व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १६

गीत ६४ कापणीत आनंदाने सहभागी व्हा!

सेवाकार्यातला आनंद वाढवा!

सेवाकार्यातला आनंद वाढवा!

“आनंदाने यहोवाची सेवा करा.”​—स्तो. १००:२.

या लेखात:

सेवाकार्यातला आपला आनंद वाढवण्यासाठी आपण कोणती पावलं उचलू शकतो ते जाणून घ्या.

१. सेवाकार्यात इतरांशी बोलण्याबद्दल काहींना कसं वाटतं? (चित्रसुद्धा पाहा.)

 यहोवाचे लोक या नात्याने आपण प्रचार करतो, कारण आपलं आपल्या स्वर्गातल्या पित्यावर खूप प्रेम आहे आणि इतरांना त्याच्याविषयी जाणून घ्यायला आपल्याला मदत करायची आहे. बऱ्‍याच प्रचारकांना प्रचार करायला खूप आवडतं. पण काहींना त्याच्यातून आनंद मिळवणं कठीण जातं. कारण त्यांचा स्वभाव कदाचित लाजाळू असेल किंवा त्यांच्यात आत्मविश्‍वासाची कमी असेल. काहींना बोलवलं नसताना दुसऱ्‍यांच्या घरी जायला अवघडल्यासारखं वाटत असेल. किंवा काही जणांना भीती असेल की आपल्या बोलण्यामुळे समोरची व्यक्‍ती नाराज होईल. तर काहींना असं शिकवलेलं असेल की आपण दुसऱ्‍यांना विनाकारण त्रास देऊ नये. यहोवावर खूप प्रेम असलं तरी या भाऊबहिणींना अनोळखी लोकांना राज्याचा संदेश सांगणं कठीण जातं. पण तरी त्यांना याची जाणीव असते की हे काम खूप महत्त्वाचं आहे आणि आपण नियमितपणे त्यात सहभाग घेतला पाहिजे. खरंच, या भाऊबहिणींवर यहोवा किती खूश होत असेल!

तुम्हाला प्रचार करायला आवडतं का? (परिच्छेद १ पाहा)


२. आनंदाने सेवाकार्य करणं तुम्हाला कठीण जातं तेव्हा तुम्ही निराश का होऊ नये?

तुम्हालाही कधीकधी या भाऊबहिणींसारखंच वाटतं का? जर वाटत असेल, तर निराश होऊ नका. जर तुमच्यात आत्मविश्‍वासाची कमी असेल, तर यावरून दिसतं की तुम्हाला इतरांचं लक्ष स्वतःकडे वेधायचं नाही. तसंच तुम्हाला इतरांशी विनाकारण वादही घालायचा नाही. शिवाय, इतरांना नाराज करायची कोणाचीच इच्छा नसते, इतरांसाठी चांगलं करायचा प्रयत्न करणाऱ्‍या व्यक्‍तीची तर मुळीच नसते. तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे तुमच्या स्वर्गातल्या पित्याला चांगलं माहीत आहे आणि तुम्हाला गरजेच्या गोष्टी पुरवून मदत करायची त्याची इच्छा आहे. (यश. ४१:१३) म्हणूनच अशा भावनांवर मात करण्यासाठी आणि प्रचारात आनंद मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल पाच सल्ले या लेखात दिले आहेत.

देवाच्या वचनातून ताकद मिळवा

३. इतरांना प्रचार करायला यिर्मया संदेष्ट्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली?

जुन्या काळात जेव्हा देवाच्या सेवकांना एखादं कठीण काम करावं लागायचं, तेव्हा देवाच्या संदेशामुळे त्यांना मदत मिळायची. यिर्मयाचंच उदाहरण घ्या. यहोवाने त्याला प्रचार करायला सांगितलं, तेव्हा त्याला भीती वाटली. यिर्मया म्हणाला: “मी तर एक लहान मुलगा आहे. मला नीट बोलताही येत नाही.” (यिर्म. १:६) मग त्याने त्याच्या भीतीवर कशी मात केली? यहोवाच्या शब्दांमुळे त्याला हिंमत मिळाली. तो म्हणाला: “तो संदेश माझ्या मनात धगधगत्या आगीसारखा झाला; माझ्या हाडांमध्ये कोंडलेल्या अग्नीसारखा तो झाला. तो आवरता-आवरता मी पार थकून गेलो.” (यिर्म. २०:८, ९) यिर्मयाला ज्या क्षेत्रात प्रचार करायचा होता, तिथे प्रचार करणं खूप कठीण होतं. पण तरीसुद्धा जो संदेश त्याला लोकांना सांगायचा होता, त्यामुळे त्याला हे काम करायची ताकद मिळाली.

