व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

माझ्या कमतरतांमध्ये यहोवाचं सामर्थ्य दिसून आलं

माझ्या कमतरतांमध्ये यहोवाचं सामर्थ्य दिसून आलं

मी आणि माझी बायको १९८५ मध्ये कोलंबियात आलो. त्या वेळी तिथे खूप हिंसाचार माजला होता. शहरांमध्ये ड्रग माफिया भरपूर प्रमाणात होते. आणि लोकांवर हल्ला करण्यासाठी टोळ्या डोंगराळ भागात लपून बसायच्या. मेडलिन या ठिकाणी तर काही गुंड बंदुकी घेऊन रस्त्यांवर फिरायचे. ते ड्रग्स विकायचे, पैशांसाठी लोकांचा खून करायचे. त्यांनी आपलं काही बरंवाईट करू नये म्हणून लोक त्यांना पैसे द्यायचे. अशा हिंसक वातावरणामुळे गुंडगिरी करणारे हे लोक खूप काळ जगत नव्हते. या भयंकर ठिकाणी आम्ही नंतर सेवा करायला गेलो. आम्हाला असं वाटायचं की आम्ही एका वेगळ्याच जगात आहोत.

जगाच्या उत्तर टोकाला म्हणजे फिनलंडमध्ये राहणारे आमच्यासारखे दोन सर्वसामान्य लोक, दक्षिण अमेरिकेला कसे पोहोचले आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात मला कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या, ते मी सांगतो.

फिनलंडमध्ये माझं बालपण

माझा जन्म १९५५ मध्ये झाला. माझ्या तीन भावांपैकी मी सगळ्यात लहान. फिनलंडच्या दक्षिण किनारपट्टीवर मी लहानाचा मोठा झालो. आता त्या ठिकाणाला वांता शहर या नावाने ओळखलं जातं.

माझा जन्म होण्याच्या काही वर्षांआधीच माझ्या आईचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा झाला होता. पण माझे वडील विरोध करायचे. आई जेव्हा आम्हा मुलांना शिकवायची तेव्हा ते तिला तसं करू देत नव्हते. तसंच ते आम्हाला मंडळीच्या सभांनाही जाऊ देत नव्हते. त्यामुळे ते घरी नसताना माझी आई आम्हाला बायबलची मूलभूत सत्यं शिकवायची.

वयाच्या सातव्या वर्षापासूनच मी यहोवाच्या इच्छेप्रमाणे करायला शिकलो

लहानपणापासूनच मी यहोवाच्या इच्छेप्रमाणे करायला शिकलो. एकदा असं झालं की मी सात वर्षांचा असताना माझ्या शाळेतली टीचर माझ्यावर खूप जास्त भडकली. कारण मी वेरीलाते  (रक्‍ताचा वापर करून फिनलंडमध्ये बनवला जाणारा एक पॅनकेक) हा पदार्थ खात नव्हतो. एका हाताने तिने माझं तोंड उघडायचा प्रयत्न केला आणि दुसऱ्‍या हाताने ती त्या पदार्थाचा तुकडा चमच्याने माझ्या तोंडात कोंबायचा प्रयत्न करत होती. पण कसंतरी करून मी तिचा हात झटकला आणि चमचा तिच्या हातातून खाली पडला.

मी १२ वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील वारले. त्यानंतर मला मंडळीच्या सभांना जाता आलं. मंडळीतल्या भावांनी माझी खूप काळजी घेतली. ते माझ्यावर खूप प्रेम करायचे. आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रगती करण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. मी रोज बायबल वाचू लागलो आणि आपल्या प्रकाशनांचा मनापासून अभ्यास करू लागलो. अशा चांगल्या सवयींमुळे मी वयाच्या १४ व्या वर्षी, म्हणजे ८ ऑगस्ट १९६९ ला बाप्तिस्मा घेतला.

माझं शिक्षण संपल्यावर मी पायनियरींग सुरू केली. मग काही आठवड्यांमध्येच मी जास्त गरज असलेल्या ठिकाणी, म्हणजे पायलावेसी इथे सेवा करायला गेलो. हे ठिकाण फिनलंडच्या मध्यभागी आहे.

पायलावेसीमध्ये माझी भेट सिरका हिच्याशी झाली. ती मला खूप आवडली. कारण ती नम्र होती आणि तिचं यहोवावर खूप प्रेम होतं. मोठं नाव कमवायच्या किंवा ऐशआराम मिळवायच्या मागे ती नव्हती. आम्हाला कुठलीही नेमणूक मिळाली तरी यहोवाची पूर्णपणे सेवा करायची आमची तयारी होती. २३ मार्च १९७४ ला आमचं लग्न झालं. हनीमूनला जाण्याऐवजी आम्ही कार्टुला इथे सेवा करायला गेलो. कारण तिथे प्रचारकांची खूप जास्त गरज होती.

