व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे खऱ्‍या आहेत का?

बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे खऱ्‍या आहेत का?

बायबलचं उत्तर

 हो. बायबल हे विज्ञानाचं पाठ्यपुस्तक नसलं, तरी त्यात विज्ञानाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अचूक आहेत. काही उदाहरणांवर विचार करू या. या उदाहरणांवरून आपल्याला दिसून येईल की बायबलमध्ये सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे खऱ्‍या आहेत. तसंच बायबलमध्ये विज्ञानाबद्दल जे सांगितलं होतं, ते त्या काळातल्या लोकांच्या समजुतींपेक्षा खूप वेगळं होतं.

  •   बायबल सांगतं की या विश्‍वाला एक सुरुवात आहे. (उत्पत्ती १:१) याउलट, प्राचीन काळातल्या बऱ्‍याच मिथ्यकथा असं सांगतात की विश्‍वाला कोणीही निर्माण केलेलं नाही; तर एका गोंधळाच्या अवस्थेतून हे सुव्यवस्थित विश्‍व आपोआप तयार झालं. बॅबिलोनियन संस्कृतीचे लोक असं मानायचे की दोन समुद्रांमधून बाहेर आलेल्या देवतांनी या विश्‍वाला जन्म दिला. इतर कथा असं सांगतात की हे विश्‍व एका महाकाय अंड्यातून आलं.

  •   हे विश्‍व देवी-देवतांच्या मनात आलेल्या लहरींप्रमाणे चालत नाही, तर निसर्ग-नियमांप्रमाणे चालतं. (ईयोब ३८:३३; यिर्मया ३३:२५) याउलट, जगभरातल्या कथा-कहाण्यांमध्ये असं सांगितलं जातं, की देवी-देवता त्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे करू शकतात आणि त्यांच्यापुढे मानवांचं काहीच चालत नाही.

  •   पृथ्वी अंतराळात निराधार टांगली आहे. (ईयोब २६:७) याउलट, जुन्या काळातले बरेच लोक असं मानायचे की पृथ्वी सपाट आहे आणि एका राक्षसाने, किंवा म्हैस किंवा कासवासारख्या एखाद्या प्राण्याने तिला आधार दिला आहे.

  •   समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ते पाणी पावसाच्या, बर्फाच्या किंवा गारांच्या रूपात पृथ्वीवर पडतं. हेच पाणी पुन्हा नद्यांमध्ये आणि झऱ्‍यांमध्ये वाहू लागतं. (ईयोब ३६:२७, २८; उपदेशक १:७; यशया ५५:१०; आमोस ९:६) याउलट, प्राचीन ग्रीक संस्कृतीचे लोक असं मानायचे की समुद्रातलं पाणी जमिनीखालून नद्यांमध्ये येतं. अठराव्या शतकापर्यंत लोकांची अशीच समजूत होती.

  •   आज दिसणारे पर्वत एकेकाळी समुद्राखाली होते. पण नंतर पर्वत वर आल्यामुळे डोंगर-दऱ्‍या तयार झाल्या. (स्तोत्र १०४:६,) याउलट बऱ्‍याच कथा-कहाण्यांमध्ये असं सांगितलं जातं, की हे पर्वत देवी-देवतांनी बनवले आहेत आणि ते आज दिसतात त्या स्थितीत आधीपासूनच होते.

  •   स्वच्छतेचे नियम पाळल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. इस्राएली लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात स्वच्छतेच्या बाबतीतही काही नियम देण्यात आले होते. जसं की, मृतदेहाला हात लावल्यावर आंघोळ करणं आणि कपडे धुणं, संसर्गजन्य रोग झालेल्या व्यक्‍तीला दुसऱ्‍यांपासून वेगळं ठेवणं, तसंच मलमूत्राची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं. (लेवीय ११:२८; १३:१-५; अनुवाद २३:१३) याउलट, ज्या काळात हे नियम देण्यात आले होते त्या काळात इजिप्तचे लोक जखमांवर मानवी विष्ठेपासून तयार केलेलं मलम लावायचे.

बायबलमध्ये अशा गोष्टी सांगितल्या आहेत का, ज्या विज्ञानाप्रमाणे चुकीच्या आहेत?

 काहींचं म्हणणं आहे की बायबलमध्ये सांगितलेल्या काही गोष्टी विज्ञानाप्रमाणे चुकीच्या आहेत. पण बायबलचं चांगल्या प्रकारे परिक्षण केल्यावर आपल्याला कळेल, की त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाप्रमाणे अचूक आहेत. खाली याची काही उदाहरणं दिली आहेत:

 गैरसमज: बायबल म्हणतं की हे विश्‍व २४ तासांच्या सहा दिवसांत निर्माण करण्यात आलं.

