व्हिडिओ पाहण्यासाठी

तरुण लोक विचारतात

मी असे कपडे घालावेत का?

मी असे कपडे घालावेत का?

 तुम्ही कोणते कपडे घालता याचा तुम्ही विचार का केला पाहिजे? कारण एक व्यक्‍ती ज्या प्रकारचे कपडे घालते त्यावरून तिच्याबद्दल बरंच काही कळतं. मग तुमचे  कपडे तुमच्याबद्दल काय सांगतात?

 कपडे निवडताना केल्या जाणाऱ्‍या तीन मोठ्या चुका आणि त्या कशा टाळाव्यात?

चूक #१: काय घालावं हे जाहिराती पाहून ठरवणं.

 १९ वर्षांची टीना a म्हणते, “कधीकधी एखादी फॅशन इतक्या ॲडमध्ये दिसते की मलाही तसे कपडे घालावेसे वाटतात. जेव्हा आपण एखाद्या फॅशनचे कपडे टिव्हीवर, मासिकांमध्ये सारखे-सारखे पाहतो तेव्हा आपण साहजिकच त्याकडे आकर्षित होतो.”

 जाहिरातींचा फक्‍त मुलींवरच प्रभाव पडतो असं नाही. तरुण मुलांना वाढवण्यासाठी मार्गदर्शन देणाऱ्‍या एका पुस्तकात म्हटलंय, “बदलत्या फॅशनचा मुलींइतकाच मुलांवरही प्रभाव पडतो. कंपन्यासुद्धा अगदी लहान वयाच्या मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जाहिराती तयार करत असतात.”

 ही चूक कशी टाळाल? बायबल म्हणतं: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवतो, पण शहाणा माणूस विचार करून प्रत्येक पाऊल टाकतो.” (नीतिवचनं १४:१५) या वचनात सांगितल्याप्रमाणे तुम्ही जाहिरातींमध्ये जे काही पाहता त्याचा सर्व बाजूंनी विचार करा. जसं की, जाहिरातीत एखाद्या स्टाईलचे कपडे “हॉट,” “सेक्सी” किंवा “ट्रेंडी” आहेत असं म्हटलं जातं, तेव्हा स्वतःला विचारा:

  •  ‘मी हे कपडे घेतले तर नेमका फायदा कोणाचाय?’

  •  ‘असे कपडे घातल्यामुळे माझा संबंध कशा प्रकारच्या लोकांशी जोडला जाईल?’

  •  ‘मी खरंच त्या लोकांसारखा आहे का आणि ती माझी ओळख आहे?’

 हे करून पाहा: एक आठवडाभर कपड्यांच्या जाहिरातींकडे आणि फॅशनबद्दलचे लेख, व्हिडिओ यांकडे लक्ष देऊन पाहा आणि जरा विचार करा: या सगळ्यातून कशा प्रकारच्या जीवनशैलीला बढावा दिला जातोय? आपण एखादी विशिष्ट प्रकारची फॅशन केलीच पाहिजे  असं त्यातून तुम्हाला सांगितलं जातंय का? कॅरन नावाची एक मुलगी म्हणते, “तरुणांवर खरंतर खूप दबाव असतो. आपलं दिसणं, कपडे आणि शरीर सगळंच ‘परफेक्ट’ असलं पाहिजे असं त्यांना वाटत असतं. आणि जाहिराती बनवणारे नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेतात.”

चूक #२: चारचौघांसारखं दिसण्यासाठी विशिष्ट फॅशन करणं.

 १४ वर्षांचा डॅनी म्हणतो: “एखाद्या प्रकारचे कपडे जर सध्या फॅशनमध्ये असतील तर सगळे तसेच कपडे घालतात. आणि तुम्ही तसे कपडे घातले नाहीत तर लोक तुम्हाला नावं ठेवतील.” अनीता नावाची एक मुलगी म्हणते: “विशिष्ट फॅशनचे कपडे घालणं महत्त्वाचं नसतं, तर इतरांसारखं दिसणं हे जास्त महत्त्वाचं असतं.”

