व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १९

गीत २२ राज्य सुरू झालं​—यावे आता जगी!

यहोवा भविष्यात लोकांचा न्याय कसा करेल?

यहोवा भविष्यात लोकांचा न्याय कसा करेल?

“कोणाचाही नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही.”​—२ पेत्र ३:९.

या लेखात:

आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो की यहोवा भविष्यात नीतीने आणि योग्यपणे न्याय करेल.

१. आपण रोमांचक काळात जगत आहोत असं का म्हणता येईल?

 आज आपण एका रोमांचक काळात जगत आहोत! दररोज बायबलच्या भविष्यवाण्या पूर्ण होताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. उदाहरणार्थ, जगावर वर्चस्व मिळवण्यासाठी “उत्तरेच्या राजाची” आणि “दक्षिणेच्या राजाची” चढाओढ आपण पाहू शकतो. (दानी. ११:४०, तळटीप.) तसंच संपूर्ण जगभरात कल्पनाही करता येणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित केला जात असल्याचं आपण पाहतोय. आणि लाखो लोक त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याचंही आपण पाहू शकतोय. (यश. ६०:२२; मत्त. २४:१४) शिवाय, “योग्य वेळी” भरपूर प्रमाणात आपल्याला आध्यात्मिक अन्‍नसुद्धा मिळत आहे.​—मत्त. २४:४५-४७.

२. आपण कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकतो आणि कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे?

लवकरच होणाऱ्‍या काही महत्त्वाच्या घटनांबद्दल आपल्याला स्पष्टपणे समजावं, म्हणून यहोवा आपल्याला आजही मदत करत आहे. (नीति. ४:१८; दानी. २:२८) आपण याची खातरी बाळगू शकतो की मोठं संकट सुरू झाल्यानंतर, यहोवाला विश्‍वासू राहता यावं आणि आध्यात्मिक रितीने प्रगती करता यावी म्हणून ज्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे त्या गोष्टी आपल्याला नक्की कळतील. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे, लवकरच अशाही काही गोष्टी होणार आहेत ज्यांबद्दल आपल्याला माहीत नाही. पण सगळ्यात आधी आपण पूर्वी जे म्हटलं होतं त्यात आता बदल करण्याची का गरज आहे याबद्दल चर्चा करू या. मग भविष्यात होणाऱ्‍या घटनांबद्दल आणि यहोवा त्या वेळी कसं कार्य करेल, याबद्दल आपल्याला काय माहीत आहे  या गोष्टीवर चर्चा करू या.

आपल्याला काय माहीत नाही?

३. मोठं संकट सुरू झाल्यानंतर आपला जीव वाचवण्याची संधी लोकांना मिळेल की नाही याबद्दल आपण काय मानायचो आणि का?

आधी आपण असं म्हणायचो, की मोठं संकट सुरू झाल्यानंतर विश्‍वास न ठेवणारे लोक यहोवाची बाजू घेऊ शकणार नाहीत. आणि त्यामुळे हर्मगिदोनातून वाचू शकणार नाहीत. आपण आधी असं मानायचो की जलप्रलयाच्या काळात झालेली प्रत्येक घटना भविष्यात होणाऱ्‍या घटनांना सूचित करते. उदाहरणार्थ, आपण असा तर्क मांडायचो, की ज्याप्रमाणे जलप्रलयाच्या सुरुवातीला यहोवाने जहाजाचं दार बंद केलं, त्याचप्रमाणे मोठं संकट सुरू झाल्यानंतर यहोवा या सैतानाच्या दुष्ट जगासाठी “दार बंद” करेल. आणि त्यानंतर लोक आपला जीव वाचवू शकणार नाहीत.​—मत्त. २४:३७-३९.

४. जलप्रलयाचा अहवाल भविष्यात घडणाऱ्‍या गोष्टींना सूचित करतो असं आपण का मानत नाही? स्पष्ट करा.