 खरी माहिती: देवाने हे विश्‍व बनवायला किती काळाआधी सुरुवात केली, हे बायबलमध्ये सांगितलेलं नाही. (उत्पत्ती १:१) उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात ज्या दिवसांचा उल्लेख करण्यात आला आहे, ते दिवस म्हणजे खरंतर कालावधी होते. आणि प्रत्येक कालावधी किती मोठा होता याबद्दल सांगितलेलं नाही. खरंतर पृथ्वी आणि आकाशाला जेवढ्या काळात निर्माण करण्यात आलं, त्या संपूर्ण काळालाही एक ‘दिवस’ म्हणण्यात आलं आहे.—उत्पत्ती २:४.

 गैरसमज: बायबल म्हणतं, की फोटोसिंथेसिसची (प्रकाशसंश्‍लेषण) प्रक्रिया होण्यासाठी सूर्य अस्तित्वात येण्याआधीच झाडंझुडपं आणि वनस्पती निर्माण करण्यात आल्या.​—उत्पत्ती १:११, १६.

 खरी माहिती: बायबलमधून दिसून येतं की सूर्य जो आकाशातल्या ताऱ्‍यांपैकी एक आहे, त्याला झाडंझुडपं आणि वनस्पती बनवण्याच्या आधी निर्माण करण्यात आलं. (उत्पत्ती १:१) निर्मितीच्या पहिल्या दिवशी किंवा कालावधीत सूर्याचा प्रकाश काही प्रमाणात पृथ्वीवर पडत होता. पण निर्मितीच्या तिसऱ्‍या दिवसापर्यंत वातावरण बऱ्‍यापैकी स्वच्छ झालं. यामुळे सूर्यप्रकाश थेटपणे पृथ्वीवर पडू लागला आणि फोटोसिंथेसिसची प्रक्रिया होणं शक्य झालं. (उत्पत्ती १:३-५, १२, १३) याच्या बऱ्‍याच काळानंतर पृथ्वीवरून सूर्य स्पष्टपणे दिसू लागला.​—उत्पत्ती १:१६.

 गैरसमज: बायबल असं म्हणतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो.

 खरी माहिती: उपदेशक १:५ म्हणतं: “सूर्य उगवतो आणि मावळतो; मग परत तिथेच धावत जाऊन, पुन्हा उगवतो.” पण या वाक्यात, पृथ्वीवरून सूर्याच्या हालचाली कशा दिसतात इतकंच सांगितलंय. आज आपल्याला माहीत आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण तरी आपण “सूर्यास्त” किंवा “सूर्योदय” असे शब्द वापरतो.

 गैरसमज: बायबल म्हणतं की पृथ्वी सपाट आहे.

 खरी माहिती: पृथ्वीच्या ‘सगळ्यात दूरच्या भागांबद्दल’ सांगताना बायबलमध्ये “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” हा वाक्यांश वापरला आहे. पण याचा असा अर्थ होत नाही, की पृथ्वी सपाट आहे आणि तिला कोपरे आहेत. (प्रेषितांची कार्यं १:८; तळटीप) तसंच, ‘पृथ्वीचे चार कोपरे’ असं जे म्हटलं आहे, तीसुद्धा एक अलंकारिक भाषा आहे आणि संपूर्ण पृथ्वी या अर्थाने ती वापरली आहे. आजसुद्धा हाच अर्थ सांगण्यासाठी आपण पृथ्वीच्या चार दिशा असा वाक्यांश वापरतो.—लूक १३:२९; प्रकटीकरण ७:१.

 गैरसमज: बायबल म्हणतं की वर्तुळाचा परीघ त्याच्या व्यासाच्या तिप्पट असतो, पण खरंतर त्याचं अचूक मूल्य पाय्‌ (π) म्हणजे जवळपास ३.१४१६ इतकं असतं.

 खरी माहिती: १ राजे ७:२३ आणि २ इतिहास ४:२ या वचनांमध्ये ‘धातूच्या गंगाळ-सागराची’ मापं दिली आहेत. त्यांवरून असं दिसून येतं की या गंगाळ-सागराचा व्यास १० हात होता आणि “त्याचा घेर मोजायला ३० हात लांब दोरी लागायची.” ही काटेकोर मापं नसून, ती सांगताना कदाचित सगळ्यात जवळचे पूर्णांक वापरण्यात आले असतील. किंवा कदाचित असंही असू शकतं, की या वचनांमध्ये परीघ हा आतल्या घेराच्या आणि व्यास हा बाहेरच्या घेराच्या मापाला सूचित करत असावा.