आपण संतांना प्रार्थना केली पाहिजे का?
बायबलचं उत्तर
नाही. बायबल सांगतं, की आपण फक्त देवालाच प्रार्थना केली पाहिजे आणि ती येशूच्या नावाने केली पाहिजे. येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, “तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (मत्तय ६:९, द होली बायबल) त्याने आपल्या शिष्यांना कधीही असं सांगितलं नाही, की तुम्ही संतांना, देवदूतांना किंवा देवाशिवाय दुसऱ्या कोणालाही प्रार्थना करा.
येशूने त्याच्या शिष्यांना असंही शिकवलं: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहान १४:६, द होली बायबल) आपल्यासाठी देवाकडे विनंती करायचा अधिकार, देवाने फक्त येशूला दिला आहे.—इब्री लोकांना ७:२५.
देवासोबतच संतांनाही प्रार्थना केली तर ते चुकीचं आहे का?
दहा आज्ञांपैकी एक आज्ञा देताना देव असं म्हणाला, “मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.” (निर्गम २०:५, द होली बायबल) देव ईर्ष्यावान आहे याचा काय अर्थ होतो? बायबलच्या एका भाषांतरात ईर्ष्यावान या शब्दाचा तळटीपेत असा अर्थ दिला आहे, की देव फक्त त्याचीच उपासना केली जावी अशी अपेक्षा करतो. याचाच अर्थ, आपण उपासना किंवा प्रार्थना फक्त देवालाच केली पाहिजे अशी त्याची इच्छा आहे.—यशया ४८:११.
आपण जर देवाला सोडून संतांना, देवदूतांना किंवा दुसऱ्या कोणालाही प्रार्थना केली, तर यामुळे देवाचा अनादर होतो. एकदा प्रेषित योहानने एका देवदूताला नमन करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्या देवदूताने त्याला थांबवलं आणि म्हणाला: “असे करू नये. मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर.”—प्रकटीकरण १९:१०, द होली बायबल.