४. आपण जेव्हा देवाचं वचन वाचतो आणि त्यावर मनन करतो तेव्हा काय होतं? (कलस्सैकर १:९, १०)

देवाच्या वचनातल्या संदेशामुळे भाऊबहिणींना ताकद मिळते. कलस्सैमधल्या मंडळीला पत्र लिहिताना प्रेषित पौलने म्हटलं, की देवाबद्दलचं अचूक ज्ञान घेतल्यामुळे भाऊबहिणींना “प्रत्येक चांगल्या कार्याचं फळ उत्पन्‍न करत” राहायला मदत मिळेल आणि “यहोवाच्या सेवकांना शोभेल” असं वागता येईल. (कलस्सैकर १:९, १० वाचा.) या चांगल्या कार्यांमध्ये आनंदाचा संदेश सांगणंही सामील आहे. त्यामुळे जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो आणि त्यावर मनन करतो, तेव्हा यहोवावरचा आपला भरवसा वाढतो आणि राज्याचा संदेश सांगणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला आणखी स्पष्ट होतं.

५. बायबल वाचनाचा आणि त्याच्या अभ्यासाचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, म्हणून आपण काय करू शकतो?

देवाच्या वचनातून जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी ते वाचताना, त्याचा अभ्यास करताना आणि त्यावर मनन करताना घाई करू नका. जर तुम्हाला एखादं वचन समजत नसेल, तर लगेच पुढच्या वचनावर जाऊ नका. तर वॉच टॉवर पब्लिकेशन्स इंडेक्स किंवा यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  यांचा वापर करून त्या वचनाबद्दल आणखी माहिती मिळवा. देवाच्या वचनाचा अभ्यास करताना वेळ दिल्यामुळे देवाचं वचन खरंय, यावरचा तुमचा भरवसा आणखी वाढेल. (१ थेस्सलनी. ५:२१) आणि जितका भरवसा वाढेल, तितकाच त्याबद्दल इतरांना सांगायला तुम्हाला आनंद होईल.

प्रचाराची चांगली तयारी करा

६. आपण प्रचाराची चांगली तयारी का केली पाहिजे?

तुम्ही जर प्रचाराची चांगली तयारी केली तर इतरांशी बोलताना तुम्हाला जास्त भीती वाटणार नाही. सेवाकार्यात जाण्याआधी येशूने त्याच्या शिष्यांना तयारी करण्यासाठी मदत केली. (लूक १०:१-११) येशूने शिकवलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे शिष्यांना बऱ्‍याच चांगल्या गोष्टी करता आल्या आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला.​—लूक १०:१७.

७. आपण प्रचाराची तयारी कशी करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

आपण प्रचाराची चांगली तयारी कशी करू शकतो? आपण काय बोलणार आहोत याचा आपण विचार करू शकतो आणि मग ते आपल्या शब्दात बोलायचा प्रयत्न करू शकतो. त्यासोबतच घरमालक कशी प्रतिक्रिया देईल आणि आपण कसं उत्तर देऊ शकतो याचा आधीच विचार केल्यामुळेसुद्धा आपल्याला मदत होईल. मग नंतर लोकांशी बोलताना आपण शांतपणे आणि आनंदी चेहऱ्‍याने त्यांच्याशी बोलू शकतो.

प्रचाराची चांगली तयारी करा (परिच्छेद ७ पाहा)


८. आपण कोणत्या अर्थाने प्रेषित पौलने सांगितलेल्या मातीच्या भांड्यांसारखे आहोत?

