व्हिडिओ पाहण्यासाठी

पृथ्वीचा कधी नाश होईल का?

पृथ्वीचा कधी नाश होईल का?

बायबलचं उत्तर

 नाही. पृथ्वीचा कधीही नाश होणार नाही. ती आगीने भस्म होणार नाही किंवा दुसरा कोणताही ग्रह तिची जागा घेणार नाही.

  •   “नीतिमान लोकांना पृथ्वीचा वारसा मिळेल, आणि ते तिच्यावर सर्वकाळ राहतील.”​—स्तोत्र ३७:२९.

  •   “त्याने पृथ्वीला तिच्या पायांवर स्थिर केलंय; आपल्या ठिकाणावरून ती कधीच हलवली जाणार नाही.”​—स्तोत्र १०४:५.

  •   ‘पृथ्वी सर्वकाळ राहते.’​—उपदेशक १:४.

  •   “खऱ्‍या देवाने आकाश निर्माण केलं, [त्याने] पृथ्वी घडवली, तिला बनवलं आणि तिला स्थिर केलं, [त्याने] पृथ्वी विनाकारण बनवली नाही, तर तिच्यावर लोकांनी राहावं म्हणून तिला घडवलं.”​—यशया ४५:१८.

माणसं पृथ्वीचा नाश करतील का?

 प्रदूषण, युद्ध किंवा दुसऱ्‍या कोणत्याही मार्गाने देव माणसांना पृथ्वीचा पूर्णपणे नाश करू देणार नाही. उलट, तो “पृथ्वीचा नाश करणाऱ्‍यांचा नाश” करेल. (प्रकटीकरण ११:१८) हे तो कसं करेल?

 आज मानवी सरकारं पृथ्वीचं संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे देव या सरकारांना काढून त्यांच्या जागी सर्व दृष्टीने परिपूर्ण असं स्वर्गातलं एक राज्य किंवा सरकार आणेल. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) देवाचा मुलगा येशू त्या राज्याचा राजा असेल. (यशया ९:६, ७) येशू पृथ्वीवर होता तेव्हा त्याने असे चमत्कार केले, ज्यांवरून दिसून आलं की नैसर्गिक शक्‍तींवरही त्याचं नियंत्रण आहे. (मार्क ४:३५-४१) भविष्यातसुद्धा देवाच्या राज्याचा राजा या नात्याने, पृथ्वीवर आणि नैसर्गिक शक्‍तींवर त्याचं पूर्णपणे नियंत्रण असेल. तो सगळं काही नवीन करेल आणि त्या वेळी ही पृथ्वी एदेन बागेसारखी होईल.​—मत्तय १९:२८; लूक २३:४३.

पृथ्वीचा आगीने नाश केला जाईल असं बायबलमध्येच सांगितलेलं नाही का?

 नाही, बायबलमध्ये असं सांगितलेलं नाही. पण २ पेत्र ३:७ या वचनाचा योग्य अर्थ न समजल्यामुळे बऱ्‍याच जणांचा असा गैरसमज होतो. त्या वचनात म्हटलंय, “आकाश आणि पृथ्वी अग्नीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.” या वचनाचा नेमका अर्थ समजून घेण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या.

  1.   बायबलमध्ये “आकाश,” “पृथ्वी” आणि “अग्नी” हे शब्द फक्‍त एकाच अर्थाने वापरलेले नाहीत. जसं की, स्तोत्र ९७:१ यात म्हटलंय “पृथ्वी आनंदित होवो.” इथे “पृथ्वी” हा शब्द मानवांना किंवा लोकांना सूचित करतो.

  2.   दुसरं पेत्र ३:७ या वचनात आकाश, पृथ्वी आणि अग्नी या शब्दांचा काय अर्थ होतो हे आपल्याला मागची-पुढची वचनं वाचल्यावर कळतं. ५ व्या आणि ६ व्या वचनात नोहाच्या काळात झालेल्या जलप्रलयाबद्दल सांगितलंय. त्या वेळी पूर्ण जगाचा नाश झाला, पण पृथ्वी ग्रह नाहीसा झाला नाही. उलट, त्या जलप्रलयात “पृथ्वी” म्हणजेच दुष्ट मानवांचा नाश झाला होता. (उत्पत्ती ६:११) तसंच, एका अर्थाने त्या वेळी ‘आकाशाचा’ म्हणजे मानवांवर राज्य करणाऱ्‍यांचाही नाश झाला होता. पण पृथ्वी ग्रहाचा नाही, तर फक्‍त दुष्ट लोकांचा नाश झाला. नोहा आणि त्याचं कुटुंब त्या नाशातून वाचलं आणि जलप्रलयानंतर त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी ही पृथ्वी व्यापून टाकली.​—उत्पत्ती ८:१५-१८.

 त्या जलप्रलयाप्रमाणेच, २ पेत्र ३:७ यात उल्लेख केलेल्या ‘अग्नीमुळे’ किंवा नाशामुळेही भविष्यात पृथ्वी ग्रह नाही, तर जगातले दुष्ट लोक नाहीसे होतील. देवाने ‘नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीचं’ वचन दिलंय आणि तिथे “न्यायनीती टिकून राहील.” (२ पेत्र ३:१३) त्या वेळी ‘नवीन पृथ्वी’ म्हणजे एक नवीन मानवी समाज असेल. आणि त्याच्यावर ‘नवीन आकाश’ म्हणजेच एका नवीन सरकारचं शासन असेल. ते सरकार म्हणजे देवाचं राज्य. देवाच्या राज्यात ही पृथ्वी एक नंदनवन बनेल आणि तिथे शांतिपूर्ण वातावरण असेल.​—प्रकटीकरण २१:१-४.