व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख २०

गीत ६७ संदेश सांगू या!

प्रचार करत राहण्यासाठी प्रेम तुम्हाला प्रवृत्त करत राहो!

प्रचार करत राहण्यासाठी प्रेम तुम्हाला प्रवृत्त करत राहो!

“सगळ्या राष्ट्रांत आधी राज्याबद्दलच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा होणं गरजेचं आहे.”​—मार्क १३:१०.

या लेखात:

प्रेमामुळे आपल्याला आवेशाने आणि मनापासून प्रचार करायला प्रेरणा कशी मिळू शकते ते पाहा.

१. २०२३ च्या वार्षिक सभेत आपल्याला कोणत्या गोष्टी कळल्या?

 २०२३ च्या वार्षिक सभेत, a आपल्याला काही विषयांवर आपली समज स्पष्ट करण्यात आली. त्यासोबतच आपल्या प्रचारकार्याबद्दल आपल्याला काही रोमांचक घोषणा ऐकायला मिळाल्या. उदाहरणार्थ, आपल्याला कळलं की मोठ्या बाबेलच्या नाशानंतरही  काही लोकांना कदाचित यहोवाच्या लोकांमध्ये सामील व्हायची संधी मिळेल. यासोबतच आपल्याला हेही कळलं, की नोव्हेंबर २०२३ पासून राज्य प्रचारकांना त्यांच्या सेवाकार्यातल्या सगळ्याच गोष्टींचा अहवाल देण्याची गरज नाही. मग या सगळ्या बदलांमुळे सेवाकार्याचं महत्त्व आधीपेक्षा कमी झालंय का? नक्कीच नाही!

२. दिवसेंदिवस आपलं प्रचाराचं काम आणखीन जास्त महत्त्वाचं का होत चाललंय? (मार्क १३:१०)

दिवसेंदिवस आपलं प्रचाराचं काम आणखीन  जास्त महत्त्वाचं बनत चाललंय. का? कारण आपल्याकडे खूप कमी वेळ उरलाय. येशूने शेवटच्या दिवसांत होणाऱ्‍या प्रचारकार्याबद्दल काय सांगितलं होतं याचा विचार करा. (मार्क १३:१० वाचा.) मत्तयच्या अहवालाप्रमाणे येशूने म्हटलं होतं, की आनंदाचा संदेश संपूर्ण जगात घोषित केला जाईल आणि त्यानंतर “अंत”  येईल. (मत्त. २४:१४) हा अंत सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या संपूर्ण नाशाला सूचित करतो. भविष्यात ज्या घटना घडणार आहेत, त्यासाठी यहोवाने ‘दिवस आणि वेळ’ ठरवली आहे. (मत्त. २४:३६; २५:१३; प्रे. कार्यं १:७) त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस आपल्याला अंताच्या आणखी जवळ नेत आहे. (रोम. १३:११) म्हणून जोपर्यंत अंत येत नाही, तोपर्यंत आपण प्रचार करत राहिलं पाहिजे.

३. कुठल्या गोष्टीमुळे प्रवृत्त होऊन आपण प्रचार करतो?

प्रचारकार्याचा विचार करत असताना आपण एका महत्त्वाच्या प्रश्‍नावरसुद्धा विचार केला पाहिजे. तो म्हणजे: आपण आनंदाच्या संदेशाचा प्रचार का  करतो? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर प्रेमाने  प्रवृत्त झाल्यामुळे आपण प्रचार करतो. आपल्या प्रचारकार्यावरून आपलं प्रेम दिसून येतं. म्हणजे आनंदाच्या संदेशाबद्दल, लोकांबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा आणि त्याच्या नावाबद्दल असलेलं आपलं प्रेम दिसून येतं. चला आता आपण यावर एकेक करून चर्चा करू या.

आनंदाच्या संदेशाबद्दल प्रेम असल्यामुळे आपण प्रचार करतो

४. आनंदाची बातमी ऐकल्यावर आपल्याला कसं वाटतं?

तुम्हाला आठवतंय का, एखादी आनंदाची बातमी ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटलं होतं? उदाहरणार्थ, नवीन बाळाचा जन्म झाल्याची किंवा गरजेच्या वेळी नोकरी लागल्याची बातमी ऐकली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? त्या वेळी नक्कीच खूप आनंद झाला असेल आणि ही बातमी कोणाला सांगू आणि कोणाला नको असं तुम्हाला झालं असेल. मग सगळ्यात चांगली  बातमी ऐकल्यावर म्हणजे देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश ऐकल्यावर तुम्हाला असंच वाटलं होतं का?