जलप्रलयाचा अहवाल भविष्यात होणाऱ्‍या घटनांना सूचित करतो असं आपण समजावं का? नाही. का बरं? कारण बायबलमध्ये यासाठी आपल्याला कोणताही आधार मिळत नाही. a हे खरं आहे, की येशूने नोहाच्या दिवसांची तुलना त्याच्या उपस्थितीच्या काळाशी केली. पण त्याने असं कुठेही सुचवलं नाही, की या जलप्रलयादरम्यान घडलेल्या प्रत्येक घटनेचा आणि प्रत्येक व्यक्‍तीचा संबंध भविष्यातल्या गोष्टींशी आहे. शिवाय त्याने असंही म्हटलं नाही, की जेव्हा यहोवाने जहाजाचं दार बंद केलं तेव्हा त्याचा संबंध भविष्यातल्या घटनांशी आहे. पण या अहवालातून आपण काहीच शिकू शकत नाही असा याचा अर्थ होत नाही.

५. (क) जलप्रलय येण्याआधी नोहाने काय केलं? (इब्री लोकांना ११:७; १ पेत्र ३:२०) (ख) प्रचाराच्या कामाच्या बाबतीत नोहाच्या दिवसांत आणि आपल्या दिवसांत कोणता सारखेपणा आहे?

जेव्हा नोहाला यहोवाकडून सूचना मिळाली, तेव्हा त्याने जहाज बांधलं आणि असं करून दाखवून दिलं की तो यहोवाला विश्‍वासू आहे. (इब्री लोकांना ११:७; १ पेत्र ३:२० वाचा.) त्याचप्रमाणे, लोक जेव्हा देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश ऐकतात तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे कार्यही केलं पाहिजे. (प्रे. कार्यं ३:१७-२०) पेत्रने नोहाला “नीतिमत्त्वाचा प्रचारक” म्हटलं. (२ पेत्र २:५) पण आधीच्या लेखात आपण चर्चा केल्याप्रमाणे, जलप्रलय येण्याआधी पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी नोहाने प्रचाराची एखादी मोहीम राबवली होती की नव्हती, हे आपल्याला माहीत नाही. पण आज आपण जगभरात प्रचाराचं काम करत आहोत. आणि आवेशाने या कामात सहभाग घ्यायचा प्रयत्न करत आहोत. पण आपण कितीही मेहनत घेतली तरीही अंत येण्याआधी पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्‍तीपर्यंत आपण आनंदाचा संदेश पोचवू शकत नाही. का बरं?

६-७. अंत येण्याआधी राज्याचा संदेश पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांपर्यंत आपल्याला का पोचवता येणार नाही?

आपलं प्रचाराचं काम किती व्यापक असेल याबद्दल येशूने काय म्हटलं त्याचा विचार करा. त्याने म्हटलं “सगळ्या राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल.” (मत्त. २४:१४) आज कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे. राज्याचा संदेश आज जवळजवळ १,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये घोषित केला जात आहे. आणि jw.org या आपल्या वेबसाईटमुळे पृथ्वीवरच्या जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याच्या आनंदाच्या संदेशाबद्दल जाणून घेता येतंय.

येशूने शिष्यांना असंही म्हटलं होतं, की तो येण्याआधी, त्याच्या शिष्यांना ‘सर्व शहरांचा दौरा पूर्ण करता येणार नाही’ किंवा सगळ्या लोकांना प्रचार करता येणार नाही. (मत्त. १०:२३; २५:३१-३३) येशूचे हे शब्द आज आपल्या दिवसांतही पूर्ण होतील. कारण आज लाखो लोक अशा भागात राहतात जिथे सहजपणे प्रचारकार्य करता येत नाही. यासोबतच दर मिनिटाला शेकडो मुलं जन्माला येतात. आपण प्रत्येक “राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या” लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोचवण्याचा प्रयत्न करतो. (प्रकटी. १४:६) पण अंत येण्याआधी प्रत्येक व्यक्‍तीपर्यंत आपण तो पोचवू शकणार नाही.

८. यहोवा भविष्यात ज्या प्रकारे न्याय करणार आहे त्याबद्दल आपल्या मनात कोणता प्रश्‍न येऊ शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

पण यामुळे एक प्रश्‍न निर्माण होतो. तो म्हणजे मोठं संकट सुरू होण्याआधी, ज्यांना आनंदाचा संदेश ऐकायची संधी मिळाली नाही त्यांचं काय होईल? तेव्हा देव आणि त्याचा मुलगा, ज्याच्यावर त्याने न्याय करायची जबाबदारी सोपवली आहे, त्यांचा न्याय कसा करतील? (योहा. ५:१९, २२, २७; प्रे. कार्यं १७:३१) या लेखाच्या मुख्य वचनात असं म्हटलंय, की “कोणाचाही नाश व्हावा अशी [यहोवाची] इच्छा नाही.” उलट, “सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.” (२ पेत्र ३:९; १ तीम. २:४) पण आपण हेसुद्धा मान्य केलं पाहिजे, की यहोवा त्या लोकांचा कसा न्याय करेल याबद्दल त्याने आपल्याला आतापर्यंत काही स्पष्ट केलं नाही. आणि त्याने आत्तापर्यंत काय केलंय आणि तो काय करेल हे सांगायची त्याला गरजही नाही.

