व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागे राहा!

शरणार्थींचा प्रश्‍न—लाखो लोक युक्रेनसोडून पळाले

शरणार्थींचा प्रश्‍न—लाखो लोक युक्रेनसोडून पळाले

 २४ फेब्रुवारी २०२२ ला रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला. त्यामुळे लाखो लोक युक्रेन सोडून दुसऱ्‍या देशांत गेले, आणि शरणार्थींची व्यवस्था कशी करायची हा मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. a

 “सगळीकडे बॉम्ब आणि विस्फोटांचा आवाज येत होता. शब्दांत सांगता येणार नाही अशी भयानक परिस्थिती होती. जेव्हा आम्हाला कळलं की सुरक्षित ठिकाणी जायला ट्रेनची व्यवस्था करण्यात आलीए, तेव्हा आम्ही लगेच निघायचा विचार केला. आम्ही प्रत्येक जण फक्‍त एकच बॅग घेऊन जाऊ शकत होतो. म्हणून आम्ही फक्‍त महत्त्वाची कागदपत्रं, औषधं, पाणी आणि थोड्याफार खाण्यापिण्याच्या गोष्टीच घेऊ शकलो. बॉम्ब हल्ला होत असताना आम्ही सगळं काही सोडून स्टेशनकडे पळालो.”—खारकिव्ह युक्रेनमधून नतालिया.

 “अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की युद्ध होणार नाही. पण नंतर शहराच्या काही भागांमध्ये विस्फोट होऊ लागले आणि खिडक्या हादरू लागल्या. फक्‍त काही गरजेच्या वस्तू घेऊन मी निघायचं ठरवलं. मी सकाळी ८ ला घर सोडलं, आणि ल्युविवसाठी ट्रेन पकडली. आणि मग बसने पोलंडला गेले.”—खारकिव्ह युक्रेनमधून नादिया.

या लेखात

 शरणार्थ्यांच्या समस्येमागचं नेमकं कारण काय?

 रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यामुळे शरणार्थ्यांची समस्या निर्माण झाली. पण बायबलमधून आपल्याला कळतं की अशा समस्यांची मूळ कारणं काही वेगळीच आहेत:

  •   मानवी सरकारं आज लोकांच्या समस्या सोडवायला अपयशी ठरली आहेत. ज्यांच्याकडे अधिकार असतो ते सहसा त्याचा गैरवापर करतात आणि इतरांवर अत्याचार करतात.—उपदेशक ४:१; ८:९.

  •   सैतान या “जगाचा अधिकारी” आहे, आणि त्याचा लोकांवर दुष्ट प्रभाव आहे. बायबल म्हणतं: “सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे.”—योहान १४:३०; १ योहान ५:१९.

  •   बऱ्‍याच शतकांपासून माणसांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. पण त्यासोबतच बायबलमध्ये असंही म्हटलंय, की आपण “शेवटच्या दिवसांत” खूप कठीण काळात जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) तसंच या दिवसांमध्ये युद्धं, नैसर्गिक विपत्ती, अन्‍नटंचाई आणि महामाऱ्‍या अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात होतील असंही बायबल सांगतं. आणि यामुळेच लोकांना शरणार्थी म्हणून दुसऱ्‍या देशांत आश्रय घ्यावा लागतो.—लूक २१:१०, ११.

 शरणार्थ्यांसाठी काही आशा आहे का?

 बायबल आपल्याला सांगतं की आपला निर्माणकर्ता देव यहोवा b खूप प्रेमळ आहे. आणि ज्यांना आपलं घर सोडून जावं लागतं आणि शरणार्थी म्हणून राहावं लागतं, त्यांच्याबद्दल त्याला खूप सहानुभूती आहे. (अनुवाद १०:१८) तो लवकरच सगळ्या मानवी सरकारांना काढून त्याचं स्वर्गातलं राज्य पृथ्वीवर स्थापन करणार आहे. आणि शरणार्थ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं अशा सगळ्या समस्या हे राज्य कायमच्या काढून टाकणार आहे. (दानीएल २:४४; मत्तय ६:१०) यहोवा त्याच्या राज्याचा वापर करून सैतानाचाही नाश करणार आहे. (रोमकर १६:२०) हे राज्य संपूर्ण जगावर राज्य करेल आणि राष्ट्रांच्या सीमांमुळे माणसांमध्ये जी फूट पडली आहे ती मिटवून टाकेल. त्यामुळे जगभरातले सगळे मानव एकाच कुटुंबाचा भाग बनतील. त्यानंतर पुन्हा कधीच कोणालाही शरणार्थी म्हणून घर सोडून जावं लागणार नाही. कारण बायबलमध्ये असं वचन दिलंय: “त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या द्राक्षवेलाखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, कोणीही त्यांना घाबरवणार नाही, कारण सैन्यांचा देव यहोवा हे बोलला आहे.”—मीखा ४:४.