५. तुम्हाला पहिल्यांदा देवाच्या वचनातलं सत्य कळलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं? (चित्रंसुद्धा पाहा.)

तुम्हाला देवाच्या वचनातून पहिल्यांदा सत्य कळलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं, त्याचा विचार करा. तुम्हाला कळलं की स्वर्गातल्या पित्याचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या उपासकांच्या कुटुंबाचा भाग बनावं. तसंच, त्याने सगळ्या समस्या काढून टाकायचं वचन दिलंय. शिवाय मृत्यूमध्ये गमावलेल्या तुमच्या जवळच्या लोकांना नवीन जगात पुन्हा भेटायची तुम्हाला आशा मिळाली. आणि अशा बऱ्‍याच गोष्टी तुम्हाला कळल्या होत्या. (मार्क १०:२९, ३०; योहा. ५:२८, २९; रोम. ८:३८, ३९; प्रकटी. २१:३, ४) या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही भारावून गेला होता. (लूक २४:३२) तुम्ही जे काही शिकत होता त्या गोष्टी तुम्हाला आवडत होत्या आणि त्याबद्दलचं प्रेम  तुमच्या मनात वाढत होतं. आणि यामुळेच ही मौल्यवान सत्यं इतरांना सांगायची तुमची मनापासून इच्छा होत होती.​—यिर्मया २०:९ सोबत तुलना करा.

आपल्याला पहिल्यांदा आनंदाचा संदेश कळला, तेव्हा त्याबद्दल इतरांना सांगायची आपली मनापासून इच्छा होती! (परिच्छेद ५ पाहा)


६. अर्नेस्ट आणि रोझ यांच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?

अर्नेस्ट b नावाच्या एका भावाचाच विचार करा. ते जवळपास १० वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. ते म्हणतात: “मला नेहमी प्रश्‍न पडायचा, की ‘माझे वडील स्वर्गात गेले असतील का? किंवा त्यांचं नेमकं काय झालं असेल? त्यांचं अस्तित्व कायमचंच मिटलं असेल का?’ शिवाय, ज्या मुलांना वडील होते त्यांचा मला खूप हेवा वाटायचा.” अर्नेस्ट नेहमी स्मशानभूमीत जायचे आणि त्यांच्या वडिलांच्या कबरेपुढे गुढघे टेकून प्रार्थना करायचे. ते म्हणायचे: “देवा प्लिज, मला जाणून घ्यायचंय माझे वडील कुठे आहेत ते.” वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर जवळपास १७ वर्षांनंतर अर्नेस्टना कोणीतरी बायबल अभ्यासासाठी विचारलं आणि ते लगेच तयार झाले. जेव्हा त्यांना कळलं की मेलेल्या लोकांना गाढ झोपेत असलेल्या माणसासारखं काहीच कळत नाही. आणि भविष्यात त्यांना पुन्हा उठवलं जाईल असं अभिवचन बायबल देतंय, तेव्हा ते खूप भारावून गेले. (उप. ९:५, १०; प्रे. कार्यं २४:१५) शेवटी इतक्या वर्षांपासून जे प्रश्‍न त्यांच्या मनाला भेडसावत होते, त्या प्रश्‍नांची उत्तरं त्यांना मिळाली. ते जे काही शिकत होते त्याबद्दल त्यांची उत्सुकता आणखी वाढत गेली. नंतर त्यांच्या पत्नी रोझ यांनीसुद्धा बायबल अभ्यास सुरू केला. आणि अर्नेस्टप्रमाणे त्यांचीही सत्याबद्दलची आवड वाढत गेली. मग १९७८ साली त्या दोघांचा बाप्तिस्मा झाला. त्यांना जे काही शिकायला मिळालं होतं, त्याबद्दल त्यांनी आपल्या मित्रांना, घरच्यांना आणि जे कोणी ऐकून घ्यायला तयार होते त्या सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की अर्नेस्ट आणि रोझ यांनी ७० पेक्षा जास्त लोकांना बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करायला मदत केली.

७. सत्याबद्दल आपल्या मनात प्रेम रुजू लागतं तेव्हा काय होतं? (लूक ६:४५)

यावरून हे स्पष्टच होतं, की जेव्हा सत्याबद्दलचं प्रेम आपल्या मनात रुजू लागतं तेव्हा आपण शांत बसू शकत नाही. (लूक ६:४५ वाचा.) याबाबतीत आपल्याला पहिल्या शतकातल्या येशूच्या शिष्यांसारखंच वाटतं. त्यांनी म्हटलं होतं: “ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” (प्रे. कार्यं ४:२०) आपल्या मनात सत्याबद्दलचं प्रेम इतकं जास्त आहे, की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगावंसं वाटतं.

लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे आपण प्रचार करतो

८. कोणत्या गोष्टीने प्रवृत्त होऊन आपण इतरांना आनंदाचा संदेश सांगतो? ( लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा  ही चौकट पाहा.) (चित्रसुद्धा पाहा.)

यहोवा आणि त्याच्या मुलाप्रमाणेच आपलंही लोकांवर प्रेम आहे. (नीति. ८:३१; योहा. ३:१६) “देवाशिवाय” असणाऱ्‍या आणि “कोणतीही आशा” नसलेल्या लोकांबद्दल आपल्याला करुणा आणि कळकळ वाटते. (इफिस. २:१२) ते जीवनाच्या चिंतांमध्ये बुडत आहेत. आणि त्यांना वाचवण्यासाठी लागणारं लाईफ-जॅकेट म्हणजे देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश आपल्याकडे आहे. म्हणून त्यांच्यासाठी असलेल्या प्रेमामुळे आणि दयेमुळे आपल्याला त्यांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी जे काही करावं लागतं ते करायचा प्रयत्न आपण करतो. या अनमोल संदेशामुळे त्यांना आशा मिळते, या काळात त्यांना त्यांचं जीवन चांगल्या प्रकारे जगण्यासाठी मदत होते आणि देवाच्या नवीन जगात खरं जीवन म्हणजे कायमचं जीवन जगण्याची संधी मिळते.​—१ तीम. ६:१९.

लोकांसाठी असलेल्या प्रेमामुळे आणि दयेमुळे आपल्याला त्यांना आनंदाचा संदेश सांगायला जे काही करावं लागतं, ते करायचा आपण प्रयत्न करतो (परिच्छेद ८ पाहा)


९. आपण भविष्याबद्दल लोकांना कोणता इशारा देत आहोत आणि का? (यहेज्केल ३३:७, ८)

लोकांबद्दल प्रेम असल्यामुळे लवकरच येणाऱ्‍या जगाच्या अंताबद्दल त्यांना सावध करण्यासाठीही आपण प्रवृत्त होतो. (यहेज्केल ३३:७, ८ वाचा.) आपल्याला आपल्या शेजाऱ्‍यांबद्दल आणि विश्‍वासात नसलेल्या आपल्या घरच्या लोकांबद्दल कळकळ वाटते. त्यातले बरेचसे लोक आपलं दररोजचं जीवन जगत आहेत, पण त्यांना “जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट येईल,” या गोष्टीची जरासुद्धा कल्पना नाही. (मत्त. २४:२१) म्हणून न्यायाच्या वेळी काय होणार आहे, हे त्यांना कळावं अशी आपली इच्छा आहे. म्हणजे खोट्या धर्माचा नाश केला जाईल आणि त्यानंतर हर्मगिदोनाच्या वेळी या संपूर्ण दुष्ट जगाचा नाश केला जाईल, या गोष्टी त्यांना सांगायची आपली इच्छा आहे. (प्रकटी. १६:१४, १६; १७:१६, १७; १९:११, १९, २०) आपली हीच प्रार्थना आहे, की जास्तीत जास्त लोकांनी आपला हा इशारा ऐकावा आणि आत्ताच शुद्ध उपासनेत आपल्यासोबत सामील व्हावं. पण सध्या जे लोक या इशाऱ्‍याकडे दुर्लक्ष करत आहेत, मग त्यात कदाचित आपले घरचे लोकसुद्धा असतील, त्यांच्याबद्दल काय?

१०. येणाऱ्‍या नाशाबद्दल लोकांना सावध करत राहणं का महत्त्वाचं आहे?

१० मागच्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे, जे लोक मोठ्या बाबेलचा नाश पाहिल्यानंतर यहोवावर विश्‍वास ठेवतील त्यांना वाचवण्याचा यहोवा कदाचित विचार करेल. जर असं असेल तर आपण हा इशारा त्यांना आत्ताच देणं खरंच किती महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, की आपण आत्ता त्यांना काही सांगितलं तर त्या वेळी त्यांच्याकडे आठवण्यासाठी काहीतरी असेल.  (यहेज्केल ३३:३३ सोबत तुलना करा.) कदाचित आपण त्यांना आत्ता जे काही सांगू त्या गोष्टी त्यांना आठवतील आणि खूप उशीर होण्याआधीच ते शुद्ध उपासना करण्यासाठी आपल्यात सामील होतील. बायबल काळात जेव्हा फिलिप्पैमध्ये “मोठा भूकंप झाला” तेव्हाच तुरुंगाच्या अधिकाऱ्‍याचं मन बदललं. कदाचित काही लोक आत्ता आपलं ऐकणार नाहीत. पण जगाला हादरून टाकणाऱ्‍या मोठ्या बाबेलच्या विनाशानंतर कदाचित त्यांचं मन बदलेल.​—प्रे. कार्यं १६:२५-३४.