मोठं संकट सुरू होण्याआधी ज्यांना आनंदाचा संदेश ऐकायची संधी मिळाली नाही त्यांचा यहोवा कसा न्याय करेल? (परिच्छेद ८ पाहा) c


९. यहोवाने बायबलमध्ये कोणती गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे?

यहोवाने बायबलमध्ये तो पुढे काय करणार आहे याबद्दल आधीच सांगितलं आहे. ज्यांना आनंदाचा संदेश ऐकायची आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात बदल करायची संधी मिळाली नाही, अशा “अनीतिमान” लोकांना यहोवा पुन्हा उठवेल असं बायबलमध्ये सांगितलंय. (प्रे. कार्यं २४:१५; लूक २३:४२, ४३) पण ही गोष्ट लक्षात घेताना आणखी काही महत्त्वाचे प्रश्‍न निर्माण होतात.

१०. मोठ्या संकटादरम्यान मेलेल्या लोकांबद्दल आणखी कोणते प्रश्‍न निर्माण होतात?

१० मोठ्या संकटादरम्यान ज्या लोकांचा मृत्यू होईल त्यांचा पुनरुत्थानाच्या आशेविना कायमचा नाश होईल का? बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं, की जे लोक यहोवा आणि त्याच्या सैन्याविरुद्ध असतील त्यांचा हर्मगिदोनमध्ये नाश केला जाईल आणि त्यांना पुनरुत्थानाची काहीच आशा नसेल. (२ थेस्सलनी. १:६-१०) पण मग इतर लोकांबद्दल काय? उदाहरणार्थ, मोठ्या संकटादरम्यान ज्यांचा नैसर्गिकपणे किंवा अपघातामुळे मृत्यू झालाय किंवा जे इतरांच्या हातून मारले गेलेत, त्यांच्याबद्दल काय? (उप. ९:११; जख. १४:१३) या लोकांचा “अनीतिमान” लोकांमध्ये सामावेश असेल का? आणि त्यांना नवीन जगात पुन्हा उठवलं जाईल का? याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही.

आपल्याला काय माहीत आहे?

११. हर्मगिदोनात कोणत्या गोष्टीच्या आधारावर लोकांचा न्याय केला जाईल?

११ भविष्यात कोणकोणत्या गोष्टी घडतील याबद्दल आपल्याला बऱ्‍याच गोष्टी माहीत आहेत. उदाहरणार्थ, लोक ख्रिस्ताच्या भावांसोबत कसं वागतील या आधारावर त्यांचा हर्मगिदोनात न्याय केला जाईल. (मत्त. २५:४०) ज्यांनी ख्रिस्ताच्या अभिषिक्‍तांना पाठिंबा दिलाय त्यांचा मेंढरं म्हणून न्याय केला जाईल. तसंच आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की ख्रिस्ताचे भाऊ म्हणजे अभिषिक्‍त जण मोठ्या संकटाची सुरुवात झाल्यानंतरसुद्धा काही काळ पृथ्वीवर असतील आणि हर्मगिदोनाची सुरुवात होण्याच्या थोड्या काळाआधी त्यांना स्वर्गात घेतलं जाईल. जोपर्यंत ख्रिस्ताचे भाऊ या पृथ्वीवर आहेत, तोपर्यंत नम्र मनाच्या लोकांना, त्यांना आणि ते करत असलेल्या कामाला पाठिंबा द्यायची संधी असेल. (मत्त. २५:३१, ३२; प्रकटी. १२:१७) पण या सगळ्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या का आहेत?

१२-१३. ‘मोठ्या बाबेलचा’ नाश होताना पाहिल्यानंतर काही लोक कदाचित काय करतील? (चित्रंसुद्धा पाहा.)

