व्हिडिओ पाहण्यासाठी

मोठं संकट काय आहे?

मोठं संकट काय आहे?

बायबलचं उत्तर

 मोठं संकट मानवजातीवर आजपर्यंत कधीही आला नाही असा कठीण काळ आणेल. बायबलच्या भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे मोठं संकट “शेवटच्या दिवसांत” किंवा “अंताच्या” काळात येईल. (२ तीमथ्य ३:१; दानीएल १२:४) ते “जगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आलं नाही आणि पुन्हा कधीही येणार नाही असं मोठं संकट” असेल.—मार्क १३:१९; दानीएल १२:१; मत्तय २४:२१, २२.

मोठ्या संकटादरम्यान होणाऱ्‍या घटना

  •   खोट्या धर्माचा नाश. अतिशय झपाट्याने खोट्या धर्माचा नाश होईल. (प्रकटीकरण १७:१, ५; १८:९, १०, २१) संयुक्‍त राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणाऱ्‍या राजकीय सत्ता खोट्या धर्माचा नाश करून देवाची इच्छा पूर्ण करतील.—प्रकटीकरण १७:३, १५-१८. a

  •   खऱ्‍या धर्मावर हल्ला. यहेज्केलच्या पुस्तकात राष्ट्रांच्या एका समूहाला ‘मागोग देशाचा गोग’ म्हटलंय. तो खऱ्‍या धर्माचं पालन करणाऱ्‍यांचा नाश करायचा प्रयत्न करेल. पण, देव त्याच्या उपासकांना यातून वाचवेल.—यहेज्केल ३८:१, २, ९-१२, १८-२३.

  •   पृथ्वीवरच्या लोकांचा न्याय. येशू पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांचा न्याय करेल आणि “जसा मेंढपाळ मेंढरांना बकऱ्‍यांपासून वेगळं करतो, तसा तो लोकांना एकमेकांपासून वेगळं करेल.” (मत्तय २५:३१-३३) येशूसोबत भविष्यात राज्य करणाऱ्‍या त्याच्या ‘भावांना’ प्रत्येक जण पाठिंबा देईल की नाही, यावर त्यांचा न्याय केला जाईल.—मत्तय २५:३४-४६.

  •   येशूसोबत राज्य करणाऱ्‍यांना गोळा केलं जाईल. येशूसोबत राज्य करण्यासाठी ज्या विश्‍वासू जणांना निवडण्यात आलंय, त्यांचं पृथ्वीवरचं जीवन संपल्यानंतर त्यांना स्वर्गातल्या जीवनासाठी पुन्हा उठवलं जाईल.—मत्तय २४:३१; १ करिंथकर १५:५०-५३; १ थेस्सलनीकाकर ४:१५-१७.

  •   हर्मगिदोन. ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धाला’ ‘यहोवाचा दिवससुद्धा’ म्हटलंय. (प्रकटीकरण १६:१४, १६; यशया १३:९; २ पेत्र ३:१२) वाईट गोष्टी करणाऱ्‍यांचा येशू नाश करेल. (सफन्या १:१८; २ थेस्सलनीकाकर १:६-१०) यात जगभरातल्या राजकीय व्यवस्थेचासुद्धा समावेश आहे. या व्यवस्थेला बायबलमध्ये सात डोक्यांच्या जंगली पशूने सूचित करण्यात आलंय.—प्रकटीकरण १९:१९-२१.

मोठ्या संकटानंतर होणाऱ्‍या घटना

  •   सैतान आणि दुष्ट स्वर्गदूतांना कैद केलं जाईल. एक स्वर्गदूत सैतान आणि दुष्ट स्वर्गदूतांना ”अथांग डोहात” टाकून देईल. यावरून हे सूचित होतं की ते मृत्यूसारख्या निष्क्रिय अवस्थेत राहतील. (प्रकटीकरण २०:१-३) अथांग डोहात सैतानाची अवस्था कैदेत असल्यासारखी असेल. त्यामुळे तो दुसऱ्‍या कशावरही प्रभाव करू शकणार नाही.—प्रकटीकरण २०:७.

  •   हजार वर्षांची सुरूवात. मग देवाच्या राज्याचा १००० वर्षांचा काळ सुरू होईल. आणि या काळात पृथ्वीवरच्या लोकांना बरेच आशीर्वाद मिळतील. (प्रकटीकरण ५:९, १०; २०:४,) कोणालाही मोजता येणार नाही असा ”मोठा लोकसमुदाय” ”मोठ्या संकटातून बाहेर” येईल. ते देवाच्या राज्याची हजार वर्षं सुरू होताना पाहतील.—प्रकटीकरण ७:९, १४; स्तोत्र ३७:९-११.

a प्रकटीकरणाच्या पुस्तकात खोट्या धर्माला मोठी बाबेल, ‘मोठी वेश्‍या’ असं म्हटलंय. (प्रकटीकरण १७:१,) मोठ्या बाबेलचा नाश करणारा गडद लाल रंगाचा जंगली पशू अशा संघटनेला सूचित करतो जिचा उद्देश जगातल्या राष्ट्रांना एकत्र करून त्यांचं प्रतिनिधित्व करणं हा आहे. या संघटनेला आधी लीग ऑफ नेशन्स म्हटलं जायचं. पण आता संयुक्‍त राष्ट्रसंघ म्हटलं जातं.