 आज शरणार्थ्यांची जी समस्या निर्माण झाली आहे, ती फक्‍त देवाचं राज्यच काढून टाकू शकतं. यहोवा देव आपल्या राज्याचा वापर करून आणखी कोणत्या प्रकारच्या समस्या कायमच्या सोडवेल, याची काही उदाहरणं पाहा:

 शरणार्थ्यांना आज बायबलमुळे मदत होऊ शकते का?

 हो. शरणार्थ्यांना भविष्याची चांगली आशा देण्यासोबतच, त्यांना आजच्या समस्यांचा सामना करण्यासाठीही बायबल मदत करतं.

 बायबलचं तत्त्व: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो. पण शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.”—नीतिवचनं १४:१५.

 अर्थ: पुढे येणाऱ्‍या धोक्यांचा आधीच अंदाज घ्या आणि स्वतःला सुरक्षित कसं ठेवता येईल याचा विचार करा. शरणार्थ्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्‍यांपासून सावध राहा.

 बायबलचं तत्त्व: “आपल्याजवळ खायला अन्‍न आणि घालायला कपडे असतील, तर आपण त्यांत समाधानी राहू या.”—१ तीमथ्य ६:८.

 अर्थ: तुमच्याजवळ आहे त्यात समाधानी राहा. गरज नसलेल्या गोष्टींच्या मागे लागू नका. असं केल्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.

 बायबलचं तत्त्व: “ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.”—मत्तय ७:१२.

 अर्थ: इतरांना दया दाखवा आणि धीर सोडू नका. यामुळे तुम्हाला नवीन ठिकाणी लोकांशी जुळवून घ्यायला मदत होईल.

 बायबलचं तत्त्व: “वाइटाबद्दल कोणाचं वाईट करू नका.”—रोमकर १२:१७.

 अर्थ: वाईट वागणूक मिळाली तर राग मानू नका आणि बदला घेऊ नका. नाहीतर परिस्थिती आणखी खराब होईल.

 बायबलचं तत्त्व: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.”—फिलिप्पैकर ४:१३.

 अर्थ: देवाकडे प्रार्थना करा आणि त्याच्या उपासनेला आपल्या जीवनात पहिली जागा द्या. यामुळे तुम्हाला परिस्थितीचा सामना करायला मदत होईल.

 बायबलचं तत्त्व: “कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. तर, सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा. म्हणजे, सर्व समजशक्‍तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती ख्रिस्त येशूद्वारे तुमच्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करेल.”—फिलिप्पैकर ४:६, ७.

 अर्थ: तुमची परिस्थिती कशीही असली, तरी मनाची शांती मिळवण्यासाठी देवाकडे मदत मागा. “फिलिपियन्स ४:६, ७—‘डू नॉट बी अँक्शियस अबाऊट ऐनिथिंग’” हा लेख पाहा.

a हल्ल्याच्या दुसऱ्‍या दिवशी, शरणार्थ्यांसाठी असलेल्या संयुक्‍त राष्ट्र संघाच्या उच्च आयुक्‍तांनी (UNHCR) या घटनेला सध्याची सर्वांत मोठी समस्या असल्याचं घोषित केलं. फक्‍त १२ दिवसांमध्ये २० लाखांपेक्षा जास्त शरणार्थ्यांनी आसपासच्या देशांमध्ये पळ काढला. तर १० लाख लोकांनी युक्रेनमध्येच इतर ठिकाणी आश्रय घेतला.

b यहोवा हे देवाचं वैयक्‍तिक नाव आहे. (स्तोत्र ८३:१८) जास्त माहितीसाठी हिंदीतला “यहोवा कौन है?” हा लेख पाहा.