 ही चूक कशी टाळाल? बायबल म्हणतं: “या जगाच्या व्यवस्थेचं अनुकरण करू नका.” (रोमकर १२:२) या वचनात दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तुमच्याकडे कशा प्रकारचे कपडे आहेत यावर विचार करा आणि स्वतःला विचारा:

  •  ‘कपडे निवडताना मी कोणत्या गोष्टींना सगळ्यात जास्त महत्त्व देतो?’

  •  ‘कपडे ब्रॅन्डेड असलेच पाहिजेत असा मी विचार करतो का?’

  •  ‘माझ्या कपड्यांनी मी लोकांवर छाप पाडायचा प्रयत्न करतो का?’

 हे करून पाहा: कपडे घेताना फक्‍त याचा विचार करू नका की ते फॅशनमध्ये (सगळे घालतात) आहेत की जुन्या स्टाईलचे (कोणीच घालत नाही) आहेत. तर याचाही विचार करा की कोणते कपडे तुम्ही आत्मविश्‍वासाने घालू शकाल. तुम्ही घातलेल्या कपड्यांमध्ये जर तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटत असेल, तर इतर जण तुमच्याबद्दल काय म्हणतील याची तुम्ही जास्त चिंता करणार नाही.

चूक #३: ‘कपडे जितके सेक्सी तितकं चांगलं’ असा विचार करणं.

 १८ वर्षांची जेनिफर म्हणते, “खरं सांगायचं तर हॉट दिसण्यासाठी कधीकधी छोटे किंवा टाईट कपडे घालायचा मला खूप मोह होतो.”

 ही चूक कशी टाळाल? बायबल म्हणतं: ‘बाहेरून दिसणाऱ्‍या गोष्टींनी आपलं सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करू नका. तर आपल्या मनातल्या गुप्त व्यक्‍तीला सजवा.’ (१ पेत्र ३:३, ४) या वचनात दिलेल्या सल्ल्यानुसार, तुम्हीच विचार करा की जास्त आकर्षक काय आहे, नजरेत भरणारे कपडे की मनाला भावणारे गुण?

 हे करून पाहा: जर तुम्हाला खरंच ‘बेस्ट लूक’ हवा असेल तर शालीनता या गुणाकडे दुर्लक्ष करू नका. हे खरंय, की आजकाल शालीन किंवा सभ्य पेहराव म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात. पण असाही विचार करून पाहा:

 तुम्ही कधी अशा व्यक्‍तीशी बोलला आहात का जी खूप बोलते आणि फक्‍त स्वतःबद्दलच बोलते? अशा व्यक्‍तीपासून दूर पळून जावंसं तुम्हाला वाटत असतं. पण गंमत म्हणजे त्या व्यक्‍तीला हे माहीतही नसतं.

काही जण बोलण्याने तर काही जण आपल्या कपड्यांनी ‘स्वतःकडे लक्ष वेधतात,’ पण अशा व्यक्‍तीला लोक सहसा टाळतात

 जेव्हा तुमचे कपडे सभ्य नसतात तेव्हा तुम्हीसुद्धा खरंतर त्या व्यक्‍तीसारखेच असता. असे कपडे घालून तुम्ही एक प्रकारे असं म्हणत असता, ‘माझ्याकडे पाहा!’ यामुळे लोकांना वाटू शकतं, की एकतर तुमच्याकडे आत्मविश्‍वास नाहीये, किंवा मी कसा दिसतो/दिसते याशिवाय तुम्हाला काहीच सुचत नाही. शिवाय हेही दिसून येतं की लोकांचं, मग ते चुकीच्या लोकांचं असलं तरी, त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार आहात.

 मग असे चुकीचे संदेश देण्याऐवजी सभ्य कपडे घालून पाहायला काय हरकत आहे? मोनिका नावाची एक मुलगी म्हणते, “सभ्य पेहराव करणं म्हणजे अगदीच ‘काकूबाई टाईप’ कपडे घालणं असं नाही. उलट याचा इतकाच अर्थ होतो, की तुम्ही जे काही घालता त्यामुळे तुम्हाला स्वतःला आणि पाहणाऱ्‍या लोकांनाही तुमच्याबद्दल आदर वाटला पाहिजे.”

a काही नावं बदलण्यात आली आहेत.