व्हिडिओ पाहण्यासाठी

४ नोव्हेंबर २०२३ ला भारताच्या केरळमध्ये झालेल्या खास सभेत, साक्षीदार भाऊबहीण एकमेकांना प्रेमाने भेटत आहेत

१७ नोव्हेंबर २०२३ | नवीन माहिती: ८ डिसेंबर २०२३
भारत

नवीन माहिती—भारतात झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आठवर पोहोचली

नवीन माहिती—भारतात झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आठवर पोहोचली

शनिवार २ डिसेंबर २०२३ ला, ७६ वर्षांचे एक भाऊ भारतातल्या केरळमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात जखमी होऊन मरण पावले. ते एक ख्रिस्ती वडील आणि पायनियर म्हणून सेवा करत होते. दुःखाची गोष्ट म्हणजे याच्या पाच दिवसांनंतरच, म्हणजे गुरुवार ७ डिसेंबरला त्यांच्या प्रिय पत्नीचाही बॉम्बस्फोटात जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला. त्यासुद्धा पायनियर म्हणून सेवा करत होत्या. या भयंकर दुर्घटनेत आतापर्यंत आपल्या आठ भाऊबहिणींचा जीव गेला आहे.

रविवार २९ ऑक्टोबर २०२३ ला भारताच्या केरळ राज्यात एका प्रांतीय अधिवेशनात एकपाठोपाठ बरेच बॉम्बस्फोट झाले. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, आता आणखी एका भावाचा आणि दोन बहिणींचा मृत्यू झाला आहे. आधी ज्या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता तिची आई आणि भाऊ या मृतांपैकी आहेत. तसंच, ११ भाऊबहीण अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत.

या हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्यांना सांत्वन आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या शाखा कार्यालयाने एक खास सभा ठेवली. ही सभा ४ नोव्हेंबर २०२३ ला झाली. ज्या अधिवेशात बॉम्बस्फोट झाले तिथे २१ मंडळ्यांमधले भाऊबहीण आले होते. त्या सर्वांना या खास सभेसाठी बोलवण्यात आलं होतं. हा कार्यक्रम एका स्थानिक राज्य सभागृहात झाला. तिथे जवळपास २०० जण हजर होते. आणखी १,३०० जण हा कार्यक्रम व्हिडिओ-कॉन्फरेन्सद्वारे पाहत होते. तसंच, हॉस्पिटलमध्ये असलेल्यांना या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात आली. शाखा कार्यालयाच्या एका वडिलांनी स्तोत्र २३:१ यावर चर्चा केली आणि यहोवाला त्याच्या प्रत्येक सेवकाची किती काळजी आहे यावर जोर दिला. याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं: “या वचनात स्तोत्रकर्ता असं म्हणत नाही, की यहोवा एक  मेंढपाळ आहे किंवा सर्वोत्तम  मेंढपाळ आहे. तर तो असं म्हणतो की यहोवा ‘माझा  मेंढपाळ’ आहे. खरंच, आपल्यापैकी प्रत्येकाकडे तो विशेष लक्ष देतो हे जाणून किती सांत्वन मिळतं.”

बहिणी एकमेकांचं मनापासून सांत्वन करत आहेत

बॉम्बस्फोट झाले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका भावाला अजूनही नीट झोप लागत नाहीए. पण तरी हॉस्पिटलमध्ये असलेल्यांना मदत करण्यासाठी तो पुढे आला. तो म्हणतो: “त्यांचा विश्‍वास आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहून मला माझं दुःख विसरायला मदत झाली. भाऊबहिणींना खूप जखमा झाल्या होत्या आणि खूप त्रास होत होता, पण तरी बरेच जण आनंदाने राज्यगीतं गात होते.” आणखी एका भावाने म्हटलं: “यांपैकी काहींना या धक्क्यातून सावरायला वेळ लागू शकतो. पण तरी मला माहितीए, की आपले सगळे भाऊबहीण त्यांच्यावर प्रेम करतच राहतील. मला पूर्ण खातरी आहे की आपल्या प्रेमळ देवाने त्याच्या मजबूत हाताने यांपैकी प्रत्येकाचा हात घट्ट धरलाय. खरंच, यामुळे खूप प्रोत्साहन मिळतं!”‏

जगभरातल्या आपल्या भाऊबहिणींचं एक मोठं कुटुंब आहे आणि त्यांच्यात एकी आहे. आपल्याला खातरी आहे, की यहोवा भारतातल्या प्रिय भाऊबहिणींच्या ‘दुःखी मनाला बरं करत आहे; तो त्यांच्या जखमांवर पट्टी बांधत आहे.’​—स्तोत्र १४७:३.