प्रचारकार्यात आपली भूमिका काय आहे, हे समजावून सांगण्यासाठी पौलने एक उदाहरण दिलं. त्याने म्हटलं “आमची ही संपत्ती मातीच्या भांड्यांत आहे.” (२ करिंथ. ४:७) मग ही संपत्ती काय आहे? ही संपत्ती म्हणजे प्रचाराचं काम आहे. यामुळे लोकांचा जीव वाचतो. (२ करिंथ. ४:१) आणि मातीची भांडी काय आहेत? ती इतरांना आनंदाचा संदेश सांगणाऱ्‍या देवाच्या सेवकांना सूचित करतात. पौलच्या दिवसांत व्यापारी अन्‍नसामग्री, द्राक्षारस आणि पैसे यांसारख्या मौल्यवान गोष्टी एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी नेण्यासाठी, मातीच्या भांड्यांचा वापर करायचे. त्याच प्रकारे यहोवाने आपल्याला आनंदाचा मौल्यवान संदेश सांगायची जबाबदारी सोपवली आहे. आणि यहोवाच्या मदतीने, आपल्याला हा संदेश विश्‍वासाने सांगत राहायचं बळ मिळतं.

धैर्यासाठी प्रार्थना करा

९. आपण माणसांच्या भीतीवर किंवा लोक ऐकणार नाहीत या भीतीवर कशी मात करू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

कधीकधी आपल्याला माणसांची भीती वाटू शकते. किंवा लोक आपला संदेश ऐकणार नाहीत याचीसुद्धा भीती वाटू शकते. मग आपण यावर कशी मात करू शकतो? प्रेषितांना जेव्हा प्रचार न करण्याचा हुकूम देण्यात आला होता, तेव्हा त्यांनी काय प्रार्थना केली याचा विचार करा. भीतीला बळी पडण्याऐवजी त्यांनी यहोवाला अशी प्रार्थना केली: “तुझं वचन पूर्ण धैर्याने सांगत राहायला तुझ्या सेवकांना बळ दे.” यहोवाने लगेचच त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. (प्रे. कार्यं ४:१८, २९, ३१) जर आपल्यालाही कधी माणसांची भीती वाटली तर आपणसुद्धा यहोवाला मदतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. लोकांवरचं आपलं प्रेम वाढवण्यासाठी आपण यहोवाला मदत मागू शकतो. त्यामुळे त्यांना आनंदाचा संदेश सांगायला आपल्याला भीती वाटणार नाही.

धैर्यासाठी प्रार्थना करा (परिच्छेद ९ पाहा)


१०. साक्षीदार म्हणून आपली भूमिका पार पाडण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करतो? (यशया ४३:१०-१२)

१० यहोवाने आपल्याला त्याचे साक्षीदार होण्यासाठी निवडलंय आणि धैर्य दाखवायला मदत करायचं वचनसुद्धा त्याने दिलंय. (यशया ४३:१०-१२ वाचा.) ही मदत तो कोणत्या चार मार्गांनी करतो ते आपण पाहू या. पहिला, आपण जेव्हा-जेव्हा प्रचार करतो तेव्हा-तेव्हा येशू आपल्यासोबत असतो. (मत्त. २८:१८-२०) दुसरा, यहोवाने आपल्याला मदत करण्यासाठी स्वर्गदूतांना नेमलंय. (प्रकटी. १४:६) तिसरा, शिकलेल्या गोष्टी आठवायला यहोवा आपल्याला त्याची पवित्र शक्‍ती देतो. (योहा. १४:२५, २६) आणि चौथा, यहोवाने आपल्याला मदत करायला भाऊबहीण दिलेत. यहोवाच्या मदतीने आणि आपल्या भाऊबहिणींच्या साथीने आपण धैर्याने प्रचार करत राहू शकतो.

बदल करायला तयार राहा आणि योग्य दृष्टिकोन ठेवा

११. प्रचारात तुम्हाला जास्त लोक कसे भेटू शकतात? (चित्रसुद्धा पाहा.)

