१६ मार्च २०२२
युक्रेन
रिपोर्ट #३ | युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं
आम्हाला हे सांगताना खूप दु:ख होतं आहे, की मारियुपूल शहरात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये आपल्या दोन बहिणींचा मृत्यू झाला. आपले २,००० हून अधिक भाऊबहीण अजूनही तिथे आहेत आणि ते जोरदार सुरू असलेल्या युद्धामुळे शहर सोडून जाऊ शकत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांत सुमारे १५० भाऊबहीण तिथून सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यात यशस्वी झाले. विपत्ती निवारण समितीमध्ये काम करणारे काही बांधव मदत पुरवण्यासाठी जेव्हा मारियुपूलकडे जात होते, तेव्हा रस्त्यामध्ये त्यांच्या गाडीवर आणि इतर काही गाड्यांवर हल्ले केले गेले. त्यामुळे त्यांना परत माघारी जावं लागलं. आपल्या जवळपास २०० बांधवांनी राज्यसभागृहाच्या तळघरात आश्रय घेतला होता. तिथे एक सम्मेलन गृहसुद्धा होतं. त्याचवेळी तिथे एक बॉम्ब पडला. भाऊबहिणींना दुखापत झाली नाही, पण त्यांच्या गाड्यांचं खूप नुकसान झालं. गाड्या नसल्यामुळे तिथून पळून जाणं आणखी कठीण झालं.
एका मंडळीतले वडील (खाली चित्रात असलेले) आपल्या कुटूंबासोबत मारियुपूल सोडण्यात यशस्वी झाले. ते सांगतात, आम्हाला आमचं घर गमवावं लागलं, नोकरी गमवावी लागली. तसंच मित्रांसोबतचा आमचा संपर्क तुटला. खरंतर प्रवास पूर्ण करायला एक दिवस लागतो, पण आम्हाला सहा दिवस लागले. आम्ही [शहरातून] निघत होतो, तेव्हा रस्त्यावर आम्ही न फुटलेले अनेक बॉम्ब पाहिले. त्यातून धूर निघत होता. या सहा दिवसांत बांधवांनी आमची खूप मदत केली, जेवण दिलं आणि राहण्याची व्यवस्था केली. आपला पिता यहोवाच आपली काळजी घेत आहे याची आम्हाला जाणीव झाली. . . . यावरून आम्ही शिकलो, की आपण यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे.
युक्रेनमधून पळून गेलेले भाऊबहीण युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी गेले. जसं की, एक सहायक सेवक आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत (मुलं ७, ११ आणि १६ वर्षांची आहेत) पोर्तुगालला गेले. तिथे त्यांचे नातेवाईक राहतात जे यहोवाचे साक्षीदार आहेत. पण सीमा ओलांडण्यासाठी त्यांना ११ तास लागले. मग सीमा पार केल्यावर त्यांना त्यांच्याकडे पोहोचायला ४ दिवस लागले आणि त्यांनी ४,००० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास केला. जेव्हा ते आपल्या नातेवाईकांच्या घरी पोहोचले, तेव्हा मंडळीची सभा सुरू होणार होती. पोर्तुगालची भाषा त्यांना माहीत नव्हती, तरी ते आपल्या सवयीनुसार सभेला गेले. या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला, तरीही ते आनंदी होते आणि हीच गोष्ट मंडळीतल्या भाऊबहिणींना खूप आवडली.
युक्रेनहून आपल्या कुटुंबासोबत जर्मनीला गेलेली एक बहीण म्हणते, बायबलचं वाचन, चांगल्या गोष्टींचा विचार करणं आणि भविष्यातल्या आशेविषयी मनन केल्याने आपल्याला खूप धैर्य आणि प्रोत्साहन मिळतं. . . . आम्ही कुठेही गेलो, तरी भाऊबहिणींनी आम्हाला खूप मदत केली. युक्रेन, हंगेरी आणि आता जर्मनीतही त्यांनी आमचं मनापासून स्वागत केलं. आम्हाला वाटलं की यहोवा या भाऊबहिणींद्वारे आपल्याला प्रत्येक वेळी मदत करत आहे.
या अहवालांवरून स्पष्टपणे दिसून येते, की यहोवा युक्रेनमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रिय भाऊबहिणींची काळजी घेत आहे.—स्तोत्र १४५:१४.
१६ मार्च २०२२, पर्यंत युक्रेनमधून खालील बातमी मिळाली आहे. स्थानिक बांधवांच्या मते ही बातमी खरी आहे. पण ही आकडेवारी आणखी जास्त असू शकते. कारण देशाच्या प्रत्येक भागातल्या बांधवांशी संपर्क ठेवणं कठीण आहे:
आपल्या भाऊबहिणींवर काय परिणाम झाला?
४ प्रचारकांचा मृत्यू झाला आहे
१९ प्रचारकांना दुखापत झाली आहे
२९,७८९ प्रचारकांना आपलं घर सोडून पळावं लागलं आणि युक्रेनमध्येच इतर सुरक्षित ठिकाणी जावं लागलं
४५ घरं उद्ध्वस्त झाली
८४ घरांचं मोठं नुकसान झालं
३६६ घरांचं थोडंफार नुकसान झालं
१६ राज्यसभागृहांचं नुकसान झालं
मदत कार्य
२७ विपत्कालीन मदत समित्या (DRC) बांधवांची मदत करत आहेत
या समित्यांनी २०,९८१ प्रचारकांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे
११,९७३ प्रचारकांना इतर देशात जावं लागलं आणि तिथले बांधव त्यांची मदत करत आहेत