ११ पाहा) e


१२. कौटुंबिक समस्येचा सामना करत असताना ॲलेक्झॅन्डरूनी काय केलं आणि काय नाही केलं?

१२ ॲलेक्झॅन्डरू आणि डोरिनाचा अनुभव लक्षात घ्या. या जोडप्याने जवळजवळ एक वर्षभर बायबल अभ्यास केला आणि त्यानंतर डोरिनाने बायबल अभ्यास थांबवायचं ठरवलं. आणि ॲलेक्झॅन्डरूनेही तसंच करावं अशी तिची इच्छा होती. पण त्यांनी शांतपणे आणि समंजसपणे आपण बायबल अभ्यास चालू ठेवणार आहोत, असं सांगितलं. हे डोरिनाला अजिबात आवडलं नाही. त्यामुळे ती त्यांच्यावर बायबल अभ्यास थांबवण्यासाठी दबाव टाकत होती. ॲलेक्झॅन्डरू म्हणतात की ते तिला समजून घ्यायचा खूप प्रयत्न करत होते. पण ते त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. कधीकधी तर डोरिना त्यांची खूप टीका करायची आणि रागाने घालूनपाडून बोलायची. यामुळे ॲलेक्झॅन्डरूना कधीकधी बायबल अभ्यास बंद केलेलाच बरा असं वाटायचं. तरी त्यांनी यहोवाच्या इच्छेला महत्त्व द्यायचं ठरवलं. पण त्याच वेळी त्यांनी आपल्या पत्नीला खूप प्रेमाने आणि आदराने वागवलं. शेवटी त्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे डोरिनाने पुन्हा बायबल अभ्यास सुरू केला आणि सत्य स्वीकारलं.—jw.org वर “सत्यामुळे जीवन बदलतं” या मालिकेत ॲलेक्झॅन्डरू आणि डोरिना वेकर: “प्रेम सहनशील आणि दयाळू असतं”  हा व्हिडिओ पाहा.

१३. आपण यहोवाला आणि आपल्या कुटुंबाला प्रेम कसं दाखवू शकतो?

१३ यहोवाने कुटुंबाची व्यवस्था केली आहे आणि त्याची इच्छा आहे की, कुटुंबांनी आनंदी असावं. (इफिस. ३:१४, १५) जर आपल्याला खरोखर आनंदी राहायचं असेल तर आपण यहोवाच्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या सांभाळून, त्यांना प्रेमाने आणि आदराने वागवून यहोवाच्या सेवेसाठी जे काही त्याग करता त्याची यहोवा मनापासून कदर करतो यात काहीच शंका नाही.​—रोम. १२:१०.

इतरांना नाझीरांसारखी मनोवृत्ती दाखवण्यासाठी प्रोत्साहन द्या

१४. आपण आपल्या शब्दांनी खासकरून कोणाला प्रोत्साहन देऊ शकतो?

१४ यहोवाची उपासना करणाऱ्‍या सर्वांनी प्रेमाने प्रवृत्त होऊन त्याग करायला तयार असलं पाहिजे. कधीकधी असं करणं सोपं नसेल. पण अशी मनोवृत्ती बाळगायला आपण इतरांना कशी मदत करू शकतो? आपल्या शब्दांतून प्रोत्साहन देऊन. (ईयो. १६:५) तुमच्या मंडळीत असं कोणी आहे का, जे उपासनेशी संबंधित कामात जास्तीत जास्त भाग घेता यावा म्हणून आपलं जीवन साधं करायचा प्रयत्न करत आहे? तुम्हाला असे कोणी तरुण भाऊबहीण माहीत आहेत का, जे शाळा-कॉलेज मध्ये आपल्या विश्‍वासाची बाजू घेणं कठीण असलं तरी इतरांपेक्षा वेगळं असल्याचं दाखवून देत आहेत? कुटुंबातून विरोध असतानाही विश्‍वासू राहण्यासाठी भरपूर प्रयत्न करणाऱ्‍या बायबल विद्यार्थ्यांबद्दल आणि इतर भाऊबहिणींबद्दल काय? आपल्यासोबत यहोवाची उपासना करणाऱ्‍या इतर भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्याच्या प्रत्येक संधीचा आपण वापर करू या. तसंच ते जे त्याग करत आहेत आणि धैर्य दाखवत आहेत त्याबद्दल कदरही व्यक्‍त करू या.​—फिले. ४, ५, ७.

