व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाची धीराने वाट पाहत असताना आनंदी राहा

यहोवाची धीराने वाट पाहत असताना आनंदी राहा

यहोवा सगळ्या वाईट गोष्टी काढून टाकेल आणि सर्व काही नवीन करेल त्या वेळेची तुम्ही आतुरतेने वाट पाहता का? (प्रकटी. २१:१-५) नक्कीच! पण यहोवाच्या वेळेची वाट पाहत राहणं नेहमीच सोपं नसतं, खासकरून जेव्हा आपण संकटांचा सामना करत असतो तेव्हा. कारण आशा पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं.​—नीति. १३:१२, तळटीप.

तरीसुद्धा यहोवाची इच्छा आहे की आपण त्याची नेमलेली वेळ येईपर्यंत धीराने वाट पाहत राहावी. पण त्याला असं का वाटतं? आणि त्याची धीराने वाट पाहत असताना आनंदी राहायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?

आपण वाट पाहावी असं यहोवाला का वाटतं?

बायबल म्हणतं: “तुमच्यावर कृपा करण्यासाठी यहोवा धीराने वाट पाहत आहे, तुम्हाला दया दाखवण्यासाठी तो पाऊल उचलेल. कारण यहोवा हा न्यायी देव आहे. त्याची वाट पाहत राहणारे सर्व आनंदी असतात.” (यश. ३०:१८) यशयाचे हे शब्द खरंतर हट्टी यहुद्यांसाठी होते. (यश. ३०:१) पण या यहुद्यांमध्ये असेही काही विश्‍वासू यहुदी होते ज्यांना या शब्दांमुळे आशा मिळाली. त्याचप्रमाणे आजही यहोवाच्या विश्‍वासू सेवकांना या शब्दांमुळे आशा मिळते.

मग जर यहोवा धीराने वाट पाहतोय तर आपणही पाहिलीच पाहिजे. या व्यवस्थेचा अंत करण्यासाठी त्याने एक वेळ ठरवली आहे आणि त्या दिवसाची आणि वेळेची तो स्वतः वाट पाहतोय. (मत्त. २४:३६) जेव्हा ती वेळ येईल तेव्हा यहोवा आणि त्याच्या सेवकांवर सैतानाने लावलेले आरोप खोटे आहेत हे पूर्णपणे सिद्ध होईल. मग तो, सैतान आणि त्याची बाजू घेणाऱ्‍यांचा नाश करेल आणि आपल्याला “दया दाखवेल.”

तोपर्यंत यहोवा आपल्या समस्या कदाचित काढून टाकणार नाही, पण धीराने वाट पाहत असताना आपण आनंदी राहू शकतो  या गोष्टीची खातरी तो आपल्याला देतो. यशयाने म्हटलं तसं चांगल्या गोष्टीची आशा बाळगत असताना किंवा वाट पाहत असताना आपण आनंदी राहू शकतो. (यश. ३०:१८) पण मग आपण आनंदी कसं राहू शकतो? यासाठी चार गोष्टी आपल्याला मदत करतील.

वाट पाहत असताना आनंदी कसं राहता येईल?

चांगल्या गोष्टींवर लक्ष लावा.  दावीदने त्याच्या आयुष्यात बऱ्‍याच दुष्ट लोकांचा सामना केला. (स्तो. ३७:३५) तरी त्याने असं लिहिलं: “यहोवापुढे शांत राहा आणि आतुरतेने त्याची वाट पाहा. आपल्या दुष्ट योजना सफल करणाऱ्‍या माणसामुळे संतापू नकोस.” (स्तो. ३७:७) दावीदने स्वतः हा सल्ला लागू केला आणि तारणाच्या आशेवर लक्ष लावलं. तसंच, यहोवाने दिलेल्या प्रत्येक आशीर्वादावर त्याने विचार केला. (स्तो. ४०:५) आपणसुद्धा जर आपल्याभोवती घडणाऱ्‍या चुकीच्या आणि वाईट गोष्टींनी भारावून जाण्याऐवजी चांगल्या गोष्टींकडे लक्ष लावलं तर यहोवाच्या वेळेची वाट पाहत राहायला आपल्याला सोपं जाईल.

