तरुण लोक विचारतात
डेटिंग—भाग ३: आम्ही ब्रेकअप करावा का?
तुम्ही डेटिंग सुरू करून काही काळ झाला असेल, पण आता तुमच्या मनात शंका येत असतील. डेटिंग चालू ठेवावी की थांबवावी? हा लेख तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल.
या लेखात
शंका येतात तेव्हा
सुरुवातीला एका तरुण मुलाला आणि मुलीला वाटेल की त्यांच्या आवडीनिवडी सारख्याच आहेत. पण डेटिंग केल्याच्या काही काळानंतर त्यांना कदाचित जाणवेल की तसं काहीच नाही. उदाहरणार्थ दोघांपैकी . . .
एकाला समुद्र आवडत असेल, तर दुसऱ्याला डोंगर-दऱ्या.
एकाला खूप बोलायला आवडत असेल, तर दुसऱ्याला शांत राहायला.
एक प्रामाणिक असेल, तर दुसरा नसेल.
वर दिलेली प्रत्येक परिस्थिती वेगळी आहे. पहिल्या परिस्थितीत वेगवेगळ्या आवडीनिवडींबद्दल सांगितलंय; दुसऱ्या परिस्थितीत वेगवेगळ्या स्वभावांबद्दल सांगितलंय; तिसऱ्या परिस्थितीत वेगवेगळ्या मूल्यांबद्दल सांगितलंय.
यावर विचार करा: लग्न करायचं झालं तर वर दिलेल्या तीन गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीच्या बाबतीत जुळवून घ्यायला तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण जाईल? कोणत्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही दोघं एकमेकांसाठी तडजोड करू शकता?
नवरा-बायकोच्या आवडीनिवडी किंवा स्वभाव सारखा नसला तरी ते त्यांच्या संसारात आनंदी राहू शकतात. कारण शेवटी, एकमेकांसाठी योग्य असण्याचा अर्थ सगळ्या बाबतीत सारखंच असणं असा होत नाही. काही पती-पत्नी त्यांच्या जोडीदाराच्या आवडीनिवडींशी जुळवून घ्यायला शिकतात. इतकंच काय तर, त्यांना एकमेकांच्या स्वभावामुळे फायदाही होतो. a
पण दुसरीकडे, तुम्ही ज्याच्यासोबत लग्न करणार आहात त्याची आणि तुमची मूल्यं सारखी असली पाहिजेत. म्हणजे, तुमचा धार्मिक विश्वास, नैतिक मूल्यं आणि योग्य-अयोग्य याबद्दलचं मत सारखंच असलं पाहिजे. पण जर हा सारखेपणा नसला तर तुमचं हे नातं इथेच थांबवायचा हा एक इशारा असू शकतो.
उदाहरणार्थ, वेगवेगळे धार्मिक विश्वास असल्यामुळे काय होतं याचा विचार करा. फायटिंग फॉर यॉर मॅरेज नावाच्या पुस्तकात असं म्हटलंय: “संशोधनावरून असं दिसून आलंय की ज्या जोडप्यांचे धार्मिक विश्वास वेगवेगळे असतात त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता जास्त असते.”
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “विश्वासात नसलेल्यांसोबत जोडले जाऊ नका. कारण . . . उजेड आणि अंधार यांच्यात काय मेळ?”—२ करिंथकर ६:१४.
निर्णय घेताना
बायबल म्हणतं की जे लग्न करतात त्यांना “हालअपेष्टा भोगाव्या लागतील.” (१ करिंथकर ७:२८, द होली बायबल मराठी—आर. व्ही.) म्हणून जर डेटिंग करताना तुम्हाला तसं काही सहन करावं लागलं तर त्याचं आश्चर्य करू नका.
तुमच्यात जर छोटेमोठे वाद होत असतील तर तुमचं नातं कधीच यशस्वी होणार नाही असा याचा अर्थ होत नाही. मुद्दा हा आहे, की तुमच्यात वाद झाल्यावर तुम्ही ते शांतपणे सोडवता का. जर पुढे तुमचं लग्न झालं तर तुम्हाला दोघांनाही हे कौशल्य शिकून घ्यावं लागेल.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “एकमेकांशी प्रेमाने वागा आणि कोमलतेने सहानुभूती दाखवा. . . . एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करा.”—इफिसकर ४:३२.
दुसरीकडे, जर तुमच्यात सारखेसारखे किंवा मोठे वाद होत असतील तर तुम्ही एकमेकांसाठी योग्य नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि जर असं असेल तर त्याबद्दल नंतर कळण्यापेक्षा आत्ताच कळलेलं बरं.
थोडक्यात: तुम्ही ज्याच्यासोबत डेटिंग करत आहात त्याच्याबद्दल तुमच्या मनात दाट शंका असेल किंवा तुम्ही स्वतः लग्न करायला तयार आहात की नाही याबद्दलही तुमच्या मनात शंका असेल, तर या शंकांकडे दुर्लक्ष करू नका.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “शहाणा धोका पाहून लपतो, पण भोळा पुढे जातो आणि परिणाम भोगतो.”—नीतिवचनं २२:३.
ब्रेकअपचा निर्णय घेतला तर
ब्रेकअपमुळे खूप त्रास होऊ शकतो. पण तुमच्या दोघांपैकी एकाला किंवा दोघांनाही तुमच्या नात्याबद्दल सतत दाट शंका येत असतील तर ते नातं तिथेच संपवलेलं बरं.
मग तुम्ही त्या व्यक्तीला ब्रेकअपबद्दल कसं सांगाल? जर तुमच्याकडे त्या व्यक्तीला न भेटण्याचं एक गंभीर कारण नसेल, तर तिला ब्रेकअपबद्दल मेसेज करून किंवा फोन करून सांगू नका. याउलट, या गंभीर विषयाबद्दल सोबत मिळून बोलता यावं म्हणून एक योग्य वेळ आणि ठिकाण निवडा.
पवित्र शास्त्रातलं तत्त्व: “एकमेकांसोबत खरं बोला.”—जखऱ्या ८:१६.
मग ब्रेकअपचा अर्थ असा होतो का की तुम्ही अपयशी ठरलात? नक्कीच नाही. डेटिंगचा उद्देश काय आहे हे नेहमी लक्षात असू द्या. तो म्हणजे, लग्न करायचं की नातं तिथेच संपवायचं हा निर्णय घेणं. त्यामुळे तुमचा ब्रेकअप जरी झाला तरी त्या अनुभवातून तुम्हाला बरेच मौल्यवान धडे शिकायला मिळतील.
स्वतःला विचारा: ‘या नात्यातून मला स्वतःबद्दल काय कळलंय? लग्नाच्या आधी, मला काही बाबतीत सुधारणा करायची गरज आहे हे या अनुभवातून मला दिसून आलंय का? मी जर पुन्हा डेटिंग करायचा विचार केला तर मी कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करेन?’
a या गोष्टींचा पती-पत्नीवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घ्यायला “कुटुंबासाठी मोलाचा सल्ला—एकमेकांशी जुळवून घेणं” आणि “परिवार के लिए मदद—खामियों में ढूँढ़ें खूबियाँ” हा हिंदीतला लेख पाहा.