१२ मोठ्या संकटाची सुरुवात झाल्यानंतरसुद्धा असं होऊ शकतं, की काही लोक ‘मोठ्या बाबेलचा’ नाश होताना पाहतील तेव्हा त्यांना यहोवाचे साक्षीदार खूप आधीपासूनच या घटनेबद्दल सांगत होते हे आठवेल. मग जेव्हा ते या घटना प्रत्यक्ष घडताना पाहतील, तेव्हा त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल का?​—प्रकटी. १७:५; यहे. ३३:३३.

१३ मोशेच्या काळात इजिप्तमध्येसुद्धा असंच घडलं होतं. जेव्हा इस्राएली लोकांना तिथून सुटका मिळाली तेव्हा त्यांच्यासोबत “विदेश्‍यांचा एक मोठा समूहसुद्धा निघाला” होता. कदाचित त्यांच्यापैकी काही जणांनी, मोशेने दहा पीडांबद्दल जो इशारा दिला होता आणि तो कसा खरा ठरला हे पाहिलं असेल. आणि त्यामुळे यहोवाच खरा देव आहे या गोष्टीवर त्यांचा विश्‍वास बसला असेल. (निर्ग. १२:३८) मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतरसुद्धा जर काही लोकांच्या बाबतीत असंच झालं, तर अंत येण्याआधी ते आपल्यात सामील झाले म्हणून आपल्याला वाईट वाटेल का? नक्कीच नाही! कारण आपला स्वर्गातला पिता “दयाळू, करुणामय आणि सहनशील देव; एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला” b असा देव आहे. आणि त्याचं अनुकरण करायची आपली इच्छा आहे.​—निर्ग. ३४:६.

काही लोक ‘मोठ्या बाबेलचा’ नाश होताना पाहतील तेव्हा त्यांना यहोवाचे साक्षीदार खूप आधीपासूनच या घटनेबद्दल सांगत होते हे आठवेल (परिच्छेद १२-१३ पाहा) d


१४-१५. एखाद्या व्यक्‍तीचा मृत्यू केव्हा होता किंवा ती कुठे राहते या गोष्टीवरून तिला सर्वकाळाचं जीवन मिळेल की नाही हे ठरतं का? स्पष्ट करा. (स्तोत्र ३३:४, ५)

१४ कधीकधी तुम्ही काही जणांना आपल्या नातेवाइकांबद्दल असं बोलताना ऐकलं असेल, की “जर मोठं संकट सुरू होण्याआधीच माझ्या अमुक एका नातेवाइकाचा मृत्यू झाला तर निदान पुनरुत्थानाची त्याला आशा तरी असेल.” आपल्या नातेवाइकांवर त्यांचं प्रेम असल्यामुळे ते कदाचित असं म्हणत असतील. पण एखादी व्यक्‍ती केव्हा  मरते या गोष्टीवर त्या व्यक्‍तीला अनंतकाळाचं जीवन मिळेल का हे ठरत नाही. यहोवा एक परिपूर्ण न्यायाधीश आहे आणि तो नेहमी न्यायाने आणि नीतीने निर्णय घेतो. (स्तोत्र ३३:४, ५ वाचा.) त्यामुळे आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की “सगळ्या पृथ्वीचा न्यायाधीश” योग्य तेच करेल.​—उत्प. १८:२५.

१५ तसंच असं म्हणणंसुद्धा योग्य ठरेल, की एखादी व्यक्‍ती कुठे  राहते या गोष्टीवर त्या व्यक्‍तीला सर्वकाळाचं जीवन मिळेल की नाही हे ठरत नाही.  कारण काही देशांमध्ये लोकांना राज्याचा संदेश ऐकायची संधी मिळत नाही. आणि फक्‍त या कारणामुळेच यहोवा त्यांचा बकऱ्‍यांसारखे लोक म्हणून न्याय करेल असा विचार करणंसुद्धा चुकीचं ठरेल. (मत्त. २५:४६) उलट, सगळ्या पृथ्वीच्या नीतिमान न्यायाधीशाला या लोकांची आपल्यापेक्षा जास्त काळजी आहे. आपल्याला हे माहीत नाही, की मोठ्या संकटादरम्यान यहोवा घटनांना कसं वळण देईल. पण जेव्हा यहोवा राष्ट्रांच्यासमोर स्वतःला पवित्र करेल, तेव्हा कदाचित या लोकांना त्याला जाणून घ्यायची, विश्‍वास ठेवायची आणि त्याची बाजू घ्यायची संधी मिळेल.​—यहे. ३८:१६.

