तरुण लोक विचारतात
मला निराश करणारे विचार कसे टाळता येतील?
तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं?
माझ्यासोबत नेहमी चांगलंच होईल असा विचार करणारी व्यक्ती
“मी नेहमी खूश राहायचा प्रयत्न करते. आणि मी का राहू नये खूश?”—वॅलरी.
माझ्यासोबत नेहमी वाईटच होईल असा विचार करणारी व्यक्ती
“जेव्हा माझ्यासोबत चांगलं काहीतरी घडतं, तेव्हा मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे.”—रिबेका.
परिस्थिती आहे तशी स्वीकारणारी व्यक्ती
“माझ्यासोबत नेहमी चांगलंच होईल असा मी विचार केला, तर एखादी वाईट गोष्ट घडल्यावर मी दुःखी होईन. माझ्यासोबत नेहमी वाईटच घडेल असा मी विचार केला तर मी कायम निराशच राहीन. पण परिस्थिती आहे तशी स्वीकारल्यामुळे मी खूश राहीन.”—ॲना.
ते इतकं महत्त्वाचं का आहे?
पवित्र शास्त्रात म्हटलंय: “ज्याचं मन आनंदी असतं, त्याच्यासाठी दररोज मेजवानी असते.” (नीतिवचनं १५:१५) यावरून स्पष्टपणे कळतं, की जे लोक आपल्यासोबत नेहमी वाईटच होईल, असा विचार करायचं टाळतात आणि जे जीवनाकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहतात, ते सहसा आनंदी असतात. त्यांचे बरेच मित्र असतात. नाहीतरी आपल्या सगळ्यांनाच खूश राहणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला आवडतं.
माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडेल असा विचार करणाऱ्या व्यक्तीलाही कधीकधी समस्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ:
तुम्हाला सतत युद्धाच्या, दहशतवादाच्या आणि गुन्हेगारीच्या बातम्या ऐकायला मिळत असतील.
तुम्हाला कुटुंबात समस्यांचा सामना करावा लागत असेल.
तुम्हाला स्वतःच्या कमतरतांशी झगडावं लागत असेल.
तुमच्या मित्राने तुमचं मन दुखावलं असेल.
समस्यांकडे पाठ फिरवू नका किंवा त्यांना कवटाळूनही बसू नका. याउलट, त्यांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा. असं केल्यामुळे, तुम्हाला नकारात्मक विचार टाळता येतील. तसंच, जीवनात येणाऱ्या समस्यांचा चांगल्या प्रकारे सामना करता येईल.
तुम्ही काय करू शकता?
तुमच्या कमतरतांबद्दल योग्य दृष्टिकोन ठेवा.
पवित्र शास्त्र म्हणतं: “जो नेहमीच चांगलं वागतो आणि कधीच पाप करत नाही, असा एकही नीतिमान माणूस या पृथ्वीवर नाही.” (उपदेशक ७:२०) आपण चुकतो कारण आपण माणसं आहोत. याचा अर्थ असा नाही की आपण काहीच कामाचे नाही.
परिस्थितीकडे योग्य दृष्टिकोनातून कसं बघता येईल? तुमच्या चुका सुधारायचा प्रयत्न करा. पण माझ्याकडून एकही चूक झाली नाही पाहिजे अशी स्वतःकडून अपेक्षा करू नका. केलब नावाचा एक तरुण मुलगा म्हणतो: “मी माझ्या चुकांबद्दल जास्त विचार करत नाही. तर चुकांमधून शिकायचा प्रयत्न करतो.”
इतरांसोबत तुलना करू नका.
पवित्र शास्त्रात म्हटलंय: “आपण अहंकारी किंवा आपसात स्पर्धेची भावना उत्पन्न करणारे किंवा एकमेकांबद्दल ईर्ष्या बाळगणारे होऊ नये.” (गलतीकर ५:२६) तुम्हाला ज्या कार्यक्रमांना किंवा पार्टीला बोलवलं नाही त्याचे फोटो सोशल मिडियावर पाहिल्यामुळे, तुम्हाला खूप वाईट वाटू शकतं किंवा रागही येऊ शकतो. यामुळे तुम्हाला तुमचे जिगरी दोस्त पक्के वैरी असल्यासारखे वाटतील.
