येशूला देवाचा मुलगा का म्हटलंय?
बायबलचं उत्तर
बायबलमध्ये बऱ्याचदा येशूला “देवाचा मुलगा” असं म्हटलंय. (योहान १:४९) पण माणसं जसं मुलांना जन्म देतात, तसं देवाने येशूला जन्म दिला असं बायबल शिकवत नाही. तर “देवाचा मुलगा” या शब्दांवरून असं दिसून येतं, की देव निर्माणकर्ता आहे आणि त्यानेच सर्वांना म्हणजे येशूलाही जीवन दिलं.—स्तोत्र ३६:९; प्रकटीकरण ४:११.
बायबलमध्ये स्वर्गदूतांनाही “देवाची मुलं” असं म्हटलंय. (ईयोब १:६, तळटीप) तसंच, बायबलमध्ये पहिला मानव आदाम यालाही “देवाचा मुलगा” असं म्हटलंय. (लूक ३:३८) पण देवाच्या मुलांमध्ये येशू सगळ्यात खास आहे, असं बायबल म्हणतं. कारण सृष्टीत सर्वात आधी देवाने येशूला निर्माण केलं होतं आणि तो एकटाच असा आहे ज्याला स्वतः देवाने निर्माण केलं.
पृथ्वीवर जन्म होण्याआधी येशू स्वर्गात राहत होता का?
हो, पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात राहत होता. आणि त्याचं एक अदृश्य शरीर होतं. येशू स्वतः म्हणाला होता: “मी स्वर्गातून . . . आलोय.”—योहान ६:३८; ८:२३.
देवाने दुसरं काहीही निर्माण करण्याआधी, सगळ्यात पहिले येशूला बनवलं. म्हणून येशूबद्दल बायबल असं म्हणतं:
“तो . . . सगळ्या गोष्टींत पहिला जन्मलेला आहे.”—कलस्सैकर १:१५.
तो “देवाच्या निर्मितीची सुरुवात” आहे.—प्रकटीकरण ३:१४.
भविष्यवाणीमध्ये ज्याच्याबद्दल असं म्हणण्यात आलं होतं, की “त्याचा उगम प्राचीन काळापासून, फार पूर्वीच्या दिवसांपासून आहे,” तो येशूच होता.—मीखा ५:२; मत्तय २:४-६.
पृथ्वीवर येण्याआधी येशू काय करत होता?
स्वर्गात त्याचं एक मानाचं स्थान होतं. म्हणूनच एकदा प्रार्थना करताना येशू म्हणाला: “बापा, हे जग अस्तित्वात येण्याआधी, . . . मला जसा गौरव मिळत होता, तसाच गौरव आताही तू मला तुझ्याजवळ दे.”—योहान १७:५.
त्याने सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी आपल्या पित्याला मदत केली. येशूने एका ‘कुशल कारागिरासारखं’ देवासोबत मिळून काम केलं. (नीतिवचनं ८:३०) म्हणूनच येशूबद्दल बायबल असं म्हणतं: ‘त्याच्याद्वारेच स्वर्गात आणि पृथ्वीवर, सगळ्या गोष्टी निर्माण करण्यात आल्या.’—कलस्सैकर १:१६.
देवाने येशूच्या द्वारे बाकीच्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्या. जसं की इतर स्वर्गदूत, तसंच आकाश आणि पृथ्वी. (प्रकटीकरण ५:११) देवाने आणि येशूने सोबत मिळून कसं काम केलं, हे समजून घेण्यासाठी एका आर्किटेक्टचं आणि बिल्डिंग बांधणाऱ्याचं उदाहरण घेता येईल. आर्किटेक्ट बिल्डिंगचा नकाशा तयार करतो आणि बिल्डिंग बांधणारा त्याप्रमाणे बांधकाम करतो.
तो “शब्द” होता. पृथ्वीवर येण्याआधी येशू स्वर्गात होता. स्वर्गातल्या त्याच्या जीवनाबद्दल बोलताना बायबल त्याला “शब्द” असं म्हणतं. (योहान १:१) याचा अर्थ देव येशूच्या द्वारे आपले विचार आणि सूचना इतर स्वर्गदूतांना कळवायचा.
तसंच पृथ्वीवर असताना येशूने मानवांनाही देवाचे विचार कळवले. उदाहरणार्थ, एदेन बागेत आदाम आणि हव्वाला सूचना देताना देव या ‘शब्दाद्वारे’ म्हणजेच येशूद्वारे बोलला असावा. (उत्पत्ती २:१६, १७) तसंच, जुन्या काळात इस्राएली लोकांना ओसाड रानात मार्ग दाखवणारा स्वर्गदूतसुद्धा येशूच असावा, ज्याचं त्यांनी लक्ष देऊन ऐकायचं होतं.—निर्गम २३:२०-२३. a
a देव फक्त “शब्द” म्हटलेल्या स्वर्गदूताद्वारेच बोलला असं नाही. उदाहरणार्थ, त्याने जुन्या काळात इस्राएली लोकांना त्याचे विचार कळवण्यासाठी, इतर स्वर्गदूतांचाही वापर केला.—प्रेषितांची कार्यं ७:५३; गलतीकर ३:१९; इब्री लोकांना २:२, ३.