मोठ्या संकटाची सुरुवात झाल्यानंतर, . . . काही जण या घटना प्रत्यक्ष घडताना पाहतील, तेव्हा त्यांच्या मनोवृत्तीत बदल होईल का?

१६. यहोवाबद्दल आपल्याला कोणती गोष्ट माहीत आहे? (चित्रसुद्धा पाहा.)

१६ बायबलचा अभ्यास करून आपल्याला हे कळलंय, की यहोवा जीवनाला किती मौल्यवान समजतो. त्याने आपल्याला कायमचं जीवन मिळावं म्हणून आपल्या मुलाचं जीवन बलिदान म्हणून दिलं. (योहा. ३:१६) तसंच त्याला आपल्याबद्दल किती कळवळा आहे हेसुद्धा आपण अनुभवलंय. (यश. ४९:१५) तो आपल्यातल्या प्रत्येकाला नावाने ओळखतो. इतकंच नाही, तर ज्या गोष्टी आपल्याला इतरांपेक्षा वेगळं करतात, जसं की आपण कसे दिसतो, आपला स्वभाव, आपलं व्यक्‍तिमत्त्व, आणि आपल्या सगळ्या आठवणी, या सगळ्या बारीकसारीक गोष्टींसोबत तो आपल्याला पुन्हा निर्माण करू शकतो! (मत्त. १०:२९-३१) खरंच, आपण या गोष्टीवर पक्का भरवसा ठेवू शकतो, की आपला स्वर्गातला प्रेमळ पिता अगदी योग्यपणे, नीतीने आणि दयेने प्रत्येकाचा न्याय करेल.​—याको. २:१३.

आपण या गोष्टीवर पक्का भरवसा ठेवू शकतो, की आपला स्वर्गातला प्रेमळ पिता अगदी योग्यपणे, नीतीने आणि दयेने प्रत्येकाचा न्याय करेल (परिच्छेद १६ पाहा)


१७. पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१७ ही स्पष्ट समज मिळाल्यामुळे, आपलं प्रचाराचं काम आता आधीपेक्षाही जास्त महत्त्वाचं बनलंय. आपण असं का म्हणू शकतो? आणि वेळ न घालवता आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत राहण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला प्रवृत्त करते? या प्रश्‍नांवर आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.

गीत ७६ वाटतं कसं सांगा?

a हा बदल का करण्यात आला हे जाणून घेण्यासाठी १५ मार्च २०१५ च्या टेहळणी बुरूज  अंकातला “कारण तुला असेच योग्य दिसले” हा पान ७-११ वरचा लेख पाहा.

b मोठ्या बाबेलचा नाश झाल्यानंतर, मागोगच्या गोगचा हल्ला होत असताना यहोवाच्या सगळ्या सेवकांची परीक्षा होईल. तसंच मोठ्या बाबेलच्या नाशानंतर जे लोक देवाच्या लोकांमध्ये सामील होतील त्यांचीसुद्धा परीक्षा होईल.

c चित्रांचं वर्णन: जगभरात चाललेल्या प्रचारकार्यात आपण ज्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही अशा लोकांची तीन चित्रं: (१) इतर धर्माचं वर्चस्व असल्यामुळे आनंदाचा संदेश लोकांपर्यंत पोचवणं धोक्याचं आहे अशा ठिकाणी राहणारी एक स्त्री. (२) जिथे सत्ताधारी राजकीय व्यवस्थेने आपल्या कार्यावर बंदी घातली आहे आणि आनंदाचा संदेश सांगणं धोकादायक आहे अशा ठिकाणी राहत असलेलं एक जोडपं. (३) जिथे पोचणं जवळजवळ अशक्य आहे अशा अतिशय दुर्गम भागात राहणारा एक माणूस.

d चित्राचं वर्णन: सत्य सोडून गेलेल्या एका तरुण स्त्रीला ‘मोठ्या बाबेलच्या’ नाशाबद्दल शिकलेल्या गोष्टी आठवतात. तिची मनोवृत्ती बदलते आणि ती आपल्या ख्रिस्ती पालकांकडे परत येते. जर असं काही घडलं, तर आपण दयाळू आणि कनवाळू असलेल्या आपल्या स्वर्गातल्या पित्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि पापी व्यक्‍ती परत आली म्हणून आनंद मानला पाहिजे.