परिस्थितीकडे योग्य दृष्टिकोनातून कसं बघता येईल? ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बोलवलं जाईल असं नाही. आणि तसंही सोशल मिडियाच्या फोटोंवरून सगळीच माहिती कळत नाही. ॲलेक्सिस नावाची एक तरुण मुलगी म्हणते: “सोशल मिडियावर लोक फक्त चांगल्याचांगल्याच गोष्टींचे फोटो टाकत असतात. बाकीच्या गोष्टींचे फोटो कोणी नाही टाकत.”
शांती टिकवून ठेवा—खासकरून कुटुंबात.
पवित्र शास्त्र म्हणतं: “शक्यतो, सगळ्यांसोबत होईल तितकं शांतीने राहा.” (रोमकर १२:१८) इतर जण काय करतात ते तुमच्या हातात नाही, पण तुम्ही काय करू शकता ते मात्र तुमच्या हातात आहे. म्हणून शांती टिकवून ठेवा.
परिस्थितीकडे योग्य दृष्टिकोनातून कसं बघता येईल? तुमच्या कुटुंबात समस्या निर्माण होतात, तेव्हा परिस्थिती आणखीन बिघडवण्याऐवजी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जसं शांतीने राहता तसंच कुटुंबातही शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करा. मेलिंडा नावाची एक तरुण मुलगी म्हणते: “आपण सगळेच बऱ्याच वेळा चुकतो. त्यामुळे आपण इतरांच्या आणि इतर जण आपल्या भावना कधी ना कधी दुखावतीलच. पण अशा वेळी आपण शांती टिकवून ठेवणार की वाद घालणार ते आपल्या हातात आहे.”
कदर बाळगा.
पवित्र शास्त्र म्हणतं: “कृतज्ञता दाखवा.” (कलस्सैकर ३:१५) कदर दाखवल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनातल्या न आवडणाऱ्या गोष्टींवर लक्ष लावण्याऐवजी चांगल्या गोष्टींवर लक्ष लावायला मदत होईल.
परिस्थितीकडे योग्य दृष्टिकोनातून कसं बघता येईल? आपल्या समस्या माहीत असणं चांगली गोष्ट आहे. पण जीवनातल्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही. रिबेका नावाची एक तरुण मुलगी म्हणते: “मी रोज माझ्या डायरीत दिवसभरात घडलेली एक चांगली गोष्ट लिहून ठेवते. त्यामुळे मला हे आठवणीत ठेवायला मदत होते, की माझ्या जीवनात समस्या असल्या तरी अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत ज्यावर मी विचार करू शकते.”
तुम्ही कोणासोबत मैत्री करता यावर विचार करा.
पवित्र शास्त्र म्हणतं: “वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.” (१ करिंथकर १५:३३) जर तुम्ही सतत निंदा करणाऱ्या किंवा टीका करणाऱ्या लोकांसोबत राहिलात, तर त्यांच्या वाईट सवयी तुम्हाला लागतील.
परिस्थितीकडे योग्य दृष्टिकोनातून कसं बघता येईल? हे खरंय, की आपल्या मित्रांवर समस्या येतील आणि त्यामुळे ते नकारात्मक विचार करतील. अशा वेळी त्यांना आधार द्या, पण त्यांच्या समस्यांचा स्वतःवर प्रभाव होऊ देऊ नका. मिशेल नावाची एक तरुण स्त्री म्हणते: “आपण नेहमी नकारात्मक विचार करणाऱ्यांसोबत वेळ घालवू नये.”
याबद्दल आणखी जाणून घ्या
पवित्र शास्त्र म्हणतं: “शेवटच्या दिवसांत खूप कठीण काळ येईल” (२ तीमथ्य ३:१) आणि आज आपण याच कठीण काळात जगतोय. मग, जगात इतक्या समस्या असताना चांगल्या गोष्टींवर विचार करणं तुम्हाला कठीण जातं का? असं असेल तर “आज इतकं दुःख का आहे?” हा लेख वाचा.