फिनलंडमध्ये कार्टुला गावातलं आमचं भाड्याचं घर

यहोवाने आमची काळजी घेतली

माझ्या भावाने आम्हाला दिलेली कार

आम्ही जर यहोवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं तर तो आमची काळजी घेईल हे त्याने आम्हाला दाखवून दिलं. लग्नाच्या सुरुवातीपासूनच आम्ही हे अनुभवलंय. (मत्त. ६:३३) मला आठवतं, की कार्टुलामध्ये असताना आमच्याजवळ गाडी नव्हती. सुरुवातीला आम्ही सायकलनेच प्रवास करायचो. पण हिवाळ्यात कडाक्याची थंडी असायची. त्यामुळे दूरच्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी आम्हाला गाडीची गरज होती. पण त्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते.

एकदा अचानकच माझा मोठा भाऊ आम्हाला भेटायला आला. त्याने त्याची गाडी आम्हाला दिली. गाडीचा इन्शुरन्सही भरलेला होता. आम्हाला फक्‍त पेट्रोल टाकायची गरज होती. अशा प्रकारे प्रचारासाठी आम्हाला एक गाडी मिळाली.

यहोवाने आम्हाला दाखवून दिलं होतं, की आमच्या गरजांची काळजी घेणं ही त्याची जबाबदारी आहे. आम्हाला फक्‍त त्याच्या राज्याला पहिलं स्थान द्यायचं होतं.

गिलियड प्रशाला

१९७८ मध्ये पायनियर सेवा प्रशालेत असताना

१९७८ मध्ये आम्ही पायनियर सेवा प्रशालेत होतो तेव्हा रायमो क्वोकानेन a या आमच्या एका प्रशिक्षकाने आम्हाला गिलियड प्रशालेचा अर्ज भरायचं प्रोत्साहन दिलं. गिलियडला जाता यावं म्हणून आम्ही इंग्रजी भाषासुद्धा शिकू लागलो. पण गिलियड प्रशालेचा अर्ज भरण्याआधीच आम्हाला १९८० मध्ये फिनलंडच्या शाखा कार्यालयात सेवा करण्यासाठी बोलवण्यात आलं. त्या वेळी बेथेलच्या सदस्यांना गिलियडचा अर्ज भरण्याची परवानगी नव्हती. पण आम्ही निराश झालो नाही. आम्हाला कुठे सेवा करायची इच्छा आहे, यापेक्षा यहोवाची आमच्यासाठी काय इच्छा आहे हे जास्त महत्त्वाचं होतं. म्हणून आम्ही बेथेलला जायचं आमंत्रण स्वीकारलं. आणि पुढे कधीतरी गिलियड प्रशालेला जायची संधी मिळेल या आशेने आम्ही इंग्रजी भाषा शिकत राहिलो.

काही वर्षांनी नियमन मंडळाने बेथेलच्या सदस्यांनासुद्धा गिलियड प्रशालेचा अर्ज भरायची परवानगी दिली. त्यामुळे आम्ही लगेच आमचे अर्ज भरले. पण याचा अर्थ आम्ही बेथेलमध्ये खूश नव्हतो असं नाही. उलट आम्ही खूप आनंदी होतो! पण आमचे गिलियडचे अर्ज स्वीकारले गेले, तर गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायला आम्ही तयार आहोत हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. पुढे आमचे अर्ज स्वीकारण्यात आले आणि सप्टेंबर १९८५ मध्ये आम्ही गिलियड प्रशालेच्या ७९ व्या वर्गातून पदवीधर झालो. त्यानंतर आम्हाला कोलंबियामध्ये सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं.

आमची पहिली मिशनरी नेमणूक

कोलंबियामध्ये असताना आम्हाला सुरुवातीला शाखा कार्यालयात सेवा करायची नेमणूक मिळाली. मी माझं काम मनापासून करायचा प्रयत्न केला. पण एका वर्षानंतर मला जाणवलं, की आम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदाच आणि शेवटचं मी एका वेगळ्या नेमणुकीसाठी विचारलं. त्यानंतर आम्हाला हुईला प्रदेशातल्या नेवा शहरामध्ये पूर्ण वेळ प्रचार करणारे मिशनरी म्हणून नेमण्यात आलं.