यहोवा आणि त्याच्या नावाबद्दल प्रेम असल्यामुळे आपण प्रचार करतो

११. आपण यहोवाला गौरव, सन्मान आणि सामर्थ्य कसं देतो? (प्रकटीकरण ४:११) (चित्रंसुद्धा पाहा.)

११ आपण आनंदाच्या संदेशाचा प्रचार करण्याचं कारण म्हणजे आपल्या मनात यहोवाबद्दल आणि त्याच्या पवित्र नावाबद्दल प्रेम आहे. आपण ज्या देवावर प्रेम करतो त्याची स्तुती करण्याचा एक मार्ग म्हणून आपण प्रचारकार्याकडे बघतो. (प्रकटीकरण ४:११ वाचा.) आपण या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहोत, की यहोवा त्याच्या उपासकांकडून गौरव, सन्मान आणि सामर्थ्य मिळवण्यासाठी अगदी योग्य असा देव आहे. यहोवाने “सर्व गोष्टी निर्माण” केल्या आणि आपण त्याच्यामुळेच अस्तित्वात आहोत. या गोष्टींचे खातरीलायक पुरावे जेव्हा आपण दुसऱ्‍यांना सांगतो, तेव्हा आपण देवाला गौरव आणि सन्मान देत असतो. तसंच आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या वेळेचा, शक्‍तीचा आणि साधनांचा प्रचारकार्यात पुरेपूर उपयोग करतो, तेव्हा आपण त्याला आपली ताकद देतो म्हणजेच आपलं सामर्थ्य देत असतो. (मत्त. ६:३३; लूक १३:२४; कलस्सै. ३:२३) सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर आपण ज्या देवावर प्रेम करतो त्याच्याबद्दल इतरांना सांगायला आपल्याला आवडतं. तसंच त्याच्या नावाबद्दल आणि त्याचा काय अर्थ होतो हे इतरांना सांगायलाही प्रवृत्त होतो. पण का बरं?

आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या वेळेचा, शक्‍तीचा आणि साधनांचा प्रचारकार्यात पुरेपूर उपयोग करतो, तेव्हा आपण यहोवाला आपली ताकद देतो (परिच्छेद ११ पाहा)


१२. आपण प्रचारकार्यात यहोवाचं नाव कसं पवित्र करतो?

१२ यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण त्याचं नाव पवित्र करायला प्रवृत्त होतो. (मत्त. ६:९) सैतानाने यहोवाबद्दल खोट्या गोष्टी पसरवून त्याच्या नावावर जो कलंक लावलाय तो पुसून टाकायच्या कामात भाग घ्यायची आपली इच्छा आहे. (उत्प. ३:१-५; ईयो. २:४; योहा. ८:४४) आपल्या सेवाकार्यात यहोवाची बाजू घ्यायला आणि जे ऐकतील त्यांना त्याच्याबद्दल सत्य सांगायला आपण उत्सुक आहोत. त्याचा सगळ्यात मोठा गुण प्रेम आहे. तो नीतीने आणि न्यायाने राज्य करतो. आणि त्याचं राज्य सगळी दुःखं काढून टाकेल, तसंच मानवी कुटुंबात शांती आणि आनंद आणेल या सगळ्या गोष्टी लोकांना कळाव्यात अशी आपली इच्छा आहे. (स्तो. ३७:१०, ११, २९; १ योहा. ४:८) जेव्हा आपण लोकांना या सगळ्या गोष्टी सांगतो, तेव्हा आपण त्याचं नाव पवित्र करतो. तसंच आपण आपल्या नावाला जागतोय याचं समाधानसुद्धा आपल्याला असतं. ते कसं?