१५. पूर्ण वेळेच्या सेवेत असणाऱ्‍या भाऊबहिणींना काही जणांनी कशी मदत केली आहे?

१५ कधीकधी आपल्याला पूर्ण वेळची सेवा करणाऱ्‍या भाऊबहिणींना व्यावहारिक मदत पुरवता येऊ शकते. (नीति. १९:१७; इब्री १३:१६) श्रीलंकामध्ये राहणाऱ्‍या एका वयस्कर बहिणीचीसुद्धा हीच इच्छा होती. तिची पेन्शन वाढली होती म्हणून तिला दोन तरुण पायनियर बहिणींना मदत करायची होती. कारण या पायनियर बहिणी आर्थिक संकटात होत्या. म्हणून तिने असं ठरवलं की त्यांच्या टेलिफोन बिलासाठी ती दर महिन्याला त्यांना एक रक्कम देईल. खरंच या बहिणीचं किती सुंदर उदाहरण आहे!

१६. प्राचीन काळातल्या नाझीरांच्या व्यवस्थेतून आपण काय शिकतो?

१६ प्राचीन काळातल्या नाझीर म्हणून स्वेच्छेने सेवा करणाऱ्‍या विश्‍वासू लोकांच्या उदाहरणातून आपण नक्कीच बरंच काही शिकू शकतो. पण या व्यवस्थेमधून आपल्याला आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दलही एक गोष्ट समजते. ती म्हणजे, त्याला याचा पूर्ण भरवसा आहे, की आपल्याला त्याचं मन आनंदित करायची प्रामाणिक इच्छा आहे आणि समर्पणाचं वचन पूर्ण करण्यासाठी बरेच त्याग करायची आपली तयारी आहे. आपल्याला हव्या त्या मार्गाने त्याच्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्‍त करण्याची संधी देऊन तो आपला आदर करतो. (नीति. २३:१५, १६; मार्क १०:२८-३०; १ योहा. ४:१९) नाझीर म्हणून सेवा करण्याची जी व्यवस्था होती त्यावरून दिसून येतं, की आपण त्याच्या सेवेत जे त्याग करतो ते तो पाहतो आणि त्याची खूप कदर करतो. तेव्हा, आपणही आपल्याकडचं सर्वात चांगलं ते यहोवाला देऊन त्याची सेवा करत राहायचा निश्‍चय करू या.

तुमचं उत्तर काय असेल?

  • नाझीरांनी आत्मत्यागी वृत्ती आणि धैर्य कसं दाखवलं?

  • आपण एकमेकांना नाझीरांसारखी मनोवृत्ती दाखवायला कसं प्रोत्साहन देऊ शकतो?

  • नाझीर बनण्याच्या व्यवस्थेवरून यहोवाला त्याच्या लोकांबद्दल कोणता भरवसा असल्याचं समजतं?

गीत १२४ कायम एकनिष्ठ राहू या!

a काही लोकांना स्वतः यहोवाने नाझीर होण्यासाठी निवडलं होतं. पण बहुतेक इस्राएली स्वतःहून काही काळासाठी नाझीर म्हणून सेवा करायचे.​—“ यहोवाने निवडलेले नाझीर” ही चौकट पाहा.

b आपल्या काही प्रकाशनांमध्ये नाझीरांची तुलना पूर्ण वेळेच्या सेवकांशी केली आहे. पण यहोवाचे सगळे  समर्पित सेवक नाझीरांसारखी मनोवृत्ती कशी दाखवू शकतात हे या लेखात सांगितलं आहे.

c सहसा नाझीर म्हणून सेवा करणाऱ्‍यांना त्यांचा नवस पूर्ण करण्यासाठी वेगळं असं काही खास काम करायची गरज नव्हती.

d jw.org वर हिंदीमध्ये “यहोवा के साक्षियों के अनुभव” या मालिकेत “कम में गुज़ारा करने से मिली ज़्यादा खुशी” हा लेख पाहा.

e चित्राचं वर्णन: एका नाझीराच्या जवळच्या व्यक्‍तीचा मृत्यू झाला आहे. त्याच्या नवसामुळे तो मृत व्यक्‍तीच्या जवळ जाऊ शकत नाही म्हणून तो घराच्या छतावरून मृत व्यक्‍तीला अंत्यविधीसाठी घेऊन जात असताना पाहत आहे.