११ जेव्हा घरोघरच्या प्रचारात खूप कमी लोक घरी भेटतात तेव्हा तुम्ही निराश होता का? असं असेल तर तुम्ही स्वतःला विचारू शकता: ‘या वेळी माझ्या क्षेत्रातले लोक कुठे असतील?’ (प्रे. कार्यं १६:१३) ‘ते कामावर असतील की बाजारात गेले असतील?’ जर असं असेल तर तुम्ही रस्त्यावरचं साक्षकार्य करून जास्त लोकांना भेटू शकता. जोशूआ नावाचा एक भाऊ म्हणतो: “बाजारात आणि गर्दीच्या ठिकाणी मला जास्त लोकांना प्रचार करता आला.” त्याला आणि त्याच्या पत्नीला संध्याकाळी आणि रविवारी दुपारी प्रचार केल्यामुळेसुद्धा जास्त लोकांना घरी भेटता आलं.—इफिस. ५:१५, १६.

बदल करायला तयार राहा (परिच्छेद ११ पाहा)


१२. लोकांचा काय विश्‍वास आहे किंवा त्यांना कशाची काळजी आहे हे आपण कसं ओळखू शकतो?

१२ जर लोक तुमच्या संदेशात कमी आवड दाखवत असतील, तर त्यांचा काय विश्‍वास आहे किंवा त्यांना कशाची काळजी आहे हे ओळखायचा प्रयत्न करा. जोशूआ आणि त्याची पत्नी, पत्रिकेच्या पहिल्या पानावर असलेल्या प्रश्‍नाचा वापर करून लोकांशी बोलतात. उदाहरणार्थ, बायबलबद्दल तुमचं काय मत आहे?  या पत्रिकेचा वापर करून ते म्हणतात: “काही लोकांना वाटतं की बायबल देवाकडून आहे तर काहींना तसं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं?” यामुळे सहसा संभाषण सुरू होतं.

१३. प्रचारात लोकांनी आपलं ऐकलं नाही तरी आपण आपलं ध्येयं पूर्ण करत असतो असं आपण का म्हणू शकतो? (नीतिवचनं २७:११)

१३ जरी प्रचारकार्यात लोकांनी आपलं ऐकलं नाही तरी आपण आपलं ध्येयं पूर्ण करत असतो. असं आपण का म्हणू शकतो? कारण इतरांना साक्ष देऊन आपण यहोवा आणि त्याच्या मुलाची इच्छा पूर्ण केलेली असते. (प्रे. कार्यं १०:४२) जरी प्रचारात लोक आपल्याला भेटले नाहीत किंवा त्यांनी आपलं ऐकलं नाही तरी आपण आनंदी असतो. कारण आपल्याला माहीत असतं, की आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याला खूश करतोय.—नीतिवचनं २७:११ वाचा.

१४. जेव्हा इतर भाऊबहिणींना आपल्या संदेशात आवड दाखवणारी व्यक्‍ती भेटते तेव्हा आपल्याला आनंद का होतो?

१४ जेव्हा इतर भाऊबहिणींना आपल्या संदेशात आवड दाखवणारी व्यक्‍ती भेटते तेव्हा आपल्यालाही आनंद होतो. टेहळणी बुरूजमध्ये प्रचाराच्या कामाची तुलना एका हरवलेल्या मुलाला शोधण्याच्या कामाशी केली आहे. बरेच लोक त्याला वेगवेगळ्या ठिकाणी शोधत असतात. पण जेव्हा तो मुलगा सापडतो तेव्हा, फक्‍त ज्यांना तो सापडला त्यांनाच आनंद होत नाही तर सगळ्यांनाच आनंद होतो. त्याच प्रकारे मंडळीतले सगळे जण शिष्य बनवण्याच्या कामात सहभागी असतात. क्षेत्रात प्रचार करण्यासाठी मंडळीतल्या सगळ्यांचीच गरज असते. त्यामुळे जेव्हा एखादी नवीन व्यक्‍ती सभांना येऊ लागते तेव्हा सगळ्यांनाच आनंद होतो!

यहोवावरच्या आणि शेजाऱ्‍यांवरच्या प्रेमावर लक्ष द्या

१५. मत्तय २२:३७-३९ वचन लागू केल्यामुळे आपल्याला आणखी उत्साहाने प्रचार करायला कशी मदत होईल? (पानावरचं चित्रसुद्धा पाहा.)