यहोवाची स्तुती करण्यात व्यस्त राहा.  ७१ व्या स्तोत्राच्या लेखकाने (कदाचित दावीद) यहोवाला असं म्हटलं: “मी तर वाट पाहत राहीन; मी तुझी आणखीनच स्तुती करीन.” (स्तो. ७१:१४) तो यहोवाची स्तुती कशी करणार होता? तो इतरांना यहोवाबद्दल सांगणार होता आणि त्याच्या स्तुतीचं गीत गाणार होता. (स्तो. ७१:१६, २३) दावीदसारखं आपणही यहोवाच्या वेळेची वाट पाहत असताना आनंदी राहू शकतो. प्रचार करताना, आपल्या ओळखीच्या लोकांशी बोलताना आणि उपासनेची गीतं गाताना आपण त्याची स्तुती करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही राज्यगीतं गाल तेव्हा त्यातल्या प्रोत्साहनदायक शब्दांकडे लक्ष द्या.

तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून भाऊबहिणींसोबत वेळ घालवा.  दावीद जेव्हा समस्यांचा सामना करत होता तेव्हा त्याने यहोवाला म्हटलं: “तुझ्या एकनिष्ठ सेवकांसमोर . . . मी तुझ्या नावावर आशा ठेवीन.” (स्तो. ५२:९) आपणसुद्धा यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करणाऱ्‍या आपल्या भाऊबहिणींकडून प्रोत्साहन मिळवू शकतो. त्यासाठी आपण फक्‍त सभेत आणि प्रचारकार्यातच नाही, तर इतर वेळीही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतो.​—रोम. १:११, १२.

आपली आशा आणखी भक्कम करा.  स्तोत्र ६२:५ म्हणतं: “मी शांतपणे देवाची वाट पाहीन. कारण माझी आशा त्याच्यावर आहे.” आशा भक्कम असेल तर अपेक्षा केलेल्या गोष्टींबद्दल आपण अगदी ठाम असतो. हे खासकरून तेव्हा जास्त महत्त्वाचं असतं जेव्हा आपल्याला या जगातल्या समस्यांना अपेक्षेपेक्षा जास्त काळ सहन करावं लागतं. यहोवाची अभिवचनं पूर्ण व्हायला कितीही वेळ लागला आणि आपल्याला त्यांची कितीही वाट पाहावी लागली, तरी ती पूर्ण होतीलच अशी खातरी आपल्याला असली पाहिजे. आपली आशा भक्कम करण्यासाठी आपण बायबलचा अभ्यास करू शकतो. म्हणजे त्यातल्या भविष्यवाण्यांचा, त्यातल्या सुसंगततेचा आणि यहोवा आपल्याला त्याच्याबद्दल देत असलेल्या बारीकसारीक माहितीचा आपण अभ्यास केला पाहिजे. (स्तो. १:२, ३) यासोबतच सर्वकाळच्या जीवनाच्या अभिवचनाची वाट पाहत असताना यहोवासोबतचं नातं मजबूत करण्यासाठी आपण “पवित्र शक्‍तीच्या मदतीने प्रार्थना” करत राहण्याची गरज आहे.​—यहू. २०, २१.

दावीद राजाप्रमाणे नेहमी याची खातरी असू द्या की यहोवाची धीराने वाट पाहणाऱ्‍यांकडे त्याचं लक्ष असतं आणि तो त्यांच्यावर एकनिष्ठ प्रेम करतो. (स्तो. ३३:१८, २२) त्यामुळे चांगल्या गोष्टींकडे लक्ष लावून, त्याची स्तुती करून, आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवून आणि आपली आशा भक्कम करून धीराने अशीच यहोवाची वाट पाहत राहा.