१३. यहोवाचे साक्षीदार या नावाचा आपल्याला अभिमान का आहे? (यशया ४३:१०-१२)

१३ यहोवाने आपल्याला त्याचे “साक्षीदार” म्हणून निवडलंय. (यशया ४३:१०-१२ वाचा.) काही वर्षांआधी नियमन मंडळाच्या एका पत्रात असं म्हटलं होतं: “आपल्यासाठी कोणता मोठा बहुमान असेल तर तो म्हणजे यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखलं जाणं.” असं का म्हणता येईल? या उदाहरणाचा विचार करा. समजा तुमच्यावर एक कोर्ट केस चालू आहे. आणि तुमच्यावर लावलेल्या आरोपामुळे तुमचं नाव बदनाम झालंय. पण आरोप खोटे आहेत, हे सांगण्यासाठी तुम्हाला एका साक्षीदाराची गरज आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा एका व्यक्‍तीला निवडाल ज्याला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता आणि ज्याच्यावर तुमचा भरवसा आहे. तसंच कोर्टाने त्याच्यावर भरवसा ठेवावा म्हणून समाजात त्याचं चांगलं नावसुद्धा आहे. त्याचप्रमाणे यहोवाने आपल्याला त्याचे साक्षीदार म्हणून निवडलंय आणि दाखवून दिलंय की तो आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. आणि त्याला आपल्याबद्दल भरवसा आहे की तोच खरा देव आहे अशी साक्ष आपण देऊ. यहोवाचे साक्षीदार असण्याचा आपल्याला अभिमान आहे. म्हणूनच लोकांना त्याच्या नावाबद्दल सांगण्यासाठी आणि त्याच्यावर लावलेले आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक संधीचा आपण फायदा करून घेतो. असं करून आपण आपल्या नावाला जागत असतो.​—स्तो. ८३:१८; रोम. १०:१३-१५.

अंत येईपर्यंत आपण प्रचार करत राहू

१४. येणाऱ्‍या दिवसांत कदाचित कोणत्या घटना घडतील?

१४ येणाऱ्‍या भविष्यात कायकाय होईल हे पाहायची आपल्याला उत्सुकता आहे. यहोवाच्या आशीर्वादाने आणखीन बरेच जण सत्य स्वीकारतील अशी आपल्याला आशा आहे. तसंच लवकरच मानवी इतिहासातला सगळ्यात कठीण काळ म्हणजे, मोठ्या संकटाची सुरुवात होईल, तेव्हासुद्धा नाश होणाऱ्‍या जगातून बाहेर पडून, यहोवाची स्तुती करणाऱ्‍यांमध्ये काही लोक सामील होतील याची शक्यता आहे. हे सगळं पाहण्यासाठीसुद्धा आपण खरंच खूप उत्सुक आहोत!​—प्रे. कार्यं १३:४८.

१५-१६. आपण काय करत राहिलं पाहिजे आणि कधीपर्यंत?

१५ पण तोपर्यंत आपल्याला आपलं काम करत राहायचंय. आपल्याला असं एक काम करायचा बहुमान मिळालाय जे पुन्हा कधीच होणार नाही. आणि तो बहुमान म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश घोषित करणं! पण त्याच वेळेस लवकरच जे होणार आहे, त्याबद्दल इशारा द्यायचं कामही आपल्याला करायचंय. लोकांना माहीत असलं पाहिजे की या दुष्ट व्यवस्थेचा नाश जवळ आहे. म्हणून जेव्हा न्यायाचा दिवस येईल, तेव्हा त्यांना माहीत असेल आपण जो संदेश सांगत होतो तो यहोवा देवाकडून होता.​—यहे. ३८:२३.

१६ मग आपण काय करायचा निश्‍चय केला पाहिजे? आनंदाच्या संदेशाबद्दल, लोकांबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या नावाबद्दल असलेल्या प्रेमाने प्रवृत्त होऊन आपण प्रचार करत राहिलं पाहिजे. आणि जोपर्यंत यहोवा म्हणत नाही, की “आता बास” तोपर्यंत आपण आतुरतेने, काळाची गरज ओळखून आणि आवेशाने प्रचार करत राहिलं पाहिजे.

गीत ५४ हाच खरा मार्ग!

a ७ ऑक्टोबर २०२३ ला न्यूयॉर्कमधल्या न्यूबर्ग असेंब्ली हॉल ऑफ जेहोवाज विटनेसेस या हॉलमध्ये वार्षिक सभा झाली होती. हा संपूर्ण कार्यक्रम नंतर JW ब्रॉडकास्टिंगवर दाखवण्यात आला. नोव्हेंबर २०२३ ला भाग १ आणि जानेवारी २०२४ ला भाग २ दाखवण्यात आला.

b jw.org वर “आमच्याविषयी” > “अनुभव” > “बायबलमुळे जीवन बदलतं” या टॅबखाली “बायबलमधली स्पष्ट आणि पटण्यासारखी उत्तरं मला खूप आवडली” हा लेख पाहा.