१५ यहोवावरच्या आणि आपल्या शेजाऱ्‍यांवरच्या प्रेमावर लक्ष लावून आपण प्रचारकार्यातला आपला उत्साह आणखी वाढवू शकतो. (मत्तय २२:३७-३९ वाचा.) आपल्याला प्रचार करताना पाहून यहोवा किती खूश होत असेल आणि एखाद्या व्यक्‍तीने बायबल अभ्यास सुरू केल्यावर त्याला किती आनंद होत असेल, याची कल्पना करा. विचार करा, एखादी व्यक्‍ती आपला संदेश ऐकते आणि यहोवाची सेवा करायचा निर्णय घेते तेव्हा तिला कायमचं जीवन जगण्याची संधी मिळू शकते!—योहा. ६:४०; १ तीम. ४:१६.

यहोवावरच्या आणि शेजाऱ्‍यांवरच्या प्रेमावर लक्ष लावून आपण सेवाकार्यातला आनंद वाढवू शकतो (परिच्छेद १५ पाहा)


१६. आपण घराबाहेर पडू शकत नसलो तरी आपण सेवाकार्यातून आनंद कसा मिळवू शकतो? उदाहरणं द्या.

१६ काही कारणांमुळे तुम्हाला घराबाहेर पडता येत नाही का? जर तसं असेल तर यहोवावर आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम असल्याचं दाखवण्यासाठी तुम्ही काय करू शकता यावर लक्ष द्या. कोव्हीड-१९ च्या काळात सॅम्युएल आणि डॅनिया घराबाहेर पडू शकत नव्हते. त्या कठीण काळात त्यांनी नियमितपणे टेलीफोन साक्षकार्य केलं, पत्रं लिहिली, आणि झूमवरून बायबल अभ्यास चालवले. कॅन्सरचा उपचार घेण्यासाठी सॅम्युएल ज्या ठिकाणी जायचा त्या लोकांना त्याने प्रचार केला. तो म्हणतो: “कठीण प्रसंगांमुळे आपण मानसिक, शारीरिक, आणि आध्यात्मिक रितीने खचून जाऊ शकतो. पण अशा वेळी आपण यहोवाच्या सेवेतून आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.” याच काळात डॅनियाला पडल्यामुळे दुखापत झाली आणि ती तीन महिने बिछान्याला खिळून होती. त्यानंतरचे सहा महिने ती व्हिलचेअरवर होती. ती म्हणते: “माझ्या परिस्थितीनुसार मी जे काही करू शकत होते ते सगळं करायचा मी प्रयत्न केला. माझी काळजी घेणाऱ्‍या नर्सला मी प्रचार केला. त्यासोबतच, घरी सामान पोहचवणाऱ्‍या लोकांनासुद्धा मी प्रचार केला. वैद्यकीय कंपनीत काम करणाऱ्‍या एका स्त्रीशीसुद्धा मला फोनवरून चांगलं बोलता आलं.” सॅम्युएल आणि डॅनियाच्या परिस्थितीमुळे ते जास्त काही करू शकत नव्हते पण तरीसुद्धा त्यांना जे शक्य होतं ते त्यांनी केलं आणि त्यामुळे ते खूश होते.

१७. या लेखात दिलेल्या सल्ल्यांचा फायदा तुम्हाला कसा होईल?

१७ या लेखात दिलेले पाचही सल्ले लागू करायचा प्रयत्न करा. प्रत्येक सल्ला हा एखादा प्रदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्‍या सामग्रीसारखा आहे. एखाद्या पदार्थात लागणाऱ्‍या सगळ्या सामग्री टाकल्या की तो पदार्थ खूप चविष्ट होतो. त्याच प्रकारे या लेखात दिलेले सगळे सल्ले लागू केल्यामुळे तुम्हाला चुकीच्या विचारांशी लढायला आणि प्रचारकार्यात आणखी आनंद मिळवायला मदत होईल.

खाली दिलेल्या गोष्टी केल्यामुळे प्रचारकार्यातला आनंद वाढवायला कशी मदत होऊ शकते?

  • तयारी करायला वेळ काढल्यामुळे

  • धैर्यासाठी प्रार्थना केल्यामुळे

  • यहोवावरच्या आणि शेजाऱ्‍यांवरच्या प्रेमावर लक्ष दिल्यामुळे

गीत ६७ संदेश सांगू या!