व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

भविष्यात काय होईल हे सांगण्याच्या यहोवाच्या क्षमतेबद्दल बायबल काय सांगतं?

भविष्यात काय होणार आहे हे यहोवा आधीच सांगू शकतो असं बायबल स्पष्टपणे सांगतं. (यश. ४५:२१) पण तो ते कसं करतो, कधी करतो किंवा एखादी गोष्ट कितपत माहीत करून घ्यायचं ठरवतो याची बारीकसारीक माहिती बायबल सांगत नाही. त्यामुळे भविष्यात काय होईल हे सांगण्याच्या यहोवाच्या क्षमतेबद्दल आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत करून घेता येणार नाहीत. पण याच्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो.

यहोवा त्याच्या इच्छेप्रमाणे काहीही करू शकतो, पण काही गोष्टी न करण्याची निवड तो करतो. यहोवाकडे अमर्याद बुद्धी असल्यामुळे त्याला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल तो आधीच सांगू शकतो. (रोम. ११:३३) पण त्याच्या परिपूर्ण संयमामुळे काही गोष्टींचं भविष्य जाणून न घ्यायची निवडसुद्धा तो करू शकतो.—यशया ४२:१४ सोबत तुलना करा.

यहोवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोष्टी घडवून आणतो. भविष्य जाणून घ्यायच्या त्याच्या क्षमतेचा याच्याशी काय संबंध आहे? यशया ४६:१० सांगतं: “मी सुरुवातीलाच, शेवट काय असेल हे सांगतो,  आणि ज्या गोष्टी अजून घडल्याही नाहीत, त्यांविषयी मी फार आधीच सांगतो. मी म्हणतो, ‘मी जे ठरवलंय ते नक्की पूर्ण होईल, आणि माझ्या इच्छेप्रमाणे मी करीन.’”

तर भविष्यात काय होणार आहे हे यहोवा सांगू शकतो याचं एक कारण म्हणजे त्याच्याकडे कोणतीही गोष्ट घडवून आणण्याची ताकद आहे. त्यामुळे काही वेळा आपण जसं एखाद्या चित्रपटाच्या शेवटी काय होणार आहे याचा अंदाज घेण्यासाठी तो फास्ट फॉरवर्ड करून पाहतो किंवा एखादं पुस्तक वाचताना शेवटी काय होणार आहे हे समजून घेण्यासाठी शेवटची काही पानं वाचून पाहतो, तसं यहोवाला एखाद्या घटनेचा शेवट कसा होणार आहे हे आधीच समजून घेण्यासाठी भविष्यात डोकावून पाहायची गरज नाही. त्याऐवजी तो एखादी गोष्ट एका विशिष्ट वेळेला घडून आली पाहिजे असं आधीच ठरवू शकतो आणि मग ती वेळ येईपर्यंत ती गोष्ट तो घडवून आणू शकतो, म्हणजे अगदी त्या अचूक वेळेला ती गोष्ट पूर्ण होईल.​—निर्ग. ९:५, ६; मत्त. २४:३६; प्रे. कार्यं १७:३१.

म्हणून भविष्यात होणाऱ्‍या घटनांबद्दल यहोवा जे काही करतो, त्यांबद्दल बोलताना बायबलमध्ये ‘योजलंय’ किंवा “ठरवलंय” असे शब्द वापरण्यात आले आहेत. (२ राजे १९:२५; यश. ४६:११) हे शब्द मूळ भाषेतल्या ज्या शब्दाचं भाषांतर आहेत, त्या शब्दाचा अर्थ ‘कुंभार’ असा होतो. (यिर्म. १८:४) जसा एक कुशल कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याची एक सुंदर फुलदाणी बनवतो, त्याप्रमाणे यहोवा घटनांना हवं तसं वळण किंवा दिशा देऊन आपला उद्देश पूर्ण करतो.​—इफिस. १:११.

यहोवा इच्छा स्वातंत्र्याच्या देणगीचा आदर करतो. तो कधीच कुठल्याही व्यक्‍तीचं भविष्य ठरवत नाही. तसंच प्रामाणिक लोकांचा नाश होईल अशी कोणतीच गोष्ट तो त्यांना करायला लावत नाही. तो प्रत्येकाला जीवन कसं जगायचं याची निवड करायचं स्वातंत्र्य देतो. आणि त्यासोबतच त्यांनी योग्य मार्ग निवडावा असा आर्जवसुद्धा करतो.

दोन उदाहरणांवर विचार करा. पहिलं उदाहरण निनवे शहरात राहणाऱ्‍या लोकांचं आहे. तिथल्या लोकांच्या दुष्टतेमुळे यहोवाने सांगितलं होतं की तो त्या शहराचा नाश करेल. पण त्या लोकांनी पश्‍चात्ताप केल्यामुळे “त्यांच्यावर जे संकट आणण्याबद्दल [यहोवा] बोलला होता, त्यावर त्याने पुन्हा विचार केला आणि त्याने ते संकट आणलं नाही.” (योना ३:१-१०) निनवेच्या लोकांनी यहोवाच्या इशाऱ्‍याप्रमाणे बदल करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी पश्‍चात्ताप केला, त्यामुळे यहोवाने त्यांचा नाश करायचा विचार बदलला.

दुसरं उदाहरण पर्शियाचा राजा कोरेश याच्याबद्दल असलेल्या भविष्यवाणीचं आहे. त्याच्याबद्दल सांगण्यात आलं होतं, की तो बंदिवासात असलेल्या यहुद्यांना सोडवेल आणि यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याचा आदेश देईल. (यश. ४४:२६–४५:४) ही भविष्यवाणी याच कोरेश राजाने पूर्ण केली. (एज्रा १:१-४) पण तो कधीच खऱ्‍या देवाचा उपासक बनला नाही. अशा प्रकारे यहोवाने कोरेश राजाच्या इच्छा स्वातंत्र्याला हात न लावता ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर केला.​—नीति. २१:१.

भविष्यात पाहण्याच्या आपल्या ताकदीचा वापर करताना यहोवा फक्‍त इतक्याच गोष्टी लक्षात घेत नाही, तर आणखी बऱ्‍याच गोष्टी आहेत. खरंतर, यहोवा ज्या पद्धतीने काम करतो आणि तो जसा विचार करतो ते माणूस कधीच पूर्णपणे समजू शकत नाही. (यश. ५५:८, ९) पण यहोवाने आपल्याला जेवढं कळवलंय त्यावरून तो जे काही करतो ते योग्यच करतो याबद्दल आपला विश्‍वास आणखी मजबूत होतो. यात भविष्यात पाहण्याची त्याची ताकदसुद्धा येते.