प्रचारकार्य मला खूप आवडतं. लग्नाआधी फिनलंडमध्ये पायनियर सेवा करत असताना मी काही वेळा सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचार करायचो. नंतर लग्न झाल्यावरही मी आणि सिरका दिवस-दिवसभर प्रचार करायचो. दूरच्या क्षेत्रांमध्ये काम करताना कधीकधी आम्ही आमच्या कारमध्येच झोपायचो. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचायचा आणि दुसऱ्‍या दिवशी सकाळी आम्हाला लवकर प्रचार सुरू करता यायचा.

मिशनरी म्हणून सेवा करताना आम्हाला पुन्हा एकदा तोच उत्साह अनुभवायला मिळाला जो पूर्वी आम्ही अनुभवायचो. काही काळातच आमच्या मंडळीमध्ये वाढ झाली. तिथले भाऊबहीण खूप प्रेमळ, आदराने वागणारे आणि मनापासून कदर करणारे होते.

प्रार्थनेची ताकद

ज्या नेवा शहरात आम्हाला नेमलं होतं त्याच्या आसपास अशी बरीच गावं होती जिथे एकही साक्षीदार नव्हता. आनंदाचा संदेश तिथे कसा पोहोचेल याची मला चिंता वाटायची. आणि हल्ला करणाऱ्‍या टोळ्यांमुळे नवीन किंवा बाहेरच्या लोकांसाठी ही ठिकाणं सुरक्षितही नव्हती. त्यामुळे मी अशी प्रार्थना करू लागलो, की या गावांमधल्या एकातरी व्यक्‍तीने साक्षीदार बनावं. पण सत्य शिकण्यासाठी त्या व्यक्‍तीला नेवामध्ये राहावं लागेल असं मला वाटत होतं. म्हणून मी अशीसुद्धा प्रार्थना करू लागलो, की त्याने बाप्तिस्मा घेऊन आध्यात्मिक प्रगती करावी आणि त्याच्या गावात जाऊन प्रचार करावा. पण यापेक्षा चांगला उपाय यहोवाकडे आहे हे मला नंतर कळलं.

याच्या काही काळानंतरच मी फरनॅन्डो गोन्झालेझ या तरुणासोबत बायबल अभ्यास सुरू केला. तो ॲल्हेसेरेस या गावात राहायचा. तिथे एकही साक्षीदार नव्हता. फरनॅन्डो ५० किलोमीटरचा प्रवास करून नेवामध्ये कामाला यायचा. तो प्रत्येक अभ्यासाची खूप चांगली तयारी करायचा. आणि त्याने सभांना यायलाही लगेच सुरुवात केली. अभ्यासाच्या पहिल्या आठवड्यापासूनच तो त्याच्या गावातल्या लोकांना गोळा करून बायबल अभ्यासातून शिकलेल्या गोष्टी त्यांना सांगू लागला.

१९९३ मध्ये फरनॅन्डोसोबत

अभ्यास सुरू केल्याच्या सहा महिन्यांनंतरच जानेवारी १९९० मध्ये फरनॅन्डोचा बाप्तिस्मा झाला. त्यानंतर तो पायनियर बनला. आता ॲल्हेसेरेसमध्ये एक साक्षीदार असल्यामुळे शाखा कार्यालयाला तिथे खास पायनियरांना पाठवता येणार होतं. मग फेब्रुवारी १९९२ मध्ये त्या गावात एक मंडळी सुरू झाली.

पण फरनॅन्डो त्याच्याच गावात प्रचार करत राहिला नाही. लग्नानंतर तो आणि त्याची बायको ऑल्गा, प्रचार करण्यासाठी सॅन व्हिसेंट डेल कॅगुआन या गावात राहायला गेले. तिथेसुद्धा एकही साक्षीदार नव्हता. तिथे त्यांनी एक मंडळी सुरू केली. मग २००२ मध्ये फरनॅन्डोला विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. तेव्हापासून आजपर्यंत तो आणि त्याची बायको प्रवासी कार्य करत आहेत.

या अनुभवातून मी शिकलो, की आपल्या नेमणुकीतल्या विशिष्ट गोष्टींसाठी प्रार्थना करणं किती महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्या गोष्टी करणं शक्य नाही त्या यहोवा करू शकतो. कारण शेवटी कापणीचं हे काम आपलं नाही, तर यहोवाचं आहे.—मत्त. ९:३८.

यहोवा आपल्यामध्ये ‘इच्छा निर्माण करतो आणि आपल्याला कार्य करायची ताकदही देतो’

१९९० मध्ये आम्हाला विभागीय कार्यात नेमण्यात आलं. आमची पहिली नेमणूक कोलंबियाचं राजधानी शहर, बोगोटा इथे होती. ती नेमणूक पूर्ण करता येईल का अशी भीती आम्हाला वाटत होती. कारण मी आणि माझी बायको साधीसरळ माणसं होतो. आणि आमच्यात काही खास कौशल्यंही नव्हती. शिवाय अशा गजबजलेल्या शहरात राहायची सवयसुद्धा आम्हाला नव्हती. पण फिलिप्पैकर २:१३ मध्ये दिलेलं अभिवचन यहोवाने आमच्या बाबतीत पूर्ण केलं. तिथे म्हटलंय: “देवाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तो स्वतः तुम्हाला उत्साहित करतो. आणि तुम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करावं, म्हणून तो तुमच्यामध्ये तशी इच्छा निर्माण करतो आणि ते कार्य करायची ताकदही देतो.”

सुरुवातीला मी ज्या मेडलिन शहराबद्दल सांगितलं होतं, तिथे मला नंतर विभागीय कार्यासाठी नेमणूक मिळाली. तिथल्या लोकांना हिंसेची इतकी सवय झाली होती की त्यांना काहीच फरक पडत नव्हता. एकदा तर असं झालं, की मी एका व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास करत होतो आणि त्याच्या घराबाहेरच गोळीबार सुरू झाला. मी इतका घाबरलो की मला वाटलं खाली वाकून लपून बसावं. पण तो बायबल विद्यार्थी अगदी शांतपणे परिच्छेद वाचत राहिला. त्याचा परिच्छेद पूर्ण वाचून झाल्यानंतर त्याने मला म्हटलं, की ‘मी दोनच मिनिटात आलो.’ थोड्या वेळानंतर तो त्याच्या दोन मुलांना घरी घेऊन आला आणि त्याने शांतपणे मला म्हटलं, “सॉरी हं, मला मुलांना घरात आणायचं होतं.”

अशाच एकदोन प्रसंगांचा आम्हाला पुढेही सामना करावा लागला. एकदा आम्ही घरोघरचं प्रचारकार्य करत होतो तेव्हा माझी बायको पळत माझ्याकडे आली. ती खूप घाबरली होती आणि तिच्या चेहऱ्‍याचा रंगच उडाला होता. तिने मला म्हटलं की कोणीतरी तिला गोळी मारायचा प्रयत्न करत होतं. हे ऐकून मी घाबरूनच गेलो. नंतर आम्हाला कळलं, की त्या व्यक्‍तीला सिरकाला मारायचं नव्हतं, तर तिच्या बाजूने जो माणूस पळत होता त्याला मारायचं होतं.

काही काळानंतर या गोष्टींबद्दल आमची भीती कमी झाली. तिथले भाऊबहीण या आणि यांपेक्षा भयानक परिस्थितींचा किती हिमतीने सामना करतात हे पाहून आम्हाला प्रोत्साहन मिळालं. आम्ही विचार केला, की यहोवा जर त्यांना मदत करतोय तर तो आम्हालाही नक्कीच मदत करेल. आम्ही नेहमी तिथल्या वडिलांनी दिलेला सल्ला ऐकायचो, सावध राहायचो आणि बाकी सगळं यहोवावर सोपवून द्यायचो.

पण परिस्थिती नेहमीच भयानक नसायची. एकदा मी एका घरी प्रचाराला गेलो होतो. तिथे घराच्या बाहेर दोन बायका जोरजोरात भांडत असल्याचं मला ऐकू आलं. मला त्यांचं भांडण ऐकण्यात एवढी काही उत्सुकता नव्हती. पण घरमालकीण मला म्हणाली, की ‘जरा बाहेर वरांड्यात या तरी!’ आम्ही बाहेर जाऊन पाहतो तर काय, चक्क दोन पोपट शेजारच्या त्या दोन बायकांच्या भांडणाची नक्कल करत होते!

नवीन नेमणुका आणि नवीन आव्हानं

१९९७ मध्ये मला सेवा प्रशिक्षण प्रशालेत b प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं. अशा प्रशालांना हजर राहायला मला नेहमीच आवडायचं. पण मला एक दिवस तिथे प्रशिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी मिळेल असा कधी मी स्वप्नातही विचार केला नव्हता.

नंतर मला प्रांतीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. पण ही व्यवस्था जेव्हा बंद पडली तेव्हा मी पुन्हा विभागीय कार्यात गेलो. गेल्या ३० पेक्षा जास्त वर्षांपासून मी एक प्रशिक्षक आणि विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करत आहे. या नेमणुकांमुळे मला खूप आशीर्वाद मिळाले आहेत. पण याचा अर्थ आमच्यावर कधी समस्या आल्याच नाहीत असं नाही. चला त्याबद्दल पुढे सांगतो.

मी माझ्या मतांवर ठाम राहणारा माणूस आहे. यामुळे मला कठीण समस्यांचा सामना करायला मदत झाली आहे. पण कधीकधी मंडळीतल्या काही चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी मी जरा जास्तच आवेशी होतो. एकदा मी मंडळीतल्या काही भाऊबहिणींना खूपच जास्त जोर देऊन सांगितलं, की आपण प्रेमाने आणि समजूतदारपणे कसं वागलं पाहिजे. पण खरंतर त्या वेळी मलाच त्या गुणांची जास्त गरज होती.—रोम. ७:२१-२३.

माझ्या कमतरतांमुळे मला कधीकधी खूप निराशही वाटायचं. (रोम. ७:२४) एकदा तर मी यहोवाला अशी प्रार्थना केली, की मी माझी मिशनरी सेवा सोडून फिनलंडला जावं हेच माझ्यासाठी चांगलं राहील. पण त्याच संध्याकाळी मी मंडळीच्या सभेला गेलो. तिथे मला खूप प्रोत्साहन मिळालं. आणि मला खातरी पटली की मी माझ्या नेमणुकीत टिकून राहिलं पाहिजे आणि माझ्या कमतरतांवर मात केली पाहिजे. यहोवाने माझ्या प्रार्थनांचं उत्तर किती स्पष्टपणे दिलंय हे आठवून माझं मन आजसुद्धा भरून येतं. तसंच, त्याने माझ्या कमतरतांवर मात करायला मला किती प्रेमाने मदत केली याबद्दलही मला खूप कदर आहे.

यहोवा पुढेही आम्हाला सांभाळेल

मला आणि सिरकाला आमच्या आयुष्यातली बरीचशी वर्षं पूर्ण वेळच्या सेवेत घालवायचा बहुमान मिळाला, याबद्दल आम्ही यहोवाचे खरंच खूप आभारी आहोत! या वर्षांदरम्यान मला एका प्रेमळ आणि विश्‍वासू बायकोची साथ मिळाली याबद्दलसुद्धा मी यहोवाचा खूप आभारी आहे.

लवकरच मी ७० वर्षांचा होईन. मला माहीत आहे की मग मला प्रशिक्षक आणि प्रवासी पर्यवेक्षक म्हणून काम करता येणार नाही. पण यामुळे मी निराश होत नाही. कारण यहोवाचा गौरव करण्यासाठी नेहमी लोकांच्या नजरेत असणं किंवा आपल्याकडे एखादी महत्त्वाची नेमणूक असणं गरजेचं नाही. तर मी हे पक्कं मानतो, की मर्यादा ओळखून यहोवाची सेवा करणं आणि त्याच्याबद्दल प्रेम आणि कदर असल्यामुळे त्याची स्तुती करणं, या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण याच गोष्टींमुळे यहोवाचा गौरव होतो.—मीखा ६:८; मार्क १२:३२-३४.

आजपर्यंत मला ज्या अनेक नेमणुका मिळाल्या त्यांचा विचार केल्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात येते. ती म्हणजे, मी इतरांपेक्षा जास्त पात्र होतो किंवा माझ्यात काही खास कौशल्यं होती म्हणून मला या नेमणुका मिळाल्या असं नाही. उलट यहोवाची अपार कृपा असल्यामुळेच त्याने मला या नेमणुका दिल्या. माझ्यात कमतरता असूनसुद्धा यहोवाने मला हे बहुमान दिलेत. मला माहीत आहे की मी फक्‍त यहोवाच्या मदतीमुळेच माझ्या नेमणुका पूर्ण करू शकलो. आणि अशा प्रकारे माझ्या कमतरतांमध्ये यहोवाचं सामर्थ्य दिसून आलंय.—२ करिंथ. १२:९.

a रायमो क्वोकानेन यांची जीवन कथा हिंदीमध्ये १ एप्रिल २००६ च्या टेहळणी बुरूज अंकात “हमने यहोवा की सेवा करने की ठान ली” या शिर्षकाखाली प्रकाशित करण्यात आली आहे.

b आता या प्रशालेऐवजी सुवार्तिकांसाठी प्